आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

राजेवाडीः महात्मा फुले आणि अस्पृश्यता निवारणाचा इतिहास सांगणारी वस्ती

  • तुषार कलबुर्गी
  • 11.04.26
  • वाचनवेळ 22 मि.
rajewadi mahatma phule

नाना पेठेत लक्ष्मी रोड आणि नेहरू रोड एकमेकांना छेदतात तिथून सेव्हन लव्ह्ज चौकाकडे जाताना डाव्या हाताला पाच-सहाशे घरांची एक छोटी वस्ती लागते- राजेवाडी. पुण्यातली ही सर्वांत जुनी वस्ती. मात्र, हे काही या वस्तीचं एकमेव वैशिष्ट्य नव्हे. ही वस्ती स्वातंत्र्य संग्रामातील आणि प्रबोधनाच्या चळवळीतील अनेक घटनांची साक्षीदार आहे.

राजेवाडी नाना पेठेचा भाग आहे. नाना पेठ १७८९ साली सवाई माधवराव पेशवे यांनी नाना फडणवीसांच्या नावाने वसवली, असा काही ठिकाणी उल्लेख आढळतेो. तर काही ठिकाणी नाना फडणवीसांनीच ही व्यापारी पेठ वसवली आणि पुढे पेशव्यांनी तिला फडणवीसांचं नाव दिलं, असाही उल्लेख आहे. त्या काळी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये पूर्वेला गावकुसाबाहेर तथाकथित अस्पृश्यांसाठी जागा राखून ठेवण्याची पद्धत होती. त्यानुसार पुण्यातही नाना, भवानी आणि मंगळवार या पूर्वेकडच्या पेठांमध्ये प्रामुख्याने दलित वस्ती वसल्याचं अभ्यासक एलिनॉर झेलियट यांनी नोंदवून ठेवलं आहे. त्यातलीच ही राजेवाडी. जुन्या काळात या वस्तीचा उल्लेख ‘भोकरवाडी’ असाही केलेला आढळतो. इथे पूर्वी साधारण एकर-दीड एकर जागेत भोकराची भरपूर झाडं होती. म्हणून या वस्तीला भोकरवाडी नाव पडलं असावं. भोकराची झाडं कापून त्यांच्यावर लोकांनी घरं बांधली, असं काही लोक सांगतात. तर झाडं रहिवाशांनी नव्हे, तर व्यापाऱ्यांनीच कापल्याचं वस्तीतल्या ज्येष्ठ लोकांंचं म्हणणं. पण साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भोकराची झाडं कमी होत गेली आणि पुढे वस्तीचं नावही बदललं. (त्याची गोष्ट पुढे येईलच.)

या वस्तीत प्रामुख्याने मातंग समाजाचे आणि त्या वेळी ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या रामोशी समाजाचे लोक राहत होते. मातंग वस्तीलगतच पूर्वाश्रमीच्या महार समाजाची तुरळक घरं होती. या वस्तीचा उल्लेख अनेक ठिकाणी ‘मांगवाडा’ असाही आढळतो. इथले मातंग समाजाचे लोक गुन्हेगारांना फाशी देण्याचं, दोर वळण्याचं, गेंड्याची सेवा करण्याचं काम करत. पेशव्यांच्या काळात या वस्तीत राहणाऱ्या तथाकथित अस्पृश्यांना गळ्यात मडकं बांधण्याची आणि हातात केरसुणी ठेवण्याची सक्ती होती. थुंकी इतरत्र कुठेही न थुंकता मडक्यातच थुंकावी लागत असे आणि जमिनीवर उमटलेली पावलं केरसुणीने पुसून टाकावी लागत असत, असं वस्तीतल्या लोकांकडून ऐकायला मिळतं. एलिनॉर झेलियट यांनीही त्याची नोंद करून ठेवली आहे. पुण्यात ब्रिटिशांनी कँटोन्मेंटची स्थापना केली आणि इथल्या दलितांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ते ब्रिटिशांकडे घरगडी, वाकनीस, घोडी-गाढवांची निगा राखण्याच्या कामात गेले. नंतर पेशव्यांच्या काळातच ते पारशी आणि ब्रिटिशांकडे ड्रायव्हर म्हणून कामाला लागले.

भोकरवाडीतील सर्वांत महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांनी इथल्या दलित समाजासाठी सुरू केलेली शाळा. भोकरवाडीत दलितांची मोठी वस्ती असल्यामुळे त्यांच्यासाठी या भागात शाळा सुरू करावी असा महात्मा फुले यांचा विचार होता. त्या काळी भोकरवाडीत घोले यांची शेतजमीन होती. महात्मा फुल्यांनी घोल्यांकडे शाळेसाठी जमीन मागितली आणि १८५१ साली तिथे अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली, अशा नोंदी अनेक ठिकाणी आढळतात. प्रा. हरी नरके यांनी संपादित केलेल्या महात्मा फुले गौरवग्रंथात बाबा आढाव यांचा महात्मा फुल्यांवरचा लेख आहे. त्या लेखातून फुल्यांचा आणि या वस्तीचा कसा संबंध आला हे लक्षात येतं. बाबा आढाव लिहितात, ‘१८५२ साली जोतिरावांनी अस्पृश्य मुला-मुलींसाठी पुण्यातील अहिल्याश्रमात शाळा सुरू केली. महार-मांगांना शिक्षण देण्याची कल्पनाच केवढी धर्मद्रोही! सोवळ्या-ओवळ्यांचं एवढं बंड माजलेलं! तिथे जोतिरावांनी विद्येचा दरवाजा या वर्गाला खुला केला. ते मांगवाड्यात, महारवाड्यात हिंडले.’

