भामरागड तालुक्यातील पाड्यापाड्यांमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध असावी, असा प्रयत्न आम्ही अनेक वर्ष करत आहोत. पण त्याला काही कारणांमुळे यश येत नव्हतं. आता गेल्या काही वर्षांपासून या प्रयत्नांची नीट घडी बसते आहे. त्यातून सामुदायिक आरोग्य कार्यक्रम आकारत आहे.
नव्याने बांधलेल्या आमच्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक सोई-सुविधा आहेत. वर्षभर तिथे पेशंटसचा राबता असतो. वेगवेगळ्या काळात वेगवेगळी शस्त्रक्रिया शिबिरं तिथे होत असतात. एकूणात मिळून वर्षभरात पन्नासेक हजार पेशंट्सवर इथे उपचार होतात. हे सगळं असताना पाड्यांवरच्या सामुदायिक आरोग्य कार्यक्रमाची गरज काय असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण भामरागड परिसरातील एकूण परिस्थिती पाहता हा कार्यक्रम हॉस्पिटलइतकाच गरजेचा आहे.
आम्ही १९७३ मध्ये हेमलकशात कामाला सुरुवात केली, तेव्हापासूनच गावागावांमध्ये आरोग्य केंद्रं असायला हवीत असं आम्हाला जाणवत होतं. गावपाड्यांना जोडणारे रस्ते नाहीत, वाहतुकीची साधनं नाहीत, खर्चायला खिशात पैसे नाही अशा अनेक कारणांमुळे स्वतः किंवा दुसऱ्या पेशंटला घेऊन लांबच्या दवाखान्यात जाणं हे आदिवासींसाठी किती जिकीरीचं आहे, ते आम्ही पाहत होतो. चार पेशंट आमच्याकडे येत, तेव्हा सहा मागेच राहिलेले असत, हे आम्हाला जाणवत होतं. या मागे राहिलेल्या पेशंट्सच्या उपचारांचं काय हा प्रश्न आम्हाला सतत पडत असे. शिवाय साध्या साध्या आजारांसाठी लोकांना प्रकल्पाच्या दवाखान्यापर्यंत यावं लागू नये, गावातल्या गावातच औषधं मिळावीत, असं आम्हाला वाटत असे. पण सुरुवातीच्या काळात मी आणि मंदा असे दोनच डॉक्टर होतो. कोण दवाखान्यात थांबणार आणि कोण गावांमध्ये जाणार हा प्रश्न होता. शिवाय जंगलाने वेढलेला अनोळखी परिसर, मराठी न समजणारे माडिया आदिवासी, प्राण्यांचा अन् नक्षलवाद्यांचा वावर अशी आव्हानं होतीच.
पण थोडी उसंत मिळाल्यावर मी आणि मंदाने एकेक करत आसपासच्या सहा गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरू केली. सुरुवातीला आम्ही गावागावांमध्ये जाऊन या केंद्रांसाठीची मशागत केली. नंतर आमच्या काही कार्यकर्त्यांना जुजबी औषधोपचारांचं प्रशिक्षण दिलं. या कार्यकर्त्यांना आम्ही एकेक दिवस एकेका गावात पाठवायचो. एक कार्यकर्ता दिवसभर एका गावात थांबायचा. शक्य असेल त्या आजारांवर औषधं देण्याचा प्रयत्न करायचा. तो प्रकल्पाच्याही सुरुवातीचाच काळ असल्याने लोक आपणहून त्यांच्याकडे जात नसत. कार्यकर्त्यांनाच घरोघरी हिंडून लोकांची विचारपूस करावी लागे. तसे ते करतही. पण तरीही आमचा हा प्रयत्न तितकासा यशस्वी ठरला नाही.
त्याला काही कारणं होती. एकतर जे कार्यकर्ते आदिवासी नव्हते, त्यांच्यासाठी नवखी आदिवासी गावं, नवखी भाषा आणि जंगलभाग या सगळ्याशी जुळवून घेणं अवघड होतं. शिवाय हे कार्यकर्ते नक्षलवाद्यांना औषधं देतात, असा संशय पोलिसांना वाटत असे. खरंतर त्यात अजिबात तथ्य नव्हतं. पण संशयापायी पोलिसांनी चौकशी करण्याचे, क्वचित प्रसंगी त्यांना मारहाण झाल्याचेही प्रसंग घडले. असे एक-दोन प्रसंग घडल्यावर कार्यकर्ते गावात जायला नकार देऊ लागले. त्यामुळे आवश्यकता आणि इच्छा असूनही हा प्रयोग मागे पडला.
