आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

मरिना अब्रामोविच : वेदनेचा अमर्याद कॅनव्हास

  • शेखर देशमुख
  • 20.04.25
  • वाचनवेळ 23 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
marina

मार्च २०१०. न्यूयॉर्कचं ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट' ऊर्फ मोमा. परफॉर्मन्स आर्ट या कलाप्रकारातली स्वयंघोषित ग्रँडमदर मरिना अब्रामोविच हिचं ‘दि आर्टिस्ट इज प्रेझेंट' हे सादरीकरण सुरू झालेलं असतं. त्यासाठी आर्ट गॅलरीच्या मधोमध दोन लाकडी खुर्च्या आणि त्यामध्ये एक चौकोनी टेबल मांडलेलं असतं. त्यातल्या एका खुर्चीत पायघोळ वेश परिधान केलेली मरिना स्थितप्रज्ञ अवस्थेत बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर सात्त्विक भाव असतात. डोळ्यांत निर्व्याज प्रेम एकवटलेलं असतं. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असतंच, पण इच्छा असेल तर मरिनाच्या परफॉर्मन्समध्ये भागही घेण्याचीही मुभा असते. अट फक्त एकच-इच्छुकाने मरिनाच्या समोर ठेवलेल्या खुर्चीत येऊन बसायचं आणि एकही शब्द न बोलता, शरीराची हालचाल न करता मरिनाच्या डोळ्यांत एकचित्ताने बघत राहायचं. ज्या क्षणी तंद्री भंग पावेल तो त्या-त्या व्यक्तीपुरता प्रयोगाचा शेवट. पुढचे सलग जवळपास ७७ दिवस आणि दिवसाचे आठ तास हा एकच प्रयोग चालणार असतो.

marina

अशा निःशब्द नि निरस प्रयोगाला किती प्रतिसाद मिळणार? पण अनपेक्षितपणे पहिल्या दिवसापासून सर्वसामान्य कलारसिक, सिनेमा-नाटक-उद्योग आणि कलाविश्वातले सेलिब्रिटी, कलेचे विद्यार्थी, जाणकार, समीक्षक असे सगळ्या स्तरांतले प्रेक्षक हे सादरीकरण पाहायला, प्रत्यक्ष अनुभवायला येऊ लागतात. प्रयोग संपल्यावर आयोजक भेट देऊन गेलेल्या प्रेक्षकांची गोळाबेरीज करतात, तर तो आकडा भरतो तब्बल ८५ हजार! पण या आकड्यापेक्षाही महत्त्वाचा असतो या सादरीकरणामागचा मरिनाचा उद्देश. काय सांगू बघते मरिना या जगावेगळ्या कृतीतून? वर्तमानातल्या एका क्षणाशी एकरूप होऊन साधलेली कोणतीही समाधिस्थ कुती जगण्यातल्या सत्याचं, सौंदर्याचं दर्शन घडवते. वेळ आणि काळाचा शेवट घडवून आणण्याच्या त्या अवस्थेतच कला दडलेली असते. एखाद्याने दृढनिश्चय केला तर रोजचं आयुष्य जगताना साध्या साध्या कृतीतूनसुद्धा आपल्याला कलानुभूती मिळवता येते, हेच कदाचित मरिनाला या सादरीकरणातून सुचवायचं असतं. एका तरल पातळीवर घडतही तसंच. या सादरीकरणात दोन व्यक्तींदरम्यान ऊर्जेचा, भावनांचा संवाद होतो. त्या एकमेकांच्या डोळ्यांत साठलेल्या व्यथा-वेदना जाणून घेतात. एकमेकांच्या डोळ्यांत आपलं प्रतिबिंब न्याहाळतात. अनेकदा समोरच्या खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रयोगादरम्यान एकमेकांसमोर बसलेल्या दोन अनोळखी व्यक्ती वर्तमानाच्या त्या एका क्षणासाठी जगत असतात.

या प्रयोगादरम्यान फक्त एकदाच मरिनाची तंद्री भंग पावते. तिचा विभक्त झालेला जर्मन पार्टनर उवे लेस्पन ऊर्फ उले अचानक समोरच्या खुर्चीत येऊन बसतो. ज्याच्यासोबत मनमुक्त आयुष्य उपभोगलं त्याला पाहताच मरिनाचे डोळे भरून येतात आणि न राहवून पुढे झुकत ती उलेचे हात आपल्या हातांत घेते.

सगळी भौतिक सुखं उपलब्ध असूनही माणूस दुःख आणि वेदनेने घेरलेला राहतो. या दुःखापासून आणि वेदनेपासून मुक्त होत जगण्यातल्या सत्य आणि सौंदर्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ज्ञान (नॉलेज), अनुभव (एक्स्पिरियन्स) आणि गतस्मृती (मेमरी) या तीन गोष्टींच्या प्रभावातून बाहेर येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला मेंदू पूर्णपणे प्रभावहीन (डी-कंडिशन्ड) आणि मोकळा (एम्टी) ठेवणं गरजेचं आहे. या तीन गोष्टी साधल्या तरच मनात कारुण्यभाव आणि निरपेक्ष प्रेम निर्माण होतं, हेच जणू मरिनाला ‘आर्टिस्ट इज प्रेझेंट' या प्रयोगकृतीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती ज्याला ‘देअर इज कम्प्लीट सिक्युरिटी ओन्ली इन नथिंगनेस' असं संबोधतात तो नथिंगनेस अर्थात शून्यावस्था प्राप्त करण्यासाठी मरिनाची चाललेली धडपड स्पष्टपणे जाणवते. तिचा हा प्रयोग बौद्ध तत्त्वज्ञानाशी नातं सांगणारा वाटतो. त्यामुळेच कारकिर्दीच्या एका टप्प्यावर ती बौद्ध तत्त्वज्ञानाच्या ओढीने बोधगया इथे आणि भारतात वास्तव्य करून असलेल्या तिबेटी धर्मगुरू दलाई लामांच्या भेटीला येऊन गेली होती, हे ऐकल्यावर आश्चर्य वाटत नाही.

