आम्ही कोण?
अनुभव 

होय, सापही आमचे सोयरेच

  • डॉ. प्रकाश आमटे
  • 17.07.25
  • वाचनवेळ 21 मि.
ranmitra

पाळीव प्राणी म्हटलं की कुत्रा, मांजर, फार तर एखादा पक्षी, इथपर्यंतच बहुतेकांची मजल जाते. त्यामुळे इतर प्राण्यांना घरी ठेवण्याचा, त्यांना जवळ घेण्याचा विचार फारसा कुणी करू शकत नाही. आमच्याकडे मी, विलास, माझा मुलगा अनिकेत, नातू अर्णव आणि इतरही काहीजण बिबट्यासकट सगळ्या प्राण्यांना जवळ घेतात, त्यांचे लाड करतात, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. आमच्यासाठी जसा बिबट्या किंवा अस्वल तसेच सापही. पण मी सापांना जवळ घेतलं की लोक म्हणतात, एक वेळ बिबट्याच्या जवळ जाणं समजू शकतं, पण सापावर माया करणं आणि त्याला जवळ घेणं हे काही तरी विचित्रच. मी त्यांच्या भावना समजू शकतो. लोकांना सापाची जबरदस्त भीती असते. त्यामुळे साप दिसला की त्याला मारणं, हीच लोकांची पहिली प्रतिक्रिया असते. तो विषारी आहे का बिनविषारी, त्याने आपल्याला खरंच त्रास दिला आहे का याचा विचार कुणीच करत नाही. पण मला सापाची कधी भीती वाटली नाही. साप पकडताना मी सावध जरूर असतो, पण मनात भीती मात्र नसते. मला वाटतं, लहानपणापासून मी खूप साप बघत आलोय, त्यामुळे तसं झालं असावं.

आमचं लहानपण ज्या ‘आनंदवनात' गेलं ते म्हणजे पूर्वीचं जंगलच. आजूबाजूला फारशी वस्तीही नव्हती. त्यामुळे आमच्याकडे तेव्हा खूप साप निघायचे. सापांबरोबर विंचू, इंगळी हेही आमचे साथी-सोबती होते. अर्थात, साप दिसला की मारायचा, हा प्रकार तिथेही चालायचाच. शिवाय, आमच्या लहानपणी सापाचे खेळ करून दाखवणारे गारुडीही तिथे यायचे. त्यात विषारी सापांचे दात काढलेले असायचे. ही दात काढण्याची पद्धत फारच क्रूर होती. पण आनंदवनात गोखले नावाचे एक कुष्ठरोगी होते. त्यांना सापाच्या जातींबद्दलचं चांगलं ज्ञान होतं. त्यांनीच पहिल्यांदा साप मारण्याऐवजी ते पकडायला सुरुवात केली. त्यांचं बघून मग हेमलकशाला आल्यावर मीही साप पकडायला लागलो. मग अनुभवातून हळूहळू विषारी आणि बिनविषारी सापांमधला फरक ओळखता येऊ लागला.

ranmitra

पुढे हेमलकशाला आल्यावर तर साप हे आमचे नित्याचेच सोबती झाले. कारण जंगल तोडूनच हा प्रकल्प उभा राहिला होता. आमच्या आसपास सर्वत्र जंगलच होतं. त्यामुळे सापांचा वावर इथे कायमच असायचा. आश्चर्य म्हणजे इथल्या आदिवासींनाही सापाची भीती वाटायची. साप चावल्यावर गर्भगळित होणं आणि साप दिसताच मागचा-पुढचा विचार न करता त्याला मारून टाकणं, अशीच त्यांची प्रतिक्रिया असायची.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. हेमलकशाला आल्यावर आमच्याकडे साप चावल्याची केस आली होती. तो माणूस बेशुद्धच होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता. साप विषारी असो की बिनविषारी असो, तो चावल्यावर ‘फेस येणं' वगैरे परिणाम बऱ्याचदा एकसारखेच असतात. त्यामुळे त्याच्यावरून सापाचा प्रकार कळणं कठीण असतं. प्रत्यक्ष साप बघूनच ती खात्री करावी लागते. आमच्याकडे आणलेल्या माणसाला साप चावल्यानंतर बाजूच्या लोकांनी त्या सापाला मारून टाकलं होतं. मी इंजेक्शन तयार करतच होतो. काय वाटलं कुणास ठाऊक, मी म्हटलं, “घेऊन या तो साप. तो कोणता आहे ते तरी बघू या.” बाकीचे लोक जाऊन साप घेऊन आले. तो मांडूळ जातीचा साप होता आणि हा साप बिनविषारी असतो. तो माणूस बेशुद्ध झाला होता ते आपल्याला साप चावलाय या भीतीनेच. त्याला इंजेक्शनची गरजच नव्हती. त्यामुळे मी काही त्याला इंजेक्शन दिलं नाही. पण तरी इंजेक्शन वाया गेलंच, कारण हे इंजेक्शन डिस्टिल वॉटरमध्ये पावडर टाकून तयार केलेलं असतं आणि ते मिश्रण पुन्हा वापरता येत नाही. आधीच आमच्याकडे औषधांचा तुटवडा असायचा. अशा वेळेस असली नासधूस परवडायची नाही. त्यामुळे आम्हाला त्याचं वाईट वाटलं, पण त्याचबरोबर तो बिचारा साप हकनाक मेल्याचं दु:ख त्याहून मोठं होतं.

