वर्ष २००२-२००३. पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता केल्यानंतर तिथंच लोकसत्तामध्ये आणि ईटीव्ही हैदराबाद इथं प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केलं. त्यानंतर काही वेळ रिकामा होता. तेव्हा रानडे इन्स्टिट्यूटच्या कँटिनमध्ये अधूनमधून जात असे. तिथं परकीय भाषा विभाग आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही येत. ते घोळका करून बसत आणि गप्पा मारत. त्यांच्याशीही छान ओळख झाली होती. तिथं जयदेव डोळे सर अधूनमधून काय चाललंय, अशी चौकशीही करायचे.
एकदा घरी वर्तमानपत्र वाचत असताना दोन-तीन ओळींच्या एका जाहिरातीनं लक्ष वेधलं. त्यातल्या ओळी नेमक्या आठवत नाहीत, पण मजकूर साधारण असा होता -
पत्रमैत्री. एकटेपणा जाणवतोय? इथे संपर्क करा. गेट टुगेदरमध्ये सहभागी व्हा.
संपर्कः .......
जाहिरात संशयास्पद वाटल्यामुळे जाहिरातीमागची बातमी शोधायची असं ठरवलं.
तो जाहिरातीचा तुकडा घेतला. ‘रानडे’च्या कँटिनमध्ये गेले. ती जाहिरात जपानी भाषा आणि एमपीएससीच्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना दाखवली. त्यांना म्हटलं, ‘‘यामध्ये जरा गोंधळ वाटतो आहे. तुम्ही मला थोडी मदत कराल का? समोर कॉईनबॉक्स आहे, त्यावरून प्लीज या नंबरवर फोन कराल का? उत्तर काय मिळतंय, ते येऊन सांगा.’’
खरंच तिथं येणारी मुलं - मुली खूप सपोर्टिव्ह होते. प्रत्येकानं थोड्या थोड्या वेळाने स्वखर्चाने फोन केले. त्यावेळी आतासारखा मोबाईल फार कुणाकडे नव्हता. ट्रू कॉलर वगैरे भानगड नसल्यामुळे कोणी, कुठून फोन केलाय, हे समजत नव्हतं.
... तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून आल्यावर मुलांनी- मुलींनी काय बोलणं झालं ते सांगितलं. संशयाला जागा होती. कारण मुलांना संबंधित महिलेने दिलेल्या उत्तरांपेक्षा मुलींना दिलेली उत्तरं वेगळी होती. त्यात गेट टुगेदरचा उल्लेख होता आणि त्यासाठी मुलांसाठी शुल्क होतं तर मुलींना निःशुल्क होतं.
जाहिरातीत ...... शुक्रवार पेठ, पुणे असा पत्ताही होता.
काय करावं बरं? काही कळेना. त्यावेळी प्रिंट मीडिया खूप महत्त्वाचा होता. इलेक्ट्रॉनिक मीडिया शिरजोर झाला नव्हता आणि सोशल मीडियाचा नुकताच उदय होत होता. क्वचित कुणाकडे संगणक असायचा. नेट कॅफेमध्ये ठरावीक पैसे भरून एक-दोन तास संगणक वापरायचा, इंटरनेटवरून माहिती शोधायची, ईमेल करायचं... अशी परिस्थिती होती. शिवाय काही विचित्र अनुभव आल्यामुळे (पानशेतच्या पलीकडील डोंगरांतील शेवटच्या गावाची स्टोरी तिथं जाऊन, राहून आणली होती. ती अशीच एकजणांना सांगितली. ती नंतर त्यांच्या नावानं पेपरात छापून आल्याचा अनुभवही होता.) वर्तमानपत्रातील कुणालाही... ताकास तूर लागू द्यायचा नाही, असं ठरवलं होतं. तरीही एका मैत्रिणीची मदत घेऊन त्या पत्त्यावर जाऊन यायचं ठरवलं. फोनवर काय बोलायचं, कसं जायचं, हे ठरलं. तिथं जाताना कसा पोषाख घालायचा, दुचाकी कुठं ठेवायची, बरोबर काय काय घ्यायचं, जास्तीत जास्त माहिती कशी काढायची, हे खूप विचार करून तपशीलवार ठरवलं-
फोनवर बोलताना आपण एकाकी आणि त्रासात आहोत, असं दाखवणारा आवाज काढायचा.
