
आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी करणारी स्नेहल जोशी आईच्या कॅन्सर मृत्यूनंतर आतून हलली. लोकांचं दुखणं कमी करण्यासाठी फक्त पैसे देऊन उपयोग नाही, तर सेवाही योग्य पद्धतीने द्यायला हवी, हा विचार तिने केला. २०१७ पासून बिहारच्या पश्चिम चंपारण भागात तिने कामाला सुरुवात केली. आजवर हजारो गरीब आणि गरजू रुग्णांना तिने शारीरिक आणि मानसिक आजारातून बरं केलंय. तिच्या प्रवासाची ही स्पेशल स्टोरी.
स्नेहलचं मूळ गाव सांगली. घरी आई-वडील आणि मोठी बहीण शीतल. आई गृहिणी, तर वडील सरकारी नोकरदार. स्नेहलने बारावीनंतरच्या शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. त्याचवेळी स्नेहलच्या वडिलांनी पुण्यात बदली करून घेतली आणि सगळेच पुण्यात राहायला आले. पुण्यातील कमिन्स कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर स्नेहलला इन्फोसिस कंपनीत नोकरी मिळाली. आयटी क्षेत्र म्हटलं, की पगार भरपूर, हे गणित स्नेहलच्या बाबतीतही जुळून आलं. या क्षेत्रातील कामाच्या अनुभवावर तिने पुढे अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत दोन वर्षं नोकरी केली. त्यानंतर मात्र आईला कॅन्सरचं निदान झालं आणि स्नेहलने अमेरिका सोडली.
२०१२ ते २०१६ या वर्षांत आईची देखभाल करत स्नेहलने घर सांभाळलं. २०१६ साली आईचा मृत्यू झाल्यानंतर मात्र स्नेहल फार अस्वस्थ झाली. आईच्या उपचारांदरम्यान दवाखान्यात सतत जावं लागायचं. तिथे येणाऱ्या लोकांचं दुःख पाहून यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, असं तिला वाटायचं. आईच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच स्नेहल आणि शीतलने दवाखान्यासाठी देणगी दिली. मात्र आपल्याला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे, याची जाणीव स्नेहलला होती.
दरम्यानच्या काळात डॉ. गौरव झा यांच्याशी स्नेहलची योगायोगाने गाठ पडली. डॉ. झा यांचं मूळ गाव बिहारमधील पश्चिम चंपारण भागातील रामनगर. हा भाग बिहार-नेपाळ सीमेजवळ येतो. डॉ. झा दिल्लीतील जी.बी.पंत हॉस्पिटलमध्ये काम करायचे. मात्र गावाकडील दुर्गम आदिवासी पट्ट्यात काम करण्याची गरज त्यांना दिसत होती. तिथे स्वतःचा दवाखाना सुरू करावा, असा त्यांचा विचार होता. ग्रामीण भागातील आरोग्यसुविधांच्या प्रकल्पाचा कच्चा आराखडा घेऊन ते पुण्यात आले होते. ग्रामीण भागात दवाखाना सुरू करण्यासाठी पैशांची तजवीज आणि आवश्यक ती सर्व यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांना एका चांगल्या प्रेझेंटेशनची गरज होती. स्नेहलने ती जबाबदारी स्वतःकडे घेतली. तिला वैद्यकीय क्षेत्रातील कामाची काहीच माहिती नव्हती. मात्र आयटीमधील व्यवस्थापन कौशल्याच्या अनुभवाच्या जोरावर तिने झा यांना उपयोगी पडेल असं प्रेझेंटेशन बनवून दिलं. ते करताना तिने कमी पैशांत चांगली आरोग्यसुविधा देणाऱ्या काही मॉडेल्सचा अभ्यास केला. आपणही या प्रकल्पासाठी काम करावं असा विचार तिच्या मनात आला. डॉ झा यांनी तिला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला.