काही काळ असाच गेला. कालांतराने आपल्याला आरोग्य केंद्रांची गरज आहे, हे प्रकल्पापासून लांब असणाऱ्या गावांना कळायला लागलं. त्यामुळे गावकरीच आमच्याकडे अशा केंद्रांची मागणी करू लागले. आदिवासींमधील आरोग्यभान वाढत असल्याची ती खूण होती. पण मागणी येताच तिची पूर्तता करण्याऐवजी दिगंत-अनघाने थोडा वेगळा विचार केला. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या गावातले कार्यकर्ते निवडा. आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ, औषधं देऊ, मानधन देऊ, दवाखान्याची व्यवस्था बघू, पण माणसांची निवड तुम्ही करा. हे केंद्र चालू राहील याची जबाबदारी तुमच्यावर असेल. आरोग्य केंद्र चालू ठेवायची असतील तर त्यावर हाच पर्याय होता. काही अपवाद वगळता बहुतेक गावांनी या योजनेला होकार दिला.
सुरुवातीला छत्तीसगढच्या सीमेजवळच्या दुर्गम भागात मिडदापल्ली, पेनगुंडा आणि घोटपाडी अशी तीन केंद्रं सुरू झाली. ज्यांना या केंद्रावर काम करायचं आहे ते किमान दहावी-बारावी शिकलेले असावेत आणि त्यांना मराठी नीट वाचता यायला हवं, एवढीच अपेक्षा होती. या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या इच्छुकांना दिंगत-अनघाने सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं. यातले पाच महिने प्रशिक्षण आणि हॉस्पिटलमधल्या कामाची ओळख-अनुभव, तर शेवटचा एक महिना पूर्ण प्रॅक्टिकल. हॉस्पिटल चालवत असताना असं प्रशिक्षण देणं, त्यांना केंद्रांवर पाठवणं, तिथल्या कामावर लक्ष ठेवणं, दर महिन्याला त्यांना प्रकल्पावर बोलवून त्यांच्या कामाचा फॉलो-अप घेणं, गरजेनुसार त्यांना आणखी प्रशिक्षण देणं वगैरे दिगंत-अनघासाठी तारेवरची कसरतच होती. पण त्यावेळी प्रकल्पावर असलेल्या तरुण डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी ही घडी बसवली.
आधी सुरू झालेल्या तीन केंद्रांनंतर जिंजगाव, मिरगुडवांचा आणि गोपनार अशी तीन केंद्र सुरू झाली. एक केंद्र साधारणपणे आसपासच्या चार ते पाच गावांसाठी काम करतं. आसपासचे पेशंट तिथे येतात आणि हे आरोग्यसेवकही वेळोवेळी या गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करतात. यातल्या प्रत्येक सेंटरमध्ये एक सामुदायिक आरोग्य सेवक काम करतो किंवा करते. त्यानुसार सर्व सेवकांची निवड गावाने एकमताने केलेली आहे. हे सेवक जवळपास १२०० घरांमधल्या ६५०० लोकांना आरोग्य सुविधा पुरवतात. एक केंद्र वर्षाला हजार रुग्णांवर उपचार करतं. सध्या या सहा केंद्रांमार्फत २६ गावांतील रुग्णांवर प्राथमिक उपचार होत आहेत.