marina

वॉशिंग्टन डी.सी.मधल्या ‘स्मिथ्सोनियन हर्शहोर्न म्युझियम अँड स्कलप्चर गार्डन'मध्ये मरिनाला भाषणासाठी बोलावलेलं असतं. हॉल छोटासाच, पण भरलेला असतो. उंचपुरी, भारदस्त देहयष्टीची, अंगभर काळ्या रंगाची ट्राउझर आणि त्याच रंगाचा टॉप घातलेली मरिना अब्रामोविच टाळ्यांच्या गजरात स्टेजवर येते. तिचं झपझप चालणं, तिच्या चेहऱ्याची रुंद ठेवण आणि चष्म्याच्या मोठाल्या फ्रेमआडचे मिश्कील डोळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. माइक हातात घेताच कोणतीही औपचारिकता न पाळता ती थेट मुद्द्याला हात घालते. स्वतः लिहिलेल्या ‘आर्टिस्ट्स मॅनिफेस्टो'ची, म्हणजेच कलावंताच्या जाहीरनाम्याची चळतच तिच्या हातात असते. थोड्याशा जीभ जडावलेल्या सर्बियन ॲक्सेंटमध्ये ती बोलू लागते. ‘ॲन आर्तिस्त शुद नॉत मेक देमसेल्व्हज इनतु ॲन आयदॉल' हे जाहीरनाम्यातलं पहिलं वचन संपवत ती हातातला एक कागद जमिनीवर टाकते, तशी प्रेक्षकांत खसखस पिकते. परंतु जशी ती एक-एक वचन वाचून झाल्यानंतर एकापाठोपाठ एक हातातले कागद खाली टाकून देण्याच्या कृतीची पुनरावृत्ती करत जाते, तेव्हा प्रेक्षक स्तब्ध झालेला असतो. कारण मरिनाला त्यातून गंभीरपणे काही तरी सांगायचं असतं. मरिनाच्या त्या कृतीमध्ये ना आग्रह असतो, ना सक्ती असते, ना तुम्ही हा जाहीरनामा पाळलाच पाहिजे, अशी अप्रत्यक्ष धमकी. खरं तर त्या एका कृतीतून स्वतःचा अहंकार न गोंजारता समोर बसलेल्यांच्या अहंकाराला मात्र तिने अप्रत्यक्ष आव्हान दिलेलं असतं.

‘ॲन आर्तिस्त शुद स्ते फॉर लाँग पीरियद्स ऑफ ताइम लुकिंग ॲत दि स्तार्स इन दि नाइत स्काय' हे शेवटचं तत्त्वज्ञानात्मक वचन तीनदा आर्त स्वरात म्हणून मरिना हातातला शेवटचा कागद जमिनीवर सोडून देते, तेव्हा प्रेक्षक भारावून गेलेला असतो. आयपॅडच्या हातभर स्क्रीनवर हे पाहताना आपणही मरिनाच्या वागण्या-बोलण्यातल्या ‘ग्रेसफुलनेस'ने चकित होऊन जातो.

मरिना अब्रामोविच नावाच्या जागतिक कलाविश्वातल्या आद्य परफॉर्मन्स आर्टिस्टबद्दल समजलं ते ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या वृत्तपत्रातल्या कॉलममधून. ते वाचतानाच आपल्याला ज्ञात असलेल्या चित्रकार आणि मांडणी शिल्पांचं सादरीकरण करणाऱ्यांपेक्षा हे प्रकरण खूप वेगळं आहे याची जाणीव झाली. मरिनाशी झालेली ती पहिली ओळख. या पहिल्या ओळखीत मनावर काय ठसलं? तर स्वतःचं शरीर हेच तिच्या अभिव्यक्तीचं प्रमुख माध्यम आहे. शरीराचा वापर करत कोलते यांच्याच भाषेत सांगायचं, तर ‘मानसिक पातळीवर शरीराला स्वतः पासून वेगळं करत ती आत्मचरित्रात्मक मांडणी दृश्य साकारत आली आहे'.

मरिना नावाच्या वादळाची शोधाशोध करता तिचं आयुष्य आणि तिचं म्हणणं दोन्ही समोर येत जातं. तिची आजवरची सादरीकरणं म्हणजे तिच्यातल्या सृजनशीलतेचा अस्सल आविष्कार आहेत. एकच सादरीकरण पुन्हा पुन्हा करत राहण्याची तिला चीड आहे. नवता हा तिचा ध्यास आहे आणि माणसाच्या वेदनेच्या मुळापर्यंत पोहोचून जगण्यातलं सत्य आणि सौंदर्य शोधणं हे तिचं ध्येय आहे. तिच्या बहुतेक सगळ्या आविष्कारांचं स्वरूप रंगमंचीय असलं तरीही रंगभूमी आणि सादरीकरणाबद्दलचं तिचं म्हणणं वेगळं आहे. ती म्हणते, ‘थिएटर इज फेक, दि नाइफ इज नॉट रिअल, दि ब्लड इज नॉट रिअल अँड दि इमोशन्स आर नॉट रिअल. परफॉर्मन्स इज जस्ट दि अपोझिट : दि नाइफ इज रिअल, दि ब्लड इज रिअल अँड दि इमोशन्स आर रिअल. टु बी अ परफॉर्मन्स आर्टिस्ट, यू हॅब टु हेट थिएटर.

