आम्ही कोण?
लेखमालिका : चतकोर शतकाच्या पाऊलखुणा

लग्नाचं गारूड अजूनही अबाधित?

  • श्रीनिवास जोशी
  • 17.02.26
  • वाचनवेळ 22 मि.
marriage

विवाहसंस्था गेली कित्येक सहस्त्रकं मानवी समाजाचा आणि संस्कृतीचा कणा बनून राहिली आहे. नदीच्या दोन तीरांमधून नदीने वाहत जावं तशी मानवी संस्कृती स्त्री-पुरुष संबंधांच्या तीरांमधून वाहत आली आहे. नदीच्या ओघाला दोन तीरांचं बंधन असतं. तीर नसतील तर पाणी भरटकत जातं. नदी, ‘नदी’ उरत नाही. तिचा ओघ आणि तिचं नदीपण फिसकटत जातं. विवाहसंस्था नसेल तर संस्कृती ‘संस्कृती’ राहत नाही. संस्कृती आणि मानवी जीवन लग्नसंस्थेशिवाय फिसकटत जातं.

म्हणूनच लग्न म्हणा किंवा विवाह बंधनातलं सहजीवन म्हणा, त्यांचे गोडवे नेहमीच गायले जात असतात. एकंदर, तीरांची बंधनं पाळल्यामुळे ओघ अबाधित राहिला तरी नदीत सगळं स्थिरस्थावर नसतं. कुठे भोवरे असतात, कुठे धबधबे खळबळ माजवतात, तर कुठे डोह साचून पाणी गढूळ होतं. लग्नाने आणलेल्या स्थिरतेच्या प्रवाहातसुद्धा अनेक गोंधळ माजतात. अस्वस्थता, असंतोष, कंटाळा, नात्याच्या अपूर्णत्वामुळे आलेली बंडखोरी अशा किती तरी गोष्टी. विवाहसंस्था गेली कित्येक सहस्त्रकं कायम असली तरी कालानुरूप तिच्यात अनेक बदल होत गेले आहेत. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत काय संक्रमणं जाणवत गेली याविषयीचा हा अनुभव.

या लेखात मुख्यत्वेकरून मध्यमवर्गाविषयी लिहिलं आहे. आज मध्यमवर्ग अनेक बाबतींत त्याच्या कळत- नकळत जातींच्या पलीकडे गेला आहे. मध्यमवर्ग ‘पॅन-इंडियन’ झाला आहे. संपूर्ण भारताच्या स्तरावर बघायला गेलं तर जीवनमूल्यांच्या बाबतीत तो एकसारखा झाला आहे. हा वर्ग आज इतर वर्गांसाठी एक ट्रेंड-सेटर बनून राहिला आहे. म्हणून या वर्गाची चर्चा.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी लग्न ही मूलतः सामाजिक गोष्ट होती. लग्नामागच्या प्रेरणा वैयक्तिक होत्या, स्वप्नं- अपेक्षा वैयक्तिक होत्या; परंतु या सगळ्या वैयक्तिक स्वप्नांच्या मागे सामाजिक वास्तवाची पार्श्वभूमी होती. लग्न शक्यतो जातीमध्ये तसंच योग्य वयात होणं आवश्यक होतं, आई-वडिलांबरोबरच समग्र समाजाचे आशीर्वाद लग्नासाठी आवश्यक होते.

याचा अर्थ असा नाही की सगळेच लोक अशा सामाजिक लग्नाला बळी पडत होते. याच काळात काय, पण अगदी पूर्वापार काळापासून लग्नाला अत्यंत वैयक्तिक गोष्ट मानून मनस्वीपणे ज्या व्यक्तीविषयी मनापासून प्रेम वाटत आहे त्याच व्यक्तीशी लग्न करणारे आणि अत्यंत प्रगल्भ सहजीवन जगणारे लोक होते; परंतु त्यांची संख्या नगण्य होती. बाकी सारे मुलगा किंवा मुलगी पाहून लग्न करणारे. इथे जाता जाता सांगावंसं वाटतं, की प्रेमविवाह ही अत्यंत मनस्वी बाब असली तरी ती प्रगल्भ सहजीवनाची गॅरंटी असतेच असं नाही, हे सगळेच मान्य करतील.

हेही वाचा - गावाकडच्या मुलांना मिळेनात लग्नासाठी मुली

माझ्या पिढीविषयी बोलायचं, तर काही लग्नं सोडली तर लग्न हा मुख्यतः सामाजिक विषय होता. त्यामुळे लग्न करताना हिशोब महत्त्वाचे होते. जात, सामाजिक प्रतिष्ठा, पैसा, मालमत्ता या गोष्टींना प्राधान्य दिलं जात होतं. या प्रकारात बहुतांश वेळा लग्नाच्या वेदीवर आपल्या आवडीनिवडी, आपलं व्यक्तिमत्त्व, आपली स्वप्नं या सगळ्यांचे बळी चढवले जात. लग्न झालं की प्रेम निर्माण होत जातं अशी धारणा होती. आधी प्रेम आणि नंतर लग्न, याऐवजी आधी लग्न आणि नंतर प्रेम अशी योजना होती. कथा, कविता, सिनेमा, नाटक आणि इतर कलाप्रकारांत प्रेमाचे गोडवे गायले जायचे, परंतु समाजात गोडवे खऱ्या अर्थाने ठरवून केलेल्या लग्नांचेच गायले जात.

