आम्ही कोण?
ले 

संजय संगवई : विस्थापितांचा अन् पर्यायी विकासनीतीचा आवाज

  • प्रशांत कोठडिया
  • 01.07.26
  • वाचनवेळ 7 मि.
sanjay sangvai

वीस वर्षांहून अधिक काळ नर्मदा आंदोलनाचं ‘माध्यम’ आणि ‘पर्याची विकासनीती’चा ‘बुलंद आवाज’ बनलेल्या संजय संगवईचं अवघ्या ४८ व्या वर्षी झालेलं निधन परिवर्तनवादी चळवळीतील सर्वांनाच मोठा चटका लावून जाणारं होतं. लहानपणीच हृदयाचा गंभीर आजार असल्याचं माहीत असूनही मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनासाठी जिवाची बाजी लावण्यास संजयने कसूर केली नाही. स्वतःच्या तब्येतीपेक्षा विस्थापितांच्या लढ्याला प्राधान्य दिल्यामुळे त्याचा आजार बळावणं स्वाभाविक होते. शेवटी केरळातील कोची येथे आयुर्वेदिक उपचार घेत असतानाच २९ मे २००७ रोजी संजयचं निधन झालं. 

संजय तसा हरहुन्नरी. ‘लोकमत’ व ‘सकाळ’ दैनिकांमधून त्याने उपसंपादकपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. विशेषतः त्याची शास्त्रीय संगीताची सखोल जाण आणि त्याअनुषंगाने केलेलं सुरेल लेखन, विशेषत: सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं रसपूर्ण वृत्तांकन त्याकाळी नावाजलं गेलं होतं. त्याने पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या पत्रकारिता विभागात काही काळ अध्यापनही केलं. ‘अभिव्यक्ती’ या नाशिकमधून प्रसिद्ध होणार्‍या माध्यम विषयक मराठी त्रैमासिकाचे संपादक म्हणूनही काम पाहिलं. परंतु त्याकाळी नर्मदा आंदोलनाने व्यापलेलं सामाजिक क्षेत्राचं अवकाश संजयला खुणावत होतं. शेवटी त्याने पत्रकारितेचा व्यवसाय सोडून, नर्मदा बचाव आंदोलनाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा निर्णय घेतला. त्याचं ज्ञान, कळकळ आणि अनुभव यामुळे त्याच्यावर ‘जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वया’ची (एनएपीएम) जबाबदारी सोपवण्यात आली. 

संजयने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रं व नियतकालिकांमधून मराठी, हिंदी व इंग्रजीतून विपुल लिखाण केलं आहे. पुणे विद्यापीठात आम्ही एकत्र शिकत होतो. मी विद्यापीठ पदव्युत्तर जिमखान्याचा जनरल सेक्रेटरी म्हणून (१९८१ - ८२) काम करत असताना संजयने आमच्या टीममध्ये मॅगेझिन सेक्रेटरी म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी पार पाडली होती. तेव्हा त्याच्या आयुष्याचा प्रवाह नर्मदेच्या खोऱ्याच्या दिशेने वळून खळाळून वाहत राहील आणि आदिवासींच्या अस्तित्वाच्या हुंकाराचा उद्गार बनून घुमत राहील, याची आम्ही कोणीच कल्पना केली नव्हती.  

स्वातंत्र्योत्तर काळ हा महात्मा गांधींच्या प्रेरणेने परिवर्तनाच्या क्षेत्रात झटणाऱ्या असंख्य संस्था, संघटना व आंदोलनाच्या दृष्टीने कसोटीचा काळ होता. जनतेला विकासाची फळं झटपट हवी होती. त्यावेळी लोकांच्या आशा-आकांक्षांना मूर्त स्वरूप देणारे अनेक प्रकारचे मोठमोठे प्रकल्प, कारखानदारी, शेती, शैक्षणिक, विज्ञान, संरक्षण, संशोधन विषयक संस्था उभारण्यास पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील त्याकाळातील सरकारने गती दिली होती. 

हेही वाचा - देशभरातील आंदोलनं काय सांगताहेत?

सुमारे १९९० पासून जागतिकीकरणाची एक महाकाय वावटळ विश्वभर घोंघावू लागली आणि सर्वच क्षेत्रात प्रचंड उलथापालथ सुरू झाली. देशाने विज्ञान व तंत्रज्ञानाने घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे औद्योगिक प्रगतीचे सारे संदर्भ पार बदलून गेले. ‘स्मॉल इज ब्युटिफुल’ हा विचार ‘बिग इज पावरफुल’ या शक्तिशाली मंत्रापुढे अगदीच वामन वाटू लागला. (जागतिकीकरणाची प्रक्रिया नेमकी कधी व कोठून सुरू झाली, हा खरंतर मोठ्या अभ्यास व संशोधनाचा विषय आहे.) 

