आम्ही कोण?
काय सांगता!  

जिथे बॉम्ब फुटले तिथेच गुलाब फुलवले

  • प्रीति छत्रे
  • 10.06.25
  • वाचनवेळ 2 मि.
rose of sarajevo

सारायेवो (Sarajevo) ही बॉस्निया-हर्जेगोविना या दक्षिण युरोपीय देशाची राजधानी. पूर्वी बॉस्निया-हर्जेगोविना हा युगोस्लाविया या देशाचा एक भाग होता. राजकीय आणि आर्थिक अस्थैर्यामुळे १९९१-९२ मध्ये युगोस्लाविया फुटला. पुढे दशकभर तिथे वांशिक युद्धं होत राहिली. त्या युद्धांचा सर्वात मोठा फटका बॉस्निया-हर्जेगोविनाला बसला.

युद्धादरम्यान सारायेवो शहराला तब्बल चार वर्षं वेढा पडला होता. त्या काळात शहरावर मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा मारा केला गेला. त्यात हजारो नागरिक मारले गेले. तोफगोळे काँक्रीटच्या रस्त्यावर फुटले की तिथे रस्ता उखडला जायचा; त्या स्फोटाच्या खुणा तयार व्हायच्या. शहरात जागोजागी असे खड्डे आणि खुणा तयार झाल्या होत्या.

युद्ध संपून सारायेवो शहराचा वेढा उठल्यावर, तिथल्या नागरिकांनी एक आगळीवेगळी गोष्ट केली. तोफगोळ्यांच्या मार्‍याने जिथे जिथे तीन किंवा अधिक लोक मारले गेले होते तिथल्या स्फोटांच्या खड्ड्यांमध्ये त्यांनी भडक लाल रंगाचं रेझिन ओतलं. ते खड्डे रेझिनने भरून टाकले. लाल रेझिनमुळे तिथे फुलांसारखे आकार तयार झाले. त्या लोकांनी त्याला नाव दिलं- Rose of Sarajevo- सारायेवोचा गुलाब.

बघता बघता सारायेवो शहरात असे अनेक युद्ध-गुलाब फुलले. आज तिथे जाणार्‍या पर्यटकांना आवर्जून हे गुलाब दाखवले जातात. युद्धात सारायेवो शहराने नक्की काय गमावलं याची ती एक कायमस्वरूपी आठवण बनली आहे.

जगभरातलं अशा प्रकारचं हे एकमेव युद्धस्मारक असेल.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results