ओशो सांगतात,
बोधिधर्माला एक शिष्य म्हणाला, “प्रभू, सकाळी सकाळी जिव्हेवर बुद्धाचं नाव आलं की किती प्रसन्न वाटतं.”
बोधिधर्म शिसारी आल्यासारखा चेहरा करून म्हणाला, “ते नाव घेतल्यावर नीट खळखळून चूळ भरत जा.”
शिष्य चमकून म्हणाला, “हे काय अजब बोलताय, महाराज?”
बोधिधर्म म्हणाला, “खरं तेच बोलतोय. साधनेमध्ये कधी बुद्ध वाटेत दिसला, तर वाट बदलत जा चटकन्.”
आता शिष्य संतापला आणि म्हणाला, “तुम्ही साक्षात गौतम बुद्धांबद्दल असं कसं बोलू शकता?”
बोधिधर्म म्हणाला, “बोलू शकतो? अरे, मी करून दाखवलंय. माझ्या साधनेत बुद्धाचा व्यत्यय यायचा तर मनोमन तलवारीने खांडोळ्या करून टाकल्यात मी त्याच्या. आता त्याची हिंमत होत नाही माझ्या आसपास फिरकण्याची.”
शिष्याने हे ऐकून हायच खाल्ली, तो डोकं धरून बसला.
मग थोड्या वेळाने बोधिधर्म शिष्याला समजावत म्हणाला, “अरे, हे केलं नाही तर ‘तुम्हीच दीप बना’ ही त्याची शिकवण बाजूला ठेवून आपण त्याचाच दिवा करून त्याच्या प्रकाशात फिरत बसतो. त्यातून काहीच सापडत नाही.”
शिष्य चाचरत म्हणाला, “पण आताच तुम्ही बुद्धमूर्तीची पूजा केलीत. संध्याकाळीही दिवा लावाल, श्रद्धेने नमनही करत असता तुम्ही बुद्धांना. हे कसं?”
बोधिधर्म म्हणाला, “आयुष्यात सर्वोच्च शिकवण देणारा गुरू तोच आहे ना? त्याला वंदन नको करायला? पण मी त्याचा दिवा बनवून नाही ठेवलेला. भले मिणमिणत्या प्रकाशाचा का असेना, माझा दिवा मीच आहे.”