आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

होय, व्यसनमुक्ती शक्य आहे!

  • महेंद्र कानिटकर
  • 31.05.26
  • वाचनवेळ 14 मि.
de addiction

कोणत्याही स्वरुपात माणूस तंबाखूचं व्यसन करत असेल, तर माझ्या अनुभवावरून सांगतो, माणसाचा प्रचंड छळ होतो. तंबाखूच्या व्यसनाइतकं चिवट, सुटायला अवघड दुसरं कोणतंही व्यसन नाही.

आपल्याकडे तंबाखू खाण्याचं प्रमाण मोठं आहे. पण खरंतर, तंबाखू मूळची भारतातली नाही. पोर्तुगीजांनी १६व्या शतकात तंबाखू भारतात आणली. ते पीक इतकं फोफावलं, की आज तंबाखू उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच भारत आज तंबाखूचा एक नंबरचा निर्यातदारही आहे.

तंबाखूबद्दलची खरी माहिती फारच थोड्या जणांना ठाऊक असते. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं घटकद्रव्य असतं. या निकोटीनमुळे व्यसन लागतं. वारंवार तल्लफ येते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या जातींनुसार पाचशे ते सहाशे प्रकारची रसायनं तंबाखूत असतात. त्या रसायनांमुळे तंबाखूबद्दल आसक्ती निर्माण होते.

निकोटीन सल्फेट हे तंबाखूच्या गाळातून तयार होणारं कीटकनाशक आहे. म्हणजेच तंबाखूतून अक्षरशः विष तयार होतं. तंबाखूच्या शेताला कुंपण नसतं, कारण जनावरं तंबाखूच्या पिकाला तोंड लावत नाहीत. थोडक्यात, या पृथ्वीतलावर तंबाखू खाणारा माणूस हाच एकमेव प्राणी आहे.

भारतात तंबाखूचं पान, गुटखा, खैनी, मावा आणि मळून तंबाखू ही धूरविरहित व्यसनं सर्रास आढळतात. मिश्री आणि तपकीरीचा वापर करणारीही अनेक मंडळी आहेत. कमी खर्चिक, फारशी सामाजिक उलथापालथ न घडवणारं हे व्यसन आहे. अर्थातच हे व्यसन सोडायचे कष्ट कोणी घेत नाही. त्यामुळे तंबाखू सेवन ही बाब दैनंदिन आयुष्याचा भाग बनून जाते.

हेही वाचा - व्यसनमुक्तीची अशीही गोष्ट...

तंबाखू सेवनाची सुरुवात सामान्यतः किशोरवयात होते. मुलांच्या समोर अनेकदा आई-वडील आणि अन्य वडीलधारी मंडळी सहज तंबाखू खात असतात. तंबाखू खाणं वाईट आहे, असं शाळेत शिकवलं तरी घरात माणसं तंबाखू खाताना दिसतात. कित्येक शाळांत शिक्षक स्वतःच तंबाखू खाऊन शिकवतात. त्यामुळे तंबाखू वाईट आहे, यावर कोणाचा विश्वास बसणार ?

घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या तंबाखू सेवनातून कुतूहल निर्माण होतं आणि अनेक मुलं तंबाखू खाण्याकडे वळतात. असंही घडतं, की शाळेत काही मोठी मुलं तंबाखू खातात आणि तंबाखू न खाणाऱ्या मुलांची टिंगल करतात. त्यामुळे तंबाखू न खाणं कमीपणाचं वाटू लागतं. दुसरीकडे, काहीजणांच्या घरी तंबाखूबद्दल कमालीचं द्वेषाचं वातावरण असतं. त्या घरात तंबाखू खाणं हा गुन्हा मानला जातो. अशा घरातली मुलं बंड करण्यासाठी म्हणून तंबाखू किंवा बिडीकडे वळतात. काही मुलांच्या मनात अशी कल्पना असते, की आपण मोठे झालो हे इतरांवर बिंबवायचं असेल तर आपण तंबाखू खायलाच हवी.