ही केंद्रं गावातल्याच एखाद्या सोईच्या घरी चालवली जातात. त्या घराबाहेर तशी माहिती देणारा छोटासा बोर्ड लावला जातो. या आरोग्यसेवकांना प्रकल्पातर्फे मानधन दिलं जातं. ते सकाळ-संध्याकाळ ठराविक वेळ या दवाखान्यात बसतात. त्यांना बीपी तपासण्याचं यंत्र, सोलरवर चालणारा वजनकाटा, स्टेथोस्कोप, थर्मामीटर, ड्रेसिंगचं सामान अशा काही गरजेच्या गोष्टी दिलेल्या असतात. त्याशिवाय या भागात सतत मलेरियाचा उद्रेक होत असल्याने त्यांना रॅपिड डायग्नोस्टिक किटही देऊन ठेवलेलं असतं. अनघाने त्यांना मलेरिया, सर्दी-खोकला, हगवण, उलट्या, पोटदुखी, अंगदुखी, लहानसहान जखमा, फोड (खरूज, गजकर्ण) या सगळ्याचे चार्टसही बनवून दिले आहेत. कोणत्या आजाराची लक्षणं कोणती, त्यानुसार औषधाचा डोस कसा ठरवायचा, हे त्यात लिहिलेलं असतं. ते चार्टस पाहून त्याप्रमाणे ते तिथल्या तिथे औषधं देऊ शकतात. कोणते पेशंट्स कधी आमच्याकडे पाठवायचे हेही त्यांना सांगून ठेवलेलं असतं. दोन-तीन दिवसांच्या वर ताप येताना दिसला, लक्षणं वाढताना दिसली तर त्या पेशंटला सरळ प्रकल्पावरच्या दवाखान्यात पाठवायचं, अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात.
ही सगळी सिस्टीम उभी करण्याचं काम अनघा आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. आम्ही अनेकदा तरुण डॉक्टरांना काही काळासाठी हेमलकशात येऊन इथल्या वैद्यकीय सेवेचा अनुभव घेण्याचं आवाहन करत असतो. हे डॉक्टर्सही अनेकदा मोलाचं काम करून जातात, असा आमचा अनुभव आहे. सामुदायिक आरोग्य केंद्रांचं काम वाढवण्यात दिगंत-अनघाला अशा अनेक डॉक्टरांनी मदत केली आहे.
सोलापूरची डॉ. निलोफर बिजली २०१७ ते २०१९ या काळात हेमलकशात मुक्कामी होती. तिने आरोग्य केंद्रांची घडी बसवण्यात मोठा हातभार उचलला. इगतपुरीची डॉ. प्राजक्ता जोशी ही २०२० ते २०२२ या काळात आरोग्य केंद्रांसाठी काम करून गेली. नागपूरचा डॉ. आदित्य बुरीले हा मूळचा डेंटिस्ट. त्याने काही काळ इथल्या डेंटल युनिटमध्ये काम केलं होतं. पण त्याला आरोग्य क्षेत्रात त्यापलीकडे काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे त्याने 'पब्लिक हेल्थ'मध्ये मास्टर्स केलं. तो २०२१ मध्ये पुन्हा प्रकल्पावर आला. तेव्हापासून तो इथेच काम करतो आहे. आरोग्य केंद्रांबरोबरच डॉ. आदित्य स्कूल हेल्थ अवेअरनेस प्रोग्रॅमअंतर्गत शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दलही जागरूक ठेवत असतो.
दिगंत-अनघाने या आरोग्य सेवकांना खास रेफरल-स्लिप्स बनवून दिलेल्या आहेत. त्यावर मराठीमध्ये नोंदी कशा लिहायच्या हेही त्यांना शिकवलं आहे. 'अमुक औषध इतके दिवस दिलं आहे; पण अजूनही ताप जात नाहीये;त्यामुळे तुमच्याकडे पाठवत आहे.' अशा नेमकेपणाने नोंदी लिहून ही मंडळी पेशंट्सना प्रकल्पावर पाठवतात. कसलेले डॉक्टर्सही लिहिणार नाहीत इतक्या व्यवस्थितपणे हे काम होतं. दर महिन्याला प्रत्येक आरोग्यसेवक साधारण शंभर पेशंट्स तपासतो. त्यातल्या पंचाण्णव टक्के पेशंट्सवर तिथल्या तिथे उपचार होतात. याचा अर्थ जेमतेम पाच टक्के पेशंट्सच प्रकल्पावर पाठवले जातात. दर महिन्याच्या शेवटी दोन दिवस त्या सर्व आरोग्य सेवकांना हेमलकशाला बोलावलं जातं. त्यांच्याशी संवाद साधला जातो. कामांची-डूज अँड डोंट्सची उजळणी होते. एकमेकांच्या अनुभवांवरून त्यांना शिकायला मिळतं. कुणाच्या शंका असतील तर त्या सोडवल्या जातात. या पद्धतीमुळे आरोग्यकेंद्रं व्यवस्थित चालण्याचा मार्ग सुकर होतो.
