आम्ही कोण?
लेखमालिका : उकलता गुंता

उतारवयातील मानसिक गुंतागुंत

  • गौरी जानवेकर
  • 11.02.25
  • वाचनवेळ 11 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
ukalata gunta gauri janavekar lekhmalika

उतारवयामध्ये एकटेपण, स्वतःची उपयुक्तता सिद्ध करण्याची धडपड, सतत आठवणीत रमणं अशा अनेक प्रकारची मानसिक गुंतागुंत होऊ शकते. यातून निर्माण होणारे उतारवयातील ताण, सिंड्रोम्स आणि त्यावरील उपाय समजून घेण्याचा प्रयत्न..

माझ्या लहानपणी घराशेजारी एक आजी राहायच्या. त्यांची त्वचा सुरकुतलेली होती, पण चेहरा खूप मऊ लागायचा. मी त्यांच्या गालाला हात लावला की त्या गाणं म्हणायच्या- “म्हातारी बाई तुझं कातडं मऊ, डफळीला लावू गोड गाणी गाऊ!” त्या गाणं म्हणताना मी ताल धरून नाचायचे. आत्ता तो प्रसंग आठवला की थोडं अस्वस्थ होतं. वाटतं, उतारवयातील स्वत:ची उपयुक्तता पटवण्याची आजींची ती धडपड असावी का?

उतारवयात अनेक प्रकारची मानसिक गुंतागुंत होऊ शकते.

या समस्या समजून घेण्यासाठी आपण या लेखमालिकेतल्या पहिल्या लेखाचा आधार घेऊ. त्या लेखात आपण पाहिलं, की मानसिक आरोग्याच्या दृष्टीने लोकांचे चार भाग पडतात. काही लोक आत्मविकासात मग्न असतात, काही तणावग्रस्त आयुष्य जगतात, काही लोकांना मानसिक समस्या असतात, तर काही मानसिक आजारांना तोंड देत असतात. उतारवयसुद्धा याला अपवाद नाही.

उतारवयातले ताण समजून घेण्यापासून सुरुवात करू.

आजूबाजूच्या लोकांच्या तुलनेत आपण नेमके कुठे आहोत हे प्रत्येकजण सतत जोखत असतो. त्यावरून स्वतःचीच परीक्षा करत असतो. अगदी छोटं उदाहरण, म्हणजे सगळं जग जेव्हा सोशल मीडियावरचे संदर्भ देत असतं तेव्हा अनेक वृद्धांना ते बोलणं समजत नाही, कारण ते स्वतः सोशल मीडियावर नसतात. त्यामुळे आपण आताच्या वातावरणात ‘रेलेव्हन्ट' राहिलो नाही असं त्यांना वाटत राहतं.

तसं पाहायला गेलं तर कायमच पुढच्या पिढीला आधीची पिढी जुन्या वळणाची वाटत आली आहे. सायकल जाऊन मोटरसायकल आली, पाटा-वरवंटा जाऊन मिक्सर आला तेव्हा आधीची पिढी कशी जगली, असा प्रश्न पुढच्या पिढीला पडलेलाच असावा. आता मात्र तंत्रज्ञानात इतक्या झपाट्याने बदल होत आहेत, की वयात पाच वर्षं अंतर असलेल्या लोकांनाही एकमेकांच्या आयुष्यातले काही संदर्भ लागेनासे होत आहेत. आपण मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या दोन मानसिक गरजा असतात- आपण कोणत्याही गटाचा भाग आहोत का आणि त्या गटात आपण काही महत्त्वाची भूमिका पार पडत आहोत का, हे माणूस सतत पाहत असतो. जगण्याचे संदर्भ जसे बदलत जातात तसं आपलं आत्ताच्या काळातलं महत्त्व काय हेच शोधलं जातं. म्हणूनच व्हॉट्‌‍सॲपसारख्या माध्यमावर सर्वांत जास्त वेळ घालवताना कोण दिसतात? तर उतारवयातली माणसं. सतत इकडची माहिती तिकडे पाठवून ते मोठ्या समाजाचा भाग होऊ पाहतात.

आपला जगण्याचा संदर्भ केवळ तंत्रज्ञानाने बदलला आहे असं नाही, पण जगण्याची गती आणि बदलत जाणारी मूल्यव्यवस्था यामुळेही उतारवयात हा संदर्भ शोधताना गोंधळ होत राहतो. अशा वेळी माणूस पुन्हा पुन्हा जुन्या आठवणीमध्ये रमतो, किंवा आधीच्या सगळ्या गोष्टी कशा भारी होत्या हे सांगत राहतो. यात पुढल्या पिढीला सतत सल्ला देण्यापासून संस्कृतिरक्षकाच्या भूमिकेत जाण्यापर्यंत काहीही होऊ शकतं.