जाताना गबाळा पंजाबी ड्रेस- त्यावर फाटकी ओढणी घ्यायची.
चेहरा शक्य तितका दीनवाणा करायचा.
टेप रेकॉर्डर कॅसेटसह पर्समध्ये रेकॉर्डिंगचं बटण दाबलेल्या स्थितीत ठेवायचा.
पर्सची चेन उघडी ठेवायची.
खबरदारी म्हणून दोघींच्याही पर्समध्ये हाताशी लागेल अशी तिखट-मिठाची पुडी, काटा चमचा ठेवायचा.
बोलता बोलता आपल्यावर काही संकट येतंय असं वाटलं तर तिथून पळ काढायचा.
दुसऱ्या दिवशी आम्ही कॉईन बॉक्सवरून संबंधित महिलेला फोन केला. ती स्वतःच फोनवर होती. आवाज थोडा घोगरा होता.
‘‘हॅलो.’’
‘‘तुम्ही अमुक अमुक का? पत्रमैत्रीची जाहिरात वाचली.’’
‘‘तुम्ही कोण बोलताय?’’
आम्ही खोटी नावं सांगितली.
‘‘काही काळजी करू नका. इथं तुम्हाला नवीन मित्र-मैत्रीण भेटतील. गेट टूगेदरला वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येणार आहेत. मुलींना प्रवेश फ्री आहे. त्यासाठी तुम्ही माझ्याकडे या.’’
‘‘लगेच येऊ का?’’
‘‘हो.’’
फोन झाल्यावर लगेचच आम्ही ठरवलं होतं तसा अवतार केला आणि निघालो. छातीत धडधडत होतं. श्रद्धाच्या एमएटीवरून शुक्रवार पेठेत गेलो. परिसरात पत्ता विचारला, तेव्हा परिसरातले लोक आपल्याकडे विचित्र नजरेनं म्हणजेच ‘तसल्या मुली’ म्हणून पाहताहेत, असं वाटत होतं. एकदाचं ते घर दिसलं. घर कसलं, विचित्र रचना असलेली इमारत होती ती. त्या इमारतीपासून जरा लांबच गाडी उभी केली. त्या घरापाशी गेलो तेव्हा मनातून टरकलेलोच होतो. पण माघार घ्यायची नव्हती. जगाला काहीतरी करून दाखवायचं होतं.
बेल वाजवली. पाच मिनिटांनी दगडी घराचं दार उघडलं. दारात एक पिवळसर डोळे असलेली, गाऊनमधली स्थूलशी बाई होती. तिनं आम्हाला ओळखलं.
म्हणाली, ‘मीच अमुक अमुक.’’
दारातून डोकावून आत पाहिलं, कसला तरी अंधारी, अस्वच्छ फील येत होता. आम्हाला वाटलं, ती दिवाणखान्यातच बोलेल. पण... त्या अंधारी खोलीच्या डाव्या बाजूला आणखी दोन अंधाऱ्याच खोल्या. तिथून उजवीकडे वळून एक खोली. आणि त्यापुढे एक खोली. (विचित्रच घर होतं.) आपण कुठून कुठली खोली ओलांडून आलो, हे लक्षात ठेवलं. तिथं एक टेबल, खुर्ची आणि समोर दोन लाकडी खुर्च्या होत्या. हेच तिचं ऑफिस असावं. खुर्चीवर बसल्यावर पर्सच्या उघड्या चेनमधून टेप रेकॉर्डर चालू आहे का, हाताशी मीठ-मिरची आहे का, याची खात्री केली. मैत्रिणीने ओढणीचा फाटका भाग वरती घेतला होता. म्हणजे हिला खरंच पैशांची गरज आहे, तसंच गरिबीमुळे कुणी मित्र-मैत्रिणी नाहीत, हे तिला समजलं असतं.
‘‘मी गावाकडची असल्यानं कुणी माझ्याशी मैत्री करत नाही. बोलत नाही.’’ असं तिला मैत्रिणीनं चेहऱ्यावर कारूण्य आणून सांगितलं.
