आम्ही कोण?
ले 

बेटा हमारा इन्फ्लुएन्सर बनेगा..

  • मन्सूर मुल्ला
  • 03.07.26
  • वाचनवेळ 14 मि.
influencer

‘मोठेपणी तुला कोण व्हायचंय?' असा प्रश्न एखाद्या मुलाला विचारला तर पूर्वी काय उत्तरं यायचं? ‘मी डॉक्टर बनणार', ‘मला इंजिनियर व्हायचंय', ‘मला वकिली करायची आहे' वगैरे. एखादा कॉलेजवयीन मुलगा अगदीच स्वाभिमानी असेल तर त्याचं उत्तर असायचं - मला ‘मी' व्हायचंय! पण आजच्या लहानग्यांची उत्तरं यापेक्षा वेगळी आहेत. कुणाला ‘ट्रॅव्हलर' बनायची इच्छा आहे, कुणाला ‘आंत्रप्युनर' व्हायचंय, तर कुणी म्हणतंय की ‘कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर होणं हेच माझं स्वप्न आहे.'

सोशल मीडियामुळे जग जवळ येत गेलं आणि अशा करियरच्या नव्या आणि अनोख्या वाटा मोकळ्या झाल्या. विशेषतः भारतीय तरुणांना अशा करियर्सनी भुरळ पाडली आहे. अनेक तरुण-तरुणी आपली नोकरी सोडून इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी धडपडतायत. भारतात आजघडीला वीस लाखांहून जास्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे. 

हे इन्फ्लुएन्सर प्रकरण नेमकं आहे तरी काय? 

गेल्या सप्टेंबरमध्ये नेपाळ सरकारने इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक आणि व्हाट्सॲपसारख्या सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली. नेपाळमधील भ्रष्टाचार आणि नेटपोटिझमला कंटाळलेल्या जेन-झीचा राग यामुळे उफाळून आला आणि त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. गोळीबारात काही तरुण मृत्यमुखी पडले आणि आंदोलन हिंसक मार्गावर गेलं. आंदोलकांनी संसदेवर हल्ला केला. देशाच्या गृहमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना मारहाण झाली. सरकारला ही बंदी मागे घ्यावी लागली आणि तिथल्या पंतप्रधानांना आपलं पद सोडावं लागलं. ‘सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असणारी पिढी' अशी ओळख असणाऱ्या जेन-झीने देशाची सत्ता उलथवली.

या जेन-झी आंदोलकांची इच्छा होती, की बालेन्द्र शहा ऊर्फ बालेन याने नेपाळचं पंतप्रधानपद स्वीकारावं. आणि खरोखरच गेल्या महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीत तो बहुमत मिळवून निवडून आला. पंतप्रधानही बनला. कोण हा बालेन? १९९०मध्ये नेपाळच्या काठमांडूमध्ये त्याचा जन्म झाला. २०१२च्या आसपास त्याने रॅप गायला सुरुवात केली. भ्रष्टाचार, कचरा आणि ट्राफिकच्या समस्यांवर त्याने सोशल मीडियावर आवाज उठवला. यूट्युब आणि सोशल मीडियावर त्याची क्रेझ आहे. हाच युथ रॅपर २०२२ साली काठमांडूचा पहिला अपक्ष महापौर बनला. ‘टाइम' साप्ताहिकाच्या ‘इमर्जिंग २०२३' यादीत त्याचं नाव होतं. भारतविरोधी भूमिका घेत आपल्या कार्यालयात ग्रेटर नेपाळचा मॅप लावल्यामुळे तो वादातही सापडला होता. सोशल मीडिया स्टार ते पंतप्रधान व्हाया काठमांडू महापौर असा प्रवास करणाऱ्या बालेनची मूळ ओळख इन्फ्लुएन्सर अशीच आहे. 