माझ्या अनुभवावरून सांगतो, पहिल्यांदा तंबाखू खाणं हा काही फारसा चांगला अनुभव नसतो. मी पहिल्यांदा तंबाखू खाल्ली तेव्हा मला एकदम उलटीच झाली होती. माझ्याबरोबर ज्या मित्राने खाल्ली त्याला चक्कर आली होती. कुणाचं तोंड भाजतं, तर कोणाचं तोंड कडू होऊन जातं.

पहिला अनुभव वाईट असूनसुद्धा माणसं परत तंबाखू का खातात ? शास्त्र असं सांगतं, की आपण तंबाखू खातो तेव्हा तंबाखू तोंडातील पेशींना स्पर्श करते आणि त्या पेशींमार्फत रक्तातून तंबाखूचा अर्क मेंदूपर्यंत पोहोचतो. त्याने एकप्रकारचा 'झटका' जाणवतो. कारण तंबाखूतील निकोटीन अॅड्रेनल ग्रंथींना उत्तेजना देतं. या ग्रंथी उत्तेजित झाल्या की एपिनेफरिन नावाचा द्रव पाझरतो. त्या द्रवाच्या पाझरण्यामुळे एकदम उत्तेजना मिळाल्यासारखं वाटतं. श्वासोच्छ्‌वासाची गती वाढते. नाडीचे ठोके जोराने पडू लागतात. रक्तप्रवाह अधिक दाबाने शरीरभर पसरतो. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावं तशी शरीराची अवस्था होते. तंबाखू खाणाऱ्यांना कमी-जास्त फरकाने हा अनुभव येत असतो. म्हणून बिडीचा एक झुरका वा तंबाखूचा बार खाताच एकप्रकारची तरतरी वाटते. कृत्रिमपणे निर्माण झालेला उत्साह जाणवतो. अप्रत्यक्षपणे तंबाखूचा परिणाम कोकेन किंवा गर्दसारखा होतो. अधिक प्रमाणात निकोटीन शरीरात गेलं तर झोपसुद्धा येऊ शकते.

hoy vyasanmukti shakya ahe

तंबाखू खाण्याचं किंवा तंबाखू ओढण्याचं प्रमाण हळूहळू वाढतं. माणूस अगदी सुरुवातीला गुटख्याची एकच पुडी दिवसभर थोडी-थोडी खातो. पण नंतर आख्खी पुडी एका वेळेला खातो. असं दिवसातून दहावेळा ! सुरुवातीला दिवसाला एक सिगरेट ओढणारा हळूहळू रोजच्या दहा-वीस सिगरेटपर्यंत पोहोचतो.

तंबाखूतल्या निकोटीनचं वैशिष्ट्य असं, की शरीरात शिरल्यावर त्याचं अगदी थोड्याच वेळात पचन होऊन जातं. त्यामुळे रात्रभर तंबाखू खाल्ली नाही आणि सकाळी उठल्यावर पहिला बार भरला तर त्याची 'किक' वेगळीच नि अधिक तीव्र असते. तंबाखूचं पचन झाल्यावर लगेचच 'हवाहवासा' अस्वस्थपणा वाटतो. त्यामुळे तंबाखू आणखीनच हवीहवीशी वाटू लागते. साधारणपणे बिडी किंवा सिगरेट ओढल्यानंतर थोड्यावेळाने शरीरातील तंबाखूचा परिणाम संपतो, तेव्हा माणूस बेचैन होतो आणि त्याला तो परिणाम पुन्हा हवासा वाटू लागतो. त्याला तंबाखूची 'तल्लफ' म्हणतात. 'तल्लफ' आली, की पुन्हा तंबाखू खाल्ली किंवा ओढली जाते.