साप विषारी की बिनविषारी हे न कळल्याने असे प्रकार सर्रास होतात. खरं तर सापांमध्ये प्रमुख चारच प्रकारचे साप विषारी असतात. पहिला नाग. त्याच्या फण्यामुळे तो ओळखणं सगळ्यात सोपं आहे. त्याला डिवचलं तरच तो फणा काढतो आणि फूत्कार टाकतो. हे तो त्याच्या बचावासाठी करतो. पण त्याने फणा काढला आणि फूत्कार टाकला, की तो अंगावर धावून येईल असं आपल्याला वाटतं. नाग किंवा कुठलाही साप त्याच्या अंगावर पाय पडला तरच चावतो. थोडक्यात, तुम्ही अजाणतेपणी का होईना, त्याच्या वाटेला गेलात तर त्याच्यावरची त्याची ही प्रतिक्रिया असते. अन्यथा तो कुणाच्या वाट्याला जात नाही.

आपल्याकडे आढळणारा दुसरा विषारी साप म्हणजे मण्यार. मण्यार नागापेक्षाही विषारी असते. हा साप काळ्या रंगाचा असतो. त्यावर पांढरे पट्टे असतात. मण्यार शक्यतो रात्री बाहेर पडतो. म्हणून आदिवासी याला नरकाकल्ले, म्हणजे रात्रीचा चोर म्हणतात. आमच्या भागातील आदिवासी अजूनही बऱ्याचदा घराच्या बाहेर जमिनीवर झोपतात. झोपेत मण्यार अंगाखाली आला किंवा कूस बदलताना त्याच्यावर हात पडला तर तो चावण्याची शक्यता वाढते. रात्री झोपेत मण्यार चावल्याचं पटकन कळत नाही, आणि मध्ये वेळ गेला की मग त्या माणसाला वाचवणं कठीण होऊन बसतं. तिसरा विषारी साप म्हणजे घोणस. त्रिकोणी तोंडाचा हा साप खूप आक्रमक असतो. त्याच्या अंगावर विशिष्ट गोलाकार ठिपक्यांचं डिझाइन असतं. घोणसाचे विषाचे सुळे (विषदंत) मोठे असतात. नाग आणि मण्यारीचे सुळे त्यामानाने बारीक असतात. त्यामुळे घोणसाचा दंश झाला तर विष जास्त प्रमाणात शरीरात टोचलं जातं. खरं तर तो नाग आणि मण्यारीपेक्षा कमी विषारी असतो, पण मोठ्या सुळ्यांमुळे तो जास्त विष आत सोडतो. या घोणस सापानेच मला २००४ साली दंश केला होता. चौथा विषारी साप म्हणजे फुरसं. हा साप आकाराने छोटा असला तरी चांगलाच विषारी असतो. कोकणात हा मोठ्या प्रमाणात आढळतो. हे चार साप ओळखण्याचं तंत्र आत्मसात केलं तर सापांना घाबरण्याची गरज नाही. बाकीचे साप ओळखता आले नाहीत तरी चालतं, कारण ते सारे बिनविषारी आणि त्यामुळे निरुपद्रवी असतात.

बँडेड क्रेट किंवा पट्टेरी मण्यार हाही अतिशय विषारी साप आहे, पण तो भारतात किंवा महाराष्ट्रात फारसा आढळत नाही. गडचिरोलीच्या सीमाभागात मात्र तो सापडतो. असं म्हणतात, की हा साप नागाच्या सोळा पट विषारी असतेो. आपल्याकडे त्याचं प्रमाण कमी असल्याने त्याच्या विषावरची लसही इथे उपलब्ध नाही. तो थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने तिथेच त्याची लस मिळते. अर्थात तो इतका विषारी आहे, की तो चावला तर लस मिळेपर्यंत माणूस जगणं कठीणच असतं. आमच्याकडे आतापर्यंत हा साप चावल्याची एकच केस आली होती. त्याची लस नसल्याने तो माणूस वाचू शकला नाही. पण आश्चर्य म्हणजे दवाखान्यात आणेपर्यंत तो माणूस जिवंत होता, आणि त्याने स्वतःच आपल्याला बँडेड क्रेट चावल्याचं आम्हाला सांगितलं होतं.

