आम्ही कोण?
आडवा छेद 

मायक्रोप्लास्टिकचा मेगाप्रश्न

  • प्रीति छत्रे
  • 25.04.25
  • वाचनवेळ 1 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
microplastic issue header

घरी दोस्तमंडळींची पार्टी असते म्हणून, किंवा कधीकधी ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो म्हणून, आपण फूड डिलिव्हरी ॲप्सवरून आपल्याला हवे ते पदार्थ मागवतो. प्लास्टिकच्या वेगवेगळ्या आकार-उकारांच्या डब्यांमधून हे पदार्थ घरपोच येतात. हे प्लास्टिकचे डबे थेट मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवता येतात. जेवणाची वेळ झाली की मायक्रोवेव्हमध्ये हवे ते पदार्थ गरम करून घ्यायचे की झालं. अतिशय सोयीची पद्धत आहे ही.. ‘सोयीचं असणं’ हा एकेकाळी प्लास्टिकचा गुणधर्म म्हणता आलाही असता. पण ही सोयच आता समस्त सजीवसृष्टीच्या मुळावर उठली आहे, ती मायक्रोप्लास्टिकच्या रूपाने.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे अगदी बारीक कण- ५ मिमी किंवा त्याहून लहान आकाराचे. प्लास्टिकचं विघटन होत नाही. त्यामुळे त्याचे बारीक बारीक कण होत राहतात. आपल्या भोवती हे कण सगळीकडे आहेत- डोंगरदर्‍यांमध्ये, जंगलांमध्ये, मातीत, नदी-समुद्रात. हे मायक्रोप्लास्टिक माऊंट एव्हरेस्टवर आणि मरियाना ट्रेंचमध्येही (जगातील सर्वात खोल जागा) पोचलंय. नळाच्या पाण्यात, अगदी हवेत सुद्धा ते आहे. खाद्यपदार्थांमधून, प्यायच्या पाण्यातून, श्वासोच्छ्वासातून हे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातं. आपल्या शरीराच्या सर्व घटकांमध्ये मायक्रोप्लास्टिकने प्रवेश केला आहे. मातेच्या दुधात, अगदी नवजात बालकाच्या पहिल्या विष्ठेतही ते आढळून आलं आहे. ‘नाकातोंडात पाणी जाणं’ या वाक्प्रचारातून अभिप्रेत असणारी अवस्था आपल्या नाकातोंडात जाणार्‍या मायक्रोप्लास्टिकने आपल्यावर आणली आहे.

काही मूठभर जागरुक नागरिक न चुकता प्लास्टिक रिसायकल करतात. घरात येणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, बाटल्या, इतर वस्तू वापरून झाल्या की केरात न टाकता साठवून ठेवतात आणि रिसायकलिंगचं काम करणार्‍या संस्थांकडे सुपूर्द करतात. पण संशोधकांच्या म्हणण्यानुसार रिसायकलिंगच्या अशा कोणत्याही प्रयत्नांनी मायक्रोप्लास्टिकच्या अस्तित्वाला धक्काही लागत नाही. कारण मायक्रोप्लास्टिकने आपला कार्यभाग त्याआधीच उरकलेला असतो.

microplastic issue header inside

‘मायक्रोप्लास्टिक’ ही गोष्ट सर्वात पहिल्यांदा समोर आली ती १९९३ साली, इंग्लंडमध्ये. अर्थात तेव्हा हा शब्द कुणालाही माहिती नव्हता. रिचर्ड थॉम्पसन हा मरीन इकॉलॉजीस्ट आपल्या सहकार्‍यांबरोबर एका समुद्रकिनार्‍याची स्वच्छता करायला गेला होता. तिथे प्लास्टिकचा लहानमोठा कचरा गोळा करत असताना वाळूतल्या रंगीबेरंगी कणांनी रिचर्डचं लक्ष वेधलं गेलं. नीट पाहिलं असता त्याला दिसलं, की ते रंगीबेरंगी कण नैसर्गिक नव्हते, तर बारीक आकाराचं प्लास्टिकच होतं. पुढे अनेक वर्षं रिचर्ड थॉम्पसन आणि त्याच्या संशोधक सहकार्‍यांनी या गोष्टीचा माग काढला आणि साधारण २००४ मध्ये ‘मायक्रोप्लास्टिक’च्या अस्तित्वाला पुष्टी मिळाली. थॉम्पसनला ‘फादर ऑफ मायक्रोप्लास्टिक’ म्हटलं जाऊ लागलं.

