आम्ही कोण?
ले 

आयुकाची गोष्ट

  • जयंत नारळीकर
  • 20.05.25
  • वाचनवेळ 38 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
jayant narlikar

जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. खगोलशास्त्रात विद्यापीठ स्तरावर मूलभूत संशोधन व्हावं यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ‘आयुका' ही संस्था आज जगात नावाजली जाते. देशाचा मानबिंदू असणाऱ्या या संस्थेच्या जन्माची खुद्द नारळीकर यांनी सांगितलेली गोष्ट २०१४च्या पुण्यभूषण दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्प्रकाशित करत आहोत.

पुणे विद्यापीठात खगोलविज्ञानाचे सैद्धांतिक केंद्र असावे, ही कल्पना नरेश दधिच या माझ्या सहकारी मित्राची. १९८६ च्या सुमारास नरेशच्या मनात हे विचार येत होते तेव्हा मी मुंबईत टीआयएफआरमध्ये (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) होतो. नरेशने माझ्या वडिलांचा वारसा पुढे चालवून पुणे विद्यापीठात गुरुत्वाकर्षण आणि व्यापक सापेक्षतेवर अभ्याससत्रे, परिषदा, तसेच अभ्यागत शास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्प राबवले होते. विद्यापीठाच्याच अखत्यारीत ह्या विषयांवर एक स्वायत्त केंद्र असेल तर हे सर्व कार्यक्रम राबवणे अधिक सोपे होईल असे त्याला वाटले.

ह्या प्रस्तावित केंद्राला विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) अनुदान द्यावे यासाठी नरेशने यूजीसीचे अध्यक्ष यशपाल यांच्याशी संपर्क साधला. टीआयएफआर सोडल्यानंतर अंतराळ विभागात आणि त्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचा सचिव म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यावर यशपाल आता यूजीसीवर आपली छाप उमटवू पाहत होता. एकंदर मुक्त विचारसरणीचा हा गृहस्थ उच्च पदावर असून वागण्यात अनौपचारिकपणा पसंत करायचा. त्याच्याच सांगण्यावरून आम्ही सर्व मित्रमंडळी त्याला ‘यश' असे एकेरी संबोधायचो. प्रस्तावित केंद्रावर नरेशची नि त्याची दीर्घ चर्चा झाली. पुणे विद्यापीठाच्या आवारात अशा तऱ्हेच्या उपक्रमाला मदत करायला ‘यश'ची हरकत नव्हती. पण त्याने नरेशच्या प्रस्तावाला एक वेगळीच कलाटणी दिली. गोविंद स्वरूपचे जीएमआरटी केंद्र विद्यापीठात येत आहे, त्याचा फायदा घेण्याकरता यूजीसीचे एक मोठे राष्ट्रीय केंद्र विद्यापीठात का येऊ नये? ही कल्पना नरेशच्या कल्पनेपेक्षा अधिक उंच भरारी मारणारी होती. ती आणखी पुढे न्यायला यशने सुचवले. “जयंतशी चर्चा कर. ही माझ्या मनातली धूसरशी कल्पना अधिक मूर्त आणि व्यवहार्य रूपात आणायला आपण जयंतला सांगू या...”

आणि म्हणून नरेशने माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्या जीवनातले चौथे पर्व सुरू झाले.

jayant narlikar

पुण्यात आययूसी आणण्यात यशपालचा दुहेरी हेतू होता. ह्या प्रस्तावित केंद्रात ग्रंथालय, संगणक सुविधा, उपकरणांची प्रयोगशाळा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संशोधनात निपुण असणाऱ्या शास्त्रज्ञांची टीम आणून त्यांचा फायदा कुठल्याही विद्यापीठातल्या ह्या विषयातील संशोधकांपर्यंत पोचवायचा, हा पहिला हेतू. दुसरा हेतू होता ‘जीएमआरटी'सारख्या अद्ययावत दुर्बिणीचा फायदा विद्यापीठांसाठी मिळवण्याचा. म्हणून जीएमआरटीचे बांधकाम सुरू असतानाच आययूसीची रचना करायचा त्याचा मानस होता. हे केंद्र अस्तित्वात आले तेव्हा त्याला ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स' हे लांबलचक नाव देण्यात आले. साहजिकच ते आद्याक्षरांनी (आययूसीएए) आयुका असे संबोधले जाऊ लागले.

यशपालने आयुकाबद्दलच्या आपल्या आशा-आकांक्षा सांगून माझ्या नियोजनाखाली अनेक शास्त्रज्ञांशी चर्चा घडवून आणून एकंदर प्रकल्पाला ठोस रूप द्यायला आम्हा दोघांना सांगितले. प्रत्यक्षात प्रकल्प पुढे सरकावा म्हणून यशने विद्यापीठाची संमती घेऊन नरेशला प्रकल्प समन्वयक म्हणून नेमले. १० फेब्रुवारी १९८८ रोजी नरेशने विद्यापीठाच्या नोकरीतून प्रतिनियुक्तीवर ‘आयुका'त पदार्पण केले. ह्याच सुमारास यशने मला फोन केला. यश सरळ मुद्द्यावर आला : “माझ्यापुढे तुझा अहवाल आहे. पण हे केंद्र यूजीसीने स्वीकृत करायचे असेल तर तू त्याचा पहिला संचालक होण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजेस.” केव्हा तरी यश हा प्रश्न विचारणार हे मला माहीत होते. म्हणून मंगलाशी याबाबत सविस्तर चर्चा करून मी ते आमंत्रण स्वीकारलं.

आयुका प्रकल्पाच्या अहवालात केंद्राच्या रूपाची कल्पना बरीचशी अब्दुस सलाम ह्या शास्त्रज्ञांनी ट्रिएस्टेमध्ये स्थापन केलेल्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थियरेटिकल फिजिक्स (आयसीटीपी)वरून घेतली होती. आयसीटीपीमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा फायदा प्रगतिशील देशांतल्या शास्त्रज्ञांना मिळतो. त्याचप्रमाणे आयुकामधील सुविधांचा फायदा भारतातील विद्यापीठांतल्या शिक्षकांना मिळावा अशी इथे योजना होती. फक्त स्थानिक अभ्यासकांचा समुदाय गोळा करताना डॉ. भाभांनी पाडलेल्या पायंड्याप्रमाणे ह्यासाठी रिकाम्या जागा न भरता जर एखादा योग्य वैज्ञानिक दिसला तर त्याला योग्य असे पद द्यायचे, असे मी ठरवले.

अहवालात आम्ही आयुकाच्या अष्टपैलू कार्यपद्धतीचे ‘द एटफोल्ड वे' ह्या बौद्धधर्मीय शीर्षकाने नामकरण केले. हे आठ पैलू कोणते होते? प्रथम आयुकाच्या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे व स्वतःचे संशोधन उत्तम प्रकारे चालू ठेवणारे शास्त्रज्ञ आयुकात नेमणे. दुसरा पैलू होता जीएमआरटीशी संवाद साधण्याचा. कारण ही प्रख्यात दुर्बीण वापरण्याची संधी विद्यापीठीय शास्त्रज्ञांना आयुकाच्या माध्यमातूनच मिळायची होती. तिसऱ्या पैलूत पीएच.डी.चे मार्गदर्शन आणि त्यासाठी आयुकातल्याच नव्हे तर विद्यापीठातल्या पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएट स्कूलचे आयोजन होते. आयसीटीपीतील सुविधांचा फायदा घ्यायला येणाऱ्या शास्त्रज्ञांना संस्थेचे सहसभासद करतात. त्या धर्तीवर चौथ्या पैलूत आयुकाच्या सहसभासदत्वाची योजना होती. सहसभासद असलेला विद्यापीठीय शास्त्रज्ञ त्याच्या गरजेप्रमाणे आयुकात काही दिवसांसाठी येऊन तेथील सुविधांचा फायदा उचलू शकत होता. अशा शास्त्रज्ञाचा जाण्यायेण्याचा व राहण्याचा खर्च आयुका देणार. पाचव्या पैलूत विविध विषयांवर विविध स्तरांवर साधारणपणे २-५ आठवडे कार्यशाळा भरवण्याची योजना होती.

सहाव्या पैलूत विद्यापीठीय शास्त्रज्ञांना देशांतर्गत किंवा परदेशी दुर्बिणींवर निरीक्षणे करण्याच्या कामात आयुकाने मार्गदर्शन करण्याची योजना होती. विद्यापीठ क्षेत्रात खगोलशास्त्रात वापरली जाणारी उपकरणे बनवण्याची क्षमता यावी यासाठी आयुकाने स्वतःची उपकरणे बनवण्याची प्रयोगशाळा उभारावी असे ठरले व त्या माध्यमातून विद्यापीठांना उपकरणे बनवण्यात मार्गदर्शन करायचे, हा झाला सातवा पैलू. आणि आठव्या पैलूत विज्ञानप्रसार आणि शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांत खगोलाबद्दल आवड निर्माण करणे समाविष्ट होते.

jayant narlikar

बाहेरून येणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी अभ्यागत निवास हवे, कँटीन हवे. त्याचप्रमाणे आयुकातले शास्त्रज्ञ, विद्यार्थी, पोस्टडॉक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्टाफ क्वार्टर्स हवीत. आणि ह्या सर्व सुविधा उभ्या करण्यासाठी कमीत कमी २० एकरांचे भूक्षेत्र अपेक्षित होते.

अहवालाच्या शेवटच्या भागात आयुकाला लागणाऱ्या इमारती, जमीन, प्रशासनासाठीचे मनुष्यबळ आदींची चर्चा करून प्रकल्पाच्या स्थापनेचा खर्च आणि त्यानंतर दरवर्षी संस्था चालू ठेवायला लागणारा खर्च यांचे अंदाज दिले होते. यूजीसीने आयुका स्थापनेला मंजुरी दिली. प्रस्तावित केंद्र रजिस्टर्ड सोसायटी होईपर्यंत विद्यापीठाच्या छत्राखाली असेल, असा निर्णय यूजीसीच्या विनंतीवरून पुणे विद्यापीठाने घेतला. त्याप्रमाणे मला मानद संचालक म्हणून नेमणारे पत्र विद्यापीठाचे कुलगुरू भिडे यांनी लिहिले. हे पत्र मला १९ जुलैला माझ्या ५०व्या वाढदिवसाला मिळाले हा योगायोग!

