आम्ही कोण?
अनुभव 

सदाशिव पेठेतील दिवस

  • हेमंत देवस्थळी
  • 06.06.25
  • वाचनवेळ 17 मि.
sadashiv peth

मी वयाची पहिली तीस-एक वर्षं सदाशिव पेठेत घालवली. आज साठी-सत्तरीच्या घरातल्या माझ्यासारख्या कुणीही तिथे फेरफटका मारला तर पेठेचं आजचं रूप पाहून तो काहीसा चक्रावल्याशिवाय राहत नाही. तसं पहिलं तर टोलेजंग इमारती वगैरे झाल्या आहेत असं काही नाही. पण अनेक जुन्या वास्तूंच्या जागेवर आज नव्या इमारती उभ्या आहेत. पूर्वीचे वाडे आता जवळ जवळ नसल्यात जमा आहेत. मी त्या बाजूला गेलो, की ‘आपल्या तेव्हाच्या घराजवळचा चौक हा, का तो?’ असा गोंधळ माझ्या मनात निश्चित उडतो. मग जवळच एखाद्या टिकून राहिलेल्या खुणेच्या आधाराने आपण कुठे आहोत ते कळतं.

आम्ही राहत असलेला वाडदेकर वाडा केव्हा बांधला असेल माहिती नाही. एक जुना व दुसरा नवा असे त्याचे दोन भाग होते. नवा म्हणजे तुलनेने. माझं लहानपण वाड्याच्या या नव्या भागात गेलेलं. दोन्ही भागांमध्ये वाडा संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण असलेलं अंगण होतं. जुन्या भागातील भिंती मातीच्या, जाड, तर नवीन भागातील भिंती बहुधा एकविटी पण सिमेंटचं प्लास्टर असलेल्या होत्या. नव्या भागाचं बांधकाम सुबक व भक्कम. पण खोल्या आठ बाय दहा फुटांच्या, जेमतेम हातपाय पसरता येतील या आकाराच्या. वाड्याच्या पुढ्यात एक चार फुटी रुंद बोळ, तिथे आम्ही उन्हाळ्यात झोपत असू. जुन्या भागातील खोल्या प्रशस्त, पण त्यांना आकार ना उकार. एका बिऱ्हाडाच्या बाहेरच्या खोलीत मध्येच खांब, तर दुसऱ्या बिऱ्हाडात स्वयंपाकघरात जाण्यासाठी तीन पायऱ्या उतरून जावं लागायचं. रेल्वेच्या डब्यासारख्या एका पाठोमाग एक अशा खोल्या. त्यातील एखादी एकदम छोटी, तर दुसरी एकदम मोठी. मधली एखादी एकदम अंधारी. बहुधा सर्व वाड्यांच्या रचना अशाच अडनिडी होत्या. त्यामुळे असं वाटायचं, की घरमालक जशी जागा मिळेल तशी कुठेही, कशीही खोली काढत असावेत. कुठचा जिना कुठे जाईल याचाही अंदाज येत नसे.

वाड्यात प्रायव्हसी शून्यात जमा असे. बिऱ्हाडकरूंची दारं दिवसा कधी बंद नसत. मधल्या अंगणामुळे एका घराच्या खिडकीतून दुसऱ्या घरातील सर्व दिसत असे. त्यात कोणाला काही विचित्र वाटत नसे. जेवणाच्या वेळी शेजारची मंडळी गप्पा मारायला येत. त्यातही कोणाला वावडं वाटायचं नाही. जेवताना असं कोणी गप्पा मारायला आलं, की मला संकोचल्यासारखं व्हायचं. पण त्याला ‘जा’ असं सांगताही येत नसे.

संडास-बाथरूम सगळीकडे कॉमन. त्यावेळी फ्लॅट्समध्ये कोणाचीच मित्रमंडळी व नातेवाईक राहत नसत. त्यामुळे स्वतंत्र संडास-बाथरूम असतात ते केवळ बंगल्यातच, असंच आम्हा मुलांना वाटे. सर्व वाड्यांमध्ये हीच पद्धत असल्याने बिऱ्हाडकरूंना त्यात गैरसोय वाटायची नाही. संडास-बाथरुमच्या बाहेर रांग लावून उभं राहणं हा नित्य दिनक्रमाचाच भाग असे. बाथरूमच्या समोर बंब असे. त्यातील पाणी तापलं की आंघोळीला निघायचं.