या उदाहरणामुळे सोशल मीडियावरील जग आणि प्रत्यक्षातलं जग हे एकमेकांत कसे मिसळत चाललेत हे समजतं. सोशल मीडियामुळे समाजात लोकप्रिय झालेला बालेन हा काही एकमेव नाही. जगभरात असे लाखो-करोडो आहेत. (त्यांच्यातील काहींचे तितकेच चाहते आहेत, फॉलोअर्सही आहेत.) त्यांना म्हटलं जातं, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स.  

हेही वाचा - रिल्स बघताय? सावधान ! पुढे धोका आहे.

तसं पाहायला गेलं तर आपण सगळेच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करतच असतो. मात्र, काहीजण एखाद्या विषयाला धरून त्यावर लिहिणं, रील्स-व्हिडिओ बनवून पोस्ट करणं असं काम सातत्याने करत असतात. त्यांना म्हणतात ‘कंटेंट क्रिएटर'. ते काय काय शेअर करतात याकडे त्यांच्या हजारो-लाखो चाहत्यांचं लक्ष असतं. त्यांची नवी पोस्ट, नवा व्हिडिओ लगेच पाहिला जातो, पुढे शेअर केला जातो. अशा क्रिएटर्सना ब्रँड प्रमोशनच्या ऑफर्स येतात. त्यांच्या कंटेंटमधून ते व्यवसाय आणि उद्योगांना ग्राहक मिळवून देतात. पण पैसा आणि मार्केटच्या पलीकडे जाऊन समाजात चांगला-वाईट बदल घडवण्याची क्षमता असणारे क्रिएटर्सदेखील इन्फ्लुएन्सर्सच आहेत. सोशल मीडियावर ते जे काही सांगतात ते आवर्जून ऐकलं जातं. कित्येकांच्या विचारांवर, निर्णयांवर त्याचा प्रभावही पडत असतो. 

पूर्वी समाजावर प्रभाव टाकणारे लोक म्हणजे नेते, संत, साहित्यिक, कलाकार, क्रिकेटपटू किंवा सिनेमातील सुपरस्टार्स असत. पण आजकाल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपैकी काहीजण समाजात चांगला-वाईट बदल घडवण्याची क्षमता राखून आहेत. ते आजच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. ते केवळ मनोरंजनच करतात असं नाही, तर ते जीवनशैलीबद्दल नवे विचार रुजवू शकतात, सामाजिक प्रश्नांवर जागृती करू शकतात.

पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नावाची ही ऑनलाइन जमात तयार कशी झाली?  

२०१७-१८ दरम्यान घडून आलेल्या डिजिटल क्रांतीमुळे भारतातील बहुसंख्य जनता अचानक ऑनलाइन आली. जग मोबाइलच्या छोट्या पडद्यावर आलं. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला. यूट्युबवर ट्रॅव्हल, फॅशन, फुड, मनोरंजन अशा विविध विषयांवर व्हिडिओ येऊ लागले. व्लॉगिंग (व्हिडिओ ब्लॉगिंग), स्टँडअप, पॉडकास्ट, मीम्सची क्रेझ तयार झाली. सुरुवातीच्या काळात असे व्हिडिओ बघणं, आवडला तर लाइक करणं, त्यावर प्रतिक्रिया देणं इथवर प्रेक्षकांची भूमिका मर्यादित असायची. बघता बघता ते सगळं बदलत गेलं. 

तसं म्हणायला गेलं तर २००८पासून भारतात सोशल मीडिया वापरला जातोय. पण तेव्हाचा आणि आत्ताचा सोशल मीडिया यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तेव्हा स्वतःबद्दलचे अपडेट्स देणं, नवी माणसं जोडणं यासाठी सोशल मीडिया वापरला जात होता. मात्र, टिकटॉक आलं आणि व्हिडिओ आडव्या स्क्रीनवरून मोबाइलच्या उभ्या स्क्रीनवर आले. पाहायला आणि शेअर करायला सोपा असणारा हा व्हिडिओ प्रकार लोकप्रिय व्हायला लागला. त्यामुळे इतर सोशल मीडियाला बदलावं लागलं. त्यातल्या ‘सोशल'चं महत्त्व कमी होऊन ‘मीडिया'चं महत्त्व वाढलं. भारतात टिकटॉकवर बंदी आली तरी त्याची जागा इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्युब-शॉर्ट्सनी घेतली. 

