आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

‘मी’ मम सरणं गच्छामि

  • प्रशांत खुंटे
  • 06.12.25
  • वाचनवेळ 10 मि.
prashant khunte

मी मुळीच दैववादी नव्हतो. आजही नाही. पण हल्ली मी देवळांसमोरून जाताना चारचौघांसारखा देवाला नमस्कार करू लागलो. पण असं करताना स्वत:ची शरमही वाटते. एक मन म्हणतं हे असं खोटं सांत्वन का म्हणून? दुसरं पुटपुटतं त्यातून एक आंतरिक शक्ती मिळावी अशी माझी कामना आहे. तुला पटत नसल्यास तू शांत राहा. पण हे सगळं कृत्रिमही वाटतं. आपल्या मनाला येणारी ही बेगडी भावना आहे असंही वाटतं. मनातून उठलेल्या या वक्ररेषेचं एक आवर्तन पूर्ण व्हावं किंवा त्यापुढे जाऊन आणखी वलयं त्याभोवती गिरवावीत या इच्छेनं मी आज बसलो आहे.

भौतिकवादी मनुष्याचा आपल्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असतो. किंबहुना तसा असायला हवा. मग मनुष्याला ईश्वर संकल्पनेची गरज उरत नाही. जगामध्ये घडणारी स्थित्यंतरं ही ईश्वराची ‘लीला’ नसून, माणूस स्वत:च इतिहास घडवतो. म्हणून आपला विश्वास इंद्रियगम्य ज्ञानावर असायला हवा. श्रद्धेमुळे बुद्धी बोथट होते, स्वातंत्र्य बाधित होते आणि माणसाची प्रगती खुंटते. मला हे जडवादी विचार पटतात. खरंतर माझ्यातील एकाला हे विचार पटतात असं मला म्हणावं लागेल. आणि तरीही माझ्यातील एकजण देवाला नमस्कार करू लागला. अगदी कुठल्याही, कोणाच्याही. रस्त्यावरून जाताना मदर मेरीची शुभ्र मूर्ती दिसली की आता मी सहजच एक हात छातीशी नेतो. मग विनाकारण तो भुवयांच्या मध्ये टेकवतो. दुरून महादेवाची टेकडी दिसली की हेच करतो. अनेकदा मी त्या टेकडीवर बसून एकांत भोगत राहिलोय. पण आधी कधी देवळात जाऊन दर्शन वगैरे घेणं मला खुळचट वाटायचं. ती छोटीशी टेकडीही मला उंच वाटायची आणि त्या टेकडीवरच्या महादेवाकडे पाठ करून मी शहराचे नित्य व्यवहार न्याहाळत बसायचो. पायऱ्या चढताना धाप लागूनही ‘शंभो.... भोलेनाथ’ म्हणून ओरडणाऱ्यांकडे मी विस्मयाने पाहायचो. पण आता तसं वाटत नाही. त्या दगडी पिंडीच्या थंडगार कठड्यावर मस्तक टेकवताना मी मात्र वेगळंच पुटपुटतो, “ठाऊक आहे तू दगड आहेस. पण तरीही तू आहेस, जसा आहेस तसा आहेस, आणि खराच असशील तर घे!! आता माझाही नमस्कार घे!” ही कसली अवस्था आपल्याला इथंपर्यंत घेऊन येते? खरंच ही नामुश्की आहे. जबर अपमानित करणारी नामुश्की... पण सामान्य कुवतीचा माणूस खरंच काय करू शकतो? आपण होत चाललोत तसलाच हा एक दगड? असे दोन दगड एकमेकांजवळ आल्यास काही चेतना निर्माण होत असतील काय? हा दगड माणसाच्या पूर्वावस्थेचं प्रतीक आहे की उत्तरावस्थेचं रूप?

