महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक राजकारणाला दिशा देण्याचं काम केलं. इथल्या वंचित आणि शोषित समाजातील लोकांना आत्मसन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. या लढ्यात त्यांना शेकडो-हजारो कार्यकर्त्यांनी, छोट्या मोठ्या नेत्यांनी भरपूर साथ दिली. त्यातील काहींना ओळख मिळाली, अनेक अज्ञात राहिले. तुलनेने कमी माहित असलेले गोपाळबाबा वलंगकर आणि थोडे तरी माहित असलेले रामचंद्र बाबाजी मोरे हे खंदे समर्थक. या मोठ्या माणसांच्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांच्याशी बोलून मिळालेली ही माहिती..!
महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रियांचं शिक्षण, विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह, बालविवाह प्रथेला बंदी, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणं अशी कामं प्राधान्याने केली. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. नवा विचार समाजात नेण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या या कामात नारायण मेघाजी लोखंडे, शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोडे, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे, रत्नम्माबाई अय्यावरू, सावित्रीबाई रोडे यांच्यासह गोपाळ बाबा वलंगकर यांनी विशेष परिश्रम घेतले. गोपाळ बुवांनी सार्वजनिक पाणवठे दलितांसाठी खुले करण्याचा पहिला प्रयत्न केला.
गोपाळबाबा वलंगकर : कोकणातले पहिले बंडखोर
गोपाळबाबा वलंगकर हे ब्रिटिश सैन्यात होते. पुण्यात नोकरीसाठी असताना त्यांची महात्मा फुलेंशी भेट झाली होती. त्यांचे विचार पटल्यामुळे त्यांनी महात्मा फुलेंसोबत काम सुरू केलं. वलंगकर यांचं गाव महाड तालुक्यातील रावढळ. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावाकडे सामाजिक कामाला सुरुवात केली. १८८५ साली ब्रिटिश सैन्यात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी बंदी करण्यात आली होती. या बंदीविरोधात वलंगकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर अस्पृश्यांसाठी सैन्यातील जागा तर खुल्या झाल्याच, शिवाय त्यांच्यासाठी महाड भागात शाळाही सुरू झाल्या. महाडजवळ असलेलं दासगाव त्यावेळी बंदराचं ठिकाण होतं. या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांची राहण्याची सोयही होती. याच गावात वलंगकर बुवांचे सहकारी बाबाजी मोरे राहत. विठ्ठलदास हाठे या नातेवाइकांच्या मदतीने बाबाजी मोरे यांनी याच गावात माडीचं पहिलं आणि देखणं घर उभं केलं तेव्हा गावातल्या सनातन्यांना चांगलीच मिरची लागली. त्यांनी बाबाजी मोरेंवर जंगलातील मौल्यवान लाकूड तोडल्याचा आरोप लावत तीन वर्षांची शिक्षा भोगायला लावली. या घटनेने व्यथित झालेल्या गोपाळबाबा वलंगकरांनी ५० पानी दीर्घ निबंध लिहीत असंतोष व्यक्त केला. या निबंधाची पुढे पुस्तिका तयार झाली. त्याचं नाव 'विटाळ विध्वंसन'. अस्पृश्यता प्रथेवर ताशेरे ओढणारी ही पुस्तिका इतिहासाची नोंद म्हणून महत्त्वाची आहे. गोपाळ बुवांच्या कामाचा आदर असल्याने त्यांना ब्रिटीश सरकारने महाड पालिकेत सदस्य म्हणूनही नियुक्त केलं होतं. १८९५ साली गोपाळ बुवांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले करावेत, असा ठराव महाडच्या पालिकेत मांडला. अस्पृश्यांच्या मूलभूत हक्कासाठी मांडण्यात आलेला हा ठराव होता. या ठरावाला मान्यता मिळाली नाही, मात्र गोपाळ बुवांच्या या कामाची यथोचित दखल पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. १९०० साली गोपाळ बुवांचं निधन झालं.
