आम्ही कोण?
मुलाखत 

आनंदवन आर्थिक संकटात, पण आणखी मोठं काम उभं करायचं आहे.. कौस्तुभ आमटे

  • गौरी कानेटकर
  • 07.02.25
  • वाचनवेळ 11 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
anandwan

बाबा आमटे आणि आनंदवन ही दोन नावं माहीत नाहीत, असा सजग मराठी माणूस सापडणं अवघड. समाजाने झिडकारलेल्या कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटेंनी १९४९मध्ये महारोगी सेवा समितीची स्थापना केली. या कुष्ठरुग्णांनी आनंदवनात अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा सर्व तऱ्हेच्या उपेक्षित घटकांना सामावून घेणारं, त्यांना अर्थपूर्ण आयुष्याची संधी देणारं मॉडेल निर्माण केलं. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, रोजगार, घरबांधणी अशा नाना क्षेत्रांत अफाट काम उभारलं. महाराष्ट्रातल्या इतर अनेक सामाजिक कामांची प्रेरणाभूमी ठरलेल्या महारोगी सेवा समितीला नुकतीच ७५ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त आनंदवनातील कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी, बाबा आमटेंचा नातू कौस्तुभ विकास आमटे याच्याशी साधलेला संवाद.

महारोगी सेवा समितीची पंचाहत्तरी पूर्ण झाली. कोणत्याही संस्थेसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. संस्थेच्या आणि पर्यायाने आनंदवनाच्या या प्रवासाकडे तू कसं पाहतोस?
संस्थेला ७५ वर्षं पूर्ण झाली, याचा आनंद आम्हाला सगळ्यांना नक्कीच आहे. पण कोणत्याही वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करावा असं मात्र वाटत नाही. कारण महारोगी सेवा समिती सुरू झाली ते एका अपरिहार्यतेतून. बाबांना वरोऱ्याच्या रस्त्याकडेला गटाराजवळ पडलेला कुष्ठरुग्ण दिसला. त्याच्याकडे पाहून बाबांच्या मनातही सुरुवातीला घृणाच दाटून आली. पावसापासून रक्षण करण्यासाठी त्याच्या अंगावर तरट टाकून ते घरी आले. पण घरी गेल्यावर त्यांच्या मनात विचार आला की हा रोग उद्या मलाच झाला तर? माझ्या बायका-पोरांना झाला तर? मी काय करेन? रस्त्यावर बेवारस पडलेल्या त्या रुग्णाच्या नातेवाईकांसारखीच मीही त्यांच्याकडे पाठ फिरवेन का? या प्रश्नांनी बाबांचा ताबा घेतला. ते पुन्हा त्या कुष्ठरुग्णाकडे गेले आणि तिथून त्यांच्या कामाची सुरुवात झाली.
inside one

म्हणजे समाज म्हणून आपल्याला आलेल्या अपयशातूनच आनंदवन उभं राहिलं. त्यामुळे आनंदवन सुरू केल्याचा सोहळा साजरा करावा का, असा प्रश्‍न पडतो. पण त्याचवेळी गेल्या ७५ वर्षांमध्ये आनंदवन, सोमनाथ आणि लोकबिरादरी या तीन प्रकल्पांच्या माध्यमातून महारोगी सेवा समिती तब्बल ३३ लाख उपेक्षितांपर्यंत पोहोचू शकली, याचं समाधान आहेच. संस्थेने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याला स्पर्श केला. संस्थेने असं आपण म्हणतो म्हणजे कुणी? तर इथल्या कुष्ठमुक्तांनी, अंध-अपंग, निराधार आणि समाजाने नाकारलेल्या नाना प्रकारच्या व्यक्तींनीच पुढे आपल्यासारख्या इतरांना मदतीचा हात दिला. आपण इतरांपेक्षा कमी नाही, असा विश्वास त्यांच्यात जागवला. त्यांचा आत्मसन्मान परत मिळवून दिला. हा कारवाँ आता ७५ वर्षांचा झाला आहे, याचा आनंद नक्कीच आहे. सहृदयता हा आनंदवनाच्या कामाचा आत्मा आहे. तो अबाधित ठेवून आजवर कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या इथे काम करत आल्या आहेत. पुढेही तोच गाभा ठेवून बदललेल्या परिस्थितीत, नवीन आव्हानांना सामोरं जात आनंदवन काम करत राहील, असा विश्वास वाटतो.

