मे २०१७ मध्ये मी छत्तीसगडमधील सरकारी जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले आणि माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. कामाला सुरुवात झाली तेव्हाच आत कुठे तरी जाणवलं होतं, की इथे काम करणं मला केवळ डॉक्टर म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनसुद्धा अंतर्बाह्य बदलवून टाकणार आहे. कारण आदिवासी भागात काम करणं हा विलक्षण अनुभव असतो. पण हा लेख त्या कामाबद्दल नाही, तर त्या कामाच्या धाग्याने जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या अनुभवाबद्दल आहे.
छत्तीसगडमधल्या कामाने मला समाधान मिळालं, पदोपदी काही तरी नवीन शिकायला मिळालं. त्याच वेळी तिथे मला एकटेपणानेही ग्रासलं. त्यावर उपाय म्हणून मी कामाच्या जोडीला लेखन सुरू केलं. ते लेखन ‘साप्ताहिक साधना'मध्ये प्रकाशित होऊ लागलं. त्याने अनेक चांगले लोक जोडले गेले, नवीन मित्रमैत्रिणी मिळाले. देशभरातल्या सामाजिक संस्था स्थापून काम करणाऱ्या अनेक अनुभवी डॉक्टर्सशी माझा परिचय झाला.
असंच एक डॉक्टर जोडपं म्हणजे डॉ. रेजी आणि डॉ. ललिता. तामिळनाडूत सितिलिंगी इथे ते ‘ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह (टी.एच.आय.) ही संस्था चालवतात. डॉ. रेजी यांना आमच्या कॉमन मित्रांद्वारे, तसंच फेसबुकद्वारे माझ्या कामाबद्दल माहिती होती. त्यांनी अगदी प्रेमाने मला त्यांची संस्था पाहायला बोलावलं. मीही उत्साहाने त्यांना भेटायला जाणं निश्चित केलं. २०२३च्या जानेवारीमध्ये त्यांनी तरुण डॉक्टरांसाठी ‘आर.एस.पी.' म्हणजेच ‘रुरल सेन्सिटायझेशन प्रोग्राम' या नावाने तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. सितिलिंगीला जाण्याचं हे आणखी एक चांगलं निमित्त मिळालं.
सितिलिंगीचा परिसर पाहताक्षणी प्रेमात पडण्यासारखा आहे. आजूबाजूला पसरलेली झाडी, नाना प्रकारचे पक्षी, भले थोरले वृक्ष, मध्येच लागणारी शेतं, घरं, बायका-माणसं-मुलं आणि चारी बाजूंना डोगरांच्या भल्या थोरल्या रांगा.
तरुण डॉक्टरांनी शहरी झगमगाटात हरवून न जाता ग्रामीण व आदिवासी भागात जाऊन काम करावं, ही प्रेरणा निर्माण करण्यासाठी ‘आर.एस.पी.' कार्यशाळेत विचारांची चर्चा, घुसळण, वादविवाद असं बरंच काही झालं. कार्यशाळा झाल्यानंतरही मला रेजी आणि ललिताला भेटण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची इच्छा होती. माझ्या मनात किती तरी प्रश्न होते, त्यांची उत्तरं मिळवायची होती. त्या उत्तरांतून मला स्वतःला पडलेले काही पेच सोडवण्याचाही एक सुप्त हेतू होता. त्यामुळे वेळ काढून त्यांच्याशीही गप्पा मारल्या, त्यांच्याबद्दल जाणून घेतलं.
रेजी आणि ललिता दोघंही केरळच्या अलप्पी मेडिकल कॉलेजमध्ये शिकले. एकीकडे ते विद्यार्थी युनियनमध्येही सक्रिय होते. दोघंही स्वभावाने विरुद्ध, पण तरीही कामामुळे एकमेकांच्या जवळ आले.
१९८७ मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला. एम.बी.बी.एस.नंतर ललिता इंटर्नशिपसाठी तामिळनाडूमधील मदुराईजवळील दिंडीगुल येथील ‘गांधीग्राम' या आरोग्यसंस्थेत रुजू झाल्या. पुढे रेजी यांनी मणिपाल इथून अनेस्थेसियामध्ये, तर ललिता यांनी त्रिवेन्द्रमला स्त्रीरोग विषयात स्पेशलायजेशन केलं आणि पुन्हा दोघं गांधीग्राममध्ये रुजू झाले; परंतु दोघंही गांधीग्राममध्ये फार काळ रमू शकले नाहीत. कारण तिथे फक्त रुग्णालयापुरतं मर्यादित काम होतं, आणि त्या दोघांना तर लोकांमध्ये मिसळून काम करायचं होतं. त्यामुळे त्यांनी १९९३ मध्ये गांधीग्राम सोडलं.
