आम्ही कोण?
काय सांगता!  

पॉइंट निमोः जमिनीपासून दूर-स्पेसपासून जवळ?

  • गौरी कानेटकर
  • 26.02.26
  • वाचनवेळ 2 मि.
point nemo

पॉइंट निमो हे नाव कधी ऐकलंयत? यालाच पॉइंट ऑफ ओशनिक इनअक्सेसिबिलिटी म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचं तर समुद्रातलं असं ठिकाण किंवा बिंदू जिथून जमीन सर्वाधिक दूर आहे. या ठिकाणाचे अक्षांश-रेखांश साधारण असे आहेत - 48°52.6′S 123°23.6′W

हे कल्पित ठिकाण (किंवा बिंदू) पॅसिफिक महासागरात दक्षिणेला आहे. त्याच्या तीन दिशांना असणारी तीन बेटं कमीत कमी २६८८ किलोमीटर एवढी लांब आहेत. उत्तरेला पँडोरा आयलेट, ईशान्येला मोती नुई आयलंड आणि दक्षिणेला आंटार्क्टिकाजवळचं माहेर आयलंड ही ती बेटं. पण असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन फिरता फिरता जेव्हा पॉइंट निमोच्या डॉक्यावर येतं तेव्हा जमिनीपेक्षा या स्पेस स्टेशनमधले अंतराळवीर पॉइंट निमोच्या जास्त जवळ असतात.

हेही वाचा - समुद्रात तयार होताहेत प्लास्टिकची बेटं!

बाय द वे, निमो म्हटल्यावर तुम्हाला ज्यूल्स व्हर्न यांच्या साय-फाय कादंबऱ्यांमधल्या कॅप्टन निमोची आठवण झाली असेल तर तेही अगदीच चुकीचं नाही. कारण क्रोएशियन सर्व्हे इंजिनीयर हर्वोये लुकाटेला याने १९९२ मध्ये अशा पॉइंटची कल्पना करून कॅप्टन निमोवरूनच या पॉइंटला नाव दिलं.

पॉइंट निमो आणखीही एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. या पॉइंट निमोच्या आसपासच जगातला बहुतेक अंतराळ कचरा (स्पेस गार्बेज) टाकला जातो. त्यामुळे या पॉइंट निमोच्या आसपासच्या परिसराला अंतराळाची दफनभूमी असंही म्हटलं जातं. अंतराळात विविध देशांनी सोडलेले उपग्रह आणि तत्सम यंत्रं निकामी झाल्यानंतर ती पृथ्वीवर मानवी वस्तीजवळ किंवा प्रवास करणाऱ्या जहाजांवर पडू नयेत, यासाठी त्यांना पॉइंट निमोजवळच्या परिसरात पडण्यासाठी प्रोग्रॅम करून ठेवलं जातं. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनही २०३१ साली इथेच विसावा घेणार आहे, असं म्हणतात.

हेही वाचा - दोन आफ्रिका आणि सहावा महासागर

point nemo

ब्रिटीश एक्सप्लोअरर ख्रिस ब्राऊन आणि त्यांचा मुलगा मायका हे दोघे मार्च २०२४ मध्ये पॉइंट नेमोपर्यंत धडकून आले. या कल्पित बिंदूपर्यंत (खात्रीपूर्वक) पोहोचणारे ती पहिलीच माणसं. त्यांनी चिले देशातून हान्स एक्सप्लोअरर या बोटीतून पॉइंट निमोपर्यंत प्रवास केला. या भागात समुद्र कायमच खवळलेला असतो. (दक्षिणेतील ४० आणि ५० अक्षांशाच्या जवळील भागातल्या वातावरणाचं वर्णन रोअरिंग फोर्टीज, फ्युरिअस फिफ्टीज असंही केलं जातं. समुद्रात ४० अक्षांशानंतर कुठलाही कायदा अस्तित्वात नसतो आणि ५० अक्षांशानंतर देवही अस्तित्वात नसतो, अशी एक म्हणही खलाश्यांमध्ये पूर्वापार प्रचलित आहे!) तिथे बोटीतून प्रवास करणंही अतिशय धोक्याचं मानलं जातं. पण ख्रिस आणि मायका पॉइंट निमोजवळ पोहोचल्यावर समुद्रात उतरले आणि थोडा वेळ पोहलेदेखील.

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results