
२६ जानेवारी या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी ‘युनिक फीचर्स’ या नव्या पोर्टलची सुरुवात होत आहे. १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान नेतृत्वाखाली भारताची राज्यघटना तयार झाली. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटनांपैकी एक मानली जाणारी ही राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारली गेली. तेव्हापासून देशात एक नवं पर्व सुरू झालं. ब्रिटिशांच्या गुलामीतून आपण आधीच स्वतंत्र झालो होतो, पण २६ जानेवारीला या देशातील जनतेचं राज्य-गणराज्य, प्रजासत्ताक प्रस्थापित झालं. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करण्याचा निर्धार त्या दिवशी केला गेला. या घटनेला यंदाच्या २६ जानेवारीला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणदिनी हे पोर्टल सुरू होत आहे, हीच बाब या पोर्टलची भूमिका स्पष्ट करणारी आहे.
भारतीय राज्यघटनेचं भव्य स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणं, सामाजिक-आर्थिक न्यायाचा आग्रह धरणं, विचार-अभिव्यक्ती-विश्वास-श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य अबाधित राहील हे पाहणं, सर्वांना दर्जाची आणि संधीची समानता उपलब्ध होत राहील यासाठी आग्रही राहणं आणि समाजामध्ये बंधुता अबाधित राहील यावर लक्ष ठेवणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपल्या परीने पार पाडण्याची भूमिका घेऊन हे पोर्टल सुरू होत आहे.
पत्रकार मित्रांनी स्थापन केलेल्या ‘मितानिन फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे हे पोर्टल सुरू करत आहोत. ही संस्था ‘ना नफा’ तत्त्वावर चालते आहे. संस्थेतर्फे तरुण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत पत्रकारी प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. त्याचप्रमाणे पुण्यातील कष्टकरी व गरीब वस्त्यांतील नववाचकांसाठी ‘सलाम पुणे’ नावाचं एक नियतकालिकही चालवलं जातं. हे नियतकालिक गेली चार वर्षं हजारो घरांपर्यंत विनामूल्य पोहचवलं जात आहे. या दोन्ही उपक्रमांची माहिती ‘आम्ही कोण’ या शीर्षकाखाली पोर्टलवर उपलब्ध आहे; ती वाचकांनी जरूर वाचावी.
हे दोन्ही उपक्रम ‘युनिक फीचर्स’ या माध्यमसंस्थेच्या मदतीने चालवले जातात. ‘युनिक फीचर्स’चा माध्यम क्षेत्रातील तीसहून अधिक वर्षांचा अनुभव, महाराष्ट्रातील प्रश्नांचा आवाका व अभ्यास आणि विविध क्षेत्रांतील प्रभावी वावर यामुळेच हे उपक्रम चालू आहेत. हे पोर्टल चालवण्याची जबाबदारीही त्यामुळेच ‘युनिक फीचर्स’वर सोपवली गेली आहे. या संस्थेचा सामाजिक पत्रकारितेतील लौकिक पाहता या संस्थेच्या नावानेच हे पोर्टल चालवलं जाणार आहे. ‘युनिक फीचर्स’ने ही जबाबदारी विनामोबदला घेतल्यामुळेच हे पोर्टल सुरू करणं आणि चालवणं शक्य झालं आहे.
आज देशात आणि महाराष्ट्रात दैनिकं, वृत्तवाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पॉडकास्टर्स यांचा तुफानी मेळा भरलेला असताना आणखी एक पोर्टल कशासाठी, असा प्रश्न काहींना पडू शकतो. माध्यमांचा गदारोळ माजलेला असताना असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण ‘युनिक फीचर्स’ने गेली ३५ वर्षं स्वतंत्र आणि समांतर पत्रकारिता करण्याचा वसा घेतलेला आहे. मग ते वृत्तपत्रीय लिखाण असो, दूरचित्रवाणीतील मुशाफिरी असो, अनुभव मासिक असो किंवा समकालीन प्रकाशन असो; आपल्या भूमिकेपासून न ढळता ही संस्था आणि संस्थेतील पत्रकार निष्ठेने काम करत आले आहेत. कोणत्याही एका विचारसरणीचा पदर न धरता जगाकडे तटस्थपणे पाहण्याचा; लोकांमध्ये जाऊन, लोकांचे प्रश्न समजून ते अभ्यासूपणे मांडण्याचा आणि व्यक्ती-संस्था-शासन यांच्यामार्फत समाजबदलासाठी आणि समाजस्वास्थ्यासाठी जे प्रयत्न होत आहेत, ते समाजासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करत आलेली आहे. समाजाचे खरे प्रश्न समाज आणि सरकार यांच्यासमोर मांडत राहणं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे प्रयत्नही पुढे आणत राहणं असं दुहेरी काम संस्था करत आलेली आहे. त्याशिवाय चांगला वाचक आणि पर्यायाने चांगला नागरिक घडवण्यासाठी साहित्य-कला आदी जीवनाच्या विविध क्षेत्रांतील नवनव्या घटना-घडामोडी - संकल्पनांशी त्यांचा परिचय करून देणं, असंही काम संस्था करत आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर हल्लीच्या मुख्य माध्यमांचं स्वरूप कसं दिसतं? वृत्तपत्रं आपला खप टिकवण्याच्या मागे आहेत. वृत्तवाहिन्यांना टीआरपीची चिंता आहे. यू ट्यूब चॅनेल्सना जास्तीत जास्त व्ह्यूज आणि शेअर्सचं वेड लागलंय. डिजिटल माध्यमं आपल्याला वाढीव क्लिक्स कसे मिळतील, याची आस बाळगून आहेत. या सर्व माध्यमांमध्ये चांगलं काम करणारे पत्रकार निश्चितच आहेत. शिवाय काही प्लॅटफॉर्म्स जाणीवपूर्वक स्तुत्य प्रयत्नही करत आहेत. पण या सर्वांवर आपल्या कामातून पैसा उभा करण्याचं आणि त्यावर उदरनिर्वाह करण्याचं दडपण आहे. त्यामुळे लोक काय क्लिक करतील, लोक काय बघतील, लोक काय डोक्यावर घेतील याचा विचार करत राहणं त्यांच्यासाठी अपरिहार्य बनून गेलं आहे. (किमान त्यांनी तसं मानलं तरी आहे.) इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी, की लोकांना जबाबदार असणं वेगळं आणि लोकानुनय करणं वेगळं. लोकानुनयाने वाचक-प्रेक्षक अवश्य मिळतात, पण लोकांच्या कलाप्रमाणे तुम्हालाही बदलावं लागतं. समाजाच्या घडणीत योगदान देण्याचं पत्रकारी मूल्य त्यातून मागे पडण्याचा धोका असतो. म्हणूनच कामातून पैसा आणि पैशातून काम हे दुष्टचक्र भेदून एक नवं माध्यम उभं करता येईल का, असा प्रयोग करून पाहण्याच्या मिशाने हे पोर्टल सुरू करत आहोत.
अर्थात पोर्टल उभं करायचं आणि ते स्वतंत्ररीत्या चालवायचं तर पैसा लागणारच. त्यासाठी ‘युनिक फीचर्स’च्या ३५ वर्षांच्या कामातून जोडले गेलेले सुहृद, सामाजिक व स्वतंत्र पत्रकारितेचं महत्त्व पटलेले समविचारी आणि आपल्या मिळकतीचा समाजधारणेसाठी सुयोग्य विनिमय करू पाहणाऱ्या उदार व्यक्ती यांच्या मदतीतून एक निधी उभा करायचा आणि या पोर्टलसाठी काम करणाऱ्या पत्रकारांनी या उपक्रमावर कमीत कमी आर्थिक भार पडावा याची काळजी घेऊन खर्च कमी ठेवायचा, असा आमचा प्रयत्न आहे. पोर्टल चालवण्याची जबाबदारी ‘युनिक फीचर्स’ने विनामूल्य घेतल्यामुळे पोर्टल आर्थिकदृष्ट्याही आवाक्यात आलं आहे. महाराष्ट्रभर पसरलेली आमची संपादक-अभ्यासक-पत्रकार मित्रमंडळी आणि संस्थेशी जोडल्या गेलेल्या सामाजिक संस्था व त्यांचे कार्यकर्तेदेखील कोणत्या ना कोणत्या प्रकारे या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहतील, याची खात्री आहेच.
अशा रीतीने सर्वांच्या सहकार्यातून डिजिटल माध्यमातील पत्रकारितेचा हा नवा प्रयोग साकरणार आहे. त्याला शहरी, निमशहरी आणि गाव-खेड्यांतीलही सजग, तरुण आणि उत्सुक वाचकांचा आश्रय मिळेल, अशी अपेक्षा बाळगून आहोत.
या पोर्टलमार्फत आणखीही काही घडवण्याची इच्छा आहे.
* ‘मितानिन’तर्फे गेली चार-पाच वर्षं ‘युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम’ चालवलं जातं. पुण्यात विविध पत्रकारी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेचा व्यापक हेतू रुजवणं, आपल्या समाजातील विविधतेचा-प्रश्नांच्या कंगो-यांचा आवाका दाखवून देणं आणि प्रत्यक्ष कामातून त्यांना पत्रकारितेची कौशल्यं शिकवणं हा या उपक्रमाचा हेतू आहे. सध्या हे काम निवडक १२-१५ विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी केलं जातं. त्यातील काही तरुण पत्रकार आज मुख्य धारेतील माध्यमांत चांगलं काम करत आहेत, धडपडत आहेत.
