
चिंतेचे तीन प्रकार असतात, तसेच उदासीनतेचेही तीन प्रकार असतात. मागच्या वेळी आपण पूर्णत्वाबद्दलच्या चिंतेबद्दल बोललो. दुसऱ्या दोन चिंता, म्हणजे भविष्य आपल्या हाताबाहेर जाईल का याची सततची धाकधूक आणि आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील का याची भीती. या चिंता वाढायला लागल्या की मनात एक प्रकारची हतबलता येते...
हतबलता
ऋतूजला सतत कोणी तरी बरोबर लागतं. आजूबाजूला सतत माणसं असावीत यासाठी तो प्रयत्न करतो. कारण आपण एकटे पडलो आणि काही अडचणी आल्या तर आपल्याला त्या सोडवता येणार नाहीत याची त्याला भीती वाटते. आजूबाजूला माणसं नसली तर उदासीनता त्याला घेरायला लागते. तरीही कधी कधी एखादा क्षण असा येतोच जेव्हा तो पूर्ण एकटा असतो. अशा वेळी अंगातलं सगळं त्राण गेलं आहे आणि आपण काहीच करू शकत नाही, असं त्याला वाटायला लागतं.
काही माणसं अडचणीतून मार्ग काढायला तयार असतात, प्रश्न सोडवायला त्यांना मजा येते, तर काही मात्र हात-पाय गाळतात. जरा काही मनाविरुद्ध झालं तर लगेच खट्टू होणं, सगळी शस्त्रं टाकून देणं, असं का होत असावं? रोजच्या आयुष्यात आपल्या आसपास अशी माणसं दिसतातच. उदा. लांबच्या प्रवासाला निघालं आणि थोडक्यात गाडी चुकली तर काही माणसं पटकन दुसरा पर्याय शोधतात, उशिरा का होईना, ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. पण काही माणसं मात्र स्वतःला किंवा इतरांना दोष देत राहतात. प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा दोष देण्यामध्ये जाते.
मार्टिन सेलिंगमनचा प्रयोग
इथे मार्टिन सेलिंगमन या मानसशास्त्रज्ञाने आधी प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर केलेल्या प्रयोगांबद्दल सांगायला हवं. काय होते हे प्रयोग?
१. पहिल्या प्रयोगात त्याने दोन खोक्यांमध्ये काही कुत्र्यांना ठेवलं. एका खोक्यातल्या कुत्र्यांना उडी मारून बाहेर जाण्याची सोय होती, दुसऱ्या खोक्यातल्या कुत्र्यांना मात्र तशी सोय नव्हती. मग दोन्ही खोक्यांतल्या कुत्र्यांना हलका शॉक दिला गेला. पहिल्या खोक्यातले कुत्रे उडी मारून सहज निघू शकले, तर दुसऱ्या खोक्यातले कुत्रे बाहेर निघू शकले नाहीत. नंतर सगळ्यांना अशा खोक्यांमध्ये हलवण्यात आलं जिथे प्रयत्न करून बाहेर पडता येऊ शकत होतं. पण तरीही आधी दुसऱ्या खोक्यात असलेले कुत्रे बाहेर पडले नाहीत. कारण त्यांना तोपर्यंत सवय लागली होती, की आपण कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग होणार नाही.
२. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष माणसांना लागू होतात का यावर अनेकदा वाद होतात. म्हणून या प्रयोगानंतर माणसांवर एक प्रयोग केला गेला. माणसांच्या एका गटाला एका ठिकाणी बसवून तिथे मोठ्या आवाजात संगीत लावलं गेलं. त्यांनी अनेकदा विनवणी करूनही संगीताचा आवाज कमी केला गेला नाही. काही वेळानंतर त्यांनी प्रयत्न करणंच सोडून दिलं. या दोन्ही प्रयोगांमध्ये कुत्र्यांना आणि माणसांना त्यांच्या अनुभवामुळे हतबलता आली (लर्न्ड हेल्पलेसनेस).