प्रेम जसं पहिल्या नजरेत तयार होतं तसं ते सहवासानेही तयार होतं, ही गोष्ट मान्य करता येण्यासारखी आहे. लग्न झाल्यावर प्रेम तयार होतं. या प्रकारात उत्कटता आणि झिंग थोडी कमी असली तरी सहवासामुळे काही जोडप्यांमध्ये सखोल प्रेम तयार होतं. हे फारच लकी लोक! बाकी, ठरवून लग्न केलेल्या लोकांच्या बाबतीत बघायला गेलं तर यातली बहुतांश जोडपी लग्नानंतर एकमेकांच्या बरोबर राहण्याच्या सवयीलाच प्रेम म्हणत राहताना दिसतात.

मी कॉलेजात असताना, म्हणजे १९८५च्या सुमारास तर माझ्या अनेक मैत्रिणींनी आई-वडील सांगतील त्या मुलाशीच आम्ही लग्न करणार असं ठरवून ठेवलं होतं. ‘आम्ही नाहीत तसल्या मुली’ असा सगळा आविर्भाव होता. जे काही धर्म, समाज आणि रूढी-परंपरेने ठरवलं आहे, जे काही आई-वडील ठरवणार आहेत त्यात आपण कशाला ढवळाढवळ करा, असा अनेक मुलींचा विचार होता. या मुलींना आपल्या आयुष्यातल्या सर्वांत महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर नको होती, असं मला तेव्हापासून वाटत राहिलं आहे. ही त्या काळची प्रातिनिधिक भूमिका होती.

यात मुलांचीही भूमिका फारशी वेगळी नव्हती. बहुतांश मुलंही जातपात, आई-वडील वगैरे बाजू सांभाळून लग्न करण्याच्या वृत्तीचीच होती. परंतु लग्नसंस्था पुरुषांच्या बाजूने झुकलेली असल्याने या मुलांना आत्मभान न बाळगण्याची भावनिक किंमत फारशी मोजावी लागणार नव्हती. माझ्याबरोबरच्या मुलींना मात्र ती मोजावी लागली.

या पद्धतीने लग्न केल्यावर संसार झाले, मुलंबाळं झाली, फ्लॅट झाले, सोनंनाणं झालं, अगदी सगळं झालं; परंतु सफळ संपूर्ण असं सहजीवन झालं का, असा प्रश्न आज विचारावासा वाटतो. असं लग्न झाल्यावर, एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांच्या मंथनातून एकमेकांचा भावनिक आणि तात्त्विक विकास होत गेला का, असा प्रश्न विचारल्यावर ‘हो’ असं उत्तर येतं. परंतु अनुभवाने माझ्या लक्षात आलं आहे, की दहातल्या साडेनऊ वेळा हे उत्तर खोटं आणि दांभिक असतं.

हेही वाचा - घटती लग्नं; वाढते घटस्फोट : चीनपुढचं नवं आव्हान

आजकाल व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे सोशल मीडियामुळे खूपशा मैत्रिणी आणि खूपसे मित्र परत ‘कनेक्ट’ झाले आहेत. खूप साऱ्या मैत्रिणी मित्रांजवळसुद्धा मनं मोकळी करत आहेत. पूर्वीचे आवडते मित्र आता मॅच्युअर, वय झालेले आणि व्हॉट्सॲपच्या सेफ अंतरावर असलेले! त्यामुळे त्यांच्याजवळ मन मोकळं करावं असं खूपजणींना वाटत असावं. माझे अनेक मित्र-मैत्रिणी आजकाल मनातल्या मनात ‘ग्रे-डिव्होर्स’चा म्हणजे उतारवयातील घटस्फोटाचा विचार करताना दिसतात. आयुष्यभर जोडपी मुख्यतः मुलाबाळांसाठी आपलं मन मारून एकत्र राहिलेली असतात. आता तो असंतोष उफाळून येताना दिसतो. अर्थात, यातलं फारसं कुणी हा विचार अमलात आणताना दिसत नाहीत ही गोष्ट वेगळी!

फेसबुकवर लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो टाकून ‘तीस वर्षांचं सफल सहजीवन’ ‘माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइड’, ‘माय बिलव्हेड लीडर’ अशी वाक्यं लिहिणाऱ्या मैत्रिणी आणि मित्रही व्हॉट्सॲपच्या पर्सनल चॅटवर मात्र आपल्या नवऱ्याबद्दल किंवा बायकोबद्दल संताप व्यक्त करताना दिसतात. वर्षानुवर्षांचा साठलेला संताप! संसारात मी झोकून दिलं, पण हाताला काही लागलं नाही अशी भावना! दोन्ही बाजूंनी!

स्त्रियांमध्ये हा अंसतोष जास्त दिसतो. कारण त्यांनी आपला साथी निवडण्याची जबाबदारी घेतली नव्हती असं मला वाटतं. माझ्या ज्या मैत्रिणींनी प्रेमविवाह केले आणि ज्यांच्या मनात आज असंतोष आहे, त्या आपल्या दुःखासाठी नवऱ्यांना जबाबदार धरताना दिसतात. ज्यांनी ‘ठरवून’ लग्न केलं त्या मैत्रिणी नवऱ्याला, आई-वडिलांना आणि समाजाला जबाबदार धरताना दिसतात. हे दुःख जास्त मोठं आहे असं मला वाटतं. माझ्या आईची आणि सासूबाईंची पिढी सरळ दैवाला जबाबदार धरताना दिसतात. म्हणजे अजून दारूण दुःख! आणि त्याही आधीच्या पिढ्या ‘नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोडलं तर सांगायचं कुणाला’, अशा वृत्तीने लग्नाकडे बघत होत्या. पुरुषी त्रास हा नैसर्गिक मानला गेला होता. नैसर्गिक गोष्टीचं दुःख कशाला करायचं?

या पार्श्वभूमीवर माझ्या मैत्रिणींची पिढी दैवाला आणि निसर्गाला जबाबदार धरताना दिसत नाही. ती नवरा, आई-वडिलांना किंवा सामाजिक परिस्थितीला जबाबदार धरते. ही एक मोठीच प्रगती म्हणायची. कारण, आपल्या दुःखाचं किंवा असमाधानाचं कारण मानवी मानलं गेलं तर त्यावर निदान उपायांचा विचार तरी सुरू होतो.

