आम्ही कोण?
ले 

इलॉन मस्क हे नेमकं काय प्रकरण आहे?

  • कौमुदी वाळिंबे
  • 11.01.25
  • वाचनवेळ 16 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
elon musk lekh kaumudi walimbe

इलॉन मस्क हा माणूस बिझनेसच्या भविष्यवेधी अचाट कल्पना शोधून काढतो, त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा उभा करण्याच्या सर्व खटपटी करतो. कसं करतो तो हे, आणि मुळात का करतो? इलॉन मस्क हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, याची उकल करणारा लेख.

एप्रिलमध्ये अमेरिकेतल्या टेक्सासमधून स्पेसएक्स कंपनीच्या ‘स्टारशिप' या महाकाय यानाने उड्डाण केलं. जिथून उड्डाण झालं तो तळ खासगी, यानही खासगी. १२० मीटर उंच आणि नऊ मीटर रुंदीच्या या यानाला ३३ विशालशक्ती इंजिनं होती आणि यानाच्या संपूर्ण उड्डाणासाठी त्यावर ४५ लाख किलोपेक्षा जास्त इंधन भरलेलं होतं. सगळं सुरळीत पार पडलं असतं तर यानाने अंतराळात प्रवेश करून एक पृथ्वीप्रदक्षिणा केली असती आणि समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी यानाचं बूस्टर आणि ९० मिनिटांनंतर प्रत्यक्ष यान येऊन कोसळलं असतं; पण तसं झालं नाही. उड्डाणानंतर चार मिनिटांत, जमिनीपासून ३८ किलोमीटरवर असताना, बूस्टरपासून यान वेगळं होऊन पुढच्या प्रवासाला लागण्याऐवजी मोठा स्फोट झाला. सारे अवशेष समुद्रात विखुरले. निर्मितीच्या त्या टप्प्यापर्यंत खर्च झालेले जवळपास २५ हजार कोटी रुपये पाण्यात गेले- असं साधारणपणे बघणाऱ्या कुणालाही वाटलं असतं. पण प्रचंड उत्सुकतेने हा थरारपट बघणाऱ्या कंपनीच्या तंत्रज्ञांनी एकच जल्लोष केला. या ‘मोठ्या यशाबद्दल' नासाच्या संचालकांनी या कंपनीचं जाहीर कौतुक केलं.

हे शेवटचं वाक्य वाचून चक्रावला असाल तर ते स्वाभाविक आहे. कारण ही स्टारशिप कहाणी म्हणजे चक्रावून टाकणाऱ्या एका लंब्या कथानकाचा एक छोटा अंश आहे. त्या कथानकाचा पडद्यापुढचा नायक आहे इलॉन मस्क.

बॉलिवुड स्टाईलमध्ये सांगायचं, तर ‘दुनिया में दो तरह के लोग होते हैं - एक जो मस्क को चाहते हैं, और दूसरे जो बिल्कुल नहीं चाहते।' मस्कच्या कर्तृत्वाने अमेरिकी यंत्रणा यातल्या पहिल्या गटात मोडतात. आकाशात भेलकांडत पेट घेणारं स्टारशिपचं उड्डाण म्हणजे यश होतं, या दाव्याची यथेच्छ चेष्टा करणारे इथले सगळे टीव्ही प्रोग्राम्सही खरं तर त्याच्याविरुद्ध नाहीत.

आजघडीला पृथ्वीच्या पाठीवर, जमिनीच्या पोटात, आकाश भेदून अंतराळात, डोळ्यांनी न दिसणाऱ्या आंतरजालात, बुद्धीचा स्रोत असणाऱ्या मेंदूत आणि बुद्धीची क्षितिजंही ओलांडून जाणाऱ्या अद्भुत पण वास्तव अशा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात इलॉन मस्कच्या कंपन्यांची गुंतवणूक आहे. मनाने तर तो यापलीकडेही किती तरी ठिकाणी वावरत असतो, तोसुद्धा एकेका क्षणाने पुढे सरकणाऱ्या काळाचा संथपणा ही सक्ती वाटावी एवढ्या वेगात. अशा बेबंद मनाच्या ताकदीवर त्याने आपल्या कंपन्या उभ्या केल्या, जगातल्या पहिल्या दहांतल्या यशस्वी श्रीमंतांमध्ये स्थान मिळवलं. मात्र, त्या स्थानावर टिकून राहण्याच्या खटपटी करत न बसता, वेळोवेळी पटेल त्या कामात तो असेल नसेल ते झोकून देत राहतो. स्वतः उचललेल्या जोखमीची व्याप्ती विस्तारत राहतो.