सोशल मीडिया बदलला तसं ते वापरणाऱ्यांचं स्वरूपही बदललं. ते निव्वळ प्रेक्षक नव्हे तर ग्राहक बनले. लहान-मोठ्या उद्योगांना त्यांच्या रूपाने आयतेच ग्राहक मिळाले. या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या उद्योगांनी सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सना हाताशी धरलं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा एक नवा आविष्कार पाहायला मिळाला.

एक उदाहरण बघू... श्रेया ऑफिस संपवून घरी चालली होती. बसमध्ये बसून ती मोबाइलवर इन्स्टाग्राम स्क्रोल करत होती. रील्स पाहता पाहता अचानक ती म्हणाली, “व्वा! मलाही असाच आऊटफिट हवा होता.” शेजारी बसलेली मुलगी कुतूहलाने श्रेयाच्या फोनमध्ये डोकावली. श्रेया तिला म्हणाली, “ही रील बघ. माझ्या आवडत्या फॅशनगर्लने घातलाय ना, अगदी तसाच...” त्या फॅशनगर्लने रीलमध्ये घातलेला ड्रेस एका ऑनलाइन सेलमध्ये विक्रीला होता, त्यावर आणखी कसली तरी सूट आणि सोबत एक बॅग फ्री! त्या फॅशनगर्ल ऊर्फ इन्फ्लुएन्सरने आपलं काम केलं होतं. क्षणाचाही विचार न करता श्रेयाने तो ड्रेस ऑर्डर केला. तिला खरंच तो ड्रेस विकत घेण्याची गरज होती का? कदाचित नाही. पण सोशल मीडियावर तेव्हा ‘गेट रेडी विथ मी' हा ट्रेंड चांगलाच गाजत होता. तिच्या आवडत्या फॅशनगर्लने त्या ड्रेसची स्तुती करणारी रील बनवली आणि तिला तो ड्रेस विकत घ्यावा वाटला. तिच्या खरेदीच्या निर्णयावर सरळ सरळ त्या फॅशनगर्लच्या रीलचा प्रभाव पडला. 

हेही वाचा - अमेरिकेत ‘मेटा’ कोमात, भारतात ‘फिंस्टा’ जोमात!

अशा इन्फ्लुएन्सर्सना इन्फ्लुएन्सर बनवणारी गोष्टी कोणती असते? त्यांचे चाहते? त्यांचं फॉलोइंग? जितके जास्त लोक तुम्हाला फॉलो करतात तितक्या जास्त प्रमाणात तुम्ही लोकांच्या मतांवर, त्यांच्या आवडीनिवडींवर प्रभाव पाडू शकता हे खरंच. फॉलोअर्स मिळवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाट असतो तो ‘नो फिल्टर कंटेंट'चा. जे आहे, जसं आहे तसं ते दाखवून लोकांशी नाळ जोडणं, लोकांचा विश्वास संपादन करणं, लोकांनी आपल्याला घरातील सदस्याप्रमाणे स्वीकारावं यासाठी प्रयत्न करत राहणं, हेच इन्फ्लुएन्सर्सचं महत्त्वाचं काम असतं. त्यासाठी ते सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या रोजच्या जगण्याची माहिती ते सोशल मीडियावरून देत असतात. कधी व्हिडिओ, कधी फोटोज, कधी साधं ट्विट, तर कधी एखादा लांबलेला पॉडकास्ट, या ना त्या मार्गाने ते प्रेक्षकांशी सतत संवाद साधत असतात. एकाच कंटेंट प्रकारात अडकून न राहता ते वेगवेगळ्या मार्गांनी प्रेक्षकांना भेटत राहतात. प्रेक्षकांच्या भावनांवर पकड मिळावी यासाठी ही सगळी धडपड असते. बघणाऱ्याला ‘हे तर आपणही करू शकतो' असं वाटायला लागतं. 