वाडदेकर वाडा सदाशिव पेठेतील सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात, खास भागात मध्यावर उभा होता. पुण्यातील दोन प्रसिद्ध रस्ते टिळक रोड आणि लक्ष्मी रोड अगदी सरळ रेषेत जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध एका चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंत तो पसरलेला होता. इतका ब्राह्मणी रस्ता त्यावेळी पुण्यात क्वचितच असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकाला एक लागून एक ब्राह्मण मालकांचे वाडे होते. केळकर, नाटेकर, नूलकर, परांजपे, सहस्रबुद्धे, नातू, गोरे, आपटे, कानिटकर, राजगुरू, करंदीकर, नंदे, कोल्हटकर अशा सर्व ब्राह्मण वाड्यांनी वाडदेकर वाडा वेढला होता. एवढंच काय, या रस्त्यावरची चाळही पेंडसे चाळ म्हणूनच प्रसिद्ध होती. रस्त्याच्या एका टोकाला जुन्या शैलीतलं टिळक स्मारक मंदिर, तर दुसऱ्या टोकाला इतिहासजमा झालेलं भानुविलास थेटर. (इथे राजा गोसावी ते स्वत: हीरो असलेल्या ‘लाखाची गोष्ट’ सिनेमाची तिकिटं स्वत: विकत असत अशी पेट आख्यायिका अनेक वेळा ऐकलेली.) या दोन टोकांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा काहीशा अंतरावर पुण्याची सांस्कृतिक ओळख देणाऱ्या अनेक वास्तू उभ्या होत्या; एखादा अपवाद सोडता त्या आजही टिकून आहेत. सर परशुरामभाऊ कॉलेज, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र मंडळ, गीता धर्म मंडळ, भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिर, पेरूगेट पोलिस चौकी, वेदशास्त्रोत्तेजक सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी मंदिर, खुन्या मुरलीधर मंदिर, ब्राह्मण कार्यालय, ज्ञान प्रबोधिनी, भावे स्कूल, चित्रशाळा प्रेस, गोखले हॉल आणि इतर अनेक स्थळं वाडदेकर वाड्यापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर होती.

सगळ्या वाड्यांमधील बिऱ्हाडकरूही ब्राह्मणच असत हे वेगळं सांगायला नको. आज जवळ जवळ सगळीकडेच नामशेष झालेलं नऊवारी पातळ म्हणजे माझ्या आईच्या पिढीतील ब्राह्मण स्त्रियांची ठरलेली वेशभूषा होती. पुरुष मंडळी बहुधा धोतर, कोट व काळी किंवा तपकिरी टोपी घालत. माझ्या आईच्या मैत्रिणी व वडिलांचे ऑफिसमधील मित्र यांच्यापैकी कुणीच यापेक्षा वेगळ्या कपड्यांमध्ये पाहिल्याचं मला आठवत नाही. साधारण नव्वदीच्या दशकात त्या पिढीसोबत ब्राह्मणमंडळींचा हा पेहराव सुद्धा अस्तंगत झाला असावा.

पेठेत राहणाऱ्या सर्वांच्या नित्य गरजा राहण्याच्या जागेपासून दोन-चार किलोमीटरच्या आत पुऱ्या होत असत. अगदी प्रेमाची गरजही. अनेकांची प्रेमप्रकरणं कानावर येत. सदाशिव पेठेतील ग्रेपव्हाईनचा तो अपरिहार्य भाग होता. नदीपलिकडे जाणं जवळ जवळ नसेच. नातेवाईक, मित्रमंडळीही सर्व नदीच्या अलीकडेच असत. नदीपलिकडील वर्ग सधन समजला जाई आणि ते खरंही होतं. त्यामुळे त्या भागाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली होती, आजही आहे. तरुण मंडळी ‘आज डेक्कनवर फिरायला गेलो होतो’ हे मोठ्या रुबाबाने सांगत. कारण फिरण्याची चैन त्यापलीकडे गेली नव्हती.

खाण्याची चैन काय होत असेल ती घरापुरती मर्यादित होती. पुरुष मंडळींचं चहा, वडा, खरवस खाण्यासाठी जनसेवा, स्वीट होम, बादशाही, संतोष भुवन इकडे जाणं व्हायचं. पण सर्व कुटुंबाचं हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणं पाहायला मिळत नव्हतं. आज ज्या पेरूगेट रस्त्यावर तीन-चार नॉनव्हेजची दुकानं दिसतात त्या प्रकारचं तिथे एकही हॉटेल तेव्हा नव्हतं. कदाचित ब्राह्मणच मांसाहार करू लागल्याने त्यांची सदाशिव पेठेतील संख्या वाढली असावी. आइसक्रीमचंही तेच होतं. वर्षभर मिळणारे आइसक्रीमचे फॅमिली पॅक्स कोणाला माहीत नव्हते. त्यामुळे आइसक्रीमचं दर्शन केवळ उन्हाळ्यातच होई. वाड्यात कोणाच्या तरी घरात पॉट भाड्याने आणून तो आळीपाळीने फिरवण्याचा एक जंगी कार्यक्रम उन्हाळ्यात एकदा होत असे. तो सगळा दिवसच वेगळा जाई.

५० च्या दशकाच्या अखेरच्या काळात रेडिओ दिसू लागले होते. पण कॉमन नव्हते. रेडिओवरील करमणुकीची परमावधी म्हणजे बुधवारच्या रात्रीचा ‘बिनाका गीतमाला’ हा प्रोग्राम. वाड्यात एकाच घरात रेडिओ होता. तिथे सर्वांनी त्यासाठी बुधवारी रात्री एकत्र यायचं हा सर्व वाड्याचा नित्य सामूहिक कार्यक्रम असे. त्या वेळचा अमिन सायानी यांचा आवाज आजही कानात घर करून आहे.