तंबाखूला हळूहळू भिनणारं विष म्हणतात. कारण तंबाखूचे परिणाम लगेचच दिसून येत नाहीत. तंबाखू खाण्यामुळे संसार विस्कटत नाही. कुटुंबाची हानी होत नाही आणि पैशाचंही फार मोठं नुकसान होत नाही. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनाकडे गंभीरपणे बघितलं जात नाही. परंतु शरीरातील असा कोणताही अवयव नाही की ज्यावर तंबाखूचा परिणाम होत नाही. जगात दर ५ सेकंदाला एक माणूस तंबाखूच्या आजारापायी मृत्यू पावतो, असा एक अंदाज आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखूचं अनियंत्रित सेवन.

तंबाखूच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि कठीण होतात. त्यामुळे वेगवेगळे विकार होऊ शकतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तपुरवठा अतिरिक्त दाबाने होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर खूप ताण पडतो. आणि नंतर हृदयविकाराचा झटका येतो. जगात हृदयविकार हे मृत्यूचं तिसऱ्या क्रमांकाचं कारण आहे आणि हृदयविकाराच्या मुळाशी तंबाखू आहे.

रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे दोन प्रकारचे विकार संभवतात. रक्तवाहिन्या कठीण झाल्यामुळे त्या फुटू शकतात. अकस्मात रक्तस्रावामुळे माणूस मृत्यूमुखी पडू शकतो. काहीजणांच्या बाबतीत अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे मेंदूतील विचार करण्याच्या भागाला क्षते पडतात. अशी क्षते पडल्यामुळे काळाचं भान राहत नाही. काळ-वेळ यांचा गोंधळ होतो. त्या क्षतांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

हेही वाचा - व्यसनाच्या विळख्यातून बाहेर येताना

बिडी, सिगरेट, गुटखा या तिन्हीतही तंबाखू असतेच. बिडी किंवा सिगरेट ओढल्यामुळे कार्बनचे कण फुफ्फुसात अडकतात. श्वासनलिकेचा दाह होतो. कफ होतो. कफ वाढून फुफ्फुसात पाणी होण्याची शक्यता असते. दुसरीकडे, गुटखा सेवनामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो. या पित्तामुळे जळजळ होते. अल्सरचा त्रास होतो. तसेच पोटात तंबाखूचे कण चिकटून बसतात. ते कुजतात व पोटात व्रण निर्माण होतात.

संपूर्ण जगाचा विचार केला तर तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. याचं कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणारे सर्वाधिक लोक भारतात आहेत. जबड्याचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर फक्त तंबाखूने होतो. माणसाला हमखास मृत्यूकडे नेणारे हे आजार तंबाखूनिर्मित आहेत.

प्रयत्न व्यसनमुक्तीचे !

पहिला अनुभव - मग तो सिगरेटचा, तंबाखूचा वा इतर कुठल्याही व्यसनाचा असो; अजिबात चांगला नसतो. कोणाला खोकला येतो, कोणाला उलटी होते, कोणाला चक्कर येते. काहीजण या अनुभवातून शहाणे होतात आणि विचार करतात 'हे काही आपल्यासाठी नाही!' पण उरलेले विचार करतात, 'आपलीच काहीतरी चूक झाली असेल. पुढच्यावेळी चूक दुरुस्त करू आणि मजा घेऊ !' 'मजा घेऊ' हाच विचार प्रामुख्याने तंबाखू-सिगरेटच्या व्यसनाच्या मुळाशी असतो. मग त्याहून पुढे जाऊन आणखी एक चूक होते. 'आत्ताचा आनंद महत्त्वाचा. पुढचं पुढे बघू' असा विचार करण्याची ! त्यामुळेच व्यसनांबाबतची कितीही माहिती झाली, त्याचे विशिष्ट परिणाम दिसले तरी ताबडतोब मिळणाऱ्या आनंदासाठी, भविष्यकाळात होणाऱ्या नुकसानीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं.