आता या स्पेसएक्स कंपनीचंच उदाहरण घ्या. इलॉन मस्कची ही खासगी कंपनी. मस्कचा रॉकेट सायन्स या प्रांताशी काही संबंध नव्हता. डॉटकॉम बूमच्या काळात दोन यशस्वी कंपन्यांच्या निर्मितीतून हातात काही पैसा जरूर आला होता, म्हणजे हजारेक कोटी रुपये. तोवर अंतराळ संशोधन किंवा अंतराळस्वाऱ्यांच्या क्षेत्रातलं काम हा फक्त सरकारी यंत्रणांच्या, थोडक्यात, नासाच्या अखत्यारीतला भाग होता. त्यांच्या बजेटच्या तुलनेत मस्ककडचे तेव्हाचे पैसे म्हणजे चणेफुटाणे. पण ‘पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीला इतर ग्रहांवर (सुरुवात मंगळापासून) घर शोधावंच लागेल' या ठाम धारणेपोटी त्याने अभ्यास सुरू केला. ते काम सुकर व्हावं म्हणून सिलिकॉन व्हॅलीतला बाडबिस्तरा गुंडाळून लॉस एंजल्समधे मुक्काम ठोकला. लाखो डॉलर्स खर्चून ‘लाइफ टु मार्स फाउंडेशन' सुरू केलं. या त्याच्या अनौपचारिक चर्चामंडळात अंतराळ क्षेत्रातली बरीच तज्ज्ञमंडळी येत असत. त्यांच्याशी केलेल्या चर्चांमधून आणि स्वतःच्या वाचनातून त्याच्या लक्षात आलं, की नासानेसुद्धा या दिशेने काही फारशी प्रगती केलेली नाही. कदाचित पहिल्यांदाच मस्कच्या पदरी अमेरिकेबद्दल निराशा आली. मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेल्या कामात अमेरिका किमान ५० वर्षं मागे पडलीय असं त्याच्या मनाने घेतलं, आणि आता स्वतःच प्रयत्न करायचे, या निर्धारातून २००२ सालच्या मध्यावर त्याने ‘स्पेसएक्स' ही कंपनी स्थापन केली- पूर्णपणे स्वतःच्या पैशावर.

आतापर्यंतच्या कहाणीत वेडसरपणाचा अंमल वाटतो की नाही? तशी शंका त्या काळात इलॉनच्या अगदी जवळच्या मित्रांनाही सतावत होती. कालांतराने या प्रकरणापुरती ती शंका शमली असली तरी एखाद्या वेळी एखादी गोष्ट का केली हे कधी कधी खुद्द तो स्वतः निश्चितपणे सांगू शकत नाही. एक गोष्ट मात्र निश्चित, की जे काही करायचं ते अमेरिकेतच, हा निर्धार त्याने अगदी लहानपणीच केला होता आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कोवळ्या वयात जन्मभूमीपासून दूर उड्डाण केलं होतं.

मस्कचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील) म्हणजे मोठी कलंदर माणसं. पैसा हा साठवून ठेवण्यासाठी नसतो, कोणत्या तरी कामी जुंपण्यासाठी असतो, यावर त्यांचा पक्का विश्वास होता. कॅनडातलं सुस्थिर आयुष्य झटकून आपल्या मुलाबाळांसह त्यांनी १९५०च्या दशकात दक्षिण आफ्रिका गाठली. का? तर जग पाहायची आवड. एक लहानसं विमान होतं त्यांच्याकडे, त्यात आपला सगळा कबिला कोंबून त्यांनी बऱ्याच अशक्यप्राय सफरी केल्या. त्यांच्या मुलीच्या पोटी जन्मलेलं पहिलं मूल म्हणजे इलॉन. इलॉनचे आई आणि वडील दोघंही कर्तृत्ववान. कायदेशीर वंशभेदाने पोखरलेल्या देशातलं आर्थिकदृष्ट्या सुस्थिर असं ते कुटुंब; मात्र, इलॉनच्या वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला. इलॉन एकपाठी होता. तो दिवसाला दोन-दोन पुस्तकं वाचून संपवायचा. मात्र, समाजात वावरायला तो अत्यंत बुजरा होता म्हणे. शाळेत वात्रट पोरांनी त्याला बारक्यासारक्या कारणांवरून बरंच छळलं. फारसे मित्र नसलेल्या या मुलाने वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी हट्टाने वडिलांकडून कॉम्प्युटर मागून घेतला आणि झपाट्याने कोडिंग शिकणं सुरू केलं.. स्वतःचं स्वतःच, पुस्तकं वाचून. बाराव्या वर्षी त्याने तयार केलेल्या कॉम्प्युटर गेमला एका स्थानिक मासिकाच्या स्पर्धेत बक्षीस मिळालं आणि 500 डॉलर्समध्ये त्याने तो गेम विकून टाकला. ही साधारण १९८३ची गोष्ट.

