
TomTom या कंपनीच्या ताज्या अहवालात पुण्याच्या वाहतूककोंडीने ‘जगातल्या पहिल्या पाचांत मानाचं स्थान मिळवल्याचं शुभवर्तमान’ अनेकांनी वाचलं असेल.
वाहतूककोंडी, प्रदूषण आणि रस्ते अपघात या समस्या दुर्दैवाने भारतीय शहरी जीवनाचा अविभाज्य भाग होत चालल्या आहेत. कोंडीवर मात करण्यासाठी रस्ते शक्य तेवढे रुंद करणं, जमतील तिथे उड्डाणपूल बांधणं, अशा गोष्टी आपण करतो आहोत. पण हे उपाय करूनही आपली शहरं वाढत्या वाहतूककोंडीच्या विळख्यात अडकत चालली आहेत.
एक मिनिट... ‘हे उपाय करूनही?’ की ‘या उपायांमुळेच?’
आपले उपायच समस्या ठरत आहेत का?
आपण वाहतूकनियोजन शास्त्रातल्या तांत्रिक बाबी क्षणभर बाजूला ठेवून शुद्ध तर्कशास्त्राचा विचार करून याकडे बघू या.
समजा, एकजण रोज गुलाबजाम हादडतोय. गुलाबजाम दुधापासून बनलेले असतात, त्यामुळे त्यात प्रथिनं असतात, म्हणजे ते तब्येतीला चांगलेच असणार, असा त्याचा समज आहे. पण रोज खूप गुलाबजाम खाल्ल्याने त्याच्या तब्येतीवर वाईट परिणाम होतील, बरोबर? त्याची तब्येत ढासळल्याने ‘गुलाबजाम तब्येतीला चांगले असतात’ हा समज चुकीचा असल्याचं दिसेल. तसंच, आपल्या शहराच्या वाहतुकीची तब्येत ढासळते आहे, म्हणजेच आपण करत असलेले उपाय चुकताहेत, हेही स्पष्ट आहे!
आपण रस्ते रुंद करतो, उड्डाणपूल बांधतो, स्वस्तात आणि मुबलक पार्किंग पुरवतो. यामुळे खाजगी वाहनं वापरणं अधिक सोयीचं होतं. पण त्याचे परिणाम काय होतात? लवकरच रस्त्यांवर खाजगी वाहनांची संख्या बेसुमार वाढते. प्रदूषण वाढतं, अपघाती मृत्यू वाढतात. तुम्ही ‘कार्यकारणभाव’ हा शब्द ऐकला असेलच- दृश्य परिणाम आणि त्यामागचं कारण यांचा संबंध. हा कार्यकारणभाव इथेही दिसतोच दिसतो.
मग या समस्येवर उपाय काय?
आपल्या शहराच्या वाहतुकीला कोणते गुणधर्म अत्यावश्यक आहेत, ते बघू या.
सर्वसमावेशकता
शहराचा प्रत्येक रहिवासी, शहरात कुठेही सोयीस्करपणे आणि स्वतंत्रपणे जाऊ शकला पाहिजे - त्यांचं वय, लिंग, आर्थिक आणि शारीरिक क्षमता काहीही असली तरी. शहर जर खाजगी वाहनांवर लक्ष केंद्रित करत असेल, तर त्याचा फायदा सहसा १८ ते साधारण ७० वर्षांदरम्यानच्या आणि आर्थिक-शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषवर्गाला होतो; परंतु इतर अनेकांना हा दृष्टिकोन गैरसोयीचा ठरतो. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रिया जरा नाखुषीनेच वाहनं चालवतात. १८ वर्षांखालच्या मुलांकडे परवाना नसतो. स्वत:चं वाहन घेणं अनेकांना परवडत नाही, आणि शारीरिक समस्या असलेले अनेक लोक स्वतंत्रपणे वाहन चालवूच शकत नाहीत.
आपण सर्वसमावेशक विचाराने वाहतूक नियोजन केलं तर? ८ वर्षांची मुलं, ८० वर्षांचे ज्येष्ठ, स्त्रिया, गरीब आणि दिव्यांग, अशा सगळ्यांना कुठेही सोयीस्करपणे आणि स्वतंत्रपणे जाता येईल याकडे लक्ष पुरवलं तर? – कारण जी व्यवस्था या लोकांना वापरता येईल, ती इतर सर्वांनाही वापरता येईलच! त्यामुळे केवळ मेट्रोपेक्षा उत्तम सार्वजनिक बस अत्यावश्यक आहे आणि ती बस कार-स्कूटरच्या समुद्रात अडकणार नाही याची काळजी घेणंही तितकंच अत्यावश्यक आहे.