माझे वडील वारले त्यावर आता काही दिवस उलटून गेले आहेत. त्यांनी आम्हांला श्रेष्ठ संस्कार देण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी जाणिवेतील संस्कार. आमच्या छोट्या घरात ठळक जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे आंबेडकर, गौतम बुद्ध, फुले आणि शिवाजी यांचे मोठाले फोटो. तीच जणू आमच्या कुटुंबाची दैवतं होती. बापूंच्या, माझ्या वडिलांच्या शोकसभेत त्यांची आठवण सांगताना आमचे नातलग बौद्धाचार्य कांबळे गुरुजी गहिवरले होते. आमच्या गावी एकदा ते बापूंसोबत गेलेले. गावातल्या भैरोबाच्या देवळातील मंडपात सर्व दैवतांच्या तसबिरी ओळीनं अडकवल्या होत्या. त्यात आंबेडकरांचाही फोटो होता. तो फोटो माझ्या वडिलांनी ग्रामस्थांना भेट दिला होता. आता वाटतं आंबेडकर हेच आमचं दैवत होतं किंवा आहे. आम्ही घरात वंदना घ्यायचो. त्रिशरण-पंचशील तोंडपाठ म्हणायचो. अगदी अलीकडेपर्यंत मला त्याचा अर्थ माहीत नव्हता. बापूंनाही माहीत असेलच असं काही ठामपणे सांगता येणार नाही. पण आम्ही देव मात्र नक्कीच मानत नव्हतो. आम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी मानत होतो. मानवी संबंधांना उज्ज्वल अवस्थेला नेऊ पाहणाऱ्या व्यक्ती आमच्या त्या देव्हाऱ्यात होत्या. आणि तरीही, तरीही मी आता देवळांसमोरून जाताना हा असा झालो. माझं हे नीतिच्यूत होणं आहे की भोवतालच्या परिसरात बिनतक्रार सामील होणं? आंबेडकरांनी बौद्ध धम्माचं केलेलं पुनरुज्जीवन का फोफावत नाही, याचं एक उत्तर माझ्यासारख्यांच्या व्यवहारातून मिळू शकेल. पण माणसाच्या भोवतालचा निसर्ग, परिस्थिती त्याच्या असण्याचं स्वरूप ठरवतो. कुठलाही मानवी व्यवहार पोकळीत अवतरत नाही. तो केवळ चालू परिस्थितीचं अपत्य असतो. माझ्यासमोर मात्र निराळा प्रश्न आहे. हे अपत्य औरस आहे की अनौरस? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बळ कसं मिळवावं? हे भय कसं गिळावं? माझ्या मनाचे सगळेच पापुद्रे मी इथे सोलू इच्छित नाही. आपलं मन सारखं असं उघडणं ही एक प्रकारची अश्लीलताच आहे. इथं मी केवळ मनानं घेतलेलं एक वळण जरा तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.

खरंतर मी मुळात भित्राच आहे किंवा होतो म्हणूयात हवं तर. शाळेत जाताना रस्त्यात गुबूगुबू वाजवत, अंगावर आसुडाचे फटके मारत नाचणारा पोतराज पाहून मी रडू लागायचो. भाऊ मला ओढत त्याच्या देव्हाऱ्याकडे न्यायचे. मी टाचा घसटत, डोळे घट्ट मिटून घ्यायचो. आमच्या वस्तीतल्या एका कुटुंबाच्या घरात नवनाथाचं ठाणं होतं. तिथं एकाचवेळी खूप लोकांच्या अंगात यायचं. त्यांच्या आरोळ्या, ढोल आणि पावलांच्या आवाजानं आमच्या घरातील जमीन हादरायची. मी खूप घाबरायचो. आईला घट्ट धरायचो आणि आई मला उचलून सरळ त्या घराजवळ नेऊन त्यांना पाहा म्हणायची. रमजानच्या महिन्यात पहाटे फकीर लोक जेव्हा खंजिरी वाजवत काहीतरी गात यायचे तेव्हाही माझं हेच व्हायचं, आणि आई पुन्हा हेच करायची. मला अंथरुणातून उठवून त्या फकीराला पाहा म्हणायची.