marina

वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतलेल्या तिच्या मुलाखती आणि तिचं शरीर-मनाच्या सहनशक्तीच्या मर्यादा विस्तारणारं आत्मक्लेशात्मक सादरीकरण पाहून सुन्नपणाचा अनुभव येत जातो. ठरवून वेदनेला भिडण्याचं सामर्थ्य अंगी बाणवलेली, शारीरिक-मानसिक-भावनिक क्लेश सोसण्याचं अकल्पित सामर्थ्य असलेली ही कलावंत युरोप-अमेरिकेत कल्ट फिगर होऊन ग्लॅमरच्या विश्वात रमते कशी याचं आश्चर्यही वाटतं. त्यामुळे पुढचा टप्पा असतो तिच्यासंदर्भातलं ठोस साहित्य वाचण्याचा. शोध घेताना नजरेस भरतं जेम्स वेस्कॉटने लिहिलेलं आणि २०१० मध्ये प्रकाशित झालेलं ‘व्हेन मरिना अब्रामोविच डाइज' अशा धक्कादायक नावाचं चरित्र. मरिनाचा जन्म १९४६ चा. म्हणजे ती आता वयाच्या सत्तरीकडे झुकलेली. पण जिवंत असतानाच प्रकाशित झालेल्या चरित्राचं शीर्षक काय, तर ‘मरिना अब्रामोविच मरण पावते तेव्हा!' म्हटलं तर हे एक प्रकारचं धक्कातंत्रच. चरित्रात या तंत्राचा वापर जागोजाग आढळतो. परफॉर्मन्स आर्ट या कलाक्षेत्रातल्या एका शाखेतल्या आजवरच्या वावरात तिने तो पुरेपूर केल्याचंही जाणवतं. तिच्या सनसनाटी प्रयोगांचे तपशील वाचून प्रेक्षकांना सतत धक्का देत राहणं, आश्चर्यचकित करणं हा तिचा स्वभावगुण असल्याची आपल्याला खात्री पटते. पण ठरवून धक्कातंत्र राबवणारी, अंतर्मनात वेदना साठवलेली, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगलेली ही खमकी बाई जगाला नेमकं काय सांगू पाहतेय हे समजून घेतल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. एक व्यक्ती म्हणून मरिनाला समजून घेण्याचा प्रयत्न करत जावं तसं तिच्याविषयीचं हे कुतूहल अधिकाधिक धगधगू लागतं. तिच्या चरित्रातल्या प्रस्तावनेच्या पानावर पुनःपुन्हा नजर खिळून राहते. त्यात लेखकाने मरिनाचं इच्छापत्र जाहीर केलेलं असतं. त्यात लिहिलेलं असतं ‘मरणानंतर तीन शवपेट्या तयार करण्यात याव्यात. त्यातल्या एकात मरिनाचा खराखुरा मृतदेह असावा. दुसऱ्यात आणि तिसऱ्यात मरिनाच्या मृतदेहाची प्रतिकृती असावी. हे तीन मृतदेह न्यूयॉर्क, ॲमस्टरडॅम आणि बेलग्रेड अशा मरिनाच्या अस्तित्वाच्या खुणा असलेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत पुरले जावेत. जे लोक दफनविधीसाठी जमतील त्यांना हे सांगितलं जावं, की त्यांनी काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान केले तरी चालतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अँथनी आणि जॉन्सन या गायकांनी फ्रैंक सिनात्राचं ‘माय वे' हे गाणं गावं. जीवन आणि मरण अशा दोहोंचा तो सोहळा ठरावा. सरतेशेवटी मरिनाच्या आकाराचा केक कापण्यात यावा आणि तो उपस्थितांमध्ये वाटण्यात यावा.'

माणसाची सर्वसाधारण प्रवृत्ती मरण लांबवण्याकडे असते. मरणाची भीती बहुतेकांच्या हाडापेरांत मुरलेली असते. पण ही बाई जिवंतपणी मरणाचा स्वीकारही करते आणि त्याचा सन्मानही. वेदना कुणाला चुकत नाही. अगदी नाकासमोर चालणाऱ्या; स्वतःला सत्शील, सत्प्रवृत्त म्हणवणाऱ्या माणसाला अपघात किंवा आजाराच्या निमित्ताने ती अनुभवास येतेच. पण मरिना अपघात-आजाराची वाट न पाहता, कलेचं प्रयोजन म्हणून वेदनेला भिडू पाहते. शरीराची आसक्ती सोडून जाणीव-नेणिवेच्या पातळीवर मरणाचा स्वीकार करते. कलेच्या माध्यमातून वेदनेची परिसीमा वारंवार अनुभवते. सोबतीण म्हणून वेदनेचा कायमस्वरूपी स्वीकारही करते.

दुसरं महायुद्ध आटोपलं होतं. हिटलरच्या नाझी फौजांना नामोहरम केल्याचा अहंकार युगोस्लाव्हियाचा अध्यक्ष मार्शल टिटोमध्ये होताच; पण ‘कॉमिन फॉर्म' म्हणजेच कम्युनिस्ट देशांच्या समूहातून बाहेर पडून त्या वेळच्या बलाढ्य सोव्हिएट रशियाच्या स्टालिनला आव्हान देत स्वतःचा वेगळा कट्टर साम्यवाद राबवण्याचा उद्दामपणाही टिटोमध्ये आलेला होता. बोजो आणि दानिका अब्रामोविच हे बेलग्रेडला (आताच्या सर्बियामध्ये) राहणारं टिटोच्या विश्वासातलं दाम्पत्य सरकारमध्ये उच्चपदावर विराजमान होतं. रात्री झोपताना उशाशी पिस्तुल ठेवण्याइतके दोघं डोक्याने तापट होते. दानिका ही करड्या शिस्तीची बाई होती. स्वच्छतेचा अतिरेक हकरत राहणं हा तिचा स्वभाव होता. पहिलं अपत्य म्हणून मरिनाला वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासूनच आईच्या अति शिस्तप्रिय स्वभावाचे फटके बसले होते. मुलगी वाया जाईल, यया एका कारणास्तव दानिकाने लहानग्या मरिनाला एकदाही जवळ घेतलं नव्हतं की प्रेमभराने तिचं चुंबन घेतलं नव्हतं. न पेक्षा कधी धाकट्या भावाचा नीट सांभाळ केला नाही म्हणून, तर कधी अजागळपणा केला म्हणून मरिनाने नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत आईचा मार खाल्ला होता. जेवणात अमुक एक पदार्थ वाढला तेवढा खाल्लाच पाहिजे, ही दानिकाची सक्त ताकीद असे. एकदा रात्रीच्या जेवणात वाढलेलं सगळं अन्न संपवणं मरिनाच्या जिवावर आलं, पण ते टाकून देण्याचीही हिंमत झाली नाही. तेव्हा मरिनाने सगळ्यांदेखत तोंडात टाकलेला हॉर्समीटचा तुकडा रात्रभर जिभेखाली लपवून सकाळी उठल्यानंतरच तो थुंकला होता. एका बाजूला कम्युनिझमला समर्पित आई-वडील आणि दुसऱ्या बाजूला कट्टर धार्मिक वृत्तीचं दर्शन घडवणारा कौटुंबिक इतिहास, अशा टोकाच्या संस्कारांत मरिना वाढली होती. तिच्या अंगी असलेल्या समर्पणभावाचं, पुढे सादरीकरणातून जगाला चकित करणाऱ्या तिच्यातल्या बंडखोरीचं, इच्छा आणि सहनशक्तीचं बीज बहुधा लहानपणीच्या अशा अनेक घटना-प्रसंगांत दडलेलं होतं.