२०१७ मध्ये डॉ गौरव झा आणि त्यांच्या काही सहकार्यांसोबत स्नेहलही रामनगरला गेली. सुरुवातीचे काही महिने स्नेहलने तो ग्रामीण भाग धुंडाळून काढला. तिथल्या वैद्यकीय सेवेची भयावह परिस्थिती तिला दिसली- ४०-५० किलोमीटरच्या परीघात चांगल्या दवाखान्याची सोय नाही, दुर्गम भाग असल्याने डॉक्टर किंवा नर्सेस काम करायला तयार नाहीत, रात्री-बेरात्री लोकांना कुठलीच वैद्यकीय मदत मिळण्याची शक्यता नाही.. ही परिस्थिती बदलायचा विचार करूनच डॉ. झा यांनी दिल्ली सोडून गाव गाठलं होतं.
गावात नवा दवाखाना सुरू करायचा तर आर्थिक मदत मिळवण्याबरोबरच दवाखान्याची इमारत, तिथे लागणाऱ्या वस्तू, प्रशिक्षित स्टाफ या सगळ्याची जुळवाजुळव करणं गरजेचं होतं. डॉ झा, स्नेहल, इतर दोन नर्सेस आणि झा यांचे तीन सहकारी, सर्वांनी या कामात सुरुवातीला झोकून दिलं.
त्याच वर्षी सप्टेंबरअखेर डॉ. झा यांच्या राहत्या घरातच ३० बेडचं हॉस्पिटल उभं राहिलं. हॉस्पिटलला ‘जन्मस्थान’ हे नाव देण्यात आलं. डॉ झा आणि त्यांच्या टीमने माफक पैशांत आरोग्यसेवा देण्याचा निर्धार केला होता. देणग्या कमी पडल्या तर स्वतःच्या खिशातून पैसे घालू, स्वतः जास्त वेळ काम करू, पण हॉस्पिटल चालवूच, हे सर्वांनी मनाशी पक्कं केलं होतं. हॉस्पिटल उभारणीच्या काळात कामाचं पूर्ण व्यवस्थापन स्नेहल करत होती. दरम्यान तिने तिथल्या लोकांशी कनेक्ट वाढवण्यासाठी भोजपुरी भाषाही शिकून घेतली.
हॉस्पिटल सुरू होत नाही तोवरच चंपारण भागाला महापुराचा फटका बसला. दूषित पाण्यामुळे आसपासच्या ४० गावांतील बरेच लोक उलट्या, जुलाब, टायफॉईड, न्यूमोनिया या आजाराने त्रस्त झाले. त्या परिस्थितीत गावोगावी जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं काम ‘जन्मस्थान’च्या टीमने केलं. काही रुग्णांना गरजेनुसार रामनगरच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं. इतर रुग्णांना गावातच उपचारांची सोय करून देण्यात आली.
ही धडपड बघून आणखी ३-४ प्रशिक्षित डॉक्टर आणि ७-८ नर्सेसनी हॉस्पिटलमध्ये काम करण्याची तयारी दाखवली. दवाखान्यात शस्त्रक्रिया सोडून इतर वैद्यकीय सुविधा दिल्या जाऊ लागल्या. यामध्ये हृदयविकार, प्रसूती, डेंग्यू, मलेरिया, टीबी आणि इतर आजारांवरील उपचार, यांचा समावेश होता. डॉ झा यांनी दवाखान्यातील जवळपास सगळ्या स्टाफला पेशंटची व्यवस्थित काळजी घेण्यासाठीचं प्रशिक्षण दिलं होतं. स्नेहल स्वतः नॉर्मल डिलीव्हरी करण्यात पटाईत झाली होती. २०१८ च्या अखेरपर्यंत डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, औषध दुकान चालवणारे आणि व्यवस्थापन करणारे मिळून ३५ ते ४० लोक ‘जन्मस्थान’मध्ये काम करू लागले.

‘जन्मस्थान’बद्दल इथल्या लोकांमध्ये केवढा विश्वास निर्माण झाला आहे, याचे काही किस्से स्नेहल सांगते. एकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात एका पेशंटला मृत घोषित केलं गेलं होतं. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला ‘जन्मस्थान हॉस्पिटल’मध्ये घेऊन आले. पेशंटची शुगर लेव्हल खाली गेल्यामुळे तो बेशुद्ध झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डेक्सट्रोज चढवून अर्ध्या तासातच त्या पेशंटला शुद्धीवर आणलं गेलं. स्नेहल म्हणते, ‘हा दवाखाना नसता तर कदाचित त्या व्यक्तीवर जिवंतपणीच अंत्यसंस्कार झाले असते.’
