“मेरा नाम अमजद। पूरा नाम अमजद मुराद गोंड।” डोक्यावर भगवी स्कलकॅप घातलेला तो कव्वाल सांगतो, “हम राजगोंड हैं। आदिवासी हैं हम।” आपलं नाव, पेशा, पेहराव मुसलमानी, पण आपण राजगोंड आहोत हे सांगणाऱ्या या कव्वालच्या बोलण्यात कुठलाच अभिनिवेश जाणवत नाही.
कव्वालीबद्दल बोलताना मात्र त्याचा नूर पालटतो. “कव्वाली पे कौन नहीं झूमता? कव्वाली ऐसी चीज है जिसे सब पसंद करते हैं। हरेक को मज़ा आता है।” अमजद गालात पानाचा विडा ठेवत म्हणतो, “पब्लिक को खुश करने का, बस्स!” जिभेवर पानाचा रस घोळताच त्याचा चेहरा उजळतो.
कव्वालीचं नातं रुहानी. सुफी परंपरेतून कव्वाली परमात्म्याशी तादात्म्य पावली. हल्ली ती अधूनमधून टॅलेंट शोमधून दिसते. ही कव्वाली वेगळीए : रुमानी! इन्स्टा रील्सवरून व्हायरल होणारी. ती आता प्रेमानुरंजनात अधिक रमतेय. पण दर्ग्यात गाणाऱ्या अमजदची कव्वाली तिसऱ्याच प्रकारची. तिला ‘खानाबदोशी' म्हणता येईल. उदरनिर्वाहासाठी भटकत ती अमजदपर्यंत आलीए.
मांडीवर बाळासारखी ठेवलेली ढोलकी, मनगटाला घुंगरू, असा अमजद पुण्याजवळच्या खेड शिवापूर इथल्या कमर अली दुर्वेश दर्ग्यावर दिसला. तो गात होता- ‘पाओ में बेड़ी, हाथों में कड़ा रहने दो, उसको सरकार की चौखट पे पड़ा रहने दो..' चाल ओळखीची वाटली. कान देऊन ऐकल्यावर ‘नाजायज' सिनेमातलं ‘अभी जिंदा हूँ तो जी लेने दो, भरी बरसात में पी लेने दो' हे गाणं आठवलं.
दर्ग्यावर आलेले भक्त ‘हा बॉलिवुडच्या चालीवर कव्वाली गातोय' यावर आक्षेप घेत नाहीत. उलट, ते दहा-वीसच्या नोटा अमजदच्या पुढ्यात टाकतात. दुआ केली, चादर चढवली, माथा टेकला की दर्ग्याचे सेवेकरी भाविकांच्या हातावर तिळगूळ देतात. मुजावर मोरपिसांच्या झाडूने सवालींच्या झुकलेल्या माथ्या-खांद्यांवरून इडापिडा झटकून लावतात. तेव्हा जसं मजारवर एखादी नोट अर्पण होते, तसंच कव्वालांच्या पुढ्यातही पैसे टाकणं भाविकाला एक कर्तव्य वाटत असावं.
अमजद सांगतो, “इस दर्गा पे सेठ लोग ज्यादा आते हैं।” दर्ग्याकडेच्या वाटेवर फुलांची चादर वगैरे विकणाऱ्यांची दुकानं. हे विक्रेते फोर व्हीलरसाठी खास पार्किंग सुविधा पुरवतात. यावरूनही बऱ्या आर्थिक वर्गातील भाविकांची इथे वर्दळ असावी हे समजतं. त्यामुळे हे श्रद्धास्थान रोजगाराचंही केंद्र बनणं ओघानेच आलं.
हेही वाचा - हुई मुद्दत के गालिब मर गया- पर याद आता है
पीर कमर अली दुर्वेशच्या दरबारात भेदभाव नाही. दर्ग्याच्या पायऱ्यांवर एखादा फकीर भिक्षा मागतो तसाच एखादा अंध, कुणी पांगळा बसलेला दिसतो. एखादी गैरमुस्लिम, काष्टा नेसलेली म्हातारीही आढळते. सर्वांवर हजरतची रेहमत सारखीच बरसते. मुजावरना मिळतं, तसंच फकीर, विकलांग, अनाथ नि कव्वालांनाही दान मिळतं.