आपली भूमिकाच आपली ओळख बनते

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यभर काही ना काही भूमिका पार पडलेली असते. उदा. कर्ता पुरुष, उत्तम गृहिणी, कर्तव्यदक्ष अधिकारी, मुख्याध्यापिका. आपलं उतारवय ही भूमिकाच आपल्या हातातून काढून घेतं. तोपर्यंत जगण्यावर त्या भूमिकेचं नियंत्रण असतं. ती भूमिकाच निघून जाते तेव्हा आयुष्य अधांतरी वाटायला लागतं. विशिष्ट भूमिकेने आपल्याला विशिष्ट मर्यादेतली सत्ताही दिलेली असतेच. आपल्या प्रत्येकाच्या मनात ही सत्ता असते, ती कुठे आणि कोणावर चालू शकते हेदेखील आपल्याला माहीत असतं. आयुष्यभर असे हिशोब मनात चालू असतात. उदा. मी कमावती व्यक्ती आहे तर हे माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे. किंवा, स्वयंपाकघर माझ्या ताब्यात आहे तर घर चालवणाच्या पद्धतीही मीच ठरवणार.

हीच सत्ता दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना दिसते तेव्हा मग आपलं स्थान निश्चित करण्याचे प्रयत्न केले जातात. उदा. रमा एका कंपनीत एच.आर. विभागात कामाला लागली आणि हळूहळू प्रमोशन मिळत ती तिच्या विभागात उच्च पदावर पोहोचली. ती रुजू झाली तेव्हा भारतीय कंपन्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत अगदी प्राथमिक म्हणाव्या अशा टप्प्यावर होत्या. पण आता मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. नवी पिढी त्यात अत्यंत तरबेज आहे. रमा किंवा तिच्या समकालीन सहकाऱ्यांनी जीव ओतून तयार केलेल्या प्रक्रिया रद्दबातल ठरत आहेत, अशा वेळी कामावर आता आपलं नियंत्रण राहिलं नाही याची रमाला तीव्रतेने जाणीव होते.

सुनील त्यांच्या कुटुंबातला पहिला इंजिनियर. अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्याचं स्वत:चं घर होईपर्यंत त्याची पन्नाशी आली, पण त्याच्या मुलाची तिशीतच दोन घरं झाली. सुनीलला मुलाचा अभिमान तर आहेच, पण आपण जे काही केलं त्याचं कुटुंबात नेमकं कसं मूल्यमापन होतं हे त्याला कळेनासं झालं आहे. घर करण्यासाठी त्याने पैशांची बचत केली, विशिष्ट प्रकारचं नियोजन केलं. त्याला वाटलं, हीच जगण्याची चांगली पद्धत आहे. आता पुढची पिढी वारेमाप खर्च करते, तरी त्यांची दोन घरं होऊ शकली. मग आपण केलं ते काय होतं, असे प्रश्न त्याला आता पडू लागले आहेत.

एकाकीपण उतारवयात जास्त त्रास देतं

ज्यांची मुलं कामानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा देशात असतात त्यांनी आधीपासून त्यासाठीचं मानसिक नियोजन केलं नसेल तर त्यांना एकाकीपण जास्त छळतं. जगण्यात होत जाणारे असे बदल वयाच्या प्रत्येक टप्प्यावर समोर येतात, ते त्रासदायकही ठरू शकतात, उतारवयात ते जास्त जाणवतात. बदलातून येणाऱ्या चिंतेबद्दल आपण एका लेखात चर्चा केल्याचं तुम्हाला आठवत असेलच. अशा बदलाची तयारी आधीपासून झाली असेल तर त्याचा उपयोग होतो. उतारवयात आपल्या अनुभवांचा इतरांना उपयोग करून द्यावा, पण अधिकार गाजवला जाऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. मला माहीत आहे, की हे इथे लिहिणं जितकं सोपं आहे तितकं प्रत्यक्षात आणणं अवघड आहे. उदा. समजा माझ्या हातातून समुपदेशन काढून घेतलं तर माझं आयुष्य कसं असेल? पण हेही वास्तव आहे, की मी आयुष्यभर हे काम करू शकणार नाही. म्हणून भूमिका आणि जगण्याचं उद्दिष्ट यात फरक करता येणं गरजेचं असतं.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणारा सगळ्यात मोठा बदल म्हणजे मृत्यू.

