
लहानपणी घडलेले अगदी छोटे छोटे प्रसंग आपल्या मेंदूत कसे साठवून ठेवले जातात आणि कोणत्या निमित्ताने ते कसे उसळून वर येतात हे खरंच कधी कधी कळत नाही. अशीच अचानक उसळून आलेली एक अगदी बारीकशी आठवण, मी दुसरी-तिसरीत असतानाची...
एकदा आमच्या घराच्या कुंपणाबाहेरच्या खड्ड्यात केर टाकायला म्हणून मी गेले होते. खड्ड्यापाशी उभ्याउभ्याच मी केराचा डबा उलटा केला आणि मागे वळले. इतक्यात एक वयस्कर माणूस खड्ड्यापाशी आला. दाढीची पांढरी खुंटं वाढलेली, अंगात मळकट बंडी-धोतर, डोक्यावर टोपीही तशीच, कडेवर एक लहान मुलगा. “त्ये घ्येतलं त चालंल का?” केरातल्या टूथपेस्टच्या एका लाल खोक्याकडे बोट दाखवत आजोबांनी जरा बिचकतच मला विचारलं. मी काहीसं नवलानेच त्यांच्याकडे पाहत अर्धवट होकारार्थी मान डोलावली. आजोबा काखोटीच्या पोरासकटच खाली वाकले आणि त्यांनी ते खोकं उचलून, जरासं झटकून त्या पोराच्या हातात दिलं. पोराने ते खोकं आजोबांच्या तळव्यावर टाळ्या दिल्यासारखं दोन-तीनदा आपटलं आणि खिदळून आपला आनंद व्यक्त केला. ते पाहून आजोबाही आनंदले, माझ्याकडे पाहून प्रसन्न हसले आणि निघून गेले.
जराशा तंद्रीतच मी परत फिरले. आपण केर म्हणून टाकून दिलेली वस्तू (त्या खोक्याला तर हे ‘वस्तू'पणही नव्हतं.) दुसऱ्या एखाद्यासाठी खेळणं ठरू शकतं, हे म्हणजे काही तरी वेगळंच वाटलं मला.
अर्थात पुन्हा घरात शिरेपर्यंत ती जाणीव विरूनही गेली...

एकदा इंटरनेटवर निरुद्देश भटकत असताना ‘मार्जिनलाइज्ड आर्ट' ही संज्ञा वाचनात आली. ‘प्रस्थापित चौकटीत न बसणारा पण प्रभावी कलाविष्कार म्हणजे मार्जिनलाइज्ड आर्ट' अशी त्याची साधारण व्याख्या समजली आणि मला अचानक हा टूथपेस्टच्या खोक्याचा प्रसंगच आठवला. माझ्या मेंदूने या दोन्ही गोष्टींची अशी तर्कसंगती लावली आणि माझी उत्सुकता अधिकच चाळवली गेली.
‘वन मॅन्स जंक इज अनदर मॅन्स ट्रेझर' हे अशा कलाविष्कारांचं ब्रीद असतं. म्हणजे एका अर्थाने कचऱ्यातून कलानिर्मितीच! ‘मार्जिनलाइज्ड आर्ट'चा माग घेत इंटरनेटवर मुशाफिरी केली तर याची प्रचिती येते. रंगसंगती, प्रमाणबद्धता यांचे कलाजगतातले नियम धुडकावून लावून केली गेलेली साधीसुधी ‘चाइल्डलाइक' कलानिर्मिती (प्रिमिटिव्ह आर्ट), मानसिक संतुलन ढळलेल्यांनी केलेली निर्मिती (आर्ट ब्रूट), या गटात न मोडणाऱ्या पण जगन्मान्य कलाविश्वाचे सारथीही म्हणता येणार नाहीत अशांद्वारे झालेली कलानिर्मिती (लिमिनल आर्ट), व्हिजनरी आर्ट, फोक आर्ट... शंभरशे साठ प्रकार.