त्या बाईच्या बोलण्यात आलं ते असं...
‘‘आळंदी रस्त्यावरील एका मोठ्ठ्या हॉटेलात गेट टुगेदर आहे. तुझ्यासारख्याच कितीतरी मुली येणार आहेत. मोठमोठे व्यावसायिक, मोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोक, श्रीमंत लोक येतील. त्यांची आणि तुमची ओळख होईल. नंतर भेटी होत राहतील. त्यांच्या ओळखीने तु्म्हालाही काही काम करून आपल्या खर्चासाठी पैसे मिळवता येतील. पुण्यात राहणं ही सोपी गोष्ट नाही. खूप महागाई आहे.’’
तिचं गूढ, वळणावळणाचं बोलणं ऐकून दरदरून घाम फुटत होता. समजा, तिला आपण रेकॉर्डिंग करतोय, हे कळलं तर...? बाहेर जाण्याच्या मार्गात कुणी असेल तर... आली का पंचाईत! ती एकटक बघत मैत्रिणीची जरा जास्तच चौकशी करायला लागली होती. धोक्याची कुठंतरी घंटा वाजली. मी हळूच मैत्रिणीला पायाने धक्का मारला आणि उठले. तशी तीही उठली. ती पत्रमैत्रीची मालकीण आम्हाला चहा, कॉफी, सरबत विचारत होती; पण नाही म्हणत आम्ही चार-पाच खोल्या ओलांडून बाहेर धावलोच. मागं वळूनही पाहिलं नाही. जवळपास पळतच दुचाकीपाशी गेलो. त्या परिसरातूनच पळ काढला. आमचं बोलणं रेकॉर्ड झालंय का, ते पाहिलं. ते रेकॉर्ड झालं होतं. त्यानंतर बराच वेळ काय करावं, सुचत नव्हतं. मैत्रिणीने तिच्या एका मित्राला ही स्टोरी सांगितली होती. त्यानंही आम्हाला ‘जरा जपून’ राहण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर एक-दोन दिवसांनी दुपारच्या वेळी कँटिनमध्ये असताना तिचा तो मित्र एका केस मोठे असलेल्या गृहस्थांना घेऊन तिथं आला. ते एका साखळी दैनिकाच्या मालकांचे नातेवाईक होते. या आमच्या स्टोरीसाठी खास भेटायला आले होते. त्यांना आम्ही केलेलं रेकॉर्डिंग हवं होतं. अर्थातच आम्ही ते दिलं नाही. त्यानंतर असं कळलं की, त्या साखळी वर्तमानपत्राला महाराष्ट्रात बस्तान बसवायचं होतं, त्यामुळं त्यांना शोधपत्रकारितेचं मोठं हाडुक चघळायला हवं होतं. आपण छोट्या जाहिरातीत बातमी शोधायची, मेहनत घ्यायची, डोकं लढवायचं, जीव धोक्यात घालायचा आणि आयती स्टोरी यांना द्यायची? छे! छे!
पण दुसरीकडे, कदाचित ते आपल्याला नोकरी देण्याच्या उद्देशाने रेड कार्पेट अंथरून आले असतील असं वाटत होतं. पण तसं घडलं नाही. उलट त्या गेट टुगेदरमध्ये सहभागी होऊन ते कव्हर करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याची हेडलाईन देऊन धमाका करायचा, यासाठी त्यांनी त्यांच्या खास वार्ताहरांची गुप्त बैठक घेतली असल्याचं समजलं. पायाखालची जमीनच हादरली. कंटेट चोरी काय असते, हे समजलं.
