मानवी इतिहासातला सर्वाधिक ‘नार्सिसिस्ट' काळ आपण सध्या अनुभवतो आहोत.
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या व्यक्ती नार्सिसिझमला, म्हणजेच टोकाच्या स्वप्रेमाला बळी पडण्याचा धोका आहे, असा इशारा जगभरातले मनोविश्लेषक गेली बरीच वर्षं देत आहेत. आपल्याकडे या स्वकेंद्रिततेचं टोक आता अनुभवायला मिळू लागलं आहे. ही स्वकेंद्रितता केवळ सेल्फीमधूनच दिसते आहे असं नव्हे. या विकृतीची कुरूप लक्षणं इतरही अनेक गोष्टींमधून उघड होताहेत.
खरं वाटत नसेल तर एखादा दिवस आपल्या आसपासच्या सोशल माध्यमांचं आणि त्यावरचा आपला वावर कसा असतो याचं निरीक्षण करा. नार्सिसिझमच्या दिशेने वाटचाल सुरू असलेली उदाहरणं तुम्हाला तिथे नक्कीच सापडतील. व्हॉट्सॅपवरचा डीपी (डिस्प्ले प्रोफाइल) हे त्याचं उत्तम उदाहरण. तुमची ओळख इतरांना कळावी यासाठी लावायचा फोटो, एवढंच खरं तर डीपीचं काम. पण आज हे डीपी कशासाठी वापरले जाताहेत? तर केवळ स्वतःच्या प्रमोशनसाठी! दिवसातून चार-चार वेळा वेगवेगळ्या कपड्यांतले, वेगवेगळ्या लोकेशनवरचे, वेगवेगळ्या पोझिशनमधले फोटो डीपी म्हणून टाकत राहणं हे महत्त्वाचं काम होऊन बसलं आहे. एवढंच नव्हे, तर फोटो काढले जाताहेत तेच मुळी ‘डीपी' लावण्यासाठी. डीपीसाठी चांगला फोटो काढ ना, अशी रिक्वेस्ट आपल्या मागच्या पिढीतल्या आत्या-मावश्या-काका-मामांकडूनही होते आहे. इतरांचं कशाला, स्मार्टफोन हातात येण्याआधी आपण स्वतःबद्दल किती आणि कसा विचार करत होतो आणि आज काय करतो आहोत याचा पडताळा घेऊन पाहा. खरं ते उत्तर मिळून जाईल.
ही स्वकेंद्रितता व्हॉट्सॅपवरच्या स्टेटस नामक खिडकीतूनही ओसंडून वाहते आहे. हो, स्टेटस म्हणजे स्वतःबद्दल ओरडून सांगण्याची खिडकीच म्हणायची! आपण सध्या ज्या मन:स्थितीत आहोत, ज्या गोष्टीबद्दल विचार करतो आहोत, जे खातो-पितो आहोत, ज्यांच्यासोबत आहोत त्याचं प्रतिबिंब या स्टेटसमधून पडत असतं. भटकण्यासाठी बाहेर पडल्याच्या आनंदापासून भंगलेल्या हृदयाच्या वेदनेपर्यंतच्या नाना कळा तिथे आपल्याला समजतात. थोडक्यात काय, तर ‘माझं काय चाललंय बघा' आणि ‘माझ्याकडे लक्ष द्या' असं हे डीपी आणि स्टेटस आपल्याला ओरडून सांगत असतात. हा आरडाओरडा संबंधितांच्या कानावर पडला नाही, तर ‘माझा डीपी/स्टेटस पाहिला नाहीस का' असा प्रश्न विचारणारे मेसेजेसही येतात म्हणे!
फेसबुकवरच्या भिंती पाहिल्या तरी प्रामुख्याने ही स्वकेंद्रितताच डोळ्यांत भरते. प्रोफाइल भले एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं असो, तिथे स्वतःच्या मुलाबाळांचे-पर्यटनाचे-पर्यायाने स्वतःचे फोटोच जास्त टाकले जातात. त्या फोटोंखालच्या प्रतिक्रिया वाचून कुणालाही अजीर्ण व्हावं. फोटो कसाही असो, त्याला ‘सुंदर', ‘किती गोड', ‘मस्तच', ‘भारी' अशाच प्रतिक्रिया द्यायच्या असतात. फोटो टाकणाऱ्याला तेच अपेक्षित असतं आणि प्रतिक्रिया देणाऱ्यालाही. शेवटी प्रतिक्रिया देणाऱ्यालाही उद्या प्रतिक्रियेची अपेक्षा असतेच ना! त्यामुळे सर्वत्र ऐकू येत राहतो तो ‘अहो रूपम्, अहो ध्वनि'चा चीत्कार.
कोणी म्हणेल, झालं असं तर काय बिघडलं? स्वतःकडेच तर लक्ष देतोय ना आपण? काही गुन्हा तर नाही करत आहोत?
तेही खरंच. पण माणूस आपल्या चोवीस तासांतल्या फावल्या वेळात काय करतो यावर त्याचं आणि त्याच्या समाजाचं भविष्य ठरतं, हे साधं गणित आहे. म्हणूनच कुतूहल वाटतं, समाज म्हणून आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं असेल बरं?
माणूस जिवंत आहे की नाही याचा दाखलाही उद्या व्हॉट्सॅप आणि फेसबुकच्या स्टेटसमधूनच दाखवला जाणार आहे की काय?
(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