त्यानंतर सहाच वर्षांत कॅनडाचा व्हिसा मिळवून इलॉनने दक्षिण आफ्रिका देश सोडला ते कधीही परत न येण्यासाठी. आपल्याला अमेरिकेत जायचंय आणि त्यासाठी कॅनडा ही महत्वाची पायरी आहे याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. जरूर पडली तेव्हा त्याने तिथे अंगमेहनतीची, मजुरीची कामंसुद्धा केली. कॅनडात कॉलेजची दोन वर्षं पूर्ण होताच संधी मिळवून तो अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये शिक्षणासाठी आला. स्कॉलरशिप आणि हिकमत्या स्वभावाने केलेल्या अचाट उद्योगांमधून मिळणाऱ्या पैशांवर तो स्वतःचं शिक्षण करत होता. स्वतःला आवश्यक तेवढा पैसा तो लीलया निर्माण करू शकत होता. त्याचा खरा रोख होता तो वेगवेगळ्या क्षेत्रांतले अनुभव गाठीशी बांधण्यावर आणि त्या त्या क्षेत्रातल्या इंटरेस्टिंग माणसांशी ओळखी वाढवण्यावर. कॉलेजचं शिक्षण पूर्ण होण्याआधी सिलिकॉन व्हॅलीतल्या काही नामवंत कंपन्यांमधे इलॉनने इंटर्नशिप्स केल्या. त्यातलं वेगळेपण असं, की एका वेळी दोन-दोन ठिकाणी काम पत्करणारा इलॉन त्याही काळात स्वतःच्या बुद्धीने कामाची दिशा ठरवून घेत होता आणि दिवसाचे २२-२३ तास कष्ट उपसताना कामाच्या दर्जात कमी पडत नव्हता. ‘इन्फर्मेशन एज'मध्ये प्रवेशाच्या उंबरठ्यावर उभं असलेलं व्हॅलीतलं वातावरण त्याला फारच मानवणारं होतं. म्हणजे असं काय होतं त्या वातावरणात?

हे नेमकं सांगण्यासाठी अमेरिकेची प्रकृती कसकशी घडत गेलीय ते बघणं उपयोगाचं आहे. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका' या देशाच्या स्थापनेआधीपासून, अगदी युरोपीय स्थलांतरित इथे येऊ लागले तेव्हापासून त्या स्थलांतरितांच्या मनात एक भावना दृढ होत गेली होती. ‘ज्याअर्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण पुढे जातो, त्याअर्थी आपण खास लोक आहोत' ही ती भावना. पुढे एकोणिसाव्या शतकात देशाचा विस्तार करण्यावरून अंतर्गत मतभेद होऊ लागले तेव्हा अनेकांनी थेट तसं बोलून दाखवायला सुरुवात केली आणि जमेल त्या मार्गाने देश वाढवणं, नवीन भागात आपल्या चालीरीती रूढ करणं ही आपली ‘दैवी जबाबदारी' आहे असं जाहीर करून टाकलं. या ‘अमेरिकन एक्सेप्शनलिझम'ला बाकीच्या अमेरिकनांनी वेळावेळी विरोध केला तरी ‘जग बदलण्याची जबाबदारी आपलीच आहे' असं मानणाऱ्यांची संख्या इथे काही कमी नाही. पुढे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या सहभागामुळे दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि सोव्हिएत रशियाच्या कम्युनिझमला टक्कर देण्यासाठी कॅपिटलिस्ट अमेरिकेने त्याच मानसिकतेतून कंबर कसली. त्या शीतयुद्धाचा आणि कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीच्या भाग्योदयाचा किती तरी जवळचा संबंध आहे. शीतयुद्धाला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने संशोधन क्षेत्रात हवा तितका पैसा ओतला हे सर्वज्ञात आहे. नवं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यावर काम करणाऱ्या लोकांना संपूर्ण मोकळेपणाने काम करू दिलं जात असे. महत्त्व फक्त रिझल्ट्सना. त्यातून होता होता शस्त्रास्त्रांच्या निर्मितीबरोबरच इंटरनेट नावाच्या अदृश्य शक्तीचा जन्म झाला हेही आपल्याला माहिती आहे. सुरुवातीची बरीच दशकं फक्त संरक्षणविषयक काम करणारे सरकारी विभाग, उद्योग आणि मूलभूत तसंच उपयोजित संशोधन करणाऱ्या विद्यापीठांमध्ये इंटरनेट उपलब्ध होतं. या काळात दक्षिण आफ्रिकेत वाढणाऱ्या इलॉन मस्कने इंटरनेट पाहिलेलं असणं केवळ अशक्य आहे; पण कॉम्प्युटर, कोडिंग याचा चसका लागलेल्या आणि चौफेर वाचनामुळे अफाट माहिती असलेल्या या मुलाला त्याविषयी माहितीही नसणं शक्य नाही.