या पिढीचा उल्लेख अशासाठी, की आज लग्न करणाऱ्या, सहजीवनाला सुरुवात केलेल्या मुला-मुलींची ही पालक पिढी आहे. आजच्या मुला-मुलींवर आजच्या जगाने केलेल्या संस्कारांबरोबरच यांचेही संस्कार आहेत. माझ्या पिढीमधल्या मुलींचं आयुष्य जगून झालं आहे. लग्नसंस्थेचा त्यांनी अगदी सखोल अनुभव घेतला आहे. या आजच्या मुलींच्या आयांचा आजच्या काळात उसळून आलेल्या स्त्रीस्वातंत्र्याला उघड नसला तरी छुपा का होईना, अगदी नक्की पाठिंबा आहे!

प्रातिनिधिक पातळीवर बघायला गेलं तर माझ्या पिढीतील स्त्रिया आपल्या लग्नाबद्दल फारशा समाधानी दिसत नाहीत. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेतच. इतके लोक आपल्या सहजीवनाबद्दल फेसबुकवर इतकं भरभरून बोलताना दिसतात, म्हणजे त्यातले अगदी थोडे लोक का होईना, थोडंफार खरंही बोलत असणारच! मात्र, बहुतेक स्त्रियांची भावना अशी, की संसार झाला खरा, पण त्या नादात हातून खूप काही निसटूनही गेलं! बहुतेक स्त्रियांच्या मनात ही भावना अगदी घट्टपणे घर करून राहिली आहे असं जाणवत राहतं. नवऱ्याचा पुरुषी अहंकार, त्याची असंवेेदनशीलता आणि त्याचं स्वतःमध्ये मग्न होऊन राहणं, म्हणजे थोडक्यात ‘टिपिकल इंडियन मेल मेंटॅलिटी’मुळे संसार व्हायचा तेवढा सुखाचा झाला नाही, अशी भावना स्त्रियांमध्ये दिसते.

मी खूप प्रेम केलं, परंतु मला मात्र प्रेम मिळालं नाही, ही खंत चौफेर दिसून येते. आपल्याला आणि आपल्या प्रेमाला गृहीत धरलं गेलं, ही भावना अनेक स्त्रियांना खूप त्रास देताना दिसते. आजच्या साठीमधील स्त्रीचं खूप सारं दुःख या भावनेतून उफाळून येतं आहे असं मला वाटतं.

आज कित्येकजणी नव्या ‘समजुतदार’ नात्याच्या शोधात आहेत, पण पाऊल टाकायचा धीर होत नाही. नुसतीच अस्वस्थता! तरीही फेसबुकवरच्या सफल सहजीवनाच्या पोस्ट्स! सगळं दुःख हसून साजरं करायचं! माझ्या पिढीला बघून एक गाणं आठवतं-

तुम इतना क्यूँ मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो!

नीलांजना भौमिक यांचं एक सुंदर पुस्तक आहे- ‘लाईज अवर मदर्स टोल्ड अस’. यात आपल्या समाजात स्त्रियांचे अगदी बेसिक असे गैरसमज कसे करून दिले जात असतात याची चर्चा आहे. लग्न हीच स्त्रीची ‘डेस्टिनी’ आहे, लग्नाशिवाय तिच्या आयुष्याला अर्थ नाही, मुलं झाल्याशिवाय तिच्या आयुष्याला अर्थ नसतो. सतत कॉम्प्रमाइज करत जगणं, सतत अन्याय सहन करत जगणं, सतत ॲडजस्ट करत जगणं, सगळ्या कुटुंबाची भावनिक आणि शारीरिक उस्तवार एकटीने करत जगणं म्हणजेच स्त्रीत्व, असे समज स्त्रीच्या मनावर बिंबवले गेलेले असतात. स्त्रीने आपल्या सेक्सच्या इच्छा व्यक्त करू नयेत, लग्नात मारहाण झाली तर होता होईल तो गप्प बसावं, लग्न होईपर्यंत कौमार्य फार आवश्यक असतं, असे अनेक संस्कार स्त्रीवर तिच्या कळत-नकळत झालेले असतात. सगळ्यात त्रासदायक समज म्हणजे- अत्यंत शांतपणे दुःख सोसत जगणं हे मानसिक सामर्थ्याचं लक्षण आहे! हे सर्व संस्कार पाळत स्त्री जगत असते. याउलट, पुरुषाला यातलं काहीच लागू होत नाही. नीलांजना भौमिक यांनी समाजाचा हा दुटप्पीपणा आपल्या पुस्तकात उघडा पाडला आहे. स्त्रीची इज्जत ही कुटुंबाची इज्जत असते, परंतु त्याच वेळी पुरुषाची इज्जत ही कुटुंबाची इज्जत नसते. स्त्रीने अफेअर केलं तर कुटुंबाची इज्जत जाते, पुरुषाने केलं तर तसं काही होत नाही! पातिव्रत्याचे जेवढे गोडवे गायले जातात तेवढे गोडवे एकपत्नीव्रताचे गायले जातात का? पातिव्रत्य वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये ‘क्रिस्टलाइज’ झालं आहे तसं एकपत्नीव्रत कुठल्या व्रतात ‘क्रिस्टलाइज’ झालेलं दिसतं का?