‘कुंपणापलीकडचं' हे कलाविश्व इतकं विस्तारलेलं असेल याची मला कल्पना नव्हती. या साऱ्या पसाऱ्यात सापडला ‘पब्लिक आर्ट/एफेमरल आर्ट' नावाचा प्रकार. म्हणजे काय, तर हाताशी ज्या काही वस्तू उपलब्ध असतील त्या वापरून त्यातून काही तरी कलानिर्मिती करायची. (थोडक्यात, भलत्यासलत्या वस्तू वापरून त्यातून तिसरंच काही तरी निर्माण करायचं!) हे प्रकरण समोर आलं आणि त्या व्याख्येत बसू शकतील अशी आपल्या भवतालातली उदाहरणं आठवायला लागल्यावर तर आणखीच मजा यायला लागली.

नेटवरच्या या मुशाफिरीतच माझ्या हाती ‘व्हिक मुनीझ' नामक एक घबाडच लागलं!
व्हिक मुनीझ- पन्नाशीतला, मूळचा ब्राझिलचा, पण आता अमेरिकेत स्थायिक झालेला एक मनस्वी कलाकार. त्याचं बालपण साओ पावलो शहरातल्या बकाल वस्तीत गेलं.
चिडमिडातलं घर, भिंतींचा रंग उडालेला, छताला ओल येऊन पोपडे निघालेले. ओल आलेल्या जागी विटक्या रंगाचे ढग तयार व्हायचे. लहानगा व्हिक पलंगावर पडल्या पडल्या त्या ढगांच्या वाढणाऱ्या, बदलत जाणाऱ्या आकारांना पाहत राहायचा. कधी त्याला त्यात जोकरचा चेहरा दिसायचा, कधी कोळ्याचं जाळं दिसायचं, काही दिवसांत कोळ्याच्या जाळ्याच्या जागी फूटबॉलचं गोलपोस्ट आलेलं असायचं, मग त्याच्या शेजारी पेलेची चिमुकली आकृतीही अवतरायची, हात उंचावून गोल झाल्याचा आनंद साजरा करणारी. व्हिकची कल्पनाशक्ती अशी चौफेर उधळायची. प्रत्येक दगड, आकाशातला प्रत्येक ढगाचा पुंजका, रस्त्यातली प्रत्येक सावली, पाण्याचं डबकं हे सारं त्याच्या मनात निरनिराळी रूपं धारण करत असे.

व्हिकचं बालपण म्हणजे ६० आणि ७०चं दशक. ब्राझिलमध्ये तेव्हा लष्कराची सत्ता होती. देशभर तणावाचं आणि भीतीचं वातावरण असायचं. संशयावरून कुणालाही कधीही तुरुंगात टाकलं जायचं. नागरिकांना संस्कृती, कला, इतिहास, साहित्य यावर खुलेपणाने चर्चा करण्याची मुभा नव्हती. आपण हे सगळं आपल्या आसपास नसण्याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. पण व्हिकच्या संवेदनशील बालमनात हे सारं झिरपत होतं. त्याच्या वडिलांनी एकदा त्याला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे सगळे संच आणून दिले. पण ती सारी पुस्तकं दुय्यम दर्जाच्या, निकृष्ट कागदावर छापली गेली होती. त्यातल्या मूळच्या आकृत्या, फोटो या कागदांवर अस्पष्ट दिसायच्या. त्यातही व्हिक त्याच्या कल्पनेतले आकार शोधायचा. त्याचे आई-वडील दिवसभर कामावर जायचे. तो त्याच्या आजीजवळच असायचा. आजीने त्याला खूप लहान वयात वाचायला शिकवलं, पण ते कसं, तर एका विशिष्ट स्थानिक पद्धतीने, ज्यात मुळाक्षरांपेक्षा एकेक शब्दच स्वतंत्ररीत्या ओळखला जायचा. परिणामी, शाळेत जायला लागल्यावर लिहिण्या-वाचण्यात व्हिक मागे पडला आणि चित्रकला त्याला अधिकाधिक आपलीशी वाटायला लागली.