संजना, पस्तीस वर्षांची स्त्री. ही अनेक वर्ष कौटुंबिक हिंसाचार सहन करत आलेली आहे. त्यातून तिला अनेक शारीरिक व्याधी जडल्या आहेत. मानसिक ताणतणाव वाढला आहे, नातेसंबंध दुरावले आहेत; पण ती त्यावर उपाय काढत नाही. कारण तिला वाटतं, हे असंच चालू राहणार, यात काहीच बदल होणार नाही. अनेक लोकांना असा कौटुंबिक हिंसाचाराशी सामना करावा लागतो. त्यातून उपाय काढणं त्यांच्यासाठी बहुतेकदा अवघड असतं पण अशक्य नसतं; पण आजूबाजूच्या अवघड परिस्थितीमुळे त्यांची हतबलता वाढीस लागते, हतबलतेहून वेगळे विचारच त्यांना करता येत नाहीत, आणि मग त्या परिस्थितीमधून बाहेर पडणं त्यांच्यासाठी अधिकाधिक अवघड होत जातं.
पन्नाशीच्या घरातला विशाल गेली अठरा वर्षं एका कंपनीत नोकरी करत आहे. त्याला त्या कामात अजिबातच आनंद आणि समाधान मिळत नाही; पण या कंपनीत काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, अशी त्याने पक्की समजूत करून घेतली आहे. आपण काहीही केलं तरी आत्ताची परिस्थिती बदलू शकत नाही, असं त्याला अगदी मनापासून वाटतं. त्यामुळे तो अडकला आहे, हतबल झाला आहे.
अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला असतात. ते सोडून इतर अनेकांकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं असू शकतात. पण जे लोक त्या प्रश्नात अडकले आहेत त्यांना ती उत्तरं सुचत नाहीत किंवा इतरांनी सुचवलेले उपाय पटत नाहीत.
अशी अनुभवातून हतबलता येते त्यामागची आणखी काही कारणं बघू या.
अति काळजी करणारे पालक
सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसणारं उदाहरण म्हणजे अति काळजी करणारे पालक. असे पालक आपल्या मुलांना कोणताच अनुभव स्वतंत्रपणे घेऊ देत नाहीत. प्रत्येक गोष्ट मुलांच्या हातात आयती दिली जाते. अगदी रोजची शाळेची तयारी करणं असो, किंवा मुलांच्या असाइनमेन्ट्स नाही तर अभ्यासाव्यतिरिक्त शाळेतले काही प्रकल्प असोत, त्यांत येणाऱ्या अडचणी त्यांचे पालकच पुढे होऊन सोडवतात. त्यामुळे कोणतीही परिस्थिती स्वत: समजून घेऊन हाताळण्याची क्षमता मुलांमध्ये तयार होत नाही. मग होतं असं, की मोठेपणीही अशी मुलं अडचणी, संकटांतून मार्ग काढण्यासाठी इतरांवर अवलंबून राहतात.
लहानपणी झालेले शारीरिक अत्याचार
सगळ्याच माणसांना काही रम्य लहानपण मिळत नाही. काहींच्या वाट्याला काही प्रकारचे अत्याचार येऊ शकतात. कधी नात्यातल्या कुणा व्यक्तीकडून लैंगिक छळ झालेला असतो. अशा वेळी मुलांना मदत मिळाली नाही, अत्याचार सहन करण्यात खूप काळ गेला तर जगाकडे बघण्याची त्यांची एक वेगळी, विशिष्ट दृष्टी तयार होते. आपण अशा परिस्थितीत कायमचे अडकलेले राहणार असं त्यांना वाटायला लागतं.
तिसरं कारण सहजी आपल्या लक्षात न येणारं आहे- भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्ती.