यातून जाणिवांचं एक निराळंच मिश्रण माझ्यात गोठून राहिलं असावं. उताऱ्याचे नारळ खाणं, मुद्दामहून लिंबू ओलांडणं हे मी आवर्जून करायचो. पण एका रात्री मित्र नको म्हणत असताना मी एक उतारा लाथाडला. त्या उताऱ्यातील टरबूज हातात घेतलं. त्या फळाचा त्रिकोणी काप मी उचलला, त्यातून रक्त सांडल्याचा भास मला झाला. अंगावर सर्रकन काटा आला. अनाहूतपणे आलेलं ते भय होतं. फळात घातलेलं कुंकू मला क्षणभर रक्तासारखं वाटलं. मी घाबरून चटकन ते फळ खाली फेकलं. माझ्या या मूळच्या भेदरट स्वभावामुळे असेल कदाचित, मी आजकाल माझ्या विवंचनांवर उपचार म्हणून देवाला नमस्कार करू लागलो. माणूस म्हणून आपल्या क:पदार्थ असण्याचा स्वीकार करू लागलो.

एक काळ होता, मी भगतसिंगाच्या ‘मी नास्तिक का आहे’ या लेखातील ‘उतारा’ वाचून भारावलो होतो - ‘माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे. म्हणून मी आशावादी आहे. प्रेषितांविषयी बोलावयाचे झाल्यास, जर त्यांनी पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता, तर जगाची अशी दुर्दशा दिसली नसती जी आज आपण पाहात आहोत. प्रेषितांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याऐवजी आकाशात स्वर्ग दाखविला. म्हणून ते निर्माते होऊ शकत नाहीत. आजचा मानव हवेत महाल बांधू इच्छित नाही. त्याने आपल्या स्वर्गाचा पाया पृथ्वीच्या याच भक्कम जमिनीवर खणण्यास सुरुवात केली आहे. आजचा प्रत्येक मानव प्रेषित आहे. म्हणून माझा मानवावर विश्वास आहे.’ मला हे विचार भावतात. पण भगतसिंग अतिशय निराळ्या, क्रांतिकारी भूमिकेतून हे विचार प्रकट करीत आहेत. मानवी वस्तीचं रम्य असं स्वप्न ते पाहात आहेत. परिवर्तनाच्या विचारानं सतत झपाटलेल्या सळसळत्या कम्युनिस्टाचे ते विचार आहेत.

माझा भोवताल वेगळाच आहे. मनुष्य जीवनाला एकाच एका सरळ रेषेत पाहणं मला जमेनासं झालं आहे. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. कसलेही गुणावगुण-मूल्य न चिकटवता एक परिस्थितीशरण अशी माझ्या मनाची अवस्था झाली आहे. याची कबुली देणं मला भाग आहे. म्हणून असेल कदाचित मी देवाला नमस्कार करू लागलो. व्यक्तिगत जीवनातील खिन्नता माणसं जेव्हा बाह्य जगातही पाहू लागतात तेव्हा अशी अवस्था अनुभवणं पदरी येत असावं.

मी जेव्हा परिस्थितीशरणतेबद्दल बोलत आहे तेव्हा केवळ भोवतालच्या परिस्थितीला दोषी ठरवण्याचा माझा इरादा नाही. एक दिवस मृत्यू येणाऱ्या माणसानं देव कल्पनेला शरण जाणं हे त्याचं भागधेयच आहे. याचाही एक अनुभव मी घेतला आहे.

माझ्या वडिलांच्या शेवटच्या आजारपणानं मला हे कष्टप्रद सत्य सांगितलं. त्यांची शेवटची अवस्था मला समजली होती. आता होईलतो त्यांचं सगळं करावं हे माझ्या मनानं घेतलेलं. त्यांना आधी कानाला यंत्र लावल्याशिवाय ऐकू येत नसे. आता त्या यंत्राची गरजच उरली नव्हती. वाचा गेली होती. कसलेसे आवाज घशातून येत राहत. मूत्रपिंडं निकामी झाली होती. शरीराला जोडलेल्या पिशवीत लघवी साठायची थांबली की समजून घ्या, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि मी मायेनं त्यांना जेऊ-न्हाऊ घालू पाहात होतो. त्या शेवटच्या महिन्यात त्यांच्या-माझ्यात कसलं नातं निर्माण झालं होतं सांगता यायचं नाही. मी जे जे त्यांच्याशी बोलीन ते ते त्यांना यंत्राशिवाय जणू कळत होतं. त्यांच्या गरजा मला समजत असाव्यात. त्या दिवसांमध्ये मी सर्वांत जास्त देवळात गेलो. मी थकलोही होतो. दोनेक महिने आम्हां दोघांनाही झोप नव्हती. मृत्यूचा वास त्यांच्या माझ्या वातावरणात भरून गेला होता. मी त्यांना पावडर लावून तो घालवू पाहात होतो. ते काही बोलायचा सतत प्रयत्न करायचे, पण शब्द येत नसत. ते गेले त्याच्या आदल्या रात्री मी त्यांचं नॅपकीन बदलायला म्हणून त्यांना एका कुशीवर करू लागलो. तेव्हा खूप प्रयासानं त्यांच्या तोंडून एक करुण, व्याकूळ शब्द आला - “देवा...”