आता पुढचा प्रश्न होता आयुका नेमके असणार कुठे? ही संस्था विद्यापीठीय आवारात जीएमआरटीच्या केंद्राजवळ असावी, असे आम्ही म्हणत होतो तरी अजून आमच्या प्रस्तावाला विद्यापीठाने दाद दिली नव्हती. दुसरा प्रश्न होता आर्किटेक्टचा. मिळाली जमीन तर त्यावर संकुल बांधणार कोण? हा दुसरा प्रश्न माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर सुटला. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळायला थोडा वेळ लागला.

आर्किटेक्टच्या शोधाची गाथा वास्तविक आयुकापूर्वी सुरू झाली! डिसेंबर १९८६ मध्ये हैदराबाद येथे सेंटर फॉर सेल्युलर ॲण्ड मॉलेक्युलर बायॉलॉजी (सीसीएमबी)च्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे आमंत्रण मला आले होते. पुष्पमित्र भार्गव या जीवशास्त्रज्ञाने अथक परिश्रम करून आधुनिक सोयींनी उपयुक्त अशी ही प्रयोगशाळा बांधली होती. तिथे माझी भेट प्रख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरियाशी झाली होती. नेहरू प्रोफेसर म्हणून तो केंब्रिजला वर्षभरासाठी जाणार होता. मी पूर्वी केंब्रिजमध्ये असल्याने तेथील जीवनावर आणि सीसीएमबीच्या इमारतीवर आमचे संभाषण झाले. त्या वेळी आमच्या तारा जुळल्या. तो जयपूरमध्ये ‘मंडल' या प्राचीन खगोलीय कल्पनेचा आधार घेऊन एक इमारत बांधत होता, म्हणून त्याला माझ्यासारख्या खगोलशास्त्रज्ञाशी चर्चा करायची होती.

आता सव्वा वर्षाने, १९८८च्या पूर्वार्धात आर्किटेक्टचा विचार करताना मला एकदम वाटले, आपण चार्ल्सला विचारू या का? मी अजित आणि नरेशबरोबर विचारविनिमय करत बी-१ ब्लॉक (भास्कर) इमारतीतल्या माझ्या फ्लॅटमध्ये बसलो होतो, तेव्हा त्यांना मी त्यांचे मत विचारले. “होय, चार्ल्स कोरियासारखा प्रथितयश आर्किटेक्ट नक्कीच आपल्याला कल्पकपणे ‘असाधारण' कॅम्पस निर्माण करून देईल.” अजित म्हणाला, “पण इतका मोठा आर्किटेक्ट आपले लहानसे काम करायला तयार होईल का?” त्यावर आशावादी नरेश मला म्हणाला, “तुझी त्याची पूर्वीची ओळख आहे, तर तू त्याला विचारून तर पाहा... फार तर तो नकार देईल.”

मी फोन उचलला आणि चार्ल्सचा घरचा नंबर फिरवलाही. अनेक ठिकाणी फिरतीवर असणारा हा गडी सुदैवाने त्या रात्री घरी सापडला. जेवण अर्धवट टाकून तो फोनवर आला. मी त्याला आयुकाची थोडक्यात कल्पना दिली आणि विचारले. “तू हे केंद्र बांधायला आर्किटेक्ट म्हणून येशील का?” “होय, अवश्य!” हे चार्ल्सचे उत्तर ऐकून मला हायसे वाटले.

जमिनीचा प्रश्न मात्र सहज सुटण्याची चिन्हे दिसेनात. पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण आवारात मोकळे (बांधकाम नसलेले) प्लॉट पुष्कळ होते, काही मोकळ्या जागा जीएमआरटी केंद्राजवळही होत्या; पण आमच्या मागणीला, त्यात यशपालने शब्द टाकूनदेखील, पुणे विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. ह्या पेचातून बाहेर पडायला १९८८च्या मार्चमध्ये मी एक धाडसी निर्णय घेतला. मी पंतप्रधानांना पत्र टाकले. त्यात असे लिहिले, की आपण जाहीर केलेल्या केंद्राला यूजीसीची मान्यता मिळाली असली तरी जागेअभावी केंद्राची प्रगती होत नाही. खुद्द कुलगुरूंवर बाहेरचे दबाव असल्याने त्यांना त्यांच्या अखत्यारीत विद्यापीठ आवारातील भूभाग आयुकासाठी देणे अवघड जात आहे. आपण ह्या कामी काही मदत करू शकाल का?

मी हे पत्र टाकले आणि माझ्या इतर कामांत मग्न झालो. इतर गोष्टींमुळे मला या पत्राचा विसरही पडला. १५ एप्रिल ते १५ जून मी दोन महिन्यांकरता पॅरिसला कोलेज-द-फ्रान्समध्ये व्याख्याने देण्यासाठी जाणार होतो. त्याच्या तयारीत असताना मला मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचा फोन आला. स्वतः शंकरराव चव्हाण बोलत होते. ते सरळ मुद्द्यावर आले. “नारळीकरसाहेब, आपणाला पुणे विद्यापीठाच्या आवारात जमीन हवी आहे ना?” मी होकार देऊन सांगितले, की ती जमीन एका राष्ट्रीय केंद्रासाठी मला पाहिजे. “किती जमीन लागेल?” मुख्यमंत्र्यांनी विचारले. “२० एकर.” माझे उत्तर. “त्यात काही अवघड नाही. मी वेळ देतो. आपण प्रत्यक्ष भेटायला या.” त्यांनी आश्वासन दिले. “ही गोष्ट माझ्यावर सोडा. मी विद्यापीठाशी संपर्क साधतो आणि आपल्या केंद्राला आवश्यक आहे तेवढी जमीन देण्याची व्यवस्था करतो.” त्यांनी त्यांचे स्वीय सचिव पी. आर. दासगुप्तांकडे माझ्याशी जरूर तेव्हा संपर्क साधायची जबाबदारी सोपवली. आमच्या सुदैवाने मुख्यमंत्री बदलले तरी त्यांचा पी.ए. दासगुप्ता आपल्या पदावर स्थिर होता!

१९ जुलैला मला आयुकाच्या मानद संचालकपदी नेमणुकीची सूचना मिळाली, तशीच वीस एकर जमिनीबद्दलचे आज्ञापत्रदेखील!

जुलै १९८८मध्ये जमिनीचा प्रश्न सुटल्यावर मी माझे लक्ष आयुकाला सरकारी मान्यता मिळवण्यावर केंद्रित केले. मानव संसाधन विकास मंत्रालयात शिक्षण सचिव अनिल बोर्डिया यांच्या अखत्यारीत ही गोष्ट होती. ते राजस्थान राज्यातले आय.ए.एस. अधिकारी. त्यांच्या करियरला सुरुवात होण्याअगोदरपासून ते माझ्या वडिलांना ओळखत होते.

नोव्हेंबरच्या आरंभी एक दिवस मी बैठकीकरता दिल्लीला आलो तेव्हा माझ्या परिपाठाप्रमाणे अनिल बोर्डियांना फोन केला. त्यांनी मला सांगितले, “मी आत्ताच सूचना दिली आहे, की आयुकाच्या स्वीकृतीचे औपचारिक पत्र यूजीसीला जावे.” दोन दिवसांनी यूजीसीने सरकारी मान्यतेची प्रत पुण्याला पाठवली. ती घेऊन नरेश आणि मी सोसायटी रजिस्ट्रारकडे गेलो. त्याने आमचे स्वागत करून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून द्यायची खात्री दिली आणि तो खरोखरीच त्या शब्दाला जागला. दोन दिवसांत रजिस्ट्रेशन मिळाले. नरेश म्हणाला, “हा आहे दोन शहरांतला फरक. दिल्लीत कोण कोणाला विचारीत नाही. इथे पुण्यात शिक्षण संशोधन संस्थांबद्दल जनमानसात आपुलकी असते.”

रजिस्ट्रेशनचा दाखला घेऊन परत येताना मी पुन्हा मागे वळून पाहिले. सप्टेंबर १९८७ मध्ये यशच्या ऑफिसात आयुकाची कल्पना मांडली गेली. आज १४ महिन्यांत संस्था रजिस्टर होऊन अस्तित्वात आली तिला जमीन मिळालो, उत्तम आर्किटेक्ट मिळाला. पुढची पावले अशीच भरभर पडतील का? मी यशला कळवले, “रजिस्ट्रेशन मिळाले. २९ डिसेंबर संस्थापन दिन म्हणून नक्की कर.”

२९ डिसेंबरला आम्ही सगळे गोळे बंगल्यात गेलो. तिथे प्रत्येक उपस्थित कौन्सिल सदस्याने व्हिजिटर्स बुकवर सही केली. मग आम्ही साइटवर गेलो. तिथे लहानशा शामियान्यात कोनशिला बसवली होती. तिचे उद्घाटन यशच्या हस्ते झाले. पुढे मुख्य इमारत तयार झाल्यावर ही शिला तिथे भिंतीत बसवण्यात आली. पुणे विद्यापीठाचे त्या वेळचे कुलगुरू राम ताकवले समारंभाला हजर होते. यशने लहानशा भाषणात संस्थेला शुभेच्छा दिल्या आणि आशा व्यक्त केली, की विद्यापीठीय शिक्षकांना ह्या संस्थेत वेगवेगळ्या ठिकाणांवरून येणाऱ्या शास्त्रज्ञांच्या बरोबरच्या चर्चेतून नवी ऊर्जा आणि हुरूप मिळेल.

संस्थापनदिनी केवळ औपचारिक समारंभच असू नयेत म्हणून मी कोनशिला समारंभाच्या चहापानानंतर एका शास्त्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. ‘खगोलविज्ञानात नव्या कल्पनांचे महत्त्व' असा परिसंवादाचा विषय होता. पी. सी. वैद्य (गुजरात युनिव्हर्सिटी), जेफरी बर्बिज (कॅलिफोर्निया- सॅन दिएगो युनिव्हर्सिटी) आणि व्ही. राधाकृष्णन (रामन रिसर्च इन्स्टिट्यूट) असे तीन परिसंवाद वक्ते होते.