सापांची थोडीफार माहिती असेल तरी बँडेड क्रेट ओळखता येऊ शकतो. हा काळ्या-पिवळ्या रंगाचा चमकदार पट्टेरी साप आहे. त्यामुळे तो अंधारातही चटकन दिसतो. तो अतिविषारी असला तरी अगदी संथ असतेो. निसर्ग कसा समतोल साधतो पाहा. हा साप प्रचंड विषारी, पण अंधारातही दिसतो. शिवाय त्याच्या संथ हालचालींमुळे तो पाठलाग करू शकत नाही, त्यामुळे माणसांनाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही त्याच्यापासून जीव वाचवणं शक्य होतं.

सर्पदंशाच्या खुणांवरून चावणारा साप विषारी आहे की नाही हे क्वचितच कळतं. तो अगदी व्यवस्थित चावला तर दोन छिद्रं दिसतात. पण तो खाण्याच्या दातांनीही चावू शकतो. बऱ्याचदा तो घाईघाईत चावतो. शिवाय आपल्या काळ्यासावळ्या त्वचेवर दातांच्या खुणा स्पष्ट दिसणं कठीण असतं. त्यामुळे साप चावलेल्या माणसाला तो साप विषारी होता की नाही हे ओळखता आलं तर त्याचा उपचारांसाठी उपयोग होतो.

ranmitra

हेमलकशाच्या जंगलात साप हा आम्हाला लाभलेला कायमचा शेजार असल्यामुळे विषारी-बिनविषारी सापांमधला फरक ओळखणं आमच्यासाठी आवश्यकच होतं. सुरुवातीला ते कठीण गेलं. इथले आदिवासी विषारी-बिनविषारी सापांतला फरक ओळखू शकायचे, पण त्यांच्याकडून शिकणार कसं? त्यांची भाषा आम्हाला कुठे येत होती? ‘स्नेक्स ऑफ इंडिया' नावाचं एक पुस्तक माझ्याजवळ होतं. ते पुस्तक वाचून मी साप ओळखायला शिकलो. अर्थात मुख्य शिक्षण झालं ते अनुभवातूनच. जंगलातून सतत आम्हाला भेटायला येणाऱ्या सापांनी जणू आमच्याकडून सरावच करून घेतला! विशेष म्हणजे माझ्याबरोबर माझे सहकारी आणि आमच्या शाळेतली मुलंही विषारी साप ओळखायला आणि नंतर ते पकडायलाही शिकली. त्यामुळे साप दिसला की त्याचा जीव घेणं जवळपास बंद झालं. सापाला पकडून पुन्हा जंगलात सोडण्याची कला आमच्यापैकी बऱ्याच-जणांना अवगत झाली. मग आजूबाजूच्या गावांमध्ये साप आढळला की त्याला पकडण्यासाठीदेखील आम्हाला बोलावणी यायला लागली. बोलावणं आलं की डॉक्टर चालले साप पकडायला! डॉक्टरकीबरोबर सर्पमित्राचं कामही मी करू लागलो. कधी कधी माझे इतर सहकारीही साप पकडायला जायचे. साप जिवंत राहावा आणि साप मारण्याऐवजी त्याला पकडून पुन्हा जंगलात सोडण्याची सवय आदिवासींना लागावी, हाच त्यामागचा हेतू होता. या प्रयत्नांमुळे आमच्या भागातील आदिवासींमध्ये साप मारण्याचं प्रमाण काही प्रमाणात कमी झालं आहे. अगदी विषारी सापालाही आम्ही न मारता जंगलात सोडतो. कारण विषारी सापही विनाकारण चावत नाही याची आम्हाला खात्री असते. अर्थात, साप पकडताना आम्ही नेहमीच काळजी घेत आलो आहोत. कारण अपघात कुठेही, कसेही घडू शकतात. आणि विषारी सापाने त्याच्या बचावासाठी दंश केला म्हणून आपल्याला त्रास होणार नाही, असं नसतं. आमच्या प्रकल्पावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन नेहमीच असतं. हे इंजेक्शन फ्रिजबाहेरही पाचेक वर्षं राहू शकतं हा मोठा फायदा होता, अन्यथा सुरुवातीच्या काळात वीज नसताना आमचा निभाव कसा लागला असता?

‘साप पकडायचा कसा' याचंही एक तंत्र आहे, आणि ते इतरांचं बघून किंवा स्वत: थोडा अंदाज घेतला की बरोबर जमतं. सापाला कधीही शेपटीकडून पकडायचं नसतं. कारण शेपटी पकडली तर तो वेगाने वळून पकडणाऱ्याला चावू शकतो. त्यामुळे मान वळवता येणार नाही अशा रीतीने त्याला पकडावं लागतं. मानेखाली चार बोटं आणि डोक्यावर अंगठा ठेवून त्याची मान पकडली, की तो काही केल्या वळू शकत नाही की आपल्याला चावूही शकत नाही. मग तो जागच्या जागी वळवळ करत राहतो. अशा वेळेस दुसऱ्या हाताने शेपूट पकडणं चांगलं. म्हणजे मग तो आपल्या हाताला शेपटीचा विळखाही घालू शकत नाही. अर्थात हे सगळं सवयीनेच जमत जातं. अशा सरावामुळेच मी आता ब्रँडेड क्रेटसारखा अतिविषारी सापही सहज हातात धरू शकतो. जेव्हा मी साप पकडायला शिकलो तेव्हा सराईतपणे साप पकडण्यात मोठं थ्रिल वाटे मला. त्यामुळे साप पकडण्यासाठी आम्ही मोठ्या उत्साहाने चालू पडायचेो. हातात काठी आणि टॉर्च. साप दिसला की आधी त्याला मान धरून पकडायचं. मग तो कुठला साप आहे, विषारी की बिनविषारी हे पाहायचं आणि पोत्यात घालून लांब सोडून यायचं, असा आमचा उपक्रम चाले.

