एफ.ए.क्यू.- फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स! वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
तुम्ही डॉक्टरकी सोडून अभिनेते का झालात?
डॉक्टरकीचा कंटाळा आला होता का?
अभिनयात येण्यापेक्षा डॉक्टरकीच केली असती तर बरं झालं असतं असं कधी वाटतं का?
इतक्या वर्षांनी मागे वळून बघताना तुमच्या ‘त्या' निर्णयाविषयी आता काय वाटतं?
हे प्रश्न ऐकता ऐकता मन अलगद भूतकाळात जातं...
आमचं कुटुंब चारचौघांप्रमाणेच एक साधं मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब. माझे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात म्हणजेच एमएसईबीत नोकरी करत होते. शिक्षणाबरोबरच आपल्या मुलाला एखादं वाद्य वाजवता यावं अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी मला बासरी शिकवण्याचा प्रयत्न केला, माऊथ ऑर्गन शिकवण्याचा प्रयत्न केला; पण मला त्या वेळी त्याची फारशी आवड नव्हती, त्यामुळे मी ते काहीच शिकलो नाही. आता त्याचं वाईट वाटतं. त्यांची इच्छा म्हणून तरी मी एखादं वाद्य शिकायला हवं होतं. माझं ड्रॉइंग मात्र चांगलं होतं. त्यामुळे एलिमेंट्री, इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा मी पास झालो.
वडिलांची नोकरी बदलीची होती, त्यामुळे मी खूप हिंडलो. माझा जन्म नागपूरचा. त्याच्यानंतर मुंबईत आलो. आधी गिरगावला होतो, मग दादरला, त्यानंतर चेंबूरला. चेंबूरला असताना बालक मंदिरात जायला लागलो. माझं प्राथमिक शिक्षण भुसावळला झालं. पाचवी ते दहावी मात्र पूर्ण नाशिकला झाली. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल या नाशिक रोडच्या शाळेत मी होतो. १९७५ साली दहावी मॅट्रिक झाली. ती आमची पहिली बॅच होती.
आम्ही ज्या-ज्या गावात जायचो तिथे वडिलांना क्वार्टर्स मिळायच्या. विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहती असायच्या त्या कॉलनीमध्येच आम्ही राहायचो. ही कॉलनी हे एक असं प्रकरण असतं, की तुम्हाला तिथे तबल्याचा क्लास, ड्रॉइंगचा क्लास, गाण्याचा क्लास या गोष्टी सहसा उपलब्ध नसतात. पण कॉलनीमध्ये एक स्पोर्ट्स क्लब असतो. तिथे बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम असे इनडोअर स्पोर्ट्स असतात. शिवाय आऊटडोअर स्पोर्ट्सदेखील असतात- क्रिकेट, व्हॉलिबॉल, हॉकी, स्विमिंग वगैरे. पण त्याशिवायचे आमचे मुलांचे खेळ म्हणजे भोवरा, पतंग, सूरपारंब्या. भोवऱ्याला आरी लावण्यापासून, पतंग तयार करण्यापासून सगळे खेळ मी खेळलो. हे खेळ आजच्या शहरी मुलांना माहीत पण नाहीत. होळीसाठी १५-१५ दिवस आधी आम्ही मुलं कुठून कुठून लाकडं तोडून आणायचो, मग ती वाळवायची, मग होळी पेटवायची. तर या सगळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वेळच मिळायचा नाही. त्या काळात नाटकाशी तर माझा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता.
एक पुसटशी आठवण आहे. मी सहावी-सातवीत असताना ‘दिवा जळू दे सारी रात' हे शरद तळवलकरांचं नाटक नाशिकच्या गणपती उत्सवात आलं होतं. नाटकात शेवटी भूतबीत येतं त्याचा इफेक्ट आठवतो.