हेही वाचा - बाबासाहेब, आपल्या भारतात दलितांवरचे अत्याचार वाढतच आहेत...
रामचंद्र बाबाजी मोरे : चवदार तळे सत्याग्रहाचे अँकर
गोपाळबाबा वलंगकर यांनी उभारलेला अस्पृश्यता निर्मूलनाचा लढा कोकणातील लोकांना आणि पुढील पिढीला मार्गदर्शक ठरला. १९०३ साली जन्मलेल्या रामचंद्र बाबाजी मोरे यांनी बुवांच्या जाण्यानंतर २० वर्षांनी या लढ्याची सूत्रं स्वतःच्या हातात घेतली. कोकणात त्यावेळी महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जोमाने सुरू होता. माणगावमधील अस्पृश्य परिषदेत राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांचा नेता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे केलं होतं. त्यावेळी अस्पृश्य बांधवांना सार्वजनिक ठिकाणचं पाणी वापरण्याचा अधिकार नव्हता. दरम्यान, सीताराम केशव बोले यांनी १९२३ साली मुंबई विधिमंडळात अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे, मंदिरं, शाळा, न्यायालय, धर्मशाळा खुल्या करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्वीकारला गेला, पण हक्काचं पाणी मिळवण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल याची जाणीव पूर्वास्पृश्य कार्यकर्त्यांना झाली. या लढ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व परिणामकारक ठरेल, असं रामचंद्र बाबाजी मोरे यांना वाटत होतं. त्यासाठी १९२४ पासूनच ते बाबासाहेबांच्या संपर्कात होते. बाबासाहेबांचे बंधू बाळाराम यांनी या दोघांची पहिली भेट घडवून आणली होती.
दरम्यानच्या काळात रामचंद्र बाबाजी मोरे यांनी महार समाज सेवा संघाची स्थापना करून शेकडो पूर्वास्पृश्य बांधवांना त्यात सक्रिय करण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२४ साली मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली होती. यामध्ये अस्पृश्येतर लोकांची संख्या तुलनेने अधिक होती. महार समाज सेवा संघात प्रामुख्याने पूर्वास्पृश्य लोक होते. हे संघटन कोकणात अधिक सक्रिय होतं. या संघटनेचं बळ पाठीशी उभं राहिल्याने लोक संघटित होत होते आणि कृती करू पाहत होते. त्यातील एक घटना म्हणजे ऑक्टोबर १९२६ मध्ये माणगावजवळच्या गोरेगावला रामचंद्र चांदुरकर या चर्मकार युवकाने गावातील तळ्यात उडी मारून पाण्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला ना.म.जोशी या आगरकर विचारांच्या सुधारकांचा पाठिंबा होता. मात्र चांदुरकरला या कृत्यासाठी स्थानिक सनातनी लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती समजल्यानंतर रामचंद्र मोरे यांनी पाणवठ्याबाबतीत अस्पृश्यता पाळण्याच्या विरोधात आंदोलन करण्याचं ठरवलं. त्यांनी अडीचशे-तीनशे सहकाऱ्यांसह ४ डिसेंबर १९२६ रोजी दासगावमधील क्रॉफर्ड तळ्यात पाण्याला स्पर्श केला. एका अर्थाने महाडच्या सत्याग्रहाआधी तीन महिने झालेला हा पहिला क्रांतिकारी उठाव म्हणता येईल.
हेही वाचा - आजही दलितांना सर्रास मंदिर प्रवेश नाहीच?