खरं तर त्या दोन ओळींच्या जाहिरातीच्या पोटात बरंच काही दडलं होतं. गरजू, एकट्या, नाकारलेल्या, गरीब मुलींना हेरून त्यांना अशा गेट टुगेदररूपी पार्ट्यांमधून धनिक बाळांना पुरवायचं, असं ते रॅकेट होतं. त्यातून भरकटत जाऊन काहीजणी आपल्या कुटुंबापासून कायमच्या दूरही झाल्या असत्या. त्यात कितीतरी बडे लोक सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. बहुतांश मुलींचा तिथपर्यंत होणारा प्रवास हा शरीरविक्रयाच्या अंधाऱ्या खाईपर्यंत घेऊन जाणारा असणार होता. थोडा विचार केल्यावर वाटलं, कसलं स्कूप आणि कसचं काय! त्या मुलींना त्या वाटेपर्यंत नेणारी ती बाई काय आणि ती बातमी मीठमसाला लावून लोकांपर्यंत पोहोचवून त्याचं श्रेय घेणारी माध्यमं काय, सगळंच विकृत... एका माळेतले मणी. काही चांगला परिणाम होणार असेल तरच असले उद्योग करणं ठीक. नैराश्य आलं होतं. पण एवढ्या मोठ्या दैनिकाला त्याच्या ‘पवित्र कार्या’पासून आपण कसं रोखणार? जाऊदेत, हा विचार मनात आला. वेळ, प्रयत्न वाया गेल्याचं जाणवलं.
तेव्हा नोकरी मिळवण्याचा विचार डोक्यात होताच. कुणीतरी सांगत आलं, पुण्यात ‘... हे मराठी भाषेतलं पहिलं इंटरनेट जर्नल सुरू होतंय, कुणाला अर्ज करायचा असेल तर करा.’ ‘स्टोरी गेली तेल लावत. आपण होणारी घटना रोखू शकत नसलो तर सरळ नोकरी केलेली बरी’, असा विचार करून त्या … डॉट कॉम या इंटरनेट जर्नलचं ऑफिस गाठलं. तिथल्या मालक संपादकांनी त्यांच्याकडचा आधुनिक कॅमेरा, टेलिफोन टॅपिंगची सुविधा... बरीच अद्ययावत यंत्रणा दाखवली. ही यंत्रणा मी आधी कुठंच पाहिली नव्हती. त्या ऑफिसमध्ये एक त्यांची असिस्टंट, दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, बातम्या देणारा एक मुलगा होता. मालक-संपादकांचाही मूळ पत्रकारितेशी काही संबंध नसावा. हाताशी पैसा होता, त्या जिवावर सुरू केलेला हा प्रयत्न असावा. मी तिथल्या सोयीसुविधा पाहून त्यांना ही स्टोरी सांगितली. ती ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर ‘वेगळाच’ आनंद होता. इंटरनेट जर्नलची सुरुवातच एका मोठ्या स्कूपने. अर्थातच, तिथली माझी नोकरी त्या दिवशीपासूनच सुरू झाली.
आधीच्या कॅसेटमधलं रेकॉर्डिंग ऐकून त्यांनीही त्यात लक्ष घातलं. त्यानंतर पत्रमैत्रीला फोन करून त्या वेगवेगळ्या संभाषणाचं टॅपिंग तिथं करायचं, असं ठरवलं. या संभाषणातलं बोलणं आधीच्या संभाषणापेक्षा ‘ॲडव्हान्स’ असणार होतं. त्या पत्रमैत्री बाईशी काय बोलायचं, ही स्क्रिप्ट तयार केली गेली. त्या संपादकांची हिंदी बोलणारी दक्षिण भारतीय असिस्टंट आणि तिथले आणखी दोन पोहोचलेले वाटणारे लोक फोनवर बोलणार होते. पण तरीही आपण भावनेच्या भरात यांना सगळं सांगून काहीतरी चुकीचं करतोय, असं अंतर्मन सांगत होतं.
आपला आतला आवाज नेहमी ऐकावा आणि सुज्ञ, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा, असं ठरवलं आणि ‘स्त्री आधार केंद्रा’च्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (आताच्या विधानपरिषदेच्या उपसभापती) डॉ. नीलम गोऱ्हे यांची वेळ घेऊन थेट धायरीमधलं त्यांचं ऑफिस गाठलं. आधी रिपोर्टिंग केलं असल्यानं त्यांच्याशी बऱ्यापैकी ओळख होतीच. तिथं गेल्यावर त्या महिलेच्या घरी केलेलं रेकॉर्डिंग त्यांना ऐकवलं. ही स्टोरी कसकशी डेव्हलप होत गेली, त्यासाठी कोण कोण भेटलं, सध्या कुठं काम करते आहे, तिथं काय झालं, हे त्यांना सांगितलं. त्यांनी गेट टुगेदर प्रकरणातला संभाव्य धोका आधीच ओळखला होता. त्या बरोबर असताना काही विपरीत घडणार नाही, ही खात्री होती. दुसऱ्या दिवशी फोन करते, असं सांगून तिथून निघाले.