काही वर्षांनी बाबांची नागपूरहून बदली झाली. तोवर माझं कॉलेजचं शिक्षण सुरू होणार होतं. माझं शिक्षण, अभ्यास, प्रॅक्टिकल्स यात खंड नको म्हणून मी नागपूरलाच राहायचं असं ठरलं. त्यामुळे काय झालं की मी मित्रांमध्ये जास्त रमायला लागलो. नागपूर मेडिकल कॉलेजला मी बीएएमएस करत होतो. कॉलेजच्या इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला लागलो. कुठल्याही गोष्टी मित्रांसमवेत एकत्र करण्यात मजा वाटायला लागली. एकत्र खेळायचं, सिनेमाला एकत्र जायचं, सगळ्यांनी एकत्र जेवायचं वगैरे. मग कॉलेजची निवडणूक लढायचं ठरलं आणि कल्चरल सेक्रेटरी या पदासाठी उभा राहिलो. निवडून आलो. तेव्हा आम्ही मित्रांनी मिळून पॅनेल तयार केलं. ते पॅनेल अजूनही चालू आहे. तेव्हा आम्ही दोन संप केले. रास्ता रोको आंदोलन केलं. जेलमध्ये गेलो. एमबीबीएस आणि बीएएमएसला समान दर्जा मिळावा यासाठीही आम्ही संप केले. अंतुले मुख्यमंत्री असताना आम्हाला हा समान दर्जा मिळाला. एम.पी.एस.सी.च्या परीक्षा दिल्यानंतर शासकीय सेवेत मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट मिळायच्या, पण त्यासाठी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचा विचार व्हायचा नाही. पहिल्या वर्षी जरी नाही तरी दुसऱ्या वर्षी आमचं आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर त्या पोस्ट्स बीएएमएसलासुद्धा मिळायला लागल्या.
हे सगळं चालू असताना एकदा कॉलेजच्या नोटिस बोर्डवर नाटकाची नोटिस लागली. नाटकात काम करण्यासाठी मी नाव नोंदवलं; पण माझी निवड काही झाली नाही. त्याचं मला फार काही वाटलं नाही. पण मी त्या नाटकाच्या दिग्दर्शकाला सांगितलं, “मला तिथे म्हणजे त्या ग्रुपमध्ये राहू दे. मी तालमीचा हॉल झाडीन, चहाबिहा आणून देईन, काही मदत लागली तर करीन.” मला तालमींच्या वातावरणात, मित्रांबरोबर, त्या ग्रुपमध्ये राहायचं होतं.
आपल्या हातून नकळत घडणाऱ्या गोष्टी पुढे किती पूरक, परिणामकारक ठरतील, हे आधी आपल्याला कळत नाही. इथे तसंच झालं. मनोहर काटदरे यांनी लिहिलेलं ‘घेतलं शिंगावर' या नावाचं ते नाटक होतं. त्यात एक पारशी माणसाचं पात्र होतं, जे त्या नाटकात फक्त तीनदा येतं. तो पारशी माणूस त्यातल्या मुख्य नायकाचा बॉस असतो. एस. बी. जोशी नावाचे आमच्या कॉलेजचे त्या वर्षीचे नाट्य विभागाचे प्रमुख होते. त्यांना माझ्यात काय दिसलं ते कळलं नाही. मी पारशासारखा दिसतो किंवा काय मला माहीत नाही. मी नेहमी गमतीने म्हणतो की कोकणस्थ आणि पारशी हे सारखे असतात. संख्येने कमी आणि डोक्याने वेडसर असतात. आतापेक्षाही मी तेव्हा किडकिडीत होतो. गोरा रंग तेवढा होता. पण शिफारस महत्त्वाची ठरते. जोशी सरांनी माझ्याविषयी बाळ पेशवेला, म्हणजेच नाटकाच्या डायरेक्टरला सांगितलं, की ‘पारशाच्या भूमिकेसाठी तू याला घे.' (म्हणजे त्यांनी माझी चक्क शिफारस केली.) ते नाट्य विभागाचे प्रमुख असल्यामुळे डायरेक्टरला त्यांचं सांगणं डावलता येईना. अशाप्रकारे रंगमंचावर माझा प्रवेश झाला. ते नाटक करताना मला ते आवडायला लागलं. नाटकाच्या तालमी करताना मला मजा वाटायची. एकूणच ते वातावरण मला भारी वाटायला लागलं. पहिल्याच प्रयत्नामध्ये मला चक्क अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. खरं तर मी त्यात फार काही वेगळं केलं नव्हतं, पण मी जे करत होतो ते मनापासून करत होतो.
