आम्ही कोण?
ले 

आणि लोकबिरादरी प्रकल्पाला समाजमान्यता मिळत गेली..

  • डॉ. प्रकाश आमटे
  • 13.03.26
  • वाचनवेळ 15 मि.
prakash amte

१९७३ पासून आम्ही हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पावर काम करत होतो. पहिली दोनतीन वर्षं आम्हाला आमचा जम बसवायला लागली. मग हळूहळू माडिया गोंड आमच्याकडे येऊ लागले. शाळा सुरू झाली. अनेक प्रयोग आकार घेऊ लागले. या सर्व उपक्रमांमुळे आमची आमच्या परिसरात चांगलीच ओळख तयार झाली. लोक विश्वासाने आमच्याकडे येत. दीडदोनशे किलोमीटरच्या परिघात आमचं बऱ्यापैकी नाव झालं होतं. परंतु साधारणपणे १९९०पर्यंत म्हणजे प्रकल्प सुरू झाल्यापासून सतरा-अठरा वर्षं या प्रकल्पाबद्दल नि तिथे चालणाऱ्या कामाबद्दल बाहेरच्या जगाला फारशी माहिती नव्हती. एक तर हा भाग खूप दुर्गम. त्यामुळे मुद्दाम वाकडी वाट करून इथे येणारे लोक कमीच. आनंदवनात ज्या सहजतेने नामवंत मंडळी येत तसं इथे अपवादानेच घडलं. आम्हीही इथून कधी फारसे बाहेर गेलो नाही. स्वतःबद्दल कधी आपणहून कुठे बोललोही नाही. त्यामुळे साहजिकच प्रकल्पाला प्रसिद्धी मिळाली नव्हती. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करत राहणं, हे माझ्या एकूण प्रकृतीलाही साजेसंच होतं. १९९० पर्यंत आम्ही आमच्या कामात गढलेलो होतो. पण नव्वदच्या दशकात परिस्थिती बदलली. इथल्या शाळेमुळे असेल किंवा प्राण्यांमुळे असेल, पण पाहुणे यायचं प्रमाण वाढलं. कुणी त्यावर लिहिलं, कुणी आणखी दहाजणांना सांगितलं. ‘वर्ड ऑफ माऊथ'मुळे बऱ्याचजणांना प्रकल्प हळूहळू माहीत होऊ लागला. माझा स्वभाव मुळात संकोची आहे. इथे काम करणारे आम्ही सगळेच तसे ‘आपण बरं, आपलं काम बरं' या वृत्तीचे. त्यामुळेही प्रसिद्धी मिळायला लागल्यावर आम्ही काहीसे भांबावूनच गेलो होतो.

प्रसिद्धी मिळू लागल्यानंतर आमच्या कामाची महाराष्ट्रभर ओळख वाढू लागली. मग हळूहळू पुरस्कार मिळायला सुरुवात झाली. खरं तर आम्ही हे काम आमच्या आनंदासाठी सुरू केलं होतं. त्यामुळे हे पुरस्कार स्वीकारायचे की नाही, असं वाटायचं. पण त्याचवेळेस पुरस्कारांमुळे कामाची ओळख वाढेल आणि आमच्या विविध प्रकल्पांना त्यातून निधी मिळू शकेल, असंही आमच्या लक्षात आलं. आम्ही कितीही जीव तोडून काम केलं तरी प्रकल्प चालवायला पैसा तर लागत होताच. त्यामुळे पुरस्कार घ्यावेत, अशा निर्णयापर्यंत आम्ही येऊन ठेपलो.

