"देशातील काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवर टीका करतात. ते झुरळासारखे असतात. त्यांना रोजगार मिळत नाही. रोजच्या जगण्यातही त्यांना कुणी विचारत नाही. त्यापैकी काही लोक मीडियात जातात. काहीजण सोशल मीडियावर सक्रिय होतात, तर काहीजण माहिती अधिकाराचे कार्यकर्ते बनतात. आणि हेच लोक व्यवस्थेवर हल्ला करण्याचं, ट्रोल करण्याचं काम करतात." अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांनी मागील आठवड्यात केली.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अभूतपूर्व वादळ निर्माण झालं. त्या वादळाचा केंद्रबिंदू होता अभिजित दिपके हा ३० वर्षीय तरुण. देशातील युवकांच्या बेरोजगारीची कारणं समजून घेऊन त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न केला जात नाही. देशातील बाकी महत्त्वाच्या समस्यांवरही बोललं जात नाही. उलट त्यांची हेटाळणी करण्याचं काम देशातील सर्वोच्च पदावरील जबाबदार व्यक्ती करते, हे खटकल्यामुळे अभिजितने 'कॉक्रोच जनता पार्टी' ही वेबसाईट आणि त्याच नावाने सोशल मीडिया अकाऊंटही सुरू केलं. तुम्ही आम्हाला झुरळ समजत असाल तर आम्ही झुरळ म्हणूनच काय करून दाखवतो ते बघा, असं त्याचं म्हणणं होतं.
हा लेख लिहीत असताना अभिजितने सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर दीड कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील कुठल्याही राजकीय पक्षाच्या फॉलोअर्सपेक्षा ही संख्या जास्त आहे. (काँग्रेस – १ कोटी ३३ लाख फॉलोअर्स, भाजप – ८० लाख ७० हजार फॉलोअर्स, आम आदमी पार्टी – १९ लाख फॉलोअर्स) अवघ्या ५ दिवसांत करोडो लोकांचा पाठींबा मिळवण्याची भारताच्या सोशल मीडिया विश्वातील ही पहिलीच घटना.
अभिजितने अकाऊंट काढल्यानंतर आणि सोशल मीडियावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनाही त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं. माझं म्हणणं हे एका विशिष्ट केस संदर्भात होतं आणि त्याचा विपर्यास केला गेला असं सारवासारव करणारं उत्तर त्यांनी दिलं. पण तरीही लोकांनी आणि विशेषतः जेन झी तरुणांनी रविवारपासून कॉक्रोच जनता पार्टीला डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. अर्थात एकूण फॉलोअर्सचा आकडा पाहता सर्वच वयोगटातील लोकांनी यात सहभाग नोंदवल्याचं दिसून येतंय.
हेही वाचा - पोलीस भरतीसाठीचे लक्षावधी अर्ज काय सांगताहेत?
अभिजितने कॉक्रोच जनता पार्टी उपहास म्हणून सुरू केली असली आणि विद्यमान सरकारला आरसा दाखवण्याचं काम करणं हेही त्याचं उद्दिष्ट असलं तरी इतर कोणत्याही राजकीय पक्षाप्रमाणे या पक्षानेही आपली ध्येयधोरणं, जाहीरनामा आणि बेसलाइन जाहीर केली आहे. ही तरुणांनी तरुणांसाठी सुरू केलेली राजकीय आघाडी अशी पार्टीची बेसलाईन असल्याचं अभिजित सांगतो. आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज हे पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात पाच मुख्य मुद्दे मांडले आहेत.
१) कुठल्याही सरन्यायाधीशाला त्याच्या निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही.
२) कॉक्रोच जनता पार्टी शासित किंवा अन्य कोणत्याही राज्यातील मतदारांचं मत कुठल्याही कारणांनी रद्द झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना UAPA कायद्याअंतर्गत शिक्षा करण्यात येईल. कारण नागरिकांचे अधिकार हिरावून घेणं हे कुठल्या दहशतवादी कृत्यापेक्षा कमी नाही.
३) संसदेच्या जागांमध्ये वाढ न करता महिला आरक्षण ५० ट्क्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. शिवाय महिलांना ५० टक्के मंत्रिपदंही दिली जातील.
४) अदानी आणि अंबानी यांची मालकी असलेल्या मीडिया चॅनेल्सची मान्यता रद्द करण्यात येईल. शिवाय गोदी मीडिया अँकरच्या बँक खात्यांची कसून चौकशी केली जाईल.
५) एखादा आमदार किंवा खासदार एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्याला निवडणूक लढवायला २० वर्षांची बंदी घातली जाईल.