सापांशी अशी जानपेहचान झाल्यावर मग काही काळाने आम्ही पकडलेल्या सापांपैकी काही साप प्रकल्पावर ठेवायला सुरुवात केली. आदिवासींचे आणि शहरी माणसांचेही सापांबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, हाच त्यामागचा हेतू होता. अर्थात प्राण्यांसाठीचं आमचं बजेट आधीच कमी होतं. त्यामुळे किती साप पदरी बाळगायचे याला मर्यादा असायची. पण तरीही वेगवेगळ्या प्रकारचे साप आमच्या अनाथालयात राहून गेले. आजही असतात. त्यामुळे सापांशी जवळीक आणखी वाढली. त्यांच्या सवयी, त्यांचे स्वभाव यांचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागला.

साप पाळायचे म्हणजे त्यांच्या खाण्याची व्यवस्था करणं आलं. सापांचं खाणं म्हणजे बेडूक, उंदीर, सरडे. मग हे प्राणी पकडण्याच्या मोहिमेवर आम्ही उत्साहाने बाहेर पडायचो. त्यातल्या त्यात बेडूक या प्राण्याशी माझा संपर्क बराच जुना, म्हणजे मेडिकल कॉलेजपासूनचा. तिथे बेडूक हाताळण्याची सवय झाली होती. इतर प्राण्यांपेक्षा ते पकडायला सोपे आणि हेमलकशात त्यांची संख्याही भरपूर. कुठल्याही डबक्यात किंवा नाल्यात हमखास बेडूक सापडणारच. तिथून ते किडे खायला बाहेर आले की त्यांना पकडायचं. त्यांच्या डोळ्यांवर टॉर्च टाकला की त्यांना समोरचं दिसेनासं होतं. मग एका झटक्यात बेडूक पकडायचा आणि तो पिशवीत टाकायचा. मगरी आणि सापांसाठी आम्ही कायमच बेडकांची शिकार करत आलो आहोत. या बेडकांवरच आमच्याकडच्या सापांचा चरितार्थ चालतो.

पण बेडकांना पकडण्याचा आमचा हा उद्योग कळल्यावर अनेकांनी आम्हाला प्रश्‍न विचारला, की एका प्राण्याला जगवण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला मारणं बरोबर आहे का? त्यांचं म्हणणं एका अर्थाने बरोबरच होतं. माझ्याकडे आणि विलासकडेही या प्रश्नांना उत्तरं नव्हती. आम्ही एवढंच म्हणू शकतो, की कुणाचाही जगण्याचा अधिकार काढून घेण्याच्या हेतूने आम्ही काही केलेलं नाही. प्राण्यांना खायला घालण्यासाठी आम्ही शक्यतो मेलेल्या प्राण्यांचाच वापर केला. काही वेळा जिवंत प्राण्यांना पकडून आमच्याकडच्या प्राण्यांची भूक भागवली हे खरं आहे, पण त्या वेळी आमच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. शिवाय आमच्याकडच्या सापाला जंगलात मोकळं सोडलं असतं तर त्याने बेडकांचाच घास घेतला असता हेही तितकंच खरं. ते निसर्गचक्रच आहे. आणि तसं पाहिलं तर आपण शाकाहारी मंडळी खातो त्या वनस्पतीतही जीव असतोच की. याचा अर्थ आम्ही चुकलोच नाही असं नव्हे, पण त्या त्या वेळची परिस्थिती पाहून जे योग्य वाटेल ते आम्ही करत गेलो इतकंच.

हेमलकशाला सुरुवातीला पुष्कळदा साप निघायचे. सापाला थंडी सहन होत नाही. मग तो कुठलं तरी उबदार ठिकाण शोधतो आणि पडून राहतो. बऱ्याचदा पिंजऱ्यात प्राण्यांच्या उबेला साप जाऊन बसायचे. चुकून प्राण्याचा पाय त्याच्यावर पडला की साप त्याला चावायचा. आमच्याकडचं माऊसडिअर नाग चावूनच मेलं होतं. आमच्याकडे छोट्या खारी होत्या. त्यांना आम्ही मडक्यात ठेवायचो. या मडक्यात एकदा उबेला म्हणून नाग येऊन बसला. तो चावल्याने त्या खारी मेल्या. कितीही काळजी घेतली तरी असे अपघात घडायचेच. जंगलातही ते होतातच, तसेच इथेही. मग अनुभवाने आम्ही पिंजऱ्यांना बारीक जाळी लावायला लागलो.