जन्मापासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेगवेगळ्या बदलांना तोंड देत असतो. मात्र, आपल्या अवतीभोवती जे काही चालू आहे त्याचा आपण भाग असणार आहोत याची आपल्याला शाश्वती असते. पण उतारवयानंतर वयाचा पुढचा कोणताही टप्पा उरत नाही. त्यानंतर येतो तो मृत्यू. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्याची भीती असते. आपल्या समाजात अनेक ठिकाणी मृत्यूचा उल्लेख करणंही टाळतात. जणू काही तो आपल्या आयुष्याचा भागच नाही. त्यामुळे काही माणसं मृत्यू नाकारत राहतात. मृत्यू नाकारतात म्हणून वय होणंही नाकारतात. सतत आपल्या वयापेक्षा लहान दिसण्याचा अट्टहास धरणं, स्वत:च्या शरीरावर अनेक प्रयोग करणं, अशा गोष्टींत ते गुंतलेले असतात. अशा वेळी वय होतंय हे मान्य करणंही ताणाचं ठरतं. तर काही प्रकारचे लोक केवळ मृत्यूनंतरच्या आयुष्याचाच विचार करत राहतात. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य अशा कल्पना इतक्या मोठ्या होतात, की आयुष्य नगण्य वाटू लागतं. त्यामुळे होतं काय, की मृत्यू आयुष्यातलं वास्तव आहे हे विसरलं जातं. त्याचा समंजसपणे स्वीकार करून आयुष्याचं नियोजन होत नाही. मग उतारवयात स्वत:च्या मृत्यूचा विचार धास्ती वाढवतो, तर जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे एकाकीपण येण्याची भीती वाटते.

अनेक विचारवंत असं मानतात, की आपण सगळे मृत्यूला घाबरतो, कारण तो प्रवास एकट्याचा आहे. जन्मानंतर आईपासून बाळाची नाळ कापली जाते त्या क्षणी त्या एकटेपणाचा प्रवास सुरू होतो, पण तरीही आयुष्यभर आपल्या अवतीभवती माणसं असतात. मृत्यू मात्र फक्त आपलाच प्रवास असतो, म्हणूनच त्याबद्दल समाज म्हणून चिंतन व्हायला हवं. हा प्रवास शांततेने होण्यासाठी त्याचा स्वीकार कसा करावा याबद्दल समाज म्हणून काही तरी तत्त्वज्ञान तयार होणं गरजेचं आहे. अगदी लहान वयापासून मृत्यूचा सकारात्मक विचार कसा रुजवावा यासाठी प्रयत्न व्हायला हवा. हे झालं उतारवयातल्या मानसिक तणावाबद्दल.

या वयात मानसिक समस्याही असू शकतात

त्या मुख्यत्वे दोन प्रकारच्या असतात- एक म्हणजे भविष्याबद्दलची चिंता आणि दुसरी म्हणजे भूतकाळाबद्दल नैराश्य. तुम्ही म्हणाल, चिंता नेहमी भविष्याबद्दलच असते, मग इथे असं वेगळं का लिहिलं आहे? तुम्हाला आठवत असेल, याआधीच्या एका लेखात आपण दोन प्रकारच्या चिंता पाहिल्या होत्या. उतारवयात त्याशिवाय आणखी एक चिंता सतत वाटत असते, ती म्हणजे स्वत:च्या तब्येतीची काळजी. साधं पोट दुखलं तरी मनात नाही नाही त्या शंका येतात, किंवा घरात कोणी नसताना आपण पडलो, आपल्याला काही झालं तर काय, या विचाराने मन व्याकूळ होतं, अस्वस्थता जाणवते. त्याचा परिणाम झोपेवर होतो. यातून येणारी दुसरी समस्या म्हणजे ‘सोमटोफॉर्म'. यात सतत शरीराच्या काही ना काही तक्रारी जाणवतात. लक्षणं खरीच दिसतात, पण लक्षणांची मुळं शारीरिक नसून मानसिक असतात. वारंवार सगळ्या तपासण्या केल्या तरी त्यातून काहीच निघत नाही. ती व्यक्ती ऐकायला तयार नसते. त्यामुळे घरची इतर मंडळीही वैतागतात.