याच गौरवग्रंथात रा. ना. चव्हाण यांनी लिहिलेल्या लेखात अहिल्याश्रमाचा किंवा या परिसराचा उल्लेख आढळतो, तो पुढीलप्रमाणे- ‘फुले पति-पत्नी यांच्या सार्वजनिक कार्याचा, अस्पृश्यता निवारणाचा वारसा १९०५ पासून महर्षी शिंदे यांनी घेतला. त्यांची बहीण जनाबाई शिंदे यांनी शूद्रातिशूद्रांच्या शाळा चालवल्या व ज्या जागेमध्ये सावित्रीबाई व जोतिबा यांची शाळा चालली होती तीच जागा ताब्यात घेऊन तिथे अहिल्याश्रम बांधला. जोतिरावांनी १८५२-५३ साली ‘अतिशूद्रांदिकास विद्या शिकवण्याविषयाची मंडळी’नामक संस्था काढली. शिंद्यांचे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन-अहिल्याश्रम’ (पुणे, नाना पेठ) हे म्हणजे सावित्रीबाई व जोतिबा फुले यांनी काढलेल्या संस्थेचा वारसा घेणारे आहे.’

क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांचाही या वस्तीशी संबंध आला होता. साळवे यांनी पुण्यातल्या अस्पृश्य वस्त्यांमध्ये फिरून मुलांचं प्रबोधन केलं आणि त्यांना फुल्यांच्या शाळेत आणलं, असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. साळवे यांचा या वस्तीशी संबंध आला याचे ठोस पुरावे सापडत नाहीत. पण या वस्तीत वस्ताद साळव्यांचं येणं-जाणं होतं, असं वस्तीतल्या जुन्या-जाणत्यांकडून ऐकायला मिळतं. आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश राक्षे हे त्यांपैकी महत्त्वाचं नाव. गेली ४५ वर्षं महाराष्ट्रभर फिरून वैचारिक प्रबोधनाचं काम करणारे राक्षे सध्या बार्टी संस्थेच्या एका संशोधन प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. राक्षे सांगतात, “माझी आई सोनाबाई ही वस्ताद लहुजी साळवे यांचे लहान बंधू येसाजी साळवे यांची खापर पणती. लहुजी साळव्यांचं या भोकरवाडीत नेहमी येणं-जाणं असायचं असं आई सांगायची. फुल्यांनी भिडेवाड्यात शाळा सुरू केली त्या वेळी त्यांना लहुजी साळव्यांनी संरक्षण दिलं होतं. महात्मा फुल्यांनी ‘शाळा सुरू करतो, तुम्ही जागा दाखवा.’ असं सांगितलं. तेव्हा वस्ताद साळवे फुल्यांना भोकरवाडीत घेऊन आले.”

हेही वाचा - एक ते नगरसेवक होते, आणि एक आजचे नगरसेवक आहेत

वस्तीतल्या थोरामोठ्यांकडून अशा गोष्टी ऐकायला मिळत असल्या तरी भोकरवाडीतली जागा फुल्यांना साळव्यांनी दाखवली याच्या नोंदी सापडत नाहीत. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनंतर शाळेची जागा तत्कालीन प्रशासनाने सरकारजमा करून घेतली. पुढे महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांनी तिथेच अहल्याश्रम आणि डिप्रेस्ड् क्लास मिशन सुरू केलं. त्यामुळे शिंद्यांचाही या वस्तीशी अगदी जवळून आणि दीर्घकाळ संबंध आला.

‘अहल्याश्रमाची तयारी’ या आत्मपर लेखनात शिंदे या वस्तीचं सविस्तर वर्णन करतात. ते लिहितात, ‘यापुढे मी ह्या शाखेच्या स्वतंत्र इमारतीच्या तयारीला लागलो. त्याप्रीत्यर्थ श्रीमंत सर तुकोजीराव होळकरांकडून २०,००० रु.ची रोख देणगी मिळाली होती. देणगीतून पुणे शाखेसाठी ज्या इमारती व्हावयाच्या होत्या त्यांना ‘अहल्याश्रम’ हे नाव देण्याचं ठरलं होतं. त्या आश्रमासाठी प्रशस्त जागा हुडकू लागलो. नानाच्या पेठेत जिथे हल्ली पोलिस क्वार्टर्स आहेत त्याच्या उत्तरेला भोकरवाडी म्हणून अस्पृश्यांची एक कंगाल वस्ती आहे. ती त्या वेळी अत्यंत गलिच्छ स्थितीत होती. तिच्या आजूबाजूस जवळजवळ दोन फर्लांग मैदानाची उघडी जागा होती. ते सर्व स्थळ इतकं उजाड आणि भयाण दिसत होतं की दिवसाढवळ्या तिथे जाण्याला कोणी धजत नसत. खाचखळगे, काटेखडेच नव्हे, तर जनावरांच्या हाडांचे मोठमोठे सापळे, चिंध्या, मोडके डबे वगैरे कंगालांच्या संपत्तीचं हे मैदान एक उघडं भांडारच होतं. हल्ली ज्याला ‘आयर्विन रोड’ म्हणून मोठं आढ्यतेचं नाव आलं आहे त्यावर पोलिस लोकांच्या वस्तीचं ठाणं असूनही हा रस्ता सामान्यपणे दुरुस्त आणि स्वच्छ ठेवणं हे त्या वेळच्या म्युनिसिपालिटीला आपलं कर्तव्य वाटत नसे. कारण तिथे रहदारी फार नसे. मृतमांस खाण्याची सवय भोकरवाडीतील लोकांना असल्यामुळे तिथेे ओंगळ अवशेष चोहीकडे अस्ताव्यस्त पडलेले असत. भोवतालच्या जुन्या वठलेल्या वटवृक्षावर भयानक पांढऱ्या गिधाडांचे कळप वस्ती करून होते. प्रसंगी खून-मारामाऱ्याही होत. अशा स्थितीतलं हे सात एकरांचं मैदान पाहून आमच्या भावी अहल्याश्रमाला हे ठिकाण योग्य आहे असं मी ठरवलं. मागितल्याबरोबर ही सात एकरांची जागा (पुणे शहर सर्व्हे नं. ७) पुणे शहर म्युनिसिपालिटीने ९९ वर्षांच्या कराराने दोन निरनिराळ्या भाडेपट्ट्या करून आमच्या मिशनच्या स्वाधीन केली.’