टेपरेकॉर्डर्स नसल्याने ती गाणी नंतर पाहिजे त्या वेळी ऐकण्याची सोय नव्हती. काही दुकानदारांनी शक्कल लढवून चार आणे घेऊन गिऱ्हाइकाला आपलं आवडतं गाणं ऐकण्याची सोय केली होती. असं एक दुकान एस पी कॉलेजच्या समोर होतं. तिथे मी अशी गाणी ऐकायला मित्रांबरोबर जात असे. पेरूगेट रस्त्यावर फ्रेण्ड्स म्युझिक सेंटर नावाचं एक प्रसिद्ध दुकान होतं. त्याच्या मालकांनी तर दुकानात एक मेझॅनीन फ्लोअर तयार करून त्यात भारतीय बैठक करून शास्त्रीय गाणं ऐकायची पण सोय केली होती. हे केवळ सदाशिव पेठेतच होऊ शकत होतं.

सर्वांचं वावरणं, हसणं, खिदळणं, रडणं, चिडणं, मजा करणं, वाद घालणं लकडी पुल, पर्वती, मंडई, शनिवार वाडा या परिघापलीकडे कधी गेलं नाही. (पुढे वाडिया कॉलेजला नोकरी लागल्यानंतर मला पूर्व पुण्याचं प्रथमच दर्शन झालं.)

वृत्तीने सनातनी असले तरी वाडदेकर वाड्यातील बिऱ्हाडकरू कोणी संघात जात असल्याचं आठवत नाही. त्यातील एकजण तर ४२ च्या चळवळीत तुरुंगात जाऊन आलेले होते. असं असलं तरी ही मंडळी मतदान बहुदा काँग्रेसच्या विरोधात करत असावीत. काँग्रेसमध्ये ब्राह्मणांना किंमत नव्हती म्हणून काँग्रेसवर ती खार खाऊन असत.

आमचे एक शेजारी सावरकर भक्त होते. त्यांनी सावरकरांच्या साहित्याचे सर्व व्हॉल्युम्स विकत घेतले होते. त्यांच्याकडून घेऊन मी ते वाचत असे. सावरकरांचं ‘काळे पाणी’ वाचून त्यांच्याबद्दल मनात खोलवर आदर निर्माण झाला. त्यांचं १८५७ च्या युद्धावरील पुस्तक गाजलेलं होतं. त्या व्हॉल्युमच्या सुरवातीला असलेल्या सुटातील फोटोकडे मी अतिशय आदराने पाहत असे. त्यावेळी मी सातवी-आठवीत असेन. माहीत नाही का, पण आदराचं रूपांतर कधी भक्तीत झालं नाही. सावरकरांचा विज्ञानवाद पटे, पण त्याची त्यांच्या हिंदुत्ववादाशी कशी सांगड घालायची ते कळत नसे. विजयादशमीच्या पहाटे संघाच्या स्वयंसेवकांची परेड दारावरून जाई. त्यांचं एका लयीत शिस्तबद्ध चालणं, एकसुरात देशभक्ती गीत म्हणणं याने हरखायला होई. पण तरीही आपण शाखेत जावं असं कधी वाटलं नाही. घरी तसं वातावरणही नव्हतं. नंतरच्या काळात बुद्धीलाही सावरकरांच्या विचारातील काही गोष्टी पटेनाशा झाल्या. विशेषत: त्यांची गांधी-नेहरुंवरची टीका मला अवघडून टाकत असे. असं असलं तरी सावरकरांबद्दल आदर वाटे, आजही वाटतो.

वाडदेकर वाड्याचे मालक तात्या अतिशय भारदस्त. जोधपूरमधील कोणत्यातरी शाळेमधून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. चेहरा रागीट. तात्यांना हसताना मी कधी पाहिलं नाही. वाड्यामध्ये सर्वजण त्यांना बिचकून असत. पण मला वाटतं, स्वभावाने ते मृदू होते. कधी आम्हा भाडेकरूंशी रागाने बोलताना मी त्यांना पाहिलं नाही. वाड्याच्या जुन्या भागात पहिल्या मजल्यावर ते एकटेच राहत. तिथे त्यांचा प्रशस्त हॉल होता. आज हे विचित्र वाटेल, पण तात्या हा हॉल भाडेकरूंना डोहाळजेवण, बारसं अशा घरगुती कार्यक्रमांसाठी वापरायला देत असत. कार्यक्रमाच्या वेळी तात्या त्यांच्या आतल्या खोलीत शांत बसत. बाहेरच्या खोलीत कधी डोकावत पण नसत.

