
समजा, आपण एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला आणि तो त्या व्यक्तीने खूप वेळ पाहिलाच नाही... किंवा समजा, त्या व्यक्तीचं ‘लास्ट सीन' पाच मिनिटांपूर्वीचं आहे आणि तरी आपल्या मेसेजला १५-२० मिनिटं काहीच उत्तर आलं नाही तर...? पहिल्या परिस्थितीत कदाचित आपल्याला काळजी वाटेल, दुसऱ्या परिस्थितीत राग येईल. आता समजा, ती व्यक्ती आपली अत्यंत प्रेमाची आहे, तर? तर मात्र सगळी समीकरणं बदलतात. मनात नाही नाही त्या शंका येऊ लागतात- ती व्यक्ती मुद्दाम असं करतेय का? आपल्याला टाळतेय का? आपण त्या व्यक्तीला नको आहोत का?
प्रेम मिळवण्यासाठी माणूस खूप आटापिटा करतो. ते प्रेम मिळतंय असं वाटू लागलं तर भरभरून जगू लागतो. पण मग हीच भावना अत्यंत त्रास देणारी का ठरते? प्रेमात माणसं निराश का होतात? प्रेम मिळालं नाही म्हणून टोकाचं पाऊल का उचलतात? कोणी प्रेमात अत्यंत समंजस होऊन उत्कट अनुभव घेऊ शकणारे अमृता इमरोझ होतात, तर कोणी आपल्याच प्रेमाच्या माणसाची हिंसा करतात. का होतो प्रेमात इतका गोंधळ? एक कारण असं असावं, की माणसाने या एका भावनेवर अनेक गोष्टी अवलंबून ठेवल्या आहेत. व्यक्तीची स्वत:ची किंमत ठरवण्यापासून ते लैंगिक गरजा भागवण्यापर्यंत सगळी जबाबदारी प्रेम या भावनेवर आहे. म्हणूनच ही भावना नीट समजून घेणं गरजेचं ठरतं.
प्रेम ही भावना इतका तीव्र अनुभव का देते?
मानसशास्त्रात प्रेमाच्या एकूण ३६ व्याख्या आहेत. प्रेम ही गोष्ट एका व्याख्येत मावत नाही, कारण प्रेमाची गरज फारच आदिम आणि खोल आहे. कशी? हे समजून घेण्यासाठी अल्फ्रेड अॅडलर या मानसशास्त्रज्ञाने केलेली मांडणी बघू. अॅडलर म्हणतो, अनेक वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रवासात माणसामध्ये दोन मानसिक गरजा तयार झाल्या. एक म्हणजे त्याला आपण कोणत्या तरी गटाचा भाग आहोत असं वाटण्याची गरज भासायला लागली. दोन, त्या गटात आपण महत्त्वाची भूमिका पार पडत आहोत याची त्याला खात्री पटणंही गरजेचं झालं. आजही या दोन गरजांच्या पलीकडची एखादी गोष्ट आपण करतो का, या प्रश्नाला सहजी उत्तर सापडणार नाही.
अॅडलर म्हणतो तशा गरजा का बरं तयार झाल्या? कारण उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणसाला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली, पण त्याबरोबर स्वत:चा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही हेही त्याला कळलं. जंगली प्राणी सुळे आणि नखं यांच्या जोरावर तगून राहू शकतात, पण माणसाकडे तसं काहीही नाही. तो केवळ इतरांच्या मदतीने जिवंत राहू शकतो. यातून आपण वेगळे पडलो तर काय, या विचाराने त्याला चिंता वाटू लागली. मग सतत आणि विविधप्रकारे इतरांशी जोडलं जाण्याचे प्रयत्न त्याने सुरू केले. त्यातून प्रेमाचे अनेक प्रकार तयार झाले. इतरांशी जोडलं जाण्याबरोबरच एकटेपण घालवण्यासाठी माणसाने अनेक पद्धतींचा आधार घेतला. कधी व्यसनात, तर कधी प्रचंड कामात बुडवून घेतलं आणि प्रेमाच्या भावनिक गरजेतून इतर अनेक मानसिक समस्या तयार झाल्या.