अमजद भिक्षेकरी नाही, कलाकार आहे. तो सकाळी अकराला दर्ग्याच्या चबुतऱ्यासमोर बैठक मारतो. हळूहळू भाविकांची वर्दळ वाढत जाते. दुपार चढते तसतशी चबुतऱ्याभोवतीची शुभ्र ग्रॅनाइटची जमीन तापते. सवालींचे अनवाणी पाय भाजू लागतात. दर्ग्याला प्रदक्षिणा घालणारे चटचट पाय उचलून दुडूदुडू चालतात. या प्रदक्षिणा घालणाऱ्यांत हिंदू भाविक जादा आढळतात.
महिलांना मजारजवळ प्रवेश नाही म्हणून बुरख्यातील महिला चबुतऱ्याच्या व्हरांड्यात बसकण मारतात. डोळे मिटून कुराणाची आयत पुटपुटत बंदगी करतात. या बायकांशेजारीच एखादी खेडूत हिंदू बाई घुमू लागते. तिच्या अंगात पीराचं वारं येतं. या वातावरणाला बॅकग्राऊंड म्युझिक हवं. नाद-ठेका नसेल तर खुदाचा नूर गाभाऱ्यात अखंड तेवणारी पणती नि धुपारतीपुरताच दरवळत राहील.
एक श्रद्धा आहे, मजारसमोरच्या चिरागमधील तेल लावलं तर विंचू-सापाच्या जहरचा असर उतरतो. अर्थातच अँटिव्हेनम उपचारांची सोय नव्हती, त्या काळी ही श्रद्धा रूढ झाली असणार. आता दवाखान्यांचा सुळसुळाट आहे, पण इलाज परवडत नाही. कुणाला मूलबाळ नाही. कुणाची सून, सासू, नणंद, सासरा, नवरा- कुणी ना कुणी कुणाला तरी छळतं. कुणाचं कुणी हरवलेलं सापडत नाही.
हा समुदाय पाहून वाटतं, कित्येकांच्या मनातली एकतारी तुटलीये. दर्ग्यावर आणलेले काही मनोरुग्णही दिसतात. जीवनाची तार जुळावी म्हणून ही माणसं
दुर्वेश दरबारात आलीत. यांच्या आर्जवांना कव्वालीचा ठेका मिळतो, धुन सापडते हे किती थोर! नकळत आपल्याही मनात कव्वालीचा नाद घुमतो. आरती गाताना वाजते, तशीच कव्वालीसोबत ब्रह्मानंदी टाळी वाजू लागते.
अमजदचे स्वर कानांत घुमतात...
“इल्लल्ला की शराब नजर से पिला दिया, मैं इक गुनाहगार था सुफी बना दिया, सूरत में मेरे आ गई...सूरत फकीर की...ये नज़र मेरे पीर की... ये नज़र मेरे पीर की...”
हेही वाचा - अभिजात संगीत वादनाचं आगळंवेगळं फ्युजनः प्रोजेक्ट अनहद
माइक नाहीए, तरी अमजदचा आवाज घुमटावरील कळसापर्यंत सहज पोचतोय. सोबतीला ना कुणी झिलकरी, ना कुणी दाद, वाहवाही देणारे. पूर्ण सोलो परफॉर्मन्स. एकानंतर दुसरी, लागोपाठ तिसरी कव्वाली. जुहर व मगरिब, अर्थात दुपार व संध्याकाळच्या नमाजापुरता अमजद विश्राम घेतो. प्रार्थनेच्या वेळी गाणं-बजावणं अशोभनीय मानतात, म्हणून अमजद तेवढा वेळ थांबतो, एरवी रात्री आठपर्यंत तो गातो.
या माणसाचा गळा बसत नसेल असं वाटतं. जणू याच्या छातीत फुफ्फुसांचं हार्मोनियम आहे. अमजदने दोन गाण्यांच्या मध्ये मिनिटभर वक्फा घेताच मी बोलण्याकरता वेळ मागितली. ‘मी पत्रकार आहे, मुलाखत हवीय' असं सांगितल्यावर अमजद म्हणाला, “मेरेकू कुछ देना पडेंगा क्या?” हे विचारताना त्याने तर्जनीवर अंगठ्याची टकटक करत नोटांची खूण केली. मी खजील झालो. मान नकारार्थी हलवून वेळ घेतली नि पुन्हा कव्वाली ऐकत बसलो.