खगोलविज्ञानातील आव्हानांचा विचार श्रोत्यांपुढे ठेवून हा कार्यक्रम संपला. कार्यक्रमात विद्याविषयक गोष्टींना महत्त्व देऊन औपचारिकतेला शक्यतो काट मारायची, ही परंपरा ह्या परिसंवादापासून सुरू झाली ती आयुकाने सातत्याने जोपासली आहे, असे मला अभिमानाने कायम सांगावेसे वाटते. २९ डिसेंबर १९८८ या दिवशी संस्थापनदिन साजरा झाल्यापासून आयुकाला मूर्त स्वरूप लाभले.

आयुकाची हौसिंग कॉलनी तयार होईपर्यंत नरेशने आयुकातर्फे माझ्यासाठी तीन बेडरूम्सचा एक फ्लॅट भाड्याने घेतला. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ. पॉल रत्नस्वामी यांचा औंध येथील गुलमोहर पार्कमधला तो फ्लॅट होता.

१ जूनला मी गोळे बंगल्यात गेलो तेव्हा मला जाणवले, की आयुकाची जागेची गरज वाढणार. १५० स्केअर फुटांची एक खोली पुरणार नव्हती, कारण जाहिराती देऊन काही प्रशासकीय स्टाफची नेमणूक झाली होती. सुदैवाने जीएमआरटी केंद्राचे बांधकाम पुरे होत आले होते आणि गोविंद स्वरूपने त्याच्या नव्या इमारतीतल्या ६ खोल्या शास्त्रज्ञांसाठी आयुकाला देऊ केल्या. पण त्याशिवाय प्रशासनाच्या कामासाठी आणखी जागा लागणार हे आधीच माहीत झाल्याने आम्ही जीएमआरटी केंद्राशेजारी असलेल्या आमच्या भूभागावर एक शेडवजा इमारत बांधायला घेतली होती. ही ‘तात्पुरती' म्हणून बांधली, पण आजही टिकून आहे आणि तिचा वापर ‘पाळणाघर' म्हणून होतो. कामावर येणाऱ्या स्टाफला आपल्या लहान मुलांना इथे ठेवून काम करण्याची सोय आहे. ही इमारत सप्टेंबर १९८९ मध्ये तयार झाली. नवजात आयुकाचा पाळणा इथे हलला असे म्हणायला हरकत नाही! क्षेत्रफळ २००० फूट. गोळे बंगला सोडून इथे स्थलांतर करताना आयुकाच्या शासकीय स्टाफला हायसे वाटले. तोपर्यंत अशा तरुण स्टाफमध्ये रत्ना राव, निरंजन अभ्यंकर, संतोष खाडिलकर, राजेश परदेशी आदींचा समावेश होता. त्या सर्वांना मार्गदर्शन करायला आणि एकंदर प्रशासन सांभाळायला एका ज्येष्ठ अनुभवी प्रशासकाची गरज होती. पुणे विद्यापीठातले सुरेश पंचवाघ ह्या कामासाठी एक वर्षभर प्रतिनियुक्तीवर यायला तयार होते. कुलगुरू प्रा. ताकवले यांनी त्याला संमती दिल्याने आमची मोठी सोय झाली. नंतर वर्षभराने ज्येष्ठ प्रशासकाची रीतसर नियुक्ती झाली आणि इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजीतल्या तरुणादित्य सहायला ह्या पदावर घेण्यात आले.

प्रशासकीय बाबी गरजेच्या असल्या तरी त्याहून जास्त निकड होती विद्याक्षेत्रात आयुकाचे पाय घट्ट रोवण्याची. आयुका हे राष्ट्रीय केंद्र विद्यापीठांचे, विद्यापीठांसाठी आहे हे विद्यापीठांना पटवून देणे महत्त्वाचे होते. त्याकरता आम्ही सुरुवात केली देशाच्या विविध भागांत क्षेत्रीय मेळाव्यांच्या आयोजनाने. निवडलेल्या क्षेत्रातल्या एका संस्थेत मेळावा भरवून त्याला त्या क्षेत्रातील खगोलविज्ञानात रस घेणाऱ्या विद्यापीठीय शास्त्रज्ञांना आम्ही बोलावत होतो. त्यांना खगोलविज्ञानाचे महत्त्वाचे संशोधनाचे विषय, आयुकातर्फे त्यावर आयोजित होणाऱ्या कार्यशाळा, आयुकातील सुविधा, सहसदस्यत्वाची पद्धत आदींवर व्याख्यानांतून माहिती पुरवत असू. तसेच ह्या शिक्षण-संशोधनाद्वारे करियर कसे आणि कुठे होऊ शकते याची पण माहिती खास करून विद्यार्थ्यांना देत असू. आम्हालाही ह्या मेळाव्यांतून होतकरू तरुण संशोधक सापडत आणि आम्ही त्यांना आयुकाचे सहसदस्य व्हायचे आवाहन करत असू. अशा मेळाव्यांद्वारे काही महिन्यांतच या नव्या केंद्राची माहिती बऱ्याच विद्यापीठांपर्यंत पोचली.

शिवाय यशपालने रईस अहमद आणि बंगलोरचा शास्त्रज्ञ मुकुंदा यांना आयुकात ‘ब्रेनस्टॉर्मिंग'साठी पाठवले. आयुकाने विद्यापीठक्षेत्रात सक्षमपणे कार्यरत व्हायला काय करणे गरजेचे आहे, हा चर्चेचा विषय होता. हे दोघे आणि आम्ही तिघे चौघे (मी, नरेश, अजित आणि नुकताच दाखल झालेला संजीव धुरंधर) या चर्चेत सामील झालो. त्यातून निष्पन्न झाले ते हे : आयुकाला आपला अष्टपैलू कार्यक्रम राबवण्यासाठी काही निवडक शास्त्रज्ञ हाताशी हवेत. दुसऱ्यांना या बाबतीत मार्गदर्शन करायला या शास्त्रज्ञांमध्ये संशोधक आणि शिक्षक म्हणून उच्चस्तरावर योग्यता असायला पाहिजे. तेव्हा अशा शास्त्रज्ञांची टीम जुळवायला आयुकाने प्रारंभ करावा आणि हे शास्त्रज्ञपदाची जाहिरात करून, मुलाखती घेऊन न निवडता, त्याऐवजी एखाद्या क्षेत्रात हुशार शास्त्रज्ञ दिसला आणि तो आंतरराष्ट्रीय, तज्ज्ञांच्या ‘परीक्षे'त उतरला तर घ्यावा. ही पद्धत होमी भाभांनी सुरू केली होती. अशा शास्त्रज्ञांत पहिली नेमणूक झाली पुणे विद्यापीठातल्या संजीव धुरंधरची.

यशने सांगितले, की शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आयुकाने आपले विद्याक्षेत्रातले सर्व कार्यक्रम तारखांसकट छापून विद्यापीठांकडे पाठवावेत. या बाबतीत आम्हाला अब्दुस सलाम यांच्या ट्रियस्टे इथल्या आयसीटीपीचा कित्ता गिरवायचा होता. एक-दोन वर्षांच्या अनुभवानंतर हे शक्य झाले. त्याचप्रमाणे आयुकाने त्रैमासिक माहितीपत्र ‘खगोल' छापायला सुरुवात केली. त्यातून केंद्रात काय घडले, घडत आहे व पडणार आहे त्याची माहिती मिळते. ‘खगोल' देशी-परदेशी पाठवल्यामुळे आयुकाचे नाव लवकरच जगजाहीर झाले.

१९८९ मध्ये इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) हे शब्द नवीन होते, पण या तंत्रज्ञानाचा वापर आयुकात चालू झाला. आयुकात १९८९ मध्ये ई-मेलची सुरुवात झाली, तसेच ग्रंथालयाचे कॅटलॉगिंग थेट संगणकाद्वारे होऊ लागले. १९८९ मध्येच विप्रोच्या सनमायक्रो सिस्टीमचा अद्ययावत संगणक ‘आदिती'मध्ये विद्यमान झाला. १९९२-९३ मध्ये संस्थेत वेबसाइटचा वापर होऊ लागला. भारतातील वैज्ञानिक संस्थांमध्ये संगणकीकरणात आयुका आघाडीवर असे, हे विधान अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ह्या सर्व धडाकेबाज संगणकीकरणामागे अजितचे नेतृत्व होते. सामान्यपणे मी अजित आणि नरेशच्या जबाबदाऱ्यांची विभागणी अशी केली होती : नरेशने एकंदर मनुष्यबळाकडे लक्ष द्यायचे तर अजितने सुविधांकडे.

‘आदिती' अर्थात तात्पुरत्या गरजा भागवायला पुरेशी असली तरी एक-दोन वर्षांत आयुकाच्या आयोजित इमारतींपैकी काही पूर्ण करणे आवश्यक होते. चार्ल्सने नरेश आणि अजितसह माझ्याशी सतत संपर्क ठेवला होता. आम्ही आयुकाच्या इमारतींचे तीन भाग केले, जे टप्प्याकडे पुरे करायचे, ती विभागणी अशी होती:

भाग एक: स्टाफ कार्टर्स

भाग दोन: ऑफिस-प्रयोगशाळा-ग्रंथालय-गेस्ट हाऊस

भाग तीन : प्रेक्षागार आणि रिक्रिएशन सेंटर

हे भाग त्या क्रमाने पुरे करायचे असे ठरवले.

भाग-१ चे काम सप्टेंबर १९८९मध्ये सुरू झाले. जानेवारी १९९१मध्ये आमचे शास्रज्ञ व विद्यार्थी आयुकाच्या कार्टर्समध्ये ऑफिस थाटून काम करू लागले.