औषधोपचारांच्या पलीकडे आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीही या केंद्रांमार्फत बरेच प्रयत्न होताहेत. या केंद्रांमध्ये प्रकल्प समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक 'सामुदायिक आरोग्य जागरुकता' सभा भरवतात. सगळ्या गावकऱ्यांना या सभेचं आमंत्रण असतं. गावांत जागरुकता वाढवण्यासाठी मलेरिया आणि त्याचा प्रतिबंध, अशुद्ध पाण्यामुळे पसरणारे रोग आणि त्यांचा प्रतिबंध यासारख्या विषयांवर चर्चा केली जाते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही पल्ली आणि जिंजगावला पाणी शुद्धीकरणाची उपकरणंही दिली आहेत. या प्रयत्नांचं आणखी एक चांगलं उदाहरण म्हणजे 'हात धुण्याचं यंत्र.' हे यंत्र केंद्रात बसवण्यात आलं आहे. लवकरच प्रत्येक घरात हे यंत्र बसवलं जाणार आहे.
सर्पदंश हाही आमच्या इथला नेहमीचा धोका. कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी याची नीट माहिती नसल्यामुळे सर्पदंश झाल्यावर घबराट पसरते. शिवाय बिनविषारी सापांचा हकनाक बळी जातो ते वेगळंच. म्हणूनच या केंद्रांवर विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक दाखवणाऱ्या चित्रांचा संच ठेवलेला आहे. त्यामुळे कुठलाही साप चावल्यावर पॅनिक होण्याचे प्रकार घडत नाहीत आणि साप विषारी असेल तर त्या पेशंटला झटपट उपचार मिळतात.
या आरोग्य केंद्रांचा उपयोग अनेक मार्गानी होत असतो. त्यातलं एक उदाहरणं सांगतो. आमच्या भागात मलेरिया जणू पाचवीलाच पुजलेला आहे. पावसाळ्यात हा आजार बराच बळावतो. तुलनेने उन्हाळ्यात मलेरियाचं प्रमाण कमी असतं. पण २०२३ च्या एप्रिलमध्ये बेजूर या गावातून जो कुणी येईल तो मलेरिया पॉझिटिव्ह निघत होता. हे बघून दिगंतने डॉ. आदित्यला या गावात पाठवलं आणि ताप असो नसो सगळ्यांना तीन आठवडे क्लोरोक्विनच्या गोळ्या घ्यायला लावल्या. त्यामुळे त्या गावातून येणारे मलेरियाचे पेशंट्स थांबले. साथ वेळीच आटोक्यात आली.
त्यानंतर आम्ही आमच्या सगळ्याच आरोग्य केंद्रात हा प्रतिबंधात्मक उपाय राबवायला सुरुवात केली. पावसाळ्याच्या आधी क्लोरोक्विनच्या भरपूर गोळ्या आणून ठेवायच्या आणि तीन-चार किंवा गरज वाटलीच तर पाच आठवड्यांचा कोर्स सर्वांना करायला लावायचा. प्रतिबंध हाच मलेरियावर एकमेव उपाय असल्यामुळे तेवढा एकच मार्ग होता. गावोगावी आमची आरोग्य केंद्रं असल्यामुळेच तो राबवणं शक्य झालं, हे उघड आहे.