शिंदे पुढे लिहितात, ‘ही जागा महात्मा जोतिबा फुले यांच्या वेळी त्यांच्या संस्थेकडे होती. ती पुढे सरकारकडे जाऊन त्यानंतर म्युनिसिपालिटीची घटना झाल्यावर पुणे म्युनिसिपालिटीकडे गेली होती आणि आता हे मिशनने प्रसिद्ध जोतिबांचंच काम पुढे चालवलेलं आहे.’ १९२०च्या दुष्काळात या डी.सी. मिशनमध्ये जवळपासच्या १०० मातंगांनी आसरा घेतला होता, असं एलिनॉर झेलियट यांनी नोंदवून ठेवलं आहे.

पुढे महात्मा गांधींचाही भोकरवाडीशी संबंध आला. १९१५च्या सुमारास महात्मा गांधी हिंदुस्थानात आले. त्यानंतर ते पुण्यात आले असता नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटले. बहुधा गोखले यांच्या सांगण्यावरूनच गांधीजी विठ्ठल रामजी शिंदे यांना भेटण्यासाठी भोकरवाडी येथील डी.सी. मिशनच्या शाळेमध्ये गेले होते. त्या वेळी पुण्यातील मंडळी अद्याप गांधीजींना फारशी ओळखत नव्हती, पण विठ्ठल रामजी शिंदे यांची मात्र त्यांच्याशी आधी भेट झाली होती. श्रेष्ठ कृषितज्ज्ञ व पुण्यातील शेतकी कॉलेजचे प्राचार्य पी. सी. पाटील यांनी गांधीजी भोकरवाडीला मिशनच्या शाळेत आले त्या प्रसंगाचं वर्णन केलं आहे, ते असं ः ‘पुण्यास ज्या वेळी मराठा समाजात शिक्षणविषयक जागृती होत होती, तेव्हा एकदा विठ्ठल रामजी शिंद्यांनी भोकरवाडीत मराठी इतिहासावर व्याख्यानमाला सुरू केली होती. बडोद्याचे इंजिनियर जयराम जनार्दन सावंत यांचं व्याख्यान होतं. विषय बाजीप्रभू व पावनखिंडीची लढाई असा होता. मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. सावंत आणि मी प्लॅटफॉर्मवर खुर्च्यांवर बसलो होतो. विठ्ठलराव शिंद्यांसह बाकीची मंडळी प्लॅटफॉर्मखाली जाजमावर बसली होती. सावंतांच्या व्याख्यानाला बराच रंग आला होता. इतक्यात एक सडपातळ गृहस्थ एकटेच सभेत आले- डोक्यास काठेवाडी धरतीचं पागोटं, अंगात खादीचा आखूड अंगरखा, खादीचा पंचा नेसलेला. विठ्ठलरावांनी पुढे जाऊन त्यांना आपल्याजवळ बसवून घेतलं. विठ्ठलरावांखेरीज आम्हा कोणालाही त्या नवख्या गृहस्थांची ओळख नव्हती. व्याख्यान संपलं. समारोप झाला आणि विठ्ठलराव शिंदे अध्यक्षांचे व व्याख्यात्यांचे आभार मानण्यास उठले. प्लॅटफॉर्मच्या जवळ येऊन त्या नवख्या गृहस्थाकडे बोट करून त्यांनी सांगितलं, हे सज्जन कोण आहेत हे आपणास माहीत नाहीसं दिसतंय. हे दुसरं कुणी नसून द. आफ्रिकेत हिंदी समाजाचे पुढारी म्हणून ज्यांच्यासंबंधी आपण वृत्तपत्रांतून वाचतो तेच हे गांधीजी होत. ते नुकते द. आफ्रिकेतून परत आले आहेत. त्यांचं दर्शन झालं याबद्दल आपणा सर्वांना आनंदच वाटतो.”

पुढे भोकरवाडी वस्ती जणू अस्पृश्यताविरोधी चळवळीचं केंद्रच बनली. आंबेडकरांचा उदय होण्याच्या आसपासच्या काळात या वस्तीत मातंग समाजाचे अनेक पुढारी होऊन गेले. वस्तीत मातंग चळवळीच्या सभा, परिषदा आयोजित होत असत. महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचे पुढारी के.के. सकट आणि बाबू धोंडी वायदंडे हे याच वस्तीतले. सकट यांनी ‘अस्पृश्य समाज समता संघटने’च्या माध्यमातून मातंग समाजाच्या सुधारणेसाठी योगदान दिलं. पुढे त्यांनी ‘मातंग बंधू’ हे नियतकालिक सुरू केलं. सुरुवातीच्या काळात ते आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. ज्ञानप्रकाश, मूकनायक, मातंग बंधू आणि बहिष्कृत भारत या नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केलं. पुढे आंबेडकर आणि सकट यांच्यात मतभेद झाले आणि ते हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडे वळले, असा उल्लेख सोमनाथ कदम यांच्या ‘आंबेडकर चळवळीतील मातंग समाज’ या पुस्तकात आहे. राजेवाडीतल्या मुख्य रस्त्याला के. के. सकट यांचं नाव आहे. बाबू वायदंडे हे पत्रकार आणि लेखक होते. ते विठ्ठल रामजी शिंदे यांचे निकटवर्तीय होते, असं सांगितलं जातं. त्यांचंही लिखाण ज्ञानप्रकाश या नियतकालिकातून प्रसिद्ध व्हायचं.

बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व उदयास आलं, त्या वेळी वस्तीतले मातंग सामाजाचे अनेक नेते त्यांचे अनुयायी व कार्यकर्ते बनले. त्यापैकी बाळासाहेब शेंडगे हे नाव आजही अग्रक्रमाने घेतलं जातं. शेंडगे त्या काळातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले मातंग समाजातले एकमेव तरुण होते. १९२९ साली बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात केलेल्या पर्वती मंदिर सत्याग्रहात शेंडगे सहभागी झाले होते. त्यात उच्चवर्णीयांच्या हल्ल्यात ते जखमीही झाले होते. पुढे आयुष्यभर ते आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहिले. वस्तीच्या सीमेवर एक लहानसा चौक आहे, त्याला बाळासाहेब शेंडगे यांचं नाव दिलेलं आहे. भोकरवाडीच्या इतिहासात पर्वती सत्याग्रह ही महत्त्वाची घटना मानली पाहिजे. कारण बाळासाहेब शेंडगे, के.के. सकट, कोंडिबा भिसे आणि सुभेदार घाडगे हे भोकरवाडीत राहणारे चार कार्यकर्ते सत्याग्रहात सक्रिय सहभागी झाले होते.

गीता दामोदर पवार या आंबेडकरवादी कार्यकर्त्याही काही काळ या वस्तीत राहिल्या. त्यांनी दलित वस्त्यांमध्ये प्रबोधनाचं काम करून अस्पृश्य महिलांचं संघटन केलं. त्या अहल्याश्रमात शिक्षिकाही होत्या. पुढे त्या नोकरीनिमित्त पुण्याहून मुंबईला गेल्या. याशिवाय भोकरवाडीत राहणारे मातंग समाजातले सुभेदार घाडगे, लक्ष्मण घाडगे, यादवराव काळे, मुक्ताजी भाऊजंगम काळोखे, लक्ष्मण अवचिते, राघू पवार, खाशाबा लोंढे हेही आंबेडकरांचे अनुयायी होते.

पुढे या वस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा झाल्याच्या नोंदी आहेत. २० जुलै १९२७ रोजी आंबेडकरांनी भोकरवाडीत मातंग प्रबोधन परिषद घेतली होती. ती आंबेडकरांची वस्तीतली पहिली सभा होती. याचा सविस्तर वृत्तान्त ‘बहिष्कृत भारत’मध्ये छापून आला होता. या वृत्तान्तात या सभेतील उपस्थितांमध्ये वस्तीतल्या सुभेदार घाडगे आणि लक्ष्मण घाडगे या नेत्यांचीही नावं होती. (त्यामध्ये भोकरवाडी असा उल्लेख नसला तरी पुण्याचा मांगवाडा असा उल्लेख आहे; पण अभ्यासकांच्या मते हे ठिकाण भोकरवाडीशिवाय दुसरं असू शकत नाही.) ही सभा चांगलीच गाजली होती. मातंग समाजाचे पुढारी के.के. सकट आणि बाबू वायदंडे यांनी आंबेडकरांसमोरच त्यांच्यावर टीका केली होती. आंबेडकरांनीही या दोघांना खडे बोल सुनावले होते.

हेही वाचा - महात्मा फुले साहित्य संमेलनाविषयी काय म्हणाले होते?

पुढे १९३६ मध्ये भोकरवाडीत आणखी एक मातंग परिषद झाली. डॉ. बाबासाहेबांनी आयोजित केलेल्या या परिषदेला वस्तीतल्या पूर्वाश्रमीच्या महार समाजातील नेत्यांनी विरोध केला. ही परिषद उधळून लावण्याचं ठरवलं. पण परिषद कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हावी म्हणून बाबासाहेबांना या वस्तीतल्या मातंग समाजाने संरक्षण दिलं.

रमेश राक्षे या घटनेबद्दल सांगतात, “बाबासाहेब मातंग समाजाची परिषद घेतायत हे पूर्वाश्रमीच्या स्थानिक महार समाजाला पटत नव्हतं. त्यांनी आंबेडकरांना महारवाड्यात परिषद घेण्यास सांगितलं. बाबासाहेबांनी नकार दिला. उलट, त्यांनी महारांनाच मातंग परिषदेला येण्याचं आवाहन केलं. तुम्ही मातंग परिषदेला आला नाहीत तर मी पुन्हा तुमच्या वस्तीत येणार नाही, असंही बजावलं. विरोध करणाऱ्यांमध्ये पूर्वीचा कामाठीपुरा, ताडीवाला रोड आणि पत्र्याची चाळ या भागातले पारंपरिक विचारांचे लोक होते. आंबेडकरांनी पूर्वाश्रमीच्या महारांना पिढीजात कामं सोडण्याचं आवाहन केलेलं असल्यामुळेचही या मंडळींचा आंबेडकरांवर राग होता.”

राक्षे सांगतात, “बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बॅरिस्टर आर.आर. भोळे यांचं घर भोकरवाडीजवळ होतं. त्यांनीच ही परिषद आयोजित केली होती. बॅरिस्टर भोळे पूर्वाश्रमीच्या महार समाजाचे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी मातंग समाजातल्या महिलेशी लग्न केलं होतं. त्या देवीच्या भक्त होत्या. त्यांच्या घरी देवीचं पारायण चालायचं. तेव्हा भोळ्यांच्या घरी भोकरवाडीतल्या मातंग समाजातल्या लोकांचं येणं-जाणं होतं. त्यामुळेच भोळ्यांनी ही परिषद आयोजित केली होती. पण महार समाजाचा विरोध पाहून भोकरवाडीतील कार्यकर्त्यांनी खबरदारीचा उपाय योजण्याचं ठरवलं. आंबेडकर कारमधून उतरून स्टेजकडे जाईपर्यंत त्यांच्याशेजारी परशू, कुऱ्हाड घेऊन थांबायचं असं ठरलं. प्रत्यक्षात लोक विरोध करायला आले तेव्हा ही तयारी पाहून ते नागझरीच्या पलीकडेच थांबले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब शेंडगे, माझे चुलत आजोबा लक्ष्मण राक्षे आणि इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते.” (या प्रसंगाचं वर्णन ‘आंबेडकर चळवळीतील मातंग समाज’ या पुस्तकातही आहे. पण पुस्तकाच्या लेखकानेही रमेश राक्षे यांचाच संदर्भ दिला आहे.)