उमलत्या वयात झार्ड-फुलं-पशू-पक्षी अशा प्रतिमा बहुतेकांच्या मनात साठतात आणि याच प्रतिमा शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून कागदावर उरतात. पण, मरिनाला सर्वाधिक आकर्षण होतं ते दोन गाड्यांमध्ये होणाऱ्या अपघाताचं; अपघातक्षणी आकारास येत जाणाऱ्या हिंसक, भीतिदायक दृश्यप्रतिमांचं आणि वेगवेगळ्या आकारांतल्या ढगांचं. तिला स्वप्नं पडत होती ती दफनभूमीची तोडफोड होत असल्याची. तिला भीती होती ती रात्री-बेरात्री मोठमोठ्याने जमिनीवर पाय आपटत संचलन करणाऱ्या टिटोच्या सैनिकांची आणि काळ्याकुट्ट अंधाराची. असे सगळे चित्रविचित्र प्रभाव घेऊन आईच्या देखरेखीखाली ती बेलग्रेडच्या ‘ॲकॅडमी ऑफ फाइन आर्टस'मध्ये दाखल झाली, तेव्हा तिथे गेल्यावरही तिथल्या रिवाजाप्रमाणे न्यूड्स चितारण्यासोबत तिने अपघातांची चित्रंही रंगवली. पण हुकुमशाही राजवटीत तिच्या या अभिव्यक्तीचं स्थान फ्रेममध्ये टांगून ठेवण्यापेक्षा अधिक नव्हतं. घरात कोंडमारा, घराबाहेर कोंडमारा-असा दुहेरी पेच तरुण मरिनापुढे होता. टिटोच्या कम्युनिस्ट राजवटीचं प्रतीक असलेला तारा, महायुद्धातल्या सरशीने उद्दाम झालेल्या युगोस्लाव्ह सैनिकांचं धडकी भरवणारं नित्याचं संचलन, दिवसरात्र पाळत ठेवत दहशत पसरवणारी आई, सत्तेच्या मस्तीत बेफिकीर झालेले वडील- या सगळ्या दृश्यप्रतिमा मरिनाच्या मानगुटीवर बसलेल्या होत्या. सभोवतालच्या परिस्थितीबद्दल तिच्या डोक्यात तिडीक होती. चित्रकलेचं प्रशिक्षण सुरू असतानाच तिला सगळ्या जगाचं लक्ष वेधून घ्यायचं होतं; पण समाजात तिच्या आई-वडिलांची असलेली पत आणि प्रभाव तिला उघड बंडखोरी करण्यापासून रोखत होता. मरिना आतल्या आत धुमसत होती, शरीर आणि मनाने कुढत होती. तिच्यातली अमर्याद ऊर्जा जणू बाटलीबंद झालेली होती. आतल्या आत ती उसळ्या मारत होती. त्या ऊर्जेला वाट मोकळी करून देण्याचा हस्तमैथुनाचा एक मार्ग तिच्याकडे होता, आणि तो आपण मुक्तपणाने अवलंबत होतो, हे तिने कधी लपवलं नव्हतं.

याच सुमारास अमेरिका आणि युरोपातल्या काही भागांत ‘काउंटर कल्चर मूव्हमेंट'चं वारं जोर धरू लागलं होतं. संस्कृती-परंपरांची मोडतोड करत व्यक्त होऊ पाहणाऱ्यांचा तांडा जगभरात विस्तारत चालला होता. ‘ओहो' हा ग्रुप युगोस्लाव्हियामध्ये परफॉर्मन्स आर्ट या कलाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येत होता. मरिना या ग्रुपच्या संपर्कात आली. तिथेच चित्रांपेक्षा परफॉर्मन्स आर्ट आपल्यातल्या ‘हिंसक ऊर्जे'ला खराखुरा न्याय देऊ शकेल हे तिला जाणवलं. त्यातूनच ‘कम वॉश वुइथ मी' अशा शीर्षकाचा एक प्रस्ताव तिने बेलग्रेडचं सांस्कृतिक युवा केंद्र असणाऱ्या संस्थेच्या संचालकांकडे दिला. मरिनाला सबंध आर्ट गॅलरीचं रूपांतर एका मोठ्या लॉण्ड्रीमध्ये करायचं होतं. गॅलरीला भेट देणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावरचे कपडे मरिना धुऊन, वाळवून आणि इस्त्री करून दिवसाअखेरी प्रदर्शन संपताना त्या-त्या प्रेक्षकांकडे सोपवणार होती. हा प्रस्ताव म्हणजे आईच्या अति स्वच्छतेबाबतच्या टोकाच्या आग्रहाला तिने दिलेली प्रतिक्रियाच होती. यातून तिला मानवी क्षमता, एकाग्रता आणि मनाच्या असह्य कोंडमाऱ्याचंही दर्शन घडवायचं होतं. दुसऱ्या प्रस्तावानुसार ती नेहमीच्या कपड्यांमध्ये प्रेक्षकांसमोर उभी राहणार होती आणि लहानपणी तिची आई ज्या प्रकारचे कपडे आणि बूट घालण्याची तिच्यावर सक्ती करी ते सारे कपडे एकेक करत अंगात घालणार होती. सरतेशेवटी पिस्तुल डोक्याला लावून चाप ओढायचा होता. अशा प्रयोगांना कुणीही परवानगी देणं शक्य नव्हतं. झालंही तसंच. लॉण्ड्रीचा प्रयोग कदाचित तिने नेटाने साकारलाही असता; पण दुसऱ्या प्रस्तावानुसार डोक्याला पिस्तुल लावून स्वतःचा शेवट घडवून आणला असता का? नसताच. पण त्यातून अभिव्यक्तीसाठी मी वेदनेचं टोक गाठू शकते, हेच बहुधा तिला जगाला सांगायचं होतं. अपेक्षेप्रमाणे हे दोन्ही ॲब्सर्ड प्रस्ताव नाकारले गेले; पण या निमित्ताने मरिनाला अभिव्यक्तीचा मार्ग गवसला.

