महाराष्ट्रातील तसंच देशातील अनेक भागांमध्ये बऱ्याच काळापासून जलपर्णी (जलकुंभी, वॉटर हायसिंथ) या पाणवनस्पतीने काळजीचं वातावरण निर्माण केलं आहे. ही एक पाण्यावर तरंगणारी, हिरव्या पानांची आणि निळ्या-जांभळ्या फुलांची आक्रमक वनस्पती आहे. नद्या, तलाव, साचलेल्या पाण्यात ती फार वेगाने वाढते. पाण्याला झाकून टाकते. तिला पाणफुटी असंही नाव आहे. तर कुणी तिला बंगालची दहशतवादीय असंही म्हणतात.
या वनस्पतीची पानं जाड, हिरवी, तर फुलं फिकट जांभळ्या-निळ्या रंगाची असतात. ही वेलीसारखी वनस्पती खूप वेगाने वाढते आणि पाण्याचा पृष्ठभाग झाकून टाकते. त्यामुळे ती पाण्यातला प्राणवायू (ऑक्सिजन) कमी करते. अर्थातच मासे व इतर जलचरांना धोका निर्माण होतो.
मूळ दक्षिण अमेरिकेतील ही वनस्पती. केवळ शोभेसाठी म्हणून या वनस्पतीचं भारतात आगमन झालं. पण आता ती आपल्या आक्रमक गुणधर्मामुळे इथल्या परिसंस्थेला हानी पोहोचवत आहे.
या जलपर्णीपासून सुटका कशी करायची, हा आपल्याकडे दीर्घकाळापासून पडलेला प्रश्न होता. ती कितीदाही काढली तरी नष्ट होत नाही, उलट आणखी जोमाने वाढते. ती नद्यांमध्येही पसरते. नद्यांना पूर आले तर ती वाहून जाते. पण शिल्लक काहींमधून नंतर पुन्हा पसरायला लागते.
जनावरं जलपर्णी खात नाहीत. उलट तिच्या पसाऱ्यात माणसांचे, जनावरांचे पाय अडकण्याची भीती असते. तिची मुळं दाटीवाटीने पसरलेली असतात. मुळांसकट जलपर्णी उपटून काढली तरच काही प्रमाणात तरी तिचा प्रतिबंध करता येतो. मुख्य म्हणजे सतत देखरेख ठेवून ती पुन्हा दिसली, तर लगेच काढून टाकावी लागते.
अनिकेत धर आणि रुपंकर भट्टाचारजी हे दोन तरुण या गंभीर समस्येवर काम करत होते. त्यांना या जलपर्णीवर शाश्वत उपाय शोधायचा होता, जो निसर्ग आणि मानव दोघांसाठीही फायद्याचा ठरेल. त्या दृष्टीने प्रयत्न करताना त्यांना जलपर्णीपासून हातकागद बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी आसाममध्ये गुवाहाटी इथे ‘कुंभी कागज' हा स्टार्टअप सुरू केला. आता त्यांच्या या प्रकल्पातून रसायनमुक्त हातकागद (हँडमेड पेपर), तसंच इतर स्टेशनरी तयार केली जाते. त्यामुळे पर्यावरणाला फारसा धोका निर्माण होत नाही.
जलपर्णीमध्ये काष्ठतंतू (सेल्युलोज) मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जलपर्णीपासून पर्यावरणपूरक कागद बनवता येईल, असं दोघांना वाटलं. बऱ्याच विचाराअंती त्यांनी जलपर्णी काढून ती आठवडाभर उन्हात वाळवून तिच्यातून तंतू काढायचं तंत्र विकसित केलं.
‘आमच्या फील्डवर काम करण्याच्या अनुभवामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळाली,’ असं रुपंकर म्हणतो. तो सांगतो, की ‘एका अजगराला त्याच्या अधिवासात सोडताना एका एनजीओच्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही होतो. त्यावेळीच ही जलपर्णी तिथल्या स्थानिक जलचरांसाठी किती घातक आहे, हे आम्हाला कळलं.’ नंतर त्यांचे मार्गदर्शक डॉ. जयादित्य पुरकायस्थ यांनी जलपर्णीबाबत सविस्तर माहिती दिली. ते सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी जलपर्णीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो ते सांगितलं. नंतर या दोघांनी जलपर्णीबाबत संशोधन करायला सुरुवात केली.
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे त्यांना या प्रकल्पासाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहायला चांगला वेळ मिळाला. त्यावेळी त्यांनी पर्यावरणरक्षणाबाबत जागृती करणाऱ्या ‘इनसाइड आउट' या संस्थेची स्थापनाही केली. ते त्यांच्या भटकंतीत जैववैविध्याची नोंद करत असत. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विस्तारला. त्याच वेळी त्यांच्या मनात विचार आला, की आसाम हा केवळ त्याच्या चहाकरता ओळखला जातो. त्याला आणखी एक ओळख देऊ शकतो- ‘जलपर्णीपासून कागद बनवणारा’.
हेही वाचा - पुण्याच्या नद्या : सुशोभीकरण नव्हे, पुनरुज्जीवन हवे
या उपक्रमाकरता संशोधन आणि कागद निर्मितीसाठी तसंच शास्त्रीय विकासासाठी मधुरिमा दास यांची खूपच मदत झाली, असं धर आणि भट्टाचारजी आवर्जून सांगतात.