वयाच्या विशीतच तो अमेरिकेत आला. इंग्रजीचं ज्ञान यथातथाच आणि डोक्यात चित्रकला आणि शिल्पकला यांचं वेड. पोटापाण्यासाठी तिथे त्याने छोटी-मोठी अनेक कामं केली. एकीकडे कलाभ्यासही सुरू ठेवला. पुढल्या ८-१० वर्षांच्या काळात आपल्या विविध कलाकृतींचे फोटो काढण्याकडे त्याचा कल वाढला. पुढे काही काळ युरोपमध्ये घालवून तो पुन्हा अमेरिकेत आला तेव्हा त्याच्या खिशात जेमतेम शंभर डॉलर्स होते; शिवाय जवळ थोडं प्लास्टिसिन, एक साधासा कॅमेरा आणि थोडी फिल्म होती. प्लास्टिसिनपासून त्याने एक शिल्पाकृती तयार केली. ती मनासारखी झाली, पण जवळचं सगळं प्लास्टिसिन त्यात वापरलं गेलं होतं. मग त्याने त्या शिल्पाचा फोटो काढला, ते मोडलं आणि पुन्हा हाताशी आलेल्या प्लास्टिसिनपासून एक नवं शिल्प तयार केलं. बघता बघता त्याच्याकडे असे ६० विविध प्रकारच्या शिल्पांचे फोटो जमले. त्याच्या एका मित्राने ते मोठ्या आकारात छापण्याची तयारी दर्शवली. १९९२ साली त्याने त्याचं प्रदर्शन भरवलं. तिथे व्हिकने हे फोटो आणि त्यांच्या शेजारी रिकामे लाकडी ठोकळे ठेवले. जणू ती सारी चालतीबोलती मंडळी होती आणि आता हे जग सोडून गेली होती. या प्रदर्शनानंतरच व्हिक खऱ्या अर्थाने शिल्पकलेकडून फोटोग्राफीकडे वळला. ते फोटोही कसे, तर आकलनाच्या, दृष्टिकोनाच्या मानसशास्त्राचा वेध घेणारे.

व्हिकने लहानपणापासून आपल्या आसपास जगण्याची धडपड करणारी वंचित माणसंच पाहिलेली होती. अशी माणसं ज्या भवतालात, ज्या साधनांनिशी काम करतात, त्यांचाच वापर करून कलेच्या माध्यमातून त्या माणसांचं आयुष्य बदलण्याचा, सुधारण्याचा प्रयत्न करणं हे त्याने आपलं ध्येय ठरवलं. त्या माणसांना परिचित असलेल्या वस्तू वापरून त्रिमितीय चित्रं तयार करायची, त्या चित्रांचे फोटो काढायचे, त्या फोटोंची प्रदर्शनं भरवायची आणि त्या माणसांचं हलाखीचं जिणं जगापुढे आणायचं, ही त्याच्या कामाची पद्धत बनली.
व्हिक आपल्या या कलाविष्कारांना ‘वर्स्ट पॉसिबल इल्युजन्स' असं म्हणतो. माती, धागे, चॉकलेट, हवा, साखर, कापूस, प्लास्टिक- कोणतंही साधन, पदार्थ, माध्यम त्याला निषिद्ध नाही. त्याच्या अंतिम कलाकृती म्हणजे त्याने काढलेले स्वतःच्या ‘इन्स्टॉलेशन्स'चे फोटो पाहताना त्यात मूलतः कोणत्या वस्तू वापरल्या गेल्या होत्या हे पाहणाऱ्याला सहजी कळत नाही. त्याच वेळी पाहणारा हेदेखील जाणून असतो, की समोर जे दिसतंय तो एक आभास आहे, प्रत्यक्षात तिथे काही तरी वेगळंच आहे. परिणामी, त्या फोटोंकडे तो अधिक काळजीपूर्वक, अधिक रोखून पाहतो. इथेच व्हिकचं उद्दिष्ट पूर्णत्वाला पोहोचतं. कारण पाहणाऱ्याने त्या फोटोशी, फोटोतून तो जे सांगू पाहतोय त्याच्याशी अधिकाधिक एकरूप व्हावं, हेच तर त्याला हवं असतं.