स्त्रीवरचे हे संस्कार कुटुंबं टिकवत असतात हे खरं आहे, पण त्यामुळे होणारी गळचेपी असंतोष तयार करत असते हेही तेवढंच खरं आहे. असा असंतोष माझ्या पिढीमधल्या मुलींमध्ये आता उफाळून आला आहे. आपण फार विचार न करता जगत गेलो आणि आत्मभान न कमावता जगत गेलो की आपण अनेक अन्यायांना बळी पडत जातो. या अन्यायांविषयीचा राग केव्हा तरी आपल्या मनात उफाळून येणारच असतो. माझ्या पिढीच्या बाबतीत बोलायचं तर तो राग आता उफाळून येतो आहे. माझ्या एक मानसोपचारतज्ज्ञ स्नेही आहेत. त्यांचं म्हणणं असं, की त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या पन्नास टक्के स्त्रियांच्या मनात नवऱ्याविषयी सूडाची भावना असते. बाकीच्या पन्नास टक्के स्त्रियांमध्ये रागाची!

खरं तर महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाईंपासून विचार करणाऱ्या स्त्रियांची परंपरा आहे; परंतु मूलतः सामान्य स्त्री आत्मभानापेक्षा संसारालाच महत्त्व देणारी राहिली. जणू काही आत्मभान आणि संसार एकत्र जाऊच शकत नाहीत! नीलांजना भौमिक यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रामधली अत्यंत मनस्वीपणे विचार करणारी स्त्री खूप आधीपासून स्वतःला व्यक्त करत होती. विभावरी शिरूरकर यांच्या ‘कळ्यांचे नि:श्वास’मुळे महाराष्ट्र हलला होता. गौरी देशपांडे यांची मनस्वीपणे स्त्री-पुरुष नात्याकडे बघणारी नायिका महाराष्ट्राला माहीत होती आणि आवडतही होती.

तसं बघायला गेलं तर माझ्या तारुण्याच्या काळात स्त्रीमुक्तीची चळवळ चांगलीच फोफावली होती. विद्या बाळ, छाया दातार आणि नीलम गोऱ्हे अशी नावं ऐकू येत होती. त्यांचे लेख येत होते, त्यांची व्याख्यानं होत होती. मी स्वतः १९८३-८४दरम्यान छाया दातार यांचं व्याख्यान पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत ऐकल्याचं मला आठवतं आहे. स्त्री तिच्या देहाची मालकीण आहे, तिच्या सेक्सच्या भावनेची मालकीण आहे, समाज-धर्म किंवा राष्ट्र तिला वापरू शकत नाही, अशा आशयाचे लेख छाया दातार लिहीत होत्या. हे विचार महत्त्वाचे असले तरी त्या काळी या सगळ्या भूमिकेची चेष्टा होत होती. त्या काळातल्या सामान्य स्त्रीला ‘स्त्रीमुक्ती’ खरं तर झेपत नव्हती. त्यामुळेच माझ्या कित्येक मैत्रिणी ‘आम्ही प्रेमविवाह करणाऱ्या ‘तसल्या’ मुली नाही’ अशी भूमिका घेत असाव्यात. मात्र, बंडखोरीचा ऑप्शन आता उपलब्ध झाला आहे हेसुद्धा तिला आत कुठे तरी कळत होतं.

तसे आम्ही पुरुष म्हणूनसुद्धा याच पिढीतले. त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करूनही आमच्या नकळत पुरुषीपणाचे काही डंख आमच्या व्यक्तिमत्त्वात राहिले असणार. आमच्या मुलाबाळांना ते जाणवत असणार. आपल्या आई-बापांच्या नात्यामधलं अपूर्णत्व आज पंचवीस-तीस वय असलेल्या मुला-मुलींना जाणवत राहतं. माझी मोठी मुलगी नेहमी म्हणते, की तुमचं मॅरेज ‘डिसफंक्शनल’ आहे. मला हसू येतं. मी मुलीला होकार देऊन विषय वाढवत नाही. ही गोष्ट मी परवा मित्राला सांगितली, तर तो म्हणाला, की ‘माझ्या मुलीसुद्धा नवरा म्हणून मी कसा असायला हवा होतो हे सांगत असतात.’ आमच्या पिढीतल्या बऱ्याच मुलांना आपले वडील आईशी वागताना पाहिजे तेवढी संवेेदनशीलता बाळगत नाहीत असं वाटत होतं. आम्ही आमचे संसार जास्त लोकशाहीवादी पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. असं असूनही मुलींकडून हे ऐकायला लागतं आहे. म्हणजे मी संसार फार ग्रेट केला असं मला म्हणायचं नाही. तसं बघायला गेलं तर आपण कशीबशी का होईना, नाव किनाऱ्याकडे आणली अशीच माझी भावना आहे. काही पातळ्यांवर यश आलं, काही पातळ्यांवर अपयश आलं. काय करणार? मुली तोंडावर टीका करतात, म्हणजे आपण संसारात लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालो याचं समाधान मानायचं! मोठी मुलगी ‘तुम्ही पेरेंट्स म्हणून चांगले होता’ असं म्हणते, हेच ‘आमचं सहजीवन’ सफल झालं याचं लक्षण समजायचं! मुली टीका करतात तेव्हा मी माझ्या सासूबाईंचं आमच्या संसाराबद्दल मत काय असेल याचा विचार करतो. त्या तर अजून जुन्या जमान्यातल्या. १९६८मध्ये लग्न झालेल्या. त्या माझ्याबद्दल मला तरी समाधानी दिसतात. जे काही आहे ते ‘ओके’ आहे, ‘लग्नात याहून अजून असं काय हाती लागणार’- अशी भूमिका असावी.