उतारवयात बऱ्याचदा नैराश्यही येऊ शकतं

उतारवय हा सिंहावलोकनाचा काळ असतो. आत्तापर्यंत आपलं आयुष्य नेमकं कसं गेलं याचा मनात सतत आढावा घेतला जातो. एरिक एरिकसन या मानसशास्त्रज्ञाने प्रत्येक वयाचे टप्पे आणि त्यातील मानसिक संघर्ष सांगितले आहेत. प्रत्येक व्यक्ती जन्मापासून आलेल्या अनुभवांमधून काही तरी अर्थ काढत असते. हे अर्थ मुख्यत्वे स्वत:बद्दल आणि जगाबद्दल असतात. लहानपणापासून स्वत:बद्दल किंवा जगाबद्दल अविश्वास निर्माण झाला असेल किंवा न्यूनगंड तयार झाला असेल आणि त्यात सजगपणे बदल घडवण्याचा कधीच प्रयत्न झाला नसेल तर त्याचा परिणाम उतारवयापर्यंत दिसत राहतो. आपण आत्तापर्यंत जे काही जगलो ते आपल्या मनासारखं नव्हतं असं वाटू लागतं. यातून नैराश्याची सुरुवात होते. आणि आता इतका उशीर झालाय की आपण काहीच बदलू शकत नाही असंही वाटू लागतं.

केवळ उतारवयात होणारे काही मानसिक आजार आहेत त्यांची थोडी ओळख करून घेऊ या

उतारवयात अनेकांना शारीरिक व्याधी सुरू होतात. डायबेटिस आणि ब्लडप्रेशर हे जणू काही असणारच हे गृहीत धरलं जातं. उतारवयाबरोबर हे आजार येणारच हे खरंच गृहीत धरलं पाहिजे का? अनेकदा शारीरिक समस्यांमागे मानसिक कारणं असतात. खूप वर्षं मानसिक ताण घेऊन शरीर थकतं, आणि मग उतारवयात लक्षणं दिसू लागतात, पण मन शांत असलं तर याचं प्रमाण कमी ठेवता येऊ शकतं.

या वयात सुरू होणारे काही मुख्य मानसिक आजार

डेलिरियम, डिमेन्शिया (अल्झायमर्स), डिप्रेशन. याला 3-डी असंही म्हणतात. या आजारांमागेही चिंता आणि नैराश्य हीच प्रमुख कारणं असतात. या आजारांमध्ये माणसाचा स्मृतिभ्रंश होतो. डेलिरियममध्ये अचानक बदल दिसतो, तर डिमेन्शियात तो हळूहळू वाढत जातो. खरं तर याला आजारापेक्षा ‘सिण्ड्रोम' म्हटलं पाहिजे. यात माणूस अगदी जवळच्या व्यक्तींना ओळखेनासा होतो. सकाळी नाश्ता केल्याचं विसरून घरातल्या लोकांवर चिडचिड करू लागतो, मला घरचे उपाशी ठेवतात, असे आरोप केले जातात. कधी कधी बाहेर गेल्यावर घराचा पत्ता विसरतात. डेलिरियम बरा होऊ शकतो, डिमेन्शिया मात्र वाढतच जातो. यासाठी फक्त वृद्ध व्यक्तींसाठी वेगळे मानसिक उपचार असतात. त्याला ‘जेरिॲट्रिक सायकिॲट्री ॲन्ड सायकोथेरपी' असं म्हणतात.

पण फक्त एवढंच पुरेसं नसतं. एकूण, समाजात वावरताना वृद्ध व्यक्तींसाठी किती सोयी-सुविधा उपलब्ध असतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आताची भारतातली सार्वजनिक वाहतुकीची अवस्था आणि रस्त्यावरील रहदारी पाहिली, तर तुम्हाला काय वाटतं, वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडायला किती सुरक्षित वाटत असेल? त्यातून एकटेपण कमी होत असेल की वाढत असेल?

उतारवयातल्या मानसिक समस्या आपण पाहिल्या. उतारवयाकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते, त्यात बदल करायला हवेत का, हेदेखील प्रत्येकाने तपासून पाहायला हवं.

अगदी लहान वयापासून शरीरात पेशी तयार होतात, पुढे नष्ट होतात. म्हणजे निर्मिती होणं आणि नष्ट होत जाणं ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. बालवय आणि किशोरवय यात शारीरिक वाढ झपाट्याने होते, म्हणून त्याला वाढीचं वय म्हणतात आणि म्हातारपणी शारीरिक झीज दिसते म्हणून त्याला उतारवय म्हटलं जातं. पण उतारवयातही शरीरात पेशी तयार होण्याचं काम पूर्णपणे थांबलेलं नसतं. अगदी साधी दिसणारी वाढ म्हणजे नखं, केस वाढत असतातच; पण त्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाची वाढ होताना दिसते, ती म्हणजे आयुष्याचे जितके अधिक अनुभव तितकी मेंदूतल्या पेशींमध्ये ‘कनेक्शन्स' तयार होतात. बोलीभाषेत आपण यालाच ‘शहाणपण' म्हणतो. हे लहान वयात इतक्या प्रमाणात होत नाही, कारण त्यासाठी तितका अनुभव गाठीशी असणं फार महत्त्वाचं असतं.

