आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

इंडिगो : एका इनोव्हेटिव्ह उड्डाणाची (इतिहासजमा?) गोष्ट

  • गौरी कानेटकर
  • 07.12.25
  • वाचनवेळ 11 मि.
indigo

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा कमालीची विस्कळीत झाली आहे. एकेकाळी खात्रीशीर-स्वस्त विमानसेवा म्हणून नावाजल्या गेलेल्या या विमानकंपनीचं नेमकं काय बिनसलंय याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण त्याआधी इंडिगोने अतिशय कमी काळात मिळवलेल्या यशामागची कहाणी काय होती हे सांगणारा २०१२ सालचा हा लेख.

दिल्लीच्या गजबजत्या विमानतळावरून एक माणूस लगबगीने बाहेर पडतो. ठरलेल्या मीटिंगसाठी हॉटेलवर जाण्याआधी आठवणीने बॅगवरचा विमान कंपनीचा टॅग काढून टाकतो. का? तर आपण लो कॉस्ट विमानसेवेने प्रवास केलाय, हे आपल्या क्लायंटला कळू नये आणि त्याचं आपल्याबद्दलचं मत बदलू नये, असा त्यामागचा प्रामाणिक हेतू असतो.

लो कॉस्ट म्हणजे लो क्वालिटी, असा शिक्का अगदी कालपरवापर्यंत अशा विमानसेवांवर पक्का बसलेला होता. अशी विमानसेवा म्हणजे पब्लिक सवारी. त्यातून प्रवास केला, हे लपवण्याकडेच त्यांचा जास्त कल असायचा. हे चित्र बदललं ‘इंडिगो'च्या आगमनानंतर. तिकीट कमी, पण दर्जा तोच, असं ब्रीद घेऊन आलेल्या ‘इंडिगो'ने लो कॉस्ट विमानाची व्याख्याच बदलली. एवढंच नव्हे, तर लो कॉस्ट विमानसेवाही यशस्वी ठरू शकते, नफा कमवू शकते, ही आजवर अशक्य वाटणारी बाब ‘इंडिगो'ने शक्य करून दाखवली. मार्च २०१२च्या आकडेवारीनुसार ‘इंडिगो' ही आज देशातली नफा कमावणारी एकमेव विमान वाहतूक कंपनी आहे. देशातल्या विमान प्रवाशांचा सर्वाधिक टक्का आज इंडिगोकडे आहे.

या यशाकडे केवळ एका कंपनीचं यश म्हणून पाहणं बरोबर नाही. आपल्या देशातली विमान वाहतुकीची परिस्थिती समजून घेतली तरच या यशाचं आणि त्यामागच्या कारणांचं महत्त्व समजू शकतं.

भारतातली हवाई वाहतूक ही बराच काळ उच्चभ्रू मंंडळींसाठीच होती. विशेषतः राजकारणी आणि बडे उद्योगपती यांच्याशिवाय इतरांना विमानात बसण्याचं स्वप्न पडणंही अवघड होतं. उच्चवर्गीय मंडळीही पैसे साठवून परदेशी पर्यटनाला जाण्यासाठी विमानात चढत. १९९०नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. देशात पैसा खुळखुळू लागला आणि कामासाठी परदेशी जाणारी, विशेषत: आयटीमधली मंडळी यांच्यासाठी विमानप्रवास नेहमीचा बनला. अर्थात सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी मात्र अजूनही तो अप्राप्यच होता. १९९४ नंतर खासगी विमान कंपन्यांना परवानगी मिळाल्यानंतर २००० मध्ये भारतात ‘लो कॉस्ट' विमान वाहतुकीला सुरुवात झाली. काही बड्या कंपन्यांनी ‘लो फेअर' विमानसेवा सुरू केली आणि या कंपन्यांसमोर एक मोठं मार्केट खुलं झालं. आजवर ज्यांचा गिऱ्हाईक म्हणून विचारच झालेला नव्हता असा एक मोठा वर्ग या कंपन्यांच्या दृष्टिपथात आला. मध्यमवर्गीय आणि अगदी काही वेळा कनिष्ठ मध्यमवर्गीयही तिकडे वळू लागले. पण या विमानसेवांच्या लेखी दर कमी याचा थेट अर्थ दर्जाही कमी असाच होता. अगदी बड्या कंपन्यांनी सुरू केलेल्या लो कॉस्ट सेवांचाही त्याला अपवाद नव्हता. त्या वेळी अनेक कंपन्यांचं वर्णन ‘उडता लाल डब्बा' असं केलं जायचं. जुनी विमानं, मेटेंनन्सची-स्वच्छतेची दुरवस्था, वेळापत्रक पाळण्याची मारामार, असे प्रकार विमानातही घडायचे. शिवाय कमी दर आकारून विमान कंपनी चालवणं ही त्या विमान कंपन्यांच्या दृष्टीने तारेवरची कसरतच होती. त्यामुळे २००० ते २००५-०६ या काळात अनेक लो कॉस्ट कंपन्या तोट्यात गेल्या. अनेक कंपन्या बंद झाल्या. काही कंपन्यांची बड्या कंपन्यांबरोबर मर्जर्स झाली. छोट्या लो कॉस्ट कंपन्या म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार, असा निष्कर्षच हळूहळू काढला जाऊ लागला.