बापूचं नेमकं असंच होतं. बापू शाळेत मास्तर, तेही सायन्सचा. त्याला माहिती होतं की सिगरेट किती वाईट असते! पण तरीही बापूला सिगरेटपासून मिळणाऱ्या आनंदाचं आकर्षण होतं. त्यामुळे भविष्यकाळात होणाऱ्या नुकसानीकडे तो दुर्लक्ष करायचा. कोणत्याही परिस्थितीत कितीही किंमत द्यावी लागली तरी 'मला मजा मिळालीच पाहिजे' असा विचार पुढे पुढे त्याच्या मनात पक्का होत गेला. दात खराब झाले तरी तंबाखू खाणाऱ्या आणि हृदयविकार होऊनसुद्धा चोरून सिगरेट ओढणाऱ्या लोकांप्रमाणे तोही व्यसनाच्या विळख्यात सापडला.

nashayatra

पण अगदी अशाही स्थितीत व्यसनमुक्ती शक्य आहे. अट एकच - सुटकेचा निर्णय लांबणीवर टाकून चालत नाही. तो ताबडतोब घ्यावा लागतो ! असा निर्णय जे घेतात, अंमलात आणतात त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीची दारं खरोखरच खुली होतात.

देशमुख मास्तरांना कधीपासून तंबाखूची सवय मोडायची आहे. आता सोडतो, मग सोडतो करता करता वर्षं सरली. १ जानेवारी आला की म्हणायचे, एक जानेवारीचा संकल्प- तंबाखू बंद ! गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, स्वतःचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असे संकल्प करायचे सगळे दिवस उलटून गेले. पण तंबाखू अजूनही त्यांच्या तोंडात आहे. सगळ्या व्यसनी माणसांचा अनुभव देशमुख मास्तरांसारखाच असतो. काहीतरी कारण काढून व्यसन बंद करायचा निर्णय लांबणीवर टाकला जातो.

मास्तरांना तंबाखू सोडायची आहे. परंतु ती सोडण्यात त्यांना विशेष इंटरेस्ट नाही. एव्हाना शाळेतूनसुद्धा तक्रारी आल्या आहेत. घरची कटकट आहेच! आता तो निर्णय घ्यायलाच हवा. अखेर मास्तर ठरवतात, काहीही झालं तरी आता तंबाखू सोडायची ! पण सकाळी शौचाला होत नाही. म्हणून थोडीशीच खायची आणि दिवसभर खायची नाही, असं त्यांच्या मनात येतं. एकदा खाल्ल्यावर विचार येतो, एकदा खाल्ली काय आणि अनेकदा खाल्ल्ली काय, सगळं सारखंच ! पण मग त्यांना वाटतं, आपली चूक झाली, आता लवकरात लवकर म्हणजे सोमवारपासून बंद करायची. तो सोमवार काही उजाडत नाही.

अशी दिरंगाई करताना मास्तरांच्या मनात भीती असते. मी तंबाखू बंद केली तर मला काय त्रास होईल ? रोजची कामं कशी करणार? हे सगळंच खूप भयंकर असेल ! मग मी त्या परिस्थितीला तोंड कसं देणार? खरंतर मनाशी असा खेळ केल्यानेच घोटाळे होत असतात. व्यसन बंद करायचा निर्णय आणि अंमलबजावणी यात जेवढी दिरंगाई जास्त, तेवढी व्यसन सुटण्याची शक्यता कमी असते !

अशोक नावाचा माझा एक मित्र आहे. त्याने पान-तंबाखू बंद करण्याचा निर्णय घेतला. खिशातली पुडी कचरापेटीत टाकली आणि त्या क्षणापासून तंबाखू बंद केली. व्यसन सोडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती वेळ ! आता, इथे, या क्षणी हे तीन शब्द सर्वात महत्त्वाचे. हे पक्कं लक्षात ठेवावं लागतं. तरच ती कृती प्रत्यक्षात येते.

आबा मला सांगत होते, की त्यांना तंबाखू सोडायची युक्ती कुणीतरी सांगितली आहे आणि त्याप्रमाणे ते तंबाखू कमी करणार आहेत. पंधरा दिवसांनंतर मी आबांना विचारलं, "काय? सुटली का?"