पण भाग-१ची गोष्ट झाडांचा किस्सा सांगितल्याशिवाय पुरी होणार नाही. माझ्या लक्षात होते, फ्रेडने जानेवारी १९८८ मध्ये सांगितले होते, “तुमच्या बांधकामात येणारी झाडे शक्यतो जपा.” भाग-२च्या बांधकामात बरेच वटवृक्ष वाटेत येणार होते. त्यांना हलवण्याचे ठरले. ते हलवून भाग-१ मध्ये बंगल्यांच्या बगीच्याच्या जागेत व बाहेरच्या आवारात लावले. अर्थात हे काम प्रचंड होते. अनेक वर्षांपूर्वी होमी भाभा यांनी मुंबईत टीआयएफआरच्या हद्दीत अशी झाडे हलवून पुन्हा लावली होती. त्या वेळी ते काम करणारे वृक्षतज्ज्ञ वैद्य पुढे अनेक वर्षे बीएआरसीच्या बागांचे प्रमुख होते. ते आता निवृत्त झाले होते. पण मी त्यांना शोधून काढून या कामी आम्हाला मार्गदर्शन करायची विनंती केली. तो त्यांनी आनंदाने मान्य केली. त्यांनी मार्ग सुचवला... झाडांच्या मुळांना धक्का न लावता भोवताली खणून त्यांना जमिनीपासून मोकळे करायचे, मुळांभोवती मातीचा भक्कम गोळा ती उकरताना ठेवायचा. एका रोलिंग क्रेनद्वारे झाडाला उचलून अधांतरी पेलून नियोजित ठिकाणी न्यायचे आणि तिथे आधी खणून ठेवलेल्या खड्ड्यात पुन्हा उभे करायचे, पूर्वी अशी कामे केलेला काँट्रॅक्टर पण आम्हाला मिळाला. त्या वर्षी २० झाडे आणि दोन वर्षांनी आणखी २० झाडे अशी एकूण ४० झाडे आम्ही स्थलांतरित केली. त्यातली दोन दगावली, पण बाकीची छान वाढत राहिली आहेत.

आयटी युगाची चाहूल १९८०-९०च्या दशकाअखेर लागली तिचा आयुकाने भरपूर फायदा घेतला. फॅक्स आणि ई-मेलमुळे आमचे परदेशांशी संपर्क उत्तम राहिले. त्यामानाने भारतातील इतर शास्त्रीय संस्थांमध्ये ही सुविधा २-३ वर्षांनी येऊ लागली. तेव्हा त्यांच्याशी पण संपर्क सुधारला. खुद्द यशपालने त्याच्या यूजीसीमधल्या ऑफिसमध्ये फॅक्स मशिन आयुकाच्या मार्गदर्शनाखाली घेतले.

बांधकाम भाग-२ची सुरुवात सप्टेंबर १९९०मध्ये झाली. १९९१ मध्ये मला एका मोठ्या वैयक्तिक दुःखाला सामोरे जावे लागले. १ एप्रिल रोजी माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. दोन-तीन दिवस आधी ते बाथरूमला जाताना घसरून पडले तेव्हा त्यांच्या मांडीचे हाड मोडले. त्यांना जोशी रुग्णालयात दाखल केले. सर्जन रानडे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार होते; पण आदल्या रात्रीच झोपेत त्यांचे निधन झाले. माझे वडील आयुकाची प्रगती पाहून सुखावले होते. १९९२ मध्ये आयुका राष्ट्राला समर्पित करण्यात आले. तो सोहळा पाहायला तात्यासाहेब हयात असते तर मला फार संतोष झाला असता; पण तसे घडायचे नव्हते...

१९८८ पासून १९९२ पर्यंत आमच्या बांधकामाचे भाग १ आणि २ चालू असताना आयुकाचे संशोधन प्रशिक्षणाचे काम बंद न करता यथाशक्ती आम्ही चालू ठेवले. ह्या जवळजवळ चार वर्षांच्या कालखंडात इमारतींची पुरेशी व्यवस्था नसतानाही आयुकाने ३६ मेळावे भरवले.

डिसेंबर १९८९ मध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिकविजेते प्रा. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर भारताच्या दौऱ्यावर आले होते. आयुकाचे सन्माननीय फेलो ह्या नात्याने मी त्यांना आमंत्रित केले. ते सपत्नीक पुण्यात आले. त्या वेळो ‘आदिती'व्यतिरिक्त आमची स्वतःची वास्तू नव्हती, पण ती गैरसोय सोसून ते दोन दिवस आमचे अतिथी होते, आमच्या मोजक्या शास्त्रज्ञांशी आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पागोष्टी केल्या. त्यांना ‘आयुका'मागची कल्पना आवडली आणि अल्प काळात संस्थेने केलेली कामगिरी (कार्यशाळा, क्षेत्रीय मेळावे...) पाहून त्यांनी तिचे कौतुक केले. त्यांचे एक व्याख्यान आम्ही युनिव्हर्सिटीत आयोजित केले.

आणखी एक संस्मरणीय भेट होती विली फाऊलरची. त्याला १९८३मध्ये चंद्रशेखरांबरोबर नोबेल पारितोषिक मिळाले होते. तो १९९१ मध्ये हैदराबादला येणार होता हे कळल्यावर मी त्याला आयुकाला भेट द्यायला आमंत्रित केले. आद्य सन्माननीय फेलोजपैकी आयुकाला येऊन जाणारा विली दुसरा फेलो. त्याचे जाहीर व्याख्यान गावातल्या लोकांना ऐकायला मिळावे म्हणून मी ते विद्यापीठात न करता फर्गसन कॉलेजात केले. पण हाय राम! भाषण सुरू झाल्यावर वीज गेली. पर्यायी जनरेटरची सोय इतक्या प्रसिद्ध कॉलेजकडे नव्हती! व्याख्याता आणि श्रोते वीज यायची वाट पाहत हॉलबाहेर थांबले. जवळजवळ तासाभराने वीज आल्यावर व्याख्यान सुरू झाले. ते पुन्हा सुरू करताना मी म्हटले, की आपण एखादा उपक्रम ‘श्री गणेशाय नमः' म्हणून सुरू करतो. पुण्यातल्या व्याख्यानाची सुरुवात वीज बोर्डाला अभिवादन करून व्हावी! विलीचे लेक्चर विनोदांनी भरलेले होते, जे छानच झाले. पण त्याशिवाय वीजपुरवठा खंडित झाला तेव्हा त्याच्याशी श्रोत्यांना बाहेर बगीच्यात गप्पा मारता आल्या हे फार छान झाले. त्या वेळी एक वृद्ध गृहस्थ माझ्याकडे येऊन म्हणाले, “तुम्ही हे भाषण पुण्यात आयोजले हे योग्य झाले, पण ते गावात केले असते तर आमच्यासारख्या पेन्शनरांना यायला सोपे झाले असते.” म्हणजे त्यांच्या लेखी फर्गसन कॉलेज गावाबाहेर होते! अर्थात हे गृहस्थ ‘जुन्या पुण्या'तले होते, हे सांगायला नको!

फाऊलरची भेट एका गोष्टीचे प्रतीक होती : आयुकाची कीर्ती आता जगात होऊ लागली होती. त्यामुळेच व्याख्यानांसाठी, कार्यशाळांसाठी देश-परदेशांतून प्रख्यात शास्त्रज्ञ येऊ लागले होते. पहिल्या चार वर्षांत सुमारे १५०० शास्त्रज्ञ आयुकात येऊन गेले. काही प्रख्यात शास्त्रज्ञांकडून आयुकाच्या आवारात वृक्षारोपण करून घ्यायची प्रथा आम्ही सुरू केली. आज ते वाढलेले वृक्ष त्यांच्या शेजारच्या पाट्यांवर वृक्ष लावणाऱ्याचे नाव दर्शवतात.

आयुकाचे बांधकाम चालू असताना १९९१च्या आरंभी यशपालची यूजीसीच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आली आणि मला जाणीव झाली, की आयुकाला उत्साहाने पाठिंबा देणारा आता आपले पद सोडून चालला.

भाग-२च्या बांधकामाबद्दल सविस्तर लिहीत नाही. बांधकाम दोन-तीन व्यत्यय वगळता सुरळीत पार पडले. पण जेव्हा जुलै १९९२मध्ये बांधकाम चार महिन्यांत संपण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा मी वास्तूच्या समर्पण समारंभाचा विचार करू लागलो. यूजीसीचे अध्यक्ष समारंभात असतीलच, पण बाहेरचा एक प्रतिष्ठित पाहुणा असावा, ज्याचे ह्या प्रसंगी व्याख्यान असेल.

मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एकमताने प्रा. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांची निवड केली. ते आयुकाचे सन्माननीय फेलो होते, पूर्वीच्या त्यांच्या भेटीत त्यांनी संस्थेचे कौतुक केले होते आणि असामान्य कर्तृत्वामुळे आणि जन्माने भारतीय म्हणून ते आम्हा सर्वांचे स्फूर्तिस्थान होते. मी त्यांना पत्र लिहून आमंत्रित केले. त्यांचा होकार आला, आणि २८ डिसेंबर १९९२ ही तारीख समर्पण समारंभासाठी त्यांच्या सोयीने निश्चित झाली.

पण भारतातल्या बांधकामाच्या पूर्ततेबद्दल शहाण्या माणसाने भाकीत करू नये! मी काँट्रॅक्टरला सांगितले, वास्तूचे समर्पण २८ डिसेंबरला आहे. तुझे काम एक आठवडा आधी पुरे झाले पाहिजे. त्याने त्यापूर्वीच आपण सर्व बांधकाम पूर्ण करू असे आश्वासन दिले. मात्र, नोव्हेंबरमध्ये सीएमसी आणि आयुका एका बाजूला आणि काँट्रॅक्टर दुसऱ्या, असा वाद निर्माण झाला. ‘अधिक कामाचे अधिक पैसे' या स्वरूपाच्या वादात ‘अधिक काम कशाला म्हणायचे आणि त्यासाठी काँट्रॅक्टरला अधिक म्हणजे किती मोबदला द्यायचा' असे प्रश्न होते. ते सुटेपर्यंत दोन आठवडे काँट्रॅक्टरने काम बंद केले.