भारतात आजघडीला २० लाखांच्या आसपास सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. कुणाला फिटनेसबद्दल बोलायला आवडतं, कुणी मानसिक आरोग्यावर बोलत असतं, कुणाला फॅशनच्या टिप्स द्यायला आवडतं, तर कोणाला समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा असते. 

वर म्हटलं तसं यात मार्केटिंगची एक बाजू असते. एखादा फिटनेस इन्फ्लुएन्सर स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट करतो, पण त्याच वेळी एखाद्या कंपनीची प्रोटिन पावडर तो खात असतो. बघणाऱ्यांपर्यंत त्या पावडरचं नाव पोचलेलं असतं. एखादी फॅशन इन्फ्लुएन्सर तिच्या व्हिडिओत ब्रँडेड बॅग वापरते. पण यामुळे जीवनशैली कोणती आणि जाहिरात कशाची यातली रेषाच नाहीशी होते. अशा वस्तू वापरणं हा जीवनशैलीचाच एक भाग आहे, हे अगदी सहजपणे रुजवलं जातं.

बरं, हे फक्त इथेच थांबत नाही. प्रॉडक्ट वापराचे अनुभवही ते अगदी एखाद्या गोष्टीप्रमाणे रंगवून सांगतात. मी हे प्रॉडक्ट वापरतोय यावर विश्वास ठेवा, असंच ते सांगू पाहतात. ते प्रेक्षकाला ती वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रवृत्तही करतात. प्रेक्षकांचे काही प्रश्न, शंका असतील तर पोल्स, प्रश्नोत्तरांचं सत्र इत्यादीमार्फत त्यांचा विश्वास पक्का करतात. प्रेक्षक कधी ना कधी या मार्केटिंगला बळी पडून त्या वस्तू खरेदी करतात. असं ‘माइंडलेस बाइंग'चं प्रमाण आजकाल वाढलं आहे.

‘बीसीजी' या आघाडीच्या व्यवसाय व्यवस्थापन सल्लागार कंपनीच्या एका अहवालानुसार भारतातील क्रिएटर्स इकॉनॉमी २०३०पर्यंत १ ट्रिलियन डॉलर इतकी असेल. म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी आपल्या खरेदीच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचं प्रमाण वाढतच जाणार आहे. 

खरं तर, इन्फ्लुएन्सर्सचा असा प्रभाव पारंपरिक जाहिरातींपेक्षा वेगळा असतो. ते मोठ्या पडद्यावरील अभिनेत्यांप्रमाणे अभिनय करत नाहीत, तर मानवी चेहरा म्हणूनच सोशल मीडियावर वावरत असतात आणि म्हणूनच लोक त्यांना मित्रासारखं मानतात. याच कारणामुळे त्यांच्या कंटेंटमधून केलेलं मार्केटिंग जास्त प्रभावी ठरतं.

हेही वाचा - सोशल मीडियाचा कार्बन फुटप्रिंट

भारतातील आघाडीच्या कंटेंट क्रिएटर्सविषयी बोलायचं झालं तर ध्रुव राठीचं नाव सगळ्यात आधी पुढे येतं. तथ्यांवर आधारित विलेषण, समाजकारण, राजकारण आणि पर्यावरणीय विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तो ओळखला जातो. मूळचा हरियाणाचा आणि जर्मनीत शिकलेला ध्रुव आज लाखो तरुणांसाठी विश्वासू आवाज बनला आहे. गुंतागुंतीचे विषय सोप्या भाषेत मांडणं ही त्याची खासियत. त्याच्या व्हिडिओंजमधून त्याने अनेक फेक-न्यूजचा पर्दाफाश केलाय. त्याचा कंटेंट लोकांना विचार करायला प्रवृत्त करतो. त्याच्या यूट्युब चॅनेलचे कोट्यवधी सब्स्क्राइबर्स आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही त्याच्या फॉलोअर्सची मोठी संख्या आहे. तरी ध्रुववर काही वेळा एकच बाजू मांडल्याची टीकादेखील होते. अशी टीका होत असली तरी त्याचा समाजावरचा परिणाम नाकारता येत नाही. भारताबाहेर राहूनही भारतातील घडामोडींवर तो लक्ष ठेवून असतो. सोशल मीडिया केवळ मनोरंजनासाठी नसून ते समाजपरिवर्तनाचं प्रभावी साधन असू शकतं हे त्याने सिद्ध केलंय. 

मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारी ऊर्मिला निंबाळकर आता पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर म्हणून काम करते. फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. महिलांनी गुंतवणूक कुठे करावी इथपासून ते साडी कशी नेसावी आणि इनरवेअर कसे खरेदी करावेत इथपर्यंत अनेक प्रकारच्या सल्लामसलतीचं काम ती तिच्या व्हिडिओंमधून करत असते. शिवाय वेगवेगळ्या प्रॉडक्टस्बद्दलचं प्रामाणिक मतही ती प्रेक्षकांपर्यंत पोहचवते. अशा इन्फ्लुएन्सर्सची आणखी अनेक उदाहरणं देता येतील.

फक्त वस्तू विकायच्या म्हणून त्यावर कंटेंट बनवण्याच्या भानगडीत न पडणारे असे अनेक टेक इन्फ्लुएन्सर्स, फिन्फ्लुएन्सर्स आहेत जे कन्झ्युमर मार्केटच्या बाहेर असूनही आपल्या विचारांनी आणि कामाने लोकांवर प्रभाव पाडतात. फक्त वस्तू विकण्यासाठी नव्हे तर लोकांपर्यंत चांगली आणि उद्बोधक माहिती पोहोचवण्यासाठीही हे इन्फ्लुएन्सर्स पुढे येतात. पण काहीजण प्रसिद्धी, पैसा, व्ह्यूजचे आकडे आणि व्हिडिओ अधिकाधिक लोकांमध्ये पसरणं (व्हायरॅलिटी) याच्या मागे लागतात आणि याच नादात ते लोकांवर नको तो प्रभाव पाडतात. 

सोशल मीडियाचा खेळ अगदी सोपा आहे. फॉलोअर्स मिळाले की त्यातून प्रसिद्धी मिळते, आणि प्रसिद्धी मिळाली की पैसा. मग ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्स जिवाचं रान करतात. आपण फॉलोअर्सना काही तरी वेगळं दिलं पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असतो. नावीन्य शोधण्याच्या नादात ते काही तरी बोल्ड, वादग्रस्त कंटेंट बनवून मोकळे होतात. प्रसिद्धीच्या या लूपमध्ये हे इन्फ्लुएन्सर्स स्वतः अडकतात आणि त्यामागे फॉलोअर्सदेखील फरफटत जातात. 

उदाहरण द्यायचं झालं, तर सोशल मीडियावर अनेक ‘रोस्ट व्हिडीओज' आपण बघत असतो. एखाद्या चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण करून अथवा कुणाला विनाकारण नको ते टोमणे मारून त्यातून लोकांना हसवणारे व्हिडिओज सतत व्हायरल होत असतात. खरं तर व्यंगात्मक विनोद समाजासाठी काही नवे नाहीत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अशा कंटेंटला वेगळा तडका दिला जातो. शिव्या देणं, अपमान करणं, बॉडीशेमिंग (शरीरयष्टीवर अथवा शारीरिक व्यंगावर विनोद) करणं म्हणजे तरुणांना एक बंड वाटायला लागतं आणि हे रोस्ट व्हिडिओज बनवणारे बंडखोर. मात्र, यामुळे विषारी भाषेच्या वापराचं कुणाला काहीच वावगं वाटेनासं होतं. समाजात असा चुकीचा प्रभाव पाडणाऱ्या ‘बॅड इन्फ्लुएन्सर्स'ची काहीच कमतरता नाही. 