हेही वाचा - पाड्यापाड्यांवर पोहोचला दवाखाना

मला पहिला मोठा पुरस्कार मिळाला तो कुसुमाग्रजांकडून. कुसुमाग्रज हे साहित्यक्षेत्रातलं मोठं नाव; पण एवढी प्रसिद्धी मिळूनही अगदी साधा राहिलेला हा माणूस. समाजाकडून मिळालेलं समाजालाच परत द्यायचं, ही त्यांची भावना. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं होतं. मिळालेल्या रकमेचा त्यांनी या भावनेतूनच ट्रस्ट केला होता, ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान' या नावानं. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्यांना त्यांनी या प्रतिष्ठानतर्फे ‘गोदावरी गौरव' पुरस्कार द्यायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षीच्या पारितोषिकासाठी त्यांनी (१९९२) माझी निवड केली. नाशिकहून तसा निरोप आला. मी म्हटलं, “विचार करतो.” त्यावर मला सांगण्यात आलं, “कुसुमाग्रजांची इच्छा आहे. नाही म्हणू नका.” शेवटी मी होकार दिला. (नाशिकला पुरस्कार वितरण होतं. मी नाशिकला पहिल्यांदाच जात होतो. हेमलकशाच्या बाहेर पडायचे प्रसंगच खूप कमी. कामाच्या दृष्टीनेही ते शक्य नसायचं. अगदी काही कामानिमित्त गेलोच तर जास्तीत जास्त चंद्रपूर आणि नागपूर, एवढीच आमची उडी.) माझ्याबरोबर अशोककुमार, गंगूबाई हनगल, डॉ. वसंतराव गोवारीकर, विजय हजारे अशा ज्येष्ठ मंडळींना पुरस्कार दिले जाणार होते. मीच त्यांच्यात ज्युनियर. मी तेव्हा होतो चव्वेचाळीस वर्षांचा. कुसुमाग्रजांनाही मी पहिल्यांदाच भेटत होतो. मला बघून ते म्हणाले, “तू खूपच तरुण दिसतोस.” मी गमतीने म्हटलं, “मला पुरस्कार दिल्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप तर होत नाहीये ना?” कुसुमाग्रजांना आमच्याबद्दल खूपच आत्मीयता होती. आमचं काम बघायला ते हेमलकशापर्यंत येऊ शकले नव्हते, पण त्यांनी आमच्याबद्दल बरंच वाचलं होतं. त्यांनी आपल्या पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड करावी, हा माझा खरंच बहुमान होता.

या पुरस्कारानंतर लगेचच मला आदिवासीसेवक, दिवाली बेन मेहेता पुरस्कारही मिळाले.

prakash amte

१९९२ साली आणखी एक गोष्ट घडली. तेव्हा फ्रान्सहून डॉ. बार्थिलेमी हेमलकशाला पाहुणे म्हणून आले होते. ते आधी आनंदवनात बाबांना भेटायला आले होते. तिथे त्यांना आमच्या प्रकल्पाबाबत कळलं, म्हणून ते इथे आले. ते आले तेव्हा आमच्याकडे नेहमीप्रमाणे दवाखान्यात खूप पेशंट होते. त्यांनी काही फोटो काढले. त्यांच्या पत्नीने डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर यांच्याबरोबर काम केलं होतं. आफ्रिकेत १९५० च्या दशकात डॉ. श्वाइट्झर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय उपचारांचं काम केलं होतं. त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. मोनॅको सरकारने त्यांच्यावर तिकीटही काढलं होतं. आमचं काम पाहून डॉ. बार्थिलेमी खूपच प्रभावित झाले. डॉ. श्वाइट्‌‍झर यांनी आफ्रिकेत ज्या परिस्थितीत काम केलं ते आणि आम्ही १९९२ साली ज्या परिस्थितीत काम करत होतो ती परिस्थिती यात खूप साम्य आहे, असं डॉ. बार्थिलेमींना वाटत होतं. त्याच सुमारास कोलकत्यातल्या कुणी तरी आमच्यावर ‘श्वाइट्झर कपल ऑफ इंडिया' या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. यामुळे आमचा सन्मान करून आमच्यावरही तिकीट काढावं, अशी मागणी करणारा एक लेख त्यांनी तयार केला आणि श्वाइट्झर यांचं तिकीट काढणाऱ्या मोनॅको सरकारला पाठवून दिला. डॉ. बार्थिलेमी फ्रान्सचे, पण ही मागणी त्यांनी मोनॅको सरकारकडे केली होती. मोनॅको हा फ्रान्सच्या सीमेला लागून असलेला छोटासा देश.