आता तो हल्लीची लोकप्रिय कव्वाली गाऊ लागला- “ताजदारे हरम, हो निगाहें करम...हम गरीबों के दिन भी सँवर जाएंगे....आप के दर से ख़ाली अगर जाएंगे... ”
‘ख़ाली अगर जाएंगे' या ओळीतला गर्भितार्थ जाणवला. त्यामुळे गाणाऱ्याशी बोलायची उत्सुकता आणखीनच वाढली. पण अर्थातच तो गायचं सोडून मुलाखत कशी देणार? म्हणून मी दुसऱ्या दिवशीची वेळ घेतली. ठरलेल्या वेळी पुन्हा दर्ग्यावर गेलो. अमजदशी प्रत्यक्ष बोलण्यापूर्वी मनात रहेमतुल्ला पीर कमर अली
दुर्वेश घोळवत राहिलो.
सुमारे सातशे वर्षांपूर्वी हजरत शिवापूरला आले तेव्हाची एक आख्यायिका सांगतात, गावात एक सैतान होता. लोक त्याला कंटाळले होते. गावकऱ्यांनी सैतानापासून मुक्ती द्यायची विनंती औलियांना केली. असं म्हणतात, या सुफी संताने त्या सैतानाला एका दगडात कैद केलं नि शाप दिला : “ता कयामत तक मेरे नाम से लोग तुझे उठा उठा के पटकते रहेंगे। तू लोगों को परेशान किया करता था। अब जो सवाली मेरे दरबार में आएंगे वो तुझे मेरे नाम से पटकेंगे।” तेव्हापासून दर्ग्यासमोरचा ९० किलोचा दगड कुणीही अकरा लोक तर्जनी लावून उचलतात. ‘याऽ कमर अली दुर्वेऽश' अशी आरोळी देऊन आपटतात. बोटाने उचललेला दगड श्रद्धाळूंना चमत्काराची प्रचिती वाटतो.
बहुधा म्हणूनच इथे नेहमीच गर्दी असते. असं ठिकाण अमजदसारख्या कव्वालांना उदरनिर्वाहाची सोय करून देतं. शिवाय ‘औलिया बेऔलादों को औलाद देते हैं।' अशीही मान्यता आहे. अमजदचे भाऊबंदही याच मर्जवरील जडीबूटी विकणारे निघाले. योगायोगाने हेही एक नातं आहे.
दर्ग्याच्या आवारातच मशीद आहे. जवळच वजूखाना. अमजदने तिथे खळखळून वजू केली. मग माझ्याशी बोलायला आला. केसांचा बुचडा बांधला. डोईवर स्कलकॅप ठेवून म्हणाला, “मैं एक-दो म्हैने में आठ-दस दिन यहाँच ऱ्हैता।” दर्ग्याखाली बेसमेंटमध्ये पथारी पसरून काही दरवेशी झोपलेले. तिथेच उशा-पायथ्याला अमजदने बॅग ठेवली. त्याने बॅगेतून चटई काढून अंथरली. त्यावर बसत मी विचारलं, “मग घर कुठंय?” तो म्हणाला, “पाचोरा, जिला जळगाव।”
विकिपीडियावर ‘मुसलमान गोंड' ही टीप आढळते. त्यानुसार दाओ या आदिवासी जमातीचं नातं राजगोंड घराण्याशी होतं. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी या जमातीने इस्लाम कबूल केला. देवगढचे गोंड राजा भगतू शाह यांनीही इस्लाम स्वीकारला होता. १८व्या शतकात मराठ्यांनी यांची रियासत काबीज केली.
तर हे मूळचे राजगोंड आता मुसलमान गोंड मानले जातात. नागपूर इलाक्यात यांचे वारस आढळतात. जळगाव जिल्ह्यातही गोंडांचं वास्तव्य आहे. पण अमजदला या इतिहासाचा मागमूस नाही. रोजची जद्दोजहद करण्यात जिंदगी गुंतलेली. त्यामुळे या ऐतिहासिक दाखल्यांशी त्याचा संबंध येणं कठीण. तसंही या माहितीने त्याच्या आयुष्यात फरक काय पडणार?