या आरोग्यसेवकांना तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करून देता येईल, यावरही दिंगत-अनघाचा विचार सुरू असतो. एकदा आमचे स्नेही हरीश जाखेटे यांच्यासोबत त्यांचे मित्र भावेश ठक्कर प्रकल्प बघायला आले. ते चौगुले मेडिकन्सल्ट या कंपनीचे उपाध्यक्ष. त्यांनी आमची गरज पाहून खास आमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स सिस्टीम तयार करून दिली. त्यामुळे या सर्व गावांमधल्या डेटाच्या नोंदी ठेवणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याचा उपयोग पुढच्या उपचारांची दिशा ठरवणं यासाठी करता येऊ लागला. मी आणि मंदाने ज्या अपुऱ्या साधनांनिशी आणि जवळपास तंत्रज्ञानविरहीत काळात कामाला सुरुवात केली, ते पाहता हे सगळे प्रयोग आम्हाला क्रांतिकारीच वाटतात.
खेड्यापाड्यांतील डॉक्टर जसे प्राथमिक उपचार करतात, तसेच हे आरोग्य सेवक काम करत असले तरी ते डॉक्टर नव्हेत, याची स्पष्ट कल्पना आम्ही गावकऱ्यांना दिलेली आहे. डॉक्टरांना जे शिकायला सहा वर्षं लागतात, ते दहावी-बारावी पास तरुणांना सहा महिन्यांत शिकवणं शक्य नसतं. त्यामुळे या आरोग्य सेवकांना आजार आणि त्यांवरची औषधं यांची अगदी प्राथमिक माहिती दिली जाते. औषधंही अगदी प्राथमिक असतात. पण तरीही निदान करताना किंवा औषध देताना त्यांच्या हातून चूक होऊ शकते. क्वचित गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते, हेही गावकऱ्यांना सांगितलेलं असतं. हे सर्व मान्य असेल तरच आरोग्यकेंद्र सुरू करूयात, असं गावकऱ्यांना सांगून केंद्र सुरू केलेलं असल्याने आरोग्य सेवकांबद्दलच्या तक्रारींचं प्रमाण खूप कमी आहे. हीच सूचना आरोग्य सेवकांनाही केलेली असते. जेवढं शिकवलं आहे, ते आणि तेवढंच करायचं; त्याबाहेरचं काहीही करायला जायचं नाही, असं त्यांना बजावलेलं असल्याने सगळे आरोग्य सेवक सूचना तंतोतंत पाळतात.
दिगंत-अनघा किंवा इतर कार्यकर्ते गावांमध्ये जाऊन आरोग्य सेवकांबद्दल चौकशी करतात, तेव्हा त्यांचा प्रतिसाद उत्तम असतो. या केंद्रांचा आम्हाला खूप फायदा होतो, असं गावकरी एकमुखाने सांगतात. गेल्या तीन-चार महिन्यांत तुमच्यापैकी किती जणांनी केंद्रावर जाऊन तपासून घेतलं असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांचे हात वर येतात. मी आणि मंदा प्रत्यक्ष या कामात नसलो तरी जेव्हा जमेल तेव्हा या मंडळींचे असे अनुभव ऐकायला खूप आवडतं. त्यापैकी काही अनुभव तुम्हालाही सांगायला हवेत.
या आरोग्यसेवकांपैकी एक मुलगी पाली. दहावीपर्यंत शिकलेली. ती पेनगुंडा गावात काम करते. तिच्याकडे पाहिलं तर ही आरोग्य सेवक असेल आणि वर्षभरात हजारेक लोकांवर उपचार करत असेल हे सांगूनही खरं वाटणार नाही. पण ती एखाद्या डॉक्टरच्या सफाईने काम करते. या कार्यकर्त्यांना आम्ही जे चार्टस करून दिले आहेत, त्यांत लहान बाळाच्या वजनाचे चार्टसही असतात. कारण बाळांचे औषधांचे डोस त्यांच्या वजनानुसार ठरवावे लागतात. त्या चार्टनुसार २.५ ते ५.० किलो वजनाच्या बाळाला अमुक इतका डोस द्यायचा; असं वाचून त्याप्रमाणे औषधं देणं अपेक्षित असतं. सुरुवातीला ते चार्टस वाचताना पालीचा गोंधळ उडायचा. चार्टमध्ये तीन हा आकडा लिहिलेला नसल्याने तीन किलो वजनाचं बाळ आलं तर त्याच्या औषधासाठी कोणता रकाना पाहायचा ते तिला समजायचंच नाही. तिच्यासारखे इतरही काही होते. मग त्यांना दशमान पद्धत, नंबर लाईन इथपासून सगळं दाखवून, शांतपणे समजावून देण्याचं काम करावं लागलं. पाली ते नेटाने ऐकायची. मला शिकायचंच आहे, असं म्हणायची. हे सगळं शिकण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले. आता सहा केंद्रांमध्ये सर्वात जास्त पेशंट्स तिच्याकडे असतात आणि त्या सर्वांच्या नोंदी ती उत्तमरीत्या ठेवते.