अशा प्रकारचं त्याचं पहिलं उल्लेखनीय आणि कलाजगतात अतिशय गाजलेलं प्रदर्शन म्हणजे ‘शुगर चिल्ड्रेन'. व्हिकने कॅरेबियन बेटांमधल्या सेंट कीट्स इथल्या उसाच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या लहान मुलांचे फोटो काढले. त्यानंतर आपल्या स्टुडिओत गडद काळ्या कागदावर पांढरी साखर शिंपडून त्यातून त्यातल्या प्रत्येकाची मोठी पोर्ट्रेट्स तयार केली, त्या पोर्ट्रेट्सचे परत फोटो काढले आणि त्यांचं प्रदर्शन भरवलं. यातलं प्रत्येक पोर्ट्रेट करायला त्याला तब्बल १५-२० दिवस लागायचे. ही पोर्ट्रेट्स इतकी हुबेहूब आहेत, की त्यांचे फोटो पाहताना त्यातला साखरेचा वापर कळतही नाही. मात्र, लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्या हाती अवाक होण्याशिवाय काहीही उरत नाही!
तळहाताच्या आकाराच्या फोटोवरून कैकपट मोठ्या आकाराची ही पोर्ट्रेट्स व्हिक कशी तयार करत असेल, त्याच्या डोक्यात हे ‘इमेज-मॅपिंग' कसं आकार घेत असेल या विचारांनी खरंच चकित व्हायला होतं. व्हिकला ‘शुगर चिल्ड्रेन'ची प्रेरणा मिळाली एका ब्राझिलियन कवीच्या कवितेतून, ज्यात तो कवी म्हणतो, की माझ्या कॉफीतला गोडवा या मुलांच्या आयुष्यातल्या कडवटपणामुळे आलेला आहे! व्हिक म्हणतो, “आपण कॉफी पीत नसतो, तर या मुलांचं बालपण गिळंकृत करत असतो.”

‘पिक्चर्स ऑफ डस्ट' हा व्हिकचा आणखी एक विलक्षण प्रकल्प. त्यासाठी त्याने व्हिटनी म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट इथल्या सफाई कामगारांना गाठलं. त्यांच्याकडून तिथल्या व्हॅक्युमक्लीनर्समधल्या धूळ-कचऱ्याने भरलेल्या कैक पिशव्या मिळवल्या आणि त्या पिशव्यांच्या इस्टॉलेशन्सचे फोटो काढून त्यांचं प्रदर्शन भरवलं. रचनात्मकरीत्या आयुष्याच्या क्षणभंगूरतेकडे जगाचं लक्ष वेधण्याचा त्याचा हा यत्न होता. नीटनेटकेपणा आणि अराजकता यांचा आपापसात सतत चाललेला खेळही त्याला दाखवायचा होता. त्या म्युझियमला हजारो कलारसिक भेट देतात. त्यांच्या तिथल्या वावरामुळे धूळ-कचरा वाढतो. तिथले सफाई कामगार सतत झाडलोट करत असतात. म्युझियममधल्या कैक उच्च दर्जाच्या पेंटिंग्जचा आस्वाद घेताना ही बाबही रसिकांनी विसरू नये, असं व्हिक या फोटोंमधून जगाला बजावतो.
पण व्हिकचं आपल्याला केवळ थक्क करून टाकणारं काम अजून पुढेच आहे. प्रत्यक्ष कचरा डेपोमध्ये गाडून घेऊन त्यातून कलाविष्कार निर्माण करण्याचं. त्यातून कचऱ्यात काम करणाऱ्या माणसांच्या आयुष्याला अर्थ देण्याचं. असं काय करतो व्हिक? ते काम समजून घेण्यासाठी तेवढ्याच ताकदीच्या एका माहितीपटाला भिडावं लागेल. व्हिक मुनीझची ही विचारप्रक्रिया, आविष्कारांमागची त्याची उद्दिष्टं, अर्थ हे सारं ल्युसी वॉकर या चित्रपट दिग्दर्शिकेला समजून घ्यावंसं वाटलं. त्या तळमळीतून साकार झाला एक लघुपट- ‘वेस्टलँड'.

