सॉल स्टाइनबर्गचं एक कार्टून आहे. एक चंद्र आणि त्याकडे आश्चर्याने बघणारा एक माणूस. पूर्वी कधी तरी न्यूयॉर्कमध्ये बराच काळ वीज गेली आणि लोक आपापल्या ऑफिसांच्या गच्चीवर-पायऱ्यांवर जमले. नेमका त्याच वेळी चंद्र उगवला आणि त्यातल्या अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच चंद्रोदय पाहिला. त्यातलाच एक माणूस स्टाइनबर्गच्या चित्रात अवतरला. आपण निसर्गापासून किती दूर गेलोय यावरची स्टाइनबर्गची ती कमेंट होती.
काही दिवसांपूर्वी हाच चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ आला होता. आपल्यापैकी काहींनी हा ‘सुपरमून इव्हेंट' छानपैकी साजरा केला- चंद्रासोबत सेल्फी काढून! जणू चंद्राचं पृथ्वीजवळ येणं महत्त्वाचं नाही, तर ही माणसं तो चंद्र पाहताहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण चंद्र यांच्याभोवतीच तर फिरतो. ते पृथ्वीवर राहत असल्याने तो पृथ्वीभोवती फिरतो असं बाकीच्यांना वाटतं एवढंच. आज स्टाइनबर्ग असता तर त्याने आपल्या कार्टून्समध्ये काय दाखवलं असतं?
अर्थात आज जगाला सेल्फी व्यापून आहे हे सांगण्यासाठी कुणा व्यंगचित्रकाराची गरज नाही. समोर घडणाऱ्या शक्य त्या साऱ्या घडामोडी काहींना स्वतःच्या सहभागासह नोंदवून ठेवायच्या आहेत. शिवाय आपलं नुसतं असणं आणि दिसणंही इतकं महत्त्वाचं आहे, की ते रोजच्या रोज नोंदवलं गेलंच पाहिजे असं त्यांना वाटतं. कुठे? अर्थातच सर्वव्यापी स्मार्टफोनवर.
सेल्फी काढण्यासाठी आपल्याला कुठलंही निमित्त पुरे आहे. मित्रमंडळी एकत्र जमलीयत, लग्नसमारंभ आहे, नवीन ड्रेस ट्राय केलाय, आपला नेहमीचाच मळकट ड्रेस किती कंफर्टेबल वाटतो हे नव्याने कळलंय, एखाद्या प्रसिद्ध वास्तूसमोर उभे आहेत, आवडत्या नट-नटीला भेटण्याची संधी मिळाली आहे, प्रवासाला निघालेत, पहिल्यांदा विमानात बसलेत, हजाराव्यांदा विमानात बसलेत, घरी एकटे बसून कंटाळलेत, मतदान करून बाहेर पडतायत, निवडणूक जिंकलेत, पैसे काढण्यासाठी एटीएमच्या भल्या मोठ्या रांगेत उभे आहेत, अशा नाना कारणांसाठी आपल्यातले अनेकजण हाताला फुटलेल्या फोनचा फ्रंट कॅमेरा ऑन करतायत आणि क्षणात सेल्फी काढतायत, किंवा खरं तर तसं काहीच कारणही नसतानाही ते सेल्फी काढत सुटलेत. पहिला बरा आला नाही तर दुसरा-तिसरा-चौथा. मग रिकाम्या वेळात त्या फोटोंतला आपलाच मुखडा पुन्हा पुन्हा पाहणं, चांगले न आलेले फोटो उडवणं, चांगले आलेले फोटो एन्हान्स करण्याचा खेळ खेळत राहणं हेही ओघाने आलंच. वेळ कसा झकास जातोय त्यात! सेल्फीतून टिपल्या जाणाऱ्या त्वचेच्या आरपार हाडीमाशी भिनू लागलंय की काय हे सेल्फीवेड?
पण हे सगळं कशासाठी?
स्वतःला कुरवाळण्यासाठी?
स्वतःची छबी जगातली सर्वांत सुंदर छबी वाटते म्हणून?
आपल्या आणि आपल्या माणसांच्या पलीकडे आपल्याला कोणीच महत्त्वाचं वाटत नाही म्हणून?
वेळ जात नाही म्हणून? की आपल्या फोनला फ्रंट कॅमेऱ्याची सोय आहे म्हणून?
मानवी उत्क्रांतीचा हा एवढाच अर्थ आपल्याला लावता येतो म्हणून?
.. आपण स्वतःला वजा करून या जगाकडे बघूच शकत नाहीये की काय?
...
सेल्फ-पोर्टेट काढण्याची पद्धत चित्रकारांमध्ये खूप पूर्वीपासून रुळलेली होती. कलेचा एक प्रकारच तो. पण स्वतःच स्वतःचा फोटो काढणारा पहिला फोटोग्राफर रॉबर्ट कॉर्नेलियस होता म्हणे! 1839 मध्ये त्याने हा सेल्फी काढला होता. ही सेल्फी टेक्नॉलॉजी काही वर्षांनी जगात एवढा धुमाकूळ घालणार आहे याची त्याला तेव्हा कल्पना तरी आली असेल का?
जाता जाता : विमानात दिल्या जाणाऱ्या (नव्या) सूचना
केबिनमधला हवेचा दाब कमी झाला तर तुमच्या सीटवरून ऑक्सिजन मास्क खाली येतील. सेल्फी काढण्यापूर्वी कृपया आपला ऑक्सिजन मास्क नीट लावून घेतला आहे ना याची खातरजमा करायला विसरू नका.
(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