पण त्याआधी त्यांनी पुढच्या कामासाठी जागा शोधून ठेवली होती. रेजी यांनी बेंगळुरूच्या संवादा या संस्थेच्या फेलोशिपद्वारे भारतभ्रमण केलं होतं, विविध राज्यांतल्या आरोग्यसंस्थाना भेट देऊन त्यांची कार्यशैली अभ्यासली होती. (त्या निमित्ताने त्यांनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पालाही भेट दिली होती.) त्या दरम्यानची एक सुंदर आठवण त्यांनी मला सांगितली. प्रवास करत असताना ते दररोज न चुकता ललिता यांना पत्र लिहायचे, ज्यामध्ये त्यांनी पाहिलेली संस्था, भेटलेली माणसं आणि त्याबद्दलचं विचारमंथन असायचं. ते ऐकून मी तर थक्क झाले. आजच्या काळात व्हॉट्सॲपनेही आपण इतके जोडलेले नसू. मी रेजींना विचारलं, 'ही पत्रं पोस्टात कधी टाकायचात?' त्यावर त्यांचं शांत आवाजात उत्तर- “एक दिवसाआड.”
तर या प्रवासाने रेजींच्या लक्षात आलं, की राज्यांच्या, तसंच काही प्रदेशांत जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातला आदिवासी समुदाय सर्वांत जास्त दुर्लक्षित राहिला आहे. यातूनच मग त्यांनी पश्चिमी घाटाचा प्रदेश कार्यक्षेत्र म्हणून निवडला. तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील हारूर तालुक्यातील सितिलिंगी हे खेडं त्यांनी निश्चित केलं. हा भाग आजूबाजूच्या पाच जिल्ह्यांनी वेढलेला आहे. मात्र, या सर्व जिल्ह्यांच्या सीमा सितिलिंगीपासून प्रत्येकी २० ते ३० किलोमीटर अंतरावर आहेत. या भागातील लोकांना तातडीच्या अत्यावश्यक आरोग्यसेवेसाठी १०० किलोमीटर प्रवास करून जावं लागायचं, त्यात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था. दिवसातून तीनच वेळा येणारी बस. रात्रीच्या १४ तासांत बस नसल्याने रात्री गरज भासल्यास या दरीतून बाहेर पडायला वाहनच उपलब्ध नसायचं. त्यामुळे साहजिकच या भागातील आरोग्यव्यवस्था अतिशय वाईट होती.
१९९२ मध्ये रेजी यांनी ‘ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह' या नावाने ट्रस्ट रजिस्टर केला. सुरुवातीला दोघांनी इथल्याच एका स्थानिकांच्या झोपडीत लहानसा दवाखाना सुरू केला. रेजी सांगतात, ''इथलं आयुष्य अगदी निराळं होतं. लोक संथगतीने काम करत वेगळ्याच तत्त्वज्ञानाने जगत होते. आम्ही त्यांचं निरीक्षण करत त्यांच्याकडून शिकायचो. सुरुवातीच्या त्या काळी एखाद्या दिवशी पाच रुग्ण आले तरी आम्हाला तो दिवस बीझी गेल्यासारखा वाटायचा.” ललिता सांगत होत्या, ''औषधोपचार करून घेणं ही गोष्टच इथल्या लोकांसाठी नवलाईची होती. घरामध्येच बाळंतपणं व्हायची आणि नवजात अर्भक आजारी पडलं की मरून जायचं. नवजात शिशूवर उपचार केले तर ते वाचू शकतं हे आम्हाला त्यांना सतत समजावून सांगावं लागायचं. कारण त्यांनी तसं झालेलं कधी पाहिलेलंच नव्हतं. या भागातल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात एकही डॉक्टर फिरकायचा नाही. त्यामुळे इथे भोंदू बुवा फोफावले होते. पण आम्ही त्यांच्यापेक्षा निराळे आणि खरे डॉक्टर्स आहोत हे हळूहळू अनुभवाने त्यांना पटू लागलं.”
रेजी आणि ललिता यांना ‘ॲक्शन एड इंडिया'कडून पहिली आर्थिक मदत मिळाली. हे फंडिंग रुग्णालयाची इमारत बांधणं, साधनसामग्री खरेदी करणं आणि त्यांचा व आरोग्यसेवकांचा तीन वर्षांचा पगार यासाठी मिळालं होतं. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेलं त्यांचं गांधीग्राममधील मित्र जोडपं, अनू आणि कृष्णा इथे आले. त्यांनी केलेल्या डिझाइनच्या आधारे १९९६ मध्ये रुग्णालयाची इमारत उभी राहिली. मी या परिसरात फिरताना रुग्णालयाच्या देखण्या इमारतीसोबतच अनेक सुंदर घरं, क्वार्टर्स पाहिली, तीसुद्धा अनू आणि कृष्णाने डिझाइन केलेली असल्याचं समजलं.