हेच काम आपल्याला महाराष्ट्रभरातील होतकरू पत्रकारांसाठी करता येईल का, असा विचार अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते काम करण्यासाठी या पोर्टलचा प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग करून घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थपूर्ण पत्रकारिता करण्याची खुमखुमी असणा-या विशी-पंचविशीतल्या तरुणांना प्रस्थापित माध्यमांमध्ये त्यांच्या क्षमतांनुसार काम करायला मिळतंच असं नाही. त्यामुळे त्यांची उमेदीची वर्षं फुटकळ कामं करण्यातच जातात. तरुण रक्ताच्या उर्जेचा हा व्ययच म्हणायचा. त्यामुळे हुशार, मेहनती आणि व्यापक समज असलेल्या तरुणांना पोर्टलमध्ये लिहिण्याची-बोलण्याची-विषय कव्हर करण्याची संधी द्यावी आणि चांगल्या पत्रकारांची एक फळी तयार करावी, असा हे पोर्टल सुरू करण्यामागील एक हेतू आहे.
* दुसरी गोष्ट म्हणजे, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात पुण्या-मुंबईपेक्षा वाचण्याची, जग समजून घेण्याची ओढ खूपच जास्त आहे. अशा उत्सुक वाचकांमध्ये तरुण मुलामुलींचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यांना एकाच जागी चांगला, माहितीपर, विचारप्रवर्तक आणि समजेच्या कक्षा रुंदावणारा मजकूर मिळाला तर हवा आहे, असं आम्हाला अनेक लोक सांगत असतात. या वाचकाला राज्य-देश-जग या सर्वच पातळ्यांवरचे विषय समजून सांगणं, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अभ्यासकांचे एकेका विषयावरचे लेख वाचायला देणं, जुन्या-नव्या कामांबद्दल-प्रयोग-प्रयत्नांबद्दल सांगणं, मुलाखतींतून विविध विषय आणि माणसं यांचा परिचय करून देणं यासाठी हे पोर्टल काम करणार आहे. याचा उपयोग विविध सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, पत्रकार आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांनाही निश्चितच होईल.
थोडक्यात, या पोर्टलवर काय मिळेल?
- समाजस्वास्थ्याचा आणि समाजघडणीचा व्यापक हेतू मनाशी ठेवून लिहिणारे-बोलणारे पत्रकार, अभ्यासक, तज्ज्ञ इथे लिहितील-बोलतील. त्यांच्यामार्फत माहिती-अभ्यास-विचार या पोर्टलवर मिळेल.
- महाराष्ट्रभरातील छोट्या शहरांतील व गावांतील इच्छुक पत्रकारांना प्रशिक्षण देऊन नवे पत्रकार घडवले जातील. त्यांना या पोर्टलवर संधी मिळेल.
- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक घटना-घडामोडी घडत असतात. पण मुख्य धारेतील माध्यमांचं कधी त्याकडे लक्ष जात नाही, कधी त्या घडामोडी त्यांच्या प्राधान्यक्रमावर नसतात. त्या प्रकाशात आणणं, त्यांची नीट माहिती देणं, त्यांचं विश्लेषण करणं हे कामही या पोर्टलवर घडावं असा प्रयत्न आहे.
- सरतेशेवटी आणखी एक गोष्ट. ‘युनिक फीचर्स’च्या पत्रकारांनी गेल्या ३५ वर्षांत जे प्रचंड लिखाण केलं, विषय शोधले, खोदले आणि लिहिले त्यातील निवडक महत्त्वाचं लिखाण या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तसंच ज्या महत्त्वाच्या लेखकांनी-पत्रकारांनी-अभ्यासकांनी ‘युनिक फीचर्स’साठी ‘अनुभव’ मासिकासह इतरही अनेक ठिकाणी विपुल प्रमाणात लिहिलं आहे, तेही ऑनलाइन उपलब्ध असावं, अशी आग्रही मागणी वाचक आमच्याकडे करत असतात. या सूचनेनुसार संदर्भमूल्य असलेलं, महत्त्वाचं लिखाण या पोर्टलवर उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
थोडक्यात, समकालीन, सखोल आणि समतोल लेखनाचं एक समृद्ध दालन या पोर्टलद्वारे सुजाण वाचकांसाठी खुलं होत आहे. वाचक त्याला उत्साही प्रतिसाद देतील, अशी आशा आहे.
टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com
टीम युनिक फीचर्स पोर्टल