त्या नाटकापासून माझी सुरुवात झाली. गॅदरिंगची सगळी नाटकं मी करायला लागलो. पुढे काही नाटकं दिग्दर्शित पण केली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये एकांकिकाही दिग्दर्शित केल्या. त्यांत अभिनयही करायला लागलो. १९७७-१९८३ या काळात आमच्या कॉलेजची सगळी नाटकं युनिव्हर्सिटीत पहिली आली. मी दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेता म्हणून पहिला आलो. मला तीन सुवर्णपदकं मिळाली. जनरल चँपियन म्हणून आमचं कॉलेज निवडलं गेलं. सगळ्यात जास्त बक्षिसं मला मिळाली. त्यामुळे पोरांनी मला खांद्यावर घेतलं. त्याच्याच जोडीला राज्य नाट्य स्पर्धा, नागपुरात खूप प्रतिष्ठित असलेली ‘डावरे एकांकिका स्पर्धा' (पुण्यात जसं ‘पुरुषोत्तम करंडक'ला महत्त्व आहे तसंच तिथे ‘डावरे करंडक'ला आहे.) सगळ्यात सहभागी झालो. त्याच्यामुळे मदन गडकरी नावाचे दिग्दर्शक चांगले ओळखीचे झाले. त्यांच्याकडे मी राज्य नाट्य स्पर्धेतली नाटकं केली. रमेश अंभईकर नावाचे दिग्दर्शक होते (ते पुरुषोत्तम दारव्हेकरांचे शिष्य होते.) त्यांच्याकडे काही नाटकं केली. त्याच्या जोडीने गणपती उत्सवात काही नाटकं केली. श्याम फडके यांची आणि इतर काही लेखकांची विनोदी किंवा फार्स अशा बाजाची नाटकं केली. अशा सेमी-कमर्शियल नाटकांत फार तर ५०-६० रुपये मिळत असतील. शिवाय विदर्भाचं वैशिष्ट्य असलेल्या ‘झाडीपट्टी' रंगमंचावरही नाटकं करत राहिलो. एकुणात, सगळं आयुष्य नाटकमय झालं.
माझं नाटकाच्या आहारी जाणं एव्हाना घरी कळलेलं होतं. मग घरून तंबी आली, की वर्षाला आता तू दोन किंवा तीन नाटकं करायचीस. एक कॉलेज गॅदरिंगचं आणि एक राज्य नाट्य स्पर्धेचं. त्याशिवायचं नाटक तू घ्यायचं नाहीस. एकदा मी आईला घरी पत्र लिहिलं, की ‘आणखी एक नाटक मी घेतलं आहे आणि तुला बघायचं असेल तर तू ये. तू आलीस तर मला आवडेल.' तिने विचार केला, की आता हा बाबा काही ऐकत नाही. तिने सांगितलं, की ‘तू आता नापास होता कामा नयेस. तेवढं तरी तू सांभाळ. बाकी तुला जे काही नाटक करायचंय ते कर.' मला ते सांभाळणं भाग होतं. कारण मी त्यांच्या पैशांवर जगत होतो. मी काही आरक्षण वर्गातला विद्यार्थी नव्हतो. सगळी फी आई-बाबा भरत होते. त्याच्यामुळे ती अट पूर्ण करावी लागायची. आम्हाला ५० टक्के मार्कांना पासिंग होतं. खूप अभ्यास करावा लागायचा, त्यामुळे नाटकाच्या काही स्पर्धा सोडून द्याव्या लागायच्या. त्याचा त्रास व्हायचा. पण ते केलं सगळं.