एकदा मगरीसाठी बेडूक शोधायला मी आणि विलास बाहेर पडलो होतो. बेडूक सहसा पाणी असलेल्या खड्ड्यात सापडतात. त्यामुळे असे खड्डे बघत आम्ही चाललो होतो. अचानक एका खड्ड्यात काही तरी चमकलं म्हणून नीट निरखून पाहिलं, तर तो बँडेड क्रेट होता. हा आमच्या शाळेच्या मुलांचा नेहमीचा रस्ता होता. त्यामुळे त्याला तसंच सोडून देणं आम्हाला जोखमीचं वाटलं. त्याला पकडायचं असं मी आणि विलासने एकमेकांशी न बोलताच ठरवलं. आमच्या हातात फक्त दोन काठ्या होत्या. विलासने मागे जाऊन त्याच्या पाठीवर काठी दाबली, त्यामुळे त्याने तोंड फिरवून मागे यायला सुरुवात केली. लगेच मी माझी काठी त्याच्या तोंडावर दाबली. विलासने शेपटी पकडल्यावर मी मानेला धरून त्याला उचलला. त्याची पूर्ण लांबी पाहून आम्ही थक्कच झालो. सहा फुटांपेक्षा लांब असा तो प्रचंड साप होता. आमच्याजवळ तेव्हा पोतं नसल्याने तो हातात धरून प्रकल्पावर येईपर्यंत आमच्या हातांना अक्षरश: रग लागली होती.

प्रकल्पावर आमच्या घरातही बऱ्याचदा साप निघायचे. बाथरूममध्ये पाणी बाहेर जाण्यासाठी आऊटलेट असतं. एरवी ते जाळीच्या झाकणाने बंद केलेलं असतं. आमच्याकडे अशी काही झाकणं नव्हती, त्यामुळे हे आऊटलेट उघडंच असायचं. त्यातून साप घरात यायचे. मंदाला एकदा अगदी जिवावरचाच अनुभव आला होता. झालं असं, की आम्ही घरात सीताफळं पिकायला म्हणून गवतात घालून ठेवली होती. एके दिवशी पहाटे रोजच्याप्रमाणे फिरायला जाण्याच्या आधी तिने सीताफळं पिकली आहेत का हे बघायला त्यावरचं गवत बाजूला केलं, तर तिच्या हाताला थंडगार स्पर्श झाला. तेव्हा आमच्याकडे वीज नव्हती. पहाटेचे पाच वाजलेले. घरात पूर्ण अंधार होता. काय आहे म्हणून तिने कंदील घेऊन बघितलं तर ती मण्यार होती. नागापेक्षाही विषारी साप. घाबरून ती मला उठवायला आली. मग त्या मण्यारीला पकडून मी तिची योग्य ठिकाणी पाठवणी केली.

ranmitra

सापांमुळे कधी कधी मजेशीर प्रसंगही घडतात. मांत्रिकाच्या मंत्राने सापाचं विष उतरतं असा खेड्यापाड्यांत समज आहे. अजूनही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. असाच एक मांत्रिक आमच्या भागात आला होता. आपल्याकडे सापांचं विष उतरवणारा दगड आहे, असं तो सांगत होता. त्याच्याबरोबर एक माणूस होता. मांत्रिकाने आपल्याकडचा साप काढून या माणसाच्या अंगावर सोडला. साप त्या माणसाला चावला आणि रक्त येऊन तो माणूस खाली पडला. मग मांत्रिकाने आपल्याजवळचा दगड त्या माणसाच्या अंगाला लावल्यावर तो पुन्हा हसत हसत उठून बसला. असे प्रयोग पाहून माणसं अचंबित होतात. आदिवासी माणसं तर इतकी भाबडी असतात, की मांत्रिकाच्या या जादूमागे काही युक्ती-लबाडी असेल हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या मांत्रिकाने आमच्या परिसरात किमान पन्नास दगड तरी विकले असतील. आपल्याला साप वश आहे असं दाखवण्यासाठी हा मांत्रिक खेळही करायचा. सापाचं तोंड उघडून त्याचे दात दाखवायचा. बहुतेकदा अशा मांत्रिकांकडचे साप विषारी नसतात. असले तरी त्यांचे विषारी सुळे काढून टाकलेले असतात. लोकांना दाखवले जातात ते खायचे दात. पण हा फरक बहुतेक लोकांना कळत नाही. त्यामुळेच हा माणूस सापाच्या तोंडात हात घालतो आणि तरीही साप त्याला काही करू शकत नाही, असा त्यांचा समज होतो, आणि त्यामुळेच त्यांचा मांत्रिकावर विश्वास बसतो. असा एक प्रयोग पाहिल्यावर मी त्या मांत्रिकाचा साप त्याच्या हातातून काढून घेतला आणि त्याला म्हटलं, “चल, मी तुला विषारी साप दाखवतो. कर त्याच्यावर तुझे प्रयोग.” मी आमच्या प्रकल्पावरचा एक विषारी साप बाहेर काढल्यावर हा मांत्रिक जीव मुठीत धरून पळत सुटला.