हेही वाचा - होय, सापही आमचे सोयरेच

डॉ. बार्थिलेमींनी आमच्या नावाची शिफारस केल्यानंतर मोनॅको देशाने या मागणीवर विचार सुरू केला. पण नुसतं डॉ. बार्थिलेमींच्या भरवशावर सरकार कसा निर्णय घेणार? त्यामुळे त्यांनी भारतातल्या फ्रेंच राजदूताला डॉ. प्रकाश आमटे कोण आहेत त्यांची माहिती काढा, असं सांगितलं. पण त्याला तरी आमची माहिती कुठून असणार? मग त्यांनी केंद्र शासनाशी संपर्क साधला. त्यांना तिथून सांगण्यात आलं, की हे महाराष्ट्रात काम करतात. मग हळूहळू मुंबईहून गडचिरोलीच्या कलेक्टरकडे निरोप आला, की आमटे यांच्याबद्दल माहिती कळवा. त्याने हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ते माहितीचे फॉर्म घेऊन आमच्याकडे पाठवून दिलं. त्यांनाही ही माहिती कशासाठी हवी आहे हे नीटसं माहीत नव्हतं. मी फॉर्म भरून माहिती पाठवून दिली. ती या तिकिटासाठी हवी होती, याची कल्पना आम्हा कुणालाच नव्हती.

मी पाठवलेली माहिती मिळाल्यानंतर सरकारलाही असं वाटलं की आमचं काम तिकीट काढावं एवढं मोठं आहे. अर्थात आम्हाला याचा काहीच पत्ता नव्हता. या सर्व घडामोडींची माहिती आम्हाला डॉ. बार्थिलेमी यांनी दिली. तिकिटासाठी फोटो पाठवण्याबद्दलही सांगितलं. पण आमच्याकडे आमचे फोटोही नव्हते. मग त्यांनी मित्रांची नावं विचारली. प्रकल्पावर येऊन गेलेल्या चार-पाचजणांची नावं, पत्ते मी दिल्यानंतर त्यांनी पत्रं लिहून त्यांच्याकडून फोटो मागवले. त्यातला एक निवडलाही. हेही सर्व आमच्या अपरोक्ष चाललेलं असल्याने हे सगळं आम्ही विसरूनही गेलो.

prakash amte

मोनॅको सरकारकडून निघालेल्या आमच्यावरील तिकिटाचीही गमतीदार गोष्ट आहे. मोनॅको सरकारने २४ ऑक्टोबर १९९५ साली ‘श्वाइट्झर कपल ऑफ इंडिया' असं आमचं वर्णन करून दोघांवर तिकीट काढलं खरं, पण आम्हाला त्यांनी अधिकृतरीत्या काही कळवलं नाही. व्यं.न. कुलकर्णी नावाचे तिकिटं गोळा करण्याचा छंद असलेले एकजण नागपुरात होते. आमच्यावर असं काही तिकिट निघालं आहे, हे त्यांना कळलं होतं. ही बातमी इतरांनाही कळावी म्हणून त्यांनी ‘तरुण भारत'मध्ये यासंबंधी एक छोटी बातमी दिली. पण मथळ्यामध्ये आमची नावं नसल्याने ती कुणाच्याच लक्षात आली नव्हती. आनंदवनात ‘तरुण भारत' येतो, पण तिथेही ती बातमी कुणाच्या वाचनात आली नाही. ‘सोमनाथ' प्रकल्पावरच्या कुणी तरी ती बातमी वाचली आणि आनंदवनात फोन केला आणि मग सगळ्यांना या तिकिटाबद्दल कळलं. मग तीच बातमी ‘लोकमत'मध्ये मोठी करून फोटोसहित छापून आली. त्यानंतर लोक तिकिटाबद्दल विचारायला लागले; पण तिकिटाबाबत आम्हालाही त्यांच्याएवढीच माहिती होती. शेवटी विकासने मोनॅको सरकारला पत्र टाकून विचारल्यावर त्यांच्याकडून पत्र आणि तीनशे तिकिटं आली. या तिकिटामुळे आमच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागली.