अशा संकटांत सापडलं तर माणसाच्या नियंत्रणात काहीच राहत नाही. अशा वेळी अनेकांचं आयुष्यभर कमावलेलं सगळं जातं. कधी जवळच्या व्यक्तींना गमवावं लागतं. अशा व्यक्तींना पुढे दीर्घकाळ किंवा कधी कधी उर्वरित संपूर्ण आयुष्य हतबलता अनुभवायला येते. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातात काहीच नाही यावर त्यांचा विश्वास बसतो. अवकाळी पावसात किंवा सलग पडणाऱ्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही तेव्हा अशीच अवस्था होते.
कधी कधी राजकीय निर्णय असे काही घेतले जातात की त्या भागात राहणाऱ्यांच्या आयुष्यावर कायमस्वरूपाचे परिणाम होतात. उदा. युद्ध. ज्या भागात दीर्घकाळ युद्ध सुरू असतं किंवा कायम युद्धजन्य स्थिती असते, तिथली माणसं ही परिस्थिती कधीच बदलू शकत नाही, याच विचाराला धरून राहतात. आपल्या पिढ्यान्पिढ्या यातच जाणार, अशी त्यांची भावना प्रबळ होत जाते.
थोडक्यात, आत्तापर्यंत जे काही घडलं आहे त्यात आपण अडकून गेलो आहोत आणि पुढे कधीच आपल्या मनासारखं होऊ शकणार नाही ही धारणा नैराश्याकडे नेते. असे अनुभव घेणाऱ्या सर्वांनाच नैराश्य येईल असं नाही. पण हतबलतेचे विचार आणि भविष्याविषयीची निराशा यामुळे नैराश्य येण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.
हताशेची कारणं
भविष्याबद्दल नकारात्मक विचार करणारी माणसं कोणत्या प्रकारची असतात याबद्दल अब्रामसन या मानसतज्ज्ञाने सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार हताश होणाऱ्या लोकांच्या विचारांमध्ये तीन वैशिष्ट्यं असतात.
१. पहिलं म्हणजे असे लोक त्यांच्या स्वतःच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काहीही वाईट झालं तरी त्याचा दोष स्वत:ला देतात. त्यांना असं वाटतं, की आपण कमी पडलो म्हणूनच असं घडलं. उदा सविता, एक उच्चशिक्षित तरुणी. मूल झाल्यानंतर तिने नोकरी सोडून पूर्ण वेळ गृहिणी म्हणून काम करायचं ठरवलं. मुलाचं संगोपन नीट करता यावं, हा तिचा मुख्य उद्देश होता. पण त्यामुळे हळूहळू असं होत गेलं, की मुलाला एखादी लहानशी गोष्ट जरी जमली नाही तरी ती स्वत:ला त्याचा दोष द्यायला लागली. मुलाला एखाद्या विषयात कमी मार्क मिळाले तरी आई म्हणून आपण कमी पडलो असं तिला वाटतं. आणखी एक उदाहरण. अरुणची आई वृद्धापकाळाने गेली. अरुणने आईला शक्य ते सगळे चांगले उपचार दिले. तरीही त्याला सतत असं वाटत राहतं, की आपण आणखी चांगले उपचार द्यायला हवे होते, म्हणजे आईला आणखी आयुष्य मिळालं असतं. सविता आणि अरुण दोघांच्याही उदाहरणांमध्ये काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असू शकतात हे त्या दोघांनाही मान्य नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जे काही वाईट झालं ते आपल्यामुळेच झालं.
२. दुसरा प्रकार म्हणजे अशी माणसं नकोशी परिस्थिती कायमस्वरूपी मानतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी काही ना काही अडचणी येतात; पण ती परिस्थिती कधी ना कधी दूर होणार आहे, परिस्थितीची तीव्रता एक ना एक दिवस कमी होणार आहे, असा विश्वास आपल्याला असतो. आता कधीच काही चांगलं होऊ शकत नाही असं काही आपल्याला वाटत नाही. पण हे सर्वांच्या बाबतीत घडत नाही. अडचणी, समस्या आल्या की काही माणसं त्याला स्वतःचं नशीब मानतात. आपण काहीही केलं तरी यात काही आता बदल होणार नाही, असं धरून चालतात. उदा. प्रवीणच्या लहानपणापासून त्याने घरात आर्थिक ओढाताण पाहिली. नंतर त्याचेही काही निर्णय असे घेतले गेले की त्यामुळे तो देखील आर्थिक विवंचनेत अधिकच अडकत गेला. आणि त्याचं असं पक्कं मत झालं, की अशा प्रकारच्या आर्थिक ताणतणावातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही. त्यातूनच तो पुन्हा पुन्हा गर्तेत अडकत जात राहिला.