अर्थात हे दिवस फक्त लो कॉस्ट एअरलाइनसाठीच कठीण होते अशातला भाग नाही. एकूणच, भारतातल्या खासगी विमान कंपन्यांसाठीच तो काळ कठीण होता. अनेक बड्या कंपन्यांनाही तडाखेबंद तोटा सहन करावा लागला होता. प्रवासी संख्या घटत होती. आणि इंधनखर्च वाढत चालला होता. त्यातून मार्ग कसा काढायचा याचं आयतं उत्तर कोणत्याच कंपनीकडे नव्हतं. आजही ही परिस्थिती फारशी बदललेली नाहीच. देशातल्या जवळपास सर्व कंपन्या खर्चाची तोंडमिळवणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचवेळी इंडिगो मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. इतर कंपन्या तोटा कमीत कमी ठेवण्यासाठी धडपडत असताना इंडिगोने गेल्या आर्थिक वर्षी मिळवलेला नफा आहे सहाशे पन्नास कोटी रुपये. स्पर्धेतल्या इतर कंपन्यांची लायसन्स रद्द होत असताना इंडिगो मात्र विस्तारीकरणाचे नवे प्लॅन्स आखत आहे. आणि चमत्कार वाटावा असं हे यश इंडिगोने केवळ सहा वर्षांमध्ये मिळवलं आहे. या यशामागे अर्थातच चमत्कार नसून, इंडिगोने शोधून काढलेली अनेक छोटी इनोव्हेशन्स आहेत. इनोव्हेशन म्हणजे नवं प्रॉडक्ट किंवा आजवर कोणीही न अवलंबलेली पद्धत ही व्याख्याही इंडिगोने बदलून टाकली आहे. कंपनी सुरू करण्याआधीच्या मायन्यूट प्लॅनिंगपासून ते प्रवाशांना ‘लो कॉस्ट'चा फील येऊ नये यासाठी हरतऱ्हेची काळजी घेण्यापर्यंत हजारो गोष्टींमध्ये इंडिगोचं इनोव्हेशन आहे. ते इनोव्हेशन व्यवसायाकडे, आपल्या ग्राहकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आहे, तसंच उद्योगातल्या प्रत्येक विभागाला, प्रत्येक टप्प्यावर आवश्यक तितकं नियोजन, महत्त्व आणि वेळ देण्यामध्येही आहे. त्यामुळेच इंडिगो ही आज भारतातली नफा कमावणारी एकमेव विमान कंपनी आहे.

