ओशो सांगतात,
एका भिक्षूने झेन गुरू जोशूला विचारलं, “बुद्ध म्हणजे काय?”
जोशू म्हणाला, “तो बाहेरच्या दालनात आहे.”
भिक्षू म्हणाला, “पण बाहेर तर बुद्धाचा पुतळा आहे. फक्त मातीचा एक गोळा. तो बुद्ध नव्हे. बुद्ध म्हणजे काय?”
जोशू म्हणाला, “तो बाहेरच्या दालनात आहे.”
भिक्षू म्हणाला, “हे मूर्खासारखं उत्तर आहे.”
जोशू म्हणाला, “बरोबर. मूर्ख प्रश्नाला मूर्ख उत्तरंच देता येतात. बुद्धत्व ही आंतरिक जागृती आहे. ती ज्याची त्याला त्याच्या आतून स्फुरते. तिची काही व्याख्या नाही, अवर्णनीय आहे. ती जाणीव आहे. म्हणून ‘बुद्ध काय आहे’, असं विचारणारा ज्या पातळीवर आहे, त्या पातळीवरचंच उत्तर त्याला मिळणार.”