१९९३-९४नंतर सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. साधारणपणे १९७५-८०मध्ये जन्मलेल्या मुलींचं आयुष्य त्या तारुण्यात येत असताना झपाट्याने बदललं. अगदी नाट्यमय पद्धतीने बदलत गेलं. याला कारण कॉम्प्युटर होता. १९९०-९५च्या दरम्यान सॉफ्टवेअर इंडस्ट्रीने स्त्रीला प्रोफेशनल कोर्सेस खुले केले. कॉम्प्युटरने अनेक क्षेत्रांतली शारीरिक शक्तीची गरज नाहीशी केली. मुली विविध उद्योगांमध्ये कॉम्प्युटराइज्ड कंट्रोल पॅनेलच्या समोर बसून कॉम्प्युटरद्वारे इंडस्ट्री कंट्रोल करू लागल्या. फ्लोअर शॉपवर उभं राहून घाम गाळायची गरज आता उरली नव्हती. त्याआधी अत्यंत मर्यादित ‘प्रोफेशनल कोर्सेस’ मुलींमध्ये लोकप्रिय होते. त्या काळी मुली सामान्यपणे डॉक्टर तरी होत किंवा मग एमएस्सी मायक्रोबायॉलॉजी. आता मात्र त्या अनेकविध प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सर्वदूर कार्यरत झाल्या. अगदी संरक्षण क्षेत्रासारख्या तद्दन पुरुषांच्या क्षेत्रातसुद्धा गेल्या. मुली सैन्याच्या सिग्नल्स कॉर्प्समध्ये गेल्या, रिमोट कंट्रोल वापरून ड्रोन्स कंट्रोल करू लागल्या, ड्रोन्सद्वारे शत्रूवर बॉम्ब टाकू लागल्या, अगदी राफेलसारखी अत्याधुनिक फायटर जेट्ससुद्धा चालवू लागल्या. स्त्रीकडे पैसा आला, आत्मविश्वास आला, स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल आला.

याच काळात ‘गियरलेस स्कूटर’ हे स्त्रीच्या मुक्ततेचं एक प्रतीक बनलं. माझ्या तारुण्याच्या काळात स्त्रीचं स्कूटर चालवणं हा चेष्टेचा विषय होता. वि. आ. बुवा यांच्यासारख्या ‘विनोदी’ लेखकांचे ‘मिसेस स्कूटर शिकते’ असे ‘विनोदी’ लेख येत असत. आता स्कूटर इंडस्ट्री सगळ्या जगाने आश्चर्य करावं इतकी फोफावली- फक्त भारतीय स्त्रीमुळे!

या काळात स्त्री खऱ्या अर्थाने पैसा कमवू लागली. पहिल्या पहिल्यांदा स्त्रीने कमावलेल्या पैशावर तिची संपूर्ण मालकी नसायची. बहुतेक वेळा स्त्रीचा पैसा कुटुंबाचा ‘कॉमन’ पैसा असायचा. मेकअप, हॉटेलिंग वगैरे निर्णय तिचे असायचे- परंतु इनव्हेस्टमेंटबद्दलचे किंवा मोठ्या खर्चाबद्दलचे निर्णय बहुतेक वेेळा नवऱ्याला विचारून घेतले जायचे. आता ही परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. या दृष्टीनेही स्त्री आपल्या पायावर उभी राहू लागली आहे.

स्त्री बदलली की लग्नसंस्था बदलते. स्त्रीला आत्मभान येऊ लागलं आणि त्याचे पडसाद सामाजिक पातळीवर दिसू लागले की विवाहसंस्था बदलत जाते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत लग्नसंस्था हां हां म्हणता म्हणता एका महत्त्वाच्या बदलाच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली आहे! फ्रिडरीश नीत्शेचं एक सुंदर वाक्य आहे : ‘अ गुड मॅरेज इज वन व्हेअर ईच पार्टनर वाँट्स टु बी द फ्रेंड ऑफ द अदर अँड व्हेअर बोथ वर्क टुवर्ड बिकमिंग देमसेल्व्ह्ज.’ लग्नात दोघांनाही एकमेकांचे मित्र व्हायचं असतं आणि त्याच वेेळी दोघांनीही आपापलं आत्मभान प्रगल्भ करत जायचं असतं, आपापली व्यक्तिमत्त्वं घडवत जायचं असतं.

माझ्या पिढीतील बहुतेक लग्नं या निकषावर अजिबात खरी उतरत नव्हती. त्याआधीच्या पिढ्यांची तर बातच नको. कुणाचे तरी लाड कुणाच्या तरी त्यागाच्या जिवावर, असा सगळा मामला! कसली मैत्री आणि कसलं प्रगल्भ आत्मभान! बोलायच्या गोष्टी नुसत्या! स्त्री आत्मविश्वासाने रसरसलेली असेल तरच ती मैत्रीण बनू शकणार. नाही तर लग्नाच्या नात्याला गुलामीचा एक पदर तरी राहणारच! आता मात्र स्त्री या दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रगतीच्या पथावर आहे असं वाटू लागलं आहे.

या दृष्टीने २०१४-१५मध्ये एक मोठी क्रांती घडली! १९९३-९४च्या कॉम्प्युटर क्रांतीनंतर २०१४-१५मध्ये स्मार्टफोन क्रांती आली. ज्ञान पुस्तकांच्या आणि वाचनाच्या कचाट्यातून सुटलं. यूट्युबवर ज्ञान ‘ऐकू’ येऊ लागलं. तत्त्वज्ञान म्हणू नका, इतिहास म्हणू नका, समाजकारण म्हणू नका, मानसशास्त्र म्हणू नका, अगदी सगळी सगळी क्षेत्रं! स्मार्टफोनने स्त्रीला नसत्या मनोगंडांमधून सोडवलं. तिच्या आयांनी करून दिलेल्या गैरसमजांमधून सोडवत पुढे नेलं.