३. तिसऱ्या प्रकारची माणसं वैश्विक पातळीवर हताश विचार करणारी असतात. म्हणजे काय ते सांगते. एखाद्या बाबतीत, एखाद्या प्रसंगी आपल्याला काही कटू अनुभव येतात. जग कायमच न्याय्य असण्याची खात्री कधीच मिळत नाही. तरी वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या प्रसंगीही तसंच घडेल, कटू अनुभवच येतील असं काही नसतं आणि हे आपण जाणून असतो. पण या प्रकारच्या माणसांना मात्र असं वाटतं, की आपण कुठेही गेलो तरी लोक वाईटच असतात. आपण कायम जागरूक राहिलं पाहिजे, नाही तर जग आपल्याला फसवतं. त्यामुळे असे लोक कोणावर विश्वास ठेवू शकत नाहीत. उदा. अमोलला असं वाटतं, की आपण कुठेही कामाला लागलो तरी आपलं शोषणच होणार आहे. त्यामुळे तो कुठेच मनापासून काम करू शकत नाही. सगळीकडे हातचं राखून असतो. त्यामुळे त्याला कामातून मिळणाऱ्या समाधानापासून वंचित राहावं लागतं. श्वेताला वाटतं, की या जगात कोणीच विश्वास ठेवण्याजोगं नाही, कुणीही आपल्या माहितीचा गैरवापर करू शकतं. त्यामुळे ती कोणत्याच व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. सतत स्वत:च्या आयुष्याबद्दल गुप्तता पाळण्याचा ताण तिला सहन करावा लागतो.
वाईट घटनांमधून आपण काय अर्थ काढतो
अशा प्रकारच्या विचार करण्यामुळे माणसाच्या मनात हतबलता येते. हतबलतेमुळे हळूहळू नैराश्य येतं. आयुष्यातल्या वाईट घटनांमुळे नैराश्य येतं हे अर्धसत्य आहे. वाईट घटना आणि त्यांचा त्या-त्या व्यक्तीने काढलेला अर्थ या दोन्ही गोष्टी नैराश्याला कारणीभूत असतात. त्यामुळे कटू अनुभवांमधून, वाईट घटनांमधून आपण काय अर्थ काढतो हे सतत तपासून पाहिलं पाहिजे.
अर्थात, हे तपासणंसुद्धा तारतम्याने व्हायला हवं. अत्याचारांना किंवा हिंसेला सामोरं जावं लागलेल्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झालेला असतो. अशा वेळी केवळ तुमचे विचार बदला, सगळं ठीक होईल, असं म्हणता येत नाही. अत्याचार, उपासमार, शिस्तीच्या नावाखाली झालेल्या जीवघेण्या शिक्षा, युद्धपरिस्थिती अशा एखाद्या अनुभवाने काही आजार होतात. उदा. पीटीएसडी (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिस्ऑर्डर). इथे हतबलता आली असेल तर औषधोपचार गरजेचे असतात, त्याचबरोबर मानसोपचार सुद्धा आवश्यक असतात. काहींच्या बाबतीत असे उपचार दीर्घकाळ चालतात. अशा अनुभवांमुळे माणसाच्या मेंदूमध्येही बदल होतात. त्यांचा भावनिक मेंदू सतत जागरूक असतो. उपचारांदरम्यान त्यांना सततच्या भावनिक चढउतारांना सामोरं जावं लागतं. कधी नुसतं झोपून राहावंसं वाटतं, काम करायचा कंटाळा येतो. मात्र, यासाठी स्वत:ला दोष न देता उपचारांमध्ये सातत्य राखणं गरजेचं असतं.