दुसरा उशीर झाला कुंडाच्या रचनेत. चार्ल्स कोरियाने इमारतीच्या मध्यभागी कुंडवजा पायऱ्यांची मोठी वर्गाकार रचना केली होती. त्यासाठी कर्नाटकातल्या ग्रॅनाइटचे मोठे स्लॅब मागवले होते. ते अनेक ट्रक्समधून आले आणि क्रेनमार्फत योग्य जागी बसवण्यात आले. पुरवठ्यात उशीर, ट्रकना यायला जास्त वेळ लागला, क्रेन कोसळल्यामुळे चार-पाच दिवसांचा खोळंबा, वगैरे विघ्ने येऊन गेली. या संदर्भात एक किस्सा सांगण्याजोगा आहे: आम्ही कर्नाटकातून प्रख्यात कार्टूनिस्ट गुज्जर याला चंद्रशेखर यांचे गमतीदार व्यंगचित्र (त्यांना भेट देण्यासाठी) काढायला बोलावले होते. तो हजर असताना त्याच्यासमोर कुंडात एक प्रसंग घडला. नवा दगड बसवायला त्याखालची जागा साफसूफ करायची होती. त्यासाठी तिथे पडलेला खड्यामातीचा ढीग हलवायचा होता. ते काम करायला आणलेले मजूर काही न करता गप्पा मारत बसले होते. त्यांच्या मुकादमाचा पत्ता नव्हता. आधीच उशीर झाला, त्यात हा वेळकाढूपणा. मला ते पाहवलं नाही. मी तिथे पडलेले घमेले उचलून त्यात ढिगातला कचरा भरला आणि बाहेर टाकायला न्यायला सुरुवात केली. ते पाहून मुकादम कुठून तरी धावत आला आणि मजूरही कामाला लागले! गुज्जरने तो प्रसंग लक्षात ठेवून माझे घमेल्यासकट कार्टून काढले आणि मला ‘सरप्राइज' प्रेझेंट दिले. ते अजूनही संचालकाच्या ऑफिसबाहेर लावले आहे.

अशा तऱ्हेचे व्यत्यय त्रासदायक असले तरी अनपेक्षित नव्हते, पण ज्याची कल्पना करता येणार नाही असे विघ्न आम्हाला शह देऊन जवळजवळ मात करायला पुढे आले. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडली गेल्यावर त्या घटनेचे पडसाद मुंबईत हिंदू-मुसलमान दंग्यांत उमटले. तिथे काही भागांत कर्फ्यू लागला, आणि तो उठला तरी तेथील मुस्लिम बाहेर पडायला धजत नव्हते. आमच्या प्रमुख इमारतीच्या दर्शनी भागाच्या भिंतीवर खास टाइल लावणारे कारागीर त्यात होते. त्यांच्याशिवाय काम होणार नाही, आणि समारंभाच्या दिवशी अर्धवट कामामुळे इमारतीची शोभा जाईल अशी शक्यता निर्माण झाली. अखेर २५ डिसेंबरला ते कारागीर यायला धजले. एकंदर काम पाहून ते म्हणाले, “साहेब, रात्रीचा दिवस करून २७च्या रात्री आम्ही सर्व पूर्ण करून देऊ.” मी २७ला रात्री १०ला पाहिले, काम चालू होते. चार्ल्स चिंतातुर मुद्रेने पाहत उभा होता. एकंदर वास्तू पूर्ण आणि सुबक दिसावी याची साहजिकच त्याला चिंता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मी येऊन पाहिले... काम पूर्ण झाले होते आणि भिंतीसमोरचा कचरा हलवला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला बाउंडरी मारून असा विजय मिळाला होता!

चार्ल्सची एक अफाट कल्पना- कुंडाभोवती चार प्रख्यात शास्त्रज्ञांचे मोठेच्या मोठे (१०-१२ फुटी) पुतळे उभे करायचे. आर्यभट्ट, गॅलिलिओ, न्यूटन आणि आइन्स्टाइन यांचे पुतळे मुंबईत तयार होऊन आले आणि वेळेत स्थानापन्न झाले. ग्रंथालय आणि काही इमारतींत उदय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंटीरियर डेकोरेशन'ही बऱ्यापैकी पुरे झाले.

अशा ‘लगीनघाईत' प्रत्यक्ष समारंभ संस्मरणीय झाला. ५०० निमंत्रित कुंडामध्ये खुर्च्यांवर बसले होते व वरून वक्ते त्यांना उद्देशून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात गच्चीवरून संस्कृतमध्ये गायलेल्या मंगल श्लोकांनी झाली. माझ्या डोळ्यांपुढे केंब्रिजमध्ये किंग्ज कॉलेजच्या डायनिंग हॉलच्या गॅलरीतून सादर केले जाणारे लोकगीत गायन आले. प्रत्यक्ष वास्तू तिचा वापर करणाऱ्यांना समर्पित करताना आम्ही एक नवी कृती अमलात आणली. कुंडाच्या मागे दालनात फुकोचा लंबक होता. तो सुरू करायची क्रिया एक बटन दाबून चंद्रशेखर यांनी राम रेड्डींच्या उपस्थितीत केली. लंबक सतत दोलत राहावा अशी रचना असल्याने आता आयुका सतत कार्यरत राहणार, असा विश्वास त्या क्रियेतून आयुका वापरणाऱ्याऱ्यांना दिला गेला. क्लोज्ड सर्किट टी. व्ही. वर लंबक चालू झाल्याचे पाहून श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर केला.

१९८८ डिसेंबर ते १९९२ डिसेंबर या चार वर्षांच्या काळात नवोदित आयुकाने कार्यक्षमतेबद्दल नावलौकिक मिळवायला सुरुवात केली होती. केवळ शास्त्रज्ञच नव्हे तर प्रशासकीय कर्मचारीदेखील मनापासून काम करत. मला ह्याची काळजी होती, की ही तत्परता, हा उत्साह आता आयुकाचे समर्पण झाल्यावर टिकून राहील का?

१९९३मध्ये आयुकाने आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा एक मोठा मेळावा आयोजित केला. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (आयएयू) ह्या जागतिक संस्थेच्या आशिया-पॅसिफिक भागातील देशांच्या खगोलशास्त्रज्ञांचा ५ दिवसांचा मेळावा दर तीन वर्षांनी भरतो. १९९० मध्ये हा मेळावा सिडनी, ऑस्ट्रेलियात भरला होता. त्या वेळी नरेशने आणि मी हजर राहून पुढील मेळाव्यासाठी आयुकातर्फे आमंत्रण दिले होते. त्या वेळी आयुकाची कुठलीच इमारत तयार नव्हती! पण सर्व काही बांधून होईल ह्या आत्मविश्वासाने आम्ही आमंत्रणाचा हात पुढे केला होता.

१६-२० ऑगस्ट १९९३ या संमेलनाच्या तारखा तीन वर्षं आधीच निश्चित झाल्या होत्या. १६ ऑगस्टला बांधकाम भाग-३ साठी राखून ठेवलेलं प्रेक्षागार पूर्ण वापरत्या स्थितीत असणे जरुरी होते. एक महिना आधी गावातल्या प्रख्यात कथक नृत्यविशारद रोहिणी भाटे प्रेक्षागार पाहायला आल्या होत्या. त्यांच्या कलापथकाच्या नृत्याचा कार्यक्रम मेळाव्याकरता ठेवला होता. प्रेक्षागाराचे फिनिशिंगचे काम चालू होते; पण त्याची अस्ताव्यस्त दशा बघून रोहिणीताई चरकल्या. हे स्टेज पाहिजे त्या स्थितीत महिन्याभरात मिळेल का, या त्यांच्या प्रश्नाला नरेशने उत्तर दिले, “काही काळजी करू नका! पाहालच एक महिन्यात इथला कायापालट झालेला!”

१४ ऑगस्टला प्रेक्षागार पूर्ण झाले व मी तिथे शाळकरी मुलांकरता व्याख्यान दिले. ठाण्यातले (व पूर्वी टीआयएफआरच्या होमी भागा प्रेक्षागारात काम केलेले) ए. एम. भावे यांनी ध्वनिसंयोजन इतके उत्कृष्ट केले होते की ध्वनिवर्धकाशिवाय स्टेजवरचा आवाज मागे ऐकू येई. चार्ल्स कोरियाने ह्या प्रेक्षागारात एक नावीन्यपूर्ण भर टाकलेली मी पूर्वी कुठे पाहिली नव्हती. ती म्हणजे रडणाऱ्या बाळाची खोली. प्रेक्षकांत लहान मूल रडायला किंवा दंगा करायला लागले की पालकांना त्याला घेऊन बाहेर जावे लागते आणि कार्यक्रम पाहता येत नाही. इथे ते मुलाला ह्या खोलीत घेऊन आले की मुलाचा आवाज बाहेर जात नाही, पण स्टेजवरचे आवाज खोलीत ऐकू येतात आणि समोर काचेच्या खिडकीतून स्टेज दिसते. त्यानंतर १६-२० ऑगस्ट मेळावा स्मरणीय झाला आणि नरेशच्या आयोजन कुशलतेवर अभ्यागतांनी स्तुतिसुमने उधळली. रोहिणी भाटे यांचे कथक आयोजन नव्या स्टेजवर सुरळीत पार पडले.

परिषदा, मेळावे यशस्वीरीत्या भरवून आयुकाची कीर्ती दिगन्तात पसरली तरी मला स्वतःला अधिक समाधान वाटे जेव्हा जेव्हा आयुकात होणाऱ्या संशोधनकार्याला जागतिक प्रसिद्धी मिळे तेव्हा. याचे एक उदाहरण गुरुत्वाकर्षणाच्या लहरींवरचे संशोधन. मला आठवतेय, १९८९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पुढील ५ वर्षांसाठी संशोधनाच्या दिशा निश्चित करायला भारतातील खगोलशास्रज्ञांचे समेलन बंगलोरमध्ये भरले होते. त्याला आयुकातर्फे मी, नरेश, अजित आणि संजीव धुरंधर चौघांनी हजेरी लावली होती. तेव्हा संजीवने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा अभ्यास कसा करता येईल यावर उत्तम भाषण दिले. तीन-चार वर्षांतच गुरुत्वाकर्षण लहरींवर त्याचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे, ख्यातीचे झाले. अशा लहरींचे अस्तित्व सिद्ध करायला जो विशाल यंत्रणा जगात चार-पाच ठिकाणी उभारली आहे तिथे मिळणाऱ्या आधारसामग्रीचे विश्लेषण करायला संजीवचे गणित उपयोगी पडते. म्हणून आयुकाचे त्या सर्व प्रकल्पांशी सहकार्याचे संबंध आहेत.