आता कोण्या एका कलाकाराने स्वतःची व्यक्त होण्याची गरज म्हणून कचऱ्यातून कलानिर्मिती करणं वेगळं. पण त्यावर आधारित चित्रपट बनवण्यासाठी म्हणून निर्माता-दिग्दर्शिकेसह अख्खा चमू त्या कलाकाराला येऊन मिळणं, त्या सर्वांनी त्यासाठी जगातलं सर्वांत मोठं ‘डम्पिंग ग्राऊंड' निवडणं, तिथे काम करणाऱ्या कचरावेचकांशी मैत्री करणं, त्यांनाही आपल्या निर्मितिकामात सहभागी करून घेणं, हे सारं त्यापेक्षा किती तरी वेगळं आणि विलक्षणही!
कचऱ्याला जेव्हा आपण ‘कचरा' म्हणतो, त्याकडे पाहून नाकं मुरडतो, त्यापासून लांब राहणंच पसंत करतो, तेव्हा आपण माणसा-माणसांतच एक मोठी दरी निर्माण करत असतो. वर्गव्यवस्थेची एक मोठी दरी. युगानुयुगं आपल्याला त्या दरीसकटच्या समाजरचनेचीच सवय झालेली आहे. ‘वेस्टलँड' या लघुपटाचं वैशिष्ट्य हे, की पहिल्या दहा-एक मिनिटांतच ही दरी नाहीशी झालेली स्क्रीनवर आपल्याला ढळढळीतपणे दिसून येते.
चेहऱ्यावर मंद स्मित असलेला व्हिक, त्याचा सहकारी स्टुडिओ डायरेक्टर फाबिओ, त्या दोघांचा पाठलाग करत निघालेला कॅमेरा आणि कॅमेराच्या परिघात न मावणारे, ओसंडून वाहणारे कचऱ्याचे ढीग... ब्राझिलची राजधानी रिओ इथल्या ‘जार्डिम ग्रामाशो' या जगातल्या सर्वांत मोठ्या, प्रचंड अशा कचरा डेपोत आपण आलो आहोत. एखाद्या बागेतून फिरावं तसा व्हिक कचरा तुडवत पुढे पुढे निघाला आहे. ना त्याच्या नाकावर रुमाल आहे ना पायांत गमबूट आहेत. तो हसत हसत आपल्याला सांगतो, “या वासाची मला सवय झालीय.” स्क्रीनवर तो बोलत असताना पार्श्वभूमीवर आपल्याला दिसत असतो फक्त आणि फक्त कचरा आणि तो चिवडणारी माणसं. आकाशात सीगल्स, कावळे घिरट्या घालतायत. इतरही बारीकसारीक पक्षी, कुत्री, माश्या... आपल्यालाही अशा दृश्याची सवय असतेच की! पण आपली सवय आणि व्हिक ज्याबद्दल बोलतोय ती सवय यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. शहरी झुळझुळीत रस्ते, गाड्या, मॉल्स यांचं जग आणि कचरावेचकांचं जग यांच्यात जितकं अंतर आपण कल्पू शकतो तितकंच!

स्वनिश्चय, कलेवरचं विलक्षण प्रेम आणि ध्यास यांच्या साथीने व्हिक, ल्युसी, फाबिओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अंतर पार केलं आणि ‘जार्डिम ग्रामाशो'मधल्या काही कचरावेचकांशी मैत्री केली. त्यांना आपल्या लघुपटाचं उद्दिष्ट, पद्धत समजावून सांगितली. या बिंदूपाशी त्या कचरावेचकांपैकी दोघी प्रथमच स्क्रीनवर येतात- ईस आणि मॅग्ना. तिथून पुढचा तास-दीड तास ही स्थानिक मंडळीच स्क्रीन व्यापून राहतात. ईस, मॅग्ना, इर्मा, सुॲली या स्त्रिया, कचरावेचक संघाचा अध्यक्ष तिओ, त्याचा सहकारी झुंबी या सर्वांच्या आयुष्यांच्या कथा आपल्या मनाला झपाटून, हेलपाटून टाकतात. व्हिक प्रत्येकाचे फोटो घेतो. काहींचे फोटो नुसते तिथल्या तिथे घेतलेले, तर काहींचे विशिष्ट संकल्पना वापरून त्यानुसार थोडीफार मांडणी करून घेतलेले. फोटो घेत असताना व्हिक त्यांना बोलतं करतो. हे सारे आनंदात आहेत असं आपण म्हणू धजावणार नाही; मात्र, यांना ते करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. म्हणूनच व्हिकच्या पारखी नजरेने त्यांना निवडलेलं आहे. व्हिकला ही मंडळी एक-दोन दिवसांत नाही भेटली. सलग दोन वर्षं तो आणि त्याची टीम या कामात संपूर्ण बुडून गेलेले होते.