‘आमचा उद्देश जलपर्णी संपूर्णपणे नष्ट करण्याचा नाही,’ असंही ते स्पष्ट करतात. ते म्हणतात, की “ही वनस्पती दोनशे वर्षांपासून परिसंस्थेचा भाग बनली आहे. ती वेगाने पाण्याचा पृष्ठभाग आच्छादते, सूर्यप्रकाश अडवते आणि जलाशयाला पूर्णपणे झाकून टाकते. त्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होतो. ही वनस्पती मेली, की पाण्याच्या तळाला जाते. त्यामुळे गाळ वाढतो. पाण्याची खोली कमी होते. तलावाच्या पाणी धारण करण्याच्या क्षमतेत घट होते. ती माशांच्या प्रजननाला अडथळा निर्माण करते. ती सारा जलायशच प्रदूषित करत फोफावते. त्यामुळे ताज्या पाण्यात मासेमारी करणाऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्याबरोबरच पर्यटकांची संख्याही घटते."
अनिकेत सांगतो, की आम्ही आसामचं एकमेव रामसरस्थळ ‘दीपॉर बील' इथे काम करत होतो, तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं, की ‘आता मासेमारीचं काम खूपच अवघड झालं आहे. आम्हाला ही वनस्पती काढण्यासाठी खूप खर्च येतो. तरीही ती तलावाच्या काही भागांतूनच काढणं शक्य होतं.’
याचा परिणाम पर्यटनावरही होतो. गोलपारा इथला उर्पद बील तलाव तिथल्या हंगामी कमळांमुळे आणि स्थलांतरित पक्ष्यांमुळे ‘पिंक पॅरेडाइज' म्हणून ओळखला जातो. पण तिथेही या जलपर्णीने १,२५६ हेक्टरमधील पाण्याचा पृष्ठभाग अनेक ठिकाणी झाकून टाकला आहे.
हेही वाचा - पुणेकरांनी का केलं चिपको आंदोलन?
धर आणि भट्टाचारजी यांचा हा स्टार्टअप काझीरंगा अभयारण्याजवळ आहे. तिथे जलपर्णी यंत्रांनी नाही तर माणसांकरवीच काढली जाते. कारण यंत्रात साप, पक्षी आणि जलचरही अडकून मरण पावतात. अशी जीवितहानी त्यांना होऊ द्यायची नव्हती. म्हणून त्यांनी स्थानिकांनाच ते काम देण्याचं ठरवलं. तिथले स्थानिक लोक पाण्यात काम करण्यात कुशल आहेत. शिवाय यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आहे. प्रत्येकजण दिवसाला साधारण २०० किलोग्रॅम जलपर्णी काढतो.
पाण्यातून बाहेर काढल्यावर या वनस्पती आठवडाभर उन्हात सुकवल्या जातात. त्यामुळे त्यांचं वातावरणात हरितवायू सोडण्याचं प्रमाण कमी होतं. नंतर त्यांवर प्रक्रिया करून त्यांपासून तंतू आणि कागद तयार केला जातो. ताज्या एक टन जलपर्णीपासून १०० किलो सुके तंतू मिळतात. त्यांपासून साधारण ८० ते ९० किलो कागद तयार होतो. तो रसायनमुक्त असतो. सध्या त्यापासून विघटनशील वह्या, जर्नल्स, कॅलेंडर्स, दैनंदिनी, नोंदवह्या बनवल्या जातात. त्यांपासून कंपोस्टही बनवता येतं.
पक्षी आणि जलचरांच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन करण्यासाठीही या प्रकल्पाची मोठी मदत होत आहे. कारण जलपर्णी जिथून काढली जाते, तिथे कमळं आणि लिली पुन्हा उमलताना दिसतात. त्यांच्या पानांवर अंडी घालणारे फेझांट टेल्ड म्हणजे -तितरसारखी शेपटी असलेले- जकानासारखे पक्षीही येतात. अन्य काही जलचर पुन्हा दिसू लागतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात' या कार्यक्रमात धर आणि भट्टचारजी यांच्या या उपक्रमाची नोंद घेतल्यावर त्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली. तेव्हापासून याबाबत माहिती घेण्यासाठी या दोघांना देशभरातून फोन येत आहेत.
जलपर्णीला पुरता नाही तरी काही प्रमाणात आळा घालण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होईल. माशांच्या अंडी घालण्याच्या जागा सुरक्षित राहतील. शिवाय या प्रकारचे उपक्रम अनेक ठिकाणी सुरू झाले तर तिथे स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीही होईल. त्याबरोबरच पर्यावरण रक्षणदेखील होईल. अशा या उपक्रमाचं स्वागत करायला हवं आणि त्याबरोबरच नवउद्यमींनीही याकडे ध्यान द्यायला हवं. त्यासाठी जाणकार आणि हातकागद संस्थेची मदतही घेता येईल.
आ. श्री. केतकर | aashriketkar@gmail.com
आ. श्री. केतकर हे ज्येष्ठ पत्रकार असून ते प्रामुख्याने क्रीडा आणि सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