आपली ओळख हिंदू की मुसलमान या फंदात अमजद पडलेला दिसत नाही. खरं तर धार्मिक भेदांपासून तो कोसो दूर वाटला. मी त्याच्या कुटुंबाबद्दल विचारलं. तो म्हणाला, “अब्बा हैं, दो माँ हैं। हम चार भाई, मेरे बाद शाहरूख, उसके बाद सेठ, फिर चार नंबर का बाबर। पाँच बहनों के बाद मेरा जनम हुआ।” मी विचारलं, “तुम्हा भावंडांची नावं मुस्लिम, मग तुम्ही आदिवासी कसे?” तो म्हणाला, “हमारे गोंड में नाम कुछ भी रख सकते। हमारा धरम कोई नहीं।” पण पुढचं वाक्य तो उच्चारतो, “हमारे धरम में जातपात नहीं मानते। हमारा कुछ अल्लग ही धरम है। राजगोंड बोलते हमको। हमारे में हिंदू और मुसलमानों के भी नाम रखते।”
हेही वाचा - एकतारीवरचा 'एकी'चा सूर
अमजद म्हणतो, “हमारे में शादी मुसलमान से नहीं, गोंड में ही होती है। मेरी बीवी चाँदनी गोंड है। मेरी एक बेटी का नाम लाजो, एक का नाम है आलिया और एक का नाम अलिमा। ये सब गोंड ही हुए ना!” नावांवरून धर्माची ओळख होते असं अमजदला वाटत नाही. तो पुराव्यादाखल आपल्या बहिणींचेही तपशील सांगतो. “मेरी सब से बड़ी बहन निशोरी। उसके बाद रेश्मा, फिर सौसाल, उसके बाद डिडोली और सबसे छोटी का नाम मेरी। अभी आप देखो, मेरे बहनों के नाम गोंड हैं। लेकिन सबसे छोटी का नाम किरिश्चन में आता है... हमारे में ऐसा कुछ नहीं। जो नाम अच्छा लगता वो रख देते...” सर्वांत थोरली निशोरी आता चाळिशीपार आहे, तर धाकटी तिशीत. या चौघींचीही लग्न गोंड मुलांशी झालीत.
अमजदची एकही बहीण शाळेत गेलेली नाही. बायकोही अशिक्षित. त्यामुळे त्याच्या मुलींच्या शिक्षणाबद्दल विचारलं. तो म्हणतो, “मेरी बच्चियाँ अभी तो सरकारी स्कूल में जाती हैं। लेकिन हम लडकियों को ज्यादा पढ़ाते नहीं।”
मुलांबद्दल विचारल्यावर अमजद सांगतो, “मेरे एक बेटे का नाम नवाज़, दूसरे का गरीब।” ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तींना जनसामान्यांनी ‘गरीब नवाज़' ही उपाधी दिलीय. अर्थात दीनदुबळ्यांचा कैवारी. या उपाधीची विभक्ती करत अमजदने आपल्या दोन मुलांचं नामकरण केलंय. तो म्हणतो, “नवाज़ तो अभी एक साल का भी नहीं हुआ। लेकिन गरीब को मैं पढाऊंगा। उसको मेरे जैसा भटकने नहीं दूंगा।” गरीबचं वय आठ. तो तिसऱ्या इयत्तेत आहे, पण बापासोबत हे मूलही अनेकदा कव्वाली गात भटकतं.
या कुटुंबातील सर्वच पुरुषांनी उदरनिर्वाहासाठी कव्वालीला जवळ केलंय. याच्यापर्यंत ही कला कशी पोचली असावी? अमजद सांगतो, “हमारे लोग जंगल से जडीबूटी ढूँढते हैं। किसी को औलाद नहीं होती, किसी को पुरानी बीमारी ऱ्हैती। ऐसे मरीज़ों को हम दवा देते हैं। हमारे गोंड लोग ऐसे हैं ना, मट्टी उठा के बेच देते हैं। हमारे लोग कान का मैल निकालने का भी काम करते। खजूर भी बेचते हैं। घर से निकल गए तो हज़ार-पाचसौ कमाकेच आते। लेकिन हमारे लोग पैसा उड़ा देते हैं। जमा नहीं करते। हमारा एक काम है ना एक धंदा। हमारे में बिलकुल भी किसी को नौकरी नहीं।”
रोजगाराचं स्थायी साधन नाही, या वास्तवाला भिडता भिडता अमजदच्या वडिलांना कव्वालीचा शोध लागला. तो सांगतो, “अब्बा मेरे दादा की तरह गाँव गाँव घुमते थे। कभी दवा, कभी खज़ूर बेचते थे। लेकिन अब्बा को गानाबजाने का शौक लगा। फिर वो कव्वाली की लेन में घुस गये। मैं बचपन से अब्बा के पीछे पीछे जाता था। कव्वाली के प्रोग्राम में बैठ बैठ के अब्बा गाने लगे। उनको देखकर मैं भी सीख गया। अभी मैं कम से कम बीस साल से कव्वाली गा रहा हूँ।”
