आम्ही कोण?
ले 

व्यसनमुक्तीची अशीही गोष्ट...

  • योगेश जगताप
  • 24.09.25
  • वाचनवेळ 4 मि.
sachin lovalekar

सचिन लोवलेकर हे कला क्षेत्रातील जाणकार मंडळींमध्ये एक परिचित नाव. वेशभूषा हा त्यांचा आवडीचा आणि कौशल्याचा प्रांत. सचिन यांचं कुटुंब सुरुवातीपासून मुंबईत स्थायिक. आई एलआयसीमध्ये कामाला, तर वडील एका कॉर्पोरेट कंपनीत अकाउंटंट. सचिनने डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण खुद्द सचिन यांच्या मनात मात्र हा विचार कधीच नव्हता. दहावीनंतर कॉमर्सचं शिक्षण घेतलेल्या त्यांनी त्याच फिल्डमध्ये काही दिवस जॉब केला. त्यात मन न रमल्यामुळे मग ते कला क्षेत्राकडे वळले.

दिग्दर्शक निशिकांत कामत हे त्यांचे कॉलेजपासूनचे मित्र. त्यांनी सचिन यांना फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्याचा सल्ला दिला. कामत यांनी तेव्हा नुकतीच सिनेक्षेत्रातील दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या क्षेत्रात वेशभूषेला असलेलं महत्त्व त्यांनी सचिन यांना समजावून सांगितलं. निशिकांतच्या सल्ल्यानुसार सचिन यांनी दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी तेव्हाच्या प्रसिद्ध वेशभूषाकार पौर्णिमा ओक यांच्याकडे दोन वर्ष इंटर्न म्हणून काम केलं.

नाटक किंवा सिनेमामध्ये प्रसंगानुसार कुणी कोणते कपडे घालायचे याचं नियोजन कॉसच्युम डिझायनर करतात. सचिन सांगतात, "फॅशन डिझाईनर आणि कॉसच्युम डिझायनर यामध्ये फरक आहे. फॅशन डिझाईनर हे कायम तुम्ही सुंदर दिसण्यासाठी कोणते कपडे घातले पाहिजेत हे सांगतात, तर कॉसच्युम डिझायनर हे पात्राला त्या त्या परिस्थितीत कुठले कपडे चांगले वाटतील याबद्दल मार्गदर्शन करतात."

निशिकांत कामत दिग्दर्शित 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटात सचिन यांनी पहिल्यांदा वेशभूषाकार म्हणून काम केलं. त्याआधी 'मुंबई मेरी जान' या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी सहायक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर चुंबक, सायकल, नील बटे सन्नाटा, शिकारा, आनंदी गोपाळ, सावरकर, सॅम बहादूर, पान सिंग तोमर, तुंबाड, हाफ तिकीट, कोर्ट, कच्चा लिंबू, मी वसंतराव, कौन प्रवीण तांबे? या आणि अशा ७५ हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांच्या वेशभूषेचं काम त्यांनी केलंय. 'सायकल' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर 'सॅम बहादूर' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय असे दोन्ही पुरस्कार मिळाले.

sachin lovalekar

आज मराठी आणि हिंदी सिनेजगतातील अनेक वलयांकित लोकांसोबत ते सहजपणे वावरत असले, तरी साधारणपणे २०११ साली त्यांना दारूच्या व्यसनाने घेरलं होतं. 'पान सिंग तोमर' हा चित्रपट बनून तयार होता, मात्र त्याचं प्रदर्शन लांबलं होतं. ते सांगतात की, त्या काळात त्यांचं व्यसनाचं प्रमाण वाढलं. इतकं की, त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दारू लागायची. कुणी काही म्हटलं तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि दारूचा नाद कायम ठेवायचा, असंच त्यांचं वागणं झालं होतं. पुढे एक-दोन सिनेमांची कामं आली तेव्हा तर हद्दच झाली. सिनेमाच्या सेटवर ते दारू पिऊन गेले.

सिनेमाचा दिग्दर्शक हा त्यांचा मित्रच होता. "तू माझ्या सिनेमासाठी काम करावं अशी माझी इच्छा आहे, पण दारू पिऊन नाही," असं त्याने स्पष्ट सांगितलं. यावर सचिन यांनी, "तुला काम द्यायचं असेल तर दे, नाहीतर मी जातो. मला गरज नाही," अशा शब्दांत मित्राला उत्तर दिलं. अर्थातच फक्त दारूच्या व्यसनामुळे ती कामं हातातून गेली.

हेही वाचा - व्यसनाच्या विळख्यातून बाहेर येताना

सचिन सांगतात की, या काळात त्यांचे हात थरथरायचे, डोळे लालबुंद असायचे, डोळ्यांत कायम झोप असायची. त्यांना वेगवेगळे भासही होऊ लागले होते. कुठल्याही गोष्टीची भीती वाटणं, अंगाला दरदरून घाम फुटणं या सगळ्या अडचणींतून सचिन एक-एक दिवस काढत होते. अशातच त्यांना पुण्यातील 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राची माहिती मिळाली. इथे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली. समुपदेशन, योग्य आहार, व्यायाम आणि औषध यांच्या मदतीने सचिन काही दिवसांत बरे झाले. मात्र, तिथून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांतच त्यांची दारू पुन्हा सुरू झाली. तो त्रास असह्य झाल्यानंतर ते पुन्हा 'मुक्तांगण'मध्ये भरती झाले.

यावेळी मात्र सचिन यांनी स्वतःवर काम केलं. सोबत राहणाऱ्या इतर पेशंटचे अनुभव ऐकले. या अनुभवांतून त्यांना जाणीव झाली की, दारूमुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायला लागणार आहेत, तर दारूच्या आहारी जाऊन उपयोग नाही.

त्यानंतर गेली १४ वर्षं सचिन यांनी दारूला स्पर्श केलेला नाही. या प्रवासात त्यांना मुक्तांगणमधील डॉक्टर्स, समुपदेशक, पेशंट, कर्मचारी, त्यांची पत्नी मैत्रेयी आणि कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. आज सचिन प्रसिद्धीच्या झोतात असले तरी भूतकाळात केलेल्या व्यसनाच्या चुकांविषयी आवर्जून बोलतात आणि इतरांनाही जागरूक करतात. आयुष्यातील छोट्या-मोठ्या अडचणींनी खचून व्यसनाच्या आहारी न जाता स्वतःवर काम करायला हवं, हाच संदेश सचिन देत असतात.

सचिन मुक्तांगणमध्ये आला, तेव्हा त्याच्या मनात सारं काही गमावल्याची भावना होती. त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गेला होता. एकदा उपचार घेतल्यानंतर त्याला वाटलं आपण बरे झालो, पण हा त्याचा भ्रम होता. व्यसनी माणसाला कुठल्याही आकर्षणापासून दूर राहण्यासाठी स्वतःवर जास्त वेळ काम करावं लागतं. नंतरच्या टप्प्यात सचिनने हे काम केलं. स्वतःच्या अडचणींवर कसा मार्ग काढायचा याचं मार्गदर्शन सचिनला मुक्तांगणमध्ये मिळालं. विध्वंसाच्या वाटेवर गेलेली त्याची गाडी विकासाच्या वाटेला लागली.
- डॉ. आनंद नाडकर्णी, मनोविकार तज्ज्ञ

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

मंगेश जगताप25.09.25
व्यसन पासून मुक्ती मिळवणे यासाठी हा लेख महत्त्वाचा प्रेरणा देणारा लेख

अरुणा भोसले24.09.25
आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सद्सद विवेक बुद्धी ने मात करता येते.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results