त्या दरम्यान आमच्या काही सीनियर्सनी ‘अपेक्षा' नावाची संस्था स्थापन केली. नागपूरमध्ये आपण कमर्शियल नाटक करू, आपण नाटक इकडे बसवायचं आणि मोहन कोठीवान किंवा धनंजय भावे यांनी मुंबईहून येऊन त्या नाटकात काम करायचं, त्याचे प्रयोग नागपुरात करायचे, असा त्यामागचा उद्देश होता. नाट्यक्षेत्रातली ही दोन ज्येष्ठ मंडळी नागपूरची. ‘अपेक्षा'ने बसवलेल्या अशा तीन नाटकांमध्ये मी होतो. त्या तीनही नाटकांमध्ये मोहन कोठीवान होते. त्यातलं एक नाटक म्हणजे, ‘तुझं आहे तुझपाशी'. त्यात मी श्याम होतो. दुसरं, ‘वेगळं व्हायचंय मला'. त्यात मी विनायक विघ्ने नावाचा खलनायक केला होता. तिसरं म्हणजे ‘नाथ हा माझा'. या नाटकांच्या दरम्यान मोहन कोठीवानांशी माझी ओळख झाली. मला नेहमी वाटतं, की ‘नियती तुमचं बोट धरून तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला नेते. ही नियती कुठल्या रूपाने येईल ते तुम्ही सांगू शकत नाही.' एस. बी. जोशींची शिफारस ही नाटकामध्ये चंचुप्रवेश करण्यासाठी जशी महत्त्वाची ठरली, तसा नंतर मोहन कोठीवानांचा रोल आला. त्यांनी मला सांगितलं, ‘तुला नाटकामध्ये करियर करायचं असेल तर मुंबईत ये. मी तुला मदत करीन.' म्हणजे पुन्हा तेच. शिफारस करीन. सध्याच्या भाषेत गॉडफादर होईन. असो.
दरम्यान माझं शिक्षण पूर्ण झालं. मी डॉक्टर झालो. अर्थातच दवाखाना उघडायचा म्हणून नागपुरात एक जागा बघितली आणि दुसरी नागपूरच्या थोडी बाहेर बघितली. आपण ज्याला आयडियल सेट-अप म्हणतो, तसं शहरात एक दवाखाना, गावात एक दवाखाना. दोन्ही ठिकाणी फॅमिली फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस सुरू झाली.
कुठल्याही नोकरी-व्यवसायात कामाचं समाधान मिळणं महत्त्वाचं असतं. कोणाला ते पैशांच्या स्वरूपात हवं असतं, तर कोणाला कामाच्या स्वरूपात. नेमकं काय हवंय ते ज्याचं त्यालाच कळतं. पण मला ते कुठल्याच बाबतीत मिळत नव्हतं. मला कंटाळा यायला लागला. म्हणजे मी त्या व्यवसायाला वाईट म्हणत नाहीये. जनरल किंवा फॅमिली फिजिशियन ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. फॅमिली फिजिशियन हा त्या कुटुंबाचा फिलॉसॉफर, गाइड किंवा मित्रही असतो. आई-वडील जे मुलांशी बोलू शकत नाहीत ते तो सांगू शकतो. आरोग्याच्या बाबतीतला एखादा अवघड निर्णयही तो घेतो. आता स्पेशालिस्ट आणि कन्सलटंट आल्याने फॅमिली फिजिशियन ही संकल्पनाच हद्दपार झाली आहे. फॅमिली फिजिशियनचा रोल मला खरंच करायचा होता, पण दुसरीकडे ते रूटिन कंटाळवाणं वाटायला लागलं. म्हणजे तुम्ही सकाळी दवाखाना उघडता, दुपारी घरी जेवायला जाता, झोपता. संध्याकाळी पुन्हा दुसरा दवाखाना उघडता. रविवारी सुट्टी घेता. रोज तेच आणि तसंच. माझ्या मनात आलं, हे माझं काम नाही. एक वर्ष मी कशीबशी प्रॅक्टिस केली आणि मग बंद केली.