नीलमताईंकडे जाऊन ही बातमी तपशीलवार सांगितली हे त्या इंटरनेट जर्नलच्या संपादकांना दुसऱ्या दिवशी सांगितलं. आपण फक्त तिखटमीठ लावून बातमी द्यायची नाहीय तर त्या सापळ्यात अडकू शकणाऱ्या मुलींना अलगद बाहेर काढायचं असून त्यासाठी नीलमताई आपली मदत करू शकतात, हे त्यांना पटवून दिलं. त्यावेळी नीलमताईंबरोबर त्यांची कार्यकर्ती मंगल पगारे ही महिलांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यायची. ताईंनी या प्रकरणात तिलाही बरोबर घेतलं होतं. त्यांनी हे प्रकरण त्यावेळचे पुण्याचे पोलीस आयुक्त रणजितसिंग शर्मा यांच्या कानावर घालायचं आणि त्यांची मदत घ्यायची असं ठरवलं. गणेशोत्सवाची वेळ होती. या काळात पुण्यातल्या पोलिसांवरही खूप ताण असतो. अशा धामधुमीच्या वेळी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी वेळ दिली, हीच महत्त्वाची गोष्ट होती. पोलीस आयुक्तालयात नीलमताई आल्या. त्यांनी पोलीस आयुक्तांशी आमची ओळख करून दिली. काय प्रकरण आहे ते थोडक्यात सांगितलं. प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्या कॅसेट्समधील संभाषण व्यवस्थित ऐकलं आणि पुराव्यासाठी आणखी काय सुधारणा हवी, हे सांगितलं. त्या पुराव्यांच्या आधारेच पोलिसांना पुढची दिशा आखता येणार होती. त्यांनाही हा प्रकार नक्की असाच आहे का, याची खात्रीही करायची होती. त्यांच्या सूचनेनुसार पुन्हा बोलणं रेकॉर्ड करायचं होतं, तेही लवकरात लवकर. हाताशी वेळ कमी होता.
या स्टोरीसाठी कितीही मेहनत घ्यायची आमची तयारी होती. सगळेच नवीन होते, करिअरमध्ये पुढं काही तरी करायचं होतं. आम्ही कितीही वेळ ऑफिसमध्ये थांबत असू. हे करत असताना इतर बातम्याही अपलोड करायच्या असत, बातम्या लिहियच्या असत. या स्टोरीचं म्हणाल तर फायनल संभाषणाद्वारे पुरावा मिळवण्याची वेळ जवळ आली होती. फायनल रेकॉर्डिंगसाठी तिथल्या दोघांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. त्यांनी फोन केला. रिंग झाली. आम्ही सगळे तिथंच उभे राहून संभाषण ऐकत होतो. पलीकडून फोन उचलला गेला. संवाद साधारण असा होता-
‘‘हॅलो.’’
‘‘... तुम्हीच बोलताय ना? काल मी फोन केला होता…’’
‘‘कशाबद्दल?’’
‘‘ते पंधरा तारखेचं गेट टुगेदर...’’
‘‘हो, तुम्ही हजार रुपये भरा आणि या...’’
‘‘... पण तिथं फक्त गेट टुगेदर असणार आहे की आणखी काही...?’’
‘‘अहो, पुरुषांना प्रवेश फी का आहे आणि मुलींना का नाही, यावरूनच लक्षात घ्या.’’
‘‘हं... पण तिथं एखादी ‘तशी’ मैत्रीण मिळेल का?’’
‘‘कितीतरी आहेत... पण एचआयव्हीची भीती असल्याने काळजी घ्यावी लागेल.’’
तिनं सांगितलं.
‘‘या मुली प्रॉस्टिट्युशनमधल्याच आहेत की... नवीन?’’