“तो आप स्कूल नहीं गये?” मी विचारलं. अमजदने खिशातून चुन्याची पुडी काढली. बोटावरचा चुना जिभेला चाटवून तो म्हणाला, “मैं दूसरी-तिसरी तक गया स्कूल। फिर गयाच नहीं। लेकिन मैं पढ़-लिख सकता। इंग्लिश भी आता मेरेकू। मैं पढ़ा ऱ्हैता तो भोत आगे जाता। लेकिन पढ़ा नहीं। उसकी वजह से पीछे हैं हम।”
अमजद सांगतो, “हमारे गाँव में पचास घर गोंड के हैं। बाकी हिंदू, मुसलमान, जय भीम सब हैं। सब में पढ़े-लिख्खे मिलेंगे, हमारेमेंच कोई नहीं। सिर्फ मेरा एक भांजा पढ़ा है। शिवा उसका नाम। शिवा कम से कम पंधरवी-सोलहवी तक पढ़ा। वो मिल्ट्री में जाना चाहता है। लेकिन उधर उसका काम नहीं बना। अब वो पुलिस भरती में ट्राय कर रहा है।” अमजदच्या परिचयात-नात्यात एक तरी मुलगा आहे, जो करियर, शिक्षण वगैरेंचा विचार करतोय, ही सुखावणारी गोष्ट.
पण म्हटलं तर अमजदनेही डाऊनमार्केट का होईना एक करियर केलंयच. तो सांगतो, “हमारी पार्टी है- केजीएन कव्वाली पार्टी।” ख़्वाजा गरीब नवाज़ या आद्याक्षरांपासून केजीएन ही पार्टी अमजदने आपल्या भावंडांसह सुरू केली. लग्नकार्यात या पार्टीला काम मिळतं. मी विचारलं, “किती पैसे मिळतात?” अमजद म्हणाला, “जिसका प्रोग्राम रहेगा उसके हिसाब से पाँच-दस हजार मिलते। सुननेवाले भी पैसा छोड़ते। सब मिलाकर पंधरा-बीस हजार की कमाई हो जाती है।” अर्थातच हे पैसे ग्रुपमध्ये समान वाटले जातात. त्यामुळे प्रत्येकी तीन-चार हजारांहून जास्त वाट्याला येत नसावेत. लग्नसराई संपली की ‘प्रोग्राम' मिळणं बंद होतं. मग अमजदची पावलं पुण्याकडे वळतात.
शिवापूरचा दर्गा अमजदसाठी हमखास उत्पन्नाचं ठिकाण. इथे दर्ग्याखाली बेसमेंटमध्ये पथारी टाकून निवाऱ्याची सोय होते. तो म्हणतो, “उप्परवाला भूखा सुलाता नहीं।” मुराद पूर्ण झाल्यानिमित्त अनेकजण दर्ग्यावर लंगर करतात. त्यातून अन्नाची सोय होते. आठवडाभर दर्ग्यावर राहायचं, कव्वाली गायची, बेगमी कनवटीला बांधून घरी जायचं, अशी घडी त्याने बसवलीय. “किती कमाई होते?” विचारल्यावर अमजद म्हणाला, “कभी दस-पंधरा तो कभी बीस हजार भी। लेकिन ज्यादा की भूख अच्छी नहीं। ज्यादा पैसा रखेंगे कहाँ? चोरी हो गया तो? इसलिए जित्ता भी मिलता, समेटकर चले जाते हैं।”
“इतने में गुज़ारा हो जाता है?” मी विचारलं. तो म्हणाला, “हाँ, चल जाता है। फिर गाँव जा कर भी कामधंदा करते हैं।” याच्या मालकीची शेतजमीन नाही. मग कुठला कामधंदा असेल? त्याने सांगितलं, “रेडियम का काम करते।” “मतलब?” माझा प्रश्न. अमजदने उत्तर दिलं, “आरटीओ पे जा कर गाडियों पर रेडियम से नाम, नंबर निकालते।” मी विचारलं, “ही कला कुणी शिकवली?” तो म्हणाला, “हम क्या करते मालूम, कव्वाली प्रोग्राम तो हमेशा नहीं मिलता, तो हमने झोला उठाया, रेडियम खरीदा, फिरते फिरते कोई गाड़ी मिला, तो उसको दुल्हन जैसा सजा दिया।” अमजदने हा एक साइड बिझनेस शोधून काढलाय. त्यातही कला आहे. तीही रस्त्यावरचीच. कमाई जेमतेम.