रामचंद्र मोरेंच्या या कृतीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे सहकारी चित्रे यांना सांगून महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाची तारीख ठरवून घेतली. या सत्याग्रहाचं नियोजन रामचंद्र मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. महाडला जाण्यापूर्वी बाबासाहेब दासगाव येथील बंदरावर उतरले. मोरेंनी आंदोलन केलेल्या क्रॉफर्ड तळ्याची पाहणीही त्यांनी केली. तिथून ते महाडला गेले आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचं पाणी उचललं. ‘‘हा संगर फक्त पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे,’’ अशी गर्जना करत असतानाच बाबासाहेबांनी गोपाळबाबा वलंगकर यांच्याविषयी गौरवोद्गारही काढले. ते म्हणाले, ‘‘कोकण इलाख्यातील अस्पृश्य समाजात सार्वजनिक काम करण्याकरता ज्या संस्था स्थापन झाल्या त्यात ‘अनार्य दोष परिहार मंडळी’ ही पहिली संस्था आहे. ही संस्था वलंगकर बुवांनी सुरू केली. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतिबा फुले यांचे विचार मानणारे त्यांचे खरे साथीदार गोपाळबाबा वलंगकर हे आहेत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केलेली जागृती अनुपम आहे.’’
चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेब महाडमधून निघून गेल्यानंतर तिथल्या सनातन्यांनी पूर्वास्पृश्य कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली, हे आपल्याला माहीत नसतं. अस्पृश्य लोक गावातील वीरेश्वर मंदिरात प्रवेश करणार असल्याची अफवा तेव्हा उठवली गेली होती. या मारहाणीत पा.ना.राजभोज, भानुदास कांबळे, भिकाजी गायकवाड हे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. सनातन्यांकडून अशा प्रकारचे हल्ले पुन्हा झाले तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडेही पाच-पन्नास लोक असावेत, या हेतूने रामचंद्र मोरे यांनी ‘आंबेडकर सेवा दला’ची स्थापना केली. या दलात ब्रिटिश सैन्यातून निवृत्त झालेल्या शिपायांचा भरणा होता. पुढे त्याचं नाव बदलून ‘समता सैनिक दल’ करण्यात आलं.
महाडच्या सत्याग्रहानंतर अस्पृश्यांच्या परिस्थितीत हळूहळू बदल होऊ लागले. मात्र आणखी काही कृती करावी असं कार्यकर्त्यांच्या मनात होतं. त्यांनी अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचं दहन करण्याचा कार्यक्रम आखला. त्यानुसार २५ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीतच शेकडो कार्यकर्त्यांनी मनुस्मृती जाळली. त्यावेळी बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांच्या या लढ्याला फ्रेंच राज्यक्रांतीची उपमा दिली होती.
महाडच्या या लढ्यात रामचंद्र मोरेंसोबत संभाजी तुकाराम गायकवाड, विश्राम गंगाराम सवादकर, सुरेंद्रनाथ टिपणीस, शिवराम गोपाळ जाधव आणि भाई अनंतराव चित्रे ही मंडळी प्रामुख्याने होती.
महाडचा चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन या अस्पृश्यताविरोधी लढ्याच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेल्या दोन घटना. या घटनांच्या अंमलबजावणीत रामचंद्र बाबाजी मोरे यांचं योगदान मोलाचं होतं. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकाची जबाबदारीही त्यांनी मोरे यांच्याकडे सोपवली. मात्र १९३० नंतर रामचंद्र बाबाजी मोरे कम्युनिस्ट चळवळीकडे ओढले गेले आणि तिकडे सक्रिय झाले. पण त्यानंतरही त्यांचे बाबासाहेबांसोबतचे स्नेहपूर्ण संबंध शेवटपर्यंत टिकले. कम्युनिस्ट विचार स्वीकारूनही आंबेडकर किंवा त्यांच्या विचारांपासून ते दूर गेले नाहीत. आंबेडकरी आणि कम्युनिस्ट चळवळीत समन्वय साधण्याचा प्रयत्न ते शेवटपर्यंत करत राहिले.
(याच विषयावरील कॉम्रेड सुबोध मोरे यांची सविस्तर मुलाखत वाचा अनुभव मे २०२६ च्या अंकात..!)