मेडगापल्ली गावची सुनीताही अशीच. तीही खूप चांगलं काम करते आहे. मध्यंतरी तिचं लग्न ठरलं. तिचा नवरा एटापल्लीचा होता. ती आता गावातून जाणार म्हटल्यावर आमच्या डॉक्टरांनी मीटिंग घेऊन गावकऱ्यांना दुसरा आरोग्य कार्यकर्ता शोधायला सांगितलं. या मीटिंगला सुनीता आणि तिचा होणारा नवरा असे दोघेही होते. मीटिंगमध्ये चाललेली चर्चा ऐकून सुनीता किती महत्त्वाचं काम करते आहे, हे तिच्या नवऱ्याला कळलं. तिने गाव सोडलं तर गावाचं नुकसान होईल, हेही त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने निर्णय घेतला आणि सुनीताला आपल्या गावी घेऊन जाण्याऐवजी तोच मेडगापल्लीला रहायला आला. त्याच्या या निर्णयामुळे नवीन कार्यकर्ता शोधून पुन्हा त्याचं प्रशिक्षण करण्याचं काम वाचलं. गावाला त्याचा फायदा झाला. आदिवासींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता तयार होते आहे, याचं हे आणखी एक उदाहरण.
हे आरोग्य केंद्रांचं मॉडेल हळूहळू गावकऱ्यांच्या अंगवळणी पडतं आहे. गावातले ९५ टक्के पेशंट्स गावातच बरे होत असल्याने प्रकल्पातल्या दवाखान्यावरचा ताण तर कमी झाला आहेच, शिवाय आजारांचं निदान वेळेत होऊ लागलं आहे. त्यामुळे एकूण आजारांचं प्रमाण घटलं आहे आणि आजाराने गंभीर वळण घेण्याचं प्रमाणही कमी झालं आहे.
दिगंत-अनघाने अलीकडच्या काळात हॉस्पिटलबाहेर वाढवलेला आणखी एक उपक्रम म्हणजे 'स्कूल हेल्थ अवेअरनेस प्रोग्रॅम' (शेप). इतर ठिकाणांप्रमाणे आमच्याकडेही किशोरवयीन मुलांचे अनेक प्रश्न लक्षात येत होते. या मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज जाणवू लागली होती. फक्त आमच्या शाळेतच नव्हे, तर भामरागड तालुक्यातल्या सगळ्याच शाळांमध्ये हा प्रयत्न करणं गरजेचं होतं. सुरुवात केल्यावर असं जाणवलं की मुलांना केवळ एकतर्फी माहिती देण्यापेक्षा ऑडिओ-व्हिज्युअलच्या संवादी माध्यमातून काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जास्त सोपं जाईल. पण लैंगिक शिक्षणावरच्या मराठीतल्या फिल्म्स अगदी प्रमाण शहरी भाषेत होत्या. ती भाषा आमच्या मुला-मुलींना कळायची नाही, आपली वाटायची नाही. शिवाय शहरी प्रश्न वेगळे आणि इथले प्रश्न वेगळे. हा सगळा विचार करता दिगंत आणि अनघाने स्वतःच दोन छोट्या फिल्म्स करायच्या असं ठरवलं. मुलगी वयात येताना आणि मुलगा वयात येताना अशा या दोन फिल्म्स त्यांनी चक्क माडिया भाषेत तयार केल्या. आमच्या शाळेतल्या मुलांनीच त्यात काम केलं. ही गोष्ट २०१४ ची. त्यावेळी आमच्या प्रकल्पावर कलाशिक्षक असलेला मिलिंद भागवत आणि डेंटिस्ट म्हणून आलेला डॉ. मयूर मुन्ने या दोघांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या फिल्म्सचा मुला-मुलींशी संवाद साधण्यासाठी खूप उपयोग झाला.
