आम्ही कोण?
काय सांगता!  

समुद्रात तयार होताहेत प्लास्टिकची बेटं!

  • मयूर पटारे
  • 20.01.26
  • वाचनवेळ 3 मि.
plastic island

गेल्या पन्नास-साठ वर्षांत समुद्रांतलं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळे तिथे प्लास्टिक कचऱ्याची मोठीच मोठी बेटं तयार झाली आहेत. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरात असलेली ही बेटं पर्यावरणासाठी मोठाच धोका बनली आहेत.

ही बेटं तयार कशी होतात? समुद्रात गोल फिरणारे पाण्याचे प्रवाह असतात. त्यांना 'गायर्स' (Gyres) म्हणतात. जमिनीवरून किंवा नद्यांतून समुद्रपर्यंत आलेला प्लास्टिकचा कचरा समुद्राच्या मध्यभागी नेण्याचं काम हे गायर्स करतात. एकदा गायर्समध्ये अडकलेला कचरा परत बाहेर पडू शकत नाही. मग तो 'बेटासारखा' दिसू लागतो.

या बेटांवर असलेल्या प्लॅस्टिकपैकी साधारण ८० टक्के प्लास्टिक जमिनीवरून नद्यांवाटे समुद्रात जातं. तर २० टक्के प्लास्टिक समुद्रातील जहाजं, तसंच तेल आणि गॅस प्लॅटफॉर्म यातून तयार होतं. इथल्या काचऱ्यात मासेमारीची जाळी, बाटल्या, खेळणी आणि अब्जावधी मायक्रोप्लास्टिकचे कण असतात. तुम्ही एखादी प्लास्टिकची बाटली समुद्रात टाकली, की काही वर्षांत ती या बेटांच्या मध्यभागी पोहोचते. प्लास्टिक कधीच पूर्णपणे नष्ट होत नसल्यामुळे या बेटांवर पन्नास-साठ वर्षापूर्वीच्या प्लास्टिकच्या वस्तू सापडल्या आहेत.

समुद्रात अशी एकूण सात प्लास्टिकची महा-बेटं आहेत.

१. ग्रेट पॅसिफिक प्लास्टिक आयलंड (Great Pacific Garbage Patch) - हे जगातील सर्वात मोठं आणि ६० वर्षं जुनं बेट आहे. हे कॅलिफोर्निया आणि हवाई यांच्यामध्ये आहे. आकाराने ते फ्रान्सच्या तिप्पट मोठं आहे.

२. दक्षिण पॅसिफिकमधील प्लास्टिक बेट (South Pacific Garbage Patch)- चिली आणि पेरूच्या किनारपट्टीजवळ असलेलं हे बेट इटलीपेक्षा आठपट मोठं आहे. या बेटावर प्रामुख्याने मायक्रोप्लास्टिक आढळतं.

३. उत्तर अटलांटिकमधील प्लास्टिक बेट (North Atlantic Garbage Patch)- इतर बेटांच्या प्रमाणात या बेटावर खूप जास्त कचरा आहे.

४. दक्षिण अटलांटिकमधील प्लास्टिक बेट (South Atlantic Garbage Patch)- हे बेट दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्ये आहे. यात साधारण ८६० टन कचरा असल्याचं सांगितलं जातं.

५. हिंदी महासागरातील प्लास्टिक बेट (Indian Ocean Garbage Patch)- या बेटाचा आकार सतत बदलत असतो. याचा व्यास ३,००० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

६. आर्क्टिक प्लास्टिक बेट (Arctic Garbage Patch) - युरोप आणि उत्तर अमेरिकेतील कचरा या बेटापर्यंत येऊन पोहोचतो.

७. सारगासो समुद्रातील प्लास्टिक बेट (Sargasso Sea Garbage Patch)- हे जगातलं सर्वात छोटं प्लास्टिक कचऱ्याचं बेट आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात साठल्यानंतर आता हळूहळू त्याचे परिणाम पर्यावरणावर होऊ लागले आहेत. याचा धोका लक्षात आल्यानंतर द ओशन क्लीनअप (The Ocean Cleanup), प्लास्टिक बँक (Plastic Bank), पार्ले फॉर द ओशन्स (Parley for the Oceans), 4ओशन (4Ocean) या सारख्या संस्था समुद्र स्वच्छतेसाठी आणि प्रबोधनाचं काम करण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्या जगाला प्लास्टिकचा वापर थांबवण्याचं व पुनर्वापर करण्याचं आवाहन करत आहेत.

मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com

युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Snehal 20.01.26
उपयुक्त माहिती

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results