
“I was part of something really unique..”
- गॅरी कास्पारोव्ह
१७ फेब्रुवारी १९९६ यादिवशी जागतिक बुद्धीबळातली एक आगळीवेगळी घटना घडली. तत्कालीन जागतिक विजेता गॅरी कास्पारोव्ह याने एका संगणकाला बुद्धिबळ सामन्यात हरवलं. त्या संगणकाचं नाव ‘डीप ब्लू’.
१० ते १७ फेब्रुवारी १९९६ दरम्यान कास्पारोव्ह आणि डीप ब्लू यांच्यात बुद्धिबळच्या सहा गेम्स खेळवल्या गेल्या. १० फेब्रुवारीच्या पहिल्या गेममध्ये ‘डीप ब्लू’ चक्क जिंकला. नंतर मात्र कास्पारोव्हने दोन गेम्स बरोबरीत सोडवल्या. पुढच्या तीन गेम्स सुद्धा कास्पारोव्हनेच जिंकल्या आणि तो सामन्याचा विजेता ठरला.
‘डीप ब्लू’ची निर्मिती फेंग-झियॉन्ग झू या संगणकशास्त्रज्ञाची होती. त्यासाठी त्याला IBM कंपनीचं सहकार्य मिळालं. फेंग कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटीत PhD करत असताना त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी मिळून पहिल्यांदा बुद्धिबळ खेळू शकणारा संगणक तयार केला. त्यात सुधारणा करत करत पुढे ‘डीप ब्लू’ तयार झाला. त्याचा आकार एका फ्रीजइतका होता.
संगणकासोबत बुद्धिबळ खेळणं याचं आज फार नावीन्य वाटणार नाही. पण तेव्हा ती एक अभूतपूर्व घटना होती. Man v/s Machine या द्वंद्वाला १७ फेब्रुवारी १९९६ यादिवशी नवीन परिमाण मिळालं.
मशीन काय काय करू शकतं, याची झलकही पुढच्या काही महिन्यांत दिसली. ‘डीप ब्लू’च्या निर्मात्यांनी त्यात बर्याच सुधारणा केल्या. त्याचा वेग दुप्पट केला गेला. आणि मे, १९९७ मध्ये पुन्हा एकदा कास्पारोव्हबरोबर त्याचा एक सामना खेळवला गेला. या सामन्यात मात्र कास्पारोव्हला हार पत्करावी लागली. हे देखील ‘something unique’च.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.