सापांबद्दल गैरसमज खूप आहेत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना काहीही शास्त्रीय आधार नसतो. कुणी तरी काही तरी सांगतं आणि बाकीचे शंका न विचारता त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे सापांबद्दलच्या दंतकथा वाढतच जातात. फक्त आमच्याच भागात असं नव्हे, तर आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सापांबद्दलच्या वेगवेगळ्या समजुती प्रचलित आहेत.

साप डूख धरतो, हा गैरसमज ही जिकडे-तिकडे बघायला मिळतो. सापाला तुमच्यामुळे काही दुखापत झाली तर त्याची प्रतिक्रिया तो त्याच वेळेला देतो. सूड घेण्याच्या विचाराने तो पुन्हा येतो, असं म्हणणं हा शुद्ध बकवास आहे. सापांच्या मेटिंगच्या वेळी एका सापाला मारलं तर जोडीदार डूख धरून सूड घेतो, वगैरेही केवळ गैरसमजुती आहेत. मेटिंगच्या वेळी एक विशिष्ट वास येतो. त्या वेळेस एक साप मेला किंवा जखमी झाला तर त्या वासाच्या आधारे दुसरा साप तिथे येऊ शकतो. लोकांना वाटतं, हा डूख धरून आला; पण त्यात काही तथ्य नाही.

धामणीविषयीही गैरसमज आहेत. धामण हा साप खरं तर बिनविषारी, पण धामण शेपूट मारते आणि त्यामुळे पाय सडतो, असं सर्रास सांगितलं जातं. मला वाटतं, कधी तरी धामणीला पकडत असताना भीतीपोटी तिने पकडणाऱ्याच्या अंगावर विधी केले असतील. स्वतःच्या बचावापोटी होणारी सापांची ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्याच्या विष्ठेला अतिशय उग्र वास असतो. या वासाला घाबरून आपल्याला सोडून दिलं जाईल, असा त्याचा कयास असू शकतो. सापाच्या विष्ठेवर पाय पडला तर लाखात एखाद्याला त्याची रिॲक्शन येऊ शकते, त्यामुळे पाय सडू शकतो. पण हे सगळ्यांच्या बाबतीत किंवा सरसकट होण्याची शक्यताच नाही. धामण ही नागाची मादी, असाही एक गैरसमज आहे. सापाचं लिंग ओळखणं हे कठीणच असतं. मागून दाबल्यावर लिंग बाहेर आलं तर तो नर; नाही तर मादी! अर्थात हे तज्ज्ञांनाच कळू शकतं. सापांचा अनुभव नसलेल्यांना नक्कीच नाही. त्यामुळेच अनाडी लोकांनी धामणीचं नागासोबत लग्न लावून दिलेलं असावं!

आमच्याकडे साप ठेवायला लागल्यापासून आम्हाला अनुभवाने त्यांच्याबद्दल वेगवेगळी माहिती कळत गेली. आमच्याकडच्या इतर प्राण्यांना माणसांप्रमाणेच काही ना काही आजार होत असतात. त्यावर उपचार करावे लागतात. त्यातल्या बऱ्याच प्राण्यांना माणसांचीच औषधं चालतात. सापांना मात्र औषध देण्याचा प्रसंग आमच्यावर आलेला नाही. फक्त सापाला खूप थंडी किंवा खूप उन्हाळा सहन होत नाही. अशा वातावरणात त्याला ऊब किंवा गारवा मिळाला नाही तर तो मरून जातो. आमच्या भागात उष्णता आणि थंडी टोकाची असल्याने सापांची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीत त्याच्या हालचालीही संथ होतात. या काळात आमचे साप ब्लँकेटमध्ये असतात. उन्हाळ्यात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आम्ही तरट लावतो आणि त्यावर सतत पाणी मारत राहतो. सापांसाठी आम्ही अनेकदा पंखेही लावले आहेत. ते जगावेत यासाठी हे सर्व करावंच लागतं.