याशिवाय या मीडियाद्वारे पाश्चात्त्य संस्कृतीचं वारं जोराने वाहू लागलं. लिव्ह-इन रिलेशनशिप्सबद्दल चर्चा ऐकू येऊ लागली. मल्टिकल्चरल आणि मल्टिरेशियल लग्नं घडताना दिसू लागली. ‘पोर्न’ आणि ‘सेक्स टॉक्स’ असे नवे आयाम आले, डेटिंग ॲप्स आली. लेस्बियन मॅरेज, गे मॅरेज, बायसेक्शुअल नाती अशा नाना प्रकारांबद्दल ऐकू येऊ लागलं. हे सगळे प्रकार सर्व समाजांमध्ये अगदी प्राचीन काळापासून होते, परंतु आता ते सर्व उघडपणे दिसू लागले. त्यांच्यावर चर्चा झडू लागल्या. ‘जेन झी’ म्हणजे १९९७नंतर जन्माला आलेली मुलं-मुली या काळात वयात येत होती. या सगळ्यांमुळे ही पिढी अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली.

या काळात स्त्रीस्वातंत्र्याला अत्यंत पोषक अशी अजून एक गोष्ट घडली. सोशल मीडियामुळे स्त्री स्वतःला व्यक्तसुद्धा करायला शिकली. यूट्युबवर व्हिडिओ अपलोड करणं, इन्स्टाग्रामवर रील्स बनवणं, व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणं यातून स्त्री व्यक्त होत गेली. तिच्या या अभिव्यक्तीचं मित्र-मैत्रिणींकडून कौतुक होत गेलं. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला. याचे फार दूरगामी परिणाम लग्नाच्या नात्यावर होऊ लागले.

आज भारतात पाच ते सहा टक्के तरुण-तरुणी निदान काही काळ तरी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. बहुतेक जोडपी त्यानंतर लग्न करतात. आमच्या पिढीतील आयांना लग्न आवश्यक वाटत होतं. आजही या आयांचं तेच मत आहे. या आया स्वतः लग्नसंस्थेबद्दल खट्टू आहेत, परंतु त्यांना आपल्या पोरांनी लग्न करून ‘सेटल’ झालेलं हवं आहे. आजच्या बहुतांश मुला-मुलींनाही लग्न आवश्यक वाटतं आहे. लग्नसंस्था अजूनही आपलं गारूड टिकवून आहे.

परंतु एक गोष्ट नक्की, की लग्नसंस्था आता जास्त मोकळीढाकळी होत चालली आहे. या नव्या मुला-मुलींना घटस्फोट हा प्रकार पटकन घेऊन टाकायची गोष्ट वाटते आहे. त्यामागचा सामाजिक ‘स्टिग्मा’ गेला आहे. पटत नाही तर त्रास कशाला करून घ्यायचा? जोडप्यांना मुलं झालेली असली तरी घटस्फोट होऊ लागले आहेत. घटस्फोटाचा मुलांवर वाईट परिणाम नक्कीच होतो, परंतु विजोड लग्न कायम राहिलं तर त्याचा मुलांवर अजून जास्त वाईट परिणाम होत राहतो, असा विचार केला जाऊ लागला आहे. घटस्फोट आता इतका सर्वमान्य झाला आहे, की लग्न झाल्याच्या जशा पार्ट्या दिल्या जातात तशा घटस्फोट झाल्याच्याही पार्ट्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. याशिवाय गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुअल ही सगळी ‘नॅचरल व्हेरियंट्स’आहेत, म्हणजे हे सगळे माणसाच्या ‘सेक्शुअल बिहेवियरचे निसर्गमान्य प्रकार’ आहेत, हे ‘सायन्स’चं मत या मुलांनी मान्य केलं आहे.

याला कारण ओटीटी! ओव्हर द टॉप प्रक्षेपणं! सरळ तुमच्यापर्यंत नेटद्वारा. तुमच्या आणि कलेच्या मध्ये ना केबल, ना सॅटेलाइट प्रोव्हायडर! यामुळे ओटीटी ही गोष्ट सेन्सॉरच्या आणि समाजातील ‘संस्कृतिरक्षकांच्या’ कक्षेच्या पलीकडे राहिली! त्यामुळे इथे खूप वेगवेगळ्या आणि बोल्ड थीम्स हाताळल्या गेल्या. कलेने मानवी जीवन ‘जसं आहे तसं’ दाखवायला सुरुवात केली. पूर्वी कला एक डोळा समाजाकडे ठेवून जीवन रंगवत होती. आता नेटफ्लिक्स, अमेझॉन किंवा डिस्नी यांच्यासारख्या प्लॅटफॉर्म्सनी ही परिस्थिती बदलून टाकली. या नव्या मुलामुलींनी ही कला बघितली, तिचे संस्कार आत्मसात केले.

आमच्या एका मैत्रिणीला त्या काळी घटस्फोट घ्यायचा होता म्हणून तिची आई कमालीची अस्वस्थ झाली होती. आज माझी एक बालमैत्रीण तिची अमेरिकेत स्थायिक झालेली मुलगी ‘लेस्बियन लग्न’ करत असल्यामुळे रडकुंडीला आलेली आहे.

असे बदल घडत असतानाच लग्नसंस्था आपलं महत्त्व टिकवून आहे असं वाटतं. ‘स्ट्रेट’ मुलं-मुली लग्न करत आहेत. मात्र, नाती आता जास्त मोकळीढाकळी झाली आहेत. माझा एक ‘लिबरल’ मित्र, या सर्व बदलांमुळे पुरुषी वर्चस्वाला हादरे बसू लागले आहेत म्हणून अतिशय आनंदी झाला आहे. यातूनच स्त्री-पुरुष नात्यामध्ये खरं सौहार्द येईल असं त्याला वाटतं आहे.