रेजी आणि ललितासाठी रुग्णालयाइतकंच महत्त्वाचं ध्येय होतं, ते म्हणजे समुदायाचं आरोग्य समुदायाच्याच हाती सोपवणं, आरोग्याचं ज्ञान दवाखान्यात बंद न राहता ते बाहेर नेणं. त्यासाठी त्यांनी १९९८मध्ये आरोग्य साहाय्यिका प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. खेड्यांतल्या वयाने परिपक्व, अशिक्षित, शेतकरी महिला निवडून त्यांना आरोग्याच्या विविध सेवांसंबंधित कौशल्यं शिकवली गेली. उदाहरणार्थ- घरी सुरक्षित बाळंतपण कसं करावं, नवजात शिशूची काळजी कशी घ्यावी, कमी वजनाच्या बाळाकडे विशेष लक्ष कसं पुरवावं, कुपोषित बालकांचा आहार आणि उपचार; लहान मुलांमधील जुलाब, श्वसनाचे आजार याचे उपचार; पाच वर्षांखालील बालकांचे मृत्यू टाळण्याचे उपाय, अशा विविधांगी विषयांचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यासाठी ‘पार्टिसिपेटरी लर्निंग अप्रोच' ही पद्धत वापरण्यात आली. या आरोग्य साहाय्यिकांच्या मदतीने आजूबाजूच्या २१ खेड्यांमध्ये सहा आठवड्यांतून एकदा असं क्लिनिक सुरू केलं गेलं. तिथे गर्भवती स्त्रिया आणि पाच वर्षांखालील बालकांची तपासणी केली जायची. गर्भवती स्त्रियांना काही आजार असल्यास किंवा त्यांच्या प्रसूतीदरम्यान धोका उद्भवण्याची शक्यता दिसल्यास त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात बोलावलं जायचं. ज्यांना काही धोका नाही अशांची घरीच प्रसूती केली जायची.
'ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह'च्या या सर्व कामांमुळे परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली. १९९३ साली त्या भागात एका वर्षाखालील बालकांचा मृत्युदर १४७ होता, तो २००३ मध्ये ६० झाला आणि नंतर २०पर्यंत खाली आला. तसंच या आरोग्य साहाय्यिकांनी तपासलेल्या व प्रसूती केलेल्या गर्भवती मातांपैकी एकीचाही मृत्यू झाला नाही. परंतु गमतीची गोष्ट अशी, की ‘टार्गेट'पूर्तीच्या तत्त्वावर काम करणाऱ्या शासकीय यंत्रणांना ‘टी.एच.आय.'च्या या यशाशी देणंघेणं नव्हतं. कारण शासनाने गर्भवती महिलामृत्यू होऊ नयेत म्हणून प्रत्येक प्रसूती रुग्णालयातच झाली पाहिजे आणि घरी होणाऱ्या प्रसूतींचं प्रमाण शून्यावर आलं पाहिजे, हे धोरण राबवायला सुरुवात केली होती. त्यामुळे शासनाचा यांना प्रश्न होता, की ‘तुमचा ट्रस्ट या भागात काम करत असूनही इथे घरी प्रसूती कशा काय होतात?'
खरं तर पब्लिक हेल्थच्या दृष्टीने घरी होणाऱ्या प्रसूती हा मोठा कळीचा मुद्दा आहे, खासकरून आदिवासी भागात. याबद्दल बोलताना ललिता म्हणतात, 'स्त्रीला कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी सन्मानपूर्वक आणि सुरक्षित प्रसूती होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. इथल्या खेड्यांमध्ये परंपरेने नातेवाईक महिलाच गर्भवती स्त्रीचं बाळंतपण करते, मग ती आई असेल किंवा बहीण. काही समस्या उद्भवल्यास गावातल्या प्रसूतीनिष्णात महिलेला मदतीसाठी बोलावलं जातं. गर्भवती मातामृत्यू कमी व्हावेत म्हणून सरकारने सरसकट सर्वच महिलांना रुग्णालयात प्रसूती करणं बंधनकारक केलं. पण हे करताना शासकीय रुग्णालयात तसं कौशल्य असलेले डॉक्टर्स व नर्सेस आहेत का, गरजेची साधनं उपलब्ध आहेत का, रुग्ण महिलेला तिच्या दुर्गम भागातील घरापासून आरोग्यसेवेपर्यंत पोहोचायला रस्ता आहे का, रुग्णवाहिका आहे का, आणि इतकं सगळं जमून आल्यावरसुद्धा गरीब आदिवासीचं शोषण होणार नाही ना; रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन यांनी अपमानास्पद भाषा वापरल्याने त्या स्त्रीवर मानसिक आघात होणार नाही ना या सगळ्याची काळजी घेतली जाणार होती का? त्यासाठी सरकारी धोरण सर्वसमावेशक व सक्षम होतं का?'
मला आठवलं, मी छत्तीसगडमध्ये असताना २०१८ मध्ये नर्सेस व डॉक्टर्ससाठी ‘लक्ष्य' नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला गेला होता. त्यातही ‘प्रसूती कशी करावी?' या विषयासंदर्भात पहिलाच मुद्दा होता, की गर्भवती स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी.