पुढे २००२ साली मला ‘पद्मश्री'चा सन्मान मिळाला. तोपर्यंत या ना त्या निमित्ताने खूप सरकारी लोक प्रकल्पावर यायला लागले होते. ते सगळं पाहायचे. कुठे ना कुठे त्याचा उल्लेख करायचे. याशिवाय इतर लोकही या सगळ्या काळात खूपदा भेटी देऊन गेले होते. त्यातून प्रकल्पाबद्दल सगळ्यांना कळत गेलं असावं. मोनॅको सरकारने तिकीट काढल्यामुळेही आम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलेलो होतो. त्यामुळे कसं माहीत नाही पण ‘पद्मश्री' पुरस्कारासाठी आमच्या कामाचा विचार झाला. एक दिवस मला थेट कलेक्टरचा फोन आला, “तुम्हाला ‘पद्मश्री' द्यायची सरकारची इच्छा आहे. तुम्ही स्वीकारणार का?” मी ‘हो' म्हटल्यावर माझं नाव जाहीर करण्यात आलं.

prakash amte

‘पद्मश्री' मिळाल्यानंतर आम्हाला कुठकुठली आमंत्रणं यायला लागली. खरं तर मला फारसं बोलायला आवडत नाही. स्वतःबद्दल तर नाहीच नाही. पण अशा कार्यक्रमात काही तरी बोलणं अपेक्षित असतं. मला ते जमत नाही. मंदालाही नाही. शेवटी कुणी तरी प्रश्न विचारायचा आणि त्या मुलाखतीतून आम्ही संवाद साधायचा, अशी तोड काढली. माझी अशी पहिली मुलाखत धुळ्याला झाली- डॉ. जगन्नाथ वाणींच्या पुढाकाराने. डॉ. वाणी १९९९ मध्ये हेमलकशाचा प्रकल्प बघायला आले होते. त्यांनी आम्हाला खूप मदतही केली होती. त्यामुळे त्यांचा-माझा चांगला परिचय होता. डॉ. वाणींनी धुळ्याला एक कोटी रुपये खर्चून हॉस्पिटल बांधलं होतं. तिथे फीत कापायला यायचं त्यांनी मला आमंत्रण दिलं. हेमलकशाच्या प्रकल्पाबद्दल मी तिथे बोलावं अशी त्यांची इच्छा होती. बोलायला मी ‘नाही' म्हणालो. वाणीकाका म्हणाले, “नुसती फीत कापून लोकांना तुझं काम कसं कळणार?” पण मग माझी अडचण लक्षात घेऊन त्यांनी माझी जाहीर मुलाखत घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी अपर्णा वेलणकर हिला बोलावलं. पाऊण तास चाललेली ही मुलाखत लोकांना खूप आवडली. या मुलाखतीनंतर लोकांनी आपणहून देणग्या दिल्या.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. नीतू मांडके उपस्थित होते. डॉ. मांडके बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, “मला लोकबिरादरी प्रकल्पाबाबत काहीच माहिती नव्हती. इतक्या अडचणीच्या परिस्थितीत इतकं काम इथे होतंय, हे खरंच विशेष आहे. मलाही या प्रकल्पावर येऊन तिथलं काम बघायला आवडेल.” त्यांना खरोखरच यायची इच्छा होती; पण त्यांच्या कामाच्या गडबडीत ते राहूनच जायचं. पण नंतर ते आणि त्यांची पत्नी अलका मांडके आमच्याकडे हेमलकशाला येऊन गेले. मग खूप कौतुकही केलं त्यांनी आमचं.