हवंहवंसं वाटणारं प्रेम समस्या का बनलं? केव्हापासून?
तर, एकूणच मानवी आयुष्यात प्रेम मिळवण्यासाठी प्रेम करणं हे समीकरण झालं तेव्हापासून हवंहवंसं वाटणारं प्रेम समस्या बनलं. याबरोबरच विवाहसंस्था तयार होऊ लागली तेव्हा प्रेमाचा उस्फूर्त अनुभव जाऊन ते एका विशिष्ट चौकटीत आलं. आपल्यावर लोक प्रेम कधी करतील याची समीकरणं काळ, प्रदेशानुसार बदलत गेली. आपल्याला कोणी स्वीकारायचं असेल तर इतरांना छान वाटेल असं आपण स्वत:ला तयार केलं पाहिजे, हा विचार जोर धरू लागला. आजही आजूबाजूला पाहिलं तर अशी उदाहरणं दिसतात. अनेक पुरुषांना असं वाटतं, की आपण जितके जास्त पैसे कमावू तितकं आपल्याला स्वीकारण्याची शक्यता अधिक असेल. त्यामुळे जास्तीत जास्त पैसा, संपत्ती गोळा करण्याचा मार्ग स्वीकारला जातो. तर स्त्रियांना वाटतं, की हवं ते प्रेम मिळण्यासाठी आपण जास्तीत जास्त सुंदर दिसायला हवं. आणखी एक मार्ग अनेकांकडून वापरला जातो, तो म्हणजे जास्तीत जास्त सत्ता मिळवणं. थोडक्यात काय, तर लोक सतत पैसा, प्रॉपर्टी, सत्ता, सौंदर्य यांच्या मागे जात राहतात. केवळ याच आशेने, की आपल्याला प्रेम करणारी व्यक्ती मिळेल. पण तसं घडतं का? हे मार्ग आयुष्यभर प्रेम करणारी व्यक्ती मिळण्याची खात्री देतात का? याला ठामपणे ‘हो' असं उत्तर देता येत नाही. कारण सगळं करूनही अनेक माणसं नाखूष, निराश दिसतात.
असं का होत असेल?
हे समजून घेण्यासाठी प्रेम या गोष्टीचा आणखी एक व्यक्तिसापेक्ष पैलू बघायला हवा. प्रेम मिळवण्याची गरज आदिम असली तरी ते मिळवण्याच्या पद्धती व्यक्ती-व्यक्तीनुसार बदलतात. याला आपण त्या-त्या व्यक्तीचा प्रेम करण्याचा पॅटर्न म्हणू शकतो. आयुष्यातील व्यक्ती बदलत गेल्या तरी हा पॅटर्न तोच राहतो. हे पॅटर्न समजून घेण्यासाठी आपण काही काल्पनिक उदाहरणं पाहू या.
१. पहिल्या प्रकारचा पॅटर्न म्हणजे अशा लोकांना आपण प्रेम मिळवण्याच्या योग्यतेचे नाही असं वाटत असतं. असे लोक प्रेम मिळवण्यासाठी सतत स्वत:च्या इच्छांना मारतात, इतरांची उद्दिष्टं आपली मानून तीच पूर्ण करण्यात आयुष्य घालवतात. सुनीता ही चाळिशीतली सर्वसामान्य बाई. तिने प्रेमाचं नातं सुरू करण्यात पुढाकार घेतला; मात्र त्या व्यक्तीचे सगळे प्रश्न तिने स्वत:चे करून घेतले. त्यासाठी स्वत:च्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीही ती कायम पुढे ढकलत राहिली.