आमच्या शेजारच्या दोन-तीन सोवळ्या बायका आठवतात. लाल लुगडं आणि डोक्याचे केस कापलेले. तात्यांच्या घराच्या छताला लागून एक माळा होता तिथे त्यातल्या एक बाई, काशीताई, राहत असत. तिथे मी केव्हातरी एकदा गेल्याचं आठवतं. सर्वत्र अडगळीचं राज्य. शेवटच्या काळात त्या भ्रमिष्ट झाल्या. त्यात त्या नंतर आजारी पडल्या. तेव्हा वाड्यातल्या लोकांनी त्यांची शुश्रुषा केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवलं. तिथेच त्या गेल्या. काशीताईंचं करायला चार माणसं तरी होती. नाहीतर अशा सोवळ्या बायकांचे म्हातारपणी काय हाल होत असतील? आज ही क्रूर प्रथा हिंदू समाजात नाही याचं मनाला खूप हायसं वाटतं व त्यावेळच्या समाजसुधारकांबद्दल मनात कृतज्ञता दाटते. अशा घटनांमुळे अनिष्ट परंपरांच्या विरोधात जाण्यासाठी माझं मन नकळत तयार होत होतं.

मी पुण्याच्या अशा ठिकाणी राहत होतो, की जिथे आजूबाजूला अनेक विषयांवर सतत व्याख्यानं, चर्चा होत असत. हातात मोबाइल असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे घराच्या बाहेर पडणं सक्तीने होत असे. त्यामुळे मला वयाच्या पंधरा-सोळा वर्षापासूनच व्याख्यानांना जाऊन बसायचा नाद लागला होता. या काळात सदाशिव पेठेने सावरकर,अत्रे, नानासाहेब, एसेम, गं. बा.सरदार, दत्तो वामन पोतदार, हॉटसन गोगटे, नाथ पै, पुलं, पुग (सहस्रबुद्धे), (काकासाहेब) गाडगीळ, नारळीकर, अवचट असे एक ना अनेक वक्ते ऐकवले. त्या वेळच्या अनेक व्याख्यात्यांच्या बोलण्यातून पारतंत्र्यातील दिवस, स्वातंत्र्य चळवळ डोकावत असे. त्यामुळे त्या भाषणांना वेगळी धार होती. त्यांना ऐकतानाही आदर वाटे. सर्व प्रकारची मतं, विचार कानावर पडत असत. त्यामुळे असेल कदाचित, विचारांमध्ये मोकळेपणा येत गेला. पुढे कॉलेजातील अधिक पद्धतशीर वाचनामुळे कोणत्याही प्रश्नाकडे पाहताना त्याच्या सर्व बाजू तपासल्या पाहिजेत हे पटायला लागलं. त्यामुळेच बहुधा सदाशिव पेठेच्या परंपरागत वातावरणात राहूनही विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या.

त्या काळात माझ्या आयुष्यात आईचा रोल महत्त्वाचा होता. तिच्या वागण्याचा माझ्या मनावर नकळत परिणाम होत असला पाहिजे. तिच्या असण्यामुळे माझ्यातला माणूस घडत होता. त्यासाठी तिने कधी मला उपदेश केला नाही, का माझ्याकडून काही पाठ करून घेतलं नाही. सदाशिव पेठेतील तिच्या ५० वर्षांच्या संसारामध्ये त्या तीन लहान खोल्यांमध्ये कमीतकमी सहा-सात माणसं कायम असायची. तरीही आमच्या कोणांमध्ये कधी थोडे देखील वाद झाल्याचं आठवत नाही. घरातल्या सुना आईच्या मैत्रिणीच होत्या. घरातलं सौहार्द तिच्यामुळेच टिकलं होतं. आयुष्यात विवेक कसा सांभाळायचा हे मी तिच्याकडून शिकलो.

आम्ही पाच भावंडं होतो. त्यातील माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनीच मोठा असलेला भाऊ -विलास- अवघा अठरा वर्षांचा असताना कॅन्सरने गेला. त्याला आमच्या फॅमिली डॉक्टरचेच उपचार सुरू होते.

फॅमिली डॉक्टरांची परंपरा नाहीशी झाल्याची खंत आपण अनेकदा ऐकतो. त्यांच्या मनात पेशंट्सबद्दल कदाचित अधिक जिव्हाळा असेल. पेशंट्सचं म्हणणं ऐकण्यासाठी ते अधिक वेळही देत असतील. पण स्पेशलिस्ट डॉक्टरांमुळे त्यांच्या मनात कॉम्प्लेक्स निर्माण झाला असावा. त्यामुळे त्यांच्यातील दुराग्रह वाढत गेला. त्या काळात आमच्या अवतीभवति बोलबाला असलेले सर्व डॉक्टर फॅमिली डॉक्टर्सच होते. पण जशा ज्ञानाच्या कक्षा वाढत गेल्या तसं स्पेशलिस्ट डॉक्टरांचं येणं अटळ झालं. माहीत नाही, पण त्यांच्याशी जमवून घेणं बहुधा फॅमिली डॉक्टर्सना अवघड झालं असावं.