उत्तर देताना ती थोडी घाबरल्यासारखी वाटली. म्हणाली,
‘‘नाही, बहुतेक जणी नवीन आहेत. त्यांना वाटतंय की इथं फक्त गेट टुगेदरच होणार आहे. ओळखींमधून काहीतरी काम मिळेल, पण तसं नाही. फक्त तुम्ही कुठं बोलू नका, नाहीतर आमचे ... साहेब आपल्या सगळ्यांनाच...’’
ती एक नाव अनाहूतपणे बोलून गेली; त्यात पुण्यातल्या एका बड्या नेत्याचं नाव घेतलं होतं. त्या काळी पुण्यात त्याचा दरारा होता. बराच संवाद झाला, खूपच स्पष्ट होता, मलाच लिहिताना विचित्र वाटत असल्यानं इथं तपशीलवार दिला नाही. पुन्हा ते रेकॉर्डिंग पोलीस आयुक्तांना ऐकवलं, पुन्हा बदल... काही प्रयत्नांनंतर ते अपेक्षेप्रमाणे झालं. तिला कुठं माहीत होतं, आपलं बोलणं रेकॉर्ड होऊन ते थेट पोलीस आयुक्तांकडे जाणार आहे म्हणून!
गेट टुगेदर पंधरा सप्टेंबरला संध्याकाळी होणार होतं. त्यावेळच्या पुण्याच्या शांत परिसरात, मूळ शहरापासून लांब... जिथून पळून जाता येणार नव्हतं. अशा शहराबाहेरच्या खास हॉटेल्समध्येच असे काळे धंदे चालत.
फोनवरील संभाषणानुसार त्या बाईचा मुलींना फसवून आणणे, त्यांना गैरमार्गाला लावणे, भल्या थोरल्या धेंडाना मुली पुरवणे हाच व्यवसाय होता. ते संभाषण ऐकून आयुक्तांनी पोलीस यंत्रणेलाही कामाला लावलं. चौदा सप्टेंबरला रात्री खोटी गिऱ्हाइकं पाठवून तिला अटक करायची आणि १५ तारखेचं गेट टुगेदर होऊच द्यायचं नाही, अशी पद्धतशीर आखणी केली होती.
चौदा सप्टेंबर हा दिवस अनंत चतुर्दशीच्या आधीचा चौथा दिवस होता. तेव्हा सार्वजनिक गणपतीचे देखावे, सजावटी पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होते. हीच गर्दी हेरून या काळात मानवी तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. हे सगळं हेरूनच १४ सप्टेंबर ही तारीख ठरवली गेली असली पाहिजे.
चौदा सप्टेंबरला सकाळी पोलीस आयुक्त, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. एका छोट्या जाहिरातीतून मोठं स्कँडल कसं उघडकीस आणणार आहोत, ते सांगितलं. पण हे स्कँडल उघडकीस येईपर्यंत बातमी छापणंच काय, पण या दालनाबाहेर यातलं काहीही जाता कामा नये, हे सांगितलं. त्यावेळचे पत्रकार थोडं सामाजिक भान असलेलेही होते. पत्रकार परिषद झाल्यावर वार्ताहर ‘हे सगळं नक्की कसं केलं’, असं विचारत होते, तेव्हा काही क्षणांसाठी आपण ‘स्टार पत्रकार’ झाल्यासारखं वाटत होतं. पण काय बोलावं ते कळत नव्हतं.
त्या दिवशीच रात्री पोलीस सापळा रचणार होते. ते सगळं प्रत्यक्षात पाहायला मिळणार होतं. या साध्या वेषातील पोलीस आयुक्त, इतर पोलीस, त्यांच्या मागून आम्ही गर्दीतून वाट काढत होतो. तेव्हा स्वतःविषयी पहिल्यांदाच अभिमान वाटला. बरंच चालल्यावर आम्ही स्टोरीतल्या खलनायिकेच्या घराच्या परिसरात पोहोचलो. रस्त्यावर गर्दी असल्याने जागोजागी खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या होत्या. आम्ही दोघी काही पोलीस कर्मचाऱ्यांसह भेळेच्या गाडीपाशी थांबलो. दोघंजण ठरलेल्या वेळी तिच्याकडे ग्राहक म्हणून जातील आणि पुरावा मिळाल्यावर खिडकीतून खाली पांढरा रुमाल टाकतील. ती खूण ओळखून बरोबर उभ्या असलेल्या पोलिसांनी पटकन तिथं जायचं, त्या महिलेला पकडायचं, असं ठरलं होतं. काही वेळाने पांढरा रुमाल खिडकीखाली दिसताच ते धावत त्या दिशेने गेले. तिला सापळा रचून पकडलं तेव्हा तिच्या घरी तीन तरूणी होत्या. त्या महिलेला पोलिसांनी पकडलं.