१९५६ साली आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर प्रामुख्याने पूर्वाश्रमीच्या महार समाजाने बौद्ध धर्म स्वीकारला. पण त्याचबरोबर मातंग समाजातीलही अनेकांनी धर्मांतर केल्याचं आढळतं. त्यात भोकरवाडीतील कार्यकर्त्यांचाही समावेश होता. राक्षे सांगतात, “बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर इथल्या अनेक मातंग कुटुंबांनी धर्मांतर केलं. त्यापैकी माझे चुलत आजोबा लक्ष्मण राक्षे, यादबा काळे आणि त्यांचे वडील बाबुराव काळे, कुशाबा साळवे, के.डी. वायदंडे, दादोबा शेंडगे, टोपाजी तुकाराम सकट, दारो शेंडगे होते; पण यापैकी बहुतेकांची पुढची पिढी पुन्हा मातंग झाली.”

राक्षे त्यांच्या कुटुंबातली आठवण सांगतात, “१९३९ सालची गोष्ट. बाबासाहेबांनी भाषणांमधून ‘देव टाकून द्या’ असं सांगायला सुरुवात केल्यानंतर माझे वडील भीमराव राक्षे यांनी त्यांच्या आईचा विरोध पत्करून घरचा देव्हारा पाण्यात टाकला आणि बाबासाहेबांचे विचार स्वीकारले. पूर्वी वस्तीत लग्नासाठी ब्राह्मणांना बोलवायची पद्धत होती. बाबासाहेबांच्या प्रभावामुळे मातंग सामाजातले लोकच लग्न लावायला लागले.”

या वस्तीला ऐतिहासिक महत्त्व असलं तरी या वस्तीच्या नोंदी तुटक आणि विरळ आढळतात. या वस्तीचा नेमका इतिहास समजून घेण्यासाठी तिथल्या बुजुर्गांना शोधावं लागतं. त्यांच्याकडून वस्तीतले जुने संदर्भ आणि काळाच्या ओघात होत गेलेल बदलही समजतात.

७७ वर्षांचे रामदास लक्ष्मण घाडगे यांचा जन्म राजेवाडीतलाच. घाडगे पी.एम.टी.मध्ये बसचालक म्हणून रिटायर झालेले. ते सांगतात, “माझे वडील आणि आजोबाही इथेच जन्मले. नाना पेठेतल्या ए. डी. कॅम्प चौकात लोखंडाची दुकानं होती, तिथे वडील हमाली करायचे. माझ्या लहानपणी मुख्य रस्त्यावर कंदील होते आणि वस्तीच्या आतमध्ये शिरलं की घरांवर चिमण्या, दिव्यांच्या बत्त्या टांगलेल्या असायच्या. घरं तेलडब्यांच्या पत्र्यांची होती. पूर्वीपासूनच राजेवाडी मातंगांची वस्ती म्हणूनच प्रसिद्ध होती. भिसे यांचा मांगवाडा, लांडगे यांचा मांगवाडा वगैरे वाडे होते. रामोश्यांची आणि मुसलमानांचीही घरं पूर्वीपासूनच. सगळ्यांची कुटुंबं वाढली आणि वस्तीची लोकसंख्याही वाढली; पण इथे कोणीही बाहेरनं आलेलं नाही.”

रमेश राक्षे सांगतात, “माझ्या वडिलांचा आणि आजोबांचा जन्म राजेवाडीमधलाच. आजोबा नाना-भवानी पेठेतल्या धान्यबाजारात मजुरी करायचे. वडील खडकीच्या अम्युनिशन फॅक्टरीमध्ये आणि नंतर एम.एस.ई.बी.मध्ये कामाला होते. वडील काम करत असतानाच वस्तीतल्या ‘राजेवाडी पंच मंडळा’त सक्रिय होते. हे पंचमंडळ मातंग समाजाचं होतं. कारण पूर्वी भोकरवाडीमध्ये साधारण ९० ते ९५ टक्के मातंग समाज राहत होता. शिक्षणाचा प्रसार करणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, वस्तीचे प्रश्न सोडवणं हे या पंचमंडळाचं मुख्य काम होतं.”

स्थानिक रहिवासी आणि पुण्याचे माजी उपमहापौर हिरामण शिंदे यांनी या वस्तीतला जुना काळ बघितला आहे. ते सांगतात, “साठ सालाच्या आसपास इथे भोकराची झाडं शिल्लकच राहिलेली नव्हती. राजेवाडी

ही मुख्य वस्ती होतीच, पण या वस्तीच्या आसपास भोर्डेआळी, इस्लामपुरा, पत्र्याची चाळ या

वस्त्यादेखील होत्या.”

साधारण ५०च्या दशकात वस्तीतल्या तथाकथित अस्पृश्य लोकांच्या शिक्षणाचं वास्तव काय होतं, हेही हिरामण शिंदे यांच्या अनुभवातून लक्षात येतं. ते सांगतात, “मी महापालिकेच्या नऊ नंबर शाळेत शिकत होतो. चौथीत असताना प्रवेश घ्यायला एक महिना उशीर झाला म्हणून मला शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. नंतर एका शिक्षकाच्या ओळखीमुळे मला आदर्श विद्यालय या खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळाला. त्या वेळी या शाळेत परिस्थिती अशी होती, एकूण पंधराशे मुलांपैकी आम्ही दोघंच मागासवर्गीय समाजातले होतो. गरीब घरांतल्या मुलांना नादारीचा फॉर्म भरल्यावर सर्व प्रकारची फी माफ होती. मी नादारीचा फॉर्म भरला होता. तरी वर्षाच्या शेवटी शाळेने मला ६० रुपये परीक्षा फी मागितली. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी परीक्षेला बसूच दिलं नाही.”