मार्ग गवसला, पण माध्यम? ते मुख्यतः तिचं स्वतःचं शरीर असणार होतं. १९७०च्या आसपास जगभरात कलावंतांनी पारंपरिक साधनांचा वापर टाळून अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून स्वतःच्या शरीराचा वापर सुरू केला होता. त्यात जोसेफ बुईस, वायेस क्लेन, ब्रुस नाऊमन, विटो ॲकोन्सी, योको ओनो आदींनी परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हणून नाव कमावलं होतं. पण मरिनाला आपल्या पूर्वसुरींपेक्षा कलावंत आणि माणूस म्हणूनही शरीर-मनाच्या मर्यादा अधिक विस्तारायच्या होत्या. जोडीला पैसा वारसा-घर-शहर-देश सगळं काही झुगारून देण्याची टोकाची बंडखोर वृत्ती आणि बंधनमुक्त जगणं होतं. त्या बंधनमुक्त जगण्यातूनच तिचं प्रत्येक सादरीकरण आकार घेत गेलं. जगण्यात अनुभवास येणारी टोकाची निःशब्दता, टोकाचे आवाज, टोकाची वेदना, टोकाची आर्तता, टोकाचा अहंकार, टोकाची असूया, टोकाची करुणा, टोकाची हिंसा असं सगळं त्यात प्रतिबिंबित होत होतं. तिचं प्रत्येक मांडणी शिल्प जणू मरणाची रंगीत तालीम ठरावी असा वेदनांचा घडवून आणलेला सोहळा होता.

‘ऱ्हिदम झीरो' हे वैश्विक कलाविश्वात खळबळ माजवणारं मरिनाचं पहिलं मांडणी शिल्प होतं. साल होतं १९७५ आणि ठिकाण इटलीतल्या नेपल्स शहरातला ‘मोरा' हा स्टुडिओ. प्रेक्षकांना वाटण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेत मरिनाने जाहीर करून टाकलं होतं- ‘आय एम दि ऑब्जेक्ट', सादरीकरणासाठी मरिना सलग सहा तास एका जागी निस्तब्ध, शून्यात नजर लावून उभी राहणार होती. तिच्यासमोर टेबलावर काट्यांचा चमचा, परफ्युम, करवत, कात्री, साखर, मेंढीचं हाडूक, वर्तमानपत्र, द्राक्षं, ऑलिव्ह ऑइल, इन्स्टंट फोटोची सोय असलेला पोलरॉइड कॅमेरा, आरसा, गुलाबाचं फूल, लिपस्टिक, हातोडी, नेकलेस, बाउलर हॅट, काडतुसं भरलेलं पिस्तुल अशा तब्बल ७२ वस्तू मांडलेल्या होत्या. या सादरीकरणात मरिना स्वतः काहीच करणार नव्हती. करण्याचं किंवा न करण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकांना असणार होतं. साहजिकच हे सादरीकरण म्हणजे मरिनाच्या सहनशीलतेची आणि प्रेक्षकांच्या विवेकबुद्धीची परीक्षा असणार होती. प्रेक्षक गॅलरीत येत होते, स्तब्ध मरिनाभोवती रेंगाळत होते. असं साधारण तीनेक तास चाललं. पण तीन तासांनंतर प्रेक्षकांमधल्या काहींचा धीर सुटला. एका-दोघांनी टेबलवर ठेवलेली कात्री उचलत मरिनाच्या अंगावरचे कपडे फाडायला सुरुवात केली. त्यांचं बघून आणखी काही पुढे सरसावले. त्यांनी मरिनाला वेगवेगळ्या पोज घ्यायला लावल्या. पोलराइड कॅमेराने तिचे फोटो घेऊन ते तिला हातात धरायला लावले. एकाने तिच्या डोक्यावर हॅट चढवली, हातात आरसा दिला. त्यावर लिपस्टिकने लिहिलेलं होतं- इओ सोनो लिबेरो (खरा फ्री). एकाने तिच्या कपाळावर लिहिल- एंड. एकाने तर कपभर पाणी तिच्या डोक्यावर ओतलं. एकाने मरिनाच्या अंगावरचा शर्ट फाडला, तिचे स्तन उघडे पाडले. एकाने आक्रमकपणे पुढे होत तिच्या गालाचं चुंबनच घेतलं. एकाने काटेरी गुलाब गळ्याभोवती फिरवत फुलाच्या पाकळ्या तिच्या चेहऱ्यावर उधळल्या. शरीराशी चाललेल्या खेळामुळे मनातल्या वेदना मरिनाच्या डोळ्यांत साकळू लागल्या. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. प्रेक्षकांमधले अनेकजण तिच्या डोळ्यांत बघणं टाळत होते, तर काही स्वतःहून पुढे येत तिच्या गालावरचे अश्रू पुसत होते. एवढं सगळं घडत असतानाही मरिना मात्र स्तब्ध उभी होती. एव्हाना प्रेक्षकांमध्ये ‘मरिनाचं संरक्षण करणारे' आणि ‘मरिनाचा वापर करणारे' असे दोन तट पडले होते. एका क्षणी प्रेक्षकांमधल्या एकाने टेबलावर ठेवलेलं पिस्तुल उचललं, मरिनाच्या हातात दिलं आणि तो हात तिच्या गळ्याच्या दिशेने नेला. गॅलरीत एकच गडबड उडाली. पण मरिनाचा निश्चय ढळला नाही. सहा तास पूर्ण होताच सादरीकरण संपलं. तिच्याबद्दल आणि तिच्या कलेबद्दल सहानुभूती असलेले प्रेक्षक पहाटे दोनपर्यंत गॅलरीत रेंगाळतच राहिले. गॅलरीच्या आयोजकाने मरिनाची हॉटेलवर पतरण्याची व्यवस्था केली. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या प्रचंड दमछाक झाल्यानंतर मरिनाने ती रात्र एकटीनेच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मरिनाने आरशात निरखून पाहिलं, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच काळ्या केसांत एक पांढरा केस तिच्या नजरेस पडला.

या सादरीकरणात कला कुठे होती, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. कला दडलेली होती ती शरीराशी खेळ सुरू असताना समाधी अवस्था न सोडण्याच्या क्षणांत! इतरांच्या विकार-वासनांशी सामना करताना मनाला होणारा क्लेश, हाच या मांडणी शिल्पाचा मुख्य आधार होता. आत्मक्लेशातूनच कला जन्म घेत असते, हे सत्यही तिला या निमित्ताने कलारसिकांच्या मनावर ठसवायचं होतं.

