आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

रोडस्टरची भटकंती

  • मेघश्री दळवी
  • 02.09.25
  • वाचनवेळ 4 मि.
tesla roadster

एक रॉकेट अवकाशात उड्डाण करतंय असं ऐकलं की डोळ्यांसमोर काय येतं? रॉकेटवर एक स्पेस शटल असेल किंवा एखादा सॅटेलाइट असेल. पण फेब्रुवारी २०१८ मध्ये फाल्कन हेवी रॉकेट काय घेऊन उडालं माहीत आहेत का? चक्क एक चारचाकी स्पोर्ट्स कार. भडक लाल रंगाची टेस्ला रोडस्टर!

ही रोडस्टर अवकाशात सोडून द्यायची कल्पना एलॉन मस्कची. फाल्कन हेवी रॉकेट बनवणारी स्पेसएक्स कंपनी त्याची, रोडस्टर बनवणारी टेस्ला कंपनीही त्याची आणि ही लाल रोडस्टरही त्याची स्वत:चीच. तेव्हा या सगळ्या प्रयोगात दुसऱ्या कुणाला विचारायची त्याला गरज वाटली नसेल!

अवकाशात कुणी तरी गाडी चालवतो आहे असं दाखवायला म्हणून रोडस्टरमध्ये ड्रायव्हरच्या जागी एक पुतळा आहे. या स्टारमन पुतळ्याला अवकाशयात्रींसारखा पोशाख दिलेला आहे. रोडस्टर अवकाशात गेली तेव्हा गाडीतले तीन कॅमेरे लाइव्ह प्रक्षेपण करत होते. काळंभोर अवकाश, पार्श्वभूमीला पृथ्वीचा निळा गोल, लाल गाडी आणि पांढऱ्या स्पेससूटमधला हेल्मेटधारी स्टारमन हा व्हिडिओ यूट्युबवर पाहता येतो.

आज रोडस्टर कुठे आहे? ती मंगळाजवळ पोहोचेल, मग सूर्याभोवती फिरत राहील, थोड्या वर्षांनी आपल्याला आकाशात दिसू शकेल, असे अनेक अंदाज त्या वेळी जाहीर झाले होते. पण रोडस्टरची दिशा किंचित बदलली. ती मंगळापलीकडच्या लघुग्रहांच्या पट्ट्यात जाऊन आदळेल अशी अपेक्षा होती, तेही झालं नाही. एखाद्या वस्तूचा अवकाशातून प्रवास कसा असेल हे ठरवण्यासाठी कित्येक निरनिराळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, गुंतागुंतीची समीकरणं मांडावी लागतात. त्यामुळे रोडस्टरचा मार्ग नक्की काय असेल हे अचूक सांगणं कठीण आहे, पण ती सध्या कुठे आहे याची माहिती मात्र मिळत राहते.

अवकाशात सोडलेल्या उपग्रहांच्या ‘नासा'द्वारे नोंदी ठेवल्या जातात. त्यात एक मॅनमेड वस्तू म्हणून रोडस्टरचा समावेश केला गेला आहे. हौसेने तिचा मागोवा ठेवणाऱ्या आणखी काही साइट्स आहेत. त्यानुसार रोडस्टर मंगळापलीकडे गेलेली आहे. तिने सूर्याभोवती चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. अशाच प्रदक्षिणा ती घालत राहील. ते करताना मंगळ आणि पृथ्वी यांच्या कक्षेला छेदून जाईल. साधारण २०९१ मध्ये ती पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल. त्या वेळी दुर्बिणीतून तिचा वेध घेता येईल अशी भाकितं आता होत आहेत.

मात्र, अवकाशातली रोडस्टर जशीच्या तशी राहणार नाही. अवकाशातल्या प्रखर रेडिएशनमुळे तिचा लालभडक रंग एव्हाना उडून गेला असेल. याच रेडिएशनमुळे तिच्या आतली इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बहुधा बंद पडली असेल. तिचे रबरी टायर्स खराब होऊन गेले असतील. आतले प्लॅस्टिक आणि फायबरचे भाग एक-एक करून नष्ट होत जातील. तिचा लोखंडी सांगाडा तेवढा उरेल. अवकाशात ऑक्सिजन नसल्याने रोडस्टरचा सांगाडा गंजणार नाही, पण इतर कारणांनी त्याचे तुकडे पडू शकतात. आणि तो छिन्नविच्छिन्न सांगाडा शाबूत राहिला तरच सत्तरएक वर्षांनी रोडस्टरचं दर्शन होईल.

रोडस्टरच्या निमित्ताने आता बरेच विलक्षण प्रश्न उभे राहिले आहेत. रोडस्टरच्या कक्षेची किंवा भ्रमणाची रीतसर आखणी केली गेली नव्हती. अवकाशात एखादी वस्तू अशी आयत्या वेळेला, रामभरोसे सोडून देणं योग्य आहे का? उद्या ती आपल्या एखाद्या सॅटेलाइटवर किंवा यानावर आदळली तर? किंवा, एखाद्या अशनीला तिचा धक्का बसून अशनीचा मार्ग बदलला तर? अवकाशात सोडताना रोडस्टर पूर्ण निर्जंतुक केली होती का याची खात्री नाही. काही सूक्ष्म जीव अवकाशात तग धरून राहू शकतात. आज आपण पृथ्वीवर प्रदूषणाच्या समस्यांना तोंड देत आहोत. तशीच रोडस्टरमुळे अवकाशाच्या प्रदूषणाला आपण सुरुवात करून दिली आहे का? अवकाशात काय वाट्टेल ते टाकण्याचा हक्क आपल्याला आहे का?

पृथ्वी, मग आपली सौरमाला आणि त्यापलीकडच्या अवकाशाला गवसणी घालताना आपल्याला कोणत्या मर्यादा पाळायला हव्यात?

अवकाश मोहिमांमध्ये खासगी कंपन्या वेगाने सहभागी होत आहेत. तेव्हा रोडस्टरसारखे चित्रविचित्र प्रयोग पुढेही होऊ शकतात. जाहिरातबाजीसाठी अवकाशाचा वापर करण्याची कल्पनाही सतत डोकं वर काढत असते. तेव्हा अवकाशाबाबत मार्गदर्शक तत्त्वं मांडायची वेळ लवकरच येईल असं दिसतं आहे.

Key highlights- In February 2018, SpaceX launched a Tesla Roadster into space with the Falcon Heavy rocket. The car, featuring a mannequin called 'Starman,' is now beyond Mars' orbit, but its path is unpredictable. This raises concerns about space debris, possible collisions, and the need for new rules for private companies in space.

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results