पण भोकरवाडीत सुरू झालेल्या प्रबोधनाचा वारसा तिथल्या पंचमंडळाने आपल्या शक्तीनुसार पुढे नेला. मातंग समाजातील या पंचमंडळाने वस्तीत अनेक सुधारणा घडवल्या. विठ्ठलराव शेंडगे, बाळासाहेब शेंडगे, यादवराव काळे, बळीराम नेटके, मुक्ताजी काळोखे, लक्ष्मण अवचिते, तात्याबा राक्षे, भीमराव राक्षे हे सगळे भोकरवाडीतले पुढारी आणि वस्तीतल्या पंचमंडळाचे सदस्य. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचं, वैयक्तिक-कौटुंबिक तंटे सोडवण्याचं काम या मंडळातर्फे चालायचं. या पंचमंडळाचा वस्तीमध्ये धाक होता, असं स्थानिक रहिवासी रोहिदास रोकडे सांगतात.

याच पंचमंडळाच्या काळात वस्तीत एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे वस्तीचं नाव बदलण्याचा. रमेश राक्षे सांगतात, “या पंचमंडळानेच १९४२ साली या वस्तीचं नाव बदलून ‘राजेवाडी’ ठेवायचं असा ठराव केला. त्या पंचमंडळामध्ये माझे वडील भीमराव राक्षेही होते.” वस्तीचं नाव राजेवाडी का ठेवलं याबद्दल ते सांगतात, “वस्तीमध्ये श्रावणात ग्रंथ पारायण चालायचं. त्या पारायणामध्ये ‘पांडव प्रताप’ ग्रंथाचं वाचन अधिक व्हायचं. इथल्या पूर्वीच्या लोकांचा असा समज होता, की कौरव-पांडव सगळे मातंग समाजाचे होते आणि ते राजेही होते. ते राजे होते तर आपल्या मातंग वाडीला ‘राजांची वाडी’ का म्हणू नये? या काळापर्यंत भोकराची झाडीही नष्ट झाली होती आणि भोकरवाडी हे ऐकायलाही अपमानजनक वाटत होतं. म्हणून वस्तीचं नाव ‘राजेवाडी’ ठेवण्यात आलं.”

१९५४ साली गलिच्छ वस्त्यांची सुधारणा म्हणून महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर राजेवाडीमध्ये दोन इमारती बांधल्या. त्यात ४८ घरं होती. तिथल्या २५ कुटुंबांना पक्की घरं मिळाली आणि उरलेली सगळी घरं सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना. (त्याला आज ‘१२ नंबर कॉलनी’ म्हटलं जातं.) या प्रकल्पाला कोणी विरोध केला नाही. त्यानंतर वस्तीतल्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन महानगरपालिकेला असं सांगितलं की ‘जागा आमच्या मालकीची करून द्या. आम्ही ती टप्प्याटप्प्याने विकसित करू आणि आमचा आम्हीच विकास करू.’ नंतरच्या प्रत्येक प्रकल्पाला वस्तीतल्या रहिवाशांनी विरोध केला. त्यामुळे वस्तीत विकास करण्याची प्रक्रिया थांबली. रमेश राक्षे सांगतात, “१९७३च्या आधी महानगरपालिकेकडून राजेवाडीला झोपडपट्टी घोषित करण्याचा प्रयत्न झाला; पण आम्ही विरोध केला. आमचं असं म्हणणं होतं, की आमचा परिसर झोपडपट्टी नाही. गलिच्छ नाही. आम्ही आमची वस्ती स्वच्छ ठेवतो. म्हणून आमच्या वस्तीला गलिच्छ वसाहत म्हणू नये.”

पुण्यातल्या अनेक वस्त्यांना १९७२च्या दुष्काळाचा संदर्भ आहे. खेडोपाड्यांत दुष्काळ पडल्यानंतर लोंढेच्या लोंढे पुण्यात आले, आणि इथे त्यांच्या वस्त्या तयार झाल्या, वाढल्या. पण राजेवाडीत १९७२ सालच्या आधीच २०० ते २२५ घरं होती. १९७२ नंतर वस्तीचा आकार वाढत गेला. महानगरपालिकेने राजेवाडीत भुईभाडं आकारायला सुरुवात केली. आज ते भाडं ३०० ते ६०० रुपये आहे, असं लोक सांगतात. ज्यांच्या नावावर घर त्यांच्या नावावर पावत्या. वस्तीतल्या १०० जणांना या पावत्या आजही येतात. त्या पावत्यांवरची नावं पहा. उदाहरणार्थ : नारायण रामा मांग, बाबाजी संतू मांग, हरिभाऊ महार, जानबा महार. ज्यांच्या नावांवर पावत्या होत्या त्यांच्याकडून काहींनी घरं विकत घेतली. ते लोकही वस्तीत ५०-५० वर्षांपासून राहतात, अशीही माहिती मिळाली.

१९६७-६८ साली इथल्या लोकांनी हाउसिंग सोसायटी स्थापन करायचं ठरवलं. राजेवाडीचा एक भाग नगरपालिकेत येत होता म्हणून इथल्या लोकांनी नगरपालिकेत पत्रव्यवहार सुरू केला. राम नेटके, डी.एल. खेत्रे, बाळासाहेब शेंडगे, खाशाबा लोंढे यांचा यात पुढाकार होता. तेव्हाही त्यांचं असंच म्हणणं होतं की ‘जमीन आमच्या नावावर करा. आम्ही आमची गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करून जागा विकसित करू’. रमेश राक्षे सांगतात, “वस्तीतल्या लोकांनी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यामध्ये दोन गट पडले. एका गटाचं नेतृत्व रामदास नेटके करत होते. तो गट म्हणत होता, वस्तीत रामाचं जुनं मंदिर आहे, म्हणून सोसायटीला ‘श्रीराम राजेवाडी हरिजन सहकारी गृहनिर्माण संस्था’ असं नाव द्यायचं. दुसऱ्या गटाचं नेतृत्व समाजवादी विचारांचे डी.एल. खेत्रे करत होते. तो गट म्हणत होता सोसायटीला ‘महात्मा फुले दलित सहकारी गृहनिर्माण संस्था’ असं नाव द्यायचं. तो वाद मिटला नाही, म्हणून दोन्ही गटांनी आपापल्या गृहनिर्माण संस्था नोंदणी करून टाकायचा निर्णय घेतला. पण पालिका म्हणाली, ‘दोघांना नोंदणी देता येणार नाही. ज्यांची संस्था मोठी त्यांची आम्ही नोंदणी करू.’ श्रीराम राजेवाडी हरिजन सहकारी गृहनिर्माण संस्था मोठी ठरली; पण काही काळाने फुले गृहनिर्माण संस्थेचीही नोंदणी झाली. गृहनिर्माण संस्था नोंदणी झाल्यानंतर इथल्या पुढाऱ्यांनी जमीन ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न केला; पण महानगरपालिकेने नेहमी दुर्लक्ष केलं.”