माझी पत्नी, माधुरी, गेल्यानंतर एकटेपणात माणसाच्या मनाची कशी घुसमट होते ते मला कळू लागलं. त्या घुसमटीपोटीच ‘आनंदयात्रे’चा जन्म झाला. त्या छताखाली एकट्या लोकांना एकत्र करू लागलो, त्यांना समजून घेऊ लागलो. आता ‘आनंदयात्रा’ खूप मोठी झालीय. त्यावरून लक्षात येतंय, की समाजाला अशा कामाची किती गरज असते. पण वडील, विलास गेल्यानंतर आईचं मन समजून घेण्याचा मी कधी विचार केला नाही. तिचं एकटेपण मी गृहीत धरलं. पुढे आम्हा भावंडांची लग्नं झाली. घरात नातवंडं आली. त्यांच्यात आपलं एकटेपण कमी करण्याचा मार्ग आईला सापडला असावा. असो.

कॉलेजमधून बाहेर पडलं की नोकरी करणं हे माझ्या अवतीभवतीच्या विशीतल्या तरुणांचं ठरून गेलं होतं. त्यातून ती सरकारी नोकरी असेल तर अधिकच चांगलं. माझ्या वयाचे तरुण त्यावेळी धंदा वगैरे सुरू करण्याच्या भानगडीत पडल्याचं मला आठवत नाही. सर्वांचेच वडील सरकारी नोकर किंवा कंपन्यांमध्ये छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणारे. धंद्याला लागणारं भांडवल आपल्याला पडवणार नाही ही कल्पना मनात निश्चित झालेली. पण त्याहीपेक्षा धंदा सुरू करण्यासाठी लागणारी जिद्द मनात नव्हती. तशा जिद्दीचा, संस्कारांचा कुणाला वारसाही नव्हता. असलाच तर तो पुसून टाकून तरुण पिढी नोकरीच्याच मागे अधिक. आजूबाजूला धंद्याबद्दल फारसं कोणी बोलत नसे. पण बहुतेक घरांना शिक्षणाचा वारसा असल्याने मुलांच्या अभ्यासातल्या हुशारीचं कौतुक होई. पण तो वारसा ज्यांच्या नशिबी नव्हता त्यांच्याबद्दल कुणी समजुतीच्या स्वरात बोलत नसे. मागल्या जन्मीचं पाप अशी त्याची बोळवण केली जायची.

७२ साली मी एम. ए. झाल्यानंतर नोकरीचा शोध सुरू केला. आमच्या वाड्यामागेच काही अंतरावर नूलकर वाडा होता. त्याचे मालक वसंत नूलकर वाडिया कॉलेजचे प्राचार्य आहेत असं कळल्याने त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली व दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये भेटायला सांगितलं. तिथे त्यांनी मला पार्ट टाइम ट्यूटर म्हणून घेतलं.

मला आठवड्यातून तीन लेक्चर्स होती. उरलेला वेळ ट्यूटोरियल्स तपासण्यात जात असे. वर्षभरात दोनएक हजार रुपये मानधन मिळायचं. माझं शाळेतलं शिक्षण मराठीतून झालं होतं. कॉलेजमध्ये निम्यापेक्षा अधिक मुलं कॅम्पमधील इंग्लिश मिडियमच्या शाळेतील होती. त्यामुळे अशा ठिकाणी आपला टिकाव लागेल का अशी मनात भीती होती. पण त्या अमराठी वातावरणात मी हळूहळू रुळून गेलो.

कॉलेजला मी दररोज सायकलने जायचो. शनिवार वाडा, कुंभार वाडा, राजा बहादूर मिल व रुबी हॉल अशा रस्त्याने साधारण अर्ध्या पाऊण तासात मी कॉलेजला पोचत असे. लेक्चर सकाळी साडेसातला असे. पुढे कधी बस, कधी मित्राच्या स्कूटरवरुन यायचो. नंतर पैसे साठल्यावर ७५ च्या सुमारास लुना घेतली.

साधारण १९७० मध्ये आमच्या वाड्याचे दोन भाग एका मोठ्या भिंतीने तटबंद करण्यात आले. वाड्याचा ३३८ हा क्रमांक आता ३३८-अ आणि ३३८-ब असा विभागला गेला. त्यामुळे वाड्याचं अंगण गेलं. मुलांचे खेळ संपले. एकमेकांच्या खिडक्यांमधून हाका मारणं, चोरून पाहणं बंद झालं. दोन्ही भागांमधील लोकांना एकमेकांकडे अंगणातून जे सहजपणे जाता येत होतं ते आता रस्त्यावरून जाणं सुरू झालं. अंगण गेल्यामुळे आमच्या घराच्या खिडक्यांमधून जी काही थोडी हवा येत होती ती बंद झाली. खिडक्यांसमोर विटाविटांची प्लास्टर नसलेली एक प्रचंड भिंत निर्माण झाली. मध्यंतरी तात्या वारले होते. नंतर कळलं त्यांचे धाकटे भाऊ आता तिथे राहायला येणार होते. त्याची ही सर्व तयारी चालू होती.