अर्थातच, या सर्वव्यापी प्रक्रियेचा सर्वात मोठा लाभ प्रगत राष्ट्रांना आणि विकसनशील देशातील शक्तिमान भांडवलदारांना होणार ही जणू काळ्या दगडावरील रेघ होती. परिणामी, जगभरातील विकसित व मागास राष्ट्रं यामधील आणि त्याच बरोबरीने, प्रत्येक विकसनशील अथवा मागास राष्ट्रांमधील अंतर्गत विषमतेच्या दरीने भयावह स्वरूप धारण केलं आहे. त्यामुळे जगातील जवळपास ७० ते ८० टक्के जनसमुदाय सरणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक दारिद्र्याच्या दरीत खोलवर गाडला जात असल्याचं सर्वत्र पहायला मिळू लागलं आहे. अशात शासनकर्ता वर्ग असंवेदनशील असला तर मग गोरगरिबांच्या हालअपेष्टांना पारावार उरत नाही!

अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ‘नर्मदा’ आंदोलनाच्या रूपाने विस्थापित होणाऱ्या आदिवासींच्या वाड्यावस्त्यांमधून आणि निसर्गसंपन्न दऱ्याखोऱ्यातून एक खणखणीत ‘हुंकार’ उमटला.! नर्मदा बचाव आंदोलनाने आपल्या ताकदीनुसार दिखाऊ ‘विकासा’च्या भव्यदिव्य संकल्पनेला आव्हान देणाऱ्या विरोधी आवाजाद्वारे, देश व परदेशातील प्रचलित राजकीय व आर्थिक व्यवस्थेला काही काळ तरी भंडावून सोडले. या आंदोलनाने आदिवासी व दारिद्र्यरेषेखालील समाजाच्या जगण्यामरण्याचे म्हणजेच प्रामुख्याने विस्थापनेचे (खरंतर उद्ध्वस्तीकरणाचे) प्रश्न पोटतिडकीने मांडून शासनकर्त्यांच्या सदसद्विवेकबुद्धी व संवेदनांना साद घालण्याचा संघटित प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणातील विस्थापनामुळे नागवल्या गेलेल्या लाखो आदिवासींमध्ये ज्या प्रकारची चीड व संताप निर्माण झाला होता, त्याला शांततामय मार्गाने वाट करून देणाऱ्या मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखालील 'नर्मदा बचाव आंदोलना'ने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यातही संजय संगवई या अहिंसक आंदोलनाचा महत्त्वाचा ‘दुवा’ आणि टिकाऊ विकासनीतीचा क्षीण आवाज देशभर व जगभर पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यमही बनला होता. 

खरंतर स्वतःची सुरक्षित अशी मध्यमवर्गीय चौकट सोडून परिवर्तनाच्या आंदोलनात सर्वस्व झोकून देणं ही बाब मुळीच सोपी म्हणता येणार नाही. पत्रकारितेच्या व्यवसायात राहिला असता तर संजय सर्व सुखसोयीयुक्त जीवन सहज जगू शकला असता. घरातली पार्श्वभूमीही त्यादृष्टीने अनुकूल होती. परंतु अशा कोणत्याही चौकटीत न अडकता संजयने हे जगावेगळं कार्य करण्याचा निश्चय केला होता. त्याकाळीदेखील मध्यमवर्गीय अलिप्तता होतीच. विशेषतः उच्च मध्यमवर्गीयांकडून तथाकथित विकासाला खोडा घालणारं आंदोलन म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाची कुचेष्टा व निंदानालस्ती होत असे. 

हेही वाचा - ग्रामविकासासाठी ‘पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स’ कळीचे

असे मानहानीचे आणि आर्थिक चणचणीचे प्रकार सहन करत मेधा पाटकर, संजय संगवई आणि या विराट आंदोलनातील सर्व सहकाऱ्यांनी आपलं कार्य अखंडितपणे सुरू ठेवलं. या पार्श्वभूमीवर संजयने अत्यंत दुर्लक्षित परंतु व्यापक अशा समाजघटकांशी आपली नाळ कायम टिकवून ठेवली, हे खूपच धैर्याचं आणि कौतुकाचं होतं.

सध्या समाजात ‘मी आणि माझं कुटुंब’, ‘माझे नातेवाईक’, ‘माझी सुरक्षितता’, ‘माझं करिअर’, ‘माझी जात’, ‘माझा धर्म’ याभोवतीच घुटमळण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्या परिस्थितीत स्वतःच्या पलीकडे जाऊन निःस्वार्थपणे इतक्या अवघड आंदोलनाचे पूर्णवेळ कार्य करण्याचा निर्णय घेणं धारिष्ट्याचं (आणि समाजाच्या दृष्टीने वेडपटपणाचं) होते. मात्र कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेची पर्वा न करता संजयने स्वतःला आंदोलनात झोकून दिलं. वैयक्तिक प्रगतीचे दोर कापून टाकले. आदिवासींशी एकरूप झालेला संजय सर्वांमध्येच सहजतेने, कोणताही अभिनिवेष न बाळगता वावरत असे. 