खरं तर डॉक्टर व्हावं असं काही मी ठरवलेलं नव्हतं. मी ९० टक्केवाला विद्यार्थी कधीच नव्हतो, ६०-७० टक्केवालाच होतो. वडिलांच्या आग्रहाखातर डॉक्टर झालो. त्या वेळी मेडिकलला असणं प्रतिष्ठेचं मानलं जायचं. अजूनही मला सगळं आठवतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी इंटर्नशिप केली. तेव्हा ग्रामीण भागातच इंटर्नशिप केली पाहिजे असं काही बंधन नव्हतं.
असो. तर शेवटी मी प्रॅक्टिस बंद केली. मी डॉक्टर म्हणून तोवर नाव कमावलेलं नव्हतं. मला काही फारशी मिळकतही सुरू झालेली नव्हती. वडिलांना मी प्रॅक्टिस बंद करण्याबाबत सांगितलं. मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात सांगितलं जातं तसं वडिलांनी मला सांगितलं, “आतापर्यंत आम्ही तुला नापास होऊ नकोस असं सांगत होतो. आता निर्णय तुझा आहे. माझी अजून पाच वर्षं सर्व्हिस आहे, तोवर तुला सेटल व्हावं लागेल.” इतर समाजांत, विशेषत: गुजराती-मारवाडी घरांमध्ये मुलाला आयता व्यवसाय-धंदा हातात दिला जातो, तसं आपल्याकडे नाही. मुलगा मोठा झाला की ‘आता तुझं तू बघायचं' हे सांगितलं जातं. एकप्रकारे ते बरं आहे.
नाट्यक्षेत्रात आल्यानंतर मला जे हवं होतं ते मिळालं. त्यामुळे सुरुवातीला त्रास झाला तरी परत वैद्यकव्यवसायाकडे जावं असं वाटलं नाही.
नंतर डॉ. शरद भुताडिया यांची द्विधा अवस्था मी बघितली. ते प्रोफेशनल प्रॅक्टिशनर होते. चाइल्ड स्पेशालिस्ट होते. ‘ज्याचा त्याचा प्रश्न' या नाटकात आम्ही बरोबर होतो. उत्तम प्रॅक्टिस सुरू असताना ती प्रॅक्टिस सोडणं आणि दुसऱ्या क्षेत्रात पुन्हा शून्यापासून सुरुवात करणं सोपं नसतं.
कलेच्या क्षेत्रात आलो तरी मी मेडिकलचे धडे विसरलो नाही. म्हणजे अजूनही मी रोगाचं निदान करू शकतो, पण प्रॅक्टिशनर डॉक्टर नसल्यामुळे उपचार करू शकत नाही. मेडिकलच्या क्षेत्रात सतत गोष्टी बदलत राहतात. उपचारपद्धती बदलत असते. पण माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा नाटकांच्या दौऱ्यांत बऱ्याच वेळा उपयोग होतो.