तात्यांचे भाऊ डॉक्टर होते. डॉ. वाडदेकर. एम.डी.सारखी पदवी असून त्यांनी तारुण्यातच कुष्ठकार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला व मुंबईला चाललेली चांगली प्रॅक्टिस बंद करून ते वर्ध्याला गेले. तेथील गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशनमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. १९७० च्या सुमारास ते फाऊंडेशनचे संचालक म्हणून निवृत्त झाले होते आणि आता पुण्यात स्थायिक होणार होते.

डॉक्टरांनी कुष्ठरोग्यांच्या वसाहतींविरुद्ध मोहीम उघडली व कुष्ठरोग्यांना इतर रोग्यांप्रमाणेच वागवलं पाहिजे या प्रचाराचा तडाखा लावला. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हा त्यांचा अप्रोच मान्य केला. त्यामुळे कुष्ठकार्याला जगभर एक वेगळंच परिमाण लाभलं. डॉक्टरांना लोक कुष्ठकार्याचे पितामह म्हणून ओळखू लागले. पुढे सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरवही केला.

खादीचा परीटघडीचा पायजमा आणि कोपरापर्यंत गुंडाळलेल्या बाह्यांचा पांढरा नेहरू शर्ट या साध्या वेषातही डॉक्टरांचं उंचपुरं व्यक्तिमत्व उठून दिसे. बी.ए. झाल्यानंतर पेढे देण्यासाठी मी त्यांच्याकडे प्रथम गेलो होतो. मग काहीना काही कारण काढून त्यांच्याकडे जाऊ लागलो. त्यांच्याशी अनेक गोष्टींवर मी चर्चा करत असे. त्यातून त्यांच्या माझ्या वेव्हलेंग्थस् जुळत गेल्या. नंतर कळलं, की कामात अडथळा नको म्हणून डॉक्टरांनी त्यांचा संसार ते व प्रमिलाताई यांच्यापुरताच मर्यादित ठेवला होता.

त्यांचं समर्पित साधं जीवन, गरीबांबाबतची आस्था यामुळे मला त्यांच्याबद्दल आदर वाटे. एवढा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस. पण माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाल्यावर स्वत: वडिलांचा दंड हातात घेऊन त्यांना चालवायला आला. एका फिजिओथेरपिस्ट बाईंची सुद्धा व्यवस्था लावून दिली.

पंचविशीचा काळ कशावरती भारण्याचा असतो. त्याप्रमाणे मी डॉक्टरांवर भारून गेलो होतो. बाबा आमट्यांचं आनंदवनातील कामही त्यावेळी खूप चर्चेत असायचं. मनात आलं, आपणही कुष्ठकार्याला वाहून घ्यावं. त्यासाठी दोनदा वर्ध्यालाही जाऊन आलो. निवडही झाली होती. पण आर्थिकदृष्ट्या ते गणित जमत नव्हतं. शेवटी वाडिया कॉलेजमधील पक्की नोकरी न सोडण्याच्या मध्यमवर्गीय विचाराने उचल खाल्ली.

एखाद्या माणसाचं आपल्या आयुष्यात येणं हा बऱ्याचदा आपल्या नाशिबाचा भाग असतो. माझ्या बाबतीत डॉ. वाडदेकरांचं तसंच झालं. त्यांच्या बरोबरील चर्चा बरंच काही शिकवत असत. त्यातून काही सूत्रं मनावर कायमची ठसली. ‘जगात कोणीही त्याग करत नसतं, त्या बदली त्याला काहीतरी मिळत असतं’ हे त्यातलंच एक. पण काही गोष्टी खटकल्या. ‘कम्युनिझमने देशातील गरीबी कमी केली तर मी कम्युनिझमही स्वीकारेन’ असंही ते मला एकदा म्हणाले होते. गांधीप्रेमी माणसाकडून हे ऐकताना आश्चर्य वाटलं होतं.

नंतरच्या काळात डॉक्टर व त्यांच्या पत्नी प्रमिला पुणे विद्यार्थी गृहाच्या शतायु भवनमध्ये राहायला गेल्या. जाताना आठवण म्हणून ते एक लहानसं स्टीलचं स्वत:चं वापरतं ताट मला देऊन गेले. शतायु भवन नंतर काही काळ ते आपला पुतण्या डॉ. अशोककडे राहत असत. एकदा मी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो. तिथे थोड्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. १९९६ मध्ये ते गेल्याचं कळलं. त्यानंतर काही दिवसांत प्रमिलाताईही गेल्या. त्यांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना फार वेळा भेटू शकलो नाही याची मनात चुटपुट लागून राहिली. पण त्यांच्यावर मी काही लेख प्रसिद्ध केले होते, त्याचं समाधान मनात बाळगून आहे.

१९७८ साली माझं लग्न झालं. आमच्या वाड्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर राहणाऱ्या माधुरी जोशी या मुलीचं स्थळ मला आलं होतं. पण आमची कधी दृष्टादृष्ट झाली नव्हती. आमच्या पहिल्या भेटीतच तिच्याशी सूर जुळल्यासारखे वाटले. मी लग्नाला होकार दिला.

