
‘सोलापूरातील पूर्वभाग अपूर्व आहे,’ असं म्हटलं जातं; याचं कारण त्या भागात तेलुगुभाषकांची संख्या जास्त आहे. सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी तेलंगण-आंध्रातून हजारो तेलुगुभाषक कष्टकरी सोलापुरात आले आणि हैदराबाद रस्त्यावर स्थायिक झाले. ती शहराची पूर्वदिशा. त्यांनी सोलापूरची मराठी संस्कृती नुसती आत्मसात केली नाही तर ती वाढवली. १९७४ साली म्हणजे ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेलं ‘पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालय’ हे त्याचं प्रतीक म्हणता येईल.
या मराठी वाचनालयाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि वाचकांची मातृभाषा आहे तेलुगु! कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख अशा मराठी साहित्यासह विविध विषयांवरील ३५ हजार पुस्तकं या ग्रंथालयात आहेत. इथं ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि लहान मुलं पुस्तकं वाचण्यासाठी येतात. वाचकसंख्या घटल्याची चर्चा सगळीकडे होत असताना तेलुगुभाषकांच्या या मराठीप्रेमाची हकीगत उत्साह वाढवणारी आहे.

शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘समाचार’ या मराठी दैनिकाचे संपादक जयंतराव जक्कल हेही तेलुगुभाषक होते. त्यांनी पूर्वविभाग सार्वजनिक वाचनालयाची मुहुर्तमेढ रोवली. दिवंगत ज्येष्ठ कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, माजी सहकारमंत्री रामकृष्णपंत बेत, माजी खासदार गंगाधर कुचन, माजी महापौर पुरणचंद्र पुंजाल, जनार्दन कारमपुरी, अभिनेते नागेश कन्ना, राजाराम कुचन, भूमय्या कोंडा, माजी खासदार धर्मण्णा सादूल अशा अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी पुढे या वाचनालयाच्या वाढीसाठी प्रयत्न केले.
दहा बाय दहाच्या खोलीतून हे वाचनालय सुरू झालं. पुढे वाचनालयाची स्वतःच्या मालकीची जागा व्हावी, यासाठी तत्कालीन खासदार गंगाधर कुचन यांनी अनेक विणकरांना आजीव सभासद करून घेतलं. त्यांच्याकडून निधी मिळवला. सोलापूरातल्या सहकारी सुतगिरण्या, सहकारी बँकांमध्ये तेलुगुभाषकांचं वर्चस्व आजही आहे. त्या संस्थांकडून मोठा निधी मिळवून वाचनालयाची इमारत उभी राहिली.
राज्यशासनाचा ‘अ’ दर्जा लाभलेल्या या वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष आहेत सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी. ते सांगतात, ‘‘बालवाचकांकडून आम्ही शुल्क घेत नाही. शिवाय त्यांना घरपोच पुस्तकं पोचवतो. असे ४२१ बालवाचक आहेत. महिलांकडूनही फक्त ५० रुपये डिपॉझिट घेतो आणि मासिक फीही घेत नाही. अशा ४४१ महिला वाचनालयाशी जोडलेल्या आहेत. वाचनालयाची तीन मजली इमारत आहे. तळमजल्यावर दुकानाचे गाळे आहेत. ते भाड्याने दिलेत. त्यातून येणारं भाडं वाचनालयाच्या देखभालीसाठी वापरलं जातं. दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय आहे आणि तिसऱ्या मजल्यावर व्याख्यानं वगैरे कार्यक्रमांसाठी सभागृह बांधलेलं आहे. स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील वाचनालयात स्वतंत्र वातानुकूलित कक्ष आहे. सध्या शंभरएक मुली आणि साधारण सव्वाशे मुलं या कक्षात रोज अभ्यास करतात. त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं, वाय-फाय सेवा मोफत दिली जाते. इथे अभ्यास करून पुढे सरकारी नोकरी मिळवलेल्या अनेक मुलांची उदाहरणं आहेत.’’

दरवर्षी वाचनालयात किमान ७५ मराठी दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. याशिवाय २६ मराठी दैनिकं, दोन इंग्रजी दैनिकं, पाच मराठी पाक्षिकं, २५ मराठी साप्ताहिकं, ७१ मासिकं अशी नियतकालिकं घेतली जातात.
इथे येणाऱ्या बालवाचकांचं वैशिष्ट्य म्हणजे ही मुलं तेलुगु कुटुंबातली आहेत पण तरी मराठी शाळांमध्ये शिकतात. महत्त्वाचं म्हणजे, या मराठी शाळांचे संचालकही तेलुगुभाषक आहेत. सोलापुरातील कुचन मराठी प्रशाला ११२ वर्षांपूर्वी सुरू झाली. तिथे आज एक हजाराहून जास्त विद्यार्थी आहेत. पुल्ली कन्या प्रशालेतही तेवढ्याच विद्यार्थिनी आहेत. बुर्ला महाविद्यालयातही शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. या शिक्षणसंस्थांमधील वाचक मोठ्या संख्येने आहेत.

वाचनालयातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. व्याख्यानं, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, कथाकथन असे उपक्रम राबवले जातात. वाचनालयाचे सचिव अरविंद चिनी सांगतात की, ‘आमच्या व्याख्यानमालेत वक्ते मराठीच असतात. त्याला श्रोतृवर्ग मात्र तेलुगु असतो. अलीकडे आम्ही तेलुगु आणि कन्नड पुस्तकंही ठेवली आहेत.’
कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी तेलुगुभाषकांच्या मराठीप्रेमाचं वर्णन करणाऱ्या दोन ओळी लिहिल्या आहेत, त्या अशा : ‘रंध्री रंध्री माझ्या, आंध्री भाषा जरी, मंद्र गीत ऊरी, मराठीचे !’
०००
कन्नडभाषिक ग्रंथपालाची मराठी वाचकसेवा !
आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, पूर्वविभाग वाचनालयाचे ग्रंथपाल काशिनाथ कोळी यांची मातृभाषा आहे कन्नड. त्यांचं गाव आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं दर्गनहळ्ळी. आपल्या गावातली छोटी मुलं आणि तरुणांमध्ये वाचनाची गोडी वाढावी म्हणून त्यांनी २०१७ च्या गुढीपाडव्यापासून गावात मराठी वाचनालय सुरू केलं. स्वतःच्या मालकीची ६५०० मराठी पुस्तकं आबालवृद्ध गावकऱ्यांना वाचनासाठी सुपुर्त केली. वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या गावकऱ्यांनपर्यंत पुस्तकं पोचवण्यासाठी कधीकधी ते चक्क बैलगाडीचा वापर करतात. स्वतः एम. ए., एम. लिब. पदवीधर असलेले काशिनाथ कोळी म्हणतात, ‘पुस्तकं उपलब्ध झाली तर लोक वाचतात. आमच्या दर्गनहळ्ळी गावातल्या लहान मुलांनी पुस्तकं वाचावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे. गंमत म्हणजे, आम्ही कन्नडमध्ये बोलतो आणि मराठी पुस्तकं वाचतो.’
०००
रजनीश जोशी | joshirajanish@gmail.com
रजनीश जोशी पत्रकार असून त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर विपुल लेखन केले आहे.