
गौतम वैष्णव रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप घेतोय असं कळलं आणि मी ती संधी वाया जाऊ न द्यायचं ठरवून नाव नोंदवलं. रॉक बॅलन्सिंग म्हणजे लहान-मोठे दगड एकावर एक रचून साधलेला बॅलन्स.
आधी थोडंसं गौतमबद्दल. हा अवलिया कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये दगड बॅलन्स करता करता mindfulness चे धडे देतो. तो शाळांमध्येही वर्कशॉप घेतो. एकाग्रता वाढवण्यासाठी दगड कसे मदत करतात ते विद्यार्थ्यांना समजावतो. आत्तापर्यंत सहा हजारांहून अधिक लोकांना त्याने ही कला शिकवली आहे.
मुळात रॉक बॅलन्सिंग असं काही असतं आणि त्याचं वर्कशॉप घेतलं जातं हेच मला योगायोगाने समजलं.
आपण लहानपणी लगोरी खेळायचो, ते आठवतंय? ते देखील एक प्रकारचं रॉक बॅलन्सिंगच. पण तिथे एक उतरंड होती. आता जो प्रकार शिकायला गेले होते तिथे दगडांच्या आकारानुसार असा क्रम असायलाच हवा असं बंधन नव्हतं.

या फोटोवरून लक्षात येईल, वीट एका टोकावर खालच्या दगडावर बॅलन्स केली आहे. वीट हातात देऊन जेव्हा गौतमने आम्हाला विचारलं, की ही वीट या एका टोकावर खालच्या दगडावर बॅलन्स करणं शक्य आहे का? तेव्हा पटकन ‘हो’ म्हणायला जीभ काही रेटेना. पण गौतम विचारतोय म्हणजे हे होत असणार असंही वाटत होतं. म्हटलं करून बघूया प्रयत्न.
अर्थात वीट बॅलन्स करण्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला. सुरवातीला छोटे दगड एकावर एक रचायलाही कठीण वाटत होतं. साधा, सोपा दगड लावायला जमला तरी ‘भारी!’ वाटत होतं. प्रत्येक दगड वेगळा, त्याला बॅलन्स करताना करावा लागलेला विचार, प्रयत्न वेगळा. दुपारपर्यंत असेच छोटे छोटे प्रयत्न करायचे होते. अधेमध्ये गौतम मदत करत होता.
लंच ब्रेकनंतर त्याने आम्हाला दगडांशी खेळायला, बोलायला मोकळं सोडलं. दगड बॅलन्स करण्याची एकेक पायरी सर केल्यावर तो अधिक कठीण दगड बॅलन्स करायला हातात आणून देत होता.
बॅलन्सिंगचे प्रयत्न करत असताना फोटो काढायचं सोडाच, पण मोबाईल हातात देखील घ्यायचा नाही अशी सक्त ताकीद असल्याने माझा तरी मोबाईल बॅगेत गप पडून राहिला होता. (हे सगळे फोटो त्याने स्वत: काढून नंतर शेअर केलेत.)
काठीण्य पातळीचे एक-एक टप्पे पार करत गेले. एका विशिष्ट टप्प्यानंतर गौतमने वीट हातात दिली. वीट बॅलन्स करण्याचे बरेच प्रयत्न आधी फोल ठरले. अगदी जमलंय वाटता वाटता फिस्कटले. पण तो म्हणाला, “प्रयत्न सोडू नका, मनात येणारे इतर विचार बाजूला सारून लक्ष संपूर्ण वीट आणि दगडावर द्या. वीट कुठे बॅलन्स होईल हे ती वीटच सांगतेय, ते ऐका.” तर वीटेचं म्हणणं ऐकायला जीवाचे कान केले. म्हणजे ती कुठे झुकतेय, कुठे पाय रोवल्यासारखी पकड जाणवतेय, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला.