एरवी, नाटक-चित्रपटांतले कलावंत एखादी व्यक्तिरेखा जगायची म्हणून त्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेल्या प्रत्यक्षातल्या व्यक्तीचं जगणं समजून घेतात. मरिनाने मात्र ‘रोल एक्सचेंज' नावाच्या सादरीकरणातून अमस्टरडॅमच्या रेड लाइट डिस्ट्रिक्टमधल्या एका खिडकीत बसून काही तासांपुरतं वेश्येचं आयुष्य जगून पाहिलं. खरं तर मरिनाला संध्याकाळी पाच ते पहाटे पाच असा हा प्रयोग करायचा होता आणि सुझे नावाच्या खऱ्याखुऱ्या वेश्येला आर्ट गॅलरीत बसवायचं होतं; परंतु ते आयोजकांना मान्य न झाल्याने सुझेला तीन तासांचा मोबदला देऊन मरिना तिच्या खिडकीत बसून राहिली. ग्राहकांच्या वखवखत्या नजरा तिने झेलल्या, त्यांच्या क्रूर प्रश्नांशी सामना केला.

हे सगळं कशासाठी? तिला वेश्या म्हणजेच जगाच्या दृष्टीने ‘नोबडी' असणं नेमकं काय असतं हे जाणून घ्यायचं होतं. तिची वेदना जगून पाहायची होती. पण हे झालं परिचित उत्तर. मरिनाला त्याहून वेगळा आत्मक्लेश साधायचा होता. उमलत्या वयाची मरिना आणि तिच्या आईमध्ये एवढ्या तेवढ्यावरून बेबनाव होत असे. तेव्हा चिडलेली आई मरिनाला अनेकदा ‘व्होअर' म्हणत असे. तिच्या वडिलांचे कुणा एका वेश्येशी संबंध असल्याचंही मरिनाला कळलं होतं. या दोन गतस्मृतींचा आधार घेत मरिनाला परफॉर्मन्स आर्टच्या माध्यमातून मानसिक क्लेशाला सामोरं जायचं होतं. ‘ऱ्हिदम झीरो 'पेक्षाही या सादरीकरणात धोका अधिक होता. वेश्येची ती अवस्था अनुभवणं इतर कुठल्याही मांडणी शिल्पापेक्षा मानसिकदृष्ट्या खूप जड गेल्याचं तिने नंतर कबूलही केलं.

marina

मरिनाच्या अनेक सादरीकरणांचं बीज भूतकाळात दडलेलं होतं. ब्लेडच्या साहाय्याने पोटावर ताऱ्याचा आकार काढणं (थॉमस लिप्स- क्रिन्झिन्जर गॅलरी, इन्सब्रुक), चार दिवसांच्या प्रदर्शनात जवळपास तीनशे गाईंची मांस असलेली हाडं स्वच्छ करणं (क्लीनिंग दि हाऊस- व्हेनिस बिनाले), जळत्या ताऱ्याच्या मधोमध हात-पाय पसरलेल्या अवस्थेत पडून राहणं (ऱ्हिदम फाइव्ह- स्टुडंट कल्चरल सेंटर, बेलग्रेड) हे तिचे धक्का देणारे असे परफॉर्मन्स होते. त्यात थॉमस लिप्स आणि ऱ्हिदम फाइव्हसारख्या सादरीकरणांतून तिला टिटोच्या फॅसिस्ट राजवटीविरोधात पोलिटिकल स्टेटमेंटही करायचं होतं. marina तिचे ब्रीदिंग इन-ब्रिदिंग आऊट (एकाने घेतलेला श्वास दुसऱ्याच्या तोंडात सोडणे आणि दुसऱ्याने आपला उच्छ्वास पहिल्याच्या तोंडात सोडणे), आर्ट मस्ट बी ब्यूटिफुल-आर्टिस्ट मस्ट बी ब्यूटिफुल (दोन्ही हातांत हेअरब्रश घेऊन एक तास वेगात केस विंचरत जाणे), थ्री (चार फुटी पायथनसोबत राहणे), ड्रॅगॉन हेड्स (चेहऱ्याभोवती साप गुंडाळणे), स्पिरिट हाऊस (थकेपर्यंत स्वतःच्या हाताने स्वतःच्या पाठीला चाबकाने फटकारणे), मार्क मेकिंग (ब्लेडच्या साहाय्याने स्वतःच्या पोटावर ताऱ्याचा रक्तरंजित आकार साकारणे), फ्रीइंग दि बॉडी (कापडाने चेहरा झाकून अनावृत्त शरीराने बोंगो संगीतावर नृत्य करत राहणे), दि लव्हर्स एक्सपान्शन इन स्पेस (दोन्ही बाजूंना हलते चौकोनी खांब ठेवून शरीराच्या माध्यमातून त्यांतील अंतर वाढवणे), दि बायोग्राफी (जमिनीवर सहा मीटर उंचीवर अनावृत्त देहासह क्रुसिफिक्स अवस्थेत राहणे), ॲक्शन पँट्स : जेनायटल पॅनिक (हातात वजनदार एके-४७ ही बंदूक घेऊन योनीचं दर्शन घडवत बराच काळ एकटक बघत बसणे), बाल्कन इरॉटिक एपिक (बाल्कन संस्कृतीतल्या दंतकथेप्रमाणे शेतात जाऊन पर्जन्यदेवतेला अनावृत्त देहाचं दर्शन घडवणे) हे परफॉर्मन्स अघोरी म्हणता येतील असेही होते. पण टीकेची तिने कधीच फिकीर केली नव्हती.

