आम्ही कोण?
आडवा छेद 

घटती लग्नं; वाढते घटस्फोट : चीनपुढचं नवं आव्हान

  • मुकुंद कुलकर्णी
  • 14.03.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
china divorce header

कुणी लग्न करावं, न करावं, नांदावं की घटस्फोट घ्यावा, मुलं असावीत की नसावीत, असावीत तर किती? ही सारी ज्याची त्याची व्यक्तिगत बाब असते. म्हणजे असायला हवी. मात्र जागतिक महासत्ता असलेला चीन सध्या या संसारिक पेचप्रश्नांनी त्रस्त झाला आहे. अमेरिकेत सत्तारूढ झालेल्या ट्रम्पबाबाचा चीन जितका विचार करत नसेल तितकी चिंता देशांतर्गत वाढत्या घटस्फोटांची करत आहे. समस्याच गंभीर बनली आहे. आधीच चिनी तरुण-तरुणी लग्नाला नकार देतात. परवडतच नाही म्हणतात लग्न करणं. एकटं-एकटं राहतात, गरजेपुरतं एकत्र येतात. पण लग्न नाही, मुलाची जबाबदारी नको. यातून जी काही युगुलं धाडस करत लग्नबंधन स्वीकारतात, त्यांची लग्नं टिकत नाही असं सध्याचं चित्र आहे.

चीनमधील विवाहदर २०२४ मध्ये विक्रमी घटला आहे, असं समोर आलंय. त्या वर्षी ६१ लाख लोकांनी लग्ननोंदणी केली. हा आकडा २०२३ च्या तुलनेत २० टक्के घटलेला आहे. चीनमध्ये १९८६पासून लग्ननोंदणी सुरू झाली, तेव्हापासूनचा हा नीचांकी आकडा आहे. २०१३मध्ये चीनमध्ये लग्नाचे सर्वाधिक बार उडाले होते. त्यावर्षी एक कोटी ३० लाख लग्नं झाली होती. त्यातुलनेत हा आकडा निम्म्यावर आला आहे. २०२४ हे लग्नासाठी अशुभ वर्ष असल्यामुळे लग्नसोहळे टाळण्यात आले, असं एक कारण दिलं जातंय. पण त्यात किती तथ्य आहे, याबाबत शंका व्यक्त होते आहे.

दुसरीकडे त्याच वर्षी, म्हणजे २०२४ साली सुमारे २६ लाख जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेत. दुसऱ्या एका पाहणीनुसार चीनमध्ये घटस्फोटाचं प्रमाणं ५५ टक्क्यांनी वाढलं आहे. वाढत्या घटस्फोटांना रोखण्यासाठी २०२१ पासून काडीमोड घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांमधील भडकलेला मामला थंड व्हावा म्हणून चीनने ३० दिवसांचा ‌‘कूलिंग-ऑफ‌’ कालावधी अनिवार्य केला आहे.

लग्नांचं घटतं प्रमाण आणि वाढते घटस्फोट यामुळे तिथे मुलांचा जन्मदर ओसरतो आहे. कारण आजही लग्न न करता मूल जन्माला घालणं चिनी समाजात निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे चीनमधलं कार्यरत मनुष्यबळ कमी होत चाललं आहे. त्याचवेळी वृद्धांची लोकसंख्या वाढते आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेपुढची ही गंभीर समस्या बनली आहे.

यावर उपाय म्हणून सरकारने युवकांना लग्न करण्यास, ते टिकवण्यास आणि मुलं जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक योजना लागू केल्या आहेत. ‌एवढंच नव्हे, तर ‘डेटिंग‌’ कार्यक्रम, सामूहिक विवाह, समुपदेशन यांचा धडाका लावला आहे. लग्न आणि बाळंतपणाचं सामाजिक मूल्यं‌वाढावं यासाठी रोख रकमेचं वाटपदेखील करण्यात येतंय. पण तरीही चिनी तरुण, विशेषत: तरुणी बधायला तयार नाहीत. बेरोजगारी, राहणीमानाचा वाढता खर्च, आर्थिक मंदीचं सावट या कारणांमुळे शिक्षित तरुणी लग्नाची जोखीम घेण्यास उत्सुक नाहीत, असं दिसतंय. 

मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

सुरेश दीक्षित 14.03.25
वास्तव ज्वलंत प्रश्नाचे...कमी अधिक फरकाने हा सर्वच देशांचा प्रश्न आहे....
See More

Select search criteria first for better results