तो कचरा डेपो म्हणजे यांची रोजीरोटी तर आहेच, पण त्याच्या साथीने प्रत्येकजण आपापल्या परीने आपलं आयुष्य समृद्धही करू पाहतो. त्यासाठीचा त्यांचा आटापिटा, एकंदरच मानवप्राण्याची अभिरुची जपण्याची धडपड हे पडद्यावरून अतिशय टोकदारपणे आपल्या मनात घुसतं. ‘कचरावेचक' आणि ‘अभिरुची' हे दोन्ही शब्द एका ताटात जेवताना पाहून तुम्हाला कदाचित दचकायला होईल. पण ही दोन उदाहरणं पहा, म्हणजे व्हिकने यांची निवड करताना किती बारकाईने विचार केला असेल हे लक्षात येईल.

झुंबीचं आवडतं काम म्हणजे कचऱ्यात टाकली गेलेली पुस्तकं गोळा करणं. कधी त्यांचं कव्हर गेलेलं असतं, कधी पुढची-मागची काही पानं गेलेली असतात, कधी सोबतच्या कचऱ्यामुळे ती लडबडलेली असतात; पण तो ती शक्य तितकी स्वच्छ करतो, सांभाळून ठेवतो. “आजवर इथे अशी हजारो पुस्तकं गोळा झालेली आहेत. ‘द दा विंची कोड', ‘द आर्ट ऑफ वॉर' ही पुस्तकं मी इथेच वाचली. इथे या पुस्तकांची एक कम्युनिटी लायब्ररी बनवण्याची माझी इच्छा आहे म्हणजे मग भविष्यात कचरा वेचणारी लहान मुलं दिसणार नाहीत.” हे त्याच्या तोंडून ऐकल्यावर धक्काच बसतो. या धक्क्यातून आपण सावरतो न सावरतो तोच कचऱ्याचा एक नवा ट्रक तिथे येऊन थडकतो. सगळे तिकडे धावतात. त्या कचऱ्यात झुंबीला अजून एक पुस्तक सापडतं. पुस्तकाचं नाव पाहताच तो अक्षरशः रडायला लागतो आणि सांगतो, “हे पुस्तक खूप महाग आहे. बाजारात आजही याची विक्री होते आहे.”

दुसरं उदाहरण इर्माचं. तिला स्वयंपाकाची भारी हौस! कचऱ्यातून आलेल्या चांगल्या भाज्या, फळं, मांस ती गोळा करते. आपलं पाककौशल्य वापरून त्याचे विविध पदार्थ तयार करते आणि तिथल्या तिच्या सवंगड्यांना दररोज खाऊ-पिऊ घालते. तिच्या खुल्या मुदपाकखान्यातल्या ढणढणणाऱ्या दोन चुली, त्यावरच्या मोठ्या भांड्यात रटरटणारे रस्से, सूप आणि आसपास कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला दिसतं. त्यातलंच काही तरी तुटकं-फुटकं सामान मिळवून तिने एक-दोन टेबल-खुर्च्या तयार केल्या आहेत. “आम्ही सगळेच अजून धडधाकट आहोत, याचा अर्थ ते अन्न तितकं काही वाईट नव्हतं.” ती ठामपणे सांगते.

