
राष्ट्रीय चर्चेत नेहरु-गांधी घराणं नेहमीच असतं. सत्ताधारी भाजपचं तर त्याशिवाय पान हलत नाही. पण चर्चेची आणि टिकेची गाडी राहुल-सोनिया-राजीव-इंदिरा-जवाहरलाल एवढीच मागे जाते. जवाहरलाल यांचे वडील मोतीलाल यांचा उल्लेख फारसा होत नाही. खरंतर नेहरू घराण्याच्या राजकीय प्रवासाचे आद्यपुरुष मोतीलाल हे आहेत. पण ते आज बरेचसे विस्मरणात गेले आहेत.
१९३१च्या ६ फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं तेव्हा ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक मोठे नेते होते. ते मूळचे वकील होते, कायदेपंडित होते. त्यांनी दीर्घकाळ काँग्रेसमार्फत काम केलं होतं आणि १९१९ आणि १९२८ अशा दोन वर्षी ते काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.
जमीन-जुमल्यांच्या मोठमोठ्या खटल्यात दिवाणी वकील म्हणून काम करून त्यांनी एका आयुष्यात मोठीच आर्थिक प्रगती केली होती. ते इंग्लंडच्या कोर्टात जाऊनही खटले चालवत. त्यासाठी त्यांना समुद्रमार्गे जावं लागे. तेव्हाच्या समजेनुसार समुद्र पर्यटन करणं निषिद्ध होतं. त्यामुळे काश्मिरी ब्राह्मणांनी त्यांना जातीतून बहिष्कृतही केलं होतं. पण मोतीलाल बधले नव्हते.
त्यांच्यातली ही बंडखोरी अनेक बाबतीत दिसते. त्यांनी ‘लीडर' या दैनिकाची जबाबदारी पार पाडल्यावर ‘इंडिपेंडंट' नावाचं दैनिक काढलं होतं. एखाद्या गढीसारखं वाटावं असं ‘आनंद भुवन' नावाचं घर त्यांनी अलाहाबाद (म्हणजे आजचं प्रयागराज)मध्ये घेतलं होतं. ते त्यांनी एकेदिवशी काँग्रेस चळवळीला देऊन टाकलं होतं.
मोतीलाल नेहरू यांची देशाला दोन महत्त्वाची योगदानं मानली जातात. ते १९१९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष असताना जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. ब्रिटिश सरकार त्याची निष्पक्ष चौकशी करणार नाही हे ताडून त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक सत्यशोधन समिती नेमली होती. या समितीमार्फत जे काम गांधीजींनी केलं. त्यातून त्यांच्या अनेक गुणांचं दर्शन काँग्रेस आणि देशाला झालं. त्यातून गांधीजींचं नेतृत्व पुढे यायला मदत झाली आणि देशाला नवा नेता मिळाला. ही गोष्ट मोतीलालांच्या गुणग्राहकतेमुळे झाली असं म्हणता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाल्यापासून स्वतंत्र देशाचं चित्र कल्पिण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न अनेक महानुभावांनी केला. १८९५ मध्ये पहिल्यांदा राज्यघटनेचं सर्वसाधारण स्वरूप कसं असावं याची ढोबळ मांडणी करण्यात आली होती. त्याचा मसुदा लोकमान्य टिळकांनी केला होता. नंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनीही एक मसुदा तयार केला होता. पुढे १९२६ मध्ये मोतीलाल नेहरू यांनी भारतीय लोकांना पूर्णपणे जबाबदार असणारं सरकार स्थापन करणं आणि भारताच्या घटनेचं स्वरूप निश्चित करणं, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी अनेकांच्या मदतीने राज्यघटनेचा एक कच्चा आराखडाही तयार केला होता. निव्वळ भारतीयांनी लिहिलेला हा पहिला पक्का आराखडा मानला जातो. आपली कायदेविषयक तज्ज्ञता पणाला लावून त्यांनी देशासाठी एक पथदर्शक दस्तावेज करून ठेवला, हे त्यांचं दुसरं महत्त्वाचं योगदान मानलं जातं.
नेहरु-गांधी घराण्याबद्दल बरंच उलटसुलट बोललं जात असताना त्या घराण्याचे आद्यपुरुष असलेल्या मोतीलाल यांचं हे योगदान कसं नाकारता येईल?
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.