राजेवाडीच्या एका बाजूला नाना पेठेचा बाजार आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प परिसर आहे. नाना, भवानी पेठांमधून कॅम्पमध्ये जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून महानगरपालिकेने साधारण १९७०च्या सुमारास राजेवाडीचे दोन भाग केले आणि वस्तीतला एकमेव रस्ता मोठा झाला.

मधल्या काळात वस्तीत स्वच्छतेचे प्रश्न तयार झाले होते. त्यामुळे पंचमंडळाने स्वच्छतेचं आवाहन केलं, तेव्हापासून इथलेच लोक आपली वस्ती स्वच्छ ठेवू लागले. या वस्तीत शिकलेले लोक तुरळक होते. १९७० सालापासून वस्तीमध्ये शैक्षणिक प्रगती झाली. त्याला राजेवाडीतलं एक विद्यार्थी मंडळ कारणीभूत आहे. राजेवाडीतल्या पंधरा-वीस शिकलेल्या मुलांनी ‘दलित विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ स्थापन केलं. त्याच्या माध्यमातून पुस्तक पतपेढी योजना सुरू केली. त्यातून वस्तीतल्या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवायचं आणि मुलांना शाळा शिकण्यासाठी प्रवृत्त करायचं, असा त्या मंडळाचा हेतू होता. हे मंडळ स्थापन झाल्यानंतर पाच ते सहा वर्षांत शिक्षणाचा प्रसार वाढला. हे पाहिल्यानंतर काही राजकारण्यांनी मंडळाला आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली. शैक्षणिक विकास झाल्याने लोकांचं राहणीमान बदललं. त्यांना महानगरपालिकेत, महावितरणमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये नोकऱ्या लागल्या. तर काहीजण शिक्षक म्हणून कामाला लागले.

लोकांनी पक्की घरं बांधली. कुटुंबांचा आर्थिक विकास झाला. हा विकासाचा काळ साधारण १९७० ते ९५ दरम्यानचा आहे.

१९६५ ते ७०च्या दरम्यान वस्तीतल्या काही घरांमध्ये वीज आली. बाकीचे लोक रॉकेलचे दिवे लावायचे. भाई वैद्य महापौर झाले तेव्हा वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचं कोंडाळं आलं. काहीजणांच्या घरांतही पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन आलं. राजेवाडीत वेळच्या वेळी सफाई कामगार येऊ लागले. त्यासाठी भाई वैद्यांनी आर्थिक तरतूदही केली होती, असं सांगितलं जातं. भाई वैद्य महापौर व्हायच्या आधी त्यांचं या वस्तीत नेहमी येणं-जाणं असायचं. त्यांच्या पत्नी राजेवाडीत बालवाडी चालवत होत्या. राक्षे सांगतात, “नाना पेठेत जेव्हापासून राजकीय जागृती झाली तेव्हापासून इथे समाजवादी विचारांचाही पगडा होता. १९४२च्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये समाजवादी विचारांचे लोक सामील झाले होते. त्याला राजेवाडीतले लोकही अपवाद नव्हते.”

राजेवाडीत १९७४पासून सलग तीन वेळा काँग्रेसचे जयवंत गद्रे निवडून आले. महानगरपालिकेच्या नोंदीनुसार १९७४ साली नाना पेठ वॉर्डातून काँग्रेसचेच गजानन शिंदे निवडून आले, तर १९८५ साली राजेवाडी वॉर्डातून शिवसेनेचे तानाजी काथवटे निवडून आले. १९७९च्या निवडणुकीत कोण निवडून आलं हे स्पष्ट होत नाही; पण राक्षे यांच्या म्हणण्यानुसार १९९२पर्यंत वस्तीच्या बाहेर राहणारेच लोक नगरसेवक झाले. वस्तीतले नेते उदाहरणार्थ रामभाऊ नेटके, रघुनाथ होळकर, ॲडव्होकेट भुंडे हे निवडणुकीत उभे राहिले, पण निवडून आले नाहीत. १९९२मध्ये मात्र वस्तीतले हिरामण शिंदे काँग्रेस पक्षाकडून निवडून आले. त्यानंतर वस्तीचा विकास झपाट्याने झाला. त्यांनी वेळोवेळी रस्त्यांचं डांबरीकरण केलं. नळ-कोंडाळी वाढवली. प्रत्येक घरात नळ आले, दिव्याचे खांब आले. वस्तीत आरोग्यशिबिरं सुरू झाली. त्यांनी वस्तीतला ड्रेनेजचा प्रश्न मिटवला. हिरामण शिंदे खऱ्या अर्थाने वस्तीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या काळात वस्तीत विकसकामं होत होती, ती २०१२ नंतर ठप्प झाली, असं इथले लोक सांगतात. हिरामण शिंदे १९९२पासून २००७पर्यंत इथले नगरसेवक राहिलेे. शेवटच्या टर्ममध्ये ते पुण्याचे उपमहापौर झाले. २००७ला वॉर्ड महिला आरक्षित झाल्यामुळे हिरामण शिंदे यांच्या पत्नी रेखा शिंदे यांनी निवडणूक लढवली आणि त्या नगरसेविका झाल्या.