२००३ साली आम्हा दोघांना भारताबाहेरची, तीही एकदम अमेरिकेत जायची संधी मिळाली. त्या वर्षी न्यूयॉर्कला बृहन्महाराष्ट्र अधिवेशन होतं. डॉ. वाणींनी आमची नावं, माहिती वगैरे त्यांच्या समितीला पाठवली होती आणि आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं असं सुचवलं होतं. मला याबद्दल फारशी कल्पना नव्हती. पण हे अधिवेशन भरवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या डॉ. मीना नेरूरकर यांनी आम्हाला न्यूयॉर्कचं निमंत्रण दिलं. मी म्हटलं, “माझ्याकडे पासपोर्ट नाही, आणि तसाही मी कुठे जात नाही, भाषण करत नाही.त्यामुळे मला गृहीत धरू नका.” वाणीकाकांना हे कळल्यावर ते म्हणाले, “तू नको का म्हणालास?” मी म्हटलं, “मला हे कार्यक्रम, भाषणं वगैरे बरं वाटत नाही.” त्यावर ते म्हणाले, “तुला कार्यक्रमाला बोलावलं जावं, प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण मिळावं वगैरेसाठी तू काही प्रयत्न करतो आहेस का? मला तुझं काम महत्त्वाचं वाटतं आणि ते लोकांसमोर यावं असं वाटतं म्हणून मी तुझ्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कुणी तुला विचारलं तर किमान नाही म्हणू नकोस.” मग माझा नाइलाज झाला. मी माझी संमती कळवली आणि अखेर आम्ही अमेरिकावारी करणार हे नक्की झालं.

हेही वाचा - आमटे कुटुंबीय : डेरेदार वृक्षाच्या छायेत

धुळ्याच्या कार्यक्रमाप्रमाणे अपर्णा वेलणकरने आमची मुलाखत घ्यायची असं ठरलं. पण डॉ. वाणींना काळजी वाटत होती, की हा गृहस्थ फारसा काही बोललाच नाही तर काय करणार? त्यामुळे त्यांनी आमच्या कामावर एक फिल्म करायची ठरवली. त्याप्रमाणे अपर्णाने ४५ मिनिटांची ‘अरण्यातील प्रकाशवाटा' ही एक फिल्म बनवली.

आम्ही अमेरिकेत पोचलो. आमचा मुलाखतीचा कार्यक्रम अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशीच होता; पण एका अजब कारणामुळे तो रद्द व्हायची पाळी आली होती. झालं असं, की अधिवेशनाला मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे ही नेतेमंडळीही आली होती. त्यांना भाषणासाठी प्रत्येकी तीन मिनिटं दिली होती. आमच्या मुलाखतीसाठी मात्र पाऊण तास दिला होता. मनोहर जोशी तेव्हा लोकसभेचे सभापती होते. ते म्हणाले, “मला बोलायला फक्त तीन मिनिटं मिळणं, हा भारताचा अपमान आहे.” त्यामुळे ते अर्धा तास बोलले. ते अर्धा तास बोलले म्हणून सुशीलकुमारही अर्धा तास बोलले. ठरवलेला सगळा कार्यक्रमच कोलमडला. संयोजकांना काय करावं कळेना. त्यांची तातडीची मीटिंग झाली. त्यात आम्हाला संध्याकाळच्या सत्रात पाऊण तास द्यावा असं ठरलं.

