
प्लास्टिक कचरा ही आज जगाला व्यापून असणारी समस्या आहे. प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी अनेकपरींनी प्रयत्न चालू आहेत; पण यातले बरेचसे प्रयत्न हौशी पातळीवर राहतात आणि त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. पण अमिता देशपांडे हिने सुरू केलेला ‘री-चरखा’ हा उपक्रम मात्र त्याला अपवाद आहे. कचऱ्यातल्या प्लास्टिक पिशव्यांपासून धागा तयार करून त्याची विविध उत्पादनं तयार करण्याचं काम ‘री-चरखा’ करतं. या कामाला रीसायकलिंग नव्हे, तर अपसायकलिंग म्हटलं जातं. (पण सोईसाठी पुढे रीसायकलिंग हा शब्द वापरला आहे.) ‘री-चरखा’च्या विविध आकार-प्रकाराच्या पर्स-बॅग्ज-कुशन कव्हर्स-बसकरं-टेबल मॅट्स आणि अशी आणखी नाना उत्पादनं पर्यावरणाला घातक ठरणारं प्लास्टिक कमी करण्याचं काम करताहेत. आकड्यांमध्ये सांगायचं तर ‘री-चरखा’ने लाखो प्लास्टिक पिशव्या सत्कारणी लावून पर्यावरणाची हानी रोखली आहे; पण त्यापलीकडे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल जागृती करून लोकांना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी मदत करणं, हे अमिताचं मुख्य उद्दिष्ट आहे.
अमिता देशपांडे मूळची सिल्व्हासा गावची. ही केंद्रशासित दादरा नगर हवेलीची राजधानी असली तरी शहर म्हणण्यापेक्षा गावंच; पण तिथेही प्लास्टिकचा उपद्रव होताच. शाळेत असल्यापासून अमिताचं लक्ष परिसरात अस्ताव्यस्त पडणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याकडे जात असे. त्याच्या दुष्परिणामांबद्दल माहिती कळत असल्यामुळे ती त्या वयातही अस्वस्थ होत असे. आपल्या सगळ्यांसारखीच. पण अमिताचं वेगळेपण असं की ही अस्वस्थता तिने बाजूला सारली नाही. उलट, प्लास्टिक कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा भुंगा तिला कायम व्यापून राहिला. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेताना ती एकीकडे पर्यावरण संरक्षणाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभाग घेत होती, तर दुसरीकडे अभ्यासामध्ये जिथे जिथे शक्य तिथे प्लास्टिक रीसायकलिंगच्या प्रकल्पांवर काम करत होती. उच्चशिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली आणि पुढे तिने तिथेच काही काळ नोकरीही केली. तेव्हाही तिथे प्लास्टिक रीसायकलिंगसाठी सुरू असलेलं काम समजून घेण्यावरच तिचा भर होता.
भारतात परतल्यावर अमिताने एक गोष्ट नक्की ठरवलेली होती की प्लास्टिक रीसायकलिंगच्या क्षेत्रातच काम करायचं. आपल्याकडे प्लास्टिकपासून सहसा कलाकुसरीच्या गोष्टी तयार करण्याचंच काम चालतं. त्यातून भेटवस्तू वगैरे तयार होतात, पण तो सगळा हौसेचा मामला असतो. त्यातून प्लास्टिकचा फारसा पुनर्वापर होत नाही. अमिताला ते नको होतं. प्लास्टिकचा पुनर्वापर करून लोकांच्या उपयोगी पडतील अशी उत्पादनं तयार झाली पाहिजेत आणि त्यातून ग्रामीण भागात रोजगारही तयार झाला पाहिजे, असं तिला वाटत होतं. त्यातूनच प्लास्टिकचा धागा तयार करून त्यातून वस्तू बनवण्याची कल्पना पुढे आली.
प्लास्टिक रीसायकलिंगची शोधाशोध करत असताना अमिताने काही ठिकाणी प्लास्टिकपासून धागा तयार करण्याचे उपक्रम पाहिले होते. मग टिकाऊ धागा तयार करण्याच्या दृष्टीने शोधाशोध सुरू झाली. प्लास्टिकचा धागा तयार करू शकेल असा चरखा, तो धागा विणून कापड तयार करू शकणारा हातमाग आणि हे काम करता येणारा- इतरांना शिकवू शकणारा माणूस, एवढी पहिली गरज होती. चरखा आणि हातमाग विकत मिळणं अवघड नव्हतं; पण त्यावर प्लास्टिकचा वापर करण्यासाठी त्यात काही बदल करावे लागणार होते. हे काम सिल्व्हासाच्या आसपास उभं करावं आणि त्यातून तिथल्या आदिवासींना रोजगार मिळावा अशी अमिताची इच्छा होती. त्यामुळे आदिवासींना हे काम शिकवणारा माणूसही हवा होता. खूप शोधाशोध केल्यावर पुण्यात चरख्यावरून सूत कातायला शिकवणारे एक म्हातारे गृहस्थ मिळाले आणि या प्रवासाला सुरुवात झाली.
सुरुवातीचा मोठा काळ धडपडण्याचा, ट्रायल अँड एरर्सचा होता. प्लास्टिकचा धागा तयार करण्याचं आणि तो विणण्याचं आव्हान एकीकडे होतं, तर दुसरीकडे व्यवसाय म्हणून हा उपक्रम यशस्वी करण्याचं. दोन्हीकडे इनोव्हेशन आणि चिकाटीची गरज होती. अमिता आणि तिचे सहकारी दोन्ही परीक्षांमध्ये पास झाले. सुरुवातीला काही मर्यादित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून विक्री सुरू झाली. उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेत जम बसल्यावर मग वेगवेगळ्या वस्तू तयार करून बघण्यावर भर दिला गेला. आज ‘री-चरखा’मध्ये जवळपास वस्तू तयार होतात.