टिम बर्नर्स-ली याने जालातल्या माहितीच्या सुविहीत रचनेसाठी वर्ल्ड-वाइड-वेब पद्धत शोधून काढली, त्याच वर्षी इलॉन मस्क नशीब काढायला म्हणून कॅनडात दाखल झाला होता. पुढच्या काही वर्षांत इंटर्न म्हणून त्याने सिलिकॉन व्हॅली गाठली. कोणताही विषय डोक्यात घेतला की देहभान हरपून प्रचंड वेगाने त्यावर मास्टरी मिळवणं आणि तेही व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून, हे मस्कचं वैशिष्ट्य आहे. १९९५ साली व्यावसायिक कारणांसाठी इंटरनेटचा वापर करायला अमेरिकी सरकार परवानगी देऊ लागलं. 'नवे प्रदेश, नवी क्षितिजं' शोधणाऱ्या मस्कसारख्यांच्या व्यावसायिक वृत्तीला एक नवं विश्व खुलं झालं. जग बदलण्याची जबाबदारी जणू आता त्यांच्यावर आली होती.

जे वातावरण मस्कला मानवणारं होतं, असा वर उल्लेख आलाय ते हे वातावरण. तो मूळचा कुठला आहे, त्याच्या भाषेचा लहेजा कसा आहे, त्याचं कागदोपत्री शिक्षण काय-किती आहे याची इथे कोणी फिकीर करत नव्हतं. ज्या इंटरनेटच्या क्षेत्रात तो विहरू लागला होता, तिथे ‘कसेल त्याची जमीन' होती. ते अख्खं क्षेत्रच नवीन असल्याने त्याभोवती फार नियम-कायदे निर्माण झाले नव्हते. व्यवसायस्पर्धा जोर धरू लागली असली तरी तोपर्यंत वळणात असलेला विद्यापीठीय वातावरणाचा मोकळेपणा भरपूर शिल्लक होता. चांगली बिझनेस कल्पना हातून सुटू नये म्हणून व्हेंचर कॅपिटलिस्ट पैसा कमी पडू देत नव्हते. अर्थात या सगळ्याचा अर्थ इलॉन मस्कला बसल्या जागेवर कोणी पैसा आणून दिला, असा अजिबात नाही.