हळूहळू सुनीताला गृहीत धरलं जाऊ लागलं. कधी तरी चार लोकांसमोर तिचा अपमान केला जाऊ लागला, तरीही तिला हे प्रेमच वाटत राहिलं. प्रेमात माणसं इतकं तर करतातच ना, अशी तिने स्वत:चीच समजूत घातली. कारण तिच्या प्रेमाच्या व्यक्तीला ती कधी म्हणजे कधीच दुखवू शकत नव्हती. आपल्या आयुष्याच्या सगळ्या दोऱ्या तिने त्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकल्या होत्या. व्यक्ती म्हणून आपला आदर राखला गेला पाहिजे, ही गरज तिला वाटत नव्हती. कारण ती दुसरी व्यक्ती आयुष्यात असेल तरच स्वतःचं अस्तित्व सहन होईल अशी तिने समजूत करून घेतलेली होती. त्यामुळे ती सतत तिच्या प्रेमाच्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायची. त्या व्यक्तीचं ‘व्हॉट्सअॅप लास्ट सीन' पहा, तिचा फेसबुकवर माग काढ, अशा गोष्टीत तिचा वेळ जायचा.
आपली प्रेमाची व्यक्ती आयुष्यातून गेली तर आयुष्य किती भयंकर असेल, या विचाराने ती सतत चिंताग्रस्त असायची. तिच्या आयुष्याचं संपूर्ण डिझाइन हे ती व्यक्ती आपल्या आयुष्यातच कशी राहील या एका विचारावर तयार झालेलं होतं. म्हणजे नोकरी कोणत्या शहरात करावी, प्रमोशन घ्यावं की नाही, इतर लोकांशी कसं नातं ठेवावं, हे सगळे निर्णय ती त्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवूनच करत आलेली होती. पण अशा नात्यात समाधान मिळत नसतं. कारण ही प्रेमाच्या रूपातील चिंता असते. अति झालं की असं नातं थांबतं. कधी कधी दुसरी कुणी तरी व्यक्ती आयुष्यात येते, पण पॅटर्न तोच राहतो.
२. दुसऱ्या प्रकारच्या पॅटर्नमध्ये कायम भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसलेली व्यक्ती निवडली जाते. एक उदाहरण शेखरचं. शेखर जेमतेम विशीतला मुलगा. त्याच्या स्वत:पेक्षा अनेक अर्थांनी वरच्या स्तरावर असलेली मुलगी त्याला आवडली. त्या मुलीकडून प्रतिसाद मिळावा यासाठी तो सतत धडपड करतो, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. शेखरसारख्या लोकांचं लहानपणापासूनच स्वतःबद्दलचं मत फारसं निरोगी नसतं. त्यांच्यापेक्षा वरचढ वाटणाऱ्या व्यक्तीने त्यांची दखल घेतली तरच त्यांना स्वत:बद्दल चांगलं वाटतं. त्या मुलीने साधा एक मेसेज केला तरी शेखरच्या मेंदूत आनंदाचं रसायन स्रवतं आणि त्याला किक बसते. आपण काही तरी साहस करत आहोत असं त्याला वाटायला लागतं. मग तो अनेक गेम करतो. तिला हरतऱ्हेने खूष करायचं, आपणच तिच्यासाठी कसे योग्य चॉइस आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. उदा. तो त्या मुलीचे कॉलेज प्रोजेक्ट्स करून देतो, तिच्यासाठी मोठी गिफ्ट्स घेतो, तिची सतत स्तुती करतो; पण यातून काही साध्य होणार नसतं. कारण शेखरला हे कळत नाही, की वास्तविक अशा वेळी तो त्या मुलीला मिळवण्याची आपली क्षमता स्वतःलाच पटवून देण्याची धडपड करत असतो.