एकदा सात महिन्यांच्या गर्भवती मातेने ‘काही झालं तरी मला सरकारी दवाखान्यात डिलीव्हरी करायची नाही’ म्हणत ‘जन्मस्थान’मध्ये स्वतःला ॲडमिट करून घेतलं. अडचणीच्या वेळी व्हेंटिलेटर लागला तर त्याची सोय आपल्याकडे नाही असं सांगूनसुद्धा तिने दवाखान्यातच प्रसूती करून घेतली. सरकारी दवाखान्यातील वाईट अनुभव असतील किंवा खाजगी दवाखान्यात घेतले जाणारे जास्तीचे पैसे असतील, या सगळ्यांचा विचार करून बहुतांश रुग्ण आता डॉ गौरव झा यांच्याच दवाखान्यात येऊ लागले आहेत.
कोविड काळात ‘जन्मस्थान हॉस्पिटल’ पेशंटसाठी वरदान ठरलं. अनेक रुग्णांवर इथे व्यवस्थित उपचार झाले. याशिवाय गरजू कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप करण्यासाठीही स्नेहलने सहकार्य केलं. बिहारमधील कामगार परराज्यात अडकले असताना अशा कामगारांच्या कुटुंबांसाठी आवश्यक ती मदत देण्याचं कामही स्नेहल आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलं.

या भागातच वाल्मिकी अभयारण्य आहे. जंगल-झाडीच्या या प्रदेशात थारू जमातीचे आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. चंपारणमधील इतर गावांत तसंच आदिवासी पट्ट्यातील लोकांमध्ये अंधश्रद्धा आणि मानसिक आजारांचं मोठं प्रमाण असल्याचं स्नेहलच्या लक्षात आलं होतं. गावांमध्ये घरगुती हिंसेचंही प्रमाण मोठं होतं.
इथल्या लोकांच्या मानसिक आजाराचा प्रश्नही दुर्लक्षित ठेवून चालणार नाही, याची जाणीव डॉ गौरव आणि स्नेहल यांना झाली. मग दोघांनी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून मानसिक आरोग्याच्या संदर्भातील एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. यामध्ये स्नेहलने समुपदेशनाचं प्रशिक्षण घेतलं, तर डॉ झा यांनी मानसिक आजारांवरील औषधोपचारांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्नेहल केवळ एवढ्यावर थांबली नाही. नंतर तिने मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला. यथावकाश तिने ग्रामीण मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणारी ‘हिलस्टेशन फाउंडेशन’ ही संस्था सुरू केली.
मानसिक आजारांविषयी अनभिज्ञ असलेल्या लोकांमध्ये जागृतीची गरज होती. डॉ. झा आणि स्नेहल यांनी आसपासच्या गावांतील पदवीशिक्षण घेतलेल्या काही मुला-मुलींना हेरलं. मानसिक आजार ओळखणं आणि लोकांना त्यावरच्या उपचारांसाठी तयार करणं, यासाठी या मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं. आशा सेविकांनाही हेच प्रशिक्षण देण्यात आलं.