"न्हाय, हो. गाडी अजून डेपोतच आहे."

पण तरीही मला त्यांची युक्ती समजून घ्यायची होती. मी म्हटलं, "सांगा तर खरं!"

आबा म्हणाले, "मी दाखवतोच!"

हेही वाचा - रिल्स बघताय? सावधान ! पुढे धोका आहे.

त्यांनी खिशातून चंची काढली. मोठा विडा घेतला. चुना काढला. तब्येतीत मळला - "आपल्याला कमी कमी करत बंद करायची म्हटल्यावर यातला थोडासा विडा कचऱ्यात टाकायचा. हा असा ! या विड्याचे दोन भाग करायचे." असं म्हणून निम्मा विडा दाढेत ठेवला आणि उरलेला विडा छोट्या कागदात बांधून खिशात ठेवला !

मी म्हटलं, "बेस्ट आयडीया ! पण तरी तुमची तंबाखू कमी का झाली नाही?"

"त्याचं काय आहे, विडा छोटा झाल्याने तल्लफ लवकर यायची आणि तंबाखू फेकून दिल्यामुळे जास्तच जाणवायची."

थोडक्यात पहिले पाढे पंचावन्न. बदल नाही तो नाहीच. तंबाखू कमी करून व्यसन सुटत नाही. भगवानरावांचा हाच अनुभव आहे. त्यांना रोज दोन बंडल बिड्या लागतात. त्यांना वाटलं प्रमाण कमी करावं. म्हणून त्यांनी टपरीवरून बिडी बंडल आणणं बंद केलं. सुट्या बिड्या घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांत लक्षात आलं आपण सुट्या बिड्याच जास्त पितो ! म्हणून परत दोन बंडलं आणायला सुरुवात केली.

सुभाषने सिगरेट कमी करण्याकरता पाकीट जवळ बाळगणं बंद केलं आणि स्वतःजवळ एकच सिगरेट ठेवायचा निश्चय केला. तल्लफ आली की प्रत्येकवेळी तो टपरीवर जाई. तिथे उभा राहून एक सिगरेट ओढे आणि खिशात ठेवायला एक घेई. शेवटी लक्षात आलं, तो एकाच्या ऐवजी दीड-दोन पाकीटं ओढू लागला आहे.

चिमूट कमी करणं, सुट्या बिड्या घेणं, खिशात पाकीट न ठेवणं हे थोडाकाळ चालणारे उपाय आहेत. सिगरेट-तंबाखूबद्दल तिडीक आणि स्वतःच्या जीवाची काळजी या दोन गोष्टी एकत्र आल्या तरच हे व्यसन सुटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जातो. 'मी या व्यसनाचा गुलाम असून माझं स्वातंत्र्य मला परत मिळवायचं आहे', अशी दुर्दम्य इच्छा असेल तर अशक्य काहीच नाही.

व्यसनमुक्तीच्या दिशेने पहिलं पाऊल : निग्रह

व्यसन सुटल्याचा नि पुन्हा त्या दिशेने पावलं न वळण्याचा आनंद मिळवायचा तर व्यसन सोडायची मनापासून इच्छा असायला हवी. त्यासाठी आपण तारीख निश्चित करायला हवी आणि कोर्टाची जशी पुढची पुढची तारीख मागितली जाते तशी मागायची नाही, हेही ठरवायला हवं.

३१ मे हा राजूच्या लग्नाचा वाढदिवस. हाच दिवस जगात तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. आपल्या संसाराला नि तंबाखूच्या दुष्परिणामांना स्मरून राजूने या दिवसापासून सिगरेट ओढणं बंद केलं. एकदा दिवस ठरला म्हणजे ठरला!