३. तिसऱ्या प्रकारात प्रेमाच्या शोधातली व्यक्ती गरजा भागवणाऱ्याच्या भूमिकेत जाते. नितीन हा मध्यमवयीन गृहस्थ. त्याचा प्रेमविवाह झालेला, लग्नानंतर त्याने त्याच्या बायकोच्या आयुष्याची जबाबदारीच घेतली. तिच्या सगळ्या प्राथमिक गरजा भागवणं, पैसे पुरवणं, तिची सगळी बिलं भरणं, इथपासून ते तिच्यासाठी प्रॉपर्टी खरेदी करण्यापर्यंत सगळं त्याने केलं. आपण तिची काळजी घेतोय असं त्याला वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्याने तिच्या सगळ्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. ते करत असताना तो तिला सतत त्याची जाणीव करून द्यायचा. वास्तविक नितीनच्याच विचार करण्यात गडबड होती. त्याला वाटत होतं, की आपण हे केलं नाही तर कुणी आपल्यावर प्रेम करणारच नाही. इथे प्रेमाच्या रूपात भीतीच जास्त होती.
४. प्रेमाचा चौथा पॅटर्न वागवणाऱ्या व्यक्ती सतत दुर्मुखलेल्या असतात. समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत असेल हे नेमकं न समजल्याने स्वत: फार बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, प्रेम व्यक्त करत नाहीत; पण इतरांची परीक्षा मात्र घेत राहतात, आपल्या बोलण्यात सतत बदल करत राहतात. आपल्या भावना इतरांना समजल्या तर त्यांचा दुरुपयोग होईल किंवा आपण दुखावले जाऊ याची त्यांना भीती वाटत असते. हे लोक समोरची व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते का हे आयुष्यभर जोखत राहत राहतात आणि प्रेम कसं नाहीये याचे पुरावे शोधत राहतात. उदा. संहिता तिशीतली तरुणी. थिल्लर प्रेमाचं वय उलटून गेलेलं असलं तरी तिला तिचं प्रेम सापडलेलं नव्हतं. ती कधी मनातील गोष्ट तिच्या प्रेमाच्या व्यक्तीला सांगायची. त्यामुळे त्या व्यक्तीला वाटायचं, की संहिता आपल्याला जवळचं मानते. मात्र, कधी कधी ती अगदी लहानशी गोष्टही त्या व्यक्तीपासून लपवून ठेवायची. ती कधी स्वत:हून त्या व्यक्तीला अनेक मेसेज करायची, तर कधी पूर्ण आठवडाभर काहीही बोलायची नाही. आपण वागण्यात एकवाक्यता ठेवली तर आपल्या मनात काय चालू आहे हे लोकांना समजेल अशी तिला भीती असायची. याला ‘हॉट अॅन्ड कोल्ड अटॅचमेन्ट स्टाइल' असं म्हणतात. इथे प्रेमाच्या रूपात संहिताच्या मनात नैराश्यच भरलेलं होतं.
प्रेमाचे हे पॅटर्न्स फक्त तरुण वयातच त्रास देतात की काय असं वाटेल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आयुष्याचे सगळे अनुभव घेतलेली साठीच्या घरातली माणसंही कधी कधी या प्रकारच्या पॅटर्न्सच्या तावडीत सापडलेली असतात.
५. पॅटर्न्सचा पाचवा प्रकार जास्त त्रासदायक असू शकतो. इथे प्रेमाच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. तिला अनेक अधिकारांपासून वंचित ठेवलं जातं. त्या व्यक्तीच्या आयुष्यात इतरांचं स्थान एक तर आपल्यानंतर असावं किंवा नसावंच यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केला जातो. मग आपल्या जोडीदाराचा फोन त्याच्या नकळत तपासणं, तो कोणाला मेसेज करतो, कधी कोणाला भेटतो याचा जाब विचारणं, त्याने कोणाशी किती बोलावं याचे नियम ठरवणं, अशा गोष्टी घडताना दिसतात. इथे प्रेमाच्या रूपातील मत्सर दिसतो. आणि वर म्हटलं तसं याला वयाचं बंधन नसतं. माणसं आयुष्यभर असं वागू शकतात.
