अलीकडच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या जमान्यात पत्रं मागे पडली. पण तरीही दोन मित्रांनी एकमेकांना पत्रं पाठवायचं ठरवलं तर? असा दोन मित्रांनी पत्रांतून साधलेला संवाद म्हणजे पत्रापत्री हे नाटक. हे नाटक पत्रांच्या आठवणींना उजाळा तर देतच पण त्याहूनही ते बरंच काही आहे....
नाटक सुरु होतं तेव्हा आपल्याला मंचाचे दोन भाग झालेले दिसतात. नेपथ्याचा मुख्य भाग म्हणजे दोन भागांत ठेवलेल्या दोन खुर्च्या आहेत. यानंतर लक्ष्य वेधून घेतं ते मागे पांढऱ्या कार्डबोर्डवर काळ्या रंगाने उभं केलेलं विश्व.. दारं, खिडक्या, पडदे, घरातल्या वस्तू सगळं चित्रं स्वरूपात यावर रेखाटलेलं आहे. त्याचसोबत त्या चित्रांमध्ये विमान आहे, पत्राचं पाकीट आहे. नेहमीप्रमाणे दारं, खिडक्या, वस्तू न उभ्या करता ही काढलेली चित्रं प्रेक्षक म्हणून अधिक अपील होतात. फिक्शनच्या जगात घेऊन जाणारी पहिली वातावरणनिर्मिती त्याने साध्य केली आहे. दोन्ही खुर्च्याही काळ्या पांढऱ्याच आहेत. त्यातल्या एका खुर्चीवरचे काळे पांढरे चौकोन कार्टून नेटवर्कच्या लोगोची आठवण करून देणारे आहेत. या अशा सगळ्या काळ्या पांढऱ्या जगात दोन रंगीत माणसं (दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे) येऊन हातात पत्रं घेऊन त्या खुर्च्यांवर बसतात आणि नाटक सुरु होतं.
दोन निवृत्त मित्र - एक मुंबईत राहणारा आणि दुसरा पुण्यात - पत्रांद्वारे आपलं रोजचं जगणं एकमेकांशी वाटून घेतात. 'पत्रापत्री' हे खरंतर एपिस्टोलरी (पत्ररूपी) नाटक आहे म्हणजे पत्रांचं अभिवाचन आहे. नाटकात वेगळे संवाद नाहीत. हे दोघे नाटकभर एकदाही भेटत नाही. पण या पत्रांच्या वाचनातून दोघांनी संपूर्ण नाट्य उभं केलं आहे. पहिलं पत्र तात्यासाहेब म्हणजे दिलीप प्रभावळकर विमानातून लेकीकडे फ्रान्सला जाताना लिहितात. प्रभावळकरांचा अभिनय आणि पार्श्वभूमीवर विमानाचे, तिथल्या अनौन्समेंटचे आवाज यामुळे हळूहळू ते सगळं खरं वाटायला लागतं.
मुलं, सुना, जावई, पेन्शनर लोकांचा क्लब यांमध्येच या दोन पात्रांचा वावर आहे. पण दोघांचा परीघ मात्र मोठा आहे. लोकल बातम्यांपासून ते आंतरराष्ट्रीय विषयांपर्यंत त्यांना सगळ्यात रस आहे आणि तेवढाच त्यांचा दांडगा गोतावळा आहे. त्यामुळे निवृत्त झाले असले तरी त्यांचं आयुष्य निरस आणि कंटाळवाणं झालेलं नाही.
दिलीप प्रभावळकरच नाटकाचे लेखक आहेत. त्यांनी वर्तमानपत्रातून हे सदर लिहिलं होतं. मग त्याचं राजहंस प्रकाशनाकडून २०१३ मध्ये ‘पत्रापत्री’ नावाने पुस्तक आलं. या लिखाणाची प्रेरणा आपल्याला डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्रातून मिळाल्याचं प्रभावळकर सांगतात. 'हसवाफसवी' नाटक पाहिल्यानंतर लागू यांनी प्रभावळकरांना कौतुकाचं पत्रं लिहिलं होतं. पत्रांच्या वैयक्तिक आणि उबदार स्पर्शाची जाणीव त्या पत्राने त्यांना करून दिल्याचं ते सांगतात.