शाश्वतता
फक्त कारच नाही, तर स्कूटर्ससुद्धा प्रतिमाणशी बसपेक्षा जास्त प्रदूषण करतात, आणि रस्त्यावरची जागाही जास्त खातात. आपल्याला आपलं शहर न नासवता, ‘शाश्वत’ हवं असेल, तर शहरातलं प्रदूषण आणि कोंडी आजच्या पातळीपेक्षा खाली आणणं आवश्यक आहे. मुलांना सायकलने शाळेला जायला आवडतं, आणि सायकली प्रदूषण करत नाहीत. रोजंदारीवरच्या अनेक कामगारांना बसही परवडत नाही आणि तेही शक्यतो सायकल वापरतात. बसेस आणि सायकलींच्या वाढत्या वापरामुळेच पुण्यातलं प्रदूषण आणि कोंडी कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांचा वापर वर उल्लेख केलेल्या घटकांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच सोयीचा आणि सुरक्षित करायला हवा.
सुरक्षितता
आपण ‘vehicle kilometres travelled’ कमी केले पाहिजेत. ‘vehicle kilometres travelled’ म्हणजे एका ठराविक काळात सर्व वाहनांनी काटलेलं अंतर. याचा सुरक्षिततेशी काय संबंध?
५० जण बसलेल्या बसमुळे रस्त्यावरची ३० वाहनं कमी होतात. त्यामुळे ‘vehicle kilometres travelled’ कमी होतात, परिणामी अपघात कमी होतात. सायकलीच्या धडकेमुळे कोणी मृत्युमुखी पडल्याचं ऐकीवात नाही. हो, बसच्या धडकेमुळे प्राणांतिक अपघात होतात, पण बसला खास मार्गिका उपलब्ध करून दिली तर कार-स्कूटर्स इत्यादींबरोबर बसची धडक होण्याची शक्यता कमी होते, आणि शहरातली वाहतूक आणखीनच सुरक्षित होते. त्यामुळे बस तसंच सायकलींसाठी खास मार्गिका तातडीने निर्माण केल्या पाहिजेत.
कार-दुचाक्या नव्हे, तर चालणं-बस-सायकल
चालणं-बस-सायकल या त्रिसूत्रीवर आधारित वाहतूक व्यवस्था आपल्या वाहतूक समस्या दूर करू शकेलच, शिवाय अशा व्यवस्थेसाठी लागणार्या पायाभूत सुविधा उभारायला खर्चही कमी येईल. हो, मेट्रो चांगली आहेच, पण मेट्रो उभारायला येणारा खर्च अतिप्रचंड आहे. आणि शहराचा ‘चालणं-बस-सायकल’ हा पाया भक्कम असेल तरच ही महागडी मेट्रो यशस्वी होईल.
‘चालणं-बस-सायकल’ला उत्तेजन देताना जोडीला कार-दुचाक्यांचा वापर टाळण्यास प्रोत्साहन देणार्या उपाययोजना करणंही अत्यावश्यक आहे. लोकांना चवदार ‘सॅलड’ द्याच, पण त्याच वेळी गुलाबजामही महाग आणि दुर्मिळ करा!
जिथे चालणं आणि सायकल चालवणं सुरक्षित, सोयीचंच नव्हे, तर आकर्षक असेल असं शहर आपल्याला हवंय. जिथे बसने सहज, पटकन सगळीकडे जाता येईल असं शहर हवंय. अशा शहरात ‘चालणं-बस-सायकल’ ही आपली ‘राईस प्लेट’ असेल आणि मेट्रो त्यानंतरचं आईसक्रीम. तिथे वाहतूक नियोजनकारांचं ब्रीदवाक्य असेल- ‘तुम्हांला चालायला, बस किंवा सायकल वापरायला काय अडचण आहे ते सांगा, आम्ही ती अडचण सोडवू!’
हर्षद अभ्यंकर | harshad.abhyankar@savepunetraffic.org
लेखक 'सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट' चे संस्थापक व कार्यकर्ते आहेत.