तरी आम्ही दोन वेगवेगळ्या उपजातीतले, म्हणून माधुरीच्या घरून होकार यायला बराच वेळ लागला. मी जातपात मानत नव्हतो. पण उपजातींमध्येही इतकं बारकाईने पाहिलं जात असेल याची तेव्हा कल्पना नव्हती. आम्हा दोघांच्या घरात परंपरा, कुळधर्म इत्यादीच्या बाबतीत वेगवेगळं वातावरण होतं. माधुरीचं मोठं कुटुंब होतं. तिच्या माहेरी मोठं, प्रशस्त, स्वतंत्र घर होतं. कोकणातील वाडीप्रमाणे. पुढे अंगण व त्यानंतर तीन-चार आंब्याची झाडं. मागे मोठी बाग. गजबजलेल्या सदाशिव पेठेत त्यावेळेस अशी काही प्रशस्त बेटं होती. (आता तिथे फ्लॅट्सचं राज्य आहे.)

सदाशिव पेठ सोडून आता चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. त्या वास्तव्यातील चांगल्या-वाईट अनुभवांचं, विचारांचं संचित मनाच्या तळाशी कुठेतरी असतंच. शिक्षण व प्रयत्नांची जोड असेल तर माफक अर्थप्राप्ती आणि मर्यादित सुखसोयीतही माणसाला बऱ्यापैकी समाधानाचं व आनंदी जीवन जगता येतं हा सदाशिव पेठेचा सर्वात महत्त्वाचा संस्कार होता.

पण सामायिक संस्कृतीने बांधलेले लोक एकत्र राहू लागले की आपोआपच ते मनाची कवाडं बंद करून त्या संस्कृतीचं गुणगान करू लागतात हेही खरं. सदाशिव पेठेनेही जातीव्यवस्थेतील उतरंडीचं समर्थन करणारी मानसिकता घट्ट केली. त्याला आजूबाजूच्या सांस्कृतिक संस्थांनी कधी विरोध दर्शवला नाही. कारण त्या संस्था चालवणारे सवर्णच होते. शेवटी आयुष्यात प्रत्येकाला चांगल्या वाईटाची निवड करावी लागतेच. ती मीही केली. पण माझ्या घडणीत एकंदरीत समाजाला पुढे नेणारे व माणुसकीला जवळ करणारे विचार या काळात रुजले व पुढे ते पक्के होत गेले.

त्या वयात विश्रामबाग वाड्याच्या शासकीय ग्रंथालयात सायकल मारत साने गुरुजींची पुस्तकं वाचायला जात असे. त्यावेळेस गुरुजी मनावर ठसले ते कायमचे. त्यामुळे धर्म, जात, दिसणं, बोलणं, पैसा या पलीकडे जाणारं माणसा-माणसामधलं नातं इतर कशापेक्षाही महत्वाचं वाटू लागलं. ती शिदोरी पुढे आयुष्यात अनेक प्रसंगांमध्ये कामाला आली.

आज पूर्वीच्या वाडदेकर वाड्याच्या ठिकाणी गेलं तर एक बकाल, अर्धवट स्थितीत पडलेली इमारत दिसते. ज्या बिल्डरने हे बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं ते पूर्ण करायला त्याला जमलं नाही. नवीन चांगल्या घरात जाण्याची वाड्यातील सर्व बिऱ्हाडकरूंची स्वप्नं धुळीस मिळाली.

लग्नानंतर चार वर्षांनी आम्ही सदाशिव पेठ सोडली व नदीपलीकडे पण नदीला लागून असलेल्या कर्वे रोड परिसरात राहायला गेलो. चार पैसे जमल्यावर वाडा संस्कृतीला राम राम करून नदीपलिकडील फ्लॅट संस्कृतीत पदार्पण करणाऱ्यांचा तो ऐंशीच्या दशकातील काळ होता. त्या बँडवॅगनमध्ये मी पण सामील झालो. पण अजून पश्चिमेकडे असलेला प्रभात रोडचा परिसर या मंडळींना अप्राप्यच राहिला.

आता कधी पेठेतून गेलो तर पूर्वीच्या आठवणींचे तरंग मनात परत उमटू लागल्याशिवाय राहात नाहीत. 

हेमंत देवस्थळी | hemantdevasthali36@gmail.com

डॉ हेमंत देवस्थळी नेस वाडिया कॉमर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आहेत. ते 'आनंदयात्रा स्वमदत गटा'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 13

माया पंडित01.07.25
खूप सुंदर लिखाण.

Anand Rajeshirke 26.06.25
सुंदर लेख. Mi sudha टिळक रोड वर महाराष्ट्र मंडळाच्या समोर चाळीत 30 वर्षे राहिल्याने बालपणीच्या सुंदर आठवणीनी हळवा झालो.