हेही वाचा - विरोधाचा नवा फंडा

दिल्लीतल्या एका यूट्युब ब्लॉगरची एक वेगळीच कहाणी आहे. त्याचे ४० लाख सबस्क्रायबर्स होते; पण त्याच्या व्हिडिओजमधून दिसणारं त्याचं बेजबाबदारपणाचं वागणं अनेकांना आवडायचं नाही. तरीही तो तरुणांमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता. एकदा त्याने त्याच्या पाळीव कुत्र्याला हायड्रोजनचे फुगे बांधले आणि त्याला आकाशात फेकलं. तो कुत्रा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंतच्या उंचीवर तरंगताना दिसत होता. या कृतीबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याला माफीदेखील मागावी लागली. मात्र या ना त्या कारणाने तो वारंवार वादात सापडू लागला. लोकांना काही तरी वेगळं देण्याचा, आपण जगतोय त्यापेक्षा वेगळं आयुष्य स्क्रीनवर दाखवण्याचा अट्टहास त्याला अशा गोष्टी करण्यास भाग पाडत असावा. एकदा का लाइक्स आणि व्ह्यूजच्या आकड्यांची चटक लागली की त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची अशा काही इन्फ्लुएन्सर्सची मानसिकता असते. आपल्या लाखो फॉलोअर्सप्रति आपली काही जबाबदारी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. 

आर्थिक विषयांवर बोलणारे अनेक ‘फिनफ्लुएन्सर्स' सोशल मीडियावर आहेत. अमुक एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करा, अमुक एखाद्या योजनेत पैसे गुंतवा आणि तुमचा फायदा निश्चित, असे बेधडक सल्ले ते देतात. खरं तर यातील काहींना आर्थिक बाबतीत पुरेसं ज्ञानदेखील नसतं. मात्र, फॉलोअर्स स्क्रीनवर दिसणाऱ्या त्यांच्या खोट्या, झगमगत्या लाइफस्टाइलला भुलतात आणि त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतात. अशा प्रकारच्या चुकीच्या आर्थिक सल्ल्यांमुळे अनेकांचं आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

या बॅड इन्फ्लुएन्सर्सच्या एक पायरी वर असणारेही काही असतात. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्यात, लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात ते पुढे असतात. पैशासाठी एखाद्याचं चारित्र्यहनन करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. कुणी गुंडगिरीचं उदात्तीकरण, मारामारी दाखवणारे रील्स पसरवतात. या प्रकारच्या रील्स प्रचंड व्हायरल का होतात? समाज म्हणून आपणही असेच विघ्नसंतोषी बनत चाललो आहोत का? 

फेसबुक, एक्स अशा प्लॅटफॉर्मवर राजकारण आणि इतर सामाजिक मुद्द्यांवर लोक व्यक्त होत असतात. अशा प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवण्याचं काम काहीजण करतात. राजकीय लाभासाठी त्यांना संबंधितांकडून प्रोत्साहनही मिळतं. परिणामी, सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि फेक न्यूजची विकृती वाढताना दिसून येते. धार्मिक आणि जातीय तेढ वाढेल असा विषारी आणि विखारी प्रचार करण्यासाठीही काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा वापर होतो. 

या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना आपण डिजिटल स्टार तर बनवतो, पण ते स्टारडम खरंच पचवू शकतात का? त्यातील यश-अपयशाचा सामना करण्याची त्यांची तयारी असते का? त्यांना जितकं जास्त यश मिळत जातं तितकाच अधिक ताण झेलावा लागतो. कधी मनाविरुद्ध जाऊन जाहिराती कराव्या लागतात. सतत कंटेंटच्या मागे धावायला लावणारी जीवनशैली स्वीकारावी लागते. ते करताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. डिप्रेशन, निद्रानाश जडतो. 

हेही वाचा - कोण म्हणतं स्त्रियांना विनोदबुद्धी नसते?

रील शूट करत असताना एका तरुण इन्फ्लुएन्सरचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कंटेंटसाठी जीव धोक्यात घालण्याची खरंच गरज असते का? आणखी एका घटनेत एका तरुण इन्फ्लुएन्सर मुलीने व्ह्यूज् आणि फॉलोअर्स कमी झाले म्हणून आपलं आयुष्य संपवलं. रीलमधलं आयुष्य आणि रियल आयुष्य यात अंतर ठेवणारी रेषा या इन्फ्लुएन्सर्ससाठी धूसर होत चालली आहे हे अशा वेळी दिसतं.  