inside three

पंचाहत्तरीनिमित्त आनंदवनात काय कार्यक्रम आहेत?
यंदा पंचाहत्तरीनिमित्त आनंदवनात पुन्हा एकदा मित्रमेळावा भरतो आहे. जवळपास २० वर्षांनी.
सुरुवातीला साठीच्या दशकात बाबांनी आनंदवनात मित्रमेळावा घ्यायला सुरुवात केली होती. आनंदवन पडलं महाराष्ट्राच्या एका टोकाला. काम सुरू झाल्यावर पहिली दहा वर्षं पुण्या-मुंबईतून काही मोजकी मंडळी इकडे येत. पण ते प्रमाण अगदीच कमी होतं. आनंदवनातलं काम बाहेरच्या उदासीन जगापर्यंत पोहोचावं यासाठी बाबांनी हा उपक्रम सुरू केला होता. पहिल्या मित्रमेळाव्याला तुकडेोजी महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, मनोहर दिवाण, दादा धर्माधिकारी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, कमलाताई होस्पेट, अण्णासाहेब कोरगावकर अशी मोठी मंडळी आली होती. पुढे या मित्रमेळाव्याची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आणि लोक आनंदवनाकडे ओढले जाऊ लागले. पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, विष्णू चिंचाळकर अशी एकाहून एक दिग्गज माणसं मित्रमेळाव्यामुळेच आनंदवनाशी कायमची जोडली गेली. विशेषतः पु. ल. आणि सुनीताबाई तर आनंदवनाचे ब्रँड अँबेसिडरच बनले. या मित्रमेळाव्यांनी बाबांसह सगळ्या कार्यकर्त्यांना भक्कम मानसिक आधार दिला. त्यातून आर्थिक मदत उभी राहिली. कार्यकर्ते आनंदवनाकडे ओढले गेले. कुष्ठरोगाबद्दलचे, आनंदवनाबद्दलचे गैरसमज दूर झाले. थोडक्यात, आनंदवनाच्या उभारणीत या मित्रमेळाव्यांचा मोठाच हातभार होता.
मधल्या काळात काही कारणांनी हे मित्रमेळावे बंद पडले. ते पुन्हा सुरू करायला हवेत, असं वाटू लागलं होतंच. म्हणूनच पंचाहत्तर वर्षानिमित्त बाकी काही कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी मित्रमेळावाच पुन्हा सुरू करतो आहोत. महाराष्ट्रभरातील थोरामोठ्यांची, मान्यवरांची, कार्यकर्त्यांची पुढची पिढी आनंदवनाशी पुन्हा एकदा जोडली जावी, अशी इच्छा आहे.
तर आठ आणि नऊ फेब्रुवारीला आनंदवनात हा मित्रमेळावा भरतोय. योगायोगाने नऊ तारखेला बाबांची पुण्यतिथीही असते. ‘योगदानाचा-कृतज्ञतेचा, सद्भावनेचा मित्रमेळावा' असं त्याचं नाव ठेवलं आहे. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ‘त्याग-समर्पण स्मारका'चं अनावरण होणार आहे. संस्थेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचं चित्ररूप आणि वस्तुरूप प्रदर्शन अतिथींना पाहता येणार आहे. त्याचबरोबर नव्या पिढीतल्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांशी गप्पा रंगणार आहेत. संस्थेतील कुष्ठमुक्त, दिव्यांग, आदिवासी कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरणही होणार आहे.
दुसऱ्या दिवशी ‘अनाम कुष्ठरुग्ण बांधवांच्या स्मरणशीले'चं उद्घाटन आणि इतर काही कार्यक्रमांसोबत दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांच्या अन्नतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी संस्था जे उपक्रम राबवू इच्छिते, त्यांचं उद्घाटन होणार आहे.