मला लोक खूप वेळा विचारतात, ते प्रोफेशन सोडल्याचं वाईट वाटतं का, परत प्रॅक्टिस करावीशी वाटते का, वगैरे. खरं सांगायचं, तर मला परत प्रॅक्टिस करावी लागेल हा विचार मनात आला की वाईट वाटायचं. नाट्यक्षेत्रात सुरुवात केली तेव्हा क्वचित असा विचार मनात यायचा. पण बघितलं तर अगदी अशोक सराफ यांच्यापासून सगळ्यांचा सुरुवातीचा काळ थोडा अवघड असतो. मला स्थिरावायला पाच-एक वर्षं लागली. मी छोट्या छोट्या भूमिका करत होतो. बदली भूमिकाही केल्या, पण म्हणावं असं काम मिळत नव्हतं. मात्र परत गेलो नाही. परत गेलो असतो तर ‘गेला होता मोठा काही तरी करायला, आला परत' हेच ऐकावं लागलं असतं. हे अपमानास्पद असतं. लोकांना तो पराभवच वाटतो. एक तर आपल्याकडे लोकांना काही वेगळं करण्याचं कौतुक नाही. त्यामुळे हसंच झालं असतं.
मध्यंतरीच्या काळात मी डॉक्टर रवी बापटांचं ‘केईएम, वॉर्ड नंबर पाच' हे पुस्तक वाचलं. त्यात त्यांनी शोधून काढलेल्या काही सर्जरीजच्या पद्धतींबद्दल लिहिलं होतं. ते वाचून मला जाणवलं, की अरे, डॉ. बापट हे तर संशोधक आहेत. नुसत्या सर्जरीज करत नाहीत तर वेगळं काही करत आहेत. मी प्रॅक्टिस केली असती तर मला रोगनिदान करण्याच्या, उपचार देण्याच्या काही वेगळ्या पद्धती शोधून काढता आल्या असत्या का, काही फॉर्म्युला मी शोधला असता का, आयुर्वेदाची मदत घेऊन प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नवीन काही केलं असतं का? तर त्याचं ठोस उत्तर माझ्याकडे नव्हतं. डॉक्टर म्हणून मला फार काही वेगळं करता आलं असतं का नाही याबाबत मी साशंक होतो; पण नाट्यक्षेत्रात मला वेगळं करता आलं. उदाहरण द्यायचं तर आजही ‘कुसुम मनोहर लेले' हे गाजलेलं नाटक म्हटलं की लोकांना माझं नाव आठवतं.
कलाक्षेत्राला मी योगदान दिलं असं म्हणणं ही फार मोठी गोष्ट होईल; पण एक समाधान आहे, खूप लेखकांचे विचार मला नेमकेपणाने पोचवता आले. लेखकाने ज्या प्रेक्षकांसाठी नाटक लिहिलं, ज्या विचारासाठी लिहिलं, ते मला पोचवता आलं. महाराष्ट्रभर फिरता आलं; नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतात जाता आलं. लोकांचा थेट रिस्पॉन्स अनुभवता आला.
त्यातल्या खास गोष्टी काय असतील, तर पणशीकरांनी स्वतः सांगणं- ‘माझ्यापेक्षा तू लखोबाचा रोल चांगला केलास'. पु.ल. आणि सुनीताबाईंनी ‘सुंदर मी होणार' हे नाटक समोर बसून बघणं. शंकर वैद्यांसमोर त्यांचीच कविता सादर करता येणं. या सगळ्यातून अपार समाधान मिळालं.
माझे सुरुवातीचे दिवस आठवून गंमत वाटते. या सगळ्या काळात असंख्य अपमान झाले, ह्युमिलेशन झालं. तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेत काय मेडल वगैरे मिळवलं असेल, ते मुंबईच्या व्यावसायिक जगात कामाचं नसतं. पण अशा फेजेस अनेकांच्या आयुष्यात येतात. उलट अनुभवही येतात.