द्विजेनला तर सिगरेट आणि तंबाखू दोन्ही गोष्टींचं व्यसन होतं. तंबाखू खाल्ली नाही असा त्याचा एकही दिवस जात नसे. आधी सिगरेट-बिडी ओढायची आणि त्याचा वास सगळीकडे जाऊ नये म्हणून गुटखा खायचा. सकाळी उठल्याबरोबर तर त्याला बिडी लागतच असे. एक दिवस अशाच मित्रांच्या गप्पा चालू होत्या. एक मित्र म्हणाला, "एकवेळ तू दारू बंद करशील, परंतु सिगरेट सोडणं तुला शक्य नाही..." त्यावर द्विजेनचं उत्तर होतं - करून दाखवतो ! आणि त्याचा निर्णय त्याने कृतीत आणला. आज दहा वर्षं झाली, तो दारू, तंबाखू, सिगरेट, गर्द अशा कोणत्याही नशिल्या पदार्थांपासून लांब आहे आणि समाजात मानाने जगत आहे.

हे सारं घडण्यामागे दोन गोष्टी आहेत. प्रत्यक्ष कृती आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार.

muktanganchi goshta

तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन थांबवण्यासाठी काहीजण सोपे उपाय वापरतात आणि फसतात. कुणी फक्त वेलची खातं, कुणी बडीशेप, कोणी सुपारी, तर कोणी च्युईंगगम. पण बहुतेकांचा अनुभव असा आहे, की त्याने फारसा उपयोग होत नाही. तल्लफ भागत नाही आणि माणसं परत तंबाखूकडे वळतात.

भीमाचंच उदाहरण सांगतो. भीमाला बिड्या प्यायची सवय. तो दिवसातून दोन-तीन बंडलं ओढायचा. त्यामुळे नाव फक्त भीम, पण छातीचं खोकं झालेलं. त्याला एक दिवस वाटलं की बिडी बंद करावी आणि त्याच्याऐवजी गुटखा खावा ! झालं त्याने बिडी बंद केली आणि गुटखा खायला सुरुवात केली. पण गुटख्याचा खर्च एवढा वाढला, की तो परत बिडीवर आला.

असं व्हायचं कारण म्हणजे पाया पक्का नाही. पाया पक्का करण्यासाठी 'एए'ने दिलेला HOW हा कार्यक्रम स्वीकारावा लागतो.

त्यातला 'H' आहे ऑनेस्टीतला. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. व्यसनापासून स्वतःला मुक्ती हवी असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकलंच पाहिजे. शेंडी तुटो वा पारंबी तुटो मी परत व्यसनाच्या वाट्याला जाणार नाही, असा निग्रह पाहिजे. माणूस या बाबतीत स्वतःशी प्रामाणिक राहिला तर त्याचा व्यसनमुक्तीचा पाया मजबूत होईल एवढं नक्की !

HOW मधलं दुसरं अक्षर म्हणजे 'O' - ओपन माईंडेडनेस. खुलेपणा, मोकळेपणा. आपलं व्यसन कोणत्या थराला जाऊन पोहोचलं आहे व व्यसन चालू ठेवल्याने आपलं काय नुकसान होईल, याची माहिती होणं आवश्यक असतं. ते कळलं तरच तंबाखूचं व्यसन सोडण्याची इच्छा निर्माण होते. नागेशला रोज पंचवीस-तीस गुटख्याच्या पुड्या लागायच्या. हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं, की आपली लैंगिक इच्छा कमी होऊ लागली आहे. डॉक्टरांनी सांगितलं, 'तुला कोणत्याही औषधांची आवश्यकता नाही. तू फक्त गुटखा बंद कर.' नागेशने डॉक्टरांचा सल्ला खुल्या मनाने स्वीकारला. आणि त्याचा गुटखा बंद झाला.

शेवटचा W - विलिंगनेसचा अर्थात इच्छाशक्तीचा आहे. माणसाला व्यसन सोडायची प्रामाणिक इच्छा असेल, तर व्यसनमुक्ती अजिबात अशक्य नाही.