विश्वरचनाशास्त्रज्ञाच्या क्षेत्रात टीआयएफआर सोडून आयुकात आलेला माझा एके काळचा विद्यार्थी पद्मनाभन आणि कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ थियरेटिकल ॲस्ट्रोफिजिक्स (सीआयटीए) सोडून आलेला वरुण साहनी या दोघांनी मोलाची कामगिरी करून भटनागर पुरस्कार मिळवले. टीआयएफआर सोडून आलेला नारायण राणा याने आकाशगंगेत विविध मूलद्रव्ये कशी आणि कुठे तयार होतात यावर मौलिक संशोधन केले. आयुका स्थापनेत आपला बराच वेळ देणारा अजितदेखील तारकाविश्वांच्या गुणधर्मावर उच्च दर्जाचे संशोधन करत आहे.

मी जेव्हा आयुकाची उपकरणांची प्रयोगशाळा कशी चालवावी याचा विचार करत होतो तेव्हा पहिल्या वैज्ञानिक सल्लागार समितीने सुचवले : टीआयएफआरच्या श्याम टंडनला इकडे बोलावू शकलास तर तुला ह्याबाबत काळजी करायला नको. टंडन इन्फ्रारेड ग्रुपमध्ये होता. पूर्वीपासून टीआयएफआर-मध्ये वाढलेला बाहेर आकर्षित करणे अवघड असते; पण श्याम यायला तयार झाला तेव्हा मला समाधान वाटले. श्यामने ह्या प्रयोगशाळेत विद्यापीठक्षेत्राला उपकरणे बनवण्यात उत्कृष्ट (आणि कडक मास्तरकी थाटाचे!) मार्गदर्शन केले.

वैज्ञानिक सल्लागार समितीने आपल्या तिसऱ्या किंवा चौथ्या भेटीत नमूद केले, की आयुका आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली असली तरी अशा संस्थांपैकी पहिल्या डिव्हिजनमध्ये अद्याप शिरली नाही. पण आणखी तीन वर्षांनी समितीने मान्य केले, की आयुकाने ती पातळीदेखील गाठली. त्या वेळी समितीच्या सभासदांत त्या वेळच्या आयएयूचा मी अध्यक्ष होतो म्हणून मला या पावतीने विशेष समाधान वाटले. मी मंगलाला म्हटले, “तू नेहमी विचारतेस, की ‘लोक आयुकाच्या आवाराच्या सौंदर्याची स्तुती करतात, तिथल्या संशोधनाची करतात का?' तेव्हा हा शेरा पाहा.”

अर्थात आयुकाचे आवार केवळ सुंदरच नव्हे तर संकल्पनेच्या दृष्टीनेही एकमेवाद्वितीय होते यात वाद नाही. चार्ल्स कोरिया मुळात आयुकाच्या वास्तुनिर्मितीच्या आव्हानाने आकर्षित झाला होता त्याला आधुनिक खगोलशास्त्राची ‘छाप' असलेले संकुल बनवायचे होते. ज्याप्रमाणे आयुकामधील प्रशिक्षण-संशोधनाने आकर्षित होऊन तिथे देशापरदेशांतले शास्त्रज्ञ येतात, तसेच वास्तुशिल्पाने आकर्षित होऊन वास्तुशिल्पाचे विद्यार्थी येतात. इथे आयुकाच्या आवाराचे थोडक्यात वर्णन करणे प्रशस्त होईल.

आयुकाच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश करताना समोर भिंतीवर दिसते ते आयुकाचे ‘स्मृतिचिन्ह'. आयुकाच्या कार्याची आठवण करून देणारे हे चित्र कीर्ती त्रिवेदी यांनी सुचवले. चित्राचे दोन अर्थ काढता येतात. एक म्हणजे ह्या आकृतीतील रेषा अमुक ठिकाणी सुरू होत नाही आणि अमुक ठिकाणी संपत नाही. विश्वाचा अभ्यास असाच अनादी-अनंत असतो. तसेच ह्या चित्रातील रेषेचा गुंतावळा पाहून असे दिसते, की आयुका पण आपल्या कार्याद्वारे विद्यापीठांशी गुंतलेली आहे.

आयुकाच्या आवारातून जाणाऱ्या दोन रस्त्यांना आम्ही मेघनाद साहा आणि वेणू बाप्पू ह्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांची नावे दिली. ह्या दोन रस्त्यांमुळे आमचा वीस एकरांचा कॅम्पस तीन भागांत वाटला गेला. त्यातील सर्वांत मोठा ‘आकाशगंगा' नावाने ओळखला जाणारा भाग स्टाफ कार्टर्स आणि रिक्रिएशन सेंटरसाठी राखून ठेवला आहे. इथे आत शिरल्यावर डावीकडे दोन स्प्रिंगवजा भुजा असलेली आपल्या आकाशगंगेची आकृती दोन रंगांच्या रोपांनी साकार केली आहे. उजवीकडे रिक्रिएशन सेंटर ‘चित्तरंजन'ची इमारत आहे. त्यात व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, वर बुद्धिबळ-कॅरम टेबल टेनिसची टेबले, तर बाजूला (खासगी कंपनीच्या अनुदानाने बांधलेला) स्विमिंग पूल व शेजारी पार्टीकरता लॉन आहे. समोरच्या बाजूला टेनिसची सोय होती आणि आता तिथे नवीन वसतिगृह आहे.

दुसऱ्या मध्यम आणि त्रिकोणाच्या आकाराच्या भागात केंद्राच्या मुख्य कामाच्या इमारती आहेत. खगोलात आपल्या आकाशगंगेशेजारच्या मोठ्या तारकाविश्वाला देवयानी (ॲण्ड्रोमोडा) म्हणतात, म्हणून या भागाला ‘देवयानी' हे नाव दिले आहे. इथे चार्ल्सने ओळीने कर्णरेषेत मांडलेले तीन चौकोन घेऊन त्यांचे ‘चौक' करून भोवताली इमारती मांडल्या. मला ह्यात थोडी केंब्रिजची झलक दिसते. पश्चिमेकडच्या चौकाभोवतालच्या गेस्ट हाऊस + होस्टेलला ‘नालंदा' नाव दिले आहे, तर त्याला जोडलेल्या लहान फ्लॅट्सच्या लायनीला ‘तक्षशिला' नालंदामध्ये खाली विद्यार्थ्यांच्या खोल्या तर वर अभ्यागत निवास, तक्षशिलामधले फ्लॅट दीर्घकाळाकरता येणारे व्याख्याते आणि पोस्ट डॉक्टोरल फेलोजसाठी आहेत. नालंदाच्या चौकात ‘सियरपिन्स्कीची गॅस्केट' म्हणून ओळखली जाणारी त्रिकोणात त्रिकोण अशो फ्रॅक्टर आकृती बनवली आहे.

दोन मितींचा वर्ग आणि एका मितीची सरळ रेषा यांच्या दरम्यान या आकृतीची मिती सुमारे १.५८ भरते. मी एकदा बिहारला गेलो असताना पूर्वीची नालंदा पाहायला गेलो होतो. उत्खनन केलेल्या एका संकुलाचा आकार पुष्कळसा कोरियाने आयुकात बांधलेल्या नालंदाएवढा दिसला, हा एक विलक्षण योगायोग.

देवयानीच्या मधल्या (आणि सर्वांत भारदस्त) चौकात कुंड आहे, त्यासाठी कर्नाटकातून ग्रॅनाइट आणले होते. ह्या चौकाभोवती एका बाजूला मुख्य ऑफिसेसची इमारत आहे. तिला ‘आर्यभट' हे नाव दिले आहे. हिच्याच पुढे कुंडाकडे बघणारा आर्यभटाचा पुतळा आहे. ह्या इमारतीत दर्शनीय भागात काही तरी शास्त्रीय पण प्रेक्षणीय वस्तू असावी असे चार्ल्सचे मत होते. इथे मंगलाने केलेली सूचना सर्वांना (म्हणजे चार्ल्स, मी, नरेश, अजित) एकदम पसंत पडली. तिने नुकताच पॅरिसच्या नुकताच पॅन्थियॉन आणि पूर्वी स्मिथ्सोनियन, वॉशिंग्टन इथे फूकोचा लंबक पाहिला होता. हा दिसायला सामान्य लंबकाप्रमाणे दोलन करणारा, दोरीला टांगलेला गोळा असतो. पण हा सतत दोलन करत राहतो, कारण त्याला जमिनीखाली दडवलेल्या इलेक्ट्रिक सर्किटद्वारे ऊर्जा पुरवली जाते. मात्र, ह्याची खासियत ही, की हा कुठल्याही ऊर्ध्व पातळीत दोलन करू शकतो. आणि तो असा दोलन करत सोडला तर त्याची दोलनाची पातळी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हळूहळू बदलते. याचे कारण पृथ्वी आपल्या आसाभोवती परिवलन करते. आपण अशा दिशा फिरणाऱ्या पृथ्वीवरून हा लंबक पाहत असल्याने आपल्याला तो असा पातळी बदलताना दिसतो. उत्तर ध्रुवावर ही पातळी २४ तासांत संपूर्ण एक चक्कर पुरी करते. जसजसे आपण विषुववृत्ताकडे जाऊ तसा हा कालखंड वाढत जातो. पुण्याच्या अक्षांशावर हा कालखंड ७५ तासांच्या आसपास आहे. अशा तऱ्हेने हा लंबक पृथ्वीच्या आसाभोवती फिरण्याचा उत्कृष्ट पुरावा आहे. एकापरीने हा लंबक आर्यभटाच्या पाठीशी असणे योग्यच आहे. कारण आर्यभटाने विधान केले होते, की तारामंडल स्थिर असून पृथ्वी आसाभोवती फिरते.

चार्ल्सला ही कल्पना फार आवडली. पुढे त्याने उम्बेटों इकोची प्रख्यात कादंबरी ‘फूकोज पेंडुलम' ही मला आणि मंगलाला भेट दिली.

मूळ पेंडुलमची कल्पना फूको नावाच्या फ्रेंच शास्रज्ञाची. १८५१मध्ये पॅन्थियॉनमध्ये त्याने तो प्रथम चालवला होता. युरोप, अमेरिका आदी प्रगत देशांत काही संस्थांमध्ये हा लंबक आहे. भारतात अद्याप असा लंबक कुठे नव्हता. तो सतत चालू राहील अशी यंत्रणा तयार करणे सोपे नसते. पण कलकत्त्याच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सच्या तंत्रज्ञांनी हे आव्हान स्वीकारले आणि समर्पण समारंभाच्या चार महिने आधीच पेंडुलम आणून जागी बसवून चालू करून दिला.

