ओशो सांगतात,
एका साधूने जपानमध्ये बुद्धाच्या शिकवणीचा जपानी भाषेत अनुवाद करण्याचा घाट घातला. प्रकल्प मोठा होता. बुद्धाच्या शिकवणीचे सगळे ग्रंथ सार्थ स्वरूपात जपानी भाषेत आणण्यासाठी भाषापंडितांची आणि धर्मपंडितांची गरज होती. त्यांना त्या कामाचं मानधन द्यावं लागणार होतं. साधू तर संपूर्णपणे कफल्लक होता. त्याने गावोगावचा दौरा सुरू केला. बुद्धाची शिकवण सांगणं, त्या शिकवणीचा जपानीमध्ये अनुवाद होणं किती आवश्यक आहे हे पटवून देणं आणि या कामासाठी देणगी मिळवणं, असं काम त्याने सुरू केलं. दहा वर्षं चिकाटीने फिरल्यावर दहा हजार मुद्रा जमा झाल्या.
अनुवादाच्या कार्याला प्रारंभ होणार, तेवढ्यात देशात मोठा दुष्काळ पडला. साधूने जमवलेली सगळी रक्कम दुष्काळनिवारणाच्या कामात, उपाशीतापाशी लोकांना दोन वेळचं अन्न मिळवून देण्यात खर्च केली.
साधूने पुन्हा दौरा सुरू झाला. लोक विचारायचे, ‘अनुवादाचं कुठवर आलंय?’ तो सांगायचा, ‘पहिली आवृत्ती झाली.’ पुन्हा तेच चक्र. पुन्हा दहा वर्षं गेली. पुन्हा १० हजार मुद्रा गोळा झाल्या. अनुवादाला हात घालणार तोच मोठा भूकंप आला. देश उद्ध्वस्त झाला. साधूने सगळी रक्कम भूकंपाच्या पीडितांवर, पुनर्वसनाच्या कामावर खर्च केली.
एव्हाना साधूने सत्तरी गाठली होती. तरीही तो तिसऱ्यांदा त्याच कामाला लागला. लोक विचारायचे, ‘अनुवादाचं काय झालं?’ साधू म्हणायचा, ‘दुसरी आवृत्ती आली.’ पुन्हा दहा वर्षं खपून त्याने १० हजार मुद्रा गोळा केल्या आणि त्यातून खरोखरच बुद्धाच्या शिकवणीचं जपानी ग्रंथरूप आकाराला आलं.
लोक साधूला विचारायचे, ‘‘तुम्ही तीस वर्षं झटून हा प्रकल्प उभारलात. तुमच्या कामाबद्दल समाधानी आहात का?’’
साधू म्हणायचा, ‘‘भगवानांच्या शिकवणीच्या पहिल्या दोन आवृत्त्या अतिशय श्रेष्ठ होत्या. त्यामानाने तिसरी फक्त बरीच आहे म्हणायची.’’