इंडिगोची सुरुवात झाली २००६ साली. चार ऑगस्ट २००६मध्ये त्यांनी दिल्ली ते इंफाळ व्हाया गुवाहाटी असं पहिलं उड्डाण घेतलं. पण इंडिगोचा प्रवास समजून घ्यायचा अन्‌‍ त्यातल्या इनोव्हेशनचा गाभा उलगडायचा तर त्याच्या स्थापनेच्याही आधीचा काळ समजून घेतला पाहिजे. कारण सुरुवात होण्याआधीच्या भक्कम नियोजनात आणि दूरदृष्टीतच इंडिगोने अर्धी बाजी मारली, असं या विषयातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

‘इंडिगो' सुरू केली राहुल भाटिया यांनी. भाटिया यांनी कॅनडातील विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग केलं. त्यानंतर आयबीएममध्ये दोन वर्षं कामही केलं. पुढे पीएचडीसाठी अमेरिकेत थांबण्याचा विचार सुरू असतानाच त्यांना वडिलांच्या तब्येतीच्या तक्रारीमुळे भारतात परत यावं लागलं. आणि परतल्यावर वडिलांच्या ‘दिल्ली एक्स्प्रेस' या छोट्या व्यवसायात लक्ष घालणं त्यांना भाग पडलं. ‘दिल्ली एक्स्प्रेस' ही विमानसेवेशी संबंधित सेवा पुरवणारी कंपनी होती. त्यातूनच पुढे भाटिया यांनी ‘इंटरग्लोब एंटरप्रायजेस' ही नवी कंपनी सुरू केली. भाटिया यांची स्वप्नं मोठी होती. भारतात राहून ‘दिल्ली एक्स्प्रेस'चं काम करताना त्यांनी इथल्या विमानसेवेचा काळजीपूर्वक अभ्यास केला. काही निष्कर्ष त्यांना लख्खपणे दिसत होते. आजवर कधीही विमानप्रवास न केलेला, विमानप्रवास न परवडणारा एक मोठा वर्ग भारतात होता. त्या वर्गातल्या काहींना ‘लो कॉस्ट'वाल्या कंपन्यांनी आकृष्ट केलं होतं, पण ‘इतने पैसे में इतनाही मिलेगा' ही जणू त्या कंपन्यांच्या दर्जाबद्दल बोलणारी टॅगलाइन होती. उत्तम दर्जा देणारी लो कॉस्ट विमानसेवा देता येणं का शक्य नाही, असा विचार भाटिया यांच्या मनात आला आणि त्यांनी ती शक्यता अजमावायला सुरुवात केली. विमानसेवा चालवण्याच्या सर्व खर्चांमध्ये काटेकोरपणे बचत केली तर हे अशक्य नाही, असं त्यांना अभ्यासावरून लक्षात येत होतं. अर्थातच एक विमानसेवा सुरू करणं ही बरीच मोठी उडी होता. उलट-सुलट विचार करून अखेेरीस भाटिया यांनी या क्षेत्रात पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला.

एकदा निर्णय झाल्यावर त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘पार्टनर्स' शोधायला सुरुवात केली. त्यासाठीही त्यांचा गृहपाठ तयार होताच. ‘यूएस एअरवेजचे' माजी सीईओ राकेश गंगवाल यांच्याशी त्यांची काही वर्षांपूर्वी उडत उडत ओळख झाली होती. विमानसेवेबद्दलची ‘इन अँड आउट' माहिती असणारा आणि त्याचबरोबर नव्या प्रयोगांना तयार असणारा दुसरा माणूस भाटिया यांच्या ऐकिवात नव्हता. गंगवाल यांनाही ‘लो कॉस्ट-हाय व्हॅल्यू' विमानसेवेची ही महत्त्वाकांक्षी कल्पना तत्काळ पसंत पडली. या दोघांनी जवळपास समसमान भागीदारीमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोघंही तपशीलवार नियोजनाच्या मागे लागले. कारण घाई-गडबड करून चालणार नव्हतं. आजवर अनेक विमान कंपन्या ‘लोकॉस्ट'च्या मोहात क्रॅश झाल्या होत्या. त्यामुळेच विमानसेवेला सुरुवात करण्याआधी या दोघांनी अतिशय तपशीलवार आणि दूरदृष्टी ठेवून नियोजन केलं. उद्दिष्ट होतं: प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी कटकटींमध्ये आणि काटेकोर वेळेत पोहोचवणं, त्याचबरोबर ही कंपनी नफ्यात चालवणं.