खरंच येईल? का माझ्या पिढीतली मुलं-मुली समोर आलेले संस्कार फार विचार न करता स्वीकारत होत्या तशीच ही मुलंसुद्धा संस्कार फारसे विचार न करता स्वीकारत आहेत? संस्कारांनी आत्मभान आपोआप येत असतं का? का ते आपल्यावर झालेल्या संस्कारांवर आपण सजगपणे विचार करत गेलो तरच येतं? आत्मभान हा चिंतनाचा विषय आहे का, की ती केवळ अर्थकारणाची बटीक आहे?

फ्रिड्रीश एंगल्सने लग्नाबद्दल अगदी स्वच्छपणे लिहिलं होतं. एंगल्स म्हणतो, की ‘कुणी काहीही म्हटलं तरी लग्न मुळात एक आर्थिक नातं असतं.’ हो! माझ्या पिढीमधील बहुतेक मुला-मुलींनी प्रेमाचा किंवा मानसिक अनुरूपतेचा फारसा विचार न करता, पगारपाणी आणि घरदार बघूनच लग्नं केली होती. काहींनी तर प्रेमात पडतानाही या ऐहिक गोष्टींचा विचार केला होता. इथे खरं प्रेम कसं मिळावं? एंगल्स म्हणतो, की ‘लग्न या आर्थिक नात्यात नवरा हा प्रॉपर्टीचा मालक असतो आणि स्त्री पगारहीन अवस्थेत घरकाम करणारी नोकर!’ एंगल्स पुढे म्हणतो, की ‘पुरुषाच्या आर्थिक वर्चस्वाचा पाया हादरल्याशिवाय स्त्री-पुरुषांत खरं प्रेम नांदू शकणार नाही.’ आता हा पाया हादरला आहे असं स्पष्टपणे दिसतं आहे. (आदिवासी, तसंच काही भटक्या समाजांमध्ये इतकी करकचून बांधलेली पुरुषप्रधान संस्कृती दिसत नाही याचं कारणही माझ्या मते एंगल्सची ही थिअरीच. तिथे प्रॉपर्टीच फारशी नसल्यामुळे मालक-नोकर हे नातं तयार होत नसावं.) खरं तर लग्नसंबंधात नवरा-बायकोतली मैत्री त्यांच्यातल्या प्रेमापेक्षाही महत्त्वाची. या मैत्रीसाठीचं पोषक वातावरण तयार होत चाललं आहे अशी लक्षणं दिसू लागली आहेत.

अर्थात आजही परंपरावादी लोक स्त्रीवरचा समाजाचा लगाम पुन्हा एकदा करकचून आवळण्याचा प्रयत्न करताना दिसत असतात. आपल्या धर्मामधल्या लोकांची संख्या वाढावी म्हणून प्रत्येक स्त्रीने किमान तीन किंवा चार मुलांना जन्म दिला पाहिजे असं सांगताना हे लोक दिसत असतात. सगळ्याच धर्मांमध्ये असे धर्मसूर्य आपल्या विचारांचा प्रकाश वितरित करताना दिसत असतात. परंतु, आता या जमान्यात त्यांच्याकडे कोणी लक्ष देईल असं वाटत नाही. हिटलरने जर्मन स्त्रीला आपल्या वंशशुद्धीच्या संकल्पनेसाठी वापरलं. जर्मन मुलींना त्याने शुद्ध जर्मन आर्यवंशाच्या पुरुषांकडून प्रजोत्पादन करण्यासाठी वापरलं. सध्याचे धर्मसूर्य याच वृत्तीच्या मवाळ आवृत्त्या आहेत असं वाटतं. ‘पुरुषी वर्चस्व आज शेवटची तडफड करत आहे’ असं माझा ‘लिबरल’ मित्र प्रसन्न चेहऱ्याने म्हणतो. खरंच असं असेल? काळच उत्तर देईल.

हा लेख मी माझ्या एका मित्राला वाचायला दिला, तर तो म्हणाला, की या ‘लेखात पुरुषांची बाजूच नाही. तू स्त्रीमुक्तीवाला कधी झालास?’ मी म्हणालो, “आपल्या पिढीमधल्या पुरुषांच्या बाजूने सगळी दानं पडत गेली आहेत. आपण काय बोलायचं? लग्नसंस्थेबद्दल पोटतिडकीने विचार करायची वेळ आपल्यावर कधी आली आहे काय? आपल्या मित्रांमधल्या कुणाला एखादी कर्कशा मिळाली असेल तर तेवढीच चर्चा आपण केली आहे. लग्नसंस्था ‘स्ट्रक्चरली’ पुरुषांच्या विरोधात आहे असा अनुभव आल्यामुळे गेल्या तीस वर्षांत आपण एकदा तरी चर्चा केली आहे काय?” तो हसला आणि म्हणाला, “नाही!” मी पुढे म्हणालो, “पुरुषांना काही गंभीर दुःख असतं तर आपल्यात नक्की चर्चा झाली असती! गेली तीस वर्षं आपण अनेक विषयांवर चर्चा केली आणि नेमका हाच विषय बरा सुटला!” तो हसला. मी म्हणालो, “आपल्या पिढीचा खूपसा वेेळ बायकोने केलेली भजी खात खात बायकांवरच्या विनोदांना फिदीफिदी हसण्यात आणि ते विनोद फॉरवर्ड करण्यात जातो आहे. आपण या विषयात आपल्या दुःखांबाबत किती बोलायचं याला फार म्हणजे फारच मर्यादा आहेत. बायका ‘स्पेस’ देत नाहीत, एवढीच तक्रार बहुतेक पुरुष करत असतात. यावर ‘आम्ही वेळ मागतो हे खरं आहे, पण तरीही तुम्ही वेळ देता का?’ असा प्रश्न बायकांनी विचारला तर आपण काय उत्तर देणार? पुरुष पैशांसाठी खूप तडफड करतो ही गोष्ट खरी आहे; पण स्त्रीचे कष्ट जसे सर्व कुटुंबाच्या मालकीचे असतात तसा त्याचा पैसा सर्व कुटुंबाच्या मालकीचा असतो का? सर्व कुटुंबाचं नियंत्रण त्याने मिळवलेल्या पैशांवर असतं का? आणि पैसा मिळवल्याच्या बदल्यात पुरुषाचे किती लाड होतात! ‘कुटुंबप्रमुख’ हे बिरूद काय आणि ‘अन्नदाता सुखी भव’ अशा प्रार्थना काय! स्त्री जी तडफड करते त्या बदल्यात तिला नक्की काय मिळतं? आज स्त्री पैसा मिळवू लागली आहे तरी घरकाम तिच्याकडेच आहे. म्हणजे तिने मिळवलेला पैसा आणि तिचे कष्ट कुटुंबाच्या मालकीचे आणि कुटुंबप्रमुख मात्र पुरुष! आपण कशाला चर्चा करायच्या? काही बाजू असेल तर मांडायची ना!” मित्र गप्प बसला.