व्हिकने निवडलेला सातवा कचरावेचक, म्हातारा व्हाल्तर, तर पडद्यावर धमाल उडवतो. “नाइन्टी नाइन इज नॉट हंड्रेड” तो ठासून सांगतो. “एकटा कचरावेचकही मोठा बदल घडवून आणू शकतो, पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो.” त्याचा हिशोब अगदी साधा आहे. तो म्हणतो, “इथे येणाऱ्या कचऱ्यापैकी जवळपास निम्मा आम्ही रीसायकल करतो. आमच्यामुळे नद्यांचं प्रदूषण तितक्याने तरी कमी होतं, पाइप तितके कमी तुंबतात. या डंपिंग ग्राऊंडवर दररोज तितकी अधिक जागा निर्माण होते.” आपल्या कामाबद्दल अभिमान असेल तरच असे विचार सुचू शकतात. नाही तर तिथे कचऱ्याचे दोन-तीन मजली उंचीचे अगणित ढीग, घाण आणि दुर्गंधी याशिवाय दुसरं काय आहे? कागद, प्लॅस्टिक, पीव्हीसी, काच, पुठ्ठा, धातू, सडलेल्या भाज्या-खाद्यपदार्थ... अगदी लहान बाळांची मृत शरीरंसुद्धा!” पाणावलेल्या डोळ्यांनी सुॲली सांगते तेव्हा डोकं सुन्न होतं. तिओची चिमुरडी मुलगी कॅमेरासमोर लाजत लाजत ‘मला सायकॉलॉजिस्ट व्हायचंय' असं म्हणते तेव्हा तिथल्या कचऱ्यातून तिला बाहेर काढायलाच हवं, असं तिओच्याही आधी आपल्यालाच वाटायला लागतं.

दोन वर्षांच्या संशोधन कालावधीत व्हिक आणि ल्युसीने हे सारं अनुभवलेलं आहे. म्हणूनच आपला हा प्रकल्प यशस्वी होणार याबद्दल व्हिकच्या मनात कुठलाही किंतू नाही. फोटो काढता काढता तो ईसला अगदी सहज विचारतो- “रिच अँड फेमस झाल्यावर, इथून बाहेर पडल्यावर काय करणार आहेस याचा विचार केलायस का?”
इथून पुढे सुरू होतो व्हिकच्या प्रकल्पाचा मुख्य भाग. या मंडळींच्या मदतीनेच व्हिक कचऱ्यातून विविध प्रकारच्या अगणित वस्तू गोळा करतो आणि सर्वांना घेऊन आपल्या स्टुडिओत येतो. या वस्तूंमधे रंगीत काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, पीव्हीसी यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यांच्या विशिष्ट मांडणीतून स्टुडिओतल्या ऐसपैस जागेत जमिनीवर एकेकाच्या फोटोवरून कैकपट मोठं पण अगदी हुबेहूब असं एकेक त्रिमितीय चित्र बनवलं जातं. फाबिओ सांगतो, “पीव्हीसीचा वापर सर्वाधिक होईल. फोटोचा अक्षरशः कुठलाही भाग त्यामुळे उत्तमरीत्या दर्शवता येतो.”
ही सारी चित्रं व्हिकच्या डोक्यात तयार आहेतच. कुठल्या वस्तू कुठे वापरायच्या, त्यातून छाया-प्रकाशाचा, चेहऱ्यावरील हावभावांचा तळ कसा गाठायचा हेदेखील त्याचं पक्कं ठरलेलं आहे. तो या मंडळींकरवी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणतो. एक चित्र मनासारखं जमलं की त्याचे फोटो काढून घेतो; की पुन्हा सगळी झाडलोट करायची, तो कॅनव्हास स्वच्छ करायचा आणि पुढल्या चित्राच्या तयारीला लागायचं. (हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यापूर्वी दुर्दैवाने व्हाल्तरचा मृत्यू झाला. त्यामुळे अंतिम प्रदर्शनात त्याच्या फोटोचा समावेश झाला नाही. मात्र, फिल्ममधली आधीची त्याची दृश्यं ल्युसीने तशीच राहू दिली.)