ही सगळी नावं केवळ उदाहरणं म्हणून घेतलेली आहेत. काही वेळा काही माणसं एकापेक्षा अधिक प्रकारचे पॅटर्न्स वागवतानाही दिसतात. या सर्वच प्रकारांत भीती, चिंता, नैराश्य, मत्सर या भावना प्रेमाचं रूप घेऊन आलेल्या असतात. आपल्या मेंदूची रचना अशी आहे, की प्राथमिक भावना काम करत असताना उत्क्रांत भावना शांत असतात. भीती, हाव, चिंता, संताप यातून येणारी सत्ता अनुभवताना प्रेमाचा अनुभव मिळू शकत नाही. काही लोक यापलीकडे जातात आणि मानसिक समस्येचा अनुभवही घेतात.
प्रेमातील अति चिंता, त्या व्यक्तीवरील संपूर्ण अवलंबित्व, त्या व्यक्तीचा मंत्रचळ लागल्याप्रमाणे (ऑब्सेशन) सतत विचार करत राहणं, संशयग्रस्तता आणि यातून येणारं नैराश्य या सगळ्या प्रेमासंबंधातील मानसिक समस्या आहेत. जिथे मानसिक समस्या आहे तिथे समुपदेशन आणि मानसोपचार उपयोगी पडतात. वर लिहिलेल्या व्यक्तींसारख्यांच्या प्रेमाच्या कल्पना नेमक्या अशा का झाल्या आहेत याची कारणं समजून घेणं, त्यांचा पॅटर्न समजून घेऊन त्यांनी स्वत:चं निरीक्षण करणं आणि या पॅटर्नमधून बाहेर पाडण्यासाठी काम करणं, हे मानसोपचारतज्ज्ञाच्या मदतीने शक्य होतं.
अल्बर्ट एलिस प्रेमाविषयी काय म्हणतो?
या मानसतज्ज्ञाच्या मते ‘माणसाच्या प्रेमाबद्दलच्या अपेक्षा त्याला त्रास देत नाहीत, तर त्याबद्दल असलेले हट्ट त्रासदायक असतात.' एलिसच्या मांडणीनुसार प्रेम ही माणसाची जैविक गरज नसून मानसिक आहे. मूल लहान असतं तेव्हा त्याची ती जैविक गरज असते. इतरांनी काळजी घेतली नाही, प्रेम केलं नाही तर बाळाच्या जिवावर बेतू शकतं, पण मोठेपणी ती ‘गरज' राहत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला प्रेमाचा हवा तसा प्रतिसाद नाही मिळाला तर तो जगण्या-मरण्याचा प्रश्न खरंच करायला हवा का? कारण यातून कोणीच आपल्यावर प्रेम करणारच नाही, असा काही अर्थ निघत नाही. त्यामुळे वरच्या उदाहरणातल्या सुनीता किंवा शेखरने स्वत:ला एक प्रश्न नक्की विचारावा, की आपल्याला आवडलेली व्यक्ती आपल्यालाच मिळावी ही माझी इच्छा आहे की हट्ट? संपूर्ण आयुष्य या एकाच गोष्टीभोवती फिरावं इतकी ती महत्त्वाची कधी झाली? बरं, इतकं करून समाधान मिळतं का? तर तेही नाही. त्यामुळे हे हट्ट सोडणं आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींबद्दल सहनशक्ती वाढवणं हे पर्याय त्यांच्याकडे असू शकतात.
एरिक फ्रॉम प्रेमाविषयी काय म्हणतो?
एरिक फ्रॉम म्हणतो- प्रेम ही कला आहे. ती जाणीवपूर्वक शिकली पाहिजे. कोणत्याही कलेप्रमाणे यात थिअरी समजून घेणं आणि त्याची प्रॅक्टिस करणं दोन्ही गरजेचं आहे. प्रेम ही खरं तर मिळवण्याची गोष्ट नाही, अनुभवण्याची आहे. प्रेम अनुभवायचं असेल तर स्वत:मध्ये काही मूलभूत बदल केले पाहिजेत. प्रेमाबद्दलचा मोठा गैरसमज म्हणजे प्रेमाच्या बाबतीत काय करायचंय समुपदेशन वगैरे. प्रेम करणं सोपं आहे, फक्त योग्य व्यक्ती मिळाली पाहिजे.