आपण आजकाल एखाद्या कॅफेमध्ये बसलेलो असतो. आजूबाजूला आपल्यातच मग्न असलेली तरुणाई असते. एवढ्यात एखादी मुलगी मित्राच्या गळ्यात हात टाकते, त्याच्या गालावर ओठ पुसटसे टेकवते- अर्ध्या क्षणासाठी. त्यात शारीर इच्छा कमी आणि मैत्री जास्त असते. तो प्रतिसाद म्हणून तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा मागे सारतो. ते पुन्हा गप्पा मारू लागतात. असं काही बघितलं की माझ्या डोळ्यांसमोर नीत्शे येतो. स्त्री-पुरुष नात्यात मैत्री शोधणारा! ही नवी पिढी ही मैत्री टिकवू शकेल का? का काळाच्या ओघात आणि समाजाच्या दाबात त्यांच्या नात्यातली ही मैत्री पुसली जाईल?

लग्न ही फार गंभीर गोष्ट आहे. बुद्ध, कन्फ्युशियस, गांधी, ॲरिस्टॉटल, कांट, कर्कगार्ड, नीत्शे, मिल, कार्ल युंग, सिमोन द ब्यूव्हॉ अशा अनेक थोर तत्त्वज्ञांनी या विषयावर लिहिलं आहे. आत्मभान, समता, आदर, कर्तव्य, प्रेम, मैत्री, सुसंवाद आणि समर्पण अशा अनेक गोष्टी लग्नात आकार घेऊ शकतात असं हे सर्व सांगत आले आहेत. स्वातंत्र्य आणि कर्तव्य यांचा समतोल या लोकांनी सांगितला आहे. प्रेमातलं आणि मैत्रीमधलं एकत्व यांनी सांगितलं आहे. परंतु याबरोबर हेसुद्धा खरं आहे, की बहुतांश नात्यांमधलं गारूड वय वाढत जातं तसतसं हळूहळू उतरत जातं.

तरीही मानवी मनाची जडणघडण विचारात घेतली तर मला वाटतं, की लग्नाचं हे गारूड मानवी समाजात आपलं स्थान टिकवून राहील. लग्नसंस्था सर्व कालखंडांत टिकून राहिली आहे. मानवाच्या सर्व संस्कृतींमध्ये आणि समाजांमध्येही ती आपलं स्थान टिकवून आहे. याला कारण म्हणजे लग्नसंस्था मानवाच्या अगदी मूलभूत अशा प्रेरणांशी एकरूप होऊन गेलेली आहे. मानवाच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक या सर्व प्रेरणांचा समन्वय लग्नसंस्थेमध्ये साधला जातो, म्हणून तर सर्व धर्म लग्नसंस्थेला सामावून घेताना दिसतात. हिंदू धर्माने तर विवाहाला एक प्रमुख संस्कार मानलं आहे. हिंदू धर्माप्रमाणे विवाह हे एक नैतिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आहे. विवाह माणसाच्या उत्कट इच्छांना सुंदर शिस्त लावतो. शिवाय, मुलांच्या संगोपनासाठी तो एक अत्यंत सुरक्षित चौकट तयार करतो.

माझ्या मते एरिक फ्रॉम या मानसशस्त्रज्ञाने लग्नसंस्थेची मानसिक गरज सर्वांत सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. या जगात माणूस तसा एकटा असतो. या एकटेपणाच्या भावनेने त्याला अत्यंत असुरक्षित बनवलेलं असतं. नुसत्या प्रेमाने ही भावना जात नाही. निष्ठा आणि प्रेम या दोन गोष्टी हातात हात घालून माणसाच्या आयुष्यात आल्या तरच माणसाच्या मनात सुरक्षिततेची आणि रुजलेपणाची सुंदर भावना तयार होते. हे निष्ठावंत प्रेम मानवाच्या आयुष्यात लग्नामुळे येतं. माणसाची ही गरज जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत माणसाच्या सर्व समाजांमध्ये लग्नसंस्था नक्कीच अबाधित राहील. आता नव्या काळात स्त्रीला प्राप्त होत चाललेल्या नव्या स्वातंत्र्यांमुळे लग्नसंस्थेला नवे आयाम प्राप्त होत राहतील. लग्नसंस्था या सर्व बदलांचा नक्कीच स्वीकार करेल आणि स्वतःला अबाधित ठेवेल!

(अनुभव, जानेवारी २०२६च्या अंकातून साभार. अनुभवचे वर्गणीदार होण्यासाठी ९०११०७४३६० या नंबरवर संपर्क करावा.)

श्रीनिवास जोशी

श्रीनिवास जोशी नाटककार आहेत आणि गेली दोन दशके वैचारिक लिखाण करत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results