सापांबद्दलचं आमचं म्हणणं साधं-सोपं आहे. चावणं हा त्याच्याजवळचा बचावाचा एकमेव मार्ग आहे. त्याला भीती वाटली, त्याच्या अंगावर कुणाचा पाय पडला, तर तो स्वतःच्या संरक्षणासाठी चावणारच; पण काळजी घेतली तर सर्पदंशापासून वाचणं शक्य आहे. जिथे साप सापडतात अशा ठिकाणी जाताना टॉर्च घेणं आवश्यक असतं. म्हणजे समोरचा साप आपल्याला दिसतो आणि त्याला धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. हातात काठी असली आणि ती आपटली तर व्हायब्रेशन्समुळे सापाला कुणी तरी जवळ येतंय असं कळतं आणि तोच आपणहून तुमच्यापासून लांब जातो. त्याला स्वतःच्या जीवाची काळजी असतेच. कधी साप समोर आडवा आलाच तर एका जागी स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. तसं केलं तर एखाद्या दगडावरून जावं तसा तो सरपटत आपल्या पायावरूनही जातो. मात्र, हालचाल झाली तर तो चावू शकतो. अर्थात साप पायावरून जात असताना स्थिर राहणार कसं, हा प्रश्‍न पडणंही स्वाभाविक आहे. त्यामुळे काळजी घेऊनही साप चावलाच तर जवळच्या दवाखान्यात तातडीने नेणं हा एकच मार्ग असतो. पण आमच्या भागात आणि एकूणच खेड्यांपाड्यांमध्ये अजूनही लोकांचा मांत्रिकावर विश्वास आहे. मांत्रिकामुळे विष तर उतरत नाहीच, शिवाय मांत्रिकाला बोलावून उपचार करण्यात वेळ फुकट जातो. त्यामुळे माणूस दगावण्याचाच धोका वाढतो.

ranmitra

साप जेव्हा चावतो तेव्हा तो विषारी आहे हे कळलं तरी त्याने शरीरात किती विष सोडलं आहे हे कळणं अवघड असतं. चावण्याआधी सापाने काही खाल्लं असेल तर विष संपून गेलेलं असतं. त्यामुळे कधी कधी विषारी साप चावूनही माणसाला फारसा त्रास होत नाही. सर्वसाधारणत: विषारी साप चावला की सर्वांत आधी माणसाच्या पापण्या जड होतात, डोळे उघडे ठेवणं अवघड होऊन बसतं. तिथून त्याची स्थिती बिघडायला सुरुवात होते. स्नायू पॅरलाइज होतात आणि त्यामुळे श्वास बंद होत जाऊन तो अखेर मरतो. अर्थात वेळेत उपचार मिळाले तर बहुतेकदा रुग्ण वाचतो. सर्पदंश झाल्यावर दवाखान्यात पोचेपर्यंत काही प्रथमोपचार करता आले तर चांगलंच. कारण खेड्यापाड्यांत दवाखाने लांब अंतरावर असतात. आम्ही इथल्या लोकांना सांगतो, की सर्पदंश झालेल्या जागेशेजारी हृदयाच्या बाजूने इलॅस्टिक बँडने बांधता आलं तर उत्तम. तो बँड फार घट्टही बांधता कामा नये, नाही तर रक्तप्रवाहाला अडथळा होऊन तो भाग काळा होऊ शकतो. शक्य असेल तर बाजूने काठी बांधावी. म्हणजे त्या अवयवाची हालचाल कमी होते. विष रक्तात लवकर भिनू नये यासाठी ही सगळी खबरदारी. मुख्य म्हणजे मांत्रिक किंवा इतर उपायांवर वेळ न दवडता रुग्णाला दवाखान्यात नेऊन तातडीने सर्पदंशावरचं इंजेक्शन घ्यायला हवं. अनेकदा मांत्रिक किंवा तत्सम उपचारांचा गुण आला नाही की मग रुग्णाला दवाखान्यात आणलं जातं. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. रुग्णाचा तर जीव हकनाक जातोच, पण दवाखान्यात आणूनही रुग्ण दगावला, अशी त्याच्या नातेवाइकांची समजूत होते.

अर्थात, वेळेत दवाखान्यात पोहोचूनही रुग्ण दगावल्याच्या घटना घडतच नाहीत असं नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या भागातील एका डॉक्टर बाईंचा साप चावल्याने मृत्यू झाला. या डॉक्टर बाईंचे पतीही इथले प्रसिद्ध डॉक्टर. डॉक्टरबाई फिरायला गेल्या असताना त्यांना साप चावला. त्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळाली, हॉस्पिटलमध्ये नेलं, अँटिव्हेनम दिलं गेलं, तरीही त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना एका सर्पमित्राच्या बाबतीत घडली. सापडलेला नाग जंगलात सोडताना त्याचा अंदाज चुकला आणि तो नाग या सर्पमित्राला चावला. हॉस्पिटलमध्ये नेल्यावरही तो डॉक्टरांना सांगत होता, की अमुक करा म्हणजे उपयोग होईल, कारण त्याला सापांचा अनुभव होता. पण डॉक्टर म्हणाले, “तू कोण सांगणार? डॉक्टर तू आहेस का मी?” त्यांनी त्यांच्या पद्धतीने उपचार केले; पण तो वाचू शकला नाही. या दोन्ही घटनांतील संबंधित व्यक्ती उच्चशिक्षित होत्या, अनुभवी होत्या. त्यांना उपचारही मिळाले, तरीही त्यांचा मृत्यू झाला. कारण हे उपचार त्यांच्यासाठी तोकडे होते. प्रत्येक व्यक्तीची तब्येत बघून तिला उपचार करण्याचं ज्ञान डॉक्टरांना हवं. तसं न झाल्यास चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते. मला वाटतं, आमच्या भोळ्याभाबड्या, अशिक्षित रुग्णांबरोबरच डॉक्टरांनाही या बाबतीत प्रशिक्षित करण्याची गरज आहे.