लैंगिक शिक्षणाबरोबरच या उपक्रमात वैयक्तिक स्वच्छता, मुलींच्या बाबतीत मासिक पाळीतली स्वच्छता आणि त्याअनुषंगाने येणारे शारीरिक- मानसिक प्रश्न हाताळले जातात. पब्लिक हेल्थमधील कोणी ना कोणी तरुण डॉक्टर आता प्रकल्पावर असतोच. त्याच्या मदतीने हा उपक्रम राबवला जातो.
अनेकदा शारीरिक-मानसिक समस्यांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. अगदी साधं उदाहरण घेतलं तर एखाद्या मुलाला शाळेत फळ्यावरचं अस्पष्ट दिसू लागतं. त्यामुळे त्याचा शिकण्यातला रस संपतो. त्या मुलावर 'ढ' असण्याचा शिक्का बसतो किंवा तो मुलगा शाळा सोडून देतो. शाळांमध्ये डोळे तपासण्याची सोय नसल्यामुळे हे घडतं. 'शेप'च्या माध्यमातून मुला- मुलींशी संवाद वाढल्यामुळे असे अनेक प्रकार वेळीच समोर येतात. मुलांचं शिक्षण सुरळीत सुरू राहतं. त्यांना अधिक मोकळेपणाने जगायला मदत होते.
अनघाने मला सांगितलेलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मध्यंतरी मेन्स्ट्रुअल हायजिन दिनानिमित्त या उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित केली गेली होती. त्यात मुलींनी स्वतःच्या मनाने उत्स्फूर्तपणे आपलं म्हणणं, मतं मांडली. एका मुलीने तर द्रौपदी वस्त्रहरणाचा संदर्भ देऊन असा प्रश्न विचारला की, 'द्रौपदी रजस्वला असताना कृष्णाने तिला वस्त्र पुरवलं होतं. याचा अर्थ देवाला तिच्या जवळ जाण्यात काही अडचण नव्हती. असं असेल तर मुलींना पाळीच्या काळात देवाजवळ जायला आडकाठी का?' एवढा तार्किक प्रश्न इथल्या मुलीच्या मनात येणं आणि तिने तो मोकळेपणाने मांडणं हे या उपक्रमाचं यशच म्हणायचं. त्यामुळे हा उपक्रम हॉस्पिटलमधल्या कामाइतकाच महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं.
हे सगळं काम व्यापून उरणारं आहे, पण तरीही कम्युनिटी हेल्थ सेंटर्सच्या बाबतीत आणखी बराच मोठा पल्ला गाठण्याची दिगंत-अनघाची इच्छा आहे.
या आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणं हा त्यातला एक भाग झाला. त्याशिवाय आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून एएनसी (म्हणजे मूल गर्भात असण्याच्या काळातील काळजी) आणि चाइल्ड क्लिनिक्सही सुरू झाली आहेत, ती वाढवण्याचं नियोजन आहे. या क्लिनिकमध्ये दर महिन्याला गरोदर महिलांची तपासणी केली जाते. नवजात बाळांच्या आरोग्याचीही सुरुवातीपासून देखभाल घेतली जाते. भामरागड तालुक्यात मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण कमी नाही. पण ते नेमकं कोणत्या स्वरूपाचं आणि किती गंभीर आहे, त्यावर उपाय काय याचा विचार योग्य माहिती हातात असल्याशिवाय करता येणार नाही. ही क्लिनिक्स ती माहिती मिळवण्याचं काम करतील, अशी पुढची योजना आहे. त्यातून कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्याचा मार्ग दिसेल, अशी आशा आहे.
अर्थात, भामरागडसारख्या ठिकाणी आरोग्यक्षेत्रात सतत नवी आव्हानं समोर येत असतात. कितीही कामं केली तरी ते पुरेसं ठरत नाही. त्यामुळे आरोग्यसेवेची ही मशाल नव्या पिढीला सतत पुढे नेत रहावी लागणार आहे.