या नियोजनाची झलक लवकरच अख्ख्या विमान वाहतूकक्षेत्राला बघायला मिळाली. भाटिया-गंगवाल यांनी पुढच्या दहा वर्षांचा विचार करून २००५ साली ‘एअरबस' या विमाननिर्मिती करणाऱ्या कंपनीला एकहाती शंभर विमानांची ऑर्डर दिली. भारताच्या नव्हे, तर जागतिक विमान वाहतूक इतिहासात एवढी मोठी ऑर्डर एकाच वेळेला दिली गेली नव्हती. या खरेदी व्यवहारामुळे पदार्पणापूर्वीच इंडिगोकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं. अनेकांना वाटलं, की इंडिगो विमानं विकत घेईल आणि नंतर ती इतर कंपन्यांना विकून टाकेल. पण सगळं जग समजत होतं त्याप्रमाणे भाटिया-गंगवाल कॅज्युअल नव्हते. ‘एअरबस'ची ‘ए३२०' या एकाच प्रकारची विमानं एकाच वेळी खरेदी करून इंडिगोने पहिली बाजी मारली. या डीलमुळे त्यांना ‘एअरबस'सोबत मोठ्या प्रमाणात भाव निगोशिएट करता आला आणि विमानखरेदीमध्ये मोठी बचत झाली. विमानासारख्या अवाढव्य किमतीच्या व्यवहारामध्ये ही बचत म्हणजे कायमस्वरूपी फायदा, असं तज्ज्ञांचं म्हणणं पडलं.

शिवाय ‘एअरबस'सोबतचं हे डील आणखीही अनेक दृष्टींनी फायदेशीर होतं. या शंभर विमानांची डिलिव्हरी ‘इंडिगो' एकाच वेळी घेणार नव्हतं, तर जवळपास दहा वर्षांच्या टप्प्यांमध्ये एकामागून एक विमानं त्यांच्या ताफ्यात दाखल होणार होती. या हिशोबाने २०१५ साली जेव्हा सर्व शंभर विमानांची ऑर्डर पूर्ण होईल, तेव्हा नव्याने दाखल करण्यासाठी नव्या (निओ-३२०) एकशे ऐंशी विमानांची ऑर्डरही ‘इंडिगो'ने गेल्या जानेवारीमध्ये ‘एअरबस'लाच दिली आहे. ‘एअरबस'शी विचारपूर्वक आणि हुशारीने केलेलं डील ही ‘इंडिगो'साठी मोठी जमेची बाजू ठरली आहे. या डीलमध्येही आणखी एक तरतूद ‘इंडिगो'च्या खर्चात बचत करणारी आहे. प्रवासी विमानांचा कार्यक्षम काळ साधारण आठ वर्षांचा असतो. त्यानंतर ही विमानं काम काढायला सुरुवात करतात. त्यावर होणारा खर्च वाढतो आणि ती इंधनही जास्त पिऊ लागतात. त्यामुळे बड्या कंपन्या अशी विमानं लो कॉस्ट विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना विकतात. पण इंडिगोने या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमधील रुळलेल्या वाटेने जाणं नाकारलं. त्यांनी ‘एअरबस'शी केलेल्या डीलनुसार प्रत्येक विमान ‘एअरबस' दर सहा वर्षांनी परत घेणार आहे. या तरतुदीमुळे इंडिगोच्या ताफ्यात फक्त नवी व उत्तम स्थितीतली विमानं राहतील, याची सोय झाली.