संजयचं हृदय लहानपणापासूनच कमकुवत असलं तरी त्याचं मन किती खंबीर होतं याची प्रचिती, त्याने उपसलेल्या कामाच्या डोंगराकडे पाहून किंवा देशभरातून हजारो सुहृदांचं विणलेलं अफाट जाळं पाहून येऊ शकेल. टिकाऊ विकासाशी निगडीत अनेकविध प्रश्नांवर त्याने सातत्याने भरपूर लिखाण केलं. नर्मदा आंदोलनाची दिशा, गती व प्रगती विषयी सातत्याने लिहून त्याने विस्थापितांची दुःखं समाजाच्या वेशीवर मांडली. आंदोलनाबद्दलचे गैरसमज व अपप्रचारांचा अनेक लेखांमधून व ठिकठिकाणी लोकांशी साधलेल्या संवादातून, संयमाने परंतु कणखरपणे प्रतिवादही केला. त्याकरिता तो देशभर वणवण भटकला. परिवर्तनावर विश्वास असणाऱ्या समविचारी व्यक्ती व संस्थांचं जाळं विणण्याचं कार्य त्याने कोळ्याच्या उपजत निष्ठेने केल. आदिवासींवरील अन्यायाचा संजयने टोकदार विरोध केला, परंतु त्याला कटुता, द्वेष व नैराश्याचा कधीही स्पर्श होऊ दिला नाही. हे त्याच्या कामाचं अन् व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

आपल्या देशातील आणि एकूणच जगभरातील विकासाच्या प्रक्रियंचे प्रचलित स्वरूप पाहून अस्वस्थ होणाऱ्या संजयने, ‘नर्मदा आंदोलन’ आणि ‘पर्यायी विकासनीती’चा प्रसार हेच आपलं जीवनध्येय बनवलं होतं. तीच त्याच्या जगण्याची खरीखुरी रसद होती. विकासाचं याच स्वरूपाचं राजकारण त्याला अभिप्रेत होतं. त्यामुळेच केवळ भांडवल, सत्ता व संपत्तीच्या जोरावर समाजातील दारिद्र्य दूर करता येणार नाही; समताधिष्ठित व विषमतारहित समाज उभारता येणा नाही, याबद्दल त्याच्या मनात गोंधळ नव्हता. त्यामुळेच कोट्यवधी गरिबांशी व पीडितांशी संजय जैविक नातं जोडू शकला. याच भावनेतून संजय समाजासाठी जगला, वणवण फिरला, कणकण झिजला आणि शांतचित्ताने निघूनही गेला.! 

हेही वाचा - आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर देणं हा त्यांच्या हक्कावर घाला; त्याविरोधात लढा देणारच - देवाजी तोफा

आपल्या कार्यकर्तृत्वाने माता नर्मदेची आगळीवेगळी ‘परिक्रमा’ करत ‘पर्यायी विकासनीती’ आणि ‘लोकशाही’वर विश्वास दृढ करणाऱ्या सातत्यपूर्ण चळवळीतून समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीला संजयने सातत्याने घातलेली साद हीच खरंतर त्याच्या अल्पायुष्याची कमाई आहे. 

सध्याचा काळ तर मोठा कठीण आहे. आपल्या देशातील राजकीय चौकटीला क्रोनी-कॅपिटलिझम, शासनयंत्रणेची प्रचंड दडपशाही आणि धर्मवादी राजकारणाचं ग्रहण लागलं आहे. मेगा सिटीज, मेगा प्रोजेक्ट्स, मल्टिनॅशनल उद्योगसमूह, सार्वजनिक मालमत्तेचं खाजगीकरण आदी प्रकार जणू देशाच्या प्रगतीचे दाखवायचे दात बनून गेले आहेत. या वेगवान विकासाच्या मॉडेलची गुलाबी कल्पना (वा स्वप्नरंजन) विशेषतः मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांना नेहमीच भुरळ घालणारी असते. अशा खाजगीकरणाच्या मग्रूर कोलाहलात आदिवासी, कोरडवाहू शेतकरी, ग्रामीण व शहरी दारिद्र्य, समता, सामाजिक व आर्थिक न्याय, विषमता या सारख्या शब्दांचा आवाज लोकशाहीला कवडीचीही किंमत न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांपर्यंत कसा पोहोचणार? 

अशा प्रचारी व विषारी काळात संजय संगवईसारख्या निर्मोही कार्यकर्त्याची उणीव अधिकाधिक भासू लागते. २९ मे रोजी संजयला जाऊन १९ वर्षं पूर्ण झाली. आजही त्याच्या त्यागपूर्ण जीवनाची प्रेरणा संवेदनशील मनाच्या कार्यकर्त्यांच्या मनात दरवळत आहे. त्याचं स्मरण अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा रिचार्ज करेल अशी खात्री वाटते.

प्रशांत कोठडिया







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results