पण तसं नसतं, हे वरच्या उदाहरणांवरून दिसतंच. प्रेमात शिस्त आणि संयम अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आयुष्याची लय ज्याला सापडली त्यालाच प्रेम करता येतं. वरील उदाहरणांत प्रेमाच्या तिसऱ्या किंवा पाचव्या पॅटर्नमध्ये एक गोष्ट समान दिसते, ती म्हणजे एकटेपणाची भीती. ‘ॲबिलिटी टु बी अलोन इज द कन्डिशन फॉर द ॲबिलिटी टु लव्ह' असंही एरिक फ्रॉमचं एक वाक्य प्रसिद्ध आहे.
आपलं अस्तित्व आपल्याला झेपत नाही, म्हणून दुसऱ्या व्यक्तीची गरज लागत असेल तर ते प्रेम नक्कीच नाही. कारण आपल्या भावनांचं ओझं आपण त्या व्यक्तीवर टाकत असतो. हे होऊ द्यायचं नसेल तर रोज थोडा वेळ तरी स्वत:बरोबर घालवता येणं, त्या वेळी इतर कोणत्याही गोष्टी न करणं हे गरजेचं आहे. या वेळात आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी समजतात. आपली एकाग्रता जशी वाढते तसं आपण दुसऱ्याचं ऐकून घेऊ शकतो, त्या क्षणात पूर्णपणे राहू शकतो. सतत पुढे काय करायचं याचे विचार त्रास देत नाहीत आणि मागे काय काय चुकलं याची उजळणी होत नाही. यातून तादात्म्य पावण्याची क्षमता विकसित करता येऊ शकते.
मग करायचं काय?
आपल्या सगळ्या उदाहरणांमध्ये आणखी एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे टोकाचा आत्मकेंद्रीपणा. पण स्वतःच्या चष्म्यातून जगाकडे पाहण्याची सवय कमी करता येणं हे प्रेम करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आत्मकेंद्री नाही तर मग कसं असायला हवं? तर, वस्तुनिष्ठ राहता यायला हवं. त्यासाठी अंगी नम्रता असायला हवी, विवेकी विचार करण्याची क्षमता हवी. नाही तर आपल्या प्रिय व्यक्तीचा प्रत्येक शब्द आपल्याला हवा तसाच ऐकला जातो. त्या व्यक्तीची प्रत्येक कृती आपल्याला हवी तशीच पाहिली जाते. या सगळ्यासाठी आपल्या बुद्धीला जे योग्य वाटतं त्यानुसार जगण्याची ताकद कळीची असते, नाही तर सतत इतरांच्या म्हणण्याप्रमाणे जगण्याची सवय लागते.
सगळ्यात शेवटी, प्रेम ही भावना स्वत:बद्दल आणि जगाबद्दल आशा वाटायला लावणारी आहे. लहानपणापासून निरोगी प्रेम मिळालेली माणसं वेगळी दिसतात. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा. तो असा, की एखाद्या व्यक्तीला प्रेम ही भावना नीट अनुभवायला शिकायची असेल तर समाजात तशी मॉडेल्स आहेत का?
प्रेम कोणाला तरी मिळवण्याचा अट्टहास नाही, तर तो आयुष्यभर चालणारा प्रवास आहे. प्रेम ही करण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. कुणी तरी म्हटलं आहे- इष्क की बाजिया ना जितीया ना हारीया... त्यामुळे हार-जीत याच्या पलीकडे असणारी ही कला शिकणं हे अनेक मानसिक समस्यांवरील उत्तर आहे.
गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com
या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.