कुष्ठरोगाबद्दल आणि आनंदवनाबद्दलही समाजात अनेक गैरसमज आहेत. लोकांना असं वाटतं की कुष्ठरोगाचं पूर्ण निर्मूलन झालंय, मग आता आनंदवनात काय काम चालतं? आनंदवनाचं काम कुष्ठरोगापलीकडे बरंच व्यापक आहे, हे तर झालंच. पण मुळात कुष्ठरोग संपलाय हे विधान तरी बरोबर आहे का?
खरंतर नाही. कुष्ठरोग संपलेला नाही. कुष्ठरोगामुळे येणारी विकृती नक्कीच कमी झालीय. ती ९० टक्के कमी झालीय, असं म्हटलं तरी चालेल. ऐंशीच्या दशकात कुष्ठरोगाच्या उपचारासाठी बहुविध उपचार पद्धती आली. त्यानंतर हा फरक पडत गेला. शिवाय कुष्ठरोगाबद्दल जागृतीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी प्राधान्य दिल्याने एकूण कुष्ठरुग्णांचं प्रमाणही कमी झालंय. पण तो संपलेला नक्कीच नाही. आनंदवनातच दर दोन दिवसाआड एक कुष्ठरुग्ण व्यक्ती उपचारांसाठी किंवा पुनर्वसनासाठी दाखल होते, यावरून त्याचं प्रमाण आणि गांभीर्य लक्षात यावं. यातील काही रुग्ण नव्याने लागण झालेले असतात, तर काहींचा रोग रिलॅप्स झालेला असतो. खरं तर सहा महिने किंवा वर्षभर औषध घेतलं की कुष्ठरोग पूर्ण बरा होतो. पण औषध न घेण्याचं प्रमाण आपल्याकडे बरंच आहे. शिवाय कुष्ठरोग पूर्ण बरा झाल्यानंतर, अगदी १५-२० वर्षांनंतरही तो रिलॅप्स होऊ शकतो. त्यामुळे असे रिलॅप्स झालेले रुग्णही त्यात असतात.
दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी की एकीकडे या रोगाबद्दल एवढी जागृती होऊन, कुष्ठरोगावर चांगली औषधं निघूनही समाजातली या रोगाबद्दलची भीती-घृणा मात्र अजून पूर्ण गेलेली नाही. अगदी तथाकथित उच्चवर्गांत, उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही अजून या रोगाबद्दल गैरसमज-भीती आहेच. हे अंदाजपंचे ओढलेले ताशेरे नाहीत. नुकतीच आनंदवनात अशा तथाकथित उच्चवर्गातली, उच्चशिक्षित कुष्ठमुक्त व्यक्ती दाखल झाली आहे. रोग पूर्ण बरा झाला असूनही या व्यक्तीच्या कुटुंबाने तिचा स्वीकार केला नाही, हे आजचं वास्तव आहे. अशा वेळी कुष्ठरोग संपला असं कसं म्हणणार? बाबा म्हणायचे, ‘एक वेळ शरीराचा कुष्ठरोग संपेल, पण समाजाच्या मनाला लागलेली कुष्ठरोगाची कीड संपणार नाही.' ते आजही तितकंच खरं आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय. त्यामुळे कुष्ठरोगाबद्दलची समाजातली भीती संपेल, किमान बऱ्या झालेल्या कुष्ठमुक्तांना तरी समाज ज्या दिवशी प्रेमाने आणि सन्मानाने स्वीकारेल, त्यादिवशी कुष्ठरोग संपला असं म्हणता येईल. तोच या कार्यातला सोनियाचा दिनु असेल. तो दिवस येईपर्यंत काम करतच रहावं लागणार आहे.
कुष्ठरोगापलीकडेही आनंदवनात बरंच काम चालतं. आनंदवनात अंध-अपंग-कर्णबधिर, तसंच अनाथ-परित्यक्ता-मनोरुग्ण अशा नाना प्रकारचे निवासी बांधव-भगिनी आहेत. याशिवाय अंध-कर्णबधिर मुला-मुलींसाठी शाळा आहेत. inside five

व्यवसाय प्रशिक्षण देणारं संधिनिकेतन आहे. तिथली मुलं आनंदवनातच राहून शिकतात. या निवासी मंडळींची संख्या जवळपास १८००च्या आसपास आहे.