माजी विश्वसुंदरी सुश्मिता सेनला एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला, की तुला परत तरुण होण्याची संधी मिळाली तर ती तू घेशील का? त्यावर ती पटकन उत्तरली, की ‘आता मला जे जगण्याचं शहाणपण मिळालं आहे ते जर जाणार असेल तर मला असं तारुण्य नको.' हे म्हणत होती विश्वसुंदरी, जिच्या कामात तरुण असणं हेच भांडवल असतं.

उतारवय म्हणजे आपण आयुष्यभर जपलेले नियम, तत्त्व यांना प्रश्न विचारण्याचा काळ असतो. मनातील टोकाची द्वंद्वं मिटवणं, आयुष्यभर जपलेले अहंकार, राग सोडून देता येणं, म्हणजे ‘इंटेग्रिटी'च्या पातळीला पोहोचणं. हे करता आलं तर उतारवय शांततेत जातं नाही तर नैराश्य दाटून येतं. काही लोक उतारवयात आयुष्यभरातल्या कटू घटना आठवत बसतात; तर काहीजण आयुष्यभर जपलेले पूर्वग्रह, धारणा, टोकाचे मतभेद याबद्दल चिंतन करून ते बदलण्याचा प्रयत्न करतात.

वर म्हटल्याप्रमाणे आपल्या मनात अनेक बाबतींत द्वंद्वं असतात. उदा. एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर लाइमलाइटमध्ये राहायची सवय असते. ते घडलं तरच त्याला सुरक्षित वाटतं. मग उतारवयात त्या व्यक्तीला विं.दा. म्हणतात तसं ‘गाजण्यास अर्थ किती'? असा प्रश्न पडू लागतो. काही माणसं आयुष्यभर अत्यंत काटेकोर वागणारी असतात. त्यांना ढिसाळ माणसांचा अतिशय राग येतो. आपणच कसे बरोबर आहोत आणि इतर माणसं कशी काम करत नाहीत हे ते आयुष्यभर सिद्ध करत राहतात. पण उतारवयात शांतपणे विचार केला, तर स्वत:च्या अतिशय काटेकोर असण्यामागची चिंता आणि ढिसाळ माणसांच्या वागण्यामागची कारणंही समजू शकतात. मग अशी माणसं इतरांबद्दलही अधिक सहृदयी होतात. अशाप्रकारे माणसाच्या मनातील अनेक द्वैत गळून पडतात आणि अद्वैताचा अनुभव घेता येऊ शकतो. फक्त आधीच्या अनेक मानसिक त्रासांतून स्वत:ला मुक्त करता आलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते उपाय योग्य वेळी करायला हवेत. असं झालं तर उतारवय हा समस्यांचा नसून मानसिक उन्नतीचा काळ ठरू शकतो. कवी बा. भ. बोरकर वर्णन करतात तसं- जीवन त्यांना कळले हो, ‘मी'पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो।'

गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com

या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 6

अपर्णा भोर 12.02.25
खूप छान.
प्रविण तोवर12.02.25
मला आवडल.
Priti Sakhadeo11.02.25
Namaskar! Tumche lekh avarjun vachte. Avdtat. Thanks for the series.
Sureshanju dixit 11.02.25
म्हातारपण हे बालपण सारखेच असते....लहान मुल आपल्या कडे इतरांचे लक्ष जाण्यासाठी रडतात....mhataryane काय करायचे, त्याला तसे रडायची ही सोय नसते....त्याचे हुंदके मुके असतात, जवळच्या माणसानी ते समजून घ्यायला हवे ....स्वतःहून मी पणा sodata आला तर बरेच प्रश्न सुटतात, पण तेही तेव्हढे सोपे नाही...प्रत्येक mhataryachi स्क्रिप्ट Vegali असते, त्याप्रमाणे त्याला ते नाटक padada पडे पर्यंत वठवणे भाग आहे....लेख आवडला...खूप विचार करायला लावला तुम्ही....
Mangala Gaikwad 11.02.25
अतिशय सुरेख विषयाचे प्रतिपादन केले आहे. अभ्यासपूर्ण लेख.
YASH11.02.25
WA!! BAROBAR AHE . WAQT KISI KE LIYE RUKTA NAHI HAI.
See More
navi-pidhi-navya-vata.webp

Select search criteria first for better results