सगळी दुनिया ऑनलाइन होण्यासाठी धाव घेऊ लागण्यापूर्वीचा तो काळ. भल्याभल्यांना अजून ‘नक्की कोणतं विश्व उघडलंय' याचा उलगडा झालेला नसताना मस्कने त्यातल्या नेमक्या व्यवसायसंधी हेरल्या. ते रॉकेट सायन्स नव्हतं, पण त्याला जे कळलं होतं ते थोडं का होईना, इतर तंत्रज्ञ व्यावसायिकांच्या आधी कळलं होतं. बाकी, या वर्षांतली त्याची कहाणी ही सिलिकॉन व्हॅलीतल्या आपण ऐकलेल्या इतर काही यशस्वी कहाण्यांच्या वळणाने जाणारी आहे. फार पैसा गाठीशी नसताना आपली कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वस्व झोकून काम करणं, नुसतंच वाहणाऱ्या वाऱ्यांवर अवलंबून न राहता पत्करलेल्या जोखमीखातर प्रसंगी वैयक्तिक हालअपेष्टा सहन करूनही कंपनीचा कोड आणि सेवा सुधारत नेणं, भावी धंद्याचं पोटेन्शियल लक्षात घेऊन जास्तीत जास्त किमतीला आपली कंपनी विकत घेऊ शकणाऱ्या ग्राहकाच्या (भावी मालक) शोधात राहणं, वगैरे वगैरे. डॉटकॉम बूमचा फुगा फुटला त्यात इलॉन मस्कच्या कंपन्या सापडल्या नाहीत. ‘झिप २' व ‘एक्स.कॉम' या त्याने सुरू केलेल्या कंपन्यांनी त्याला लक्षावधी केलं तेव्हा त्याने जेमतेम तिशी पार केली होती.

धंद्याचं आणि बेफिकिरीचं बाळकडू घेऊन जन्मलेल्या मस्कला वेब १.०च्या काळातल्या व्यावसायिक यशाचं समीकरण सुटलं. मुळात फार कुणाला लक्षातही न आलेल्या गोष्टीची भावी गरज कळणं, त्यावरच्या सोल्युशनसाठी तंत्रज्ञान कमीत कमी किमतीत कसं राबवता येईल याचा पक्का आडाखा बांधता येणं, हे त्या काळातल्या जवळपास सगळ्या यशस्वी तंत्रज्ञ व्यावसायिकांना उमगलं होतं. इलॉनचं वैशिष्ट्य असं, की तंत्रज्ञानच उपलब्ध नसेल तिथेही ते आपण निर्माण करू शकू यावर त्याचा जबरदस्त विश्वास होता. एकदा तसं वाटलं की वाट्टेल ते (बुद्धीचे प्रयोग) करून ते प्रत्यक्षात आणण्यामध्ये त्याचा हातखंडा होऊ लागला. आपल्या कल्पनांवर काम करण्यासाठी बुद्धिमान आणि झोकून देऊन काम करणारी माणसं सातत्याने मिळवत राहणं हे इलॉनचं यश, आणि अशी माणसं देशात उपलब्ध होत राहणं हे एकूण अमेरिकन सामाजिक वातावरणाचं, इथल्या विद्यापीठांचं यश. त्या वातावरणाचा भाग बनलेल्या इलॉनला ‘देश चुकलाय, आता मलाच पुढाकार घेऊन काही केलं पाहिजे' असं वाटलं. आणि त्या वळणावर सिलिकॉन व्हॅलीतले इतर यशस्वी आणि इलॉन मस्क यांच्या ट्रॅजेक्टरीज बदलल्या.

मिळालेल्या पैशांतून आयुष्याची बेगमी करत करत जमेल ते नवं शोधत राहण्याचा सुरक्षित मार्ग इलॉनने सोडला. नुसतं तसंच नाही, तर वेब २.० टप्प्यात कंपन्यांनी जे निर्माण केलं तो हमरस्ताही त्याने गमावला. मानवजातीला अनेक ग्रहांवर नेऊन स्थापित करण्याची वाट धुंडाळायला त्याने सुरुवात केली, त्यात अनेकांना निव्वळ वेडाची छटा जाणवली असेल यात नवल नाही. गुगलचा सहसंस्थापक लॅरी पेज आणि मस्कची चांगली मैत्री होती. पेजचं असं निरीक्षण होतं, की ‘इतर इंजिनियर्सना जे उमगतं त्यापलीकडे व्यवसायाचं गणित, संघटना उभारणी, नेतृत्व, आणि सर्वांत मुख्य म्हणजे सरकारी यंत्रणा-कायदेकानूंची इलॉन मस्कला चांगली जाणीव आहे.'