inside six

त्याशिवाय आनंदवनात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. कृषिमहाविद्यालय, कृषितंत्रविद्यालय आहे. प्राथमिक-माध्यमिक विद्यालय आहे. या सर्व ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या ३५००च्या घरात आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे इथे शिकणाऱ्यांमध्ये ९७ टक्के विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातले, ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांतले आहेत. गेली ५०-६० वर्षं आनंदवनामध्ये हे शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत. त्याबद्दल बाहेर फारशी माहिती नाही.

school

एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी निधीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर लागत असणार. पण सध्या आनंदवन मोठ्या आर्थिक संकटात आहे, असं ऐकतोय. त्यामागची कारणं काय आहेत? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
आर्थिक आव्हानं आनंदवनापुढे अगदी सुरुवातीच्या काळापासून होतीच. त्यावर त्या त्या वेळी मात करतच संस्थेचा प्रवास सुरू आहे. बाबांच्या शब्दांत सांगायचं तर लोकांच्या रूपाने प्रभुचे हजारो हात लागल्यामुळेच आनंदवन गेली ७५ वर्षं त्या संकटांना पुरून उरलं आहे. पण कोव्हिडनंतर आर्थिक संकट अधिक गंभीर झालं आहे. मोठ्या जागतिक संकटात स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचं प्रमाण कमी होतं. पुढे काय होईल, याबाबत अनिश्चितता असेल तर लोक खर्च करताना हात आखडता घेतात, त्याचा फटका साहजिकच देणग्यांना बसतो. कोव्हिड हे तर संपूर्ण अभूतपूर्व असं जागतिक संकट होतं. त्यामुळे त्याकाळात इतर संस्थांप्रमाणेच महारोगी सेवा समितीकडे येणारा देणग्या जवळपास ५०-६० टक्क्यांनी कमी झाल्या. आनंदवन-सोमनाथ आणि लोकबिरादरी या प्रकल्पांना भेटी देणाऱ्या लोकांची संख्या घटली. कोव्हिड संपून परिस्थिती सुरळीत झाल्यावर देणग्यांचा ओघ सुरू झाला, पण तो पुन्हा पूर्वपदावर काही आला नाही.
महारोगी सेवा समितीला शेती आणि उद्योगातूनही उत्पन्न मिळतं. पण गेल्या दहा वर्षांत भारतातल्या शेतीला हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यातून आनंदवन-सोमनाथमधली शेतीही वाचलेली नाही. त्यातून मार्ग कसा काढायचा यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण उत्पन्न घटलं आहे आणि त्याचा फटका बसला आहे, हे तर खरंच. देशातल्या शेतकऱ्याची जी स्थिती आहे, तीच आनंदवनातल्या शेतीची आणि शेतकऱ्याचीही.
त्याशिवाय महारोगी सेवा समितीला निवासी कुष्ठरुग्णांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी सरकारकडून अनुदान मिळतं. तेही खूपच अपुरं आहे. आपल्याला प्रति कुष्ठमुक्त प्रति दिन ७० रुपये मिळतात, पण त्याचा प्रत्यक्ष खर्च येतो ३०० रुपये. तसंच निवासी अंध-कर्णबधिर-अपंग मुलांसाठी आपल्याला प्रति व्यक्ती प्रति दिन ५० रुपये अनुदान मिळतं आणि आपला खर्च आहे २४० रुपये. ही तफावत खूप मोठी आहे. शिवाय हे अनुदान प्रतिपूर्ती स्वरूपात मिळतं. म्हणजे आधी खर्च करावा लागतो, मग अनुदान येतं. पण हे अनुदानही आपल्याला २०१९पासून मिळालेलं नाही. त्यामागे सरकारचीही काही कारणं असतील. त्यांच्यासमोरचे प्रश्‍न आणखी गंभीर असतात. पण त्यामुळे आमच्यासारख्या संस्थांपुढे मोठाच पेच तयार होतो. दुसरीकडे दिवसेंदिवस महागाईही वाढत चालली आहे. त्यामुळे खर्चात सतत वाढच होते आहे.
अशा अनेक कारणांमुळे आनंदवन सध्या आर्थिक संकटात सापडलं आहे. अशा आणीबाणीसाठी साठवलेली सर्वच्या सर्व, साडे सोळा कोटींची पुंजीही गेल्या तीन वर्षांत ही तूट भरून काढण्यासाठी खर्ची पडली आहे. मागे संस्थेची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी कॉर्पस निधी उभारण्याची मोहीम उघडली होती. तेव्हा जवळपास ३८ कोटी रुपये उभे राहिले होते. नियमानुसार तो निधी आपल्याला खर्चासाठी वापरता येत नाही, फक्त त्याचं व्याज वापरलं जाऊ शकतं. पण त्या निधीमुळे संस्थेला एक सुरक्षितता लाभते. त्यामुळे कॉर्पसमध्ये सतत भर पडत राहणं गरजेचं असतं. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीमुळे त्या निधीतही पुन्हा भर पडू शकलेली नाही.
त्यामुळे सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्याही दानशूर व्यक्ती, कॉर्पोरेट कंपन्यांना आमच्या मदतीचा हात देण्याचं आणि आनंदवनाला या संकटातून बाहेर काढण्याचं आवाहन करतो आहोत. आनंदवन संकटात आहे, हे कळण्याचा अवकाश; आमचे हितचिंतक पाठिशी उभे राहतील, अशी आम्हाला खात्री आहे. या मित्रमेळाव्याचाही त्यासाठी उपयोग होईल, अशी आशा आहे.