शेजारच्या पत्र्याच्या चाळीत २००० सालच्या आसपास झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झाला. राजेवाडीत तसाच प्रकल्प येऊ घातला होता. या प्रकल्पाचे विकसक फक्त २८० चौरस फुटांची घरं देणार होते. इथल्या लोकांना २८० चौरस फुटांची घरं परवडणारी नव्हती. प्रकल्प आल्यानंतर आम्ही वस्तीतल्या लोकांनी स्वतः वस्तीचा सर्व्हे केला. त्यामध्ये ६०० कुटुंबांची नोंद झाली. आम्ही प्रत्येक कुटुंबासाठी ४२५ चौरसफुटांच्या घरांची मागणी केली. विकसक त्याला तयार नव्हता. पण त्याने संमती मिळवण्यासाठी वस्तीतल्या काही लोकांना हाताशी धरलं. दादागिरी आणि दिशाभूल करून ८० टक्के लोकांची संमती मिळवली. त्यानंतर वस्तीतल्या लोकांनी सभा घ्यायला सुरुवात केली आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध अधिक तीव्र केला. विशेष म्हणजे तत्कालीन नगरसेवक हिरामण शिंदेही या प्रकल्पाच्या विरोधातच होते. कारण ते राहत असलेल्या पत्र्याच्या चाळीतलं बांधकाम दाटीवाटीचं होतं. त्यांचीही प्रकल्पाबाबत निराशा झाली होती. शेवटी वस्तीतल्या लोकांनी विकसकाला सांगितलं, की आम्ही कोर्टात जाऊन स्टे घेऊ. त्या वेळी वस्तीतल्या लोकांचे वकील ॲड. मोहन वाडेकर होते. वस्तीतल्या लोकांची एकजूट, संघर्षाची तयारी आणि नगरसेवकाचाही विरोध हे बघून विकसकाने या प्रकल्पातून काढता पाय घेतला. त्यानंतर राजेवाडीत पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आला नाही. त्यानंतर लोकांनी आपापल्या पद्धतीने घरांवर दोन मजले, तीन मजले चढवले. जवळच्याच लोहियानगर-काशीवाडीमध्ये काही दशकांमध्ये वस्ती हटवण्याचे प्रयत्न झाले, तसे प्रयत्न राजेवाडीत झाले नाहीत, असं इथले लोक सांगतात.

राजेवाडीला सामाजिक सौहार्दाचाही इतिहास आहे. इथे पूर्वीपासून मातंग समाज आणि नवबौद्ध समाज एकत्र राहतो. दोन्ही समाजांत एकी नव्हती, पण वितुष्टही नव्हतं. नंतर नंतर रामोशी, नवबौद्ध, मातंग आणि मुस्लिम हे सगळे एकदिलाने इथे राहायला लागले. रमेश राक्षे एक घटना सांगतात- “पूर्वी राजेवाडीजवळ ‘भोर्डे आळी’ नावाची मराठाबहुल वस्ती होती. तिथले लोकही राजेवाडीच्या मैदानावर खेळायला यायचे. दोन्ही वस्तींतल्या लोकांमध्ये अनेकदा खेळण्यावरून, पतंग उडवण्यावरून भांडणं व्हायची; पण नंतर रामचंद्र बडदे, जगन्नाथ सकट यांनी सामंजस्याने हे झगडे मिटवले.”

हिंदू-मुसलमान सौहार्दाबद्दल रमेश राक्षे यांनी दोन घटना सांगितल्या, “१९६५च्या सुमारास पुण्यात दंगल झाली होती. तेव्हा राजेवाडीच्या कोपऱ्यावर मुसलमानांची काही घरं होती. त्यांच्यावर हल्ला करायला, घरं जाळायला काही लोक आले होते; पण वस्तीतले वसंत सकट त्यांना आडवे गेले. वसंत सकटांची हिम्मत पाहून वस्तीतले आणखी काही लोक गेले. त्यामुळे मुसलमानांची घरं बचावली. १९७३ला अशीच दंगल झाली होती. वस्तीतल्या मुसलमानांना मारण्यासाठी बाहेरून लोक आले होते; पण वस्तीतल्या मातंग समाजाच्या लोकांनी त्यांना परतवून लावलं होतं.”

वंचितांच्या इतिहासाची साक्ष देणारी अशी अनेक ठिकाणं पुण्यात आहेत. शोधाशोध केली तर स्थानीय इतिहासाचे आजवर समोर न आलेले कितीतरी पैलू प्रकाशात येतील.

(पुण्यभूषण, दिवाळी २०२३च्या अंकातून साभार.)

संदर्भ -

१. दलित समाज, एलिनॉर झेलियट, शहर पुणे, खंड- १.

२. अस्ताव्यस्त पुणे, मीरा बापट, शहर पुणे, खंड- १.

३. पुणे शहराचा ज्ञानकोश, शां.ग. महाजन, खंड - १.

४. पुणे शहर नगररचना, मा.प. मंगुडकर.

५. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाड़्मय, खंड- २.

६. महात्मा फुले गौरव ग्रंथ, संपादक हरि नरके.

७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड - १८, भाग १ आणि २.

८. आंबेडकर चळवळीतील मातंग समाज, डॉ. सोमनाथ कदम.

९. virashinde.com / यशवंतराव चव्हाण सेंटर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समग्र साहित्य.

१०. आंबेडकरवादी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश राक्षे, पुण्याचे माजी उपमहापौर हिरामण शिंदे, स्थानिक रहिवासी रामदास घाडगे आणि रोहिदास रोकडे यांच्याशी केलेल्या चर्चा.

तुषार कलबुर्गी | tusharkalburgi31@gmail.com

तुषार कलबुर्गी हा युनिक स्कूल ऑफ जर्नलिजममध्ये तयार झालेला पत्रकार आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results