मला मुंबईत येऊन एक महिना झाला होता, तेव्हा एक दिवस मला एक फोन आला. एका खऱ्या घटनेवर आधारित एक नाटक करायचं होतं. नाटकाचं नाव होतं- ‘साहेब विरुद्ध मी'. लेखक प्रभाकर नेवगी. दिग्दर्शक शशिकांत निकते. श्रीकांत मोघे आरोपीच्या वकिलाचं काम करणार होते. व्हीलन मोहन कोठीवान. संजीवनी बीडकर पण होत्या नाटकात. नाटकाला तीन दिवस शिल्लक होते आणि त्यातला जजचं काम करणाऱ्या नटाचा काही तरी प्रॉब्लेम झाला होता. तो रोल करण्याबद्दल मला विचारणा झाली होती. हीच ती नियती. म्हटलं, चालेल. खरं तर अगदी थोडाच वेळ मी कोर्टरूममध्ये दिसणार होतो. शशिकांत निकत्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ‘हा अगदीच तरुण जज वाटेल, पण चालेल' म्हणाले. दुसऱ्या दिवशी तालमीला गेलो. काय नशीब असतं बघा. अरुण पाटील सरकारी वकिलाचं काम करत होता. (मी ते नाव विसरूच शकत नाही.) तो साधना विद्यालयात शिक्षक होता. त्याला सुट्ट्या मिळणं शक्य नव्हतं. म्हणून ‘हे काम मी करू शकत नाही' असं सांगायला तो आला होता. मग काय, एकदम फिरलं सगळं. शशिकांत निकत्यांनी मला विचारलं, “तू सरकारी वकील करशील का?”
करशील का? अहो, आंधळा मागतो एक.. अशी माझी अवस्था झाली. करीन म्हटलं. दोन दिवसांवर नाटक आलेलं. जजचं काय करायचं ते बघू म्हणाले. सरकारी वकिलाला सीन्स होते, डायलॉग होते. त्या वेळी विदर्भ वैभव मंदिर इथे मी रात्री १० रुपये कॉट या दराने राहत होतो. भवानी शंकर रोडवरून मोठा ट्रक किंवा बस गेली तर तिथल्या कॉट हलायच्या. रात्री झोपच लागायची नाही. एका खोलीत ८-१० माणसं असायची. खोलीत लाइट लावता यायचा नाही. जिन्यातला लाइट चालू असायचा. जिन्यात जाऊन मी माझे डायलॉग पाठ केले. दुसऱ्या दिवशी परेलला तुलसी पाइप रोडला कामगार क्रीडा भवन नावाचं एक स्टेज आहे तिथे रंगीत तालीम होती तिथे गेलो. बोलताना ततपप व्हायला लागलं. ते म्हणाले, “घाबरू नकोस.” कशीबशी तालीम झाली. तिसऱ्या दिवशी शिवाजी मंदिरला प्रयोग होता. तो उत्तम झाला. ते माझं पहिलं व्यावसायिक काम. आणि मग तिथून सुरुवात झाली. माझा आत्मविश्वास वाढला. धनंजय भाव्यांनी प्रभाकर पणशीकरांबरोबर ओळख करून दिली.
त्यानंतर मग कामं मिळत राहिली. नाटकांत, चित्रपटांत, मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करत राहिलो. आता पूर्णपणे स्थिरावलो आहे असं वाटत असतानाच कोरोनाच्या काळात मी थोडासा हललो. आम्हा कलाकारांची कामं कमी झाली आणि डॉक्टरांची वाढली. जे फक्त स्टेजवर काम करतात त्यांच्या डोळ्यांसमोर अक्षरश: अंधार होता. हे सगळं पुन्हा सुरू कधी होणार? प्रेक्षक कधी येणार? मी तेव्हा बाल्कनीत जाऊन एकटा रडलो आहे. अनेक कलाकारांची ही अवस्था झाली होती. सर्जन आणि आर्टिस्ट सारखे असतात. सर्जनला काही दिवस सर्जरी करायला मिळाली नाही तर तो अस्वस्थ होतो. तसंच आर्टिस्टचं आहे. स्टेजवर काम करता येत नाही याने फार अस्वस्थता येते. आतल्या एनर्जीचं करायचं काय? मी मोठ्यांदा ओरडायचो. काही दिवसांत सगळं पूर्ववत झालं. त्या काळात क्वचित वाटायचं, मेडिकल प्रॅक्टिस करावी. पण आता जनरल प्रॅक्टिशनर राहिलेच नाहीत.