ललिता पुढे सांगतात, 'सरकारी धोरणामुळे झालं काय, तर एकीकडे घरात होणारी बाळंतपणं बंद झाली. ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं कौशल्य मागे पडलं. दुसरीकडे शासकीय सुविधांच्या तुटवड्यामुळे गर्भवती स्त्रीला खासगी दवाखान्यात पोहोचवून पैसे मिळवण्याच्या निरनिराळ्या क्लृप्त्या वापरल्या जाऊ लागल्या.” छत्तीसगडमध्ये मी हा अनुभवदेखील घेतला होता.
२००४ मध्ये रेजी आणि ललिता यांनी आणखी पुढचं पाऊल उचलायचं ठरवलं. आता त्यांच्या डोक्यात आरोग्याच्या सामाजिक पैलूंवर काम करण्याचे विचार घोळत होते. त्यासाठी त्यांनी गावागावांत पदयात्रा करायचं ठरवलं. आठवड्यातील तीन दिवस रुग्णालयात काम करायचं, तर तीन दिवस खेड्यांमध्ये पदयात्रेला जायचं, अशी त्यांनी आखणी केली. पुढील तीन-चार महिन्यांत २५ खेड्यांत जाऊन त्यांनी लोकांशी विविध समस्यांवर चर्चा केली. त्यातून एक मुख्य समस्या समोर आली, ती म्हणजे तोट्यात जाणारी शेती आणि त्यातून येणारं दारिद्य्र. त्यावर उपाय म्हणून ‘टी.एच.आय.'तर्फे शेतकऱ्यांना शेतीबद्दल प्रशिक्षण द्यायचा निर्णय घेतला गेला. पण त्यात एक मेख होती. गांधीवादी रेजी यांचा आग्रह होता, की ते फक्त रसायनविरहित, सेंद्रिय शेतीसंबंधीचं प्रशिक्षण देतील. पण यात तिथल्या शेतकऱ्यांना फायदा न वाटल्याने आधी कोणी रस दाखवेना. मग रेजी यांनी एक वर्ष एका शेतकऱ्याच्या शेतात प्रयोग करून सेंद्रिय शेतीचे फायदे सप्रमाण दाखवून दिले. त्यातून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीशी जोडले गेले. त्यातून सुरू झाली ‘सितिलिंगी ऑरगॅनिक फार्मर्स असोसिएशन (एस.ओ.एफ.ए.- सोफा)'. यात भाग घेण्याचा मुख्य निकष एकच- शेतकरी छोटा हवा, म्हणजे त्याच्याकडे जास्तीत जास्त पाच एकर जमीन हवी. अशा शेतकऱ्यांसाठी कापूस, हळद अशी या भागातील मुख्य पिकं निवडली गेली. शेतमालाचा दर्जा वाढावा म्हणून विविध प्रक्रियाकेंद्रं बनवली गेली.
'सोफा' आता चांगलीच फोफावली आहे. सध्या त्यात ७०० शेतकरी सहभागी आहेत. रेजी स्वतः फिरून मला ‘सोफा'चा परिसर दाखवत होते. या परिसरातील सर्व युनिट सौर ऊर्जेवर चालतात. कुठे मिलेट प्रोसेसिंग युनिट तर कुठे बाजरी पावडर चक्की. कुठे कोल्ड प्रेस ऑइल युनिट, तर कुठे सांबर, रसम पावडर, किंवा कोकोनट, नाचणी कुकीज बनवायचं मशिन. ‘स्वाद' म्हणजे ‘सितिलिंगी व्हॅली ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट ' या ब्रंॅडने ही उत्पादनं विकली जातात. इथली उत्तम प्रतीची हळद कंपन्या विकत घेऊन एक्स्पोर्ट करतात. मागे एका भागात मोठ्या हौदात शेतकऱ्यांसाठी व्हर्मिकम्पोस्ट ठेवलेलं होतं, तर कुठे टोमॅटो, वांगे, मिरची यांची रोपं. एकीकडे मधुमक्षिकापालन केंद्र. शेतकऱ्यांची माहिती गोळा करून, ऑरगॅनिक सर्टिफिकेशन करण्याचं एक वेगळं ऑफिस. हे काम सुरू झाल्यापासून हळूहळू खेड्यांतील स्त्रियांचे गट जमू लागले. स्वतंत्र व्यवसाय करू पाहणाऱ्या स्त्रियांना कमी दरात कर्ज पुरवलं गेलं. ४०० महिलांचे ४० गट बनले. यासाठी मदत म्हणून ‘टी.एच.आय.'च्या मित्रमंडळींकडून काही रकमा उभ्या करून त्याद्वारे कर्ज दिलं जाऊ लागलं. आदिवासींचा समुदाय (कलेक्टिव्ह) बनवला गेला. अशाप्रकारे ‘टी.एच.आय.'ने काही अंशी आरोग्याच्या सामाजिक पैलूंना हात घातला.