पुढच्या पंचवीस वर्षांतल्या कामांचा संकल्प या मित्रमेळाव्यात मांडला जाणार आहे, असं तू म्हणालास. पुढच्या कामांची दिशा काय असेल?
कोव्हिड काळात आम्ही ‘मिशन आनंद सहयोग' नावाची एक मोहीम सुरू केली होती. आनंदवनाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी महाराष्ट्रभरातल्या दुर्गम वस्त्या-पाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे ६५०० किट वाटले. त्यावेळी या वस्त्या-पाड्यांवर एक सर्वेक्षणही केलं होतं. त्यातून समाजातल्या परिघावरच्या घटकांची परिस्थिती काय आहे, याचा अंदाज आम्हाला मिळाला. कोरोनासारखं कुठलंही संकट आलं की सगळ्यांनाच त्याचा फटका बसतो. पण हाता-तोंडाशी गाठ असणाऱ्यांच्या दृष्टीने त्याची दाहकता कितीतरी पटीने जास्त असते, हे त्यातून पुन्हा एकदा लख्ख समोर आलं. त्यामुळेच आम्ही असं ठरवलं, की एकीकडे आनंदवन-सोमनाथ-लोकबिरादरीमध्ये काम सुरूच राहील. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वंचित घटकांसाठी काम करण्यासाठी आनंदवनाबाहेर पडण्याची बऱ्याच काळापासून मनात असलेली इच्छा पुन्हा एकदा प्रबळ झाली. मागे २०१५-२०१६ मध्येही 'समाजभान अभियान' या नावाने आपण महाराष्ट्रातल्या इतर काही संस्थांच्या साथीने थोडंबहुत काम केलं होतंच. आता त्याचा आवाका वाढवावा आणि राज्यातल्याच, नव्हे तर देशातल्याही वंचितांसाठी काम करावं, असं ठरवतो आहोत. व्हील टू स्पोक अशी एक संकल्पना आहे. आनंदवन हे देशाच्या साधारणपणे मध्यभागी आहे. चाकाच्या मध्यापासून स्पोक्सपर्यंत मदतीचे, सद्भावनेचे धागे बांधले जावेत, अशी कल्पना आहे. माझे वडील, डॉ. विकास आमटे नेहमी म्हणतात, स्वप्नं पाहायची तर मोठी पाहा; कारण स्वप्नांवर कोणताही टॅक्स लागत नाही. एका अर्थाने बाबांचाही पिंड भव्य स्वप्न पाहून त्यासाठी झोकून देण्याचा होता. त्यामुळे आम्हा पुढच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांवरही तीच जबाबदारी आहे, असं आम्ही मानतो.
नेमकं काय करायचं याची ब्ल्यू प्रिंट हळूहळू उलगडत जाईल. पण समाजात अनेक प्रश्‍न आहेत आणि ते सोडवण्याचा अनुभव, सोडवण्याची इच्छा असलेले तळमळीचे कार्यकर्ते आनंदवनात आहेत. त्यामुळे एकीकडे त्यांच्या भरवशावर आम्ही या स्वप्नपूर्तीच्या दिशेने चालायला सुरुवात करतो आहोत. त्यात तुम्हा सर्वांची साथ गृहीत धरतो आहोत.

inside two


या मुलाखतीचा व्हिडिओही जरूर बघा. 