स्पेसएक्सच्या प्रवासात मस्कच्या या कौशल्याचं प्रत्यंतर मिळतं. स्थापनेनंतर मूळ आराखड्यापासून सुरुवात करून तीनेक वर्षांत कंपनीने एका रॉकेटची स्वतः निर्मिती केली. हा सगळा काळ इलॉन मस्कची तिजोरी रिकामी होत होती; पण एकही यशस्वी उड्डाण करून दाखवण्याआधीच स्पेसएक्सला २००६ सालापासून नासाकडून आर्थिक हातभार मिळू लागला. कसं शक्य झालं हे? तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर तंत्रज्ञांची आणि मालाची यशस्वी वाहतूक करू शकणाऱ्या या क्षेत्रातल्या इच्छुक खासगी कंपन्यांना नासाने अनुदान सुरू केलं. यादरम्यान नासाप्रमुख असलेले मायकेल ग्रिफिन पूर्वी मस्कच्या अनौपचारिक चर्चामंडळात येत असत, शिवाय अगदी सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी स्पेसएक्सचा सल्लागार म्हणूनही काम केलं होतं. इलॉनचं ज्ञान, त्याहून मोठा आत्मविश्वास, हाती घेतलेल्या प्रकल्पावर जीव ओवाळून टाकण्याची वृत्ती आणि आपले सहकारी तसंच कर्मचाऱ्यांकडून अशक्य कोटीतली कामं करून घेण्याची त्याची क्षमता याची ग्रिफिन यांना चांगली माहिती होती. त्याने स्वतःसाठी ठेवलेल्या आणि जाहीर केलेल्या डेडलाइन्स हास्यास्पदरीत्या महत्वाकांक्षी असतात हेही ते जाणून होते. आणि तरीही, इलॉन मस्कच्या महत्वाकांक्षेत दडलेलं अमेरिकेचं हित पाहून त्यांना ही बोली लावावीशी वाटली. बऱ्याच लोकांना तर असं वाटतं, की स्पेसएक्सला मदतीचा हात देण्यासाठीच ती अनुदान योजना आखण्यात आली. वैयक्तिक महत्वाकांक्षेला संपूर्ण देशाच्या क्षमतेचे पंख लावून घेण्याची कला मस्कने साधली होती.

स्पेसएक्सने या क्षेत्रात मुसंडी मारण्याआधी नासाचा अंतराळ कार्यक्रम मंदावला होता हे खरंच आहे. पैशाची कमतरता नसली तरी वेगवेगळ्या दुर्घटनांत अंतराळवीर मृत्युमुखी पडल्यामुळे जोखीम पत्करण्याची त्यांची इच्छाशक्ती कमी झाली होती. अंतराळ उड्डाणांमध्ये नासाला साहाय्य करणाऱ्यांमध्ये त्या वेळी फक्त बोइंग, लॉकहीड यांसारख्या अजस्र कंपन्या होत्या; पण संथगतीने चालणाऱ्या त्यांच्या महागड्या कारभारात जोखीम पत्करण्याची वृत्ती आणखीनच कमी. अशा काळात स्पेसएक्सला मदत करून नासाने जणू स्वस्तात एक प्रयोग सुरू केला. मस्क आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी ही मदत जीवदानापेक्षा कमी नव्हती. स्पेसएक्सनंतर दोन वर्षांत इलॉनने इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला या (आता जगप्रसिद्ध) कंपनीत गुंतवणूक केली होती. स्पेसएक्सपेक्षा या गुंतवणुकीचा आकार लहान असला तरी या दोन्ही प्रकल्पांत एकाच वेळी मस्कचा वेळ, प्रयत्न आणि भरपूर पैसा चालला होता. दाखवण्याजोगं यश मिळत नसताना टेस्लासाठी त्याच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या मित्रांनी (गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज-सर्गे ब्रिन आणि इतर काही) गुंतवणूक केली. तर स्पेसएक्सला तारून नेलं नासा अनुदानाने आणि नंतर त्यांच्याकडून मिळालेल्या मोठमोठ्या कंत्राटांनी. २००८ साली अमेरिकी आर्थिक जगतात बरीच पडझड होत असताना मस्कच्या दोन्ही कंपन्यांचे दिवस पालटले. स्पेसएक्सच्या यानाने पहिल्यांदाच यशस्वी उड्डाण केलं. त्या क्षणापर्यंत स्पेसएक्स, टेस्ला, स्वतः मस्क अक्षरशः दिवाळखोरीच्या सीमारेषेवर पोचले होते. पणाला लागलेल्या गुंतवणुकीचे आणि खर्चाचे आकडे ऐकून एखाद्याची हिंमत खचली असती. पण अफाट वैयक्तिक जोखीम घेऊन मस्कने परिस्थिती खेचून नेली.