HOW या कार्यक्रमाआधारे जसं व्यसनांशी लढता येतं, तसंच इतर मार्गांनीही त्यापासून दूर राहता येतं. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना 'मला शक्य आहे, शक्य आहे मला, मलाच ते शक्य आहे' अशा स्वतःला सूचना देणं हा असाच एक उपाय. ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे त्यांनी झोपेतून उठल्यावर दोन्ही हातांना सूचना द्याव्यात - 'हे हात तंबाखू मळण्यासाठी नाहीत. हे हात सिगरेट-विडी ओढण्यासाठी नाहीत. हे हात व्यसनमुक्तीसाठी आहेत आणि व्यसनमुक्त होणं मला शक्य आहे.' रात्री झोपण्यापूर्वी शवासनात काही काळ पडून राहावं. दृष्टी कपाळाच्या मध्यभागी स्थिर करावी आणि स्वतःला सकाळसारखीच सूचना द्यावी.

हेही वाचा - मुक्तांगणची गोष्ट

केवळ तंबाखूचा वापर कमी करून तंबाखू बंद करता येत नाही. तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणं हाच त्यावरील खात्रीशीर उपाय आहे. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यानंतर मात्र तंबाखूची सवय पूर्णपणे बंद होते, असा आजवरचा अनुभव आहे. सुरुवातीला तंबाखू बंद केल्याचा अनेकांना त्रास होतो. लक्ष लागत नाही. चिंता वाटत राहते. चिडचिड होते. अशा पेशंट्सना निको-फ्री नावाचं आयुर्वेदिक औषध दिलं जात असे. या औषधाने मन शांत होई आणि तंबाखूची इच्छा कमी होत असे. अलीकडे तंबाखू बंद करण्यासाठी च्युईंगगम वापरतात. त्यात अत्यंत अल्प प्रमाणात निकोटीन असतं. या च्युईंगगममुळे शरीरातील निकोटीनची पातळी एकदम खाली येत नाही. त्यामुळे त्रास होत नाही. परदेशात आणि महानगरात निकोटीनचे पॅचेसही मिळतात. त्याचाही अल्प प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

तंबाखू बंद करण्यासाठी एक छोटी योजना

१) तारीख पक्की करा : तंबाखू बंद करण्याचा निर्णय उगाचच लांबवू नका. तंबाखू बंद करण्याचा सर्वांत चांगला दिवस आजचा असतो हे लक्षात ठेवा.

२) तंबाखू बंद केल्याने दोन-चार दिवस त्रास होणार, हे पक्कं लक्षात ठेवा. कदाचित चिडचिड होईल, कदाचित उदास वाटेल, कदाचित लक्ष लागत नाही असा अनुभव येईल. परंतु दीर्घकालीन सुखासाठी थोडा त्रास सहन करण्याची तयारी ठेवा.

३) मी तंबाखू का सोडणार आहे, याची यादी करा आणि ती यादी वारंवार वाचा. प्रदीपने केलेली यादी अशी - मी तंबाखू सोडणार आहे. कारण मला हृदयविकाराचा झटका येऊ नये. कारण माझे दात चांगले राहावेत, आणखी खराब होऊ नयेत.

४) तंबाखूची जास्तीतजास्त माहिती गोळा करा आणि आपण कोणत्यावेळी तंबाखू खातो त्याची यादी करा. प्रदीपच्या लक्षात आलं, की टेन्शन आलं की आपल्याला सिगरेटची आठवण होते. त्याच्यावर त्याने दीर्घ श्वसनाचा उपाय शोधून काढला.

५) मित्रपरिवाराला सहभागी करून घ्या. त्यांना निर्णय सांगा व तल्लफ आल्यास त्यांची मदत घ्या.

मुळात स्वतःला सांगा- होय! व्यसनमुक्ती शक्य आहे.

(महेंद्र कानिटकर यांच्या समकालीन प्रकाशित ‘होय व्यसनमुक्ती शक्य आहे!' या पुस्तकातून साभार)

महेंद्र कानिटकर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results