कुंडाच्या शेजारच्या (पूर्वेच्या) बाजूस ‘भास्कर' इमारतीत तोन वेगवेगळ्या आकारांच्या (५०, ८० व १२० श्रोत्यांकरिता) लेक्चर रूम्स आहेत. त्या खोल्यांच्या छपरावर हिरवळ आणि ‘आयुका'च्या परिसराला वेगळेपण बगीचा करून त्यांना नैसर्गिकरीत्या थंडावा पुरवला आहे. ह्या ‘छतावरच्या बगीच्यात' खास पार्ट्या-मेजवान्या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित केल्या जातात. उत्तरेकडे ग्रंथालयाची विशाल काचेची खिडकी, तर पश्चिमेकडे ‘डोम'. चार्ल्सच्या मते खगोलशास्त्राच्या इमारतीत घुमट कुठे तरी पाहिजे. आम्ही त्याला सांगून पाहिले, की सामान्यपणे दुर्बीण जिथे असते त्या इमारतीला घुमट असतो. आयुका इथे तशी दुर्बीण वापरणार नाही, तर मग घुमट कशाला? पण चार्ल्सचा हेका कायम! मग माझ्या पूर्वीच्या विद्यार्थ्याने, राणा याने सुचवले, की डोमला बारीक भोके पाडून त्यावर काचा लावू. मग खालून पाहताना जिथून सूर्यप्रकाश येतो ती भोके चमकतील व आपण दिवसा तारे पाहू! कल्पना अफलातून होती.

जेव्हा डोमचे कास्टिंग चालू होते तेव्हा आमचा हा तरुण शास्त्रज्ञ नारायणचंद्र राणा तोळामासा प्रकृती असूनसुद्धा ताऱ्यांचा चार्ट घेऊन छतावर उभा राहून योग्य ठिकाणी (काँक्रीट सेट होण्यापूर्वी) भोके पाडून घेत होता. आज हा डोम पण आयुकाच्या दर्शनी भागांपैकी एक आहे. त्याच्या पायथ्याशी मी पूर्वीच्या आयुर्वेदिक पुस्तकात सापडणारी षट्कोनी ताऱ्याची आकृती चितारून घेतली, ह्या ‘ताऱ्या'चे प्रत्येक टोक म्हणजे एक ऋतू. प्रत्येक ऋतूत कुठले खाद्यपदार्थ प्रकृतीला चांगले त्याचे वर्णन दिलेले असते. आयुकातली ही आकृती सूचक आहे. कारण डोमनंतरची इमारत आहे कॅन्टीन ‘बल्लव'ची. कँटीनमध्ये मला एक ओळ भिंतीवर मोठ्या अक्षरात टाकायचा मोह आवरला नाही. त्या ओळीचा मथितार्थ असा, ‘कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात नव्या ताऱ्यापेक्षा नव्या पक्वान्नाचा शोध जास्त आनंद आणतो!' ब्रिलॅ सॅव्हरॅन नावाच्या पाकविशारदाची ही म्हण आहे. तसेच मला लोकांनी विचारले, की तुम्ही देवयानीतल्या वेगवेगळ्या इमारतींना भारतीय खगोलशास्त्रज्ञांची नावे दिली होती. वराहमिहिर आणि आणि ब्रह्मगुप्त. वराहमिहिर हे ग्रंथालय तर ब्रह्मगुप्तमध्ये आहे संगणक केंद्र आणि उपकरणांची प्रयोगशाळा. ग्रंथालय हे आयुकातील इमारतींतले सर्वांत प्रेक्षणीय रत्न. आत शिरल्यावर एकदम भव्यतेची जाणीव होते. खाली पुस्तके, वर नियतकालिके अशी योजना आहे. प्रवेश केल्यानंतर पुस्तके/नियतकालिके असतील तिथे वाचक सरळ जाऊ शकतो, पण बाहेर पडताना त्याला एका कमानीमधून जावे लागते. जर तुम्ही पुस्तक / नियतकालिक ग्रंथालयाच्या स्टाफकडून छाप मारून नेले नसेल तर कमानीतून मोठा आवाज निघतो. थोडक्यात, तुम्ही पुस्तक लपवून बाहेर नेऊ शकत नाही. ही सुरक्षा यंत्रणा पुस्तकांसाठी वापरणारे आयुका ग्रंथालय भारतातले पहिले ग्रंथालय असावे.

ह्या चौकात दोन वडाची झाडे आहेत. ती मुद्दाम न तोडता वापरावीत. त्यांचा पण एखाद्या खगोलशास्त्रीय मॉडेलकरता उपयोग होईल का, असे चार्ल्सने विचारले. अजितला एक कल्पना सुचली. दोन झाडे म्हणजे एकमेकांभोवती फिरणारे तारा युगल समजू. त्यांचे दोघांचे मिळून असणारे गुरुत्वाकर्षण चितारणारे पॅटर्न त्याने काढून दिले व ते झाडांभोवती दगडविटांनी दाखवण्यात आले. तसेच ‘शून्य' बळ ज्या ठिकाणी असते असे लॅग्राजियन बिंदू पण दर्शवण्यात आले. तारा युगलाच्या अभ्यासकांना हे मॉडेल अर्थातच विशेष रुचते. ह्या चौकापलीकडे खास गुलाबांचा बगीचा आहे, ज्याला पुण्यातल्या ‘रोज शो'मध्ये बरेच पुरस्कार मिळाले आहेत.

‘देवयानी' आवार संपून ‘मेघनाद साहा' रस्ता पार करून आपण ‘आदिती' आवारात जातो. ह्या आवारात बाहेरच्या लोकांसाठीच्या कार्यक्रमांच्या जागा आहेत. त्यापैकी ‘आदिती' शेड १९८९मध्ये बांधलेली. पाळणाघर आणि (एक भाग) टेलिफोन एक्स्चेंज म्हणून ती वापरली जाते. देवांची माता आदिती पाळणाघर राबवते, ही कल्पना योग्यच नव्हे का? तिच्यावरून आदिती हे आवाराचे नाव पडले. पण आता ह्या आवारातली प्रमुख इमारत आहे ‘चंद्रशेखर प्रेक्षागार'. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर १९९५ साली दिवंगत झाले. त्यानंतर त्यांचे नाव ह्या प्रेक्षागाराला देण्यात आले. पण इथले ‘गणिती' टायलिंग जगात बहुतेक अन्यत्र नसावे. टाइल नेहमी चौकोनी, त्रिकोणी, फार तर षट्कोनी पण सारख्या बाहुंच्या असतात. पण रॉजर पॅनरोज याने वेगवेगळ्या लांबीच्या बाहूंच्या दोन प्रकारच्या पंचकोनी टाइल वापरून फरशी झाकता येते हे सचित्र आपल्या एका पुस्तकात दाखवले होते. त्याआधारे इथल्या लहानशा कुंडाचे टायलिंग केले आहे. प्रेक्षागारात छताला एक मोठा पक्षी भरारी घेताना दाखवला आहे. प्रेक्षागार बाहेरील संस्थांच्या कार्यक्रमांसाठी पण वापरण्यात येते, कारण ते ५०० लोकांसाठीचे पुण्यातले अद्ययावत प्रेक्षागार समजले जाते.

मी प्रारंभीच्या काळात देशा-परदेशांत व्याख्यानासाठी गेलो की सुरुवातीला ‘जाहिरातीची पाच मिनिटे' म्हणून आयुकावर लहानसा स्लाइड शो करत असे. १९९३मध्ये मी सिडनीमध्ये अँग्लो-ऑस्ट्रेलियन आब्झव्हेंटरीतर्फे आयोजित व्याख्यानात हा शो केला तेव्हा त्यात न्यूटनच्या कुंडाशेजारच्या पुतळ्याची स्लाइड दाखवली, त्या वेळी मी गमतीने म्हटले, “आयुकातला न्यूटन वडाच्या झाडाखाली बसला आहे आणि पुढे सफरचंद पडले म्हणून त्याची मती कुंठित झाला आहे!” लोकांनी विनोदाला हसून दाद दिली; पण व्याख्यानानंतर सीएसआयआरओ ह्या रेडिओ संस्थेचा ज्येष्ठ शास्त्रज्ञ रॉन ईकर्स माझ्याकडे आला आणि म्हणाला, “तुम्ही प्रयत्न करून पाहा : न्यूटन ज्या सफरचंदाच्या झाडाखाली बसत असे त्याचे ‘वंशज' आज इंग्लंडमधून मागवता येतात. तसे झाड तुम्ही न्यूटनच्या पुतळ्यामागे लावले तर?” त्यांनी तसे झाड सीएसआयआरओमध्ये लावले होते. ही कल्पना मला आवडली. ईकर्सनी मला काही पत्ते दिले. पण बाहेरच्या देशातून वनस्पतीची आयात ऑस्ट्रेलियात होऊ शकत नाही, म्हणून त्यांना झालेल्या डोकेदुखीचेही वर्णन केले. थोडक्यात, झाडाचा इतिहास मला कळला त्याप्रमाणे १८२० पर्यंत न्यूटनचे ते झाड हयात होते व अखेर वीज पडून गेले. पण तत्पूर्वी त्याचे वंशज तयार केले गेले होते. परंपरेने ते रॉयल बोटॅनिकल गार्डन्स (क्यू) व नंतर ब्रॉगडेल हॉर्टिकल्चरल ट्रस्टकडे आले. मी ब्रॉग्डेल ट्रस्टशी पत्रव्यवहार केला. त्यांनी काही रोपे आनंदाने देऊ केली: पण ती भारतात आणायची कशी? पहिल्यांदा मी फ्रेड हॉएलला विचारले... तो १९९४ च्या फेब्रुवारीत पुण्याला येणार होता. तेव्हा काही रोपे घेऊन येईल का? तो तीन रोपे घेऊन आला; पण त्याने आणलेली रोपे पुण्याच्या उन्हाळ्यात तग धरू शकली नाहीत. दुसऱ्यांदा ट्रस्टने रोपे पोस्टाने पाठवली. फॉरिन पोस्ट मुंबईने लालफितीत अडकवून आम्हाला त्याबद्दल उशिरा कळवले. आम्ही येऊन ती रोपे नेली ती अगदी वाळलेल्या स्थितीत. पण त्यांना पालवी फुटली, फुले पण लागली. मात्र, ती पण फार काळ जगली नाहीत.