एन.एस.डी.च्या एका नाट्य शिबिरात मला अनिरुद्ध खुटवड याने एकदा बोलावलं होतं. मी म्हटलं, “इतरांना अभिनय शिकवण्यासाठी मी स्वत: औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. कोणत्याही ॲक्टिंग स्कूलचा मी विद्यार्थी नाही. त्यामुळे मी इतरांना अभिनय शिकवू शकेन असं वाटत नाही.” पण अभिनय या विषयावर अनिरूद्धशी दोन-अडीच तास गप्पा मारल्या. तो म्हणाला, आत्ता तुम्ही बोललात ना तेच मुलांशी बोलायचं. तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलं, आता ॲकॅडमिक भाषेत सांगा. मला गंमतच वाटली. ज्यात करियर करायचं म्हणून मी अभ्यास केला ते वैद्यकीय क्षेत्र माझ्यापासून दुरावलं आणि सुरुवातीला माझी पॅशन नसलेलं नाटक आणि अभिनय यांतलं माझं करियर ॲक्टिंग शिकवण्याइतकं अनुभवसंपन्न झालं! दॅट इज डेस्टिनी!
माझ्या आजवरच्या प्रवासाविषयी मलाच उत्तर न मिळालेला एक प्रश्न मांडतो आणि थांबतो. फार जुनी आठवण आहे. मी सायकल आणि मग मोपेड चालवायला शिकल्यानंतर एक उटपटांग गोष्ट मला करून पाहावीशी वाटली. क्रॉस हँडल धरून म्हणजे उजव्या हाताने डावं हँडल धरून आणि डाव्या हाताने उजवं हँडल धरून मोपेड चालवण्याचा मी प्रयत्न केला. हा प्रकार आता बालिश आणि फुलिश वाटेल, पण तेव्हा मी तो करून पाहिला. परिणामी, अतिशय वाईट पद्धतीने आपटलो. असा प्रकार कोणीही ट्राय करू नये असं मी आज आवर्जून सांगेन, पण तेव्हा हट्टाने मी तो अतरंगीपणा केला होता.
असाच एकदा ट्रेकिंगसाठी गेलो होतो. १४ हजार फूट चढायचं होतं. दुर्दैवाने आदल्या दिवशी मला डीहायड्रेशन झालं. पाऊल टाकता येईना इतका अशक्तपणा आला. खेचरावर बसून वर चढणं असा पर्याय होता, पण तो मनाला पटत नव्हता. कारण ती गोष्ट आयुष्यभर डाचत राहिली असती. पुन्हा तिरपागड्या स्वभावाने उचल खाल्ली. इलेक्ट्रॉल पीत पीत मी संपूर्ण १४ हजार फूट माझ्या पायांनी चढलो.
आणखी एक उदाहरण सांगतो. ‘फू बाई फू' या गाजलेल्या कार्यक्रमाचा पहिला सीझन होता. सीनियर आर्टिस्ट म्हणून मला नवोदित कलाकारांसोबत परफॉर्म करायला बोलावलं होतं. तिथे गेल्यावर कळलं की मी एकटाच सीनियर होतो. दिग्दर्शकाने सांगितलेलं त्यामागचं कारण ऐकून मला धक्का बसला- एकही नामवंत कलाकार ज्युनिअर्ससोबत परफॉर्म करायला तयार नव्हता. इतरांचं बाजूला ठेवू, पण अमुक एक गोष्ट करून पाहावीशी वाटणं हे माझ्या स्वभावाचं आणि पिंडाचं वेगळेपण आहे.
आता ही ऊर्मी म्हणा, कंड म्हणा किंवा खाज म्हणा, माझ्यात कुठून येते हा फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पण त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
(अनुभव, जून २०२३ च्या अंकातून साभार.)