मग संध्याकाळी आमची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत लोकांना इतकी आवडली, की त्यांना आमच्याबद्दल अजून समजून घ्यावंसं वाटत होतं. मग संयोजकांनी जाहीर केलं, की ‘वरच्या मजल्यावर पुस्तकांचे स्टॉल आहेत. ज्यांना आमट्यांना भेटायचं आहे त्यांनी तिथे जावं. तिथे ते तुम्हाला भेटतील.' आम्हाला भेटायला तिथे गर्दीच गर्दी झाली. लोकांना आमच्या कामाबद्दल एवढी आस्था निर्माण झाली होती की संपूर्ण अधिवेशनभर लोक आम्हाला भेटत राहिले. तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनातली गाणी, नाटकं हे कुठलेच कार्यक्रम आम्ही बघू शकलो नाही. एवढी गर्दी आमच्याभोवती राहिली. लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे निधीही दिला. दोन-तीन दिवसांत तब्बल ३५ हजार डॉलर्स जमा झाले. इतर ठिकाणांहूनही पैसे आले.

amte ad

अमेरिकेच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातही आमच्या मुलाखती, कार्यक्रम सुरू राहिले. ...ठाण्याला, साताऱ्याला, नाशिकला, पुण्या-मुंबईला...

सुरुवातीला आम्ही कधी हेमलकशाबाहेर गेलो नाही, पण नंतर मुलांनी काम सांभाळल्यावर मी-मंदा बाहेर जायला लागलो. कार्यक्रमांद्वारे लोकांपर्यंत पोचता येतं, ही गोष्ट त्यात प्रकर्षाने लक्षात आली. लोकांनी आपलं ऐकून घेतलं तर त्यांना आमच्या कामातून काहीतरी प्रेरणा मिळेल, अशा आशेने आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रमांना गेलो.

२००७ साली परत एकदा डॉ. वाणींनी आम्हाला अमेरिकेत यायचं आमंत्रण दिलं. मागच्या वेळेस बृहन्‌‍महाराष्ट्रच्या अधिवेशनापुरते आम्ही गेलो होतो. त्यावेळेस मिळालेला प्रतिसाद आमच्या स्मरणात होता. या वेळेस आमचे वीस ठिकाणी कार्यक्रम ठेवले होते. अमेरिका आणि नंतर कॅनडात जायचं होतं. आमची दोघांचीही फारशी इच्छा नव्हती; पण ‘नाही म्हणू नकोस' अशी प्रेमळ दटावणी डॉ. वाणींनी केली. आम्ही पुन्हा एकदा अमेरिकावारीसाठी तयार झालो. पण या वेळेस व्हिसा मिळताना जो गोंधळ झाला त्यामुळे आमची ही अमेरिकावारी बरीच गाजली.

अमेरिकेच्या बृहन्‌‍महाराष्ट्र मंडळाच्या निमंत्रणावरून आम्ही अमेरिकेला जाणार असल्याने अमेरिकन कॉन्सुलेटकडून व्हिसा मिळण्यात काही अडचण येईल असं मनातही नव्हतं. कॉन्सुलेटला जाताना मिलिंद सरनौबत आमच्याबरोबर होता. आम्ही बाहेरच्या रांगेत वाट बघत उभे राहिलो. नंबर आल्यावर आत गेलो. आमची मुलाखत घेणारा माणूस अमेरिकेन होता. त्याच्याबरोबर एक भारतीय होता, पण तो नुसताच इंटरप्रिटर म्हणून. आम्ही त्या अमेरिकन अधिकाऱ्याला आवश्यक ती कागदपत्रं, आमंत्रणाचं पत्र, इन्कमटॅक्स सर्टिफिकिट वगैरे सगळं दिलं. आम्ही दोघं १५०० रुपये पगार घेत होतो. तसं त्यात लिहिलं होतं. त्या माणसाने सगळी कागदपत्रं पाहिली. पगाराच्या आकड्यांकडे पाहिल्यावर मला विचारलं, “तुम्ही काय काम करता?” मी म्हटलं, “आम्ही दोघंही डॉक्टर आहोत. आदिवासींमध्ये काम करतो.” आमचा वेश बघून तो तुच्छतेने म्हणाला, “एवढासा पगार? अमेरिकेत जायचं तिकीट किती आहे, माहीत आहे का?” मी शांतपणे म्हटलं, “नाही, काही कल्पना नाही. ज्यांनी आम्हाला बोलावलं आहे तेच आमचं तिकीट काढणार आहेत, त्यामुळे तिकिटाच्या दरांची काही मी चौकशी केली नाही.” माझ्या या उत्तरामुळे त्याची माझ्याबद्दलची खात्रीच पटली. तो म्हणाला, “यू गो बॅक. तुम्हाला व्हिसा मिळणार नाही.” याच कागदपत्रांवर आम्हाला २००३ साली व्हिसा मिळाला होता. मग आता काय झालं ते मला कळेना. तसं मी त्याला विचारलंही. तो म्हणाला, “बाहेर जा आणि जी कारणं दिली आहेत ती वाचा.”