प्लास्टिकच्या धाग्यांपासून तयार झालेल्या वस्तू हा म्हटलं तर भन्नाट-युनिक असा प्रकार आहे. पण तरीही तो लोकांच्या पसंतीस उतरणं, त्यांनी तो विकत घेणं आणि त्या बळावर उद्योगाचं चक्र सुरू राहणं ही गोष्ट सोपी नाही. चहुदिशांना ऑनलाइन विक्रीचा मारा होत असताना, देशा-परदेशांतले लाखो ब्रँड्स एका क्लिकसरशी उपलब्ध असताना या बाजारपेठेत स्वतःची जागा तयार करायची होती. त्यात अमिताचा आग्रह होता, की ही उत्पादनं तयार करणाऱ्या कारागिरांना योग्य मोबदला देता येईल, अशाच किमती असल्या पाहिजेत. त्यामुळे साहजिकच री-चरखा’ची उत्पादनं इतरांपेक्षा महाग आहेत, असं ग्राहकांना सुरुवातीला वाटायचं. (आजही काही प्रमाणात ती तक्रार असतेच.) पण प्लास्टिकचा पुनर्वापर आणि आदिवासी गरजूंना रोजगार ही दोन महत्त्वाची कामं आपण पार पाडत असल्याने त्यासाठी ही किंमत लोकांनी द्यायला हरकत नाही, यावर अमिता ठाम राहिली. त्यासाठी ‘री-चरखा’च्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला. प्लास्टिक गोळा कसं केलं जाते, ते स्वच्छ कसं होतं, त्याच्या पट्ट्या तयार करून धागा कसा तयार होतो, त्याचं कापड कसं विणलं जातं, एक पर्स तयार करायला कारागिरांना किती वेळ लागतो, हे सगळं ‘री-चरखा’ने डॉक्युमेंट केलं. त्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. या उत्पादनांची विक्री करतानाही प्रत्येक वस्तूमुळे किती लोकांना किती दिवसांचा रोजगार मिळालाय आणि त्या वस्तूसाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या गेल्या आहेत, याची माहितीही दिलेली असते. या कामाचं महत्त्व कळणारे अनेक ब्रँड अँबॅसेडर्स आपापल्या सोशल मीडियावरून त्याबद्दल लिहीत राहतात. त्यामुळे हळूहळू लोकांना या कामाचं मोल कळू लागलं आहे. ‘री-चरखा’ स्थिरावलं आहे. प्लास्टिक पुनर्वापर आणि वंचितांना रोजगार ही दोन्ही उद्दिष्टं जास्तीत जास्त साध्य करण्यासाठी धडपडतं आहे.
सध्या ‘री-चरखा’ची दोन शॉपिंग आऊटलेट्स आहेत. एक, पुण्यात कर्वेनगरमध्ये, तर दुसरं, मुंबईत . त्याशिवाय वेबसाइटवरूनही या वस्तू ऑनलाइन घेता येतात. सिल्व्हासाखेरीज आता भोरजवळच्या एका गावातही ‘री-चरखा’चं उत्पादन (सूतकताई आणि विणकाम) सुरू होत आहे. तिथल्या स्थानिक महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे.
अर्थात, हे काम म्हणजे प्लास्टिकच्या समस्येवरचा तोडगा नव्हे, याचीही अमिताला जाणीव आहे. ती म्हणते, “प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो याचा अर्थ तुम्ही मनमर्जी प्लास्टिक वापरा, असा होत नाही. कचऱ्यात जाणाऱ्या प्लास्टिकच्या तुलनेत असा पुनर्वापर जवळपास नगण्य म्हणावा असाच आहे. त्यामुळे पुनर्वापर हा तोडगा नाहीये. आपण धोका फक्त काही काळासाठी पुढे ढकलतो आहोत एवढंच. त्यामुळे डिस्पोजेबल प्लास्टिक वापर शक्य तितका कमी करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. त्याबद्दल जागृती व्हावी यासाठी आम्ही ‘माय इकोसोशल प्लॅनेट’ ही संस्था सुरू केली आहे. ‘री-चरखा’तून मिळणारा फायदा या कामासाठी वापरला जातो.”
माय इकोसोशल प्लॅनेटच्या माध्यमातून अमिता आणि सहकारी (अमिताचा नवरा अभिषेक परांजपेही नुकताच या टीममध्ये दाखल झाला आहे.) विविध पातळ्यांवर काम करताहेत. सध्या ताडोबाच्या परिसरातही प्लास्टिक कचऱ्याबाबत जागृती करण्याचं काम चालू आहे. शाळकरी मुलांना प्लास्टिकच्या धोक्यांची जाणीव देणं हे त्यातलं महत्त्वाचं काम. शाळकरी वयात हा प्रश्न भिडल्यामुळेच अमिताने हे काम उभं केलं हे विसरून चालणार नाही. इनोव्हेटिव्ह मंडळी सतत नवं काही तरी करण्याच्या मागे असतात. कुणी सांगावं, प्लास्टिक कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी अमिता पुढच्या काळात इनोव्हेशनचा आणखी पुढचा टप्पाही गाठेल.
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.