Ashok Wardekar15.06.25
मी अशोक वाडदेकर मी ह्या वाड्यात एक वर्ष होतो १९५४ मध्ये मला जेव्हा फर्स्ट इयर फर्गसन कॉलेजला प्रवेश ला प्रवेश मिळाला तेव्हां मी त्या वाड्यात जिथे तात्या काका राहत होते तिथेच मी माझ्या आई बरोबर राहायला आलो त्यावेळची गोष्ट आहे मी पटण्याहून आलो होतो आणि मराठी चा गंध हि नव्हता तेव्हां मी एकदा धावत धावत आलो व सगळ्यांना सांगितले दूध फाटले मग बोडस म्हणाले मग शिवून टाक कारण दूध मराठी भाषेत नासायच फाटणे हे हिंदी भाषेतून आलेला शब्द जहन धूंद फटता था तेव्हां देवस्थळी समोर पाहल्याच ब्लॉक मध्ये राहायचे हेमंत तेव्हां फारच लहान होता त्यांचा मोठ भाऊ आणि मोहन वैद्य हे माझे मित्र होते मी सगळ्या मुलांना गोळा करून तुम्हाला समुद्र दाखवतो म्हणून काळया हौदला घेऊन गेलो त्यांनी माझे ऐकले कारण मी समुद्र पाहिला होता पटण्याहून येताना मी प्रथम बॉम्बेला आलो व समुद्र पाहिला होता हे आमचे ज्ञान आणि त्या वेळचा विश्वास

Sadashivkulkarni11.06.25
सुंदर लेख lekh पुन्हापुन्हा वाचावासा vatanara जुन्या punya बदल वाचून मन भरून आले

Ashok Wardekar08.06.25
I will have write in English as I grew up in Bihar so my Marathi is poor I recall Devsthali's very well Hemant was too young at the time when I was in wada I stayed there only for one year as after that got accommodated in Ferguson college hostel. For me dudh phataych nasat navht. I was always curious about one mori left unoccupied as called as Vitalshi mori when we were standing in line with a tumrel in hand in the morning. Good old days I was the laughing stock of wada due to poor marathi command. But learnt a lot during the short stay how to live together and trust each other to the point that I took younger children of wada to show them sea to Kala Haud as I had seen sea because I came from Mumbai or Bombay while coming to Pune from Patna good old days of trust and cooperation. ASW

SHASHIKANT ANANT KULKARNI 07.06.25
1950 जन्मापासून मी सदाशिव आजपवितो येथेच. शाळा गोपाळ हायस्कूल, म्हणजे पुढच्याच चौकात. शनीपार, फुलेमंडई व विश्रामबागवाडा शासकीय ग्रंथालय व शाळा हेच आयुष्य. सायकल चालवायला मिळणे म्हणजे सर्वांनंद. आज चारचाकीला सायकलची सर नाही. असो.

Shivaji Jadhav07.06.25
Sir अतिसूदंर लेख आहे वाचुन आपलेबददल आदरच वाढलाय मनापासून धन्यवाद

Subhash Devare 07.06.25
Very well written article by my friend Hemant.I have visited his house several times but did not know much about the various dimensions of life in his Wada.I also lived in Sadashiv Peth for 10 years and can relate to the rich culture of the area.Thanks for the nostalgic experience.

Vasudha Joshi07.06.25
Excellent!

सुवर्णा 06.06.25
खुप सुंदर लेख व त्या काळातील पुण्याच्या वाडा संस्कृतीचे वर्णन वाचून माझ्या सारख्या वाडा संस्कृती अजिबात माहीत नसलेल्या लोकांना डोळ्यांसमोर सर्व चित्र उभे राहिले. तसेच त्या काळात संस्कार मुद्दाम करावे लागत नसत परंतु आजूबाजूच्या वातावरणामुळे परिणाम आपोआपच कसे होत असतं हे फार महत्वाचं सांगितलं आहे. वाडा संस्कृती हे मला वाटतं पुण्याचे वैशिष्ट्य. धन्यवाद सर

Pravin Gupte06.06.25
Wow!!! Sir, I am touched by ur heartfelt article! on ur children hood Sadashiv Peth and ur memories on Vadadekar Wada were vividly described.ur love for the place and people shines through ur writting, thanks for sharing such a wonderful piece with me. Sir ! U have a gift of story telling and I am sure many will enjoy it.Sir keep writing & inspiring us.

सुप्रज्ञा जोशी 06.06.25
अगदी यथोचित वर्णन. माझे लहानपण पेठेत गेलं, तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला. पेठेतलं साधं आणि सरळ आयुष्य. लोकांकडे पैसा नव्हता पण संस्कार आणि माणुसकी होती. पुण्यातील वाडा संस्कृती जमिनीवर पाय ठेवून जगायला शिकवते. सर, खूप छान लिहिले आहे 🙏

अनिता आगाशे06.06.25
पुण्याचा सांस्कृतिक परिचय झाला तत्कालीन राहणीमान, जीवनमान, राजकीय, संस्कृती त्यातून होणारी जडणडण आणि मिळणारा माणसांचा सहवास एखाद्या माणसाचे जीवन घडण्यास हे घटक किती महत्वाचे होते दिसून येते आनंदयात्रीचा जन्म कसा झाला कळाले जो समाजाचा एक अविभाज्य घटक एकत्रितरित्या बांधून ठेवण्यास मदत करतो ओघवत्याशैलीत छान लिहिले आहे

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results