बाहेर आल्यावर व्हिसा नाकारण्याची कारणं बघायला मिळाली. आमच्या अर्जावर ‘सोशल, इकॉनॉमिक टाइज आर व्हेरी वीक' असा शेरा मारला होता. अमेरिकन कॉन्सुलेटमधल्या बहुतेकांना आपल्याकडे व्हिसा मागणारे सगळेच अमेरिकेत स्थलांतरित होणार आहेत, असं वाटत असतं. त्यात आमची आर्थिक परिस्थिती दुर्बल. त्यामुळे आम्ही गेलो की तिकडेच राहणार, हे त्यांनी ठरवून टाकलं असावं.

अर्थात व्हिसा नाकारला याचं आम्हाला काही दुःख झालं नाही. तसेही आम्ही जायला फारसे उत्सुक नव्हतोच. त्यामुळे उलट आमच्या मनासारखंच झालं होतं. आम्ही हसत बाहेर आल्यावर मिलिंदला वाटलं, आम्हाला व्हिसा मिळाला. खरी गोष्ट कळल्यावर मात्र तो खूप चिडला. ‘हे खूप माजले आहेत. यांना कुणी तरी धडा शिकवायला हवा,' वगैरे म्हणाला. अमेरिकन कॉन्सुलेटचा निर्णय मी डॉ. वाणींना कळवला. त्यांनाही आश्चर्य वाटलं. आमच्या कार्यक्रमांची तिकडे अमेरिकेत तयारी झाली होती. अमेरिकेला जोडूनच पुढे कॅनडाचा १५ दिवसांचा कार्यक्रम ठरलेला होता.

हेही वाचा - आनंदवन आर्थिक संकटात, पण आणखी मोठं काम उभं करायचं आहे.. कौस्तुभ आमटे

व्हिसा नाकारल्यानंतर आम्ही तर रेल्वेने नागपूरला परतलो, पण झाल्या प्रकाराने मिलिंद फार अस्वस्थ होता. त्यामुळे आम्हाला व्हिसा नाकारल्याचं जे पत्र होतं ते घेऊन तो नि त्याचा मित्र राजेंद्र ‘लोकसत्ता'चे संपादक कुमार केतकर यांच्याकडे गेला. त्यांनी त्यांच्या इतर काही पत्रकार मित्रांशी संपर्क साधला. दुसऱ्याच दिवशी काही मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांत याची मोठी बातमी छापून आली. त्यात व्हिसा नाकारल्याबद्दल सडकून टीका करण्यात आली होती. ज्याला सरकारने ‘पद्मश्री' दिली आहे अशा व्यक्तीला व्हिसा नाकारणं हा सरकारचा अपमान आहे, असंही त्यात लिहिलं होतं. आमच्या पाठीमागे मुंबईत काय झालं, याची काही कल्पनाच नव्हती. पण दैनिकांत आलेल्या या बातम्यांमुळे अमेरिकेच्या कॉन्सुलेट जनरलला आपण केलेली चूक कळली. त्याने रात्रीच आम्हाला ई-मेल केली. मी आणि मंदा प्रवासात होतो. दिगंत पहाटे काम सुरू करायच्या आधी ई-मेल बघतो, त्यामुळे त्याने ती पहाटे पाहिली. त्याने पहाटे पाचला मला फोन केला, की कॉन्सुलेट जनरलची ई-मेल आली आहे. त्यांनी तुला पासपोर्ट घेऊन परत बोलावलंय. मी म्हटलं, “आम्ही तर आता नागपूरच्या आसपास आलोयत. नंतर बघू या काय करायचं ते. तू काहीच उत्तर पाठवू नकोस.”