त्यांनी काम सुरू केलं. आसपासच्या ४० गावांमध्ये मानसिक आजारांनी ग्रस्त असणारे हजारो स्त्री-पुरुष आढळून आले. चिंता, नैराश्य, मायग्रेन, एपिलेप्सी, बायपोलर डिसऑर्डर- हे आजार प्रामुख्याने दिसून आले. सुरुवातीला २-३ गावांतील लोकांनी गैरसमजुतीतून या प्रकल्पाला विरोध केला. मात्र काही काळाने लोक आपणहून स्वतःच्या अडचणी सांगायला पुढे येऊ लागले. या रुग्णांकडून केवळ १० रुपये एवढीच फी घेतली जायची. नंतरच्या टप्प्यात स्नेहलने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन केलं, की मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीसाठी निरोगी माणसांनी ३०० रुपयांची मदत करावी. या आवाहनालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

ही सगळी कामं सुरू असतानाच स्नेहलला तिथे मुली आणि महिलांच्या काही समस्या प्रकर्षाने जाणवत होत्या. या मुली दहावी-बारावीपर्यंत शिकल्या तरी त्यांना नीटसं संगणक प्रशिक्षण मिळालं नव्हतं. स्नेहल लॅपटॉप घेऊन त्यांच्यात जायची त्यावेळी त्या मुली कुतूहलाने तिच्याकडे पहायच्या. या मुलींनी स्नेहलकडे संगणक प्रशिक्षणाची मागणी केली. स्नेहलने आधी दोन पदवीधर मुलींना संगणक प्रशिक्षण दिलं. मग इतर मुलींना प्रशिक्षित करण्यासाठी तिने ४ महिन्यांचा अभ्यासक्रमच तयार केला. त्यानंतर प्रशिक्षणवर्गासाठी गावातली एखादी जागा देण्याबाबत तिने सरपंचांशी बोलणी केली. आयटी क्षेत्रातील जुन्या मित्र-मैत्रिणी आणि सोशल मीडियावरील दानशूर लोकांना आवाहन करून स्नेहलने एकूण १५ संगणक संचांचीही सोय केली. आज स्नेहलच्या प्रयत्नांतून त्या भागातील कित्येक मुली संगणकसाक्षर बनत आहेत.
अशिक्षित किंवा अर्धशिक्षित मुली आणि महिलांसाठीही स्नेहलने तिथे शिवणक्लासची सोय केली. त्यासाठी तिने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील स्थानिक लोकांची मदत घेतली. या उपक्रमाचं नाव ‘सुई-धागा क्लास’. या क्लासमुळे शेकडो महिला स्वावलंबी झाल्या आहेत.
महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत स्नेहलला जाणवलेली आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे मासिक पाळीसंदर्भातील आजाराची. अनेक महिला पाळीच्या काळात काही त्रास झाला तर तो अंगावर काढायच्या. पुढे दुखणं वाढलं आणि इन्फेक्शन झालं की हे प्रकरण गर्भाशय पिशवी काढण्यापर्यंत जायचं. प्रशिक्षित डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती न मिळाल्याने बऱ्याच महिलांनी स्वतःचं गर्भाशय काढून टाकल्याची आपबीती स्नेहलजवळ सांगितली. यावर उपाय म्हणून स्नेहलने ‘रेड रिव्हॉल्युशन’ उपक्रम राबवला. मासिक पाळीविषयी मनमोकळा संवाद करण्याचं आणि मुली-महिलांना कापडी पॅड देण्याचं काम तिने या माध्यमातून सुरू केलं. २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत जवळपास दोन हजारांहून अधिक मुली-महिलांना या उपक्रमाचा फायदा झाला आहे.
बिहारमध्ये ७ वर्षं काम करून स्नेहल आता पुण्यात परतली आहे. कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय तिने घेतलाय. बिहारमधल्या कामाची घडी आता व्यवस्थित बसली आहे. पन्नासहून अधिक जणांना हक्काचा आणि चांगला रोजगार मिळालाय. स्नेहलच्या या प्रवासात तिचे वडील जयंत जोशी, बहीण शीतल आणि तिचे पती सागर चितळे यांनी वेळोवेळी मोलाची साथ दिली. कुटुंबियांच्या मदतीशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं, असं स्नेहल मानते.

२०२४ मध्ये तिने पुण्यात ‘तथ्यम कन्सल्टिंग’ नावाने स्वतःची नवी संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत समुपदेशन, नेतृत्वगुण प्रशिक्षण, थेरपी आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग दिलं जातं.
स्नेहल आता पुण्यात स्थिरावली असली तरी तिला ग्रामीण भागातील मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर आणखी दिशादर्शक काम करण्याची इच्छा आहे. स्नेहलच्या कामाचं मॉडेल महाराष्ट्रासह देशातील दुर्गम खेड्यापाड्यात नक्की उपयोगी ठरू शकतं.
सामाजिक काम करताना दीर्घ पल्ल्याचा विचार करावा लागतो, निराश होण्याची आणि त्या कामातून बाहेर पडण्याची तयारीही ठेवावी लागते, असं स्नेहल अनुभवातून सांगते. स्वतःला हवं ते करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणाईसाठी स्नेहलचं काम दिशादर्शक आहे.