कशावर भरवसा ठेवला असेल त्याने? वेडं धाडस हा भाग तर खराच. पण त्याला मदत करणारे आजूबाजूचे? त्यांनी तारण धरली असावी ती त्याची धारदार चाणाक्ष व्यावसायिकदृष्टी. दणकट रॉकेट्सच्या मदतीने मोठमोठे उपग्रह अवकाशात सोडण्याचा उद्योग त्या वेळी प्रचलित होता. मात्र, हलक्या वजनाचे छोटे उपग्रह वेळी अंतराळापर्यंत नेणारी रीयुजेबल रॉकेट्स आणि पुढे जाऊन ते उपग्रहसुद्धा रीचार्जेबल/रीप्रोग्रॅम करता येणं. इलॉनच्या या आग्रहामुळे तो धंदा किफायतशीर होणार होता. त्याच्या धोरणीपणातली लवचिकता अशी की त्याच दरम्यान आपल्या इलेक्ट्रिक कार कंपनीचा बाजारातला प्रवेश तो करू पाहत होता- एकदम महागड्या प्रीमियम कारच्या आधारे. कोणत्या क्षेत्रात कोणते प्रतिस्पर्धी आहेत, आज आणि उद्याचे ग्राहक कोण असणार आहेत, आणि त्या त्या उद्योगात जे भांडवली आणि तांत्रिक भागीदार असू शकतात त्यांना काय हवंय, याचं अचूक भान तो दाखवत होता.

आज अमेरिकेचे अंतराळवीर आणि त्यांना लागणाऱ्या सामग्रीची इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर ने-आण करणारी एकमेव टॅक्सी कंपनी स्पेसएक्स आहे. अंतराळातून पृथ्वीतलावर इंटरनेट पोचवणाऱ्या जवळपास साडेतीन हजार उपग्रहांचं जाळं-स्टारलिंक -स्पेसएक्सकडे आहे. (वेब ३.० जमान्यात इंटरनेट उपलब्धता ही जमीन-पाणी-वीज यांच्याइतकीच मूलभूत आवश्यकता असेल हे लक्षात घेतलं तर याचं महत्व चटकन लक्षात येईल.) स्टारशिप सेवेत आलं की त्यातही प्रचंड वाढ प्रस्तावित आहे. अमेरिकेचे अंतराळवीर शेवटचे १९७२साली चंद्रावर उतरले होते. स्पेसएक्सचं स्टारशिप तयार होताच पुन्हा एकदा ती चढाई करण्याची त्यांची योजना आहे. स्वतः मस्कच्या प्लॅनमध्ये तर चंद्र ही एक पायरी आहे. त्याचा खरा रोख मंगळाकडे आहे. टेस्ला ही अख्ख्या जगातली महत्त्वाची वाहन आणि ऊर्जा कंपनी झालीय. या कंपनीचं सतत वाढणारं बाजारमूल्य मस्कच्या वैयक्तिक तिजोरीत संपत्ती आणून ओतत असतं. ती संपत्ती त्याने हायपरलूप (हवेपेक्षा कमी दाबाच्या नळकांड्यांमधून माणसं आणि मालाची वेगवान वाहतूक), ओपन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा विकास), न्यूरालिंक (कम्प्युटरला जोडण्यासाठी मानवी मेंदूत बसवता येण्याजोगी उपकरणं) या स्वतःच्या आवडीच्या प्रोजेक्टसच्या जडणघडणीत आणि आता ट्विटरची मालकी मिळवण्याकामी जुंपली आहे.

तरी इलॉन मस्क हा अनेकांना भरवशाचा गडी वाटत नाही. वेब २.०च्या वाटेला न गेलेल्या इलॉनने मध्येच ट्विटर काबीज केलं तेव्हा तर या चर्चांना ऊत आला. हा सगळा अगोचरपणा त्याच्या स्वतःच्या नियंत्रणात नसलेल्या शोमनशिपचं एक उदाहरण आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. इलॉनचं स्वतःचं वागणं ‘पार्टनर! अब बोल ही दिया है तो देख लेंगे' या धर्तीवर असतं. त्याशिवाय, माहीत नसलेल्या/प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टींची लोणकढी देऊन तो इतरांना भुलवत राहतो, याचे लोकांकडे दाखले आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं, तर २०१८ साली ‘टेस्ला कंपनी पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी मी फंडिंग मिळवलंय' असं थेट ट्वीट या महाशयांनी केलं. परिणामतः, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत चांगलाच चढउतार झाला.