सकाळी आठच्या सुमारास कॉन्सुलेट जनरलचा माझ्या मोबाइलवर फोन आला, ‘वुई रिग्रेट द मिस्टेक. तुम्ही तुमच्या सोयीने परत या.' मी म्हटलं, ‘आता आम्ही नागपूरपर्यंत पोचलोयत. मुंबईहून हे अंतर खूपच आहे. पुन्हा येणं शक्य नाही. त्यात माझी आर्थिक स्थिती चांगली नाही. याच कारणासाठी तर तुम्ही मला व्हिसा नाकारला. सारखं येणं-जाणं मला कसं परवडणार?' तो चांगलाच वरमला. ‘कुणाला तरी पासपोर्ट घेऊन पाठवा' असं म्हणायला लागला. आमचा पासपोर्ट मुंबईतच होता. कॅनडाच्या वकिलातीने आम्हाला व्हिसा दिलेला असल्याने आम्ही कॅनडाला जाणारच होतो, त्यामुळे तो तिथेच ठेवला होता. मग मिलिंदला फोन लावून सगळं सांगितलं. मिलिंद अमेरिकन कॉन्सुलेटशी बोलला. तो त्यांनी दिलेल्या वेळेत आमचा पासपोर्ट घेऊन गेला. आता त्यांनी आम्हाला थेट दहा वर्षांचा व्हिसा दिला. वृत्तपत्रांनी हे प्रकरण लावून धरल्याचा हा सारा परिणाम होता. दैनिकांत छापून आलेल्या बातम्या वाचून अनेकांनी कॉन्सुलेटकडे ई-मेल, पत्रं पाठवूनही निषेध केला होता.

अमेरिकेच्या या दौऱ्यात आम्ही वीस ठिकाणी गेलो. वेगवेगळ्या गावांत वेगवेगळ्या लोकांकडे राहिलो. त्यांनी खूप छान आदरातिथ्य केलं. सुट्टीच्या दिवशी जमेल तेवढं फिरवलं. या दौऱ्यात आम्हाला गायतोंडे यांच्यासारखे अनेक स्नेही लाभले. त्यांनी शाळेसाठी भरघोस मदतही दिली. पुढे कॅनडातही गेलो. या दौऱ्यात होस्टेलसाठी आम्हाला एकरकमी देणगी मिळाली. त्यामुळे त्याही अर्थाने ही वारी यशस्वी झाली.

त्यानंतरही ठिकठिकाणची निमंत्रणं येत राहिली. पुरस्कार मिळत राहिले. वेगवेगळ्या प्रकारे लोक पाठिशी उभे राहत गेले. आमचं काम व्यापक पातळीवर जगापर्यंत पोहोचलं. त्यातून लोकांचं आणखी प्रेम मिळालं. मला-मंदाला पुरस्कार वगैरेंचं काही कौतुक नाही, परंतु या पुरस्कारांमुळे आपल्या कामाला समाजमान्यता मिळते आहे, याचं समाधान मात्र खूप आहे.

डॉ. प्रकाश आमटे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results