पण रेजी यांची नजर आणखी दूर जात होती. शेतीतून, उद्योगांतून रोजगारनिर्मिती तर झाली; पण पुढे लक्षात आलं, की नुसता पैसा असूनही उपयोग नाही. कारण दळणवळणासाठी रस्ते नसतील, प्यायला शुद्ध पाणी नसेल तर चांगलं आरोग्य कसं राखता येईल? या प्रदेशातील ४७ आदिवासी गावांसाठी हारूर पंचायत आहे. गावकऱ्यांनी ग्रामसभेत सक्रिय सहभागी व्हावं, स्वतःच्या हक्कांची मागणी करावी यासाठी ‘टी.एच.आय.'तर्फे गावकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं; परंतु शासनाने या लोकांकडे सरळ दुर्लक्ष केलं. मग आदिवासी कलेक्टिव्हने स्वतःच निवडणूक लढवली, ती जिंकली आणि आदिवासी असलेली जेष्ठ आरोग्यसेविका माहेश्वरी पंचायत सरपंच बनली. रेजी सांगतात, 'स्वतःच स्वतःचं सरकार चालवणं हा आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. पंचायतीमार्फत गेल्या कित्येक वर्षांत झालेलं नव्हतं असं काम मागच्या तीन वर्षांत झालं आहे. रस्ते, पाणी आणि वीज सर्वत्र पोहोचते आहे. पाणी फाऊंडेशननेही या भागात त्यांच्या तज्ज्ञांकरवी वॉटरशेड प्रशिक्षण दिलं. यापुढे आम्ही गावागावांतील अंगणवाड्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत.”
आम्ही गप्पा मारत असताना एकीकडे ‘सोफा'मध्ये कुणी कुणी येत होते, शेतीमालाबद्दल चर्चा करत होते. रेजी आनंदाने ‘सोफा'च्या परिसरात काम पाहत होते. त्यांना तिथे कामात अडकलेलं पाहून मी रुग्णालयाकडे परतले.
तरुण डॉक्टर्सनी हा परिसर सतत गजबजलेला असतो. डॉक्टरांच्या केबिनमध्ये रुग्णतपासणीसाठी लाकडी टेबल होतं. डिझाइन अगदी वैज्ञानिक, पण लाकडी. जागोजागी पार्टिशनसाठी बांबूचा वापर केला गेला होता. कौलारू छतं आणि मोठे मोठे वृक्ष. सध्या रुग्णालयाचा भार वाहणारे डॉ. रवी यांनी एक गमतीदार माहिती दिली. ही जागा शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. जागेचं भाडं इथे असणाऱ्या वृक्षसंपत्तीवरून ठरतं. जागा घेतली तेव्हा हा परिसर अगदी वैराण असल्याने भाडं अल्प होतं; परंतु ‘टी.एच.आय.'ने अनेक रोपं लावून तगवली, त्यांचे वृक्ष झाले आणि आता त्याच वृक्षांमुळे ‘टी.एच.आय.'ला जास्त भाडं द्यावं लागतं.
डॉ. रवी यांच्या ऑफिसच्या शेजारी मेडिटेशनसाठी मोठा हॉल होता. डॉ. रवींनी काही महिन्यांपासून एक नवीन उपक्रम सुरू केला होता. दररोज सकाळी काम सुरू करायच्या आधी सर्वांनी या हॉलमध्ये एकत्र जमायचं. दहा मिनिटं ध्यान करून, कोणाला काही बोलायचं असेल तर चर्चा करून मग आपापल्या कामाला लागायचं. यामुळे सर्व स्टाफला एकत्र कुटुंब असल्याची जाणीव होते. इथे मला स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारा डॉ. प्रवीण भेटला, जवळपास माझ्याच वयाचा. भाषेचं अंतर असलं तरी आमची मैत्री लगेच जुळली. त्याचे इथले अनुभव आणि माझे छत्तीसगडमधील अनुभव आम्ही सोबत पडताळून पाहत होतो. त्याने प्रसूतिकक्षाजवळ असलेला नवजात शिशू कक्ष दाखवला. ‘इथलं काम कोण पाहतं?' या माझ्या प्रश्नावर प्रवीणचं उत्तर- “आमच्याकडे बालरोगतज्ज्ञ नसल्याने त्या कक्षाचं काम मी आणि डॉ. रवीच पाहतो.” डॉ. प्रवीण स्त्रीरोगतज्ज्ञ असला तरी रुग्णतपासणीमध्ये जास्त कौशल्य मिळवण्याच्या हेतूने त्याने त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन काही दिवस नवजात शिशुरोगाचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं. मला कौतुक वाटलं त्याच्या धडाडीचं. छत्तीसगडमध्ये मी सीझर करून बाहेर काढलेलं नवजात बालक माझ्या प्रशिक्षित नर्सेस तपासायच्या, कारण बालरोगतज्ज्ञ वेळेवर उपलब्ध नसायचे.