‘एस.ई.सी.'ने, म्हणजे भारतातल्या ‘सेबी'सारख्या नियामक यंत्रणेने केलेल्या तपासांती लक्षात आलं की ती काही वस्तुस्थिती नाही. मग एवढया प्रकाशझोतात असलेल्या महत्वपूर्ण कंपनीच्या सीईओने खोटं ट्वीट का करावं याला उत्तर नाही. या प्रकरणाचा परिणाम असा झाला, की टेस्लाबाबत काहीही ट्विट करायचं असेल तर ते कंपनीच्या वकिलांच्या संमतीनेच करण्याचं बंधन कोर्टाने त्याला घातलं.

इलॉन मस्क अवास्तव दावे करतो, थापा मारतो एवढेच त्याच्याबद्दलचे आक्षेप नाहीत. त्याला जे हवंय ते साधण्यासाठी तो इतका बेभान असतो की हाताखालचे कर्मचारी/सहकारी यांच्याशी तो किमान माणुसकीने वागत नाही. ट्विटरवर लोकांशी भांडाभांडी करताना बऱ्याचदा त्याची भूमिका अहंकारी, स्त्रीद्वेष्टी, लिंगद्वेष्टी, वंशद्वेष्टी असते. जगाच्या लोकसंख्येविषयी त्याची मतंही प्रचलित मान्यतांपेक्षा वेगळी आहेत. त्याच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झालेत आणि त्या तक्रारी दाबण्यासाठी त्याच्या कंपन्यांनी आर्थिक करार केल्याचंही बोललं जातं. तो रूढ नीतिनियमांची पत्रास बाळगत नाही, त्याचा स्वतःचा कोड ऑफ कंडक्ट तो पाळत असतो. कारण या जगावर स्वतःचा खास ठसा उमटवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.

दुसरीकडे, त्याच्या बोलण्या-लिहीण्यातून हेही लक्षात येतं, की त्याचं मन-बुद्धी अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरत असतं. त्याच्यात अहंकार डोकावला तरी आपल्या ज्ञानाच्या ओझ्याखाली तो अडकून पडलेला दिसत नाही. नवीन काही चटकन लक्षात येण्याची, ग्रहण करण्याची चपळता त्याच्याकडे आहे. कदाचित चतुरस्त्र बुद्धीमुळे तो सर्वसामान्य माणसांना न कळणाऱ्या बाबींचा सखोल विचार करू शकतो. ते प्रांतच जर नवीन असतील तर त्याबद्दलच्या काही रूढ कल्पना-नियम असणं शक्य नाही. त्या अर्थाने तो ननैतिक पातळीवर जगत असावा.

अलीकडे इलॉन मस्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अमेरिकेतल्या रिपब्लिकन राजकारणाच्या बाजूने जोरदार भूमिका घेत असतो. तेव्हा, तंत्रज्ञानाद्वारे जग बदलण्याची जबाबदारी शिरावर घेतलेला हा व्यावसायिक बाष्कळपणात का गुंतलाय असा प्रश्न त्याच्या पाठीराख्यांनाही पडतो. तो शोमन मात्र कशाची आणि कुणाचीही पर्वा न करता, स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांसाठी हाती असलेल्या प्रत्येक हत्याराला धार लावत बसला आहे.

तंत्रज्ञानाचे नवीन प्रांत शोधून काढताना, भविष्यवेध घेताना काही चुका होणार, त्याचे फटके बसणार याची जाणीव असूनही त्या चुका करण्याचं धाडस तो वारंवार दाखवतो, चुका सुधारत नवीन काही तरी करतो- आणि या सगळ्यात लोकांची सहानुभूती राहावी यासाठी सतत शोमनशिप चालू ठेवतो. म्हणून तो इलॉन मस्क. आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या व्यावसायिक कारकिर्दीतल्या चुकांसहित त्याला स्वीकारते, म्हणून ती अमेरिका. त्याच्या लोणकढ्या पचल्या नाहीत तरी सगळी काही बोलाचीच कढी नाही ही समज इथला समाज बाळगून आहे. ये पब्लिक है, सब जानती है!

कौमुदी वाळिंबे | kaumudee.valimbe@gmail.com

कौमुदी वाळिंबे







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

मुद्रा14.01.25
उत्तम
See More

Select search criteria first for better results