आम्ही कोण?
आडवा छेद 

जागतिक स्थलांतरितांमध्ये भारतीय सर्वाधिक, पण त्यांच्याबद्दलचे अभ्यास मात्र तुटपुंजे

  • गौरी कानेटकर
  • 16.04.25
  • वाचनवेळ 4 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
migration

ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेतील आणि त्यानिमित्ताने जगभरातील भारतीय स्थलांतरितांचा विषय नव्याने चर्चेत आलाय. फक्त अमेरिकेतच नव्हे, तर जगभरातच भारतीय स्थलांतरितांची संख्या मोठी असल्याचं युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्सच्या ताज्या आकडेवारीवरून दिसून येतंय. जगभरातील एकूण स्थलांतरितांमध्ये भारतीयांचा वाटा सहा टक्के आहे. परदेशी स्थलांतरितांकडून उत्पन्न मिळणाऱ्या देशांमध्येही सर्वात वरचा नंबर भारताचाच आहे. २०२४मध्ये स्थलांतरितांकडून भारतात तब्बल १२९ बिलीयन डॉलर्स जमा झाले असल्याचा वर्ल्ड बँकेचा अंदाज आहे. पण असं असूनही या स्थलांतरितांचे आपल्याकडे सखोल अभ्यास झालेले दिसत नाहीत.

संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या व्याख्य़ेनुसार मायदेश सोडून किमान वर्षभर दुसऱ्या देशात मुक्काम केलेल्या व्यक्तीला स्थलांतरित म्हटलं जातं. त्यात महत्त्वाकांक्षेपोटी स्थलांतरित झालेले उच्चशिक्षित, विद्यार्थी, पोटापाण्यासाठी बाहेर गेलेले कुशकल-अकुशल कामगार आणि निर्वासितांचाही समावेश असतो. जागतिक इतिहासात स्थलांतरितांमध्ये भारतीयांची संख्या कायमच मोठी राहिली आहे. याचं मुख्य कारण भारताची फाळणी. फाळणीमुळे १९४७ नंतरचा मोठा काळ भारतीय स्थलांतरितांमध्ये पाकिस्तानात गेलेल्या लोकांचा वाटा मोठा होता. पण जसजशी भारतात जन्मून पाकिस्तानात स्थलांतरित झालेली पिढी संपत गेली तसं स्वेच्छेने वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण वाढत गेलं.

१९९० ते २०२४ या काळात भारतीय स्थलांतरितांची संख्या ६५ लाखावरून एक कोटी ८५ लाखांपर्यंत वाढली, म्हणजे जवळपास तिप्पट झाली आहे. जगातल्या एकूण स्थलांतरितांमधला त्यांचा वाटाही या काळात चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर गेला आहे. या स्थलांतरितांपैकी निम्मी लोकसंख्या पश्चिम आशियातल्या बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमध्ये राहते. एक चतुर्थांश भारतीय स्थलांतरित (उत्तर) अमेरिकेमध्ये राहतात.

या काळात अमेरिकेत जाणाऱ्यांचं प्रमाण वाढत गेलं आहे. तसंच कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक होणाऱ्यांचं प्रमाणही वाढतं आहे. तर दुसरीकडे युरोपमध्ये स्थायिक होणाऱ्या भारतीयांचा एकूण आकडा वाढला असला तरी त्यांची टक्केवारी मात्र कमी झाली आहे. आखाती देशांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांमध्ये अकुशल कष्टकरी कामगारांचं प्रमाण बरंच आहे, तर बाकीच्या देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची संख्या जास्त आहे.

१९९० मध्ये पाकिस्तान वगळता सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक भारतीय राहत होते. आता २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या दोन्ही देशांत सर्वाधिक, म्हणजे प्रत्येकी १७ टक्के भारतीय राहत आहेत. संयुक्त अरब अमिरातीतल्या एकूण स्थलांतरितांपैकी भारतीयांचा वाटा तब्बल ४० टक्के, तर तिथल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय एक तृतीयांश आहेत. कॅनडामध्येही एकूण स्थलांतरितांमध्ये सर्वांत मोठी संख्या भारतीयांची आहे, तर अमेरिकेत ते मेक्सिकन्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

पूर्वी परदेशी स्थलांतर करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांमधल्या नागरिकांचं प्रमाण जास्त होतं. पण अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून बाहेर जाणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. पण स्थलांतरितांचं प्रमाण एवढं असूनही आपल्याकडे त्याबद्दलचे म्हणावे तितके अभ्यास झालेले नाहीत. राज्याराज्यांमधले स्थलांतरित किती, त्यापैकी उच्चशिक्षित किती, विद्यार्थी किती आणि कुशल-अकुशल कामगार किती, बेकायदा स्थलांतरित किती, मानवी तस्करीला बळी पडलेले भारतीय किती, कोणत्या राज्यांतले नागरिक कोणत्या देशांत स्थलांतरित होतात, कोणत्या कामांमध्ये ते जास्त आढळतात, याचे केवळ कल किंवा प्रवाह समजतात. पण त्याबद्दलची राज्यनिहाय अचूक माहिती आणि त्या माहितीचं विश्लेषण उपलब्ध नाही. अलीकडच्या काळात स्थलांतरितांचा बहुशाखीय अभ्यास ही नव्याने उदयाला आलेली ज्ञानशाखा आहे. पण त्यात आपण अजून बरेच मागे आहोत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीयांचे स्थलांतरासाठीचे आवडते देशही बदलत गेले आहेत. आकडा मोठा नसला तरी अलीकडच्या काळात अग्नेय आशियातील देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांची संख्याही वाढते आहे. विशेषतः जपान, दक्षिण कोरिया, एवढंच नव्हे तर तैवानमध्येही भारतीय स्थलांतरित होत आहेत. पण त्यांचा पद्धतशीर अभ्यास केला गेलेला नाही. स्थलांतरितांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढतं आहे. त्यातही मध्य आणि पूर्व युरोपमध्ये, विशेषतः पूर्वाश्रमीच्या सोव्हिएट युनियनचा भाग असणा-या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. पण त्याचाही सखोल अभ्यास उपलब्ध नाही.

केरळ, तमिळनाडू, गुजरात आणि पंजाब या राज्यांनी त्यांच्या स्थलांतरितांचं काही प्रमाणात दस्तावेजीकरण केलं आहे. पण इतर राज्यांमध्ये मात्र अशा प्रकारच्या नोंदींची वानवा आहे. स्थलांतरितांचे असे राज्यनिहाय अभ्यास सुरू झाले तर या स्थलांतरामागची चांगली-वाईट कारणं, त्याचा भारताच्या आणि स्थलांतरित देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम, स्थलांतरितांना नव्या देशात जुळवून घेण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यातून निर्माण होणारी नवी संस्कृती, कामगारांच्या बाबतीतलं अन्याय-शोषण, त्याचे सामाजिक-मानसिक परिणाम अशा अनेक अंगांचा नव्याने उलगडा होऊ शकेल, असं मानलं जातंय.

(संदर्भ : डेटा फॉर इंडिया, इपीडब्ल्यू, युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स, केंद्र सरकारचं परदेश मंत्रालय, वर्ल्ड बँक)

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results