marina

ओरिजिनॅलिटी ही मरिनाची खासियत होती; पूर्वसुरींना अभिवादन करण्यासाठीही तिने काही वेळा सादरीकरण केलं. विटो ॲकोन्सीन १९७२ मध्ये न्यूयॉर्कच्या आर्ट गॅलरीत एक खळबळजनक सादरीकरण केलं होतं- ‘सीडबेड'. त्यात ॲकोन्सीने स्टेजच्या खाली सलग काही तास हस्तमैथुन करत वीर्य प्रसवलं होतं. वीर्यपतनाच्या सुखाची परिसीमा गाठत शारीरवासनेपासून अन्‌‍‍ शरीराबद्दल वाटणाऱ्या आसक्तीपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. एक स्त्रीसुद्धा त्या अवस्थेला पोहोचू शकते, मन आणि मेंदू निर्मळ आणि निर्वात करण्याचा, शरीरमुक्तीचा अनुभव घेऊ शकते, हे मरिनाला सिद्ध करायचं होतं. सेन्सेशनॅलिझमचा आरोप पत्करून तिने ते केलंही. सादरीकरणासाठी न्यूयॉर्कच्या ग्युगेनहेम आर्ट गॅलरीच्या मधोमध गोलाकार स्टेज उभारण्यात आलं होतं. स्टेजच्या खाली मरिना सादरीकरण करणार होती. प्रेक्षकांना फक्त आवाजावरून तिचं अस्तित्व जाणवणारं होतं. स्टेजवर येऊन बसण्याची, उभं राहण्याची त्यांना पूर्ण मुभा होती. मरिनाने तब्बल सात तास हस्तमैथुन केलं. यादरम्यान प्रेक्षक स्टेजवर फेऱ्या मारत होते. काही हसत होते, तर काही शांतपणे लैंगिक भावना उद्दीपित करणारं मरिनाचं बोलणं ऐकत होते. काही ‘वुई विल रॉक यू' म्हणत चेकाळून स्टेज वर पाय आपटत होते. एकजण तर साफ उताना पडला होता. “देंट्‌‍स इट! आय काण्ट मूव्ह एनी मोर. आय एम फिनिश!” असं म्हणत मध्यरात्रीच्या सुमारास मरिनाने सादरीकरण थांबवलं. त्यानंतर स्टेजखालूनच तिने प्रेक्षकांशी संवाद साधला. ती म्हणाली, “मी आता गर्भाची अवस्था अनुभवतेय. मुटकुळं करून पडून आहे. शरीरात इतकी उष्णता निर्माण झालीय की आणखी हस्तमैथुन करणं मला शक्य नाही. तुमच्यामुळे हे सादरीकरण शक्य झालंय. तुमच्यामुळेच यापूर्वी कधीही प्राप्त न झालेली अवस्था मला लाभली आहे. आय एम सो ग्रेटफुल!” हे सादरीकरण अनेकांसाठी चावटपणा करण्याची संधी ठरलं असलं, तरी प्रत्यक्षात मरिनासाठी तो शरीराबद्दल वाटणाऱ्या प्रेम, तिरस्कार आणि टोकाच्या आसक्तीपासून मुक्त होण्याचा दुर्मिळ असा क्षण होता. जगण्यातल्या सौंदर्याची जागा तिने पुन्हा एकदा अधोरेखित करून दाखवली होती.

युरोपच्या कलाविश्वात १९७५ ते १९८८ ही जवळपास बारा-तेरा वर्ष मरिना आणि तिचा ‘लिव्ह-इन' पार्टनर असलेल्या उलेच्या उत्कर्षाची होती. उलेच्या मानगुटीवर हिटलरने व्यापलेल्या भूतकाळाचं ओझं होतं, तर मरिना फॅसिस्ट टिटोच्या राजवटीचा दुष्प्रभाव घेऊन घराबाहेर पडली होती. हिटलरच्या हुकुमशाहीचं प्रतीक असलेलं स्वस्तिक आणि टिटोच्या राजवटीचं प्रतीक असलेला तारा या दोन प्रतीकांनी मरिना-उलेचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन घडवला होता. संस्कृती-परंपरेशी दोघांनीही उभा दावा मांडलेला होताच, पण दोघांचंही निश्चित घर नव्हतं, स्टुडिओ नव्हता की कायमस्वरूपी पत्ता नव्हता. या काळात दोघंही एका व्हॅनमध्येच राहत होते. ती व्हॅन हाच त्यांचा चाकावरचा संसार होता. त्या अर्थाने ते रस्त्यावरचं, कलंदरांचं जगणं होतं. याच मनमौजी जगण्यातून धक्कादायक-सनसनाटी असं बरंच काही त्यांच्या हातून घडत होतं. परफॉर्मन्स आर्टच्या माध्यमातून दोघंही एकमेकांच्या क्षमतांची परीक्षा घेत होते. अनावृत्त देह हेच त्यांचं भांडवल आणि मुख्य साधन होतं. मानवी देहात देव वसतो, अशी सर्वसाधारण समजूत असते. हाडामांसाचं शरीर ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आणि खूप मोठं ओझंही आहे. ते झुगारून देवाला शिक्षा देण्याचं शरीर हेच प्रभावी साधन आहे, अशी मरिनाची धारणा होती. त्या धारणेला जागत ती परफॉर्मन्स आर्टच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत चालली होती.

marina

ठरवून धोका पत्करून सादरीकरण करण्याची जणू मरिना आणि उलेला नशाच जडली होती. असंच एक धोक्याचं सादरीकरण मरिना आणि उलेने डब्लिन इथल्या नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट इथे केलं होतं. त्याचं नाव होतं ‘रेस्ट एनर्जी'. या सादरीकरणाचं साधन होतं धनुष्यबाण. धनुष्य मरिनाने धरलं होतं, उलेने बाण. बाणाचं टोक मरिनाच्या हृदयाच्या दिशेला होतं. एका बाजूला उले दोन बोटांच्या बेचक्यात पकडलेला बाण ताणून होता, तर दुसरीकडे मरिना धनुष्य ताणून उभी होती. हृदयाचे ठोके ऐकू यावे यासाठी दोघांच्याही छातीला मायक्रोफोन लावण्यात आले होते. म्हटला तर हा अत्यंत सोपा पण तरीही सर्वांत भीतिदायक असा प्रयोग होता. परस्परावलंबित्व, विश्वास आणि मेंदूचं नियंत्रण ही या प्रयोगाची प्राथमिक गरज होती. विशेषतः मरिनासाठी मृत्यूशी नियंत्रित अवस्थेत केलेला तो सामना होता. एकाग्रता भंग पावली तर कुठल्याही क्षणी उलेकडून बाण सुटण्याची शक्यता होती. उलेने बाण ताणला की प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढत होती. मग मरिना आणि उलेच्या मनात- मेंदूत काय काय घडत असेल, मानसिक-भावनिक आंदोलनं कशी आकारास येत असतील याची नुसती कल्पनाच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत होती, पण एकाच अवस्थेत बरेच क्षण गेल्यानंतर उलेने माघार घेतली तेव्हा प्रेक्षकांमधल्या अनेकांनी निःश्वास सोडला. एकाग्रता, निष्ठा आणि पराकोटीचा संयम हे या सादरीकरणाचं वैशिष्ट्य ठरलं होतं.

