पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत हालचाली होत असतात. कधी ज्वालामुखीच्या उद्रेकाने बेटांवर भूप्रदेशाची भर पडते, तर कधी भूकंपात गावंच्या गावं गडप होऊन जातात. बहुतेक वेळा आपण एक बातमी म्हणून वाचून त्याबद्दल विसरून जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत आफ्रिकेच्या जमिनीत पडलेल्या एका भेगेने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे.
इथिओपियाच्या अफार वाळवंटी प्रदेशात २००५ मध्ये एक मोठी भेग पडलेली आढळून आली. या प्रदेशात आफ्रिका आणि अरेबियाचे भूपट्ट (टेक्टॉनिक प्लेट्स) एकत्र येतात. त्यातला अरेबिया भूपट्ट आफ्रिका भूपट्टापासून वर्षाला सात मिलीमीटर इतका दूर जातो आहे. गेली तीन कोटी वर्षं या हालचाली संथपणे होत आहेत. एडनचं आखात आणि तांबडा समुद्र यांच्या निर्मितीमागे याच हालचाली आहेत. त्यामुळे इथिओपियातली ५६ किलोमीटर लांबीची मोठी फट पाहून इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे की काय याची शंका येऊन आजूबाजूच्या परिसरात प्रचंड भीती पसरली. उलटसुलट बातम्या यायला लागल्या. इंटरनेटच्या कृपेने ही माहिती वेगाने सगळीकडे पोहोचली आणि या आफ्रो-अरेबियन रिफ्ट व्हॅली परिसराकडे पर्यटकांचा ओघ सुरू झाला. संशोधकांनी तातडीने अभ्यास हाती घेतला आणि ही भेग वाढत गेली तर आफ्रिका खंडाचं विभाजन होण्याची शक्यता पुढे आली.
पृथ्वीवरचं जमिनीचं कवच अनेक भूपट्टांमध्ये विभागलेलं आहे. हे भूपट्ट सतत हलतात, सरकतात, कधी एकमेकांवर आदळतात, मग दूर जातात. कधी एक भूपट्ट दुसऱ्याला खालून ढकलतो, तर एखादा भूपट्ट फुटतो आणि त्यातून दोन-तीन भूपट्ट तयार होतात. हा सिलसिला कित्येक कोटी वर्षं चालला आहे. आताचे खंड आणि महासागर अशा हालचालींमुळेच घडलेले आहेत.
आफ्रिकेतला रिफ्ट व्हॅली परिसर भूकंपप्रवण आहे. तिथे पूर्वेकडील बाजूला सतत छोटे-मोठे भूकंप होत असतात. भूशास्त्राच्या अभ्यासकांची त्यावर बारीक नजर असते. त्यामुळे या क्षेत्रात भूपट्ट जास्त सक्रिय झाल्याची शंका आली. संशोधकांच्या एका टीमने या प्रदेशातल्या जमिनीच्या कंपनाचा डेटा गोळा करून त्याचं विश्लेषण केलं. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नल'मध्ये या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यानुसार समुद्राच्या पोटात जशी कंपनं आढळतात तशीच इथे मिळाली आहेत. जर त्याच प्रकारच्या प्रक्रिया रिफ्ट व्हॅली परिसरात होत राहिल्या तर आफ्रिकेत आणखी काही भेगा पडायला लागतील. आफ्रिका खंडाचं दुभाजन होईल आणि दोन खंडांच्या मध्ये एक नवा महासागर उदयाला येईल.
संशोधक जीपीएसच्या मदतीने अरेबिया आणि आफ्रिका प्लेटच्या स्थानांचं अचूक मोजमापन करत आहेत. त्यावरून त्यांनी अनुमान मांडलं आहे, की एडनचं आखात आणि तांबडा समुद्र दोन्ही हळूहळू या नव्या महासागराला येऊन मिळतील. त्याने पूर्व आफ्रिका हा एक छोटा वेगळा खंड होईल. काही देश पूर्णपणे पश्चिम आफ्रिका खंडात राहतील, तर इथिओपियासारख्या देशांचा थोडा भाग पूर्व आफ्रिका खंडात जाईल. या पूर्ण प्रक्रियेला पन्नास ते शंभर लाख वर्षं लागू शकतात.
तसं होईल तेव्हा जगात सातऐवजी आठ खंड असतील आणि पाचच्या जागी सहा महासागर. सहा आफ्रिकी देशांना पहिल्यांदाच किनारे मिळतील- रवांडा, युगांडा, काँगो, मालावी, बुरुंडी आणि झांबिया. तिथे बंदरं होतील, मालवाहतूक, बोटींची ये-जा सुरू होईल आणि आयात-निर्यातीला चालना मिळेल. कित्येक उपयोगी वस्तू त्या देशांमध्ये सहज उपलब्ध होतील. त्याच वेळी स्थानिक वस्तू परदेशी पाठवणं सोपं झाल्याने कदाचित या देशांना पहिल्यांदाच जागतिक बाजारपेठेत योग्य स्थान मिळेल. याचे पडसाद स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात उमटतील.
जागतिक व्यापारात युरोपने एक कालखंड गाजवला, मग उत्तर अमेरिका आणि आता आशियाचं वर्चस्व दिसतं. पुढील काळ आफ्रिकेचा असेल असे अनेक अंदाज आहेत. आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. विशेषत: जपान आणि युरोपियन देशांमध्ये तरुणांची वानवा जाणवत असताना आफ्रिकेला लोकसंख्येचा फायदा करून घेता येईल. आफ्रिकेचे दोन खंड होतील. तिथे सागरी वाहतूक वाढेल तेव्हा हे चित्र अधिक ठळक होईल.
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