सन्मानानं जगलेल्या माणसावर अशी अवस्था यावी याबद्दल त्यांना वाटलेली ती परावलंबी, असहाय जाणीव असावी किंवा जर देव असेलच तर त्याला दिलेली ती शिवीही असावी. आयुष्यभर देवाचं नाव न घेतलेल्या माझ्या वडिलांचा तो शब्द ऐकून मी क्षणभर थरारून गेलो. त्या अनुभवाचं संचित घेऊन आज मला वाटत आहे की, देव ही केवळ शोषणासाठी निर्मिलेली कल्पना नाही. ती मानवी मनातील अपरिहार्य जाणीव आहे. लोक त्या जाणिवेला धर्माशी, झुंडशाहीशी जोडून मतलब साधू पाहतात. पण म्हणून ती भावनाच टाकाऊ मानण्याची गरज नाही. माणूस हाच जर भौतिक जगाचा केंद्रबिंदू मानला तर, माणसाचं मन हे भौतिकाचाच भाग मानायला हवं, त्या मनातून स्फुरलेल्या देवासारख्या कल्पनाही भौतिकच मानायला मग काय हरकत आहे? ज्ञानेश्वरांनी, ‘तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्यतत्त्वे’ असं याच भावनेतून म्हटलं असेल का?

पण आंबेडकरी जाणीव माझं मन कुरतडत राहते. वावटळीत उडालेल्या कस्पटासारखं मन भिरभिरत राहतं. अशावेळी, ‘तुका म्हणे होय, मनासी संवाद, आपुलाचि वाद, आपणासी’ असं सांगत तुकाराम माझ्या आधाराला येतात.

बोधी प्राप्त केल्यानंतर बुद्धांच्या मनात एक विचार आला होता म्हणे, “मी हा गंभीर, सहजपणे अनुभवता येणार नाही, सुलभतेने जाणता येणार नाही असा, उत्तम, तर्कांनी प्राप्त करता येणार नाही असा, निपुण आणि जाणकारांना जाणता येईल असा धम्म प्राप्त केला आहे. परंतु ही प्रजा कामतृष्णेमध्ये रमणारी, मग्न राहणारी आणि आनंद मानणारी आहे. अशा प्रजेच्या दृष्टीने प्रतीत्यसमुत्पाद समजणे अवघड आहे. सर्व संस्कारांचे शमन, सर्व उपाधींचा त्याग, तृष्णेचा क्षय, आसक्तीचा नाश, दु:खाची समाप्ती आणि निब्बान यांचे तिला आकलन होणेही अवघड आहे. मी जरी धम्माचा उपदेश केला, तरी ती तो जाणू शकणार नाही. मला क्लेश आणि पीडा होईल....” गौतम बुद्धांच्या मनाची ही अवस्था वाचताना मला वाटू लागतं, बुद्ध मला ओळखत होते. चांगलाच ओळखत होते.

भूक, प्रजनन, भय आणि आक्रमकता या मानवाच्या मूलभूत प्रेरणा आहेत. असं कुठल्याशा वर्तनशास्त्रज्ञाचं मत माझ्या कानावरून गेलं आहे. एक माणूस म्हणून माझ्या वर्तनातही या प्रेरणा आहेत. यातून निर्माण झालेल्या गुंत्यांना तोंड देताना मी थकून जातो. अशा मनाला जर कुणा अतिमानवी शक्तीची गरज भासली, तर माझ्यातल्या इहवाद्यानं आक्षेप घेऊ नये, असं मला वाटू लागलं आहे.