मला प्रवीणचं क्वार्टर पाहण्याचीही उत्सुकता होती. माझी कल्पना होती, की दोन-तीन खोल्या असलेलं एक मोठं घर असेल. संध्याकाळी अंधारात झाडाझुडपांतून वाट काढत आम्ही पोहोचलो एका मातीच्या कौलारू खोलीपाशी. खोलीत एका बाजूला छोटा किचन कट्टा. भिंतींवर रंगवलेली चित्रं. एकीकडे पुस्तकं पद्धतशीर लावलेली आणि शेजारी जुन्या पद्धतीचा टाइपरायटर. खोलीच्या मागे बाथरूम. तिथे शॉवर आणि वरती मोकळं आकाश. बाथरूमला छतच नव्हतं. लटकलेल्या शॉवरच्या शेजारी आकाशात दिसणारा चंद्र पाहून आम्ही दोघं हसलो. संडास म्हणजे शोषखड्डा. मी अवाक.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. त्या दिवशी बऱ्याच शस्त्रक्रिया होणार होत्या, असं डॉ. प्रवीणकडून कळलं होतं. तिथलं मैत्रीपूर्ण वातावरण पाहून मला सुखद धक्का बसला. डॉ. रवी मुख्य असल्याने त्यांची नियोजन करायची धावपळ चालू होती. डॉ. प्रवीणने जुनियर डॉक्टरसोबत रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया सुरू केली होती. तिच्या गर्भाशयात मोठी गाठ होती. चार-पाच जुनियर डॉक्टर्स शिकण्यासाठी उपस्थित होते. कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा न करता एका शिस्तीत काम चालू होतं. डॉ. रवी स्वतःच्या देखरेखीखाली तरुण डॉक्टर्सना स्वतंत्रपणे बरंच काम करायला देत होते.
मला शहरातील कॉर्पोरेट रुग्णालयांमधील चित्र आठवलं. जो सीनियर किंवा वृद्ध डॉक्टर असतो तोच सर्व शस्त्रक्रिया करणार आणि ते करत असताना बाकीच्यांवर सतत चिडचिड करणार. जुनियर डॉक्टरांना हमालीकाम लावून, त्यांचा पाणउतारा करत स्वतःचा उदो उदो करत राहणार. अशा विचित्र वातावरणाला कंटाळून, गुलाम डॉक्टर बनायचं नाकारून मी आदल्याच वर्षी माझ्या गुणवत्तेवर मिळवलेला मोठ्या दवाखान्यातील प्रवेश सरळ सोडून दिला होता. काही सरकारी मेडिकल कॉलेजमध्येही आजकाल हीच स्थिती आहे. ज्येष्ठ डॉक्टर्स स्वतः केलेल्या शस्त्रक्रियांचे आकडे प्रसिद्ध करून कसला आनंद मिळवतात, कोण जाणे. त्यापेक्षा तुम्ही किती नवीन डॉक्टरांना शस्त्रक्रिया शिकवली हे आकडे प्रसिद्ध करायला हवेत. असो.
डॉ. रवींनी मध्येच मला एका जुनियर डॉक्टरला मदत करायची विनंती केली. मीही आनंदाने त्यांच्या कुटुंबात तात्पुरती का होईना पण सामील झाले. डॉ. रवी यांनी ‘रुरल सर्जरी' या विषयात उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यांचं ध्येय ‘टी.एच.आय.'शी सुसंगत असल्याने ते इथे रुजू झाले. त्यांनी रुग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग अधिक सुसज्ज बनवला आणि मोठ्या शस्त्रक्रियासुद्धा करायला सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतील लोकांची सोय झाली.
मध्येच सामोसे खाऊन सर्वजण पुन्हा कामाला लागले. दोन वर्षांचं वयाचं एक बाळ रुग्णालयात आलं होतं. त्याच्या गालाजवळचा भाग पू भरल्याने टम्म फुगला होता. डॉ. रवी यांनी भूल देऊन ती जखम उघडी केली आणि सर्व पू बाहेर काढला. यात प्रचंड वेदना होतात, त्यामुळे भूल व्यवस्थित द्यावी लागते. म्हटलं तर सहज होणारी शस्त्रक्रिया. पण बाळाचं वय पाहता ग्रामीण भागातील डॉक्टर्स भूल द्यायला घाबरतात आणि नातेवाइकांना शहरातील मोठ्या दवाखान्यात जायला सांगतात. मग वेळ जातो, आजार वाढतो, खर्च वाढतो आणि ही लहान आरोग्यसमस्या एक मोठी गुंतागुंतीची आर्थिक आणि सामाजिक समस्या होऊन बसते.
