
सध्या दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाची धामधूम सुरू आहे. महात्मा फुले यांनाही अशाच एका संमेलनाचं आमंत्रण मिळालं होतं. त्यावेळी साहित्य संमेलनाबद्दलचं त्यांचं म्हणणं एका पत्राद्वारे कळवलं होतं. त्यात अशा संमेलनांबद्दल त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आजही कसे आणि किती लागू आहेत हे ताडून बघण्यासाठी ते पत्र इथे जसंच्या तसं देत आहोत.
“ग्रंथकारांच्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्या म्हणून” न्या. रानडे व लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी १८७८ सालच्या मे महिन्यात “मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी”ची स्थापना केली आणि ११ मे, १८७८ रोजी पुण्याला ग्रंथकारांचं पहिलं संमेलन भरवलं. २४ मे, १८८५ रोजी न्या. रानडे यांनी पुढाकार घेऊन ग्रंथकारांचं दुसरं संमेलन भरवलं. या संमेलनात सहभागी होण्यासंबंधी रानडे यांनी १३ मे, १८८५ रोजी महात्मा फुले यांना पत्र पाठवून विनंती केली होती. त्या पत्रास फुले यांनी पाठवलेलं उत्तर ‘ज्ञानोदय' नियतकालिकाने ११ जून, १८८५ च्या अंकात छापलं.
पत्र
वि. वि. आपलें ता. १३ माहे मजकूरचें कृपापत्रासोबतचें विनंतिपत्र पावलें. त्यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोठ्या दादा, ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयीं वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस तें हक्क त्यांच्यानें खुषीनें व उघडपणें देववत नाहींत, व चालू वर्तनावरून अनुमान केलें असतां पुढेंही देववणार नाहींत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनीं व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थांशीं आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाहीं. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगविण्याच्या इराद्यानें, आम्हांस दास केल्याचें प्रकर्ण त्यांनीं आपल्या बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमानें दडपलें. याविषयीं त्यांच्यांतील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हां शूद्रादि अतिशूद्रांस काय काय विपत्ति व त्रास सोसावे लागतात, हें त्यांच्यांतील ऊंटावरून शेळया वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानीं आगांतूक भाषण करणारांस कोठून कळणार? हें सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या उत्पादकांस जरी पक्कें माहीत होतें, तरी त्यांनीं फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळांच्या क्षणिक हिताकरितां डोळ्यावर कातडें ओढून त्याला इंग्रज सरकारांतून पेनशन मिळतांच तो पुनः अट्टल जात्याभिमानी, अट्टल मूर्तिपूजक, अट्टल सोंवळा बनून आपल्या शूद्रादि अतिशूद्रांस नीच मानूं लागला; व आपल्या पेनशनदात्या सरकारनें बनविलेल्या कागदाच्या नोटीससुद्धां सोवळ्यानें बोट लावण्याचा विटाळ मानूं लागला! अशीच कां शेवटीं ते सर्व आर्य ब्राह्मण या हतभाग्य देशाची उन्नति करणार! असो, आता यापुढें आम्ही शूद्र लोक, आम्हांस फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भूलणार नाहींत. सारांश, यांच्यांत मिसळल्यानें आम्हा शूद्रादि अति-शूद्रांचा कांहीं एक फायदा होणें नाहीं, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणें असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधूप्रीति काय केल्यानें वाढेल, त्याचें बीज शोधून काढावें व तें पुस्तकद्वारें प्रसिद्ध करावें. अशा वेळीं डोळे झांकणें उपयोगाचें नाहीं. या उपर त्या सर्वांची मर्जी. हें माझें अभिप्राया-दाखल छोटेखानी पत्र त्या मंडळीच्या विचाराकरितां तिजकडे पाठविण्याची मेहेरबानी करावी. साधे होके बुढ्ढेका येह पहिला सलाम लेव.
आपला दोस्त
जोतीराव गो. फुले
टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com
टीम युनिक फीचर्स पोर्टल