या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग नाही. जीवन भणंग. पण भारतीय लोकशाहीने अशा माणसांच्या जीवनातही प्रकाश पोचवलाय. कसा ते अमजद सांगतो. “मेरे अब्बा गाँव के सरपंच हैं।” अर्थातच ग्रामपंचायत स्तरावरील आरक्षणामुळे हे घडलं असणार. अमजद म्हणतो, “अब्बा ने भोत अच्छे अच्छे काम किये। हमारी बस्ती में चिख्खल ऱ्हैता था। अब्बा ने रोड बना दिया।” पण आपल्या समाजबांधवांबद्दल एक नाराजीही अमजदच्या मनात आहे. तो म्हणतो, “सरपंच के आगे कौन जाता है क्या? हमारे लोग सुनतेच नहीं। हाथ में पैसा आया नहीं कि मुर्गी-मछली लाते। सब पैसा उड़ा डालते। सिरफ मौज करते। आगे की कोई नहीं सोचता।”
आपल्या समाजबांधवांनी एकीने पुढे जायला हवं, हा विचार अमजदला शिवलाय. हे जाणवल्यावर मी थोडा आगाऊपणा केला. अमजदच्या गुप्त मतदानाच्या हक्कावर अतिक्रमण करत विचारलं, “तो आप वोट किस पार्टी को देते हो?” तो म्हणाला, “पैले पंजा को करते थे। अभी तो बीजेपीच चल रहा है। जातवाले जो फैसला करते उसकोच वोट करते। जो चल रहा है वईच चल रहा है! हमको पोलिटिक्स से मतलब नहीं।”
मी अचानक विचारलं, “आप शराब पीते हो?” अमजद लगबगीने म्हणाला, “नहीं, नहीं। बिडी नहीं, शराब नहीं। हमारे भाई बिड्या पिते, पुड्या खाते, लेकिन मैं नहीं। कोई शौकीच नहीं गंदा।” मी म्हटलं, “पण सगळेच तर शौकपाणी करतात.” तो म्हणाला, “हम भोत अल्लग लेन में हैं। आदमी शराब पी के गाने बैठा तो उसका बेज्जती होता ना! तो कायको वैसा काम करने का! तो बचपन से आपुन शौक ही नहीं करे...” ही आशादायी गोष्ट.
मी शेवटचा प्रश्न विचारला, “आपकी पसंदीदा कव्वाली कौन सी है?” अमजद म्हणाला, “संस्कृत में जो कव्वाली ऱ्हैती ना वो मुझ को भोत अच्छी लगती। गाने में भी अच्छा लगता, सुनने में भी अच्छा लगता।” संस्कृत कव्वाली? मी आश्चर्य व्यक्त केलं. त्यावर अमजदने स्पष्टीकरण दिलं, “असलम साबरी ने गायी है ना... ‘किरपा करो महाराज'। कितना मीठा लगता! जो गीत दिल को छू लेता है वही संस्कृत होता है। कव्वाली भगवान के लिए गाओ या नबी के लिए, दिल को छू जाए, बस्स!”
ऊन चढू लागलेलं. दर्ग्यावर लोकांची वर्दळ वाढू लागलेली. चबुतऱ्यासमोर एक गट गोळा झाला. त्यातल्या कुणी डोईवर स्कलकॅप घातली, तर कुणी रुमाल बांधला. या मंडळींनी सैतानरूपी दगडाची ‘याऽ कमर अली दुर्वेऽश' अशी आरोळी ठोकून आदळआपट सुरू केली. मग मी अमजदची मुलाखत आटोपती घेतली.
कलेत कुणीही गुरू नाही, घराणं नाही. प्लॅटफॉर्म, मोठा चाहतावर्गही नाही. अशा या कलाकाराला त्याचं काम करू द्यावं, त्याचा उदरनिर्वाह चालावा, त्याने गात राहावं, पब्लिकने खूष व्हावं, ही दुवा करत मीही मनातल्या मनात ‘याऽ कमर अली दुर्वेऽश!' अशी घोषणा देऊन अमजदचा निरोप घेतला.
(अनुभव, जानेवारी २०२५च्या अंकातून साभार)
प्रशांत खुंटे | prkhunte@gmail.com
प्रशांत खुंटे हे मुक्त पत्रकार असून समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत.