‘आनंदवन सद्भावना-सहयोग निधी'साठी योगदानाचे आवाहन

महारोगी सेवा समितीच्या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम अविरत सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी २५ कोटी रुपयांचा प्रचंड निधी आवश्यक असतो. ही रक्कम ‘आनंदवन सद्भावना-सहयोग निधी'च्या रूपात उभारण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. त्यासाठी जनता-जनार्दनास ‘आनंदवन सद्भावना-सहयोग निधी'त आर्थिक योगदान देत संस्थेच्या मानवाधिकार कार्याचे ‘सद्भावना-राजदूत' होण्याचं आग्रही आवाहन करत आहोत.

१) संस्थेच्या प्रकल्पांत पुनर्वसित प्रौढ कुष्ठमुक्त, तसंच अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, निराधार वृद्ध, परित्यक्ता, मानसिक व्याधीग्रस्त बांधव आणि भगिनी : १३७४

आपण ९००० रुपये योगदान देऊन एका बांधवाचा/ भगिनीचा आरोग्यसेवा, भोजन, निवास, कपडेलत्ते, इतर दैनंदिन गरजा आणि कौशल्य विकासातून आर्थिक पुनर्वसनाचा एक महिन्याचा खर्च उचलू शकता.

२) संस्थेच्या प्रकल्पांत निवासी कुष्ठमुक्त व इतर दिव्यांग जोडप्यांची मुलं-मुली : १४३

आपण ७५०० रुपये योगदान देऊन एका मुलाचा/ मुलीचा आरोग्यसेवा, भोजन, निवास आणि शिक्षणाचा एक महिन्याचा खर्च उचलू शकता.

३) विशेष शिक्षण/ व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संस्थेच्या प्रकल्पांत निवासी अंध, कर्णबधीर आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्रशिक्षणार्थी : ३०४

आपण ७२०० रुपये योगदान देऊन एका विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या/प्रशिक्षणार्थीच्या विशेष शिक्षणाचा/व्यावसायिक प्रशिक्षणाचा एक महिन्याचा खर्च उचलू शकता.

४) संस्थेच्या प्रकल्पांतर्गत ‘पूर्णतः विना-अनुदानित' माध्यमिक शाळा आणि कृषितंत्रविद्यालयात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी : १६०

आपण ५२५० रुपये योगदान देऊन एका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी/ विद्यार्थिनीच्या एक महिन्याच्या शिक्षणाला हातभार लावू शकता.

५) संस्थेच्या प्रकल्पांतर्गत शासकीय वेतनानुदानित प्राथमिक शाळा, विज्ञान-कला-वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, कृषी महाविद्यालय इथे शिकणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी-विद्यार्थिनी : ३४०५

आपण १८०० रुपये योगदान देऊन एका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी/ विद्यार्थिनीच्या एक महिन्याच्या शिक्षणाला हातभार लावू शकता.

अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी संपर्क : ९९२२५५०००६, kaustubh.amte@maharogisewasamiti.org

आपण आपले योगदान संस्थेच्या खालील बचत बँक खात्यात Cheque/ NEFT/ RTGS/ IMPS द्वारे जमा करू शकता.

A/c Name : Maharogi Sewa Samiti, Warora, A/c
No.: 048010100297165
Bank: Axis Bank Limited
Branch: Civil Lines, Nagpur
IFSC: UTIB0000048

योगदान जमा केल्यावर आपलं नाव, पूर्ण पत्ता, PAN आणि बँक व्यवहाराचे तपशील कृपया एसेएमस, व्हॉट्सॅप किंवा इमेलद्वारे आम्हाला कळवावेत, ही विनंती.

योगदान जमा करण्यासाठी क्यूआर कोड

anandwan qr code

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

विनोद 03.03.25
आशा संस्थांची खरोखर गरज आहे. शुभेच्छा..
See More

Select search criteria first for better results