कामाला सुरुवात करण्यापूर्वी व्हिक सर्वांना सांगतो, “पाहणारा या फोटोंकडे दोन प्रकारे पाहणार. एकदा लांबून. तेव्हा तुमचा फक्त चेहरा त्याला दिसेल. आणि मग अगदी जवळून... जेव्हा त्याला या साऱ्या वस्तू वेगवेगळ्या दिसून येतील. एखाद्या गोष्टीच्या जागी जेव्हा अशी दुसरी गोष्ट दिसून येते ना, तो क्षण फार सुंदर असतो, जादुई असतो. आपल्याला तो खूप काही शिकवून जातो.” एखाद्या आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांना शिकवताना बोलावं तसं तो बोलतो; पण त्याच्या बोलण्यात कुठेही ढुढ्ढाचार्याचा आव नाही किंवा आपलं बोलणं या लोकांना समजणार आहे का अशी शंकाही नाही. कारण आपल्या निवडीवर त्याचा सार्थ विश्वास आहे.
एकेक चित्र पूर्ण झालं की व्हिक उंचावर बांधलेल्या आपल्या ‘ऑब्झर्व्हेशन डेक'वर त्या-त्या कचरावेचकाला बोलावतो. वरून जेव्हा ते आपलं स्वतःचंच त्रिमितीय चित्र पाहतात तेव्हाच्या त्यांच्या विविध प्रतिक्रिया पडद्यावरच बघायला हव्यात. टूथपेस्टचं खोकं हातात मिळाल्यावरच्या त्या लहान पोराच्या चेहऱ्यावरचे भाव आणि या प्रतिक्रिया यांची जातकुळी एकच!
२००८ साली या चित्रांचं लंडन इथे प्रदर्शन भरवलं गेलं. चित्रांचा लिलाव झाला. त्यातून उभी राहिलेली घसघशीत रक्कम ‘जार्डिम ग्रामाशो'च्या कचरावेचकांच्या कल्याणकामांकडे वळवली गेली. लघुपटाच्या अंतिम भागात ही दृश्यं दिसतात. तिओचा फोटो २८,००० पौंडांना विकला जातो. तो आकडा ऐकूनच तो गहिवरतो. म्हणतो, “इथे फायनल इमेज पाहिल्यावर तुम्ही क्रेझी माणसं काय करू पाहत होतात ते लक्षात आलं. मला पॉप-स्टार झाल्यासारखं वाटतंय. एक ना एक दिवस मी माझं चित्र परत विकत घेईन.”
या लघुपटाला ऑस्कर नामांकनासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. दिग्दर्शिका ल्युसी वॉकरची याबद्दलची मतंही उल्लेखनीय आहेत. ती लिहिते, ‘ही चित्रं म्हणजे त्या कचरावेचकांसमोर व्हिकने धरलेला आरसा आहेत. त्याचप्रमाणे हा लघुपट म्हणजे आपल्यापासून कैक योजने दूर असणाऱ्या माणसांमध्ये गुंतण्याचा एक मार्ग आहे. जसं ती चित्रं ‘झूम-इन' केल्यानंतर तुम्हाला वेगळीच अनुभूती देतात, तसंच इथेही होतं. तुम्ही त्यांच्या आयुष्यात झूम-इन होता, तुम्हाला त्यांच्याबद्दल ममत्व वाटायला लागतं. आपल्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी केल्याशिवाय हे झालं नसतं.”
व्हिक शेवटी पडद्यावर सांगतो, “आज एक वर्तुळ पूर्ण झालंय. मी या मातीतून वर आलो, त्याचं देणं आज मी फेडलं. हे काम आपल्याला जमेल की नाही याबद्दल माझ्या मनात तसूभरही शंका नव्हती. मात्र, या कचरावेचकांशी इतकं गहिरं नातं प्रस्थापित होईल याची मला मुळीच कल्पना नव्हती.” त्याच्या या उद्गारांसरशी कलेचं सामर्थ्य आणि मनुष्यजन्माचा गौरव यांचा संगम पूर्णत्वाला पोहोचलेला असतो.
( अनुभव, जानेवारी 2016 च्या अंकातून साभार)
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.