हे झाले दुसऱ्यांचे अनुभव. पण साप चावण्याचा अनुभव मीही घेतला, तोही विषारी. खरं तर इतकी वर्षं मी जंगलातले साप हाताळतोय, पण या आधी मला कधीही साप चावला नाही. पण २००४ साली मला साप चावला तो मात्र आमच्या प्रकल्पावरच्या सर्पोद्यानातलाच. हा घोणस जातीचा साप होता. प्रकल्पावर येणाऱ्या लोकांना नेहमी वाटायचं (आणि अजूनही वाटतं) की आम्ही साप, वाघ यांचे दात काढून टाकतो आणि त्यामुळेच मी त्यांच्या तोंडात हात घालू शकतो. तसं ते नाही, हे त्यांना पटवण्यासाठी मी सापाचं तोंड उघडून त्याचे दात दाखवायचो. सापांसाठी ते नक्कीच सुखावह नसणार; पण त्याकडे माझं दुर्लक्ष झालं असावं. त्या दिवशी पुण्याहून आलेल्या काही पाहुण्यांना सापाचे दात दाखवत असताना माझ्या हातून सापाचा जबडा थोडा जास्त उघडला गेला असावा. मीही काहीसा बेसावध असेन. कारण काहीही असो, पण साप माझ्या हाताला चावला. असं काही झालं की हात झटकन मागे घेणं ही खरं तर आपली नैसर्गिक प्रतिक्रिया असते; पण मी तसं केलं नाही. त्यामुळे सापाने माझ्या हाताला कडकडून चावून विषाची पिशवी पूर्ण रिकामी केली. त्यानंतर लगेचच मी प्रतिबंधक इंजेक्शन घेतलं. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे एखाद्याला (म्हणजे अगदी हजारो-लाखोंत एखाद्याला) ‘ॲलर्जिक रिॲक्शन' येऊ शकते, तशी ती मला आली. आधी ब्लडप्रेशर एकदम कमी झालं. सगळं अंग, चेहरा प्रचंड सुजला. मी आकाराने नेहमीपेक्षा जवळजवळ दीडपट झालो असेन. प्रकल्पावर सगळेच घाबरले. मला नागपूरला ॲडमिट करायचं ठरलं. खरं तर तिथे गेल्यावर ही बातमी आणखी पसरणार आणि लोक त्याचा आपल्या पद्धतीने अर्थ काढणार याची मला भीती होती. त्यामुळे तिथे ॲडमिट होणं मला टाळायचं होतं; पण आता प्रसंग जिवावर बेतला होता, त्यामुळे माझाही नाइलाज झाला.

नागपूरला मला तीन-चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. माझी तब्येत सुधारत होती, पण माझ्या अंदाजाप्रमाणे मला साप चावल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि अफवांना ऊत आला. ‘साप मारू नये' असं सांगणाऱ्या माणसालाच साप चावल्याने अनेकांना जणू हातात कोलीतच मिळालं. ‘शेवटी साप तो साप, कितीही लळा लावा तो चावणारच, साप विनाकारण चावत नाही हे सगळं झूठ आहे', वगैरे कॉमेंट्स मला ऐकवल्या जात होत्या. बाहेरही त्यावर चर्चा सुरू होती. सापाच्या चावण्यापेक्षा या गैरसमजांचाच मला जास्त त्रास होत होता. शेवटी मी या सगळ्या प्रकारात सापाची चूक कशी नाही आणि त्याला दोष देऊ नये असं सांगणारं पत्रकच काढलं. काही वर्तमानपत्रांनी ते पहिल्या पानावर छापलं. तरीही तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालं होतंच.

मला साप चावणं हा निव्वळ एक अपघात होता. साप चावल्यानंतर मला विषाची ‘ॲलर्जिक रिॲक्शन' आली होती. इंजेक्शन लागू पडलं असतं तर ही घटना कुणाला कळलीही नसती. या प्रकरणात आणखी एक गोष्ट घडली. उपचार घेऊन मी हेमलकशाला परतल्यावर साधारण महिन्याभराने मला चावलेला साप मृत्यू पावला. त्या संदर्भातही ‘त्याला आपलं चुकलं याची जाणीव झाली, त्यामुळे त्याने अन्न-पाणी सोडून मृत्यू पत्करला,' वगैरे अफवा उठल्या. अशा वेळी आपण कुणाकुणाचं तोंड धरणार आणि कुणाकुणाला समजावत बसणार? त्यामुळे गप्प बसण्यातच शहाणपणा होता. आम्ही तेच केलं.

(डॉ. प्रकाश आमटे यांच्या रानमित्र या समकालीन प्रकाशित पुस्तकातील संपादित भाग)

डॉ. प्रकाश आमटे







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

एम.बी.अलमेल 17.07.25
अति महत्त्वाची माहिती पूर्ण लेख

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results