दरम्यान, पुण्यातले तज्ज्ञ आम्हाला या प्रयत्नांबद्दल वेड्यात काढत होते. सफरचंदाचे झाड पुण्यात जगणार नाही, जगले तर त्याला फळे येणार नाहीत, असे ते निक्षून सांगत होते. तिसऱ्या प्रयत्नात, १९९६ साली ब्रॉग्डेल ट्रस्टने कळवले, की भारत सरकारचे परवानगीपत्र मिळाल्याशिवाय रोपे पाठवणे शक्य होणार नाही. मी माझा पंतप्रधान विज्ञान सल्लागार समितीवरचा सहसदस्य विनोद चोप्रा याला गाठले. तो दिल्लीतल्या ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचा संचालक होता. त्याने ती रोपे आयात करायचे सोपस्कार पूर्ण करून आयुकाकडे तीन रोपे पाठवली. तीनही रोपे काही वर्षे जगली. एका रोपाला तर ४-५ वर्षे नेमाने फळे येत होती. ती कापून आम्ही बारीक फोडी सर्वांना ‘स्वाद' घ्यायला ठेवत असू. पण २००७ सालापर्यंत तीनही झाडे वाळून गेली होती. निदान पुण्यात सफरचंद वाढून फलद्रूप होऊ शकते हे सिद्ध झाले. आता नव्याने पुन्हा प्रयत्न करू... अनुभवाने जास्त शहाणपणा येतोच! न्यूटनशेजारी लावलेल्या झाडाला फुले आली पण फळे नाही. त्याची वाढ तो वटवृक्षाच्या छायेत असल्याने खुंटली. आइन्स्टाइनशेजारच्या झाडाला फळे लागली, कारण त्याला मोकळ्या जागेत सूर्यप्रकाश मिळत होता. मी विनोदाने म्हणत होतो, की यातून सिद्ध होते की आइन्स्टाइनचा सिद्धांत न्यूटनच्या सिद्धांतापेक्षा जास्त समर्थ आहे!

आयुका ही भारतातली पहिलीवहिली वैज्ञानिक संशोधन संस्था होती जिने विज्ञानप्रसार व शालेय विद्यार्थ्यांत विज्ञान रुजवणे यासारखे जनताभिमुख कार्यक्रम हाती घेतले.

आमचा जनसंपर्क व विद्यार्थी संवाद आमच्या इमारती बांधून होण्याची वाट पाहत थांबला नाही. उदाहरणार्थ, २८ फेब्रुवारी १९९०चा राष्ट्रीय विज्ञानदिन आम्ही नारायण राणाच्या नेतृत्वाखाली साजरा केला. त्याच्या पश्चात सोमक रायचौधरी या आयुकातील शास्त्रज्ञाने संपर्काची धुरा सांभाळली.

१९९३ पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी विज्ञानावर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक आयोजित करायला आयुकाने सुरुवात केली. हिंदी/इंग्रजी/मराठीतून हा कार्यक्रम असतो आणि चंद्रशेखर प्रेक्षागार त्यासाठी राखून ठेवले जाते. हे पाचशे श्रोत्यांचे प्रेक्षागार अशा कार्यक्रमांसाठी तुडुंब भरलेले असते. अशाच व्याख्यानाद्वारे मी १४ ऑगस्ट १९९३ रोजी प्रेक्षागाराचा वापर सुरू केला होता.

१९९४च्या उन्हाळी (शाळेतल्या) सुट्टीदरम्यान मी एक नवा उपक्रम शाळकरी मुलांसाठी (८-१० इयत्तेत गेलेल्या) सुरु केला. दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार ५ दिवस शाळेतला विद्यार्थी आयुकातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रकल्प पुरा करतो. त्यासाठी तो रोज सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत आयुकात असतो. तिथे त्याला नाश्ता/जेवण दिले जाते. पाचव्या दिवशी तो आपल्या कामाचा अहवाल (लेखी) सादर करतो आणि त्यावर ५-७ मिनिटांचे भाषणही देतो. दरवर्षी जवळजवळ १२५ विद्यार्थी ह्या कार्यक्रमाचा फायदा घेत आलेत. वैज्ञानिक प्रकल्प कसा असतो, संशोधन संस्थेचे वातावरण कसे असते, वैज्ञानिक कसे वावरतात आदी मुलांना जवळून पाहायला मिळतात. पुढे यातील बरेचजण विज्ञान-तंत्रज्ञानाकडे वळले.

आयुकात किंवा पुण्यात एखादा शास्त्रज्ञ अथवा अन्य विषयांतला विद्वान भेट द्यायला आला असला तर त्याचे प्रासंगिक जाहीर व्याख्यान चंद्रशेखर प्रेक्षागारात होते. अशा व्याख्यानांची संख्या आता १०० वर गेली आहे. नोबेल पारितोषिकविजेते ॲन्थनी ह्युइश आयुकाचे सन्माननीय फेलो आहेत. त्यांचे भाषण ह्या प्रेक्षागारात झाले. एक संस्मरणीय प्रसंग होता राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या भेटीचा. भेट अनौपचारिक होती, पण आयुका पाहताना आणि शाळकरी मुलांशी संवाद साधताना कलाम यांना वेळेचे भान राहिले नाही. त्यांची भेट ठरल्या वेळेपेक्षा दुप्पट काळाची झाली.

इंटरनेटचा एक कल्पक वापर आयुकातील अरविंद परांजपे याने आकाशदर्शनासाठी केला. पुण्यातून इंटरनेटवर आज्ञा देऊन कॅलिफोर्नियातल्या माऊंट विल्सन येथील १५ इंची टेलिस्कोप हव्या त्या दिशेला वळवून आकाशातल्या तारकांची निरीक्षणे त्याकरवी करून घेता येतात. कॅलिफोर्नियाचे स्थानिक घड्याळ पुण्यातल्या स्थानिक वेळेच्या साडेबारा तास मागे असते. याचा फायदा घेऊन अरविंदने मुलांना दुपारी अडीच-तीन वाजता आयुकात बोलावून त्यांच्या समक्ष माऊंट विल्सनवरील दुर्बिणीकरवी निरीक्षणे आणि छायाचित्रण करून दाखवले, कारण त्या वेळी तिथे रात्र असते. हा प्रयोग कमालीचा यशस्वी आणि प्रभावशाली झाला.

१९९७-९८च्या सुमारास प्रेक्षागाराभोवतीच्या मोकळ्या जमिनीवर एक खुल्या हवेतील विज्ञान प्रदर्शन मांडायला सुरुवात झाली. ह्या सायन्स पार्कमध्ये विज्ञानाचे नियम विशद करणारी काही मॉडेल्स बसवण्यात आली. अशा तऱ्हेने हसतखेळत विज्ञान पचनी पडते. नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स म्युझियम्सने ही मॉडेल्स बसवून देण्यात मदत केली. त्याचप्रमाणे १९८९पासून जनसामान्यांकरता आकाशदर्शन घडवून आणायची सोय आयुकाने केली आहे. इतकेच नव्हे, ८-१० इंच व्यासाच्या दुर्बिणी स्वतः तयार करायची दीक्षा देणाऱ्या कार्यशाळा आयुकात वेळोवेळी भरतात, किंवा आयुकातर्फे देशात इतरत्र आयोजित केल्या जातात.

वास्तविक हौशी खगोलशास्रज्ञांशी संवाद साधण्याचे काम १९८८ पासून सुरू झाले. प्रथम पुण्यातली गो. रा. परांजपे यांनी सुरू केलेली ज्योतिर्विद्या परिसंस्था आणि नंतर ‘आकाशमित्र'सारख्या इतर हौशी खगोलशास्त्रांच्या संघटनांशी सहकार्य करून आयुकाने संयुक्त कार्यक्रम केले. १९९१ साली सर्व भारतीय संघटनांना एका महासंघाच्या छत्राखाली आणण्यासाठी आयुकाने पुण्यात हौशी खगोलशास्त्रज्ञांचा राष्ट्रीय मेळावा घडवून आणला.

२०००-२००१च्या सुमारास सुनीताबाई देशपांडे यांनी आयुकाच्या विद्यार्थिलक्षित कार्यक्रमांकरिता २५ लाखांची देणगी देण्याचा मनोदय व्यक्त केला. पु.लं.ची अर्थात त्याला सहमती होती. पण सर्व सोपस्कार पुरे होऊन देणगीतून इमारत उभी राहायला २००४ साल उजाडले. तोपर्यंत पु.लं.चा स्वर्गवास झाला होता. पण इमारतीला ‘पुलत्स्य' हे सप्तर्षीपैकी एका ताऱ्याचे नाव देऊन आम्ही त्यांची स्मृती सतत समोर ठेवली. इथल्या प्रकल्पाला नाव आहे मुक्तांगण विज्ञान शोधिका (एमव्हीएस). चंद्रशेखर प्रेक्षागाराशेजारीच ‘पुलत्स्य' दिमाखाने उभे आहे.

आज अरविंद गुप्ता यांच्या निदर्शनाखाली एमव्हीएसमध्ये शाळेतल्या मुलांना विज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन होते. त्यासाठी गुप्तांनी गमतीदार खेळणी तयार केली आहेत. एखादे खेळणे गमतीशीर ‘वागते' ते का? त्यामागचे विज्ञान कळायला त्यातून मदत होते. अरविंदचा कटाक्ष आहे, की स्वस्त किंवा टाकाऊ घरगुती गोष्टींपासून ही खेळणी बनवावीत. मुले, शिक्षक ती स्वतः बनवायला शिकतात आणि एम.व्ही.एस.ची शिकवण पुढे चालू ठेवतात. अरविंद गुप्ताने मुलांसाठी हिंदीतून विज्ञानाची रोचक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची मराठी, इंग्रजी भाषांतरे पण एमव्हीएसतर्फे प्रसिद्ध केली जात आहेत.

आयुका रोज नव्याने विस्तारते आहे.

(पुण्यभूषण, दिवाळी २०१४मधून साभार)

जयंत नारळीकर







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results