उड्डाणाआधीच पुढच्या दहा-पंधरा वर्षांचं काटेकोर नियोजन केल्यावरच इंडिगोने प्रत्यक्ष ‘ऑपरेशन्स'च्या कामांना हात घातला. परवानग्या मिळवणं, विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था करणं, कर्मचाऱ्यांची रिक्रुटमेंट अशा प्रत्येक पातळीवर भाटिया-गंगवाल यांचं सूक्ष्म नियोजन होतं. उदाहरणच द्यायचं झालं, तर ‘इंडिगो'च्या सर्वांत वरच्या अधिकाऱ्यापासून अगदी तळातल्या स्वीपरपर्यंत प्रत्येकाच्या निवडीवेळी भाटिया स्वत: हजर होते. प्रत्येक माणूस त्यांनी पारखून घेतला. “काम हीच पॅशन असं मानण्यावर आमच्या दोघांचा (भाटिया, गंगवाल) विश्वास होता आणि आमचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं तर आम्हाला आमच्या सोबत आमच्यासारखीच माणसं हवी होती. कंपनी चालवण्यासाठी जसं नियोजन, खर्चात बचत, या बाबी आवश्यक होत्या, तसंच संपूर्ण कंपनीची ‘संस्कृती' एकसारखी असणं आणि त्यावर इथे काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरेपूर विश्वास असणं गरजेचं होतं,” असं भाटिया सांगतात.

त्यामुळे ऑगस्ट २००६मध्ये ‘इंडिगो'ने पहिलं उड्डाण केलं तेव्हा त्यांच्याजवळ उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि काटेकोर नियोजन तर होतंच, पण कामावर श्रद्धा असणारी माणसंही होती. त्यात सर्वांत महत्त्वाचं नाव होतं कंपनीचे अध्यक्ष म्हणून रुजू झालेल्या आदित्य घोष यांचं. भाटिया-गंगवाल यांनी आपलं स्वप्न घोष यांच्या हातात सोपवलं आणि इंडिगोचं विमान सुसाट सुटलं ते आजवर थांबलेलं नाही.

‘इंडिगो' सुरू करताना तीन उद्दिष्टं समोर ठेवण्यात आली होती. वक्तशीरपणा, कमी दर आणि विना कटकट प्रवास. प्रवाशांना विमानप्रवास करताना याच तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, असा भाटिया-गंगवाल-घोष यांचा ठाम विश्वास होता.

विमानाचं तिकीट कमी ठेवायचं तर खर्चात बचत करणं गरजेचं होतं. विमानखरेदीशिवाय इतरही अनेक प्रकारे ही बचत इंडिगोने केली. मुख्य म्हणजे ही बचत कायमस्वरूपी असली पाहिजे यासाठी इंडिगोने तरतूद केली. भाटिया यांच्या मते यशस्वी कंपन्या आणि अयशस्वी कंपन्या यांच्यामधला मुख्य फरक ‘खर्चात बचत' हाच असतो.

त्यामुळेच इतर सर्व कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी नवी आमिषं देण्याच्या मागे होत्या, तेव्हा विमानात कोणतीही खाद्य-पेय सेवा न पुरवण्याचा निर्णय इंडिगोने घेतला. शिवाय विमानात जेवण, नाश्ता, पेयपान, मासिकं अशा गोष्टी देऊन ग्राहकांना खूष करण्यापेक्षाही ग्राहकांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या तीन गोष्टी पाळणं जास्त आवश्यक आहे यावर भाटिया-गंगवाल ठाम होते. या निर्णयाचा फायदा दुहेरी होता. त्यामुळे अवजड सामग्री बाळगण्याची गरज पडणार नव्हती. त्यामुळे विमानाचं वजन इतर विमानांपेक्षा बरंच कमी राहणार होतं आणि इंधन वाचणार होतं.

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे अगदी प्रत्येक विभागातल्या कर्मचाऱ्यांना आपलं काम कार्यक्षमतेने आणि कमीत कमी वेळात करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ, प्रवाशांना सहा मिनिटांमध्ये खाली उतरवण्याचं प्रशिक्षण त्यांच्या ग्राऊंड स्टाफला मिळालेलं आहे. त्याचबरोबर सामान खाली उतरवून नव्या उड्डाणातल्या प्रवाशांचं सामान वर चढवण्यासाठी इंडिगोला फक्त दहा मिनिटं लागतात. इंडिगोचं प्रत्येक विमान अवघ्या पंचवीस मिनिटांत उड्डाणासाठी तयार होतं. (इतर विमानांचा हा वेळ तीस मिनिटांहून अधिक आहे.) प्रत्येक विमानाचा जमिनीवरचा वेळ वाचवणं याचा अर्थ उड्डाणासाठी त्याला अधिक वेळ मिळणं. आणि उड्डाणासाठी अधिक वेळ म्हणजे अधिक उत्पन्न. सध्या इंडिगोचं प्रत्येक विमान रोज कमीत कमी अकरा तासांचा प्रवास करतं. (इतर विमान कंपन्यांचा हा काळ आठ ते दहा तासांचा आहे)