डॉ. रवींची पत्नी प्रेमा रुग्णालयात सीनियर नर्स आहेत. रवी कौतुकाने सांगतात, 'आमचा ९० टक्के स्टाफ स्थानिक आदिवासी लोकांपैकी आहे. आम्ही जुन्या सीनियर नर्सेसना इथेच प्रशिक्षण दिलं, त्याच आता नवीन नर्सेसना ट्रेन करतात. जुन्या काळातील किती तरी नर्सेस दहावी पाससुद्धा नाहीत, पण त्या त्यांच्या कामात हुशार आणि बिनचूक आहेत. इथल्या खेड्यांत त्यांना तेव्हा औपचारिक शिक्षणाची संधीच उपलब्ध नव्हती. मग आपण जे समानतेचं तत्त्व मानतो ते कसं अस्तित्वात येणार? या रुग्णालयाची हीच विशेष बाब आहे, की स्थानिक लोकांना सोबत घेऊन हे काम उभं राहिलं आहे. त्यामुळे त्यांना आमच्या कामाबद्दल विश्वास वाटतो.” पूर्वीच्या आरोग्य साहाय्यिका आता बऱ्याच वृद्ध झाल्याने पुन्हा नव्याने प्रशिक्षण सुरू करायचा विचार असल्याचंही रवी सांगतात. सध्या रुग्णालयातील तीन नर्सेसना फील्डवर पाठवलं जातं. त्यांच्याद्वारे लोकसंख्येची माहिती गोळा केली जाते. खेड्यांमध्ये ६० वर्षं वयापेक्षा जास्त लोकांसाठी क्लिनिक चालवलं जातं, कारण त्यांना औषधं घेण्यासाठी सतत रुग्णालयात येण्याची गरज भासू नये.
'टी.एच.आय.'ने सुरू केलेला आणखी एक उपक्रम बघण्यात मला उत्सुकता होती- पोरगाई हस्तकला केंद्र.
या हस्तकला केंद्राची कथा मोठी न्यारी आहे. लम्बाडी नावाच्या फिरस्त्या लोकांना ही कपड्यांची हस्तकला अवगत होती. त्यांच्यामध्ये कॉलराच्या साथीने अनेक लोक मेले. शेवटी फक्त चार लोक शिल्लक राहिले, जे इथे येऊन स्थायिक झाले आणि पुन्हा त्यांची संख्या वाढली. ललिता यांना लम्बाडी लोकांच्या या कापडावरील हस्तकलेबद्दल कळलं तेव्हा त्यात फक्त दोनच स्त्रिया या कलेत कुशल होत्या. मग ललिता त्या भागातल्या इतर स्त्रियांशी बोलल्या, त्यांच्यापैकी कुणाला ही कला शिकण्यात रस आहे का हे त्यांनी विचारलं. अनेक तरुणींनी तसा रस दाखवला. मग ललितांनी त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यातूनच पोरगाई हस्तकला केंद्र जन्माला आलं. पोरगाई याचा अर्थ आत्मसन्मान. सध्या ललिता तीन दिवस रुग्णालयात देतात, तर तीन दिवस पोरगाईमध्ये देतात. ६८ महिला आणि तीन पुरुष इथे काम करत आहेत.
पूर्वी शेतीतून पुरेसं उत्पन्न निघत नसल्याने अनेक स्त्रिया स्थलांतर करायच्या, पण पोरगाईचं काम सुरू झाल्यापासून ते स्थलांतर कमी झालं आहे. स्त्रियांना त्यांचे हक्काचे पैसे तर मिळतातच, पण त्यासोबत कलानिर्मितीचा आनंदही त्यांना मिळतो. खरं तर आपल्या देशात शेतीपाठोपाठ हस्तकला उद्योग दुसऱ्या क्रमांकावर होते; पण मागच्या काही दशकांत ते घटत चालले आहेत. एक तर मोठ्या ब्रँड्सने काबीज केलेलं मार्केट आणि स्वस्त वस्तूंची उपलब्धता. पण अशा छोट्या उद्योगाकडून वस्तू विकत घेण्यात एक ‘पर्सनल टच' असतो जो ऑनलाइन शॉपिंग किंवा मॉलमध्ये हरवतो. तसंच जेव्हा आपण स्वस्त वस्तू विकत घेतो तेव्हा खरं तर शोषणातून बनवलेल्या मालाला उत्तेजन देत असतो
दुपारी चार वाजता मी पोरगाईच्या इमारतीत गेले. दोन दिवसांनी मुंबईला होणाऱ्या काला घोडा फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हायला पोरगाईचे कपडे घेऊन ललिता आणि काही महिला सहकारी जाणार होत्या. त्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. एका खोलीत खाली फरशीवर ललिता बसल्या होत्या. हातात एकेक साडी घेऊन, त्यावर काम करण्यासाठी विविध रंगांचे धागे शोधून ठेवण्याच्या कामात त्या रमून गेल्या होत्या. ललिता सांगतात, 'लोकांसाठी रोजगारनिर्मिती करणं हाही आरोग्याचा एक पैलू आहे. पोरगाई हे आम्हाला मर्यादित साधनांमध्ये हळूहळू वाढणारं उत्पादन ठेवायचं आहे. बाजारातील स्पर्धेत भाग घ्यायला आमचा सपशेल नकार आहे. अनेक स्त्रियांना इतके दिवस जी संधी मिळाली नव्हती, ती पोरगाईद्वारे मिळाल्याने त्यांना स्वतःची किंमत समजली, सन्मान मिळाला.”