मी जो होऊ शकत नाही, जे असण्याची माझ्यात कुवत नाही, ते बाहेर शोधणं, त्याचं पूजन करणं, किमान तेवढी पात्रता येण्याची प्रार्थना करणं, हे देवत्व संकल्पनेतील गम्य मला आवडू लागलं आहे. आपल्याकडून कुणाचे हक्क लाथाडले जाऊ नयेत, आपलं जीवन समृद्ध करताना इतरांचं ओरबाडलं जाऊ नये, एवढं आत्मबळ माझ्यात यावं, माझी ही प्रार्थना स्वीकारली जावी यासाठी मला कुणाचेही देव चालतील.

काही असो, आता या अवस्थेतील बोच तशीच ठेवून मी वावरतो. माझ्या नियतीचं खापर फोडायला एखादा दगड हेरून ठेवतो. इतर कुणाहीसारखं मला माझ्या अंतर्विश्वातील माझं प्रतिबिंब छळतं. ही उलघाल का उत्पन्न होते? वास्तवापलीकडे विश्वात (पर्यायाने जीवनात) काही रहस्यमय असावं, हे मला पटत नाही. पण अनुभवजन्य विश्वाच्या पल्याडचं काहीतरी असायला हवं, नाहीतर आपल्या असण्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही, असं स्वत:च्या अस्तित्वालाच रहस्यमय करून टाकणारी गरजही आपल्यात दडून असावी. ही मानसिक (आध्यात्मिक?) गरज कल्पित रहस्यांना जीवनाचं अंग करून टाकत असावी.

कधी वाटतं, जगणं ही व्याधी आहे तसा आनंदही. विरक्तीनं, रूक्षपणानं त्यातली मजा निघून जाईल आणि केवळ मजा घेण्यानं स्वत:वर बलात्कार होतील. म्हणून माझे पाय मातीचे आहेत, हे सत्य स्वत:ला पटवीत मी मलाच शरण येतो. चारचौघांसारखा देवळांसमोरून जाताना नमस्काराचा अभिनय करतो. तरीही मी दैववादी नव्हतो आणि नाही. मी माझ्यात द्वंद्व घडवणाऱ्या मानवी प्रेरणेला शरण आलो आहे. ‘मी’ मम सरणं गच्छामि..

(अनुभव, मार्च २००८च्या अंकातून साभार)

प्रशांत खुंटे | prkhunte@gmail.com

प्रशांत खुंटे हे मुक्त पत्रकार असून समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

दिनानाथ 08.12.25
प्रशांत तुझ्या बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली. तुझे अनुभव वाचून काही तरी वेगळंच वाटलं, नेमकं शब्दात नाही सांगता येणार ते. मात्र एक गोष्ट खटकली की अजूनही आंबेडकरी विचार देवदेवतांचा, त्यायोगे येणाऱ्या रूढीपरंपरांना हेटाळणं ह्या पलीकडे जातच नाहीये. मान्य आहे की हजारो वर्ष हा रूढी परंपरेच्या मक्तेदारांनी शूद्र ठरवून अस्पृश्य करून काही लोकांना निम्नस्तरात ठेऊन त्यांचं अतोनात शोषण केलं. पण त्याचवेळी हेही सत्य आहे की ह्या देवदेवतांवर श्रद्धा ठेवणारा बराचसा वर्ग अनैतिक गोष्टींपासून स्वतःला सावरू शकला आहे, दूर ठेऊ शकला आहे. त्यामुळे तुझी श्रद्धा नसली काही हरकत नाही पण चुकून देवाच्या पाया पडल्या म्हणून तू स्वतःला जबर अपमानाची नामुष्की, बापूनी देवाला दिलेली शिवी अस नव्हतं लिहायचं. मी देवावर श्रद्धा ठेवतो (कर्मकांडावर नाही), पण म्हणून मी काही खुश होणार नाही की अगतिक होऊन शेवटी प्रशांतला देवाला मानावाच लागलं. बुद्ध काय देव काय जबरदस्ती करून पचनी पाडण्याचा विषयच नाहीये. ज्याची त्याची अनुभूती आणि जाणिवेचा विषय आहे तो. ते काही शब्द सोडले तर तुझं लिखाण मला अगदी मनापासून आवडलं... खरंच. पुनश्च बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results