संपूर्ण कंपनीच्या कार्यपद्धतीत रुजवलेल्या अशा अनेक नव्या गोष्टींमुळे ‘इंडिगो'चा खर्च कमी होतो आणि ‘लो कॉस्ट' विमानसेवा देणं परवडू शकतं.

‘लो कॉस्ट' सेवा असूनही ती प्रवाशांना ‘चीप' वाटता कामा नये, याकडेही ‘इंडिगो'ने लक्ष पुरवलं आहे. प्रवाशांना मानाची वागणूक देणं हा त्यातला एक भाग. नवी विमानं, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे वक्तशीरपणा यामुळे इंडिगोने स्वत:चा फॅन क्लब निर्माण केला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तेही कोणत्याही अवाजवी जाहिरातींची मदत न घेता. माऊथ पब्लिसिटी हीच उत्तम जाहिरात, असं भाटिया यांचं म्हणणं. इंडिगोच्या जाहिरातीचं काम पाहणाऱ्या कंपनीचे संचालक मोहित जयालही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देतात. “ग्राहकांना चांगला अनुभव येत नसेल तर जाहिरात वगैरेंचा काहीही उपयोग नसतो,” असं ते म्हणतात. गेल्या सहा वर्षांत इंडिगोने अत्यल्प आणि जिथे आवश्यक तिथेच केलेल्या जाहिरातींच्या आणि प्रामुख्याने माऊथ पब्लिसिटीच्या बळावर ग्राहकांच्या पसंतीचं नवं शिखर गाठलेलं दिसतं आहे. याची साक्ष इंडिगोच्या वेबसाइटवर आणि फेसबुकवर तर मिळतेच, पण वाढत्या ग्राहकसंख्येमुळे आणि इतर कंपन्या तोट्यात जात असताना वाढत चाललेल्या इंडिगोच्या नफ्यामुळेही ग्राहकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सिद्ध होतो. आजघडीला देशातले एकोणिस टक्के प्रवासी इंडिगोने प्रवास करतात, हे त्याचंच दृश्य रूप.

इनोव्हेशन म्हणजे काही तरी क्रांतिकारी-जगावेगळं संशोधन असंच नव्हे, तर आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दाखवलेलं सातत्य आणि छोट्या छोट्या पातळीवर रुजवलेल्या नव्या कल्पना हेदेखील वेगळ्या इनोव्हेशनचं उदाहरण ठरू शकतं, हे इंडिगोने आपल्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत दाखवून दिलं आहे.

या यशाच्या पार्श्वभूमीवर भाटिया यांचं म्हणणं समजून घेतलं की या यशाची गुरुकिल्ली सापडायला मदत होते. ते म्हणतात, “हवाई वाहतूक उद्योगाचा आवाका पाहिला तर आम्ही एक नगण्य कंपनी आहोत. आम्हाला सुरुवातीलाच यशाची चव चाखायला मिळाली आहे हे खरं; पण त्या यशाचा आम्ही फारसा विचार करत नाही. आम्ही ठरवून घेतलेल्या तत्त्वांनुसार आणि आखलेल्या योजनेनुसार काम करत राहणं, एवढं आमचं उद्दिष्ट आहे. ते आम्ही सर्वजण सतत, प्रत्येक मिनिटाला करत असतो एवढंच!”

‘इंडिगो'चं स्पिरिट नेमकं काय आहे हे या वाक्यातून पुरेसं कळावं.

(अनुभव, दिवाळी २०१२च्या अंकातून साभार)

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results