आम्ही दोघी गप्पा करत घरी पोहोचलो. घराच्या आत मध्यभागी मोठा खड्डा आणि त्यात बहरलेली विविध झाडं, वेली. वरती छतातून येणारा प्रकाश. न राहवून मी म्हणाले- “माझ्या आयुष्यात मी पाहिलेलं हे सर्वांत सुंदर घर आहे.” थोड्या वेळाने रेजीही आले. फिल्टर कॉफी पीत आमच्या तिघांच्या गप्पा रंगल्या. त्यांच्या कॉलेजजीवनातील आठवणी ऐकण्यात ती संध्याकाळ कशी गेली कळलंच नाही. एकीकडे मी त्यांना अनेक प्रश्न विचारत होतेच. एका प्रश्नाचं उत्तर देताना रेजी म्हणाले, ''यश हे काही आयुष्याचं गंतव्य नसतं. तो एक छोटा टप्पा असतो. एका टप्प्यावरून पुढच्या टप्प्याकडे जात राहिलं पाहिजे. आमच्या डोक्यातही सतत तेच चालू असतं, की पुढे आणखी काय करायचं.” ललिता कळकळीने सांगत होत्या, ''आरोग्यसेवेचं मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण होत चाललं आहे. प्रत्येक गोष्ट नफ्याच्या स्वरूपात पाहिली जाते. नवीन डॉक्टरांनासुद्धा मग या सर्व व्यवस्थेत कुठे तरी फिट होण्याची चिंता भेडसावते. आमची इच्छा आहे, की डॉक्टरांना ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था बळकट करण्याची गरज, कमी संसाधनांत काम करण्यातील जिद्द, मेहनत समजावी. खरं तर ग्रामीण आरोग्यव्यवस्थेला शासनाने प्राधान्य द्यायला हवं. यासाठी आपल्या सर्वांनाच मिळून लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे.'
'टी.एच.आय.'तर्फे तरुण डॉक्टरांसाठी ‘ट्रॅव्हलिंग फेलोशिप' सुरू केली गेली आहे. त्यायोगे देशात तळागाळात काम करणाऱ्या विविध निवडक आरोग्यसंस्थांमध्ये तरुण डॉक्टर्स काही काळ काम करून शिकू शकतील. ‘सर्च'मधील डॉ. बंग यांच्या ‘निर्माण' या शिबिरांपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेलं ‘आर.एस.पी.' हे शिबिरसुद्धा गेल्या काही वर्षांत आकार घेत आहे. डॉक्टरवर्गाने स्वतःचं आणि देशातील आरोग्यव्यवस्थेचं परीक्षण करून सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल याचं चिंतन करावं, हा या शिबिराचा हेतू आहे.
१९७८ मध्ये अल्मा आटा डिक्लरेशन नावाने आरोग्याची उद्घोषिका प्रसिद्ध झाली, त्यात आरोग्याची सर्वांगीण व्याख्या बनवली गेली, ती जागतिक आरोग्य संघटनेने अंगीकारली. ती म्हणजे, 'आरोग्य म्हणजे फक्त आजार अथवा दुर्बलतेचा अभाव नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्हीही मितींमधील एकूण स्वास्थ्य असणं म्हणजे आरोग्य.' रेजी आणि ललिता आरोग्याच्या अशा सर्वांगीण व्याख्येवर काम करत आलेले आहेत.
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान सांगितलं जातं, की रुग्णालयाच्या चार भिंतींत राहून सर्व समाजाला आरोग्यवान बनवता येईल. माझी ही समजूत किती तकलादू होती हे मला कॉलेजातून बाहेर पडल्यावर, ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम केल्यावर लक्षात आलं. छत्तीसगडमध्ये काम करताना माझी रुग्ण महिला रुग्णालयात माझ्या डोळ्यांदेखत तरी व्यवस्थित असायची; पण ती घरी परत गेली की पुन्हा तिचा आजार उफाळून वरती यायचा आणि ती परत माझ्याकडे यायची. रुग्णालयात कुशल नर्सच्या हातून जन्माला आलेलं बाळ घरी गेलं की चार दिवसांत मृत होऊन परत यायचं. अशा वेळी आरोग्यव्यवस्थेचं हे सपशेल अपयश पाहून मी अस्वस्थ होऊन जायचे. त्यातूनच कुठे तरी माझा अशी ठिकाणं शोधायचा प्रवास सुरू झाला, जिथे आरोग्य चार भिंतींच्या बाहेरसुद्धा निवास करत असेल. सितिलिंगीला जाऊन, डॉ. रेजी आणि
डॉ. ललिता यांना भेटून मला किती मोठी ऊर्जा मिळाली, हे वेगळं सांगायला नकोच.'
टी.एच.आय. संपर्क : thisittlingi@gmail.com
(अनुभव, सप्टेंबर २०२३च्या अंकातून साभार.)
डॉ. ऐश्वर्या रेवडकर
डॉ. ऐश्वर्या रेवडकर स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी पाच वर्षं आदिवासी भागात काम केलं आहे.