पक्षाचा सदस्य होण्यासाठी आळशी असणं, बेरोजगार असणं किंवा बेरोजगार आहे असं वाटणं, सतत ऑनलाईन असणं आणि महत्त्वाचा प्रश्नांवर आवाज उठवण्याची तयारी असणं या मूलभूत अटी अभिजितने मांडल्या आहेत. पक्षाची उभारणी करण्याचा हेतू सांगताना अभिजित म्हणतो, "आम्ही इथे आणखी एक 'पीएम केअर फंड' उभारण्यासाठी, करदात्यांच्या पैशांवर दावोसमध्ये सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी किंवा भ्रष्टाचाराला धोरणात्मक खर्च असं गोंडस नाव देण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथे फक्त जाहीरपणे, वारंवार आणि लेखी स्वरूपात 'पैसा गेला कुठे?' हे विचारण्यासाठी आलोय." कॉक्रोच जनता पार्टीचं निवडणूक चिन्ह मोबाईलमध्ये दिसणारं झुरळ आहे. सोशल मीडियावरील या आंदोलनाच्या निमित्ताने अधिकाधिक बेरोजगार आणि सजग तरुणांना अभिजितने जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला असून त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा - १५ ते २९ वयोगटातील १३ टक्के मनुष्यबळ बेरोजगार
बेरोजगारी, पेपरफूट, सत्तेसाठी पक्षांतर, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, आरोग्यव्यवस्थेतील हेळसांड, मोठ्या उद्योगपतींची मोनोपॉली हे मुद्दे घेऊन सोशल मीडिया सेन्सेशन तयार करण्यात कॉक्रोच जनता पार्टीला व्हर्च्युअल जगात तरी यश मिळालेलं आहे. सत्तेविरोधात क्षीण वाटणारा आवाज एकाएकी मोठा आणि तीव्र झाला आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सिनेअभिनेता जोसेफ विजयने केलेली हवा देशवासीयांनी एप्रिल महिन्यात अनुभवली, त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच कॉक्रोच जनता पार्टीने देशवासीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम हँडलवर आतापर्यंत जवळपास ६० पोस्ट पडल्या असून प्रत्येक पोस्ट दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. काही पोस्ट तर अगदी दोन करोडहून अधिक लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. जवळपास ३० हून अधिक माध्यमांनी (स्वतंत्र/प्रस्थापित) अभिजितच्या मुलाखती घेतल्या आहेत. एका मराठी तरुणाने देशभरातील अस्वस्थ तरुणांना एकत्र येण्याचं व्यासपीठ दिलंय, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.
अभिजित मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. त्याने पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असून तो सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याने आधी आम आदमी पक्षासोबत दिल्लीत काम केलेलं आहे. दिल्लीतील शाळांमध्ये शिक्षणविषयक मॉडेल राबवण्यात त्याने महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती. पण सध्या माझा आम आदमी पक्षाशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण अभिजितने दिलंय. कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसणारे देशातील लाखो तरुण, एवढंच नव्हे तर काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी या पक्षांचे कार्यकर्ते आणि वैयक्तिक चॅनेलच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणारे शेकडो पत्रकारही कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक बनले आहेत.
मागील काही काळात श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये तरुणांनी सत्ता उलथवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चर्चा चांगलीच रंगली होती. तिकडे बऱ्याच ठिकाणी हिंसक आंदोलनंही झाली. त्यावेळी भारतातील तरुण कधी जागा होणार, देशातील प्रश्नांवर तो कधी आवाज उठवणार अशी चर्चा वारंवार केली जात होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने मे महिन्यात देशातील तरुणाईने या प्रश्नाचं उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा - गुणवत्तेचा लातूर पॅटर्न ते शिक्षणाचे बाजारीकरण
कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्समध्ये माहुआ मोईत्रा, कीर्ती आझाद, योगेंद्र यादव, फाय डिझुझा, दीपक कुमार, अनुराग कश्यप, वरुण सुखराज, राणा आयुब, प्रकाश राज, मनीषा पांडे, कुणाल कामरा, बाबुषा कोहली, विशाल ददलानी, कोंकणा सेन शर्मा, ध्रुव राठी, राजदीप सरदेसाई, विणेश फोगाट, मोहम्मद झिशान आयुब, सोहित मिश्रा, सयामी खेर, श्याम रंगीला, राघव जुयाल, दिया मिर्झा, राम पुनीयानी, कुशल बद्रिके, विपिन तातड, अलका धुपकर, ईशा गुप्ता, फातिमा सना शेख, राघव त्रिवेदी, ममता यादव, किरण माने या नामांकित आणि इतर कोट्यवधी लोकांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या तीन दिवसांत भारतीय जनता पार्टीचा कुठेही थेट उल्लेख न करता कॉक्रोच जनता पार्टीने जी मांडणी केली होती ती भाजप समर्थकांनी मनाला लावून घेतली. कॉक्रोच जनता पार्टीला विरोध करायला, ट्रोल करायला, त्यांचे अकाउंटस हॅक करायला भाजपचा आयटीसेल प्रचंड ऍक्टिव्ह झाल्याचं X माध्यमावर दिसून आलं. ताज्या माहितीनुसार कॉक्रोच जनता पार्टीचं X माध्यमावरील खातं भारतात बंद करण्यात आलेलं आहे. अभिजितला आपचा दलाल म्हणण्यापासून ते कॉक्रोच जनता पार्टीमागे अमेरिका असल्याचे आरोप झाले. अभिजितच्या आंदोलनाला काहींनी २०११ च्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाशी जोडलं. लवकर प्रसिद्धी मिळाल्याच्या कारणामुळे अशी चर्चा होणं स्वाभाविक होतं. काही जणांनी सोशल मिडियावरच अभिजितची पार्टी म्हणजे भाजपची बी टीम असल्याचे आरोपही केले. मात्र देशातील विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून अभिजितने त्याची आणि कॉक्रोच जनता पार्टीची दिशा काय असेल हे स्पष्ट केलं. कॉक्रोच जनता पार्टीचे ९४ टक्के फॉलोअर्स हे भारतीय असल्याचं अभिजितने दाखवून दिलं. नीट पेपरफुटीचं प्रकरण, इंधनाचे आणि गॅसचे वाढीव दर, देशावरील आर्थिक संकट आणि हे सगळं सुरू असताना सरकारने जबाबदारी टाळणं आणि नरेंद्र मोदींचे परदेश दौरे याबाबत जनतेच्या मनातील अस्वस्थता कॉक्रोच जनता पार्टीने पकडली. त्याचं सोशल मीडिया चळवळीत रूपांतर केलं. अर्थात ही अस्वस्थतेची लाट किती दिवस टिकणार हे पाहणं रंजक असेल.