स्वत:ला विचारायचे प्रश्न
हिंसा, अत्याचार इतक्या टोकाचे अनुभव नसतील तरीही हतबलता असेल आणि त्यातून नैराश्य जाणवत असेल तर मानसोपचारांची मदत होऊ शकते. वर म्हटल्याप्रमाणे तीन प्रकारच्या विचारांवर काम करावं लागतं. हे करताना आपण स्वत:ला पुढील प्रश्न विचारू शकतो :
१. खरंच सगळी परिस्थिती माझ्या आटोक्यात आहे का? काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात. कधी मानवी प्रयत्नांना मर्यादा असू शकतात. अशा वेळी परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करणं हाच उपाय असतो. उदा. वरच्या उदाहरणातल्या सविताच्या मुलाचं स्वत:चं असं वेगळं व्यक्तिमत्त्व आहे, त्यातून निर्माण होणारे अनेक पैलू आहेत. त्यामुळे त्याला योग्य वाटेल असं तो वागू शकतो. एखादवेळेस सविताला ते आवडलं नाही, तरी त्यामुळे ती आई म्हणून कमी पडली असा त्याचा अर्थ होत नाही. तसंच अरुणच्या बाबतीत, आईसाठी शक्य तितकं सगळं करून झालेलं असताना त्याने मानवी प्रयत्नांच्या मर्यादा मान्य करायला हव्यात. मृत्यू कुणालाच चुकलेला नाही हे स्वीकारायला हवं.
२. दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाच्या बरोबर उलट आहे- मी खरंच सगळे प्रयत्न करून पाहिले आहेत का? वर आपण सेलिंगमनचा प्रयोग पहिला, त्यातल्या लोकांसारखी तर आपली परिस्थिती नाही ना? काही काळापूर्वी खूप प्रयत्न करून उपाय सापडला नाही, म्हणून आपण प्रयत्न करणंच सोडून दिलं आहे का? इतर काही पर्यायांचा शोध घ्यायला हवा का? उदा. वरच्या उदाहरणातल्या प्रवीणने कधी तरी स्वतःलाच विचारायला हवं, की मी सारखा त्याच परिस्थितीत का अडकतो आहे? माझ्या काही सवयी बदलायला हव्यात का? आर्थिक साक्षरता वाढवायला हवी का?
३. एकदा कटू अनुभव आला तर सगळीकडे तसंच होईल याला काही पुरावा आहे का? आपण दुखावले जाऊ ही भीती इतकी मोठी करायची का, की जगणंच राहून जाईल? आपण जगावर थोडा विश्वास ठेवून तर पाहू. असं केल्याने आपल्या नियंत्रणात असणाऱ्या आणि नसणाऱ्याही गोष्टी आपल्याला समजू शकतील, यावरचा विश्वास वाढवायला हवा.
आपण मागच्या आणि या लेखामध्ये मिळून पाहिलेले चिंता आणि उदासीनतेचे प्रकार मानसिक आरोग्याच्या मुळाशी आहेत. चिंता आणि उदासीनतेची तीव्रता जेवढी जास्त तितक्या मानसिक समस्या अधिक. प्रत्येक मानसिक समस्येचं नाव वेगळं असेल पण मुळं इथेच सापडतील. त्यामुळे स्वतःचा, आपल्या जवळच्या माणसांचा आणि जगाचा विनाअट स्वीकार जितका अधिक तितके प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय सापडतील आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवता येईल.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात म्हटल्या जाणाऱ्या एका प्रार्थनेने शेवट करू या. या प्रार्थनेचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो :
जे टाळणे अशक्य, दे शक्ति ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धि देवराया !
गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com
या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.