‘पत्रापत्री’ या पुस्तकातून पाच प्रसंग निवडून नीरज शिरवईकर यांनी त्याचं नाट्यरूपांतरण केलं आहे आणि विजय केंकरे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. नाटकातली माधवराव ही भूमिका देखील त्यांनी साकारली आहे. लेखक दिग्दर्शकच मंचावर सादरीकरणाला उभे राहिले आणि त्यातही ती प्रभावळकर आणि केंकरे यांसारखी बाप माणसं असतील, तर निव्वळ अभिवाचनातून केवढा अवकाश उभा करता येतो याचं हे नाटक एक उदाहरण म्हणता येईल.
ही पत्रं विनोदी आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील रोजमर्राच्या गोष्टी, किस्से एवढाच खरं म्हणजे पत्रांचा विषय आहे. पण आपल्या वागण्यातला विरोधाभास, हव्यास-त्यातून झालेली फजिती, राग-लोभ-अगतिकता, कुटुंबातले बदल, समाजामधलं व्यंग या सगळ्याच्या आधारे तो विनोद फुलत जातो. अतिशयोक्ती अलंकाराचाही उत्तम वापर त्यांनी केला आहे. पण तो इतका कन्विंसिंग आहे की नाटकाच्या प्रवाहात तो जाणवतही नाही.
पत्राच्या मसुद्यातही कलाकारी आहे. माधवराव हे पात्र दर पत्राच्या शेवटी ‘तुमचाच, माधवराव’ असं म्हणताना आपला त्या त्या वेळचा मूड दाखवतं. म्हणजे ‘तुमचाच अधीर माधवराव, तुमचाच त्रासिक माधवराव’ अशा पद्धतीने.
एकूण पाच छोट्या किस्स्यांमध्ये नाटक विभागलं आहे. त्यातल्या पहिल्या किस्स्यात दूध पिणारी मूर्ती पुण्यात सापडली, असं माधवराव पत्राने कळवतात. लगेच तात्यासाहेब तशी मूर्ती फ्रान्सला मागवून घेतात, तिथे देवभोळ्या माणसांसाठी त्याचं प्रदर्शन भरवतात. पण तेच तात्यासाहेब एका आफ्रिकन देशातल्या उत्सवात सामील होतात तेन्हा तिथल्या प्रथा पाहून हे आफ्रिकन लोक कसे अंधश्रद्धाळू आहेत असं म्हणतात.
दुसऱ्या एका प्रसंगात माधवरावांच्या कवी मुलाचा साहित्य संमेलनात जेवणाच्या ताटावर अपमान होतो. त्यावर तो कशा कविता करतो आणि हे मानापमानाचं नाटक कुठल्या कुठे जातं हे पाहण्यासारखं आहे.
एका प्रसंगात तात्यासाहेब मराठी टीव्ही मालिकेमध्ये काम करायला लागतात. तिथे त्यांची जी काय भंबेरी उडते ते चित्रं डोळ्यासमोर उभं राहतं.
या सर्व प्रसंगांमध्ये अजित परब यांच्या पार्श्वसंगीताने नाटकातले सर्व प्रसंग जिवंत करण्याचं काम केलं आहे. हे अभिवाचन सुरु आहे हे विसरून प्रेक्षक त्यातलं नाट्य अनुभवायला लागतात त्यामध्ये लेखन, अभिनय यांच्या बरोबरीने पार्श्वसंगीताचा सिंहाचा वाटा आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक डिजिटल युगात पत्रलेखनाच्या जुन्या आठवणींना उजाळा देतं. शिवाय आजच्या शहरातल्या वेगवान जीवनशैलीमध्ये क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडतं. ते हसवतं, रडवतं, आठवणींमध्ये रमवतं, आपल्याच व्यक्तिमत्वामधला विरोधाभास दाखवून विचार करायला भाग पाडतं. नाटकाचे दोन तास कसे जातात कळत नाही. नाटकाचा शेवट होतो. पण नाटकाचा शेवट हा त्यातल्या पत्रांच्या सिलसिल्याचा शेवट नाहीय. त्या अपूर्णत्वामुळे नाटक बघून परत आल्यावरही बराच काळ ते आपल्यासोबत राहतं.
मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com
मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.