हे इन्फ्लुएन्सर्स काही मुरलेले कलाकार अभिनेते नसतात. जे आहे तसं दाखवणं ही त्यांची गरजही असते. ते केलं नाही तर त्यांचे व्हिडिओ पाहिले जाण्याची (एंगेजमेंट) शक्यता शून्य असते. साहजिकच चांगल्या आणि वाईट कंटेंटमधली रेषा वारंवार ओलांडली जाते. 

रोस्ट व्हिडिओजसाठी प्रसिद्ध असणारा अजय नागर अर्थात कॅरीमिनाटी तुम्हाला माहीत आहे का? त्याचे रोस्टिंग व्हिडिओज आवर्जून पाहणारे आणि पाहून मोकळेपणाने हसणारे लाखो लोक आहेत. मात्र त्याच वेळी त्याने वापरलेली भाषा अपमानकारक आहे असंही काहीजण म्हणतात. ‘बियर बायसेप्स' हा पॉडकास्ट चालवणाऱ्या रणवीर अलाहाबादियाने आजवर अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत, मात्र बऱ्याचदा त्याने विचारलेल्या काही प्रश्नांवरून वाद झाले आहेत. एका यूट्युब कॉमेडी शोमध्ये त्याने केलेली टिप्पणीही वादग्रस्त ठरली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

चांगल्या आणि वाईटाच्या मधल्या- ग्रे एरियातल्या- या इन्फ्लुएन्सर्सविषयी आपण एक प्रेक्षक म्हणून सजग असलं पाहिजे. इन्फ्लुएन्सरला गुड/बॅड ठरवण्यापेक्षा त्याच्या कंटेंटला गुड आणि बॅडची चाळणी लावायला पाहिजे. चमकणारं प्रत्येक रील रियल असेलच असं नाही, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.  

जगप्रसिद्ध पॉप गायक एड शिरान त्याच्या ‘प्ले' या अल्बमचं रेकॉर्डिंग करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी भारतात येऊन गेला. या अल्बमसाठी त्याने पाच गाणी रेकॉर्ड केली. या गाण्यांची खासियत होती- भारतीय संगीतवाद्यांचा त्यात केलेला प्रयोग. कर्नाटकात राहणाऱ्या आणि सोशल मीडियावर तालवादनाचे रील्स पोस्ट करणाऱ्या गणेश मुरली अय्यरला या रेकॉर्डिंगसाठी बोलावण्यात आलं. त्याने या अल्बममध्ये घटम्, मृदुंग आणि कंजीरा या भारतीय तालवाद्यांचा वापर केला. या रेकॉर्डिंगमध्ये तबला, पखवाज, सतार अशा वाद्यांचाही समावेश होता. एड आणि गणेश घटम् वाजवत असतानाची रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या बातमीपूर्वी कितीजणांना गणेश अय्यरबद्दल माहीत होतं? एक उत्कृष्ट कलाकार असूनही त्याला लाखोंची सोशल मीडिया फॉलोइंग का नव्हती? 

खरं सांगायचं झालं, तर सोशल मीडियावरच्या चांगल्या कंटेंटला चांगले व्ह्यूज् येतीलच असं नाही. एखादा व्हिडिओ व्हायरल करायचा की नाही हे प्रेक्षक आणि सोशल मीडियाचं अल्गोरिदमच ठरवतं. त्यामुळे चांगल्यातला चांगला कंटेंट पाहत राहणं, तो इतरांना शेअर करत राहणं हे प्रेक्षक म्हणून आपलं काम असायला हवं. चुकीच्या कृतींना आणि वाईट प्रवृत्तींना आपणच व्हायरल करत असू तर प्रेक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतोय असंच म्हणावं लागतं. 

कारण आपण कशाने इन्फ्लुएन्स व्हायचं हे शेवटी आपल्यावर असतं!

(अनुभव, एप्रिल २०२६च्या अंकातून साभार.)

मन्सूर मुल्ला

मन्सूर युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results