आणि एक क्षण असा आला, की वीटेचं सांगणं एकदम व्यवस्थित कळलं आणि ती चक्क एका कोनावर उभी राहिली.
‘जमत नाही’ ते ‘जमलं’, एका क्षणाचं अंतर होतं. पण ते पार करायला काहींना ५ मिनिटं लागली, काहींना १०, तर काहींना १५-२० मिनिटं लागली होती. प्रत्येकाने आपापल्या गतीने तो टास्क पूर्ण केला. दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याने प्रत्येकाने आपापल्या यशाचा आनंद १०० टक्के अनुभवला.

फोटोत दगडांच्या खाली लाकडी सांगाडा दिसेल. सर्वात तळातला दगड हलू नये यासाठी केलेली ती सोय आहे. गौतमनेच स्वत: ते डिझाईन करून घेतलं आहे. त्याने आम्हाला बेसचा दगड देतानाही सुरवातीला बऱ्यापैकी खडबडीत दगड दिला होता. दुपारनंतर जसे आम्ही एक एक लेव्हल पार करत गेलो तसं मग जरा कमी खडबडीत ते बऱ्यापैकी सपाट दगड दिले गेले. त्याला विचारलं, तर तो म्हणाला, की आता त्याचा इतका सराव झालाय की त्याला कोणताही पृष्ठभाग वर्ज्य नाही. त्याने किती प्रयोग केलेत हे बघायला त्याचं इंस्टाग्राम प्रोफाईल बघाच एकदा. ‘आss’ वासला जातो. आम्ही बेसिक लेव्हलवरच धडपडत, शिकत आनंद मानत होतो.
दगडावर दगड बॅलन्स करण्याचं कसलं आलंय वर्कशॉप? ते ही फी भरुन? आणि काय मिळणार ते शिकून? करायचं काय पुढे त्या रचनेचं? याबद्दलचे कोणतेही प्रश्न माझ्या मनात येण्यापूर्वी आणि इतरांनी ते विचारण्यापूर्वी मी नाव नोंदवून वर्कशॉपला गेले ते एक बरं झालं. काही गोष्टी फक्त अनुभवण्याच्या असतात. त्या का करायच्या हे कळायला ती तल्लीनता, ती झिंग अनुभवावीच लागते. नाहीतर मी कितीही काही सांगितलं तरी ते तोकडंच ठरेल.
दगड काही कायमस्वरूपी बॅलन्स होत नाहीत. रचना केली, तिचा आनंद घेतला आणि ती मोडून पुढची रचना करायला सुरवात केली, इतकं साधंसोपं होतं हे. Mindfulness practice, meditation अशी भारदस्त नावं द्या किंवा let go करायचा पाठ, never give up चा पाठ शिकवणारी कला म्हणा... माणसाच्या फिलॉसॉफीकल जगात या कलेला कशाशी जोडता याच्याशी दगडाला देणंघेणं नाही. पण माणसाला त्याच्या जगात जगायला पूरक अशा बऱ्याच गोष्टी दगड शिकवून जातात.
एकाग्रता, संयम हे या कलेचे by-products. मुख्य काय मिळतं? तर आनंद. सध्या तरी साध्या, सोप्या रचना करण्यापुरतंच थोडंफार जमतंय. कदाचित ध्यास घेऊन केलं तर आणखीही नक्की जमेल. आणि तितकं नाही जमलं तरी कुठे बिघडलं? इतकेच धडे परत परत गिरवायलाही मजा येतेय.
आजपर्यंत खिजगणतीतही नसलेल्या रस्त्यावरच्या दगडांनीही आता लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली आहे. आता हा प्रवास वर्कशॉपबाहेरही सुरूच राहणार आहे.
(मी केलेलं वर्कशॉप पूर्ण दिवसाचं होतं. पण गौतम वैष्णव काही ठिकाणी कॅफेमध्ये दोन तासांची वर्कशॉप्स देखील घेतो. गौतम वैष्णवचा संपर्क क्रमांक +919762124690)