परिस्थितीचा स्वीकार करत जगणारी मरिना काय किंवा आदर्शवाद जपणारा उले, दोघांनाही एकमेकांबद्दल आसक्ती होती, आसक्ती आहे, म्हटल्यावर अहंकार आणि असुरक्षितताही आलीच. याच असुरक्षिततेतून बारा वर्षांचं सहजीवन संपुष्टात आणण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. या सहजीवनाचा शेवटही त्यांनी एका परफॉर्मन्सद्वारे करण्याचं ठरवलं होतं. परफॉर्मन्सचं नाव होतं ‘दि लव्हर्स'. marina चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीवरून दोघांनीही एकाच वेळी विरुद्ध दिशेने चालत निघायचं आणि ज्या क्षणी एकत्र भेटू तेव्हा एकमेकांना अंगठी घालून लग्न करायचं, अशी त्यांची आधीची योजना होती, परंतु हा प्रयोग खूप खर्चिक होता. त्यासाठी कलाविश्वातल्या दिग्गजांची मदत लागणार होती. नेदरलँड आणि चीन अशा दोन देशांची परवानगी, राजकीय आणि सरकारी पातळीवरचं सहकार्य असं बरंच काही त्यात गरजेचं होतं. मरिना-उले एकत्र असेपर्यंत यातली एकही गोष्ट जुळून आली नव्हती. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्याच दरम्यान या प्रयोगासाठी पैशांचीही व्यवस्था होत आली. चीनने या दोघांना ३,७५० मैल अंतर चालण्याची परवानगीही दिली. त्यामुळे विभक्त होताना का होईना, पण हे सादरीकरण करण्याचं या दोघांनी ठरवलं. शांनाई पास या ठिकाणाहून सुरुवात करत मरिना पश्चिमेच्या दिशेला चालत निघणार होती, तर जिआयू पास या ठिकाणाहून सुरुवात करत उले पूर्वेकडे चालत येणार होता. या सादरीकरणाची कलाविश्वाला फारशी खबरच नव्हती. सादरीकरणाची ऑडिओ-व्हिजुअल नोंद व्हावी यासाठी चित्रीकरणाची सोय मात्र करण्यात आली होती. तब्बल ९० दिवस चालल्यानंतर मरिना आणि उले शान्झी प्रांतातल्या भिंतीवर एकमेकांना भेटले. तो त्यांच्या सहजीवनाचा अखेरचा क्षण ठरला. नव्वद दिवसांत दोघांच्या शारीरिक-मानसिक क्षमतांची पुरती कसोटी लागली होती. हासुद्धा आत्मक्लेशाचा एक आविष्कारच. प्रयोगादरम्यान सोबत मदतनीस होते, पण मुख्य संवाद स्वतःशीच होत होता. या सादरीकरणात जितकं काव्य होतं तितकंच वियोगाचं दुःखही होतं आणि वेगळ्या वाटांनी अपरिचित भविष्याकडे जाण्याची धाकधूक आणि ओढही.

एखाद्या उत्कंठावर्धक, रोमांचक कथा-कादंबरीत शोभावा असा हा चीनच्या भिंतीवर साकारलेला प्रयोग होता. पण तो एकच प्रयोग कशाला, मरिनाची सबंध कारकीर्दच रोमांचक सिनेमाचा विषय ठरेल अशी आहे. त्यात चिमूटभर आनंद आहे आणि मूठभर दुःखही. त्यात संस्कार-परंपरांचा फास आहे आणि शरीर-मनाला होत असलेल्या वेदनांचा न संपणारा उत्सवही. त्यात शरीराबद्दल वाटणारं प्रेम आहे तसाच तिरस्कारही. त्यात जन्माने चिकटलेल्या नात्यांबद्दल अढी आहे आणि स्वतःहून निर्माण केलेल्या नात्यांबद्दल जिव्हाळाही. त्यात आयुष्याबद्दल विरक्तीची भावना आहे तशीच भौतिक जगाबद्दलची आसक्तीही. त्यात बंधनमुक्त जगणं आहे तशीच अध्यात्माची ओढही. त्यात समाजाची विचारधारा बदलण्याची आहे तसंच सौंदर्यमूल्यांमध्ये अडकणाऱ्या कलेबद्दल दुरावाही. त्यात भव्यदिव्यतेचा ध्यास आणि सेलिब्रिटी स्टेटसचा सोस आहे; तशीच साधेपणाची आसही. त्यात मूक प्राण्यांबद्दल खोल करुणा आहे तसंच नावडत्या माणसांबद्दल विखारही.

तसं म्हटलं तर इतर कुणाही कलावंताप्रमाणे मरिना अब्रामोविच नावाच्या व्यक्तिमत्त्वात विसंगतीच अधिक आहे. तरीही कलेच्या प्रांतात या ना त्या निमित्ताने हरघडी वेदनेचा पाठलाग करत राहण्यात तिने राखलेलं सातत्य तिला वेगळं अस्तित्व बहाल करतंय. आचार्य विनोबा भाव्यांनीही आयुष्याच्या एका टप्प्यावर निर्धाराने वेदनेचा माग काढला होता. सहनशीलतेच्या मर्यादा स्पष्ट करताना त्यांनी वेदना मोरपिसासारखी सुंदर आणि हलकी झाली पाहिजे, असं म्हटलं होतं. मरिना तिच्या प्रत्येक मांडणी शिल्पातून कदाचित हेच ध्येय गाठू पाहत आहे.

(अनुभव दिवाळी 20१५च्या अंकातून साभार )

संदर्भसूची :

व्हेन मरिना अब्रामोविच डाइज : ए बायोग्राफी - दि एमआयटी प्रेस-२०१०

स्थितप्रज्ञ दर्शन विनोबा, परमधाम प्रकाशन- २००७

दि एंडिंग ऑफ टाइम- जे. कृष्णमूर्ती- डॉ. डेव्हिड बोम- कृष्णमूर्ती फाउंडेशन, इंडिया

दै. दिव्य मराठी, रसिक पुरवणी- १८ जानेवारी २०१५ न्यूयॉर्क आर्ट- कॅरेन रोझेनबर्ग

शेखर देशमुख







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results