मुळात प्लास्टिकचा शोध लागला तो हस्तिदंताला पर्याय म्हणून. लवचिकता हा त्याचा प्रमुख गुणधर्म. सुरुवातीला नैसर्गिक सेल्युलोजपासून या लवचिक वस्तू तयार होत होत्या. त्यांचा वापर अगदी मर्यादित होता. कृत्रिम घटकांपासून त्याची निर्मिती होऊ लागली. बघताबघता इंजिनिअरिंग, मेडिसीन अशा उद्योगव्यवसायांमध्ये या कृत्रिम प्लास्टिकने जम बसवायला सुरुवात केली.

दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेत प्लास्टिक लोकप्रिय झालं. घराघरांत दिसायला लागलं. पण प्लास्टिकच्या वस्तूंचा नेमका वापर कसा करायचा, त्यांची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या, गरम पदार्थ त्यांत ठेवल्याने काय होऊ शकतं, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना काहीही माहिती दिली गेली नाही. केवळ ‘सोय’ पाहिली गेली.

पुढेपुढे सौंदर्यप्रसाधनांमध्येही मायक्रोप्लास्टिकचा वापर सुरू झाला. एक्सफोलिएटींग स्कीन क्रीम वगैरे शब्द तुम्ही जाहिरातींमधून ऐकले असतीलच. त्यात हे तथाकथित एक्सफोलिएटींगचं काम कोण करतं? तर प्लास्टिकच. पाण्याने चेहरा धुवून टाकला की झालं असं आपल्याला वाटतं, पण ते पाणी, त्यातलं हे मायक्रोप्लास्टिक पुढे नदी-समुद्रात जातं. त्या पाण्यावर जगणार्‍या प्राणी-वनस्पतींमध्ये ते प्रवेश करतं. एवढंच नव्हे, तर या मायक्रोप्लास्टिकमुळे आज आपल्या संप्रेरकांनाही धोका निर्माण झाला आहे.

मायक्रोप्लास्टिकच्या प्रश्नावर ना समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता करणं पुरेसं आहे, ना बायोडीग्रेडेबल प्लास्टिक हा त्यावरचा उपाय आहे. प्लास्टिक रिसायकल करूनही फारसा फायदा होण्यातला नाही. कारण रिसायकल करणार्‍या संस्थांकडे प्लास्टिकचा कचरा नेऊन दिला की प्लास्टिकची सृष्टी आपल्या दृष्टीआड जात असली तरी शेवटी त्यातला जेमतेम १० ते २० टक्के प्लास्टिक कचराच खर्‍या शास्त्रशुद्ध पद्धतीने रिसायकल होतो.

शिवाय आपण ज्याला ‘प्लास्टिक कचरा’ म्हणतो तो आपल्या डोळ्यांना दिसतो. पण मायक्रोप्लास्टिक आपल्याला दिसत नाही. पण त्यामुळेच त्याच्यापासून असणारा धोका अधिक गंभीर आहे.

रिचर्ड थॉम्पसनच्या सांगण्यानुसार यावरचा उपाय, म्हणजे एकदा वापरून फेकून देता येऊ शकणार्‍या (सिंगल युज) प्लास्टिकचा वापर बंद करणं. थॉम्पसनचं म्हणणं ऐकायचं ठरवलं, तर आज आपलं शहरी दैनंदिन जीवन जवळपास ठप्प होईल. आहे त्याला आपली तयारी? 

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

अस्मिता फडके30.04.25
माहितीपूर्ण लेख
संगीता 25.04.25
महत्त्वपूर्ण विषयावरचे लेखन. नुकताच मायक्रोप्लास्टिक वरचा संशोधन लेख वाचण्यात आला आणि लगेच आपला त्याचं विषयावरचा लेख वाचायला मिळाला. धन्यवाद 🙏
See More

Select search criteria first for better results