या सगळ्या घटनेनंतर रात्रीचे दोन वाजत आले होते. माझं घर शहरापासून लांब होतं. हाताशी गाडी नव्हती. इतक्या लांब कशी जाणार? कोणी, ‘तू कशी जाणार?’ असं साधं विचारलंही नव्हतं. एक मोठी कामगिरी पार पाडल्याच्या आनंदात ते कुणाच्या लक्षात आलं नसावं. शेवटी धीर करून मीच एका पोलिसांना विचारलं मग त्यांनी मला घरापर्यंत पोहोचवलं. आईनं दार उघडलं. आई-वडील, बहिणीला उशीर होईल, अशी कल्पना दिली होती. सगळे वाटच बघत होते. मोबाईल नसल्यानं काय झालं, याची घरी खबरबात असण्याचं कारण नव्हतं.
आई म्हणाली, ‘‘इतका उशीर? कशी आलीस?’’
तिला सगळ्याची कल्पना होती. बाहेर घडलेली प्रत्येक गोष्ट तिला सांगण्याची मला सवय होती.
‘‘पोलिसांच्या गाडीतून आले.’’असं तिला सांगितलं. ही कशाला नस्ते उपद्व्याप करते, असं घरीदारी, शेजारीपाजारी सगळ्यांचंच मत होतं.
‘‘उद्याच्या पेपरमध्ये वाचा.’’
मी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या वर्तमानपत्रांची ती हेडलाईन होती. अर्थात, सुरक्षेच्या कारणावरून त्यात माझ्या नावाचा उल्लेख नव्हता. पुणे, नगर, नाशिक, मुंबई... अशा ठिकाणहून मुली पुरवण्याचं काम अशा गेट टुगेदरमधून होत होतं. पण गेट टुगेदरच्या आधीच त्या महिलेला पकडल्यामुळे दोन-अडीच हजार मुलींना जाळ्यात अडकवण्याचा तो प्लॅन अयशस्वी झाला होता. त्या वर्तमानपत्राच्या मसाला बातमीच्या ‘कार्यक्रमा’चाही फज्जा उडाला होता. आपण चिकाटीनं हे सगळं केलं, ते बरं झालं, असं वाटलं. त्या इंटरनेट जर्नलच्या मालकांना आकाश ठेंगणं होतं. या स्टोरीमुळे त्यांचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं.
त्यानंतर ती नेत्याचं नाव असलेली कॅसेट माझ्या दृष्टीस कधीच पडली नाही. कितीतरी दिवस मी विचारत होते, ‘‘तिला पकडलं, पण मुख्य माणसांना कोण पकडणार?’’ पण काहीही झालं नाही. तीही आठ दिवसांनी जामीनावर सुटली. ते इंटरनेट जर्नल सोडणं इष्ट असं तिथल्या एकदोन सभ्य माणसांनी सांगितलं. मी ती नोकरी सोडली. नंतर त्या मालकानंही एक दुसऱ्या भाषेतलं चॅनल सुरू केल्याचं समजलं.
या सगळ्याचा इतका धक्का बसला होता की, पाझे पायच गळाले. जवळजवळ पंधरा दिवस मी चालू शकत नव्हते. पण तरीही सजगता, धाडस याला पोलीस, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, आधुनिक तंत्रज्ञान यांची जोड मिळाल्याने दोन ते अडीच हजार मुली मानवी तस्करीच्या क्रूर जाळ्यापासून वाचल्या, हेच मोठं होतं.
Key highlights-
In Pune, trainee journalist Shilpa Datar courageously uncovered a sex racket disguised as a “pen-friend” service. With the help of friends and local authorities, her sting operation exposed a human trafficking ring